कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका/कोविड-१९संदर्भातील गैरसमज
कोविड-१९संदर्भात विविध माध्यमांतून अनेक गैर समज प्रसृत होत आहेत. त्यांसंदर्भात काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
सर्वसाधारण धोरण
संपादनकोविड-१९शी संबंधित अनेक बाबींवर अद्याप अभ्यास चाललेला असल्याने नेमकी कोणती माहिती विश्वसनीय धरायची आणि कोणती नाही ह्याचा निर्णय घेणे सर्वसामान्य व्यक्तींसाठी कठीण आहे. तरी विविध माध्यमांतून जी माहिती प्रसृत होत असते तिच्या संदर्भात सर्वसाधारण धोरण पुढीलप्रमाणे असावे.
- कोणत्याही माध्यमात एखादा उपाय सांगितला असेल तर तो आपला आपण अनुसरू नये. असा कोणताही उपाय अनुसरण्यापूर्वी शक्यतो आपल्या वैद्यकीय मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घ्यावे.
- माहितीचा स्रोत विश्वसनीय आहे की नाही हे शक्यतो पडताळावे. उदा. जागतिक आरोग्य संघटना, केंद्रशासन, राज्यशासन ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर दिलेली माहिती व मार्गदर्शक सूचना ह्या एखाद्या अनुदिनीवरील वा चर्चापीठावरील माहितीच्या तुलनेत प्रमाण मानता येतील.