पसायदान(संत ज्ञानेश्वर)

संत ज्ञानेश्वर--पसायदान ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्यरचनेतून उलगडून दाखवले आहे.आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे(श्रुतिप्रस्थान)ब्रह्मसूत्र(न्यायप्रस्थान)भगवद्गीता(स्मार्तप्रस्थान) अशी प्रस्थानत्रयी आहे.प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे,प्रवृत्तीकडून निव्रुत्तीकडे हा जीवनाचा प्रवास आहे. आत्मोन्नती हे साध्य व प्रस्थानत्रयी हे साधन आहे.उपनिषदे संस्कृत मध्ये असून त्यातील तत्वज्ञान अभ्यासाला अवघड आहे.भगवद्गीतेत ते सुलभपणे सांगितले आहे आणि ज्ञानेश्वरांनी तर ते अनेक उपमा,दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले आहे. हे तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे.मह्राठियेचिये नगरी।.ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।ही ज्ञानेश्वरी मागील उदात्त बैठक आहे. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरुपी यज्ञ सिध्दीस नेला.हा यज्ञ सात्विक यज्ञ आहे कारण तो करणे हे कर्तव्य आहे असे मानून फलाची अपेक्षा न ठेवता केला गेला आहे,त्या साठी आवश्यक असे तप केले आहे.या तपश्चर्येतून हा वाक्-यज्ञ सफल झाला व त्यातून ‘ज्ञानेश्वरी’नावाचे अमृत निघाले .आतां या विश्वात्मक देवाने तोषून (आनंदित होऊन) संतुष्ट अंत:करणाने पसायदान द्यावे अशी प्रार्थाना केली आहे. संताचे हे पसायदान व्यत्त्तिगत हितासाठी नसते तर अखिल सजीवस्रुष्टीच्या कल्याणासाठी या शुभकामना असतात.”जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा” अशी ती विश्वव्यापी प्रार्थना असते.ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येतो.ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा वाङ्मयरुपी यज्ञ सिध्दीला नेल्यानंतर जसे पसायदान मागितले तसा संत नामदेवांनी “आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळा । माझिया सकळां हरिच्या दासां ।।” असा क्रुपाप्रसाद मागितला.संत तुकाराम म्हणतात,”हें चि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा “.समर्थ रामदासांनी श्रीरामाजवळ मागितलेलें पसायदान असे आहे “कल्याण करी देवराया।जनहित विवरी ।। तळमळ तळमळ होत चि आहे। हे जन हाति धरी ।। संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे.

          आतां विश्वात्मके देवे । येणें वाग्यज्ञे तोषावें ।
           तोषुनि मज द्यावें । पसायदान हें ।।

ज्ञानेश्वरांनी ज्या विश्वात्मक देवाकडे प्रसाद मागितला आहे तो देव कोणता? या प्रश्नाचे उत्तर ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्ययात दिले आहे. “आतां विश्वात्मकु हा माझा स्वामी निवृतिराजा “आत्मज्ञानाने परिपूर्ण असलेला अतिशय विद्वान महापुरुष निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे सद्गुरु आहेत तोच विश्वात्मकु देवु आहे असे ज्ञानदेव म्हणातात.त्यांनी या या यज्ञाने संतुष्ट होऊन आपणास पसायदान द्यावे ही ज्ञानेश्वरांची पहिली प्रार्थना ! निष्कामता,दृढ आत्मबुध्दी, शुध्दज्ञान,समाधान, उदासिन, कामनारहित वृत्ती, सारासार विचार, निर्मळ आचार,अखंड स्वरुपाकारता,ही दासबोधात वर्णिलेली सद्गुरीची मुख्य लक्षणें ज्याच्या ठिकाणी सर्वार्थाने वसत आहेत अशा निव्रुत्तीनाथ यांच्याकडे संत ज्ञानेश्वर पसायदानांत दुसरी मागणी करीत आहेत.

            जे खळांची  व्यंकटी सांडो।तया सत्कर्मी रती वाढो
             भूतां परस्परें  पडो । मैत्र जीवाचे ।।'

या ओवीमध्ये तीन गोष्टी मागितल्या आहेत खळ म्हणजे दुष्ट. व्यंकटी म्हणजे कुटिलपणा. जेवढे वाईट आचरण आहे वाकडेपणा आहे त्याला व्यंकटी म्हणायचे खळांच्या म्हणजे दुष्टांच्या अंतःकरणामधील कुटिलपणा जावो ही पहिली मागणी आहे. कुटिलपणा गेल्यानंतर तया सत्कर्मी रती वाढावी, सत्कर्मे त्यांच्या हातून घडावीत आणि त्यामध्ये त्यांना गोडी निर्माण व्हावी असे दुसरे मागणे मागितले अवघ्या प्राणिमात्रांची परस्परांशी मैत्री व्हावी आणि त्यामुळे अवघ्या प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे अशा तीन गोष्टी या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी मागितल्या आहेत.संत ज्ञानेश्वर हे कारक पुरुष आहेत,अवतारी पुरुष नाही.संस्कृतमधील कारक या शब्दाचा अर्थ आहे तप,अत्यंत सात्विक तप करणारा महापुरुष म्हणजे कारकपुरुष तपाने माणुस शुध्द,सात्विक होत जातो.सद्गुरु निवृत्ति नाथांच्या आदेशा प्रमाणे अज्ञानी लोकांना ज्ञानमार्गाकडेनेण्यासाठी,जनसामान्यांना भक्तिमार्गाची शिकवण देण्यासाठी,धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहीली आहे. समाजातला सात्विकपणा हे कारक पुरुष जपत असतात.त्यामुळे सज्जनांचे परित्राण होते पण दुष्टांचे हनन करता येत नाही.व्यास,वाल्मिकि ,शंकराचार्य हे कारक पुरूष होऊन गेले .कारकपुरूष उत्तमातले उत्तम या मातीत रुजावे या साठी सतत प्रयत्न करतात.ज्ञानेश्वरां सारखे संत हेच कार्य करतात.समाजांत खल निर्माण होण्याची तीन कारणे आहेत. चांगले संस्कार न लाभणे,कर्माचे कर्तुत्व स्वत:कडे घेणे ,तीव्र वासनांचे दमन न करता येण.आतां या दुष्टांचे हनन तर संतांना करता येत नाही पण त्यांचा दुष्टपणा कमी करता येतो.बुध्दीला इच्छेची जोड न देता बोधाची जोड देवून दुष्टांचे परिवर्तन संत करतात.चांगले करणे(कृत) चांगले करविणे,(कारित)चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे (अनुमोदित) या प्रकारे संत हे कार्य करीत असतात.त्यामुळे सामान्य लोकांमध्ये सत्कर्मांची आवड निर्माण होते.जे कर्म आपल्या वाट्याला आले ते पार पाडणे म्हणजेच सत्कर्मामधली गोडी वाढवणे अशी गोडी जेव्हां वाढीस लागते तेव्हां खळांची व्यंकटी कमी होत जाते.अहंकार कमी होतो,इच्छा कमी व्हायला लागतात,सुसंस्काराचे महत्त्व पटू लागते.सत्कर्माची गोडी वाढत असतांना परस्परांतील मैत्री वाढत जाते.मनुष्य भक्तीने,आत्मज्ञानाने विनयशील बनतो,सहनशील होताना मनाने व्यापक बनत जातो.मत्सर,द्वेष लयाला जातात.सगळ्यांची एकमेकांशी निर्व्याज मैत्री व्हावी अशी ज्ञानदेवांची इच्छा आहे,हेच पसायदानांत त्यानी मागितले आहे.या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी सद्गुरु चरणीं मागणे मागितले आहे ते असे-

        दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।

. जो जे वांछील तो ते लाहो ।प्रणिजात ।।

येथेही ज्ञानेश्वरांच्या तीन मागण्या आहेत.दुरित म्हणजे पापतिमिर म्हणजे अंधार!पापरुपी अंधार नाहिसा होऊ दे ही पहिली प्रार्थना.आता तिमिर जाण्यासाठी सूर्योदय झाला पाहिजे.ज्ञानेश्वरांना जो सूर्य अभिप्रेत आहे तो स्वधर्मरुपी सूर्य आहे.तो उदयाला येवो अशी दुसरी विनंती आहे.तिसरी मागणी विश्वातील सर्व प्राणिजाता साठी आहे.जो जे वांछील म्हणजे ईच्छा करील ती वस्तू किंवा गोष्ट त्याला प्राप्त होवो अशा या तीन अलौकिक मागण्या आहेत की ज्या मुळे हे पसायदान वैश्विक पातळीवर पोचले आहे.दुरित या शब्दाचा अर्थ आहे असत्य!याचा विरुध्द शब्द आहे ऋत. ऋत म्हणजे वैश्विक सत्य.ज्यामुळे अवघ्या विश्वाची धारणा होते असे विश्वात्मक नियम.हे नियम नुसत्या बुध्दीने धारण करता येत नाहीत,त्या साठी प्रज्ञेची जरुरी असते आणि बुध्दीला बोधाची जोड मिळाली तरच प्रज्ञा निर्माण होते.दुरितांचे तिमिर जावो कारण जिथे तिमिर आहे तेथे अविद्या व पाप आहे.जेथे ऋत आहे तेथे ज्ञान व पुण्य आहे.दुरित जर घालवायचे असेल तर ऋताची कल्पना मनांत ठसली पाहिजे,आणि ती ऋतंभरा प्रज्ञेवर अधिष्ठित झाली पाहिजे. ज्ञानेश्वर म्हणतात की,’दुरितांचे तिमिर जायला हवे असेल तर विश्वांत स्वधर्मरुपी सूर्याचा उदय व्हायला पाहिजे.स्वधर्म आणि सत्कर्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.स्वधर्म आचरला तरच त्याला सत्कर्म म्हणता येईल.व्यत्तिगत स्वार्थासाठी केलेले कर्म ते दुष्कर्म.लोककल्यासाठी केलेले कर्म स्वधर्माचे पालन करणारे आहे म्हणुनच ते सत्कर्म होय.

        ‘जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात’।।

स्वधर्मसूर्याचा प्रकाश पसरावा म्हणुन आपण स्वधर्माचे आचरण केले पाहिजे त्यामुळे आपल्या सर्व इच्छा आपोआपपूर्ण होतील.स्वधर्म कामधेनूप्रमाणे इच्छापूर्ती करणारा आहे,कारण त्याला बैठक स्वकर्माची आणि स्वधर्माची असणारआहे.या स्वधर्मासाठी सगळ्यांना प्रवृत्त कसे करायचे या प्रश्नाचे ऊत्तर ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत दिले आहे.

        वर्षत सकळ मंगळीं ।ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
         अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ।।'

संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणारी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सर्व प्राणिमात्रांना अनवरत म्हणजे निरंतर भेटत राहो असे मागणे मागितले आहे.ज्ञानेश्वर म्हणतात,जे ईश्वरनिष्ठ आहेत त्यांची मांदियाळी म्हणजे समुदाय एकत्र येऊन सर्व प्राणिमात्रांवर संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करु दे।.तो वर्षाव झाला की,माणसे स्वकर्माला कधीही चुकणार नाहीत.समुदायातील सर्व माणसे सारख्या पात्रतेची नसतात.बध्द,मुमुक्ष,साधक,सिध्द अशा विविध पातळीवरची असतात.बध्दापासून सिध्दापर्यंतचा प्रवास सुकर होण्यासाठी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सतत निरंतर,अखंड भेटत राहिली पाहिजे आणि त्यांनी संपूर्ण ,काहिही राखून न ठेवतां कल्याणाचा वर्षाव केला पाहिजे तरच परमार्थाचा मार्गसापडू शकेल.ईश्वरनिष्ठा निर्माण होण्यासाठी आधी ईश्वर कसा आहे हे समजून घेतले पाहिजे.मंदिरामध्ये सजवून ठेवलेली मूर्ती किंवा घरातील धातुची अगर पाषाणाची मूर्ती संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत नाही. ईश्वर हा स्वयंभू आहे स्वत:च्या निरपेक्ष आनंदासाठी तो प्रकट होतो.दुसरी खूण अशी की,तो कर्ता असूनही अकर्ताआहे.माणसाच्या बुध्दीला तो अगम्य आहे.तो अमूर्त असूनही मूर्त होतो.आतां ईश्वराचे स्वरुप समजल्यावर त्याच्यावर निष्ठा निर्माण होते.असे ईश्वरनिष्ठ आत्मज्ञानी असतात.त्यांच्या हातात विवेकाचा चाबूक असतो.ते आमची देहबुध्दी नाहिशी करतात.ते अविवेकाचा अंधार दूर करतात तेथे विवेकाचा लखलखीत दिवा लावतात.ते अनवरत म्हणजेअखंड,निरंतर भेटत राहावेत.कारण त्या शिवाय स्वाध्याय होणार नाही.सातत्य राहणार नाही.अशी सदिच्छा संतं ज्ञार्नेश्वरांनी व्यक्त केली आहे. हे भक्तीचे अमृत वाटत नघालेले ईश्वरनिष्ठ कसे आहेत याचे वर्णन संत ज्ञानदेव पुढील ओवीत करीत आहेत.

