एकनाथांचे चरित्र

नाथांचा जन्म इ.स.१५२८ मध्ये पुण्यपावन अशा घराण्यात झाला. ज्यांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात परत आणली त्या संत भानुदासाचे एकनाथ हे पणतू होत. भगवद्भक्ती त्यांच्या घराण्यात पूर्वीपासून चालत आलेली. पैठण हे तत्कालीन महाराष्ट्राचे काशीक्षेत्र आणि संस्कृत धर्मग्रंथाच्या अभ्यासाचे व्यासपीठ समजले जाई. या पैठणक्षेत्री एकनाथांचा जन्म झाला. नाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणी असे होते. पण आईवडिलांचा सहवास नाथांना फार काळ लाभला नाही. नाथांचे पालनपोषण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनीच केले. एकनाथांनी लहानपणी गीता, उपनिषदे, शास्त्रे, पुराणे याबरोबरच लेखन, वाचन, गणित यांचाही अभ्यास केला. बालवयात भक्तिमार्गाचे संस्कार नाथांवर झाले. त्यांचे मन परमार्थाकडे वळले व गुरूभेटीची ओढ निर्माण झाली. आजोबा चक्रपाणी यांची अनुज्ञा घेऊन एकनाथ देवगिरी येथील विद्वान संत जनार्दनस्वामी यांच्याकडे गेले. अत्यंत तेजस्वी व विनम्र अशा नाथांची योग्यता स्वामींनी ओळखली व एकनाथांना गुरूदिक्षा दिली. गुरू-शिष्य तीर्थयात्रेला निघाले असतांना स्वामींनी नाथांना चतु:श्लोकी भागवतावर टीका लिहिण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे नाथांनी पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर येथील मुक्कामात भागवतावर विद्वत्तापूर्ण व रसाळ भाषेत टीका पूर्ण केली. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग व उत्तर भारतातील तीर्थे करून नाथ पैठणला आले.

गुरूआज्ञेप्रमाणे नाथांनी सन १५५७ मध्ये पैठण येथे गिरिजाबाईंशी विवाह केला. पतिव्रता गिरिजाबाई नाथांच्या जीवनांत पूर्ण समरस झाल्या. श्रीखंड्या व उध्दव हे दोन सेवक नाथांना लाभले. गोदा, लीला आणि हरिपंडित ही तीन अपत्ये, मुक्तेश्वर कवी, गोदावरीचा मुलगा हे नाथांचे कुटुंब. एकनाथांचा मुलगा हरिपंडित हा संस्कृत भाषेचा अभिमानी, कर्मठ, सनातनी वृत्तीचा होता. नाथ उदार व सहिष्णू होते. भागवतावर नाथांनी मराठीत टीका केली म्हणून हरिपंडित रागावला व घर सोडून काशीला निघून गेला. नाथांच्या भागवतग्रंथाच्या मराठी टीकेचा काशीच्या पंडितांनी सन्मानाने गौरव केला, तेव्हा हरिपंडिताला आपली चूक समजली व पितापुत्रामधील वाद कायमचा मिटला.

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली. नाथांनी आपले विचार व्यक्त करण्यासाठी विविध पद्धतींची योजना केली. पंडित आणि विद्वानांसाठी चतु:श्लोकी भागवत व एकनाथी भागवताचे लेखन केले. मध्यमवर्गासाठी रुक्मिणीस्वयंवर व भावार्थरामायणाची योजना केली. जो तळाचा वर्ग होता त्यासाठी भारूडांची निर्मिती केली. लोकभाषेत लोकरंजन करताना लोकशिक्षण देणारे एकनाथ हे पहिले कवी होत. ग्रंथ, भारूडे, पदे, गौळणी आणि अभंग मिळून नाथांची काव्यसंपदा पाऊण लाख भरते. दत्तउपासक आणि वारकरी, प्रपंच आणि परमार्थ, काव्य आणि तत्वज्ञान, संस्कृत आणि प्राकृत, पंडितश्रेष्ठ आणि सामान्यजन असा समन्वय नाथांनी आपल्या जीवनात व धर्मग्रंथात घातला.

भागवतातील नवव्या अध्यायाच्या ३२ ते ३५ या चार श्लोकावर एकनाथांनी १०३६ ओव्यांचे भाष्य लिहिले. सृष्टीनिर्मितीपूर्वीं ब्रह्मदेवाने केलेल्या तपश्चर्येने श्रीआदिनारायण प्रसन्न झाले व त्यांनी जे ज्ञान सांगितले ते या चार श्लोकात आले आहे. हा आपला पहिलाच ग्रंथ असल्याने ‘वाकुडे तिकुडे आर्ष‘ आहेत असे नाथ संकोचाने व विनयाने सांगतात. ग्रंथाच्या शेवटी “जे बोलविले जनार्दने । तेचि ग्रंथकथने कथिलें म्यां ।“ या शब्दांत ग्रंथलेखनाचे सारे श्रेय नाथ आपले गुरू जनार्दनस्वामींना अर्पण करतात.

नाथांची भारूडरचना विविध स्वरुपाची असून त्यातून लोकजीवनातील उदाहरणे देऊन लोकभाषेतून अध्यात्म शिकवले आहे. मनोरंजनातून परमार्थाची भाषा शिकवली आहे. त्यामुळे नाथांचे वर्णन लोकसाहित्यकार असे केले जाते. नाथकालीन समाजजीवनाचे म्हणजे चालिरिती, सणवार, कुटुंबव्यवस्था, ग्रामजीवन, समाजव्यवस्था यांचे अत्यंत स्पष्ट दर्शन ही भारूडे घडवतात. अशी सुमारे ३०० भारूडे नाथांनी लिहिली आहेत. याशिवाय ‘हस्तामलक', ‘स्वात्मसुख’, ‘शुकाष्टक’, ‘आनंदलहरी’, ‘गीतासार’, ‘चिरंजीवपद’, ‘गीतामहिमा’ अशी स्फुटप्रकरणे नाथांनी लिहिली आहेत. त्यातील ओव्यांची एकूण संख्या सुमारे ४००० आहे.

विविध देवदेवतांवर एकनाथांनी अभंगरचना करून भक्तीच्या नाना छटांचे मनोरम दर्शन घडवले आहे. अभंगातून कृष्णजन्म, बालक्रिडा, कृष्णमहिमा, पंढरीमहिमा विठ्ठलमहिमा, राममहिमा, नाममहिमा, नामपाठ, किर्तनमहिमा, संतमहिमा, सद्गुरूमहिमा, अद्वैतज्ञान, आत्मभूमी अश्या विविध विषयांवर प्रासादिक, सुबोध अभंगरचना करून नाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे. सुलभता, गेयता, प्रासादिकता हे नाथांच्या अभंगांचे प्रमुख गुणविशेष आहेत.

एकनाथांची भजने

कर्मयोग आणि चित्तशुध्दी

१ मनुष्यदेहाचे सार्थक

फूल झडे तंव फळ सोसे । तया पाठी तेही नासे ।
एक मागे एक पुढे । मरण विसरले बापुडे ।
मरण ऐकता परता पळे । पळे तोही मसणी जळे । एका जनार्दनी शरण । काळ वेळ तेथे न रिघे मन ।

भावार्थ:

झाडावर फूल उमलते. कालांतराने ते कोमेजून जाते. फूल झडून गेल्यावर झाडावर फळ लागते. यथावकाश फळ पिकून मधुर बनते आणि हळूहळू नासून जाते. हा निसर्गनियम असून विकास आणि विनाश एकापाठोपाठ येतात. तरीही मरणाची कल्पना माणसाला भेडसावते. तो मरणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी काळामुखी पडतो. जीवनातील हे सत्य सांगून एका जनार्दनी म्हणतात, काळ वेळ आल्याशिवाय मरण येत नाही.


जे जे दिसे ते ते नासे । अवघे ओस जायाचे ।
पदार्थ-मात्र जात असे । काही नसे आन दुजे ।
एका जनार्दनी सर्व वाव । धरा भाव विठ्ठली ।

भावार्थ:

जे जे डोळ्यांना दिसते, ते ते सर्व नाशवंत आहे. उत्पत्तीनंतर विकास व शेवटी विनाश ठरलेला आहे. या तत्वाशिवाय दुसरे काहीही सत्य नाही. या अविनाशी विठ्ठलचरणी भक्तिभाव ठेवावा, असे एका जनार्दनी या भजनांत सांगतात.