        ‘ चलां कल्पतरुंचे आरव । चेतनाचिंतामणींचे गाव .
         बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।'

ह्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीला संत ज्ञानेश्वरांनी सुरेख उत्प्रेक्षा अलंकाराने सजवले आहे.हा ईश्वरनिष्ठांचा समुदायनसून जणू काही नाना वृक्षवेलींनी,फुलाफळांनी बहरलेले सुंदर उपवन (आरव) आहे. हे आरव असामान्य आहे हे इच्छिले फळ देणाय्रा कल्पवृक्षांनी व्यापलेले आहे.आणि हे कल्पतरु (ईश्वरनिष्ठ संताची मांदियाळी ) अलौकिक आहेत कारण ते एका ठिकाणि स्थिर राहाणारे नसून चल म्हणज (चालते,बोलते ) कल्पतरू आहेत. या संत समुदाया साठी संत ज्ञानेश्वर दुसरी अप्रतिम उत्प्रेक्षा वापरतात. ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी नसून जणू काही चिंतामणीचे गाव च आहे चिंतामणी मनातिल ईच्छा पूर्ण करणारा काल्पनिक ,अचेतन मणी असतो पण संतरुपी चिंतामणी सचेतन असून जनकल्याणा साठीं भक्तीचे अमृत कुंभ घेऊन अमृत वाटत निघाले आहेत.ह्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळी साठी संत ज्ञानेश्वरांनी आणखी एक अनन्यसाधारण उत्प्रेक्षा वापरली आहे.ते म्हणतात,हा संत समुदाय नसून अर्णव म्हणजे सागर आहेत.पण हा अर्णव खाय्रा पाण्याचा किंवा दुधाचा सागर नसून अमृताचा महासागर आहे.विशेष म्हणजे हा सागर सचेतन असून जनसामान्यांच्या कल्याणा साठी त्यांना भक्तिरुपी अमृताचे (पीयुषाचे) पान घडवतात.आतां हे संत असतात कसे?त्यांना ओळखावे कसे?या साठी संत ज्ञानेश्वरांनी या संतांची काही लक्षणे सांगितली आहेत. असे संत चंद्र आणि सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत असे वर्णन संत ज्ञानेश्वर करतात.

        चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
         ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे  होतु ।।

पौर्णिमेचा पूर्ण चंद्र जरी बघितला तरी त्याच्यावर डाग आहे.पण ईश्वरनिष्ठ संत निष्कलंक असतात.मार्तंड म्हणजे सूर्य तेजाचा झगझगीत अग्नीगोल,तो तापहीन असूच शकत नाही.पण संत हे ज्ञानरुपी मार्तंड आहेत.त्याचे तेज दाहक नसून शीतल आहे.ते ज्ञानाचा प्रकाश देऊन अविद्येचा नाश करतात पण अगदी सौम्यपणे.पूर्ण चंद्राच्या शीतल चांदण्यांचा ते वर्षाव करतात.संतांच्या ठिकाणी चंद्राचा कलंक नाही आणि सूर्याची दाहकताही नाही.सूर्याला उदय अस्त आहे,चंद्राला क्षय आहे पण ईश्वरनिष्ठ संत सदा सारखेच आहेत.त्यांना डावे-उजवे,कमी-ज्यास्त,अशी कसलिही उणीव नाही ते सदा परिपूर्णच आहेत.ते आपल्या ठिकाणीच रममाण झाले आहेत.ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंभ आहेत. ते विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत. किंवा ब्रह्मविद्येचे अवयवच आहेत . (ज्ञानेश्वरी )आत्मप्रचितीचा ,,ब्रह्मसाक्षात्काराचा ,आत्मानुभावाचा अर्थ संतांच्या सहवासात उलगडतो.म्हणून संत ज्ञानेश्वर सांगतात की ते संत सज्जन तुमचे सोयरे होऊ देत आणि तुम्हाला सर्व सुखाचा लाभ होऊ दे.असे लोकोत्तर संत सामान्य जनांना प्रपंच्याच्या विळख्यातून बाहेर काढतात,त्यांची दु:खे पूर्णत:नाहीशी करतात.असे संत आपले सोयरे झाले तर मग काय होईल हे ज्ञानेश्वर पुढिल ओवीत सांगत आहेत.

              किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं
               भजिजो आदिपुरखीं । अखंडित ।।

ज्याच्या चित्तांत निरंतर समाधान ,शांती असते त्यांना संत म्हणावे.ही शांती कोणत्याही बाह्य गोष्टींवर ,वस्तूंवर,चित्ताच्या लहरीवर ,प्रवृतींवर अवलंबून नसते.ज्ञानयोगात जशी ज्ञाता ज्ञान,ज्ञेय अशी त्रिपुटी असते तशी ती कर्मयोगात,ध्यानयोगात,व भक्तियोगामधे आहे.ही त्रिपुटी जिंकल्याशिवाय चिरशांती प्राप्त होत नाही.संतांनी ही त्रिपुटी सांडलेली असते.ज्ञानेश्वर म्हणतात एवढे पसायदान गुरूकडे मागून झाले.आणि मग म्हणतात,किंबहुना म्हणजे फार काय सांगावे तर त्रैलोक्य सर्व सुखाने पूर्ण होऊन त्याने आदिपुरुषाचीअखंडित उपासना करावी,भजन करावे.ज्ञानेश्वर हे विश्वमानव आहेत.त्यांचे मागणेही अत्यंत व्यापक स्वरुपाचे आहे.ते जे दान मागत आहेत ते केवळ पृथ्वीवरील मानवासाठी नाही तर स्वर्ग,पृथ्वी,पाताळ या वरील देव,मानव,दानव या सर्वांसाठी आहे.तिन्ही लोकं परिपूर्णहोऊन आदिपुरुषाला शरण जावो,त्याची अखंडित पूजा करो असे हे विश्वव्यापी मागणे आहे.या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी सर्वसुखी हा अगदी समर्पक शब्द वापरला आहे .आपल्या व संतांच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत.आमची सुखे मर्यादित असतात तर संतांचे सुख विश्वात्मक असते कारण ते आत्मतत्वाचे असते.आपले सुख इंद्रियजनित ,कनिष्ठ असते कारण ते क्षणभंगूर असते. ज्ञानेश्वरीच्या 18व्या आध्यायांत ज्ञानेश्वरांनी सुखाची व्याख्या केली आहे.”जीवाला आत्म्याच्या संबंधातून जे प्राप्त होते, म्हणजे जीवात्मा परमात्मा झाल्यानंतर त्याला जी अनुभूती येते त्याला सुख म्हणायचे.आतां हा आदिपुरुष कोण आहे,ईशतत्व कोणतेआहे याचे ही उत्तर संतांनी दिलेआहे.आपण अनेक देवदेवतांचे गणपती,देवी,राम,कृष्ण,ब्रह्मा,विष्णु,महेश पूजन करीत असतो पण प्रत्येकाला झालेली अनुभूती एकाच चैतन्यतत्वाची असते.सगुणाची उपासना करतांना हळूहळ शुध्द होऊन निर्गुणाकडे जाता येते.म्हणून ‘येक नाना प्रतिमा’,येक अवतार महिमा,येक अंतरात्मा,आणि चौथा जो परमात्मा आहे तो वेगळा.पदार्थ!,वस्तु नाशवंत असतात परमात्मा अविनाशी आहे.त्या आदिपुरुषाची पूजा मांडायची आहे ती सात्विक सुखाची आहे,तामस किंवा राजस नाही.निद्रा,आळस आणि प्रमाद यांच्यावर आधारलेले सुख सन्मार्ग दाखवू शकत नाही तर सात्विक सुख जे प्रारंभी विषासारखे,परिणामी अमृतामध्ये बदलणारे आहे ते सन्मार्गदर्शक असते.(भगवद्गीता) आपल्याला आदिपुरुषाचे भजन केव्हा करता येईल असा प्रश्न निर्माण होतो.अनासक्त कर्मयोग जो आचरतो,ज्याला आत्मज्ञान झाले त्याला आदिपुरुषाचे भजन सहज मांडता येईल.अशा असामान्य संतांना समाजमान्यता मिळण्यास वेळ लागत नाही.मानव देह प्राप्त झाल्यावर आत्मोनतिचा प्रयत्न करावा असे संत सांगतात व त्या साठी त्यांनी नवविधा भक्तिचा मार्ग सुचवला आहे.त्यातही श्रवणभक्तिला प्रधान स्थान देण्यात आले आहे.धार्मिक ग्रथांचे श्रवण,वाचन किंवा त्यांचा अभ्यास म्हणजे श्रवण भक्ती की ज्यामुळे उत्तम संस्कार चित्तावर उमटतील.व त्यातले ज्ञान आत्मसात होऊन आत्मोनतीचे दरवाजे खुले होतील.म्हणुन संत ज्ञानेश्वर म्हणतात--

“ आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकीं इयें ।

  दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ।।”

‘ग्रंथोपजीविये’म्हणजे ग्रंथ हेच तुमचे जीवन होऊन जावो.किंवा तुमचे जीवन ग्रंथरुप होऊन जावो.ग्रंथामध्ये वर्णिलेला आत्मसाक्षात्कार प्रत्यक्ष अनुभवास येवो.अशा असामान्य ग्रथांची व्याख्या समर्थ रामदासांनी केली आहे

जेणे परमार्थ वाढे ।अंगी अनुताप चढे ।आणि भक्तिसाधन आवडे । त्या नाव ग्रंथ ।

ज्य मुळे धैर्य वाढते,निश्चय बळावतो,परोपकार घडतो,सर्व शंकांचे निरसन होते,बुध्दी निश्चयात्मक बनते त्याला ग्रंथ म्हणायचे.अद्वैतापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा ग्रंथ नाहीअसे अनेक जाणकारांणचे मत आहे.ज्याच्या योगाने विरक्ती व भक्ति उत्पन्न होत नाही,जो मोक्षलाभ देत नाही तो ग्रंथच नव्हे.अवगुणांचे रूपांतर सद्गुणांमध्ये करुन माणसाची अधोगती टाळली जाते,हे ज्याच्या श्रवण ,अध्ययनाने घडते तो खरा ग्रंथ.त्याचे वाचन केले तर परमेश्वराचा निदिध्यास लागतो. तो आदिपुरुष कोण व तो कसा आहे हे हळूहळू समजते.अद्वैतामध्ये भक्तीचे जे अंग आहे ते प्राप्त करुन घ्या असे संत ज्ञनेश्वर सांगतात,म्हणुन ग्रंथोपजीविये होतांना कर्म ही पहिली पायरी आहे.नंतर भक्ती व ज्ञान आहेत.

या मृत्युलोकामधे जो मनुष्यदेह लाभलेला आहे तो अत्यंत क्षणभंगूर आहे पण तो आत्मोन्नतीसाठी दिला आहे याची जाणिव ठेवून जो ग्रंथाचे अध्ययन करतो,तो दृष्ट व अदृष्ट दोन्हीवर विजयी होतो.दृष्ट म्हणजे जे प्राप्त झाले ते,आणि अदृष्ट म्हणजे जे प्राप्त व्हायचे ते.आपल्या वाटेला आलेले भोग किंवा-सुखदु:ख त्याला म्हणतात दृष्ट.अदृष्ट म्हणजे आपले संचित जे केव्हातरी आपल्यापुढे प्रकट  होणार आहे,म्हणून ते अदृष्ट.आपले संचित म्हणजे पूर्वकर्म साठलेले आहे ते प्रारब्ध होऊन उभे राहाणार आहे.त्यालासामोरे जाण्यासिठी क्रियमाण,चांगले करून संचित निर्माण

करायला हवे की जे शुभ संचित असेल.क्रियमाण कर्मातूनसंचित निर्माण करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे.या इहलोकी,ज्याला मर्त्यलोक असे संबोधण्यात येते येथे आपला देह क्षणभंगूर आहे,याचे भान ठेवून हा ग्रंथच (ज्ञानेश्वरी) आपले जीवन बनवण्याचा व दृष्ट- अदृष्टावरविजय प्राप्त करण्याचा मनोदय केला पाहिजे.या प्रयत्नात आपल्याला यश द्यावे अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वर सद्गुरुंच्या चरणी करीत आहेत.सगळ्या मानवांची प्रकृती हळूहळू संस्कृतीकडे वळावी.लोककल्याणाचा मार्ग त्यांना दिसावा म्हणून संतज्ञानेश्वरांनी हे विश्वव्यापी ,विलक्षण मागणे मागितले आहे.प्रवृत्तिकडून निवृत्तिकडे जाणारा खरा धर्म येथे सुफल झालाआहे.आत्मज्ञानाचा हा कृपाप्रसाद सर्वांना लाभेल असे निवृत्तिनाथ संतुष्ट होऊन म्हणाले.