अशाश्वतासाठी । का रे देवासवे तुटी ।
अंतकाळीचे बंधन । कोण निवारी पतन ।
तु म्हणसी हे माझे । खरा ऐसे वाहसी ओझे ।
याचा न धरी विश्वास । एका जनार्दनाचा दास ।

भावार्थ:

माणुस जन्माला येतो आणि देहबुध्दीने ममत्व निर्माण होते. आपला देह, इंद्रियसुखाची साधने, आप्तपरिवार आपली वाटू लागतात. सर्व माझे-माझे म्हणुन गाढवाप्रमाणे ओझे वाहतो. हेच अंतकाळीचे बंधन बनते. जनार्दनस्वामींचे दास एकनाथ सांगतात की या सर्व गोष्टी अशाश्वत आहेत, त्यावर विश्वास धरु नये. त्यामुळे अंतकाळीचे पतन-निवारण करणाऱ्या देवाला आपण पारखे होतो.


देह हा काळाचा जाणार शेवटी । याची धरुनी मिठी गोडी काय ।
प्रपंच काबाड एरंडाचे परी । रस-स्वाद तरी काही नाही ।
नाशवंतासाठी रडतोसी वाया । जनार्दनी शरण रिघे तु पाया ।
एका जनार्दनी भेटी होता संतांची । जन्म-मरणाची चिंता नाही ।

भावार्थ:

देह हा अशाश्वत असून शेवटी तो काळामुखी जाणार आहे, त्याची लालसा धरून उपयोग नाही. प्रपंच हा काबाडकष्ट देणारा असून एकनाथ प्रपंचाला रस-स्वाद नसलेल्या एरंडाच्या झाडाची उपमा देतात. प्रपंच नाशवंत असून त्याचे दु:ख करण्यापेक्षा संतांना शरण जाणे श्रेयस्कर आहे. कारण एकदा संतांची भेट झाली की जन्ममरणाची चिंता करण्याचे कारण नाही, असे संत एकनाथ म्हणतात.


मागे बहुतांसी सांगितले संती । वाया हे फजिती संसार तो ।
अंधाचे सांगाती मिळालेसे अंध । सुख आणि बोध काय तेथे ।
एका जनार्दनी जाऊ नको वाया । संसार माया लटकी ते ।

भावार्थ:

फार पूर्वीच संतांनी उपदेश केला की संसार ही केवळ लटकी माया असून तिच्या बंधनात अडकणे म्हणजे व्यर्थ जीवन घालवणे. जो सत्याचे दर्शन घेऊ शकत नाही, अशा अंधास दुसरा अंध भेटला तर कोण कुणाला योग्य मार्ग दाखवणार आणि त्यापासून कोणते सुख प्राप्त होणार ? म्हणून एकनाथमहाराज सांगतात की संसार-बंधनात अडकून मिळालेला मनुष्यजन्म वाया घालवू नका.


नरदेही येऊनी करी स्वार्थ । मुख्य साधी परमार्थ ।
नव्हता ब्रह्मज्ञान । श्वान - सूकरांसमान ।
पशुवत् जिणे । वाया जेवी लाजिरवाणे ।
एका जनार्दनी पामर । भोगिती अघोर यातना ।

भावार्थ:

नरदेह मिळूनही जर ब्रह्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, तर मनुष्यजन्म मिळूनही जीवन कुत्रा व डुकराप्रमाणे पशुवत, लाजिरवाणे होऊन वाया जाईल. एकनाथमहाराज म्हणतात, अशा पामरांना अनंत अघोर यातना भोगाव्या लागतात. नरदेही येऊन परमार्थ साधणे अत्यंत श्रेयस्कर आहे, कारण नरदेहाद्वारेच देवत्व साधता येते.


देह सांडावा ना मांडावा । येणे परमार्थचि साधावा ।
जेणे देही वाढे भावो । देही दिसतसे देवो ।
ऐसे देही भजन घडे । त्रिगुणात्मक स्वयें उडे ।
त्रिगुणात्मक देही वावो । एका जनार्दनी धरा भावो ।

भावार्थ:

परमेश्वरकृपेने मिळालेल्या नरदेहाचा त्यागही करु नये आणि त्याचा अहंकारही मानू नये. हा नरदेह परमार्थ साधण्याचे साधन आहे, असे समजून जीवन परमेश्वराच्या भक्तिभावात घालवावे. जसजसा भक्तिभाव वाढत जातो तसतसा देहात देव प्रकट होतो आणि असा देह भजनांत तल्लीन होतो, तेव्हा सत्व-रज-तमोगुण लयास जाऊ लागतात. असा भक्तिभाव धरावा की हा त्रिगुणात्मक देह नश्वर आहे असा भाव निर्माण व्हावा, असे एका जनार्दनी म्हणतात.


२ स्वधर्माचरणाचे अगत्य

परमार्थाचे वचना द्यावे अनुमोदन । तेणे नारायण संतोषत ।
विषयिक वचना देता अनुमोदन । तेणे नारायण क्रोध पावे ।
भक्ति-प्रेम-वचना द्यावे अनुमोदन । तेणे नारायण संतोषत ।
दुर्बुध्द वचना देता अनुमोदन । तेणे नारायण क्रोध पावे ।
एका जनार्दनाचे वचना द्यावे अनुमोदन । तेणे जनार्दन संतोषत ।

भावार्थ:

परमार्थवचनांचा आनंदाने स्विकार केल्याने नारायण प्रसन्न होतात. याउलट इंद्रियविषयांचे चिंतन केल्याने नारायणाचा कोप होतो. भक्ती आणि प्रेमाच्या वचनांनी नारायण प्रसन्न होतात, तर वाईट विचारांचा अंगिकार केल्याने नारायण क्रोधिष्ट होतात. एकनाथमहाराज म्हणतात, सद्गुरू जनार्दनस्वामींची वचने स्विकारल्यास स्वामी संतोष पावतात.


मेघ वर्षे निर्मळ जळ । परी जैसे बीज तैसे फळ ।
तैसे भक्त अभक्त दोन्ही । वेगळीक वेगळेपणी ।
एका जनार्दनी गुण । चंदन वेळू नोहे समान ।

भावार्थ:

मेघ सर्व काळी सर्व स्थळी, निर्मळ जळाचा वर्षाव करीत असतात, तरीही झाडांवर येणारी सर्व फळे एकाच प्रकारची नसतात. जसे बीज तसे फळ येते, हा निसर्गनियम आहे. चंदनाच्या बीजापासून चंदनाचे झाड आणि बांबूपासून बांबू उगवणार या निसर्ग नियमाचा दाखला देवून एका जनार्दनी स्पष्टीकरण करतात की, भक्त आणि अभक्त एकाच भगवंताचे अंश असले तरी त्यांचे स्वाभाविक गुणधर्म भिन्न असल्याने ते परस्परांपासून वेगळे असतात.


१०

अधर्मे अदृष्टाचे चिन्ह । विपरीत वचन ते ऐका ।
भांडारी ठेविला कापूर उडे । समुद्रामाजी तारू बुडे ।
ठक येवोनि एकांती । मुलाम्याचे नाणे देती ।
परचक्र विरोध धाडी । खणित लावुनी तळघरे फोडी ।
पाणी भरे पेवा आत । तेणे धान्य नासे समस्त ।
गोठण शेळ्या रोग पडे । निमती गाईम्हशींचे वाडे ।
भूमि-निक्षेप करू जाती । ते आपुल्याकडे धुळी ओढिती ।
ऐसी कर्माची अधर्म-स्थिती । एका जनार्दनी सोशी फजिती ।

भावार्थ:

जेव्हा लोकांमध्ये अधर्म, अनाचार यांचे प्राबल्य वाढते तेव्हा भविष्यात घडून येणाऱ्या गोष्टींची विपरित चिन्हे दिसू लागतात. धान्याच्या कोठारातील कापूर उडणे, समुद्रात जहाज बुडणे, ठकांकडून फसवणूक होणे, परचक्र येऊन तळघरे फोडली जाणे, धान्याच्या पेवात (कोठारात) पाणी भरुन सगळं धान्य नासून जाणे, गाई-म्हशी, शेळ्या यासारख्या पाळीव प्राण्यांवर रोग पडून मृत्यु येणे, भूकंप होऊन जमीन खचणे ही सर्व अधर्म वाढल्याची लक्षणे आढळून येतात. या अधर्म-स्थितीत लोकांना असुरक्षितता, अवहेलना सोसावी लागते असे एका जनार्दनी म्हणतात.