         येथ म्हणे श्रीविश्वेशरावो ।हा होईल दानपसावो ।
           येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।

हा विश्वाचा राव कोण आहे?जो प्रत्यक्ष आदिपुरूष सद्गुरु निवृत्तिनाथांच्या रुपाने प्रकटला आहे.तो विश्वेश्वर संतुष्ट झाला आणि तथास्तु म्हणाला.’हा होईल दानपसावो।’हे दान असे आहे की,देणार्याला जास्त सुख व घेणार्याला कमी सुख देणारे आहे.तो कृपाप्रसाद सर्वांना लाभेल असे वरदान सद्गुरुंकडून मिळाले त्यामुळे ज्ञानेश्वरांना अतीव सुख झाले. खळांची व्यंकटी सांडेल,सत्कर्मी रती वाढेल ,सर्व प्राणिमात्रांची परस्परांशी मैत्री होईल.अज्ञानाचा ,पापाचा अंध्:कार नाहिसा होईल,विश्वात स्वधर्मरुपी सूर्य उदयाला येईल,प्राणिमात्रांच्या मनातिल सर्व इच्छा संपूर्ण होतील,ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या भूतलावर प्रकट होईल,सर्वांना आत्मकल्याणाचा मार्ग सुकर होईल.जे साक्षात् कल्पतरुंची वने आहेत,चेतना चिंतामणींची गावे आहेत,अमृताचे महासागर आहेत,येथील संत सज्जन सूर्यासारखे तेजस्वी असूनही दाहक नाहीत,चंद्रासारखे शीतल असूनही निष्कलंक आहेत.हे सगळे प्राप्त होईल असा कृपाप्रसाद सद्गुरुंकडून मिळाला आहे आणि संत ज्ञानेश्वरांचे पसायदान सिध्दीस गेले आहे.

                संदर्भ ग्रंथ    -----पसायदान----
                                     विद्यावाचस्पति
                                     शंकर   अभ्यंकर

संत ज्ञानेश्वर अभंगमाला

संपादन

तेराव्या शतकापासून म्हणजे सुमारे सातशे वर्षांपासून ज्ञानदेवांची अमृतवाणी मराठी मनाला रिझवित आली आहे.आजही ज्ञानेश्वरीचे वाचन घरोघरी चालत असलेले दिसते. ज्ञानेश्वरी म्हणजे शारदेच्या गळ्यातील देशीकार लेणे म्हटले पाहिजे .ज्ञानेश्वरांचा जीवनकाल इसवी सन 12 75 ते 12 96 असा आहे अशा अल्प जीवनामध्ये त्यांनी साहित्यक्षेत्रात ,अध्यात्मिक क्षेत्रात अविस्मरणीय कार्य केले आहे आपल्या प्रतिभेला अध्यात्माची जोड देऊन त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली.अमृतानुभव चांगदेव पासष्टी, अभंगाची गाथा ,ज्ञानेश्वरी हे ग्रथ संत ज्ञानदेवांचे मानले जातात. ज्ञानदेवांच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य सिद्धांत अद्वैताचा चा आहे.सर्वत्र एकच आत्मतत्त्व भरून राहिले आहे आत्माच सर्वत्र भरला आहे ,ज्ञानदेवांनी मांडलेला विचार हा चिदविलास वाद म्हणून ओळखला जातो त्यांच्या मते जग हे परमात्मास्वरूप आहे. ज्ञानदेवांच्या उपलब्ध अभंगांची संख्या 765 आहे या अभंगातून पंढरी महात्म्य , विठ्ठलमहात्म्य, संतसमागम,नामस्मरण,सदाचाराचा उपदेश असे विविध विषय हाताळले आहेत. हे अभंग सध्या,सहज,उत्कट शब्दात लिहिलेले असल्याने साध्याभोळ्या ,सहृदय माणसाच्या मनाची पकड घेतात.भावनेची आर्तता ,कल्पनेची विशालता आणि शब्दांची कोमलता या तिन्ही गुणांचा संगम ज्ञानदेवांच्या लेखनात झाला आहे .अशा मार्मिक शब्दांत शं.गो.तुळपुळे यांनी अभंगवाणीविषयी आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.

अभंग---1

सकळमंगळनिधी। श्रीविठ्ठलाचे नाम आधी ।।1।। म्हण कां रे म्हण कां रे साचे ।श्री विठठलाचे नाम वाचे ।।2।।पतित-पावन साचें । विठ्ठलाचे नाम वाचे ।।3।।बापरखुमादेविवरू साचें।श्री विठ्ठलाचे नाम वाचे ।।4।।


भावार्थ--

जीवनातील सर्व मांगल्याचे ,पावित्र्याचे भांडार असलेले श्री विठ्ठलाचे नाम सर्वात आधी जपावे कारण तेच जीवनाचे सार आहे .पतितांचा उध्दार करून त्यांना पावन करणारे आहे. यासाठी विठ्ठलाच्या नामाचा निरंतर वाचेने जप करा असे श्री संत ज्ञानदेव या अभंगात सांगत आहेत.

अभंग---2

समाधी साधन संजीवन नाम । शांती दया सम सर्वभूती।।1।। शांतीची पै शांति निवृत्ती दातारू ।हरिनाम उच्चारू दिधला तेणे ।। 2।।शम दम कळा विज्ञान सज्ञान। परतोनी अज्ञान नये घरा ।।3।।ज्ञानदेवा सिध्दि साधन अवीट । भक्तिमार्ग नीट हरिपंथी ।।4।।

भावार्थ--

या अभंगात संत ज्ञानेश्वर समाधी साधना विषयी बोलत आहेत निरंतर हरिनामाचा जप केल्याने साधकाच्या अंतकरणात शांती ,सर्व भूतमात्रांच्या विषयी समभाव व दया निर्माण होते या हरिनामाची दीक्षा सद्गुरु निवृत्ती नाथांकडून मिळाली त्यामुळे मनातील शांती पलीकडील मनःशांतीचा अनुभव आला .अहंकाराचे शमन,इद्रियांच्या विषयांचे दमन या कला प्राप्त झाल्या.जिवाशिवाच्या ऐक्याचे ज्ञान झाले व अज्ञान पूर्णपणे देशोधडीला लागले.ज्ञानदेव म्हणतात की, हे साधन सिध्दी देणारे असून त्याची माधुरी अवीट आहे.साधकांसाठी हा उत्तम भक्तीमार्ग आहे.

अभंग--3

रंगा येई वो रंगा येई वो ।विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई।।1।।वैकुंठवासिनी वो जगत्रजननी वो ।तुझा वेधु माझे मनीं वो ।।2।।कटीं कर विराजित ।मुगुटरत्नजडित। पीतांबरु कसिला । तैसा येईं का धावत ।।3।।विश्वरुप विश्वंभरे कमळनयने कमळाकरे वो । तुझें ध्यान लागो बापरखुमादेविवरे वो ।।4।।

भावार्थ ---

वैकुंठावर निवास करणाऱ्या तिन्ही जगाचे पालन ,पोषण करणाऱ्या पांडुरंगाला जननी ,विठाई,किटाई, कृष्णाई, कान्हाई अशी साद घालून संत ज्ञानदेव तिच्या भेटीचे वेध मनाला लागले आहेत असे म्हणतात.मस्तकावर रत्नजडित मुकुट धारण केला आहे,कमरेला पितांबर कसला असून दोन्ही कर कटीवर विराजमान झाले आहेत अशा पांडुरंगाने धावत येऊन भेटी द्यावी अशी विनंती करीत आहेत.कमला सारख़े कर व नयन असलेल्या ,विश्वरुपाने नटलेल्या व सर्व विश्वांत भरुन राहिलेल्या या विश्वंभराचे मनाला निरंतर ध्यान लागो अशी आळवणी संत ज्ञानेश्वर करीत आहेत.

अभंग--4

भक्तीचे तें ज्ञान वाचे नारायण ।दया ते संपूर्ण सर्वांभूतीं।।1।। ज्ञान नारायण ध्यान नारायण ।वाचे नारायण सर्वकाळ।।2।। संसार ग्रामीं नाम हाचि सांठा । पावाल वैकुंठा नामें एकें।।3।। गोविंद गोपाळ वाचेसी निखळ ।पद पावाल अढळ अच्युताचे ।।4।।नामेचि तरले शुकादिक दादुले । जडजीव उध्दरले कलीयुगीं ।।5।।स्मरण करिता वाल्मीकी वैखरी वारुका भीतरीं रामराम ।।6।।सर्वांमाजीं श्रेष्ठ पुण्य भू वैकुंठ।विठ्ठल मूळपीठ जगदोद्धारक ।।7।।निवृत्ती निरोपण ज्ञानदेवा ध्यान । सर्वत्र नारायण एकरुप ।।8।।


भावार्थ---

अंतरंगात सर्व प्राणिमात्रा विषयी भूतदया आणि वाचेने निरंतर नारायणाचा जप हेंच खरे भक्तीचे ज्ञान आहे.चित्तांत नारायणाचे अखंडित ध्यान व वाचेने सर्वकाळ जप हाच संसाराच्या गावामधील मोठा पुण्यसंचय आहे.या पुण्याईने आपण वैकुंठाची प्राप्ती करु शकतो.गोविंद गोपाळ या नावाच्या जपाने वाचेचा मल जावून वाणी शुध्द होते व अच्चुताचे अढळपद मिळते.नामाच्या या पुण्याईनेच अत्यंत ज्ञानी,विरागी असे शुकासारखे ऋषी संसार सागर तरुन गेले आणि कलीयुगातील अनेक जडजीवांचा उध्दार केला.वाल्मिकीनी अखंड रामनामाचा जप केला की मुंग्यांनी त्यांच्या भोवती वारुळ तयार केले .या नामजपाच्या पुण्याईने ते सर्वश्रेष्ठ रामायणकर्ते लेखक बनून अजरामर झाले.सद्गुरु निवृत्ति नाथांच्या उपदेशाने ज्ञानदेवांना याच नामाचे ध्यान लागून सर्वत्र नारायणाचे रूप दिसू लागले.

अभंग--5

नाम प्रल्हाद उच्चारी । तया सोडवी नरहरी उचलूनी घेतला कडियेवरी । भक्त सुखे निवाला ।।1।।नाम बरवया बरवंट। नाम पवित्र आणि चोखट । नाम स्मरे नीळकंठ ।निज सुखे निवाला।।2 ।। जे धुरुसी आठवलें ।तेंचि उपमन्यें घोकिले । तेंचि गजेंद्रा लाधले ।हित झाले तयांचे ।।3।।नाम स्मरे अजामेळ ।महापातकी चांडाळ।नामें झाला सोज्वळ । आपण्यासहित निवाला।।4।।वाटपाडा कोकिकु। नाम स्मरे तो वाल्मिकु ।नामे उध्दरिले तिन्ही लेकु ।आपणासहित निवाला ।।5।।ऐसे अनंत अपार । नामे तरले चराचर ।नाम पवित्र आणि परिकर । रखुमा देविवराचें ।।6 ।।

भावार्थ---

रामनामाचा सतत जप करणार्या भक्त प्रल्हादाला नरसिंहरुपाने स्तंभातून प्रकट होऊन त्याच्या पित्याच्या जाचापासून वाचवले.उचलून कडेवर घेऊन अभयदान दिले.भक्त प्रल्हाद सुखावला.भगवंताचे नाम पवित्र व अत्यंत शुध्द आहे.समुद्र मंथनातून निघालेले हलाहल प्राशन केल्यानंतर झालेला दाह शांत करण्यासाठी नीळकंठ शंकरांनी रामनामाचा जप केला ,त्यामुळे ते शांत झाले.ध्रुवाने अढळपदाची,उपमन्यूने क्षीरसागराची प्राप्ती नामस्मरणानेच करून घेतली तसेच गजेंद्राला मोक्षप्राप्ती झाली ती नामस्मरणानेच.अजामेळ नावाचा महापातकी नामामुळेच सोज्वळ झाला.लुटारू वाल्याकोळी नामस्मरणाच्या प्रभावाने वाल्मीकी ऋषी झाला.स्वत:चा उध्दार तर केलाच शिवाय तिन्ही लोकांचा उध्दार केला.रखुमादेविवराचे नाम अत्यंत पवित्र व सुंदर आहे त्याने अनंत अपार असे चराचर तरुन गेलेआहे.

अभंग---6

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ।।1।। चरणकमळदळु रे भ्रमरा ।भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ।।2।। सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळ विद़दु रे भ्रमरा ।।3।। सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा।।4।।

भावार्थ ---

या अभंगात संत ज्ञानेश्वरांनी एका सुंदर रूपकाची रचना केली आहे .देहबुद्धी असणाऱ्रा असणारा जीव म्हणजे क्षणभंगुर सुखाच्या मागे धावणारा ,भ्रमर आहे. अस्थिर, इंद्रियजन्य सुखाचा हव्यास, चंचलपणा हे त्याचे अवगुण आहेत ते सोडून त्याने शाश्वत आत्मसुखाचा शोध घ्यावा असे ज्ञानदेव म्हणतात. हा अविनाशी सुमन सुगंध त्याला रखमा देवी वराच्या चरण कमला पासून मिळेल.कारण हे चरणकमल सर्व प्रकारचे ऐहिक व पारमार्थिक सुख देणारे आहेत.हा आनंद त्याने निश्चलपणे भोगावा असे ज्ञानदेव म्हणतात.

अभंग --7

सुकुमार सुरज्ञ परिमळे अगाध । तयाचा सुख बोध सेवी आधीं ।।1 ।।मना मारी सुबुद्धि तल्लीन मकरंदीं ।विषय उपाधी टाकीं रया ।।2।।रखुमादेविवरू गुणाचा सुखाडु । मन बुध्दि निवाडु राजहंसु ।।3।।

भावार्थ--

सत्चिदानंद असे स्वरुप असलेला परमात्मा अतिशय सुकुमार,सुंदर ,सुगंधित आहे.रखुमादेवीचा पती केवळ शारिरीक सौंदर्याने नटला आहे असे नसून तो सर्व गुणांचे भांडार आहे.विकारी,चंचल मन व निश्चयात्मक ,स्थिर बुध्दी यातून योग्य निवड करणारा आहे.संत ज्ञानदेव सांगतात की,आपल्या मनोवासनांचे दमन करुन सुबुध्दीची कास धरुन तिला परमात्म्याच्या स्वरुपात तल्लीन करा.विषयांच्या सर्व उपाधि सोडून द्या.

अभंग --8

रामनाम वाट हेचि पैं वैकुंठ । ऐसी भगवद्गीता बोलतसे स्पष्ट ।।1।।अठरा साक्षी साही वेवादत ।चौघाचेनि मतें घेईन भागु ।।2 ।।शेवटिले दिवसीं धरणे घेईन । ।बापरखुमादेविवरा बळेंचि साधीन ।।3।।

भावार्थ--

रामनामाचा अखंड जप हे वैकुंप्राप्तिचे एकमेव साधन आहे असे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगतात.त्या प्रमाणेच अठरा पुराणे,सहा शास्त्रे ,आणि चारी वेदांचा मागोवा घेतला तरी ते ही याला दुजोरा देतात.यासर्वांचा दाखला देवून संत ज्ञानेश्वर म्हणतात की,जीवनभर रामनामाचा जप करुन शेवटच्या दिवशी विठ्ठलाकडे धरणे धरुन त्याच्या साहाय्याने परमात्म स्वरुप प्राप्त करुन घेईन.

अभंग ---9

तुज सगुण म्हणो की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदु रे।।1।।अनुमाने ना अनुमाने ना । श्रुती नेती नेती म्हणती गोविंदु रे ।।धृ.।। तुज स्थूल म्हणो की सूक्ष्म रे ।स्थूल सूक्ष्म एक गोविंदु रे ।।2।।तुज आकारू म्हणो की निराकारू रे। आकारू निराकारू एकु गोविंदु रे ।।3 ।। निवृत्ति प्रसादे ज्ञानदेव बोले । बापदेविवरु विठ्ठलू रे ।।4 ।।।

भावार्थ ---

भगवंताला सगुण म्हणावे का निर्गुण याचा निर्णय करता येत नाही.श्रुती सुध्दा या स्वरुपाला जाणत नाहीत असे गोविंदाचे स्वरुप अगम्य आहे.भगवंताच्या या स्वरुपाला स्थूल रुपात पहावे की सूक्ष्मांत पहावे हे समजत नाही,पण हे दोन्ही एकाच गोविंदाची रूपे आहे.भगवंताची साकार आणि निराकार ही दोन्ही रुपे एकाच गोविंदाची आहेत.निवृत्तिनाथांच्या प्रसादाने संत ज्ञानदेव म्हणतात रखुमादेवीचा वर जो विठ्ठल तोच सर्व रुपात प्रकट झाला आहे.

अभंग --10

सोनिया#चा दिनु आजि अमृते पाहिला ।नाम आठवितां रूपी प्रगट पैं झाला ।।1।।गोपाळा रे तुझें ध्यान लागो मना ।आनु न विसबे हरि जगत्रजीवना ।।2।।तनु मनु शरण विनटलों तुझ्या पायीं ।बाप रखुमादेविवरा वाचूनि आनु नेणें कांहीं ।।3।।

साधक आपल्या आराध्या देवतेची उपासना करीत असतांना एक अत्यंत मोलाचा ,सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा दिवस त्याच्या जीवनात येतो .त्या दिवशी नामाचा जप करीत असताना त्या देवतेचे प्रत्यक्ष दर्शन साधकाला घडते, तो त्या देवतेशी एकरूप होऊन जातो. संत ज्ञानदेव म्हणतात सर्व जगाचे जीवन असलेल्या त्या विठ्ठलाचा एक क्षणभर देखील विसर पडणार नाही असे ध्यान लागावे. त्याक्षणी केवळ देहानेच नव्हे मनाने शरण जाऊन त्या स्वरूपात पूर्णपणे रंगून जाईन.तो दिवस अमृताचा असेल कारण त्यावेळी बाह्य जगाची सारी बंधने मनाच्या साऱ्या वासना गळून पडतील. या अनुभवालाच कदाचित मुक्ती म्हणत असतील.

अभंग---11

कां सांडिसी ग्रृहस्थाश्रम । का सांडिसी क्रियाकर्म । कासया सांडिसी कुळींचे धर्म । आहे तें वर्म वेगळेंची । ।1।।भस्म उधळण जटाभारू । अथवा उदास दिगंबरू । न धरीं लोकांचा अधारू । आहे तो विचारू वेगळाची ।। 2 ।।जप तप अनुष्ठान । क्रिया कर्म यज्ञ दान । कासया इंद्रियां बंधन । आहे तें निधान वेगळें ची ।।3 ।। वेदशास्त्र जाणितलें । आगमी पूर्ण ज्ञान झालें । पुराण मात्र धांडोळिलें । आहे तें राहिलें वेगळेंची ।।4 ।। शब्दब्रह्मे होसी आगळा ।म्हणती न भियें कळिकाळा । बोधेंविण सुख सोहळा । आहे तो जिव्हाळा वेगळाची ।। 5 ।। याकारणें श्रीगुरूनाथु । जंव मस्तकीं न ठेवी हातु । निवृत्तिदास असे विनवितु । तंव निवांतु केवी होय । ।6 ।।

भावार्थ---

परमात्म स्वरूप जाणून घेण्यासाठी संसारी साधक आपल्या नित्य नैमित्तिक क्रिया कर्माचा त्याग करतो आपले कुळधर्म कुलाचार सोडून देतो गृहस्थाश्रमा पासून अलग होतो. पण त्या मुळे परमात्मस्वरूपाचे पूर्ण ज्ञान होणार नाही कारण ते रहस्य वेगळेच आहे .सर्वांगाला भस्म फासून ,जटांचा भार वाढवून ,सगेसोयरे,मित्र यांचा आधार सोडून,उदासिन वृत्ती धारण करून संन्यासी बनतो पण त्या मुळे परमात्म्याचा बोध होतोच असे नाही कारण तो वेगळाच आहे.इंद्रियांचे दमन करुन ,जप तप अनुष्ठान करून अनेक प्रकारचे यज्ञ व दाने करून परमेश्वराची प्राप्ती होणार नाही कारण ते सुखाचे निधान वेगळेच आहे. अठरा पुराणे, सहा शास्त्रे, चारी वेद यांचे पूर्ण ज्ञान झाले तरी परमात्म स्वरूपाचे ज्ञान शब्दातीत आहे.या ज्ञानाने केवळ अहंकार वाढेल, कळीकाळाची भिती वाटेनाशी होईल. पण देव भेटणार नाही. अपार श्रध्देने गुरुवाक्य श्रवण करून गुरु उपदेशाचा पूर्ण बोध झाल्याशिवाय गुरुकृपेचा सुखसोहळा साजरा करता येणार नाही.जो पर्यंत श्रीगुरुनाथ मस्तकावर हात ठेवून कृपाप्रसाद देणार नाहीत तोवर साधक पूर्ण ज्ञानी ,निवांत कसा होईल? असे संत ज्ञानेश्वर विचारतात.

अभंग--12

बरवा वो हरी बरवा वो । गोविंद गोपाळ गुण गुरुवा वो।।धृ। सावळा वो हरी सावळा वो ।मदन मोहन कान्हो गोवळा वो ।।1 ।।पाहता वो हरी पाहता वो । ध्यान लागले वो चित्ता वो ।।धृ ।। पढिये वो हरी पढिये वो । बाप रखुमा देवी वरू घडीये वो ।।2।।

भावार्थ---

या अभंगातिल विठोबाच्या रंगरूपाचे व गुणांचे वर्णन करतांना ज्ञानोबांची वाणी अधिकच कोमल,लडिवाळ बनली आहे.गोविंद गोपाळ अशी नावे श्रीहरीला शोभून दिसतात.तो रुपाने अतिशय उत्तम (बरवा)असून गुणांमध्ये सर्वोत्तम आहे.त्याचे रूप मदना सारखे मनमोहक असून सावळ्या वर्णाने तो शोभून दिसत आहे.हरीचे हे रूप पाहतांच मनाला त्याचे ध्यान लागते व हरघडीला तो अधिकच आवडू लागतो.

अभंग --13

त्रिभंगी देहुडा ठाण मांडूनिया माये ।कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे. ।।1।। गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरी अवघा रमानंदु वो ।।2।। सावळे सगुण सकळा जिवांचे जीवन घनानंद मुर्ती पाहता हारपले मन ।।3।।शून्य स्थावर जंगम व्यापुनि राहिला । बाप रखुमा देवीवरू विठ्ठल सकळ ।।4।।

भावार्थ---

कटी, गुडघे आणि मांड्या यांना वाकवून ,डाव्या पायावर उजवा पाय ठेवून कल्पवृक्षा खाली सुमधुर वेणू वाजवित उभा असलेला हरी अंतर बाह्य आनंदस्वरूप आहे,हरीचे हे सावळे ,सगुण रूप म्हणजे सर्व जीवांचे जीवन आहे.हा मेघश्याम पाहताच मन हरपून जाते. स्थावर जंगम सृष्टिच नव्हे तर सर्व विश्वाची पोकळीच त्याने व्यापून टाकली आहे.असा हा रखुमादेवीवर विठ्ठल आकलनाच्या पलिकडे आहे.

अभंग ---14

स्वप्निंचेनि सुखे मानिताती सुख ।घेतलिया विख जाईल देह ।।1।। मौलाचे आयुष्य दवडितोसी वायां । माध्यान्हींची छाया जाय वेगीं ।।2 ।।वेगीं करीं भजनां काळ यम श्रेष्ठ । कैसेंनी वैकूंठ पावशील झणें ।।3।।बापरखुमादेवीवरु विठ्ठल उभा । सर्वत्र घटीं प्रभा त्याची आहे.

भावार्थ---

परमार्थाचा विचार करू जातां संसार मायिक (खोटा,क्षणभंगूर) आहे. स्वप्नातील सुख जसे क्षणिक असते तसेच देहबुध्दीने मानलेले संसारसुख विषा सारखे देहनाशास कारणीभूत होते.ज्या प्रमाणे माध्यान्हकाळी आपली सावली आपल्याला दिसेनाशी होते त्या प्रमाणे संसारसुखे भासतात.हे लक्ष्यांत घेऊन काळ व्यर्थ न दवडता सर्वाघटी विराजमान असलेल्या विठ्ठलाचे भजन करावे.वैकुंप्राप्तीचे तेच एकमेव साधन आहे नाहीतर यमलोकी दंड भोगण्याची वेळ येईल.

अभंग 15---

पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठा देखियेला डोळां बाईये वो ।।1।।वेधलें वो मन तयाचिया गुणीं । क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी ।।2।।पौर्णिमेचें चांदिणें क्षणक्षणां

होय उणें । तैसे माझे जिणे एका विठ्ठलेवीण ।।3 ।।

बापरखुमादेविवरू विठ्ठलचि पुरे ।चित्त चैतन्य मुरे बाईं येवो ।।4।।

भावार्थ ---

पंढरपुरीचा निवासी निळसर मेघासारखा जणूं काही लावण्याच्या मुशीतून ओतलेला पुतळाच!डोळ्यांनी पाहिल्यावर मन त्याच्या रूपागुणांनी वेधले गेले.एक क्षणभर देखील ते रूप विसरतां येणार नाही.पौर्णिमेच्या चांदण्याची शितलता व सौंदर्य जसे प्रत्येक क्षणी कमी होत जाते तसे मनाचे सौख्य विठ्ठलाच्या दर्शनाशिवाय उणे होत जाते .बापरखुमादेविवरू विठ्ठलाने मनाचे चैतन्य पूर्णपणे व्यापून टाकले आहे.

आभंग---16

इवलेसे रोप लावियेले द्वारीं ।त्याचा वेल गेला गगनावरी।।1। मोगरा फुलला मोगरा फुलला। फुले वेंचितां बहरू कळियांसी आला ।।2 ।। मनाचिये गुंती गुंफियेला शेला । बापरखुमादेविवरू विठ्ठलीं अर्पिला ।।3।।

भावार्थ --

चित्त प्रागणांच्या दारांत छोटेसे मोगर्याचे रोप लावले.त्याचा वेल इतका फोफावला की आकाशाला भिडू लागला.या वेलाला सुखदु:खरुपी आशा-आकांक्षाची ,वासनांची अनेक फुले लगडली.जसजशी फुले खुडली तसा नविन कळ्यांचा बहर येत होता.मनामध्ये या फुलांचा शेला गुंफून तो श्री विठ्ठलाला अर्पण केला.अशा रितीने सर्व कर्मफले परमात्म स्वरुपी अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून सुटका झाली असे संत ज्ञानदेव म्हणतात.