११

जया करणे आत्म-हित । स्वधर्म आचरावा सतत ।
कर्मे नित्य नैमित्तिक । ब्रह्मप्राप्ती लागी देख ।
तीचि नित्य आचरावी । चित्तशुध्दी तेणे व्हावी ।
एका जनार्दनी कर्म । ईशभक्तीचे हे वर्म ।

भावार्थ:

ज्या साधकांना स्वतःचे हित साधायचे असेल त्यांनी आपली नित्य व नैमित्तिक (रोज नियमितपणे करावी अशी नित्य व काही निमित्ताने करावी लागणारी नैमित्तिक) कर्मे यथाकाल, यथाविधी, यथासांग पूर्ण करून स्वधर्माचे आचरण करावे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, कर्माच्या आचरणाने आपले चित्त शुध्द होऊन आत्मदर्शनाचा मार्ग मोकळा होतो. ईश्वरभक्तीचे हेच रहस्य आहे.


१२

ज्यासी करणे चित्तशुद्धी । कर्मे आचरावी आधी ।
तरीच होय मन:शुध्दी । सहज तुटती आधि-व्याधि ।
चित्ताची स्थिरता । होय उपासने तत्वतां ।
चित्त झालिया निश्चळ । सहज राहिल तळमळ ।
एका जनार्दनी मन । होय ब्रह्म-रूप जाण ।

भावार्थ:

कर्माने चित्त-शुद्धी होते हा पारमार्थिक सिध्दांत सांगून एका जनार्दनी म्हणतात, ज्यांना चित्त-शुध्दीची आस लागली आहे त्यांनी कर्माचे आचरण करावे. त्यामुळे मनाची मलिनता नाहिशी होऊन ते शुध्द होते. परिणामी मनाचे रोग (आधि) व देहाच्या व्याधी सहज तुटतात. देवाच्या नियमित उपासनेने चित्ताची स्थिरता लाभते. चित्त निश्चळ झाल्याने मनाची तळमळ नाहिसी होते आणि मन आत्मस्वरुपाशी एकरुप होते.


१३

नित्य-नैमित्तिक कर्मे आचरावी । तिही ते पावावी चित्तशुध्दि ।
चित्त स्थिर व्हाया करी उपासना । भजे नारायणा एका भावे ।
विवेक-वैराग्य-प्राप्ति तत्प्रसादे । चित्ता लागे वेध सद्गुरूचा ।
सद्गुरू-कृपेने पूर्ण बोध होय । नित्य त्याचे पाय हृदयी धरी ।
एका जनार्दनी ठेवूनिया मन । मनाचे उन्मन पावलासे ।

भावार्थ:

नित्य, नैमित्तिक कर्मे सद्भावनेने आचरावी, कारण त्यामुळे चित्तशुध्दी होते. चित्त स्थिर होण्यासाठी नारायणाची अनन्यभावे उपासना केल्याने नारायणकृपेने विवेक व वैराग्याची प्राप्ती होते. विवेक व वैराग्य आले की सद्गुरूभेटीची ओढ लागते. सद्गुरूने कृपा केल्याने पूर्ण आत्मबोध होतो. आत्मबोधाचा लाभ करुन देणाऱ्या सद्गुरूचरणांची नित्य सेवा करावी असे सांगून एकाजनार्दनी सांगतात, सद्गुरूचरणांशी मन एकाग्र केल्याने मन शुध्द होऊन उच्च पातळीवर स्थिर झाले, मनाचे उन्मन झाले.


१४

परब्रह्म-प्राप्ती लागी । कर्मे आचरावी वेगी ।
चित्त शुध्द तेणे होय । भेटी सद्गुरूचे पाय ।
कर्म नित्य नैमित्तिक। प्रायश्चित्त जाण एक ।
उपासन ते चौथे । आचरावे शुध्द चित्ते ।
तेणे होय चित्त स्थिर । ज्ञानालागी अधिकार ।
होय भेटी सद्गुरूची । ज्ञानप्राप्ति तैची साची ।
प्राप्त झाल्या ब्रह्मज्ञान । आपण जग ब्रह्म परिपूर्ण ।
एका जनार्दनी भेटला । ब्रह्म-स्वरूप स्वयें झाला ।

भावार्थ:

नित्यकर्म, नैमित्तिक कर्मे, प्रायश्चित्त कर्मे व चौथी उपासनाकर्मे केल्याने चित्त शुध्द होऊन परब्रह्म प्राप्ती होते. चित्त स्थिर होऊन ज्ञानासाठी अधिकारी बनते. सद्गुरुंची भेट हीच ज्ञानप्राप्ती होय, आत्म-स्वरुपाशी पूर्णपणे एकरूप होणे हेच ब्रह्मज्ञान. एकनाथमहाराज जनार्दनस्वामींना भेटले आणि ब्रह्मज्ञान होउन ब्रह्म-स्वरूप झाले असे म्हणतात.


३ निष्काम कर्म-योग

१५

आधी घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथा ।
निरपेक्षाची आवडी । ब्रह्मज्ञान घाली उडी ।
निरपेक्षावाचून । नाही नाही रे साधन ।
एका जनार्दन शरण । निरपेक्ष पाविजे ज्ञान ।

भावार्थ:

निरपेक्ष भक्ती, निरपेक्ष कर्म हेच निरपेक्ष ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन आहे. निरपेक्षतेशिवाय अन्य कोणतेही साधन नाही. निरपेक्ष साधकाच्या प्रेमामुळे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान धाव घेते असे सांगून एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी निरपेक्षपणे शरणागत झाल्याने ब्रह्मज्ञानाचा अधिकारी झाला.


१६

आशा-बध्द करिती वेदांचे पठण । तेणे नारायण तुष्ट नोहे ।
आशा-बध्द करिती जप तप हवन । तेणे नारायण तुष्ट नोहे ।
निराशी करिती देवाचे कीर्तन । एका जनार्दन तुष्ट होय ।

भावार्थ:

जेव्हा साधक काहितरी फळ मिळवण्यासाठी वेदांचा अभ्यास, पठण करतो. त्यामुळे नारायण प्रसन्न होत नाही. जप, तप, होम हवन ही नैमित्तिक कर्मे जेव्हा सत्ता, संपत्ती, संतती, लौकिक मिळवण्याच्या आशेने केली जातात, तेव्हाही नारायण संतुष्ट होत नाही. जेव्हा केवळ मनाच्या समाधानासाठी, चित्तशुध्दीसाठी जी कर्मे केली जातात, तेव्हा एकनाथांचे जनार्दनस्वामी आनंदित होतात.


१७

वेदयुक्त मंत्र जपता घडे पाप । मी मी म्हणोनि संकल्प उठतसे ।
यज्ञादिक कर्म घडता सांग । मी मी संसर्ग होता वाया ।
एका जनार्दनी मीपणा टाकून । करी कृष्णार्पण सर्व फळ ।

भावार्थ:

योग-याग, होम-हवन करतांना ज्या वेदमंत्रांचे पठण केले जाते ते मंत्र मुख्यतः कामनापूर्तीसाठी गायले जातात. त्यामुळे मनात नवनवे संकल्प उठतात. या संकल्पानुसार यज्ञादिक कर्मे यथासांग पार पाडली जातात. त्यामुळे मनाला मीपणाचा संसर्ग होतो. अहंकाराची बाधा होते. यासाठी एका जनार्दनी सांगतात, मीपणाचा त्याग करून केलेल्या सर्व कर्माची फळे श्रीकृष्ण नारायणाला श्रध्देने अर्पण करावी.


१८

कर्म करिसी तरी कर्मठचि होसी । परी निष्कर्म नेणसी कर्मामाजी ।
ब्रह्मालागी कर्म सांडणे हे कुडे । पाय खंडोनि पुढे चालु पाहसी ।
एका जनार्दनी सर्व कर्म पाही । सांडी मांडी नाही तये ठायी ।

भावार्थ:

कर्म करतांना निष्कर्म होणे हेच कर्माचे अंतिम साध्य आहे. फलाशा सोडून कर्म करणे म्हणजे कर्माचे फळ ईश्वराला समर्पित करणे होय. परंतु कर्म करत असताना आपण निष्कर्म न होता अधिकाधिक कर्मठ होत जातो. ब्रह्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्नात आपली सर्व नित्य व नैमित्तिक कर्मे सोडून देणे म्हणजे पाय तोडून टाकून पुढे चालण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. कारण कर्म हेच ब्रह्मज्ञानाचे मुख्य साधन आहे असे सांगून एका जनार्दनी कोणतेही कर्म सोडू नये असे आग्रहाने सांगतात.