अभंग---17

रामकृष्ण जपा सोपा । येणें हरती जन्मखेपा । संसारु तुटेल महापापा । धन्य भक्त तो घरातळीं ।।1।।जया हरीची जपमाळी । तोचि पडिला सर्व सुकाळीं । तया भय नाही कदाकाळीं ऐसे ब्रह्मा बोलियेला ।।2 ।।बापरखुमादेवी हरि । नामे भक्तासी अंगिकारी ।नित्य सेवन श्रीहरि । तोचि हरीचा भक्त जाणावा ।।3।।

भावार्थ---

रामकृष्ण हा जप अगदी सोपा असून महापापाचे क्षालन करण्याचे सामर्थ्य त्यात आहे.जन्म मरणाचा फेरा चुकविण्याचे ते ऊत्तम साधन आहे.ज्याच्या जवळ हरीची जपमाळ आहे,तो निरंतर सुखी समाधानी धन्य भक्त होय.तो कळीकाळाच्या भया पासून मुक्त होतो असे परमपिता ब्रह्मदेवांनीच सांगितले आहे.नित्य नामस्मरणी दंग असलेल्या भक्तांचा श्रीहरि अमंगिकार करतो. तोच हरिचा खरा भक्त जाणावा.

अभंग ---18

योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।पाहतां पाहतां मना न पुरेचि घणी .।।1।। देखिला देखिला माय देवाचा देवो । फिटला संदेहो निमालें दुजेपण ।।2।। अनंतवेषें अनंतरूपें देखिलें म्या त्यासी ।बापरखुमादेवीवर खूण बाणली कैसी ।।3।।

भावार्थ---

सर्वश्रेष्ठ योग्यांनाही ज्याचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे तो परमात्मा जेव्हां प्रत्यक्ष पाहिला तेव्हां कितीही वेळ पाहिला तरी मनाची तृप्तीच होत नाही अशी मनाची अवस्था झाली. तो देवाधिदेव भेटल्यानंतर मनातील मी-तू पणाची भावना , सर्व द्वैत संपून गेले, सगळे संदेह समूळ नाहीसे झाले. तोच पांडुरंग सर्वत्र अनंत रूपाने ,अनंत वेषाने नटला आहे अशी मनोमन खात्री पटली.

अभंग---19

माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।1 ।। पांडुरंगीं मन रंगले । गोविंदाचे गुणीं वेधलें ।।2 ।। जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रूप आनंद साठवे ।।3 ।।बापरखुमादेविवरू सगुण निर्गुण । रूप विटेवरी दाविली खूण ।।4 ।।

भावार्थ---

पंढरपुरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतांना त्या सगुणस्वरुपात मन रंगून जाते.गोविंदाच्या गुणांनी मन त्या कडे आकर्षित होते, गुंतून पडते. आपण जागे आहोत की झोपेत स्वप्न पहात आहोत अथवा गाढ झोपेत आहोत हेच कळेनासे होते.गोविंदाचे रुप सतत डोळ्यांपुढे असल्याने चित्तामध्ये आनंद भरुन वाहतो आहे असे वाटते.जो निर्गुणनिराकार परमात्मा तोच भक्तांसाठी सगुण रुपात विटेवर उभा आहे अशी मनोमन खात्री पटते.ही गोजिरवाणी मूर्तीआपल्या विशेष आवडीची आहे असे संत ज्ञानदेव म्हणतात.

अभंग---20

अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।1 ।।जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ।।2।।सर्व सुकृताचे फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ।।3।। बापरखुमादेविवरु विठ्ठलेशीं भेटी । आपुले संवसाठी करून ठेला ।।4 ।।

भावार्थ ----

अवघा संसार सुखपूर्ण आनंदाने भरून टाकीन स्वर्ग ,पृथ्वी,पाताळ हे तिन्ही लोक ब्रह्मानंदाने भरीन ही ज्ञानदेवांच्या मनीची कामना आहे.पंढरपूर हे सर्व संताचे माहेर आहे,ज्ञानदेवांना या माहेराची आस लागली आहे. आपण जीवनात जी सत्कृत्ये केली असतील त्याचे फळ म्हणजे पांडुरंगाचे दर्शन अशी संत ज्ञानेश्वरांची श्रध्दा आहे. आपल्या सर्व पुण्याचे फळ एकत्र करून आपण विठ्ठलाची भेटी(आलिंगन) घेऊ असे संत ज्ञानदेव म्हणतात.

अभंग --21

जंववरी तंववरी जंबुक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ।।1 ।। जंववरी तंववरी वैराग्याच्या गोष्टी। जंव सुंदर वनिता द्दष्टी देखिली नाही बाप ! ।।ध्रु ।। जंववरी तंववरी मैत्रत्त्व संवाद जंववरी अर्थेसी संबंध पडिला नाही बाप । ।2।।जंववरी तंववरी युध्दाची मात । जंव परमाईचा पूत देखिला नाही बाप ! ।। 3।।जंववरी तंववरी समुद्र करी गर्जना । जंव अगस्ती ब्राह्मणा देखिलें नाही बाप !।।4 ।।जंववरी तंववरी बाधी हा संसार ।जंव रखुमादेविवरू देखिला नाही बाप ।।5।।

भावार्थ---

जोवर सिंहाचे दर्शन झाले नाही तो पर्यंतच कोल्होबाची गर्जना , वैराग्याच्याच्या गोष्टी जोपर्यंत सौदर्यशालिनी स्त्री दर्शन होत नाही तोपर्यंतच ! धनाशी संबंध आला की, घनिष्ठ मैत्री लुप्त होण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही. जो पर्यंत प्रत्यक्ष युध्द भूमीवर बलाढ्य योध्द्याशी गाठ पडत नाही तोवर शौर्याच्या बढाया केल्या जातात.प्रचंड उसळणार्या लाटांसह गर्जना करणारा समुद्र अगस्ती ऋषींचे दर्शन होतांच शांत होतो.जो पर्यंत रखुमादेवीवराला पाहिले नाही तोवरच या मायावी संसाराचे भय वाटते.या अभंगात त् समर्पक उपमांचा उपयोग करून पाडुंरंगाचा महिमा वर्णनप केला आहे.

अभंग --22

साधूचा महिमा वर्णवेना कांहीं । ब्रह्मादिक तेही वर्णिताती।।1।। त्याचिये कृपें मोक्ष जिऊनियां । लाधिजे प्राणिया निश्चयेंसी ।।2।।गंगेहूनि थोर संत शुचिष्मंत । गंगा शुध्द होत त्याचे संगे ।।3।।वडवानल शुचि परी सर्वही भक्षक । इंद्र पुण्यश्लोक पतन होय ।।4।।पतितपावन क्रुपाळ समर्थ । देताती पुरुषार्थ चारी दिना ।।5।।बाप रखुमादेविवर विठ्ठलाच्या संगी । झाला पूर्ण योगी ज्ञानेश्वर ।।6।।

भावार्थ---

या अभंगात संत ज्ञानेश्वर सत्संगतिचा महिमा वर्णन करीत आहेत.साधु संगतीचा महिमा ब्रह्मा ,विष्णु, महेश हे तिन्ही देवही वर्णन करु शकत नाही.संत ज्ञानेश्वर म्हणतात की,साधुंच्या संगतीने जीवाला मोक्षाचा लाभ होतो.येथे संत ज्ञानेश्वर साधुंची तुलना गंगा,वडवाग्नी ,देवराज ईंद्र यांच्याशी करतात . गंगा ही अत्यंत पतवित्र नदी समजली जाते परंतु वाराणसीला येईपर्यंत ती प्रदुषित होते पण साधुंच्या संगतीने ती शुध्द होते.पुण्यश्लोक इंद्र पुण्य क्षीण होतांच तो पतित होतो.परंतु क्रुपाळू व समर्थ संत शरणागताला चारी पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ) देऊन क्रुतार्थ करतात.संत ज्ञानेश्वर म्हणतात की, विठ्ठलाचे संगतीने आपण पूर्ण योगी झालो आहोत.

अभंग--23

योग तो कठिण साधितां साधेना । जेणें गा चिद्घना न पाविजे ।।1।। याची लागीं आतां सांगणे हें तुज । माझे निजगुज अंतरींचे ।।2।।इंद्रिये कोंडावी आवरावें मन । सहज ब्रह्मज्ञान लाधलाशी ।।3।।जेथें जेथें म धावोनिया जाय तेथें गुरूचे पाय बसवावे ।।4 ।।ज्ञानदेव म्हणे होईं तूं निर्गुण। कळेल तुज खूण पूर्ण तेव्हां ।।5।।

भावार्थ ---

संत ज्ञानेश्वर या अभंगात म्हणतात की,अष्टांग योग साधणे अत्यंत कठीण आहे कारण माणसाचे मन अतिशय चंचल असून त्याला वश करणे दुरापास्त आहे.अष्टांग योगाद्वारे परमेश्वर प्राप्ती अवघड आहे.या साठी संत ज्ञानेश्वर साधकाला आपल्या मनीचे रह्स्य सांगत आहेत.मनावर नियंत्रण आणून इंद्रियांवर ताबा आणावा त्यामुळे सहजपणे ब्रह्मज्ञान लाभेल.या साठी गुरुवर नितांत श्रध्दा ठेऊन जेथे जेथे मन जाईल तेथेतेथे गुरुचरणांचे ध्यान करावे.संत ज्ञानेश्वर म्हणतात की, या प्रकारे देहबुध्दी कमी होऊन सत्व, रज तमोगुणा पलिकडे जाऊन निर्गुणता मिळणे शक्य होईल व त्या मुळे परमात्म्याचे खरे स्वरुप समजून येईल.

अभंग--24

सद्गुरुसारिखा सोयरा सज्जन ।दाविले निधान वैकुंठीचे।।1।।सद्गुरु माझा जिवाचा जिवलग । फेडियेला पांग प्रपंचाचा ।।2।।सद्गुरु हा अनाथ माउली । क्रुपेची साउली केली मज ।।3।।ज्ञानदेव म्हणे अवचित घडलें ।निव्रुत्तीनें दिधलें निजबीज ।।4।।

भावार्थ---

संत ज्ञानेश्वर म्हणतात सद्गुरु सारखा सज्जन सोयरा मिळणे अवघड आहे.वैकुंठीचे निधान सद्गुरुमुळेच लाभले आहे.सद्गुरु हा आपल्या अंतरिचा जिवलग आहे,त्यांच्या क्रुपेमुळेच प्रपंच्याच्या बंधनामधून मुक्त झालो.सद्गुरु हे अनाथांची माउली असून प्रपंच्याच्या तापातून सोडवणारी क्रुपेची सावली आहे.ज्ञानदेव म्हणतात की,अवचित घडले व सद्गुरु निव्रुत्तिनाथांच्या क्रुपेने आत्मज्ञानाची प्राप्ती झाली.

अभंग ---25

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्मसनातन विठ्ठल हा।।1।। पतितपावन मानसमोहन।ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।2।।ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन । ब्ह्मम सनातन विठ्ठल हा।।3।।ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्घन। ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।4।।

भावार्थ ---

संत ज्ञानेश्वर म्हणतात की, हा विठ्ठल निर्गुण रुपाने प्रत्यक्ष ब्रह्माचे सनातन रुप आहे तर विटेवरचा पांडुरंग हे विठ्ठलाचे साजिरे सगुण स्वरुप असून दोन्ही विलक्षण आहे.हा सगुण विठ्ठल पतितांचा उध्दारक असून मनमोहक आहे तर निर्गुण रुपाने तो ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीहून वेगळा (ध्यान करणारा,ज्याचे ध्यान करायचे तो व ध्यान हे जेव्हा एकरुप होते ,द्वैत संपून अद्वैताचा विलक्षण अनुभव येतो.)असून सनातन ब्रह्म आहे .हा विठ्ठल सगुण आणि निर्गुण दोन्ही रुपात आनंदमय आहे.

अभंग--26

अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळों आलें ।।1।।तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फिटला संदेह अन्यतत्तवीं।।2।।मुरडुनियां मन उपजलासी चित्तें । कोठें तुज रितें न दिसे राया ।। 3।।दीपकी दीपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ।।4।।व्रुत्तीची निव्रुत्ती आपणासकट । अवघेंची वैकुंठ चतुर्भुज ।।5।। निव्रुत्ति परमानुभव नेमा । शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ।।6।।

भावार्थ---

या अभंगात संत ज्ञानेश्वरांची क्रुतार्थततेची भावना व्यक्त झालेली दिसते.परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांनी ज्या ध्यान मार्गाचा अवलंब केला त्याचे रहस्य संत ज्ञानेश्वरांना समजल्यामुळे आपण पावन झालो असे ते म्हणतात. ज्याचेध्यान करायचे तो पांडुरंग आपणच असून त्याच्या वरील भक्तीभावही आपलाच आहे ,तसेच ध्यानाची क्रियाही आपणच आहोत असा विलक्षण अनुभव आला.त्रिपुटी सांडली ,देव भक्त एकरुप झाले.द्वैत संपून अद्वैताचा अनुभव आला ,मनातील सर्व संदेह लयास गेले.चंचल मनावर बंधन घातल्याने चित्त शुध्द होऊन आत्मबोध झाला.सर्व विश्व एकाच चैत्यन्याने व्यापले असून परमात्म्या शिवाय कोठेही रितेपण नाही असा साक्षात्कार झाला,मनातील वासना, प्रपंच्यातील आसक्ती शून्य झाली.सर्व त्रैलोक्य चतुर्भुज पांडुरंगाचे वैकुंठ बनले.निव्रुत्तिनाथांनी दाखवलेल्या ध्यान मार्गावरील या परम अनुभवाने संत ज्ञानेश्वरांना क्षमा व शांतीचा अपूर्व लाभ झाला.

अभंग---27

दृष्टिमाजी रूप लखलखीत देखिलें । अव्यक्त ओळखिले तेजाकार ।।1।। सावळे सुंदर रुप बिंदुलें ।मन हें मुरालें तयामाजीं ।।2।।अणुरेणु ऐसें बोलती संतजन । ब्रह्मांड संपूर्ण तया पोटीं ।।3।।निव्रुतिची खूण ज्ञानदेव पावला। सोयरा लाधला निव्रुत्तिक्रुपें ।।4।।

भावार्थ---

या अभंगात संत ज्ञानेश्वर आत्मसाक्षात्काराचे वर्णन करीत आहेत.परमात्म्याचे अव्यक्त ,तेजोमय, लखलखीत रुप आपण आपल्या अंतरदृष्टीने पाहिले आणि अंतरमनाला त्याची ओळख पटली.सावळ्या रंगाचे,सुंदर असे ते बिंदुरुप पाहून मन त्यातच एकरुप झाले.अणुरेणु सारख्या या बिंदुल्या रुपात सर्व ब्रह्मांड सामावले आहे असे संतजन सांगतात.निव्रुत्तिनाथांची क्रुपा झाल्यानेच आपल्याला ह्या परम अनुभवाची प्राप्ती झाली असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.

अभंग--28

विश्वाचे आर्त माझ्या मनीं प्रकाशलें ।अवघेंचि जालें देहब्रह्म ।।1।।आवडीचें वालभ माझेनी कोंदाटलें ।नवल देखिलें नभाकार गे माये ।।2।।बापरखुमादेविवरू सहज निटु जाला। ह्रदयीं नटावला ब्रह्माकारें।।3।।

भावार्थ---


निर्गुण,निराकार परमात्मा हे विश्वाचे ब्रह्मरुप ते आपल्या मनात प्रकाशमान झाल्यामुळे आपला संपूर्ण देहच ब्रह्मरुप झाला.अत्यंत आवडीच्याअशा ह्या ब्रह्मरुपानेआपल्या मनाचा गाभारा व्यापून टाकला.हे आकाशतत्वी नभाकारब्रह्मरुप पाहून मन आश्चर्याने भरुन गेले. रखुमापती श्री विठ्ठल आपणास सहज प्रप्त झाला आणि ब्रह्मरुपाने आपल्या ह्रदयांत स्थिर झाला.

अभंग --29

योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।पाहतां पाहतां मना न पुरेचि घणी ।।1।।देखिला देखिला माय देवाचा देवो । फिटला संदेहो निमालें दुजेपण ।।2।। अनंतवेषे अनंतरुपें देखिलें म्यां त्यासी । बापरखुमादेविवरु खूण बाणली कैसी।।3।।

भावार्थ---

सर्वश्रेष्ठ योग्यांनाही ज्याच्या दर्शनाचा लाभ होत नाही असा परमेश्वर आपण प्रत्यक्ष पाहिला असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.या देवाधिदेवाला कितीही वेळ पाहिले तरी मनाचेसमाधान होत नाही.त्या पांडुरंगाला पाहतांच मनाचे मी-तूपण संपून गेले.सर्व संदेह लयाला गेले.अद्वैत भावना व नि:संदेह मन हीच त्याच्या दर्शनाची खूण आहे ती मनालापटली.या संपूर्ण चल- अचल स्रुष्टीमध्ये, अनंत प्राणीमात्रांमध्ये हे चैतन्यतत्व अनंत रुपाने,अनंत वेषाने नटलेले दिसले.

अभंग--30

गुरु हा संतकुळीचा राजा । गुरु हा प्राणविसांवा माझा । गुरूवीण देव जाऊ। पाहतां नाहीं त्रिलोकीं ।।1।।गुरु हा प्रेमाचा आगरू । गुरु हा धैर्याचा डोंगरू ।कदाकाळी डळमळेना ।।2।।गुरु वैराग्याचे मूळ । गुरु हा परब्रह्म केवळ। गुरु सोडवी तात्काळ । गांठ लिंगदेहाची ।।3।।गुरु हा साधकाशी साह्य। गुरु हा भक्तालागी माय । गुरु हा कामधेनु गाय ।भक्तांघरी दुभतसे ।।4।।गुरु घाली ज्ञानांजन गुरु दाखवी निजधन । गुरु सौभाग्य देऊन ।साधुबोध नांदवी।।5।।गुरु मुक्तीचे मंडन । गुरु दष्टांचें दंडन । गुरु पापाचे खंडन । नानापरी वारितसे ।।6।।

भावार्थ ---

आपल्या गुरुमाउलीला’ संतकुळीचा राजा ‘असे संबोधून श्री गुरुंचा महिमा या अभंगात वर्णन केला आहे.गुरु आपला प्राणविसावा असून तो सुखाचा सागर,प्रमाचेआगर व कधिही विचलित न होणारा धैर्याचा डोंगर आहेअसे सांगून संत ज्ञानेश्वर आपल्या गुरुंचा गौरव करतात.सद्गुरु निव्रुतिनाथ हे प्रत्यक्ष परब्रह्ममच आहेत कारण ते वैराग्याचे मूळ असून जन्म मृत्युच्या,लिंगदेहाच्या गाठी तात्काळ सोडवतात.निव्रुतिनाथ हे श्री शंकराचे अवतार आहेत असे सर्व संत मानतात.सद्गुरुंमुळे साधकास आत्मज्ञान प्राप्त होऊन ,लिंगदेहापसून मुक्त होऊन मोक्षाप्रत जातो.गुरु हा साधकांचा सहाय्यक असून भक्तांची माऊली आहे.भत्ता घरची कामधेनु आहे.श्री गुरु हा साधकाच्या डोळ्यात अंजन घालून साधकाला आपले निजधन म्हणजे आत्मरूप दाखवतात. साधकाला बोध देऊन त्याच्या अंगी साधुत्व बाणवतात. गुरु साधकाच्या पापांचे खंडन करून त्यांच्या मुक्तीचे दार उघडतात.

अभंग ---31

आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा धनु ।।1।। हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्य अभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी ।।ध्रु ।।द्दढ विटे मन मुळीं । विराजीत वनमाळी।।2।। बरवा संत समागमु प्रगटला आत्मारामु ।।3।।क्रुपासिंधु करुणाकरु। बापरखुमादेविवरु ।।4।।

भावार्थ---

अमृताचा वर्षाव करणारा आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्या जोगा आहेअसे संत ज्ञानेश्वर म्हणतात कारण त्यांना आज श्रीह्ररीचा साक्षात्कार झाला आहे.विश्वाच्या आत व बाहेर सर्वत्र तोच मुरारी व्यापून राहिला आहे.सगुणरुपाने तोच मुरारी दृढपणे वीटेवर विराजमान झाला आहे.संपूर्ण चराचरांवर करुणा करणारा वनमाळी क्रुपेचा सागर असून संतक्रुपे मुळेच तो बापरखुमादेवीवरु आज सोनियाच्या दिनी प्रगटला आहे असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.

अभंग ---32

श्रीगुरुसारिखा असतां पाठिराखा ।इतरांचा लेखा कोण करी ।।1।।राजयाची कांता काय भीक मागे ।मनचिये जोगें सिध्द पावे।।2।।कल्पतरुवटीं जो कोणी बैसला ।काय वाणी त्याला सांगिजो जी ।।3।।ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों । आतां उध्दरलों गुरुक्रुपें ।।4।।

भावार्थ---

संत ज्ञानेश्वर म्हणतात की, सद्गुरु निव्रुत्तिनाथां सारखा सबळ पाठीराखा असतांना इतरांच्या मदतीची अपेक्षा कुणीही करणार नाही. ऐश्वर्यसंपन्न राजाच्या राणी सारखे सर्व सुखोपभोग सिध्द असतांना कुणापुढे पदर पसरण्याचे कांहीच प्रयोजन नाही.इच्छिले फळ देणाय्रा कल्पवृक्षाखाली बसलेल्या भाग्यवंताला कसलीच उणीव भासणार नाही.संत ज्ञानेश्वर अत्यंत समाधानाने सांगतात की,गुरुक्रुपे मुळे आपण हा दुर्धर संसार तरुन गेलो,आपला उध्दार झाला.

अभंग--33

मन हे ध्यालें मन हे ध्याले पूर्ण विठ्ठलची झालें। अंतरबाह्य रंगुनी गलें विठ्ठलची ।।1।।विठ्ठल म्हणतां हरलें पाप पदरी आलें पुण्य माप झाला दिनाचा मायबाप विठ्ठलची ।।2 ।। विठ्ठल जळीं स्थळीं भरला ठाव कोठें नाहीं उरला । आज म्यां दृष्टीने पाहिला विठ्ठलची ।।3।। ऐसा भाव धरुनी मनीं विठ्ठल आणिला निजध्यानी ।अखंड वदो माझी वाणी विठ्ठलची ।।4।।तो हा चंद्रभागेतीरा पुंडलिके दिधला थारा । बापरखुमादेविवरा जडलें पायीं विठ्ठलची ।।5।।

भावार्थ---

परमार्थातील एका अलौकिक अनुभवाचे वर्णन या अभंगात संत ज्ञानेश्वर करीत आहेत.मन विठ्ठलरुपाने पूर्णपणे व्यापून टाकल्याने मनाचे उन्मन झाले. विठ्ठलरुपात ते आतून बाहरून रंगून गेले.अनंत जन्माच्या पापाचे क्षालन झाले,अमाप पुण्य पदरांत पडले.आपल्या सारख्या दीनाला विठ्ठला सारखा श्रेष्ठ मायबाप मिळाला.जळी,स्थळी , काष्ठी पाषाणींसर्वत्र विठ्ठलच भरला आहे कोठेच रिता ठाव नाही हा विलक्षण अनुभव आला.आपल्या पार्थिव नयनांना विठुदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ झाला आणि वाणीने विठ्ठलाचे नाम अखंड जपावे असा छंद मनाला लागला.मन या विठ्ठलाच्या पदकमलाशी कायमचे जडून गेले.हाच तोरखुमादेविवर की जो पुंडलिकाच्या भक्तिसाठी चंद्रभागेतिरी कायमचा स्थिर झाला.

अभंग--34

श्रवण त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । दशहि इंद्रिये जाण हरीच्या ठायीं ।।1।।अवघा हा गोविंदु अवघा हा मुकुंद ।अवघा हा विद्गदु भरला असे ।।2।।पतितपावन नामें दिनोध्दारण। स्मरिलिया आपण वैकुंठ देतु ।।3।।ज्ञानदेव म्हणे पुंडलीक जाणें। अंतकाळीं पेणें साधियेलें ।।4।।

भावार्थ ---

ज्या साधकाचे कान, त्वचा ,डोळे,जीभ, नाक ह्या सर्व ज्ञानेंद्रियासह पांचही कर्मेंद्रियें श्री हरीच्या ठिकाणि गुंतून राहिली आहेत त्याला सर्वत्र श्रीहरीच भरून राहिला आहे याची प्रचिती येते.पतितांना पावन करणारा हा दिनोध्दारक श्रीहरी परमदयाळू असून केवळ स्मरण केल्याने तो सर्वश्रेष्ठ अशा वैकुंठात स्थान देतो.संत ज्ञानेश्वर म्हणतात की, पुंडलिकाला हे माहिती असल्याने त्याला वैकुंठप्राप्ती सहज साध्य झाली.

अभंग ---35

सर्वव्यापक सर्व देहीं आहे । परी प्राणियांसी सोय न कळे त्याची ।।1।।परमार्थ तो कडु विषय तो गोडु। तया अवघडु संसार ।।2।।नामाचें साधन जिव्हे लावी बाण । तया अनुदिन जवळी असे ।।3।।धारणा धीट जरी होय विनट । तया वैकुंठ जवळी असे ।।4।।सुलभ आणि सोपारेंकेलेंस दातारें। आमहीं एकसरें उच्चारिलें ।।5।।ज्ञानियासी ज्ञान ज्ञानदेवी ध्यान ।कलिमलछेदन नाम एक ।।6।।

भावार्थ---

आत्मचैतन्य हे सर्वत्र,सर्वदेही,अणुरेणूत व्यापलेले आहे.पण देहबुध्दीमुळे जीवाला त्याचे अज्ञान आहे.त्यामुळे त्याला विषयांत गोडी वाटते व परमार्थ कडू वाटतो.संसारातील दु:खाचे हेंच मूळ कारण आहे असे संत सांगतात.त्या साठी नामजपाची सवय हा योग्य मार्ग आहे.जो सातत्याने नामजपात तल्लीन होईल त्याला त्या विषयी प्रेम निर्माण होईल व अंती सायुज्यमुक्ती मिळेल असे संतांचे मत आहे. ज्ञानमार्गी ज्याला ज्ञान व ध्यानमार्गी ज्याला ध्यान म्हणतात हे एक केवळ हरीचे नामच आहे आणि हरीनाम कलिमलछेदक आहे असे संत ज्ञानेश्वर सांगतात.