१९

धावू नको सैरा कर्माचिया पाठी । तेणे होय दृष्टि उफराटी ।
शुध्द-अशुध्दाच्या न पडे विवादा । वाचे म्हणे सदा नारायण ।
एका जनार्दनी ब्रह्मार्पण कर्म । तेणे अवघे धर्म जोडतील ।

भावार्थ:

योग्यायोग्यतेचा कोणताही विचार न करता साधक कर्माच्या पाठीमागे लागला तर तो निष्कर्मी बनण्याची ऐवजी कर्मठ बनतो, त्याची दृष्टी उफराटी बनते असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, कर्माची कोणती पध्दत शुद्ध व कोणती अशुध्द यांच्या वादात न पडता, वाचेने सतत नारायणाचे नाम घेत कर्म केले की ते ब्रह्मार्पण होते व सर्व धर्मांचे पालन केल्याचे श्रेय मिळते.


२०

प्रपंच परमार्थ एकरूप होत । आहे ज्याचा हेत रामनामी ।
परमार्थे साधे सहज संसार । येथे येरझार नाही जना ।
सहज संसारे घडे परमार्थ । लौकिक विपरीत अपवाद ।
एका जनार्दनी नाही तया भीड । लौकिकाची चाड कोण पुसे ।

भावार्थ:

रामनामाचा अखंडित जप करीत जो प्रपंच करतो त्याचा प्रपंच व परमार्थ एकरूप होतो, म्हणजे प्रपंच करीत असताना त्याला परमार्थ साधतो. रामनामस्मरणात संसार सहजपणे घडून येतो. याविपरीत उदाहरण हा अपवाद समजावा. येथे जन्म-मरणाची बंधने तुटून पडतात, असे एकनाथ महाराज सांगतात.


२१

जगाचिये नेत्री दिसे तो संसारी । परी तो अंतरी स्फटिक शुध्द ।
वायाचि हाव न धरी पोटी । वाउगी ती गोष्टी न करी जगा ।
स्त्री-पुत्र-धन नाही तेथे मन । इष्ट मित्र कारण नाही ज्याचे
एका जनार्दनी प्रपंच परमार्थ । सारिकाचा होत तयालागी ।

भावार्थ: रामनाम घेत संसार करणारा साधक जगाच्या दृष्टीने संसारी असला तरी तो अंतर्यामी स्फटिकासारखा शुध्द असतो. लौकिक, सत्ता, संपत्ती याविषयी त्याच्या मनात लालसा नसते. पत्नी, संतती याविषयी संसारात असूनही ममत्व नसते. असा भक्त सामान्यांना विपरीत वाटतील अशा गोष्टी करीत नाही. इष्ट मित्रांना खुष ठेवण्याचा प्रयत्न तो करीत नाही. असा भक्त संसारात राहून परमार्थ साधत असतो असे एका जनार्दनी म्हणतात.


२२

उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण । जेथे भेद शून्य मावळला ।
भेद शून्य झाला बोध स्थिरावला । विवेक प्रगटला ज्ञानोदय ।
जिकडे पाहे तिकडे उत्तम दर्शन । दया शांती पूर्ण क्षमा अंगी ।
एका जनार्दनी उत्तम हे प्राप्ती । जेथे मावळती द्वैताद्वैत ।

भावार्थ: ज्या पुरुषाच्या चित्तातील मी-तू पणाचा भेद, द्वैत-अद्वैत हा भेद पूर्णपणे लयास गेला आहे तो उत्तम पुरुष समजावा. सर्व प्रकारचे भेदाभेद नाहिसे होऊन चित्त शुद्ध झाले असता सद्गुरुने केलेला बोध चित्तात स्थिरावतो, विवेक प्रकट होऊन ब्रह्मज्ञान होते. जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी केवळ एकच आत्मतत्व भरून राहिले आहे असा प्रत्यय येतो. सर्वत्र परमेश्वराचे उदात्त दर्शन घडते. अशा साधकाचे मन दया, क्षमा, शांती यांनी भरून जाते. एका जनार्दनी म्हणतात, जेथे द्वैत संपून अद्वैताचा अनुभव आला तेथे ही उत्तम लक्षणे दिसून येत असल्याचे जाणवते.


२३

समुद्र क्षोभे वेळोवेळी । योगिया क्षोभेना कोणे काळी ।
समुद्रा भरते पर्व-संबंधे । योगी परिपूर्ण परमानंदे ।
समुद्र सर्वदा तो क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ।
योगियाची योग-स्थिती । सदा परमार्थ भक्ति ।
एका जनार्दनी शरण । योगियांचे जे योगचिन्ह ।

भावार्थ:

येथे एकनाथमहाराज समुद्र व योगी यांची तुलना करीत आहेत. अनेकवेळा समुद्रात वादळे निर्माण होतात, वडवानल उठतात. योगी पुरुषांच्या अंत:करणातमात्र कधीच क्षोभ निर्माण होत नाही. पर्वकाळी अमावस्या, पौर्णिमेला समुद्राला भरती येते. योगीमात्र सदासर्वकाळ परमानंदाने प्रसन्नचित् असतो. समुद्राचे पाणी क्षारयुक्त असते, तर योगेश्वराचे चित्त माधुर्याने परिपूर्ण असते. सदा परमार्थभक्ति ही योगीजनांची कायमस्वरूपी योग-स्थिति असते. जनार्दनस्वामींच्या चरणी शरणागत असलेले संत एकनाथ योग्यांची योगचिन्हे सांगून योग्याचा महिमा वर्णन करतात.


मिथ्या साधनांच्या मागे लागु नका

२४

प्रतिमेचा देव केला । काय जाणे ती अबला ।
नवस करिती देवासी । म्हणती पुत्र देई वो मजसी ।
देव खोटा नवस खोटा । एका जनार्दनी रडती पोटा ।

भावार्थ

पाषाणाची, धातूची, देवाची मूर्ती तयार करून ती मंदिरात ठेवतात. मंदिरात देवदर्शनाला आलेल्या स्त्रिया भक्तिभावाने या प्रतिमेला पुत्रप्राप्तीसाठी नवस बोलतात. एका जनार्दनी म्हणतात, प्रतिमेचा खोटा देव खरा मानून केलेला नवस फळाला येणे शक्य नसते, फसगत होऊन केवळ दु:खच पदरी पडते.


२५

देव दगडाचा भक्त तो मेणाचा । आइका दोहींचा विचार कैसा ।
खरेपणा नाही देवाचे ते ठायी । भक्त अभाविक पाही दोन्ही एक ।
एका जनार्दन ऐसे देवभक्तपण । निलाजरे जाण उभयतां ।

भावार्थ:

दगडाचा देव आणि मेणाचा भक्त याविषयी एकनाथमहाराज आपले मत व्यक्त करतात. खरा देव दगडाच्या प्रतिमेत नसून तो भाविक भक्ताच्या अंतरात नांदतो. दगडाचा देव व अभाविक भक्त दोन्ही खोटे आहेत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, खोट्या देवाची कामनापूर्तीसाठी पूजा करणारे दोन्ही दांभिक, निलाजरे होत.


२६

नीचाचेनि स्पर्शे देवो विटाळला । पाणिये प्रक्षाळूनी सोवळा केला ।
देवापरिस जळ सबळ केले । ज्ञान ते दुर्बळ होऊनि ठेले ।
एका जनार्दनी साच नाही भाव । संशयेचि देव नाही केला ।

भावार्थ:

नीच (दलीत) माणसाच्या स्पर्शाने देव विटाळला (अशुध्द) झाला म्हणून पाण्याने धुऊन शुध्द केला. जो परमेश्वर सजीव व निर्जीव सृष्टीतील सर्वांच्या अंतर्यामी वास करुन सर्वांना पावन करतो तो नीचाच्या स्पर्शाने अपवित्र कसा होऊ शकेल आणि पाण्याने धुऊन तो सोवळा केला असे मत व्यक्त करणे म्हणजे पाण्याला देवापेक्षा अधिक सबळ मानणे हे अज्ञानाचे लक्षण असून ते ज्ञानाला कमीपणा आणते असे सांगून एका जनार्दन म्हणतात, जेथे मनातील भक्तिभाव खरा नसेल, तेव्हा मनात संशय निर्माण होतो आणि देवाविषयी विपरित भावना व्यक्त केली जाते.