अभंग ---36

जन्मजन्मांतरी । असेल पुण्यसामुग्री ।तरीच नाम जिव्हाग्रीं येईल रामाचें ।।1।।धन्य कुळ तयाचें रामनाम हेंचि वाचे । दोष हरतील जन्माचे । श्री राम म्हणतांची।।2।कोटीकुळाचें उध्दरण । मुखी राम नारायण ।रामक्रुष्ण स्मरण ।धन्य जन्म तयाचे ।।3।।नाम तारक सांगडी ।नाम न विसंबे अर्धघडी । तप केलें असेल कोडी ।तरीच नाम येईल ।।4।।ज्ञानदेवीं अभ्यास मोठा । नामस्मरण मुखावाटा । पूर्वज गेले वैकुंठां। हरिहरि स्मरतां ।।5।।

भावार्थ---

मागील जन्माचे जर पुण्य असेल तरच जिभेवर श्रीरामाचे नाव येईल. ज्याच्या वाणीत श्रीरामाचे नाव आहे त्याचे कुळ धन्य होय त्या रामनामाच्या जपाने जन्मांतरीचे दोष निघून जातील आणि कोटी कुळांचा उद्धार होईल धन्य त्याचा जन्म जो क्षणभरसुध्दा रामनाम विसरत नाही. अनेक जन्माचे तप असेल तरच हरीनाम मुखी येईल.हरीच्या नामस्मरणाचा सतत सराव असल्यानेच आपले कुळ वैकुंठाला गेले असा स्वानुभव संत ज्ञानेश्वर सांगतात.

अभंग---37

त्रिभुवनीचे सुख एकतत्व विठ्ठल । नलगे आम्हा मोल उच्चारितां ।।1।।विठ्ठल उघडा मंत्र कळिकाळा त्रास । घालुनियां कांस जपों आधीं ।।2।। सत्वर सत्वाचे जपती नामावळी । नित्यता आंघोळी घडे राया ।।3।। बापरखुमादेविवरु जिव्हाळा ह्रदयीं । जीवाचा जीव ठायीं एक पाही ।।4।।

भावार्थ---

त्रिभुवनात एकवटलेले सर्व सुख म्हणजे एकतत्व विठ्ठल होय की,ज्या साठी आम्हाला कोणतेच मोल द्यावे लागत नाही.विठ्ठल या नाममंत्राचा कळीकाळाला सुध्दा मोठा धाक वाटतो.या साठी मनाचा निश्चय करुन कंबर कसून नामजप करावा असे संत ज्ञानदेव सुचवतात. सत्वगुणी साधक सर्व सोडून विठ्ठल नामावळी जपतात त्या मुळे त्यांच्या देह मनाची शुध्दी होते व परमात्म तत्व निखळपणे समजते.बापरखुमादेविवरु हाच सर्व जीवांच्या अंतरीचा जिव्हाळा आहे असे संत ज्ञानेश्वर नि:संशयपणे स्पष्ट करतात.

अभंग 38

का रे स्फुंदतोसी। कां रे स्फुंदतोसी ।न भजतां विठ्ठलासी नरकीं पडसी ।।1।।पुण्य पाप बाधा न पवसी गोविंदा । पावशील आपदा । स्मर परमानंदा ।।2।।पुण्य करिता स्वर्ग । पाप करितां भोग । नाम जपतो सर्वांग होईल पांडुरंग ।।3।।देहीं आत्मा जंव आहे। तव करुनियां पाहे। अंतीं कोणी नोव्हे । धरी वैष्णवाची सोय ।।4।।जाईल हें आयुष्य । न सेवी विषयविष पडतील यमपाश वेगीं करी ।।5।।बापरखुमा देविवरु विठ्ठलीं । मन चरणींगोंवीं। हारपला देहभावीं।जालासे गोसावी एकरूप ।।6।।

भावार्थ ---

सदासर्वदा गर्वाने उन्मत होऊन विठ्ठलाच्या भजन-किर्तनाला टाळल्यास नरकवास भोगावा लागेल असा ईशारा देऊन संत ज्ञानेश्वर साधकाला सावध करून परमानंद विठ्ठलाचे स्मरण करण्यास सुचवतात.पुण्याने स्वर्गवास व पापाने नरकवास भोगावा लागतो तर नामजपाने प्रत्यक्ष पांडुरंगाचे स्वरुप प्राप्त होत असे नि:संशयपणे सांगतात.जो पर्यंत देहात चैतन्य आहे तो वरच विठ्ठलाची जाले करुन घेणे श्क्य आहे कारण अंतकाळीं वैष्णवा शिवाय कोणीही सोडवणारा नाही.आयुष्य नश्वर आहे ,ईंद्रियांचे विषय विषासारखे आहेत ,त्यां पासून अलग राहून परमेश्वर चरणी मन गुंतवून जीवनाचे सार्थक केले पाहिजे.संत ज्ञानदेव स्वानुभवाने सांगतात की, विठ्ठलाचे चरणकमळी मन एकरूप केल्याने देहभाव नाहीसा होऊन आपण परमात्म स्वरूपच बनलो. अभंग---39


आरंभी आवडी आदरें आलों नाम । तेणे सकळ सिध्दी जगीं जाले पूर्ण काम ।।1।।रामक्रुष्ण गोविंद गोपाळा।तूं माय माउली जिवीं जिव्हाळा ।।2।।तुझियेनि नामें सकळ संदेहो फिटला । बापरखुमादविवरा श्रीविठ्ठला ।।3।।

भावार्थ---

आरंभी हरीचरित्रामुळे आदर निर्माण झाला,नंतर विठ्ठला विषयी विलक्षण प्रेमभाव मनांत जाग्रुत होऊन नामाविषयी ओढ वाटू लागली.अखंड नामस्मरणाने सकळ सिध्दी प्राप्त झाल्या.असे सांगून संत ज्ञानदेव म्हणतात की,हा गोविंद,गोपाळ आपली माय माऊली ,जिवीचा जिव्हाळा बनला आहे.बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठलाच्या नामजपामुळे मनातील सर्व संशयांचे निराकरण झाले आहे.

अभंग---40

अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे।हरिनाम नाटे तें बरवें।।1।।जें नाटे तें नाम चित्तीं ।रखुमादेविपती श्रीविठ्ठलाचें ।।2।।शरीर आटें संपत्ति आटे।हरिनाम नाटे तें बरवे ।।3।।बापरखुमादेविवराचें नाम नाटे। युगें गेली तरी उभा विटे ।।4।।

भावार्थ ---

अंड्यातून,गर्भातून,घामातून,पाण्यातून जन्म घेणाय्रा या चारी खाणीतिल सर्व सजीव हे नश्वर आहेत.भगवंताचे नाम मात्र चिरंतन,शाश्वत आहे .ते सतत चित्तात धारण करावें . देह ,संपत्ति यांना नाश आहे,हरिनाम विनाशी असून ,विठोबा युगांयुगापासून विटेवर उभा आहे. अठ्ठाविसयुगांपासून विठोबा विटेवर उभा आहे असे संत वचनआहे.

अभंग---41

कर्म आणि धर्म आचरती जयालागीं ।साधक सिणले साधन साधितां अभागी ।।1।।गोड तुझे नाम विठोबा आवडतें मज। दुजे विचारितां मना वाटतसे लाज ।।2।। भुक्त्ति आणि मुक्त्ति नामापासीं या प्रत्यक्ष । चारह्री वेद साही शास्त्रें देताती साक्ष ।।3।।काया वाचा चित्त चरणीं ठेविलेंसे गाहाण । बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ।।4।।

भावार्थ---

परमात्म्याच्या प्राप्तिसाठी साधक जप, तप ,व्रत,वैकल्य, यज्ञ याग दान धर्म असें अनेक मार्ग अनुसरतात.ही साधने साधतांना हे साधक थकून जातात.प्रत्यक्षांत निराशाच पदरी पडते.या अनुभवावरुन संत ज्ञानेश्वर सांगतात कीं, विठोबाचे गोड नाम आपणास अतिशय आवडते व त्या शिवाय इतर मार्गाचा विचार करण्याची सुध्दा लाज वाटते. नामसाधनेमुळे साधकाला भक्ति व मुक्ति प्राप्त होतात याची चारी वेद व सहा शास्त्रे साक्ष देतात.बापरखुमादेविवरा विठ्ठलाची शपथ घेऊन ज्ञानदेव सांगतात कीं, आपण आपला देह,मन,वाणी विठ्ठलचरणी अर्पण केले आहे.

अभंग ---42

जें शंभूने धरिलें मानसीं । तेंचि उपदेशिलें गिरिजेसी ।।1।।नाम बरवें बरवें । निज मानसी धरावें ।।2।।गंगोदकाहुनी निकें । गोडी अमृत जालें फिके ।।3।। शीतळ चंदनाहूनी वरतें । सुंदर सोनियाहुनी वरतें ।।4।। भुक्त्ति मुक्त्तिदायक । भवबंधमोचक ।।5।।बापरखुमादेविवरें। सुलभ नाम दिधलें सोपारें ।।6।।

भावार्थ ---

समुद्र मंथनातून निघालेले जहर प्राशन केल्यानंतर त्याचे उपशमन करण्यासाठी शिवशंकराने श्रीहरीचे गोड नाम कंठात धारण कले याच नामाचा त्यांनी पार्वतीस उपदेश केला.श्रीहरीचे नाम गंगेच्या पाण्यापेक्षा पवित्र , अम्रुता पेक्षा

गोड , चंदनाहून शीतल व सोन्याहूनही सुंदर आहे.श्रीहरीचे

नाम भुक्ति व मुक्ति देणारे व संसारबंधनातून मुक्त करणारे आहे.असे सुंदर सुलभ नाम रखुमादेविवराने भक्तांना दिले.

अभंग ---43

सकळ नेणोनियां आन । एक विठ्ठलुची जाण ।।1।।पुढती पुढती मन ।एक।विठ्ठलुची जाण ।।2।।हेंचि गुरुगम्याची खूण । एकविठ्ठलुची जाण ।।3।।बुझसी तरी बुझ निर्वाण।एक विठ्ठलुची जाण ।।4।।हेचि भक्ति हेंचि ज्ञान। एक विठ्ठलुची जाण ।।5।।बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण।एकविठ्ठलुचि जाण ।।6।।

भावार्थ ---

जे जाणून घेतल्याने सर्व कांही जाणलें जाते असे विठ्ठल हे तत्व आहे.तेव्हां इतर सर्व कांही सोडून एका विठ्ठलाला जाणून घ्यावे असे संत ज्ञानेश्वर सांगतात.हीच गुरुतत्व जाणून घेण्याची खूण आहे.समजून घेऊ शकत असशील तर समजून घ्यावे कीं,विठ्ठलपद हेंच मोक्षपद असून तेच खरें भक्ति व ज्ञान आहे.बापरखुमादेविवराची शपथ घेऊन संत ज्ञानेश्वर सांगतात कीं,एका विठ्ठलालाच जाणून घ्यावें.

अभंग ---44

जप तप अनुष्ठान । नित्य आमुचें रामधन । रामक्रुष्ण नारायण । हाचि जिव्हाळा सर्वदा ।।1।।जयाशी अम्रुत घट। रामक्रुष्ण घडघडाट । हेचि पूर्वजांची वाट ।सर्व जिवाशी तारक ।।2।।गोविंद गोविंद राम ।सर्व साधिलें सुगम ।नलगे तीं तपें उत्तम ।रामक्रुष्ण पुरे आम्हा ।।3।।ज्ञानदेवी स्नान ध्यान । राम राम नारायण । इतकेंचि पुरे अनुष्ठान। हेंचि जीवन शिवाचें ।।4।।

भावार्थ---

रामनाम नित्य जपणे हेंच आमुचे जप तप अनुष्ठान असून रामक्रुष्ण नारायण हे आमच्या अंतरिचे दैवत आहे असे संत ज्ञानदेव म्हणतात.रामक्रुष्णाच्या नामाचा गजर ही पूर्वजांनी घालून दिलेली वहिवाट असून सर्व जिवांना तारणारी आहे.गोविंद गोविंद राम या जप साधनेने सर्व कांही सिध्दिस गेले आहे.राम राम नारायण या जपाचे अनुष्ठान हेच आमुचे संध्यास्नान व ध्यान आहे असून हें इतकेचि अनुष्ठान पुरेसे आहे.हें च शिवशंकराचे सुध्दा अनुष्ठान होय असे संत ज्ञानेश्वर सांगतात.

अभंग ---45

आजि संसार सुफळ जाला गे माये ।देखियेले पाय विठोबाचे ।।1।।तो मज व्हावा तो मज व्हावा । वेळोंवेळा व्हावा पांडुरंग ।।2।।बापरखुमादेविवरु न विसंबे सर्वथा। निवृत्तिनें तत्वतां सांगितलें ।।3।।

भावार्थ ---

श्री विठ्ठलाच्या पदकमलांचे दर्शन झाले आणि सर्व संसार सफल झाला .या दर्शनाचा लाभ परत परत घडावा तो पांडुरंग सदा चित्ती वसावा.बापरखुमादेविवर पांडुरंगाला क्षणभरही विसंबू नये असे सद्गुरु निवृत्तिनाथांनी आपणास आवर्जुन सांगितले असे संत ज्ञानदेव म्हणतात.