२७

केले तुंवा काय जाउनिया तीर्था । सर्वदा विषयार्था भुललासी ।
मनाची ती पापे नाही धोवियेली । वृत्ति हे लाविली संसारीच ।
तीर्थ-यात्रा-योगे कीर्ति ही पावली । बुद्धि शुध्द झाली नाही तेणे ।
एका जनार्दन सद्गुरू-पाय धरी । शांतीचे जिव्हारी पावशील ।

भावार्थ:

सदासर्वदा इंद्रियविषयांचा ध्यास असलेला सामान्य भक्त त्या विषयत भुलून जातो, त्याच्या सर्व वृत्ति संसारात गुंतलेल्या असतात. तीर्थयात्रेला जाऊन त्यांना काही गौरव, थोडी प्रतिष्ठा प्राप्त होते. पण त्याच्या मनाची पापे धुतली जात नाहीत किंवा बुध्दी शुध्द होत नाही, मनाची पापे आणि बुध्दीची मलिनता जाण्यासाठी सद्गुरुंना शरण जावे लागते. संतसंगतीत अंतरंगात शांतीचा उदय होतो, असे एका जनार्दनी सांगतात.


२८

हृदयस्थ असोनि का रे फिरसी वाया । दीप आणि छाया जयां परी ।
आत्मतीर्थी सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजे नाही ।
एका जनार्दनी मनासी आवरी । मग तु संसारी धन्य होसी ।

भावार्थ:

परमात्म्याचे अधिष्ठान आपला हृदयात असतांना, त्याला शोधण्याची धावपळ करणे व्यर्थ आहे. जिवा-शिवाची जोडी दीप-छाये सारखी आहे. आत्मस्वरुपाच्या पवित्र तीर्थात मन भिजून शुध्द होणे यासारखे दुसरे साधन नाही असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनाच्या सर्व वृत्ती आवरून वागल्यास संसारी धन्यता मिळते.


२९

देव देव म्हणूनि फिरताती वेडे । चित्त शुध्द नाही तरी देव केंवि जोडे ।
पाहे तिकडे देव आहे । दिशा व्यापुनी भरला राहे ।
एका जनार्दनी आर्तभूत । देव उभा असे तिष्ठत ।

भावार्थ:

देवाचा शोध घेत सामान्यजन वेड्यासारखी फिरतात. ज्याचे चित्त शुध्द नाही, त्याला देवाचा साक्षात्कार घडणे शक्य नाही. खरा भक्तीभाव असलेल्या भाविकाला सर्व दिशा व्यापून देव सर्वत्र भरला आहे असा अनुभव येतो. सर्व सृष्टीत भरुन राहिलेली देवाची अनंत रूपे त्याला सतत दिसत असतात, असे एका जनार्दनी म्हणतात.


३०

जिवाचे जीवन जनी जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व देही ।
वाउगी का वाया शिणती बापुडी । काय तयार जोडी हाती लागे ।
एका जनार्दनी वाउगी ती तपे । मनाच्या संकल्पे हरि जोडे ।

भावार्थ:

सर्व प्रकारच्या जीवांचे प्राणतत्व असलेला जनार्दन सर्व प्राणिमात्रांच्या देहात वास करतो, हे जाणून न घेणारे अज्ञानी-जन देवाचा शोध घेत व्यर्थ श्रम करून काया झिजवतात. एका जनार्दनी म्हणतात, यज्ञ-याग-तप या साधनांनी देव प्रसन्न होत नाही तर मनाच्या संकल्पसिध्दीने हरि जोडला जातो.


३१

आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहटी नाही ।
कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा दिसे ।
एका जनार्दनी ज्ञानाज्ञाने । पुजावे चरण विठोबाचे ।

भावार्थ:

आपण स्वत:च परमेशाचे रूप आहोत ही जाणीव ठेवून आत्मसन्मान हीच खरी देवपूजा आहे हे समजून न घेता देवपूजेचा व्यर्थ अट्टाहास करण्यापेक्षा अज्ञानी असणे अधिक बरे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, जाणतेपणी किंवा अजाणतेपणी विठोबाला भक्तिभावाने शरण जाऊन त्याचे चरण पूजावे हेच योग्य होय.


सार-ग्राही श्रवण पाहिजे

३२

वेदांमाजी ओंकार सार । शास्त्र सार वेदांत ।
मंत्रांमाजी गायत्री सार । तीर्थ-सार गुरु-चरण ।
दानांमाजी अन्न-दान सार । कीर्तन सार कलियुगी ।
जिव्हा-उपस्थ जय सार । भोग-सार शांति-सुख ।
एका जनार्दनी एका सार । सर्व-सार आत्म-ज्ञान ।

भावार्थ:

ओंकार हे वेदांचे सार तर शास्त्र हे वेदांताचे सार आहे. सर्व मंत्रामध्ये गायत्रीमंत्र प्रमुख, तर गुरुचरणांचे तीर्थ सर्व तीर्थात पवित्र मानले जाते. दानामध्ये दान अन्नदान, नवविधा भक्तीत कीर्तन-भक्ती कलियुगात श्रेष्ठ मानली जाते. वाणी, रुची (जिव्हा) व कामवासना यांचा संयम हा सर्वश्रेष्ठ संयम असून शांति-सुख हे भोगाचे सार आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, आत्म-ज्ञान (मी देह नसून आत्मा आहे, अमृताचा पुत्र आहे) हे ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे.


३३

पिंपळावरुनी मार्ग आहे । ऐकोनि वृक्षा वेधो जाय ।
ऐसे अभागी पामर । न कळे तयांसी विचार ।
म्हणोनी शरण जनार्दनी । एका जनार्दनी एकपणी ।

भावार्थ:

गीतेच्या पंधराव्या अध्यायांत भगवंताने अश्वस्थ (पिंपळ) वृक्षाला संसारवृक्षाची उपमा दिली आहे, हे लक्षात घेऊन एखादा भाविक संसार बंधनातून सुटण्यासाठी पिंपळाला फेरे घालत असेल तर तो अभागी पामर आहे असे समजावे कारण त्याला भगवंताचे विचार समजले नाहीत.पारमार्थिक विचार समजण्यासाठी सद्गुरूला शरण जाऊन ज्ञान ग्रहण करणे जरुरीचे आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, आपण जनार्दनस्वामींना एकनिष्ठपणे शरणागत आहोत.


३४

वेद-वाणी देवे केली । येर काय चोरापासूनि झाली ।
सकळ वाचा वदवी देव । का वाढवा अहंभाव ।
ज्या ज्या वाणी स्तुति केली । ती ती देवासी पावली ।
एका जनार्दनी मातु । वाचा वाचक जगन्नाथु ।

भावार्थ:

संस्कृत भाषेचे अभिमानी लोक गर्विष्ठपणे सांगतात की, संस्कृत (वेदांची भाषा) वाणी देवांनी निर्माण केली आहे. संत एकनाथ मराठी प्राकृत भाषेचे अभिमानी असल्याने ते विचारतात, संस्कृतशिवाय बाकी भाषा चोरापासून आल्या आहेत असे नसून सर्व वाचा वदवणारा देवच आहे. कोणत्याही वाणीतून भगवंताची स्तुति केली तरी ती देवाला पावते. एका जनार्दनी म्हणतात, वाणी निर्माण करणारा आणि वदवणारा केवळ जगन्नाथच आहे.


३५

शतावर्ती श्रवण अधिक पै झाले । तेणे अंगा आले जाणपणव ।
श्रवण तो लौकिक मनी नाही विवेक । बुध्दीसि परिपाक कैसेनि होय ।
एका जनार्दनी साच न रिघे मन । तंववरी समाधान केवी होय ।

भावार्थ:

शंभरापेक्षा अधिक ग्रंथांचे श्रवण (वाचन) केल्याने अनेक गोष्टींचे ज्ञान झाले. परंतु मनात विवेक निर्माण झाला नाही, तर बुध्दी परिपक्व होऊ शकणार नाही आणि मनामध्ये खऱ्या ज्ञानाचा उदय झाल्याशिवाय निर्भेळ समाधान लाभणार नाही असे एका जनार्दन म्हणतात.


३६

करिता हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच न ये दारुण ।
रुका वेचिता प्राण । जाऊ पाहे ।
द्रव्य-दारा-लोभ अंतरी । हरि-कथा वरी वरी ।
बीज अग्नी माझारी । विरूढे कैसे ।
एका जनार्दनी । काम-क्रोध-लोभ तीन्ही ।
द्रव्य दारा त्यजुनी । नित्य तो मुक्त ।

भावार्थ:

हरिकथा ऐकतांना सामान्य माणसाचे अष्टसात्विक भाव दाटून येत नाहीत. देहावर रोमांच उभे रहात नाहीत किंवा स्वेद (घाम) येत नाही. परंतु पैसा खर्च करतांना मात्र प्राणांतिक वेदना होतात कारण धन, पत्नी, संतती यांचा मनाला लोभ वाटतो. या लोभरुपी अग्नीत भक्तीभावाचे बीज रुजत नाही, जसे अग्नीमध्ये कोणत्याही वनस्पतीचे बीज रुजत नाही. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, काम, क्रोध, लोभ, पत्नी आणि धन यांचा जो त्याग करु शकतो तो नित्य मुक्त समजावा. तोच हरिकथा श्रवणात भक्तभावाने रममाण होऊ शकेल.


३७

आरशा अंगी लागता मळ। मुख न दिसेचि निर्मळ ।
मळ तो झाडूनि पाहता । मुख दिसे निर्मळता ।
पाहता शुध्द भाव रिती । परमार्थ हाचि चित्ती ।
एका जनार्दनी हा विचार । आरशासारखा प्रकार ।

भावार्थ:

चित्तामध्ये काम, क्रोध,मोह,लोभ या विकारांची पुटं चढलेली असतील तर या मलिन चित्तात परमार्थाचे निर्मळ रूप दिसणार नाही. जसे आरशावर धुळीची पुटं चढली की, निर्मळ मुख-दर्शन होणार नाही हा विचार एका जनार्दनी स्पष्ट करून सांगतात.


अहिंसा-सत्यादी व्रते निष्ठेने पाळावी

३८

श्रुती सांगती परमार्था । हिंसा न करावी सर्वथा ।
संकल्प नाशी तो संन्यासी । तेथे कल्पना कायसी ।
वेद बोले सर्वा ठायी । एकावाचुनी दुजे नाही ।
एका जनार्दनी बोधु । नाही तंव न कळे वेदु ।

भावार्थ:

श्रुतींचे वचन आहे परमार्थ साधु इच्छिणार्यांनी हिंसा करू नये. वेदांच्या वचनाप्रमाणे अहिंसा आणि सत्यवचन निष्ठेने पाळावे. शस्त्राचा आघात करून शरिराला घायाळ करणे आणि खोटे बोलून, अविश्वास दाखवून मन दुखावणे या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी किंवा समान आहेत. एका जनार्दनी सांगतात की श्रुतींचा किंवा वेदांचा जोपर्यंत खरा बोध होत नाही, तोवर त्यातील रहस्य कळणार नाही.


३९

ब्रह्मांडाची दोरी । हालवी जो एक्या करी ।
भूतीं परस्परे मैत्री । ती एके ठायी असती बरी ।
पंचप्राणांचे जे स्थान । तये कमळी अधिष्ठान ।
एका जनार्दनी सूत्रधारी । बाहुली नाचवी नाना परी ।

भावार्थ:

ब्रह्मांडरूपी पाळण्याची दोरी भगवंताच्या हातात असून तो एका कराने तो हालवित आहे. पंचप्राण हृदयांत स्थित असून कमळ हे त्याचे अधिष्ठान आहे. कठपुतळ्यांचा खेळ करून दाखवणारा हातामधील दोरीने बाहुली नाचवून नाना प्रकारचे नाच करून दाखवतो. एका जनार्दनी म्हणतात, तो ब्रह्मांडनायक सूत्रधारी असून सर्व प्राणिमात्रांकडून अनेक प्रकारच्या क्रिडा करवून घेतो. सर्व प्राणिमात्रांमध्ये परस्परांविषयी मैत्रीची भावना असावी.


४०

असत्याचा शब्द नको माझे वाचे ।
आणिक हो का ओझे भलतैसे ।
अणुमात्र रज डोळां न साहे ।
कैसा खुपताहे जन-दृष्टी ।
एका जनार्दन असत्याची वाणी ।
तोचि पाप-खाणी दुष्ट-बुध्दि ।

भावार्थ

ज्याप्रमाणे धुळीचा अगदी बारीक कण डोळ्यात गेला तरी तो डोळ्यात खुपतो, तसेच असत्य भाषण लोकांच्या डोळ्यांत सलत राहते. दुसऱ्या कोणत्याही पापाच्या ओझ्यापेक्षा असत्य वाणी हे मोठे पाप आहे. असत्य वाणी ही दुष्ट बुध्दी असून अनेक पापांची खाणी आहे. म्हणून एका जनार्दनी परमेश्वराला प्रार्थना करतात की, असत्य शब्द वाचेवाटे कधीही बोलले जाऊ नयेत.


४१

अर्थ नाही जयापाशी । असत्य स्पर्शेना तयासी ।
अर्थापाशी असत्य जाण । अर्थापाशी दंभ पूर्ण ।
अर्थापोटी नाही परमार्थ । अर्थापोटी स्वार्थ घडतसे ।
अर्थ नको माझे मनी । म्हणे एका जनार्दनी ।

भावार्थ:

या भजनात संत एकनाथ अर्थाने कसे अनर्थ घडतात याचे वर्णन करीत आहेत. पैसा मिळवण्यासाठी लबाडी, खोटेपणा यांचा आश्रय घेतला जातो. पैसा मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी दांभिकता व स्वार्थीपणाचा अवलंब करावा लागतो. अर्थामुळे साधक परमार्थाला पारखा होतो. आपल्या मनात पैशाविषयी विचार कधीही येऊ नयेत असे एका जनार्दनी म्हणतात.


४२

विषयाचे अभिलाषे सकळ भेद भासे ।
विषय-लेश तेथे मुक्ति केवि वसे ।
विषय तृष्णा सांडी मग तु साधन मांडी ।
वैराग्याची गोडी गुरूसी पुसे ।
स्त्री-पुरुष भावना भेद भासे ।
तेथें ब्रह्म-ज्ञाना गमन कैचें ।
कणुभरित जो डोळा शरीरासी दे दु:ख ।
अणुमात्र विषय तो संसार-दायक ।
एका जनार्दनी निज-ज्ञान शक्ति ।
निर्विषय मन ते अभेद भक्ति ।

भावार्थ:

संसारातील सर्व भेदाभेद केवळ इंद्रियांच्या विषय-तृष्णेने भासतात. जेथे विषयांची प्रिती आहे, तेथे मुक्ती राहू शकत नाही. जेथे मनात स्त्री-पुरुष हा भेद निर्माण होतो, तेथे ब्रह्मज्ञान प्रवेश करु शकत नाही. धुळीच्या एका कणाने भरलेला डोळा शरीराला दु:ख देतो, तसाच विषयाचा अत्यल्प संसर्गसुध्दा संसारबंधनास कारणीभूत ठरतो. यासाठी साधकाने विषयतृष्णेचा सर्वस्वी त्याग करून नंतरच साधनेला सुरवात करावी. या विवेकानंतरच वैराग्य येते हे ज्ञान गुरूंकडून प्राप्त होते. सद्गुरुंकडून मिळालेली ज्ञानशक्ति, विषयवासनांपासून मुक्त झालेले मन हेच अभेद भक्तिचे मुख्य लक्षण आहे असे एका जनार्दनी म्हणतात.


४३

हीचि दोनी पै साधने । साधके निरंतर साधणे ।
पर-द्रव्य पर-नारी । यांचा विटाळ मने धरी ।
नको आणिक उपाय । सेवी सद्गुरूचे पाय ।
म्हणे एका जनार्दनी । न लगे आन ते साधन ।

भावार्थ:

परक्याचे धन आणि परस्त्री या दोन गोष्टींचा मोह टाळण्याचा सतत अभ्यास व सद्गुरूंची निरंतर सेवा याशिवाय अन्य कोणत्याही साधनाची गरज नसल्याचे संत एकनाथमहाराज आवर्जून सांगतात.


४४

कनक कांता न ये चित्ता । तोचि परमार्थीं पुरता ।
हेचि एक सत्य सार । वाया व्युत्पत्तीचा भार ।
वाचा सत्यत्वे सोवळी । येर कविता ओवळी ।
जन तेचि जनार्दन । एका जनार्दनी भजन ।

भावार्थ:

परमार्थ हा शब्द कोणत्या मूळ धातूपासून निर्माण झाला, त्याचा अर्थ काय यांचा व्यर्थ उहापोह करण्यापेक्षा परमार्थी कसा ओळखावा हे जाणून घेणे अधिक उद्बोधक आहे. कनक (धनसंपत्ती) व कांता (स्त्री-सौख्य) याविषयी ज्याच्या चित्तात मोह निर्माण होत नाही तो परमार्थी समजावा असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सत्य हेच केवळ सार असून वाचेने सत्यवचन बोलणे हेच शुध्दपणाचे लक्षण असून जन हेच जनार्दनाचे रुप आहे, जनसेवा हीच ईश्वरसेवा होय.