अभंग ---46

अमोलिक रत्न जोडलें रे तुज ।कां रे ब्रह्मबीज नोळखिसी?।।1।।न बुडे न कळे न भीये चोरा । ते वस्तु चतुरा सेविजेसु ।।2।।ज्ञानदेवो म्हणे अविनाश जोडलें। आणुनी ठेविलें गुरुमुखीं ।।3।।

भावार्थ---

प्रत्यक्ष परब्रह्माचा अंश असलेले मानवी देहरुपी अमोलिक रत्न मिळाले असूनही हे ब्रह्मबीज जो परमात्मा कां ओळखत नाहीस असा प्रश्न विचारून संत ज्ञानेश्वर म्हणतात कीं,सद्गुरुंना शरण जावून हे ब्रहमज्ञान प्राप्त केले पाहिजे.ते आत्मज्ञान अगोचर असून बोध होण्यास अवघड आहे चतुराईने ते मिळवावे लागेल.परंतू या आत्मज्ञानास चोराचे अथवा पाण्याचे भय नाही.असे आत्मज्ञान गुरुमुखाने पुढे आणून ठेवल्यानें आपणास प्राप्त झालें असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.

अभंग---47


परिमळाची धांव भ्रमर वोढी ।तैसी तुझी गोडी लागो मज ।।1। अविट गे माय विटेना । जवळी आहे परी भेटेना ।।2।। तृषा लागलीया जीवनातें ओढी । तैसी तुझी गोडी लागे या जिवा ।।3 ।।बापरखुमादेविवरा विठ्ठली आवडी। गोडियासी गोडी मिळोन गेली ।।4।।

भावार्थ---

फुलांचा सुगंध आसमंतात पसरतो व भ्रमराला आपल्याकडे खेचतो.तशी विठ्ठलाच्या स्वरुपाची ओढ आपल्याला लागावी अशी संत ज्ञानेश्वर आळवणी करतात.परब्रह्म स्वरूप अविट असून त्या स्वरुपाला मन कधी विटत नाही आणि अगदी जवळ असूनही भेटत नाही.तहान लागल्यावर पाण्यासाठी जिवाची जशी तळमळ होते तशी विठोबाच्या स्वरूपाची ओढ लागावी .परमात्म्य स्वरुपांत जिवात्म्याचे सौख्य एकरुप व्हावे अशी अंतरिक ईच्छा संत ज्ञानेश्वर या अभंगात व्यत्त करतात.


अभंग ---48

पडलें दूर देशीं मज आठवे मानसीं ।नको नको हा वियोग कष्ट होताती जिवासी ।।1।।दिनु तैसी रजनी मज जालिये वो माये ।अवस्था लावुनी गेला अझुनी कां न ये।।2।। गरुडवाहना ,गंभिरा येई गा दातारा । बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला ।।3।।

भावार्थ ---

परमात्म स्वरुपा पासून दूर गेल्यानें सतत आठव येतो,या वियोगानें मनाला अतिशय कष्ट होतात.मनाची करुण अवस्था झाली आहे.या अवस्थेतून सोडवणूक करण्यासाठी संत ज्ञानेश्वर श्रीवठ्ठलाला गरुडवाहना, गंभिरा, दातारा अशी साद घालून अजून कां येत नाही असे विचारतात.

अभंग ---49

कवणाची चाड आतां मज नाहीं ।जडलों तुझ्या पायीं निश्चयेंची ।।1।।देह जावो राहो नाहीच संदेहो । न करी निग्रहो कासयाचा ।।2।।बहुत श्रमलों साधन करितां । विश्रांति तत्वतां न होयची ।।3।।तुज वांचोनियां कवणां सांगावें ।कवणां पुसावें अनुभवसुख ।।4।।माता पिता सखा सर्वस्व तूं कीर ।म्हणे ज्ञानदेव निव्रुतिशी ।।5।।

भावार्थ ---

या अभंगात संत ज्ञानेश्वर आपले सद्गुरु निव्रुत्तिनाथांना सांगतात कीं, आपणास आतां कुणाकडूनही कसलिही ईच्छा नाही.निश्चयपूर्वक गुरुचरणांशी जडलो आहे.देह जावो अथवा राहो या विषयीं कोणतिही आसक्ति नाही, कसलाच अट्टाहास नाही.साधना करुन खूप थकून गेलो असून मनाला विश्रांति नाही. या गोष्टी एका सद्गुरुंशिवाय कोणाला सांगतां येत नाही,अनुभवसुखा विषयी सद्गुरुंशिवाय कोणाशीं हितगूज करणार? कारण एक सद्गुरुच आपले माता ,पिता, सखा सर्वस्व आहेत.

अभंग ---50

अग्नीच्या पाठारीं पिके जरी पीक । तरी ज्ञानी सुखदु:ख भोगतील ।।1।।काळोखामाजीं जैसें शून्य हारपे । मायोपाधी लोपे तया ज्ञानी ।।2।। नक्षत्राच्या तेजें जरी इंदु पळे ।तरी ज्ञानी विकळे पुण्यपाप ।।3।।बापरखुमादेविवर विठ्ठलु राया । घोटूनिया माया राहियेला ।।4।।

भावार्थ---

धगधगित अग्नीच्या पठारावर जसे पीक येणे शक्य नाही तसेच ज्ञानी माणसाला सुखदु:ख भोगावी लागत नाही जशी काळोखांत आकाशाची पोकळी लोप पावते,तशी ज्ञानी पुरुषाची मायारुपी उपाधी लोप पावतें.जर नक्षत्रांच्या तेजाने चंद्र लोपून जाऊ शकेल तर ज्ञानी व्यक्तिला पाप पुण्याची चिंता ग्रासू शकेल. बापरखुमादेविवरु विठ्ठल हा मायातीत ,सर्वज्ञानी आहे असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.

अभंग ---51

गगनाहूनी व्यापक वायुहूनि चालक ।अग्नीहूनी दाहक आन नसे ।।1।।ब्रह्म परिपूर्ण तोच सनातन ।स्वये आनंदघन आन नसे।।2।। दृष्यहूनी गोचर इहिहूनि पर । गुरुवीण ज्ञानेश्वर आन नसे ।।3।।

भावार्थ ---

सामान्य माणसाला आकाश सर्वव्यापी वाटतें.ब्रह्म त्याहूनही व्यापक असून गगनाला व्यापून टाकते.वायु सर्व सजीवांच्य चलनवलनाचा नियंत्रक आहे पण ब्रह्म वायूचाही चालक आहे.अग्नीची दाहकता ब्रह्मरूपाहून वेगळी नाही.ब्रह्म परिपूर्ण ,अनादी,अनंत असून आनंदघन आहे.ब्रह्मरुपासारखे अन्य कांहीच नाही ,ते दृष्य वस्तुच्या पलिकडे आहे.संत ज्ञानेश्वर म्हणतात कीं,आपणही ब्रह्मरूप सद्गुरू निव्रुतिनाथापेक्षा वेगळे नाही.

अभंग---52

मुक्ति पावावया करिजे हरिभक्ति । तरीच विरक्ती प्रगटेल।।1।। विरक्ति विषयीं होतांची विचार ।नित्य हे नश्वर ओळखती ।।2।। तेव्हां आत्मज्ञान अनुभव होय। अविद्यत्व जाय जीवरुप ।।3।।शांति क्षमा दया तिष्ठती सहज । न दिसे दृष्य काज जगामाजीं ।।4।।गुरुक्रुपा द्वारें लाहिजे पैं सिध्दी । बोलिला त्रिशुद्धि ज्ञानेश्वर ।।5।।

भावार्थ ---

मोक्षाची इच्छा असणार्यांनी हरीची भक्ति करावी,भक्तिमुळें चित्त शुध्द होऊन विरत्ती निर्माण होईल.त्या मुळे नित्यानित्य विवेक करण्याची सवय होईल. देहबुध्दी कमी होत जाऊन आत्मबुध्दीचा विकास होईल.आपले मानवी स्वरुप मुलत: देह नसून आत्मा आहे याचा बोध होईल.अविद्येचा लोप होईल.दिसणारे व भासणारे सर्व द्रुष्य विश्व नश्वर आहे याची खूण पटेल.दया क्षमा शांती मनोमंदिराच्या पुढे उभ्या ठाकतील.गुरुक्रुपेमुळे या अपूर्व सिध्दी प्राप्त होतील अशा त्रिविध प्रकारच्या त्रिशुध्दी संत ज्ञानेश्वरांनी याअभंगात सांगितल्या आहेत.

अभंग ---53

मरण न येतां सावधान व्हा रे । शोधुनी पावा रे निजवस्तू ।।1।।अंतकाळीं जरी करावें साधन ।म्हणतां नागवण आली तूम्हां ।।2।।नाशिवंत देह मानाल शाश्वत। तरी यमदूत ताडतील ।।3।।काळाचे खाजुके जाणिजे कीं काय। धरुं नको माया सर्वथैव ।।4।।अमोलिक प्राप्ति होत आहे तुज ।धरुनियां लाज हित करीं ।।5।।मागुती न मिळे जोडलें अवचट । सायुज्याचा पाट बांधुनी घेई ।।6।।ज्ञानदेव म्हणे विचारा मी कोण । ना तरी पाषाण होऊनी राहा।।7।।

भावार्थ---

मृत्युने गाठण्याच्या आधीच सावध होऊन आत्मवस्तुचा शोध घ्यावा असे संत ज्ञानदेव या अभंगात सांगतात कारण अंतकाळी रामनाम हे आत्मप्राप्तिचे साधन करू असे म्हटले तर त्या वेळीं मुखांत नाम न आल्यास फसवणूक होण्याचा धोका आहे.हा नाशवंत देह शाश्वत मानून त्याचा मोह धरल्यास यमदूतां कडून ताडलें जाऊ शकाल.यमाचा घाला केव्हांही पडू शकेल. मोक्ष-मुक्ती ही अमोलिक वस्तु असून अनित्य वस्तुचा त्याग करावा व मानवी देहाचे सार्थक करून घ्यावें.कारण हा देह परत परत मिळणारा नाही,या जन्मांतच सायुज्य मुक्ती साधून घेण्याची सोय आहे.आतांच आपण कोण आहोत आणि आपल्या मनुष्य देहाचे प्रयोजन काय याचा विचार न केल्यास जडदेहांत अनंत काळापर्यंत राहावें लागेल.

अभंग---54

गुरूज्ञान नाहीं ज्यासी । तरणोपाय नाहीं त्याशी ।तो नावडे ऋषीकेशी । व्यर्थ जन्मासी तो आला.।।1।।देव धर्म नेणें कांहीं। घरी प्रपंचाची सोई ।त्या कोठेंही थारा नाही ।हें वेद बोलिलासे ।।2।।क्रुष्णकथा जो नायके ।

भावार्थ ---

संत ज्ञानेश्वर या अभंगात म्हणतात कीं, ज्याच्याकडे गुरुज्ञान नाही तो भगवंताला आवडत नाही. कारण संसार सागर तरुन जाण्यासाठी गुरुक्रुपेची अत्यंत जरुरी असते.जो देव ,धर्म जाणत नाही,संसाराची चिंता नाही त्याला कोठेही विसाव्याचे ठिकाण नाहीं असे वेदांत सांगितले आहे.ज्याला क्रुष्णकथेची गोडी नाही ,रामनाम मुखाने जपत नाही,त्याला जन्मजन्मांतरी कोटी दु:खें सोसावी लागतात.जन्म मरणाचा फेरा चुकत नाही.संत ज्ञानदेवांनी वेद, उपनिषदांचा सखोल अभ्यास करुन ,संस्क्रुत भाषेच्या पिंजर्यात अडकलेलें वैदिक ज्ञान मोकळे केले व सामान्य लोकांना ज्ञानाची ,मोक्षाची कवाडं उघडी करुन दिली.सर्व पितरांसहित सर्वांचे भवपाश तोडलें.

अभंग---55

दुडीवर दुडी गौळणी साते निघाली ।गौळणी गोरसु म्हणों विसरली ।।1।।गोविंद घ्या वो दामोदर घ्या वो ।जव तव बोलती मथुरेच्या वो ।।2 ।।गोविंद गोरसु एकचि नांवा ।गोरसु विकूं आलें तुमच्या गावा ।।3।।बापरखुमादेविवर विठ्ठलेंसी भेटी ।आपले संवसाटी करुनी ठेली ।।4।।

भावार्थ ---

दूधाच्या हंड्या एकावर एक ठेवून मथुरेच्या बाजारांत गेलेली गौळण हरीनादांत इतकी बुडून गेली कीं, दूध घ्या दूध असं म्हणायचे विसरुन गोविंद घ्या दामोदर घ्या असा हाकारा करु लागली.तिचे हे बोल ऐकून इतर गौळणींना अचंबा वाटला. त्यांची ही प्रतिक्रिया पाहून ही गवळण त्यांच्यापासून दूर निघून गेली आणि आपल्या विचारांत दंग झाली. हे सर्व विश्व एकाच परमेश्वरी रंगाने रंगले आहे.मथुरेचा बाजार,दूध विकणारी गवळण आणि गोरस सर्व एकाच परमेश्वराची रुपें आहेत.संत ज्ञानेश्वर म्हणतात रखुमादेविवराची भेट झाली असतां भेट घेणारा परमात्म स्वरुप होतो.