४५

रस सेविण्यासाठी । भोगवी जन्माचिया कोटी ।
रसनेअधीन सर्वथा । रसनाद्वारे रस घेता ।
जव रसना नाही जिंकिली । तंव वाउगीच बोली ।
एका जनार्दनी शरण । रस रसना जनार्दन ।

भावार्थ:

जिवात्मा रसनेच्या अधीन राहून जिव्हेद्वारा सर्व रसांचा आस्वाद घेतो. या रसमयतेचे सेवन करण्यासाठी तो अनेकदा जन्म-मरणाच्या बंधनात अडकतो. ज्याचे जिभेवर बंधन नाही (बोलण्यात) त्याचे बोल पोकळ आहेत असे समजावे. जनार्दनस्वामी शरणागत संत एकनाथ म्हणतात, रस व रसना दोन्ही जनार्दनाचे रुप आहे.


४६

पक्षी अंगणी उतरती । ते का गुंतोनि राहती ।
तैसे असावे संसारी । जोवरी प्राचीनाची दोरी ।
वस्तीकर वस्ती आला । प्रात:काळी उठोनि गेला ।
शरण एका जनार्दन । ऐसे असतां भय कवण ।

भावार्थ:
दाणे टिपण्यासाठी पक्षी अंगणांत येतात, पण ते तेथे गुंतून राहात नाहित. संसारिकांनी संसारात असे राहावे जसा वाटसरू एका रात्रीच्या निवाऱ्यासाठी धर्मशाळेत उतरतो आणि सकाळी निघून जातो. जनार्दनस्वामींना शरणागत असलेले संत एकनाथ म्हणतात, अशा प्रकारे निष्काम वृत्तिने जन्ममरणाचे भय संपते.


टाकावयाच्या गोष्टी : अविश्वास, अभिमान ममत्व

४७

अविश्वासा घरी । विकल्प नांदे निरंतरी ।
भरला अंगी अविश्वास । परमार्थ तेथे भूस ।
सकळ दोषांचा राजा । अविश्वास तो सहजा ।
अविश्वास धरिला पोटी । एका जनार्दनी नाही भेटी ।

भावार्थ:

अविश्वास हा सर्व दोषांमधला सर्वात अपायकारक दोष समजला जातो. ज्याच्या मनात इतरांबद्दल अविश्वास असतो त्याचे मन अनेक प्रकारच्या संशयाने, विकल्पाने ग्रासलेले असते. तेथे आत्मविश्वासाचा अभाव असून सद्गुरूंविषयी श्रध्दा निर्माण होऊ शकत नाही. जेथे श्रध्दा नाही, तेथे परमार्थ सुदृढ होणे शक्य नाही; असे एका जनार्दनी म्हणतात.


४८

अविश्वासा पुढे । परमार्थ कायसें बापुडे ।
अविश्वासाची राशी । अभिमान येतसे भेटीसी ।
सदा पोटी जो अविश्वासी । तोचि देखे गुण-दोषांसी ।
सकळ दोषा मुकुटमणी । अविश्वास तोचि जनी ।
एका जनार्दनी विश्वास । नाही त्यास भय काही ।

भावार्थ:

मनातील अविश्वासामुळे अभिमान निर्माण होतो. अहंकाराने इतरांचे गुण-दोष पहाण्याची वृत्ती बळावते, त्यामुळे परमार्थाची हानी होण्याची भिती वाढते. एका जनार्दनी सांगतात की ज्याचा गुरुवचनावर पूर्ण विश्वास असतो, तो कोणत्याही भयापासून मुक्त होतो.


४९


एक नरदेह नेणोनि वाया गेले । एक न ठके म्हणोनि उपेक्षिले ।
एकांते गिळले । ज्ञान-गर्वे ।
एक ते साधनी ठकिले । एक ते करू करू म्हणतचि गेले ।
करणे राहिले । ते तैसें
ज्ञाने व्हावी ब्रह्म-प्राप्ति । ते ज्ञान वेंची विषयांसक्ती ।
भांडवल नाही हाती । मा मुक्ति कैची ।
स्वप्नींचेनि धने । जागृती नोहे धर्म ।
ब्रह्माहमस्मि समाधान । सोलीव भ्रम ।
अभिमानाचिया स्थिती ब्रह्मादिका पुनरावृत्ति ।
ऐसी वेद-श्रुति निश्चये बोले ।
एका जनार्दनी । एकपण अनादि ।
अहं आत्मा तेथे । समूळ उपाधी ।

भावार्थ:

काही साधक मानवी देहाचे महत्त्व समजून न घेतल्याने, काही ज्ञानाचा गर्व झाल्याने, तर काहीची उपेक्षा झाल्याने वाया गेले. काही अयोग्य पद्धतीने साधना केल्याने फसले, तर काही निश्चय दृढ नसल्याने किंवा आळस बळावल्याने साधनेत प्रगती करु शकले नाहीत. ब्रह्मप्राप्ति व्हावी यासाठी जे ज्ञान संपादन केले ते इंद्रियसुखाच्या शोधात खर्च करून ज्ञानरुपी भांडवल गमावून काही मुक्तिला पारखे झाले. मी ब्रह्मरुप आहे हे जाणून त्यातून समाधान मानणे, हा केवळ भ्रम आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अभिमानाने ब्रह्मादिक (ब्रह्मा, विष्णू, महेश आदि) देवांचेसुध्दा स्वर्गातून पतन होते असे वेद-श्रुती वचन आहे. मी देह नसून आत्मरुप आहे, हे अनादी तत्व जाणून उपाधीरहित होणे अधिक श्रेयस्कर आहे.


५०


लोखंडाची बेडी तोडी । आवडी सोनियाची घडी ।
मी ब्रह्म म्हणता अभिमान । तेथे शुध्द नोहे ब्रह्मज्ञान ।
जैसी देखिली जळ-गार । शेवटी जळचि निर्धार ।
मुक्तपणे मोला चढले । शेवटी सोनियाचे फांसा पडिले ।
एका जनार्दनी शरण । बध्द-मुक्तता ऐसा शीण ।

भावार्थ:

लोखंडाची बेडी तोडून आवड म्हणून सोन्याची बनवली, तरी ते शेवटी बंधनकारकच आहे. मी ब्रह्म आहे हे शुध्द ज्ञान नसून केवळ अभिमान आहे, जसे मेघातून पडलेल्या गारा हे पाण्याचेच घनरुप आहे. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मुक्तीसाठी साधना केल्याने लोकांकडून लौकिक मिळाला पण तो सोन्याच्या बंधनात सापडून वाया गेला. बंधन आणि मुक्तता हा केवळ जाणिवेचा शीण आहे.


५१

मी एक शुचि । जग हे अपवित्र । कर्मचि विचित्र । ओढवले ।
देखत देखत । घेत असे विख । अंती ते सुख । केवी होय ।
अल्पदोष ते । अवघेचि टाळी । मुखे म्हणे । सर्वोत्तम बळी ।
अभिमाने अशुचि । झालासे पोटी । एका जनार्दनी । नव्हेचि भेटी ।

भावार्थ:

विषाची परिक्षा घेऊनही जाणूनबुजून ते विष प्राशन करणे हे विचित्र कर्म आहे, त्यातून शेवटी कोणतेही सुख लाभणार नाही. अभिमानाची बाधा विषासारखी घातक असून मीच तेवढा पवित्र आणि बाकी सर्व जग अपवित्र असे समजून वागल्याने साधकाचे मन अशुध्द बनते आणि तो गुरु-उपदेशाला अपात्र ठरतो, असे एका जनार्दनी प्रतिपादन करतात.


५२
ममता ठेवुनी घरी-दारी । वाया का जाशी बाहेरी ।
आधी ममत्व सांडावे । पाठी अभिमाना खंडावे ।
ममता सांडी वाडे कोडे । मोक्ष-सुख सहजी घडे ।
एका जनार्दनी शरण । ममता टाकी निर्दाळून ।

भावार्थ:

साधक मोक्ष-मुक्तीसाठी प्रयत्न करीत असतांना मोह आणि ममता त्याला बंधनकारक होतात. सगे-सोयरे, नातेवाईक, पत्नी, पुत्र आणि कन्या यांच्या ममतेमध्ये तो मनाने गुंतून पडतो. तसेच घरदार, संपत्ती, सांसारिक सुख यांचा मोह असतो. एका जनार्दनी म्हणतात, हे ममत्व आधी सोडून नंतर अभिमानाचा त्याग केल्यास मोक्ष-सुख सहज साध्य होते.


५३


मोह ममता ही समूळ नाशावी । तेव्हाचि पावावी चित्तशुध्दी ।
चित्तशुध्दि झालिया । गुरुचरण-सेवा । तेणे ज्ञानठेवा । प्राप्त होय ।
एका जनार्दनी । प्राप्त झाल्या ज्ञान । ब्रह्म परिपूर्ण अनुभवेल ।

भावार्थ:

मोह-ममतेचे पूर्ण निरसन झाल्यानंतर साधकाचे चित्त शुद्ध होते. हे शुध्द झालेले चित्त गुरुसेवेत पूर्ण रममाण होते. त्यामुळे गुरुकृपा होऊन ज्ञानप्राप्ती होते. एका जनार्दनी सांगतात, गुरुकृपेने संपूर्ण ब्रह्मज्ञान होऊन ते प्रत्यक्ष अनुभवता येते.


जगात वागतांना घ्यावयाची काळजी

५४


मत्सर ज्ञानियाते न सोडी । मा इतर कायसी बापुडी ।
शिणताती मत्सर-वेधे । भोगिताती भोग विविधे ।
एका जनार्दनी मत्सर । तेणे परमार्थ पळे दूर ।

भावार्थ:

अत्यंत ज्ञानी साधकसुध्दा मनातील मत्सराला बळी पडतो. मत्सराने ज्याच्या मनाला वेधून टाकले आहे अशा ज्ञानी साधकाला अनेक भोग भोगावे लागतात, तर इतर सामान्य माणसाला किती यातना भोगाव्या लागत असतील याची कल्पनाच करता येत नाही. एका जनार्दनी म्हणतात, मत्सराने व्यापलेले मन परमार्थाचा विचार करु शकत नाही.


५५


लज्जा अभिमान टाकुनी परता । परमार्थ सरता करी का रे ।
वादक निंदक भेदक । ऐसे त्रिविध । यांचा टाकुनी भेद । भजन करी ।
एका जनार्दनी त्रिविधा परता । होउनी परमार्था हित करी ।

भावार्थ:
जगामध्यें वादक, निंदक (निंदा करणारे) व भेदक (मनात भेद निर्माण करणारे) असे त्रिविध प्रकारचे लोक असतात. ते भोळ्या भाविक भक्तांचा बुध्दीभेद करुन, निंदा करुन त्यांना भक्तीमार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा विचार करुन भक्तांनी परमार्थ-मार्ग सोडू नये. लज्जा, अभिमान यांचा त्याग करुन भक्तिमार्गावर श्रध्दा ठेवावी व स्वत:चे हित साधावे, असा उपदेश एका जनार्दनी करतात.


५६


विवाद-वाद हे तो अधम लक्षण । भक्तीचे कारण न साधे येणे ।
मुख्य एक करी एकविधपण । सम-दरुशने देख जगी ।
नर अथवा नारी असो भलते याती । वंदावे विभूति म्हणोनिया ।
एका जनार्दनी बोध धरी मना । होऊनिया सान सानाहूनि ।

भावार्थ:
वाद-विवाद करणे हे नीचपणाचे (अधम) लक्षण आहे. त्यामुळे परमार्थ हे भक्तीचे मूळ साधन साध्य होणार नाही. मतभिन्नतेपेक्षा समदर्शत्व (सर्वत्र समभावाने पाहणे) अधिक श्रेयस्कर आहे, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, स्त्री-पुरुष, जातिभेद न मानता सर्व एकाच परमेश्वराच्या विभूति आहेत असे समजून वंदनीय मानाव्यात. विनम्रता धरुन सर्वांना आपलेसे करावे हा बोध मनी धरावा.


५७


ब्रह्म एक परिपूर्ण । तेथे नाही दोष-गुण ।
पराचा देखती जे दोष । तेचि दोषी महा-दोष ।
गुण-दोष जे देखती । एका जनार्दनी नाडती ।

भावार्थ:

ब्रह्म हे परिपूर्ण असून ते गुणदोषरहित आहे. तेथे गुण-दोषांचा संपूर्ण अभाव असल्याने इतरांचे दोष पहाणे हा महादोष आहे व जे दुसऱ्यांचे दोष बघतात ते महादोषी आहेत असे समजावे, असे एका जनार्दनी सांगतात.


५८


देह-बुद्धि सांडी कल्पना दंडी । वासनेची शेंडी वाढवू नको ।
तु तेचि पाही तु तेचि पाही । पाहूनिया राही जेथीचा तेथे ।
तु ते तूचि पाही जेथे देहो नाही । मीपणे का वाया गुंतलासी ।
एका जनार्दनी मीपण तूपण । नाही नाही मज तुझीच आण ।
भावार्थ:

आपण आत्मरुप नसून देह-रुप आहोत ह्या देहबुध्दिचा त्याग करावा, कारण देहबुध्दिमुळे इंद्रियांच्या वासना निर्माण होतात व त्यातून जन्म-मृत्यूचे चक्र चालूच राहते. मीपणाने त्यात गुंतून पडतो. हे मी-तूपण द्वैत निर्माण करुन परमेश्वरी तत्वापासून साधकाला अलग करते. एका जनार्दनी सांगतात, आपणच आपल्याला ओळखावे.


५९


सर्वांभूती देव वसे । नीचाठायी काय नसे ।
नीच कोठुनी जन्मला । पंचभूतांवेगळा झाला ।
नीच म्हणोनि काय भुली । एका जनार्दनी देखिली ।

भावार्थ:

विश्वातिल सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी परमेश्वर अंशरुपाने व्यापून राहिला आहे असे पारमार्थिक सत्य सांगते. असे असतांना नीचयोनीत किंवा जातीत जन्माला येणाऱ्यांच्या ठिकाणी परमेश्वर वसत नाही असे समजणे म्हणजे फार मोठी चूक करणे आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सर्व प्राण्यांची निर्मिती आकाश, पृथ्वी, वायू, जल, अग्नी या पंचमहाभूतातून झाली आहे हे शास्त्र-वचन आहे, तर नीच यापासून वेगळा असू शकणार नाही.


६०


थोर तोचि म्हणावा । नेणे भूतांचा जो हेवा ।
लहान तोचि म्हणावा । काया वाचा भजे देवा ।
एका जनार्दनी म्हणे । देवावाचुनी काही नेणे ।

भावार्थ:
परमेश्वरीसृष्टीतील कोणत्याही प्रकारच्या श्रेष्ठ किंवा कनिष्ठ प्राण्यांचा जो हेवा करीत नाही, तो थोर (मोठ्या मनाचा) समजावा आणि जो देहाने, वाचेने, मनापासून देवाचे निरंतर भजन करतो त्याला विनम्र (लहान) म्हणावे; असे सांगून एका जनार्दन म्हणतात, देवावाचून कोणी काही जाणू शकत नाही.


६१


आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण । जाती कुळ नाही लहान ।
आम्हा सोवळे ओवळे नाही । विटाळ न देखो कवणे ठायी ।
आम्हा सोयरे जे झाले । ते जाती-कुळा वेगळे केले ।
एका जनार्दनी बोधु । जाती-कुळाचा फिटला संबंधु ।

भावार्थ:

एका जनार्दनी येथे अभिमानाने सांगतात की आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण आहोत, थोर कुळात जन्मलो आहोत. शुध्द विचारांमुळे सोवळ्या-ओवळ्याच्या संकुचित कल्पनांपासून दूर असल्यामुळे कोणाचाही विटाळ मानत नाही. जाती-कुळाच्या अनिष्ट रुढी ज्यांना मान्य नाहीत अशा सज्जनांशी सोयरिक असल्याने जाती-कुळाचा संबंधच फिटला आहे.


६२

काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर ।
षड्वैरी तत्पर हेचि येथे ।
क्षुधा तृषा मोह शोक जरामरण ।
षड्ऊर्मि पूर्ण देही हेचि ।
आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा वासना ।
हे अठरा गुण जाणा देहामाजी ।
एका जनार्दनी त्यजुनि अठरा ।
तोचि संसारामाजी शुध्द ।

भावार्थ:
अनिवार वासना, रागीटपणा, हावरटपणा, दांभिकपणा, गर्विष्टपणा, मत्सर हे माणसाचे सहा शत्रू असून ते माणसाचा विनाश करण्यासाठी अत्यंत तत्पर असतात. भूक, तहान, मोह, शोक, वार्धक्य या सहा माणसाच्या नैसर्गिक ऊर्मी आहेत. आशा (भविष्यकालीन इच्छा) मानसिक इच्छा, कल्पना, शारिरीक वासना, अनावर ओढ असे अठरा मानवी देहाचे गुण आहेत असे समजावे. या अठरा गुणांचा त्याग करणारा या जगात शुध्द, सात्विक समजला जातो, असे एका जनार्दनी या भजनात स्पष्ट करतात.


मनोजय

६३
बैसता निश्चळ । मन करी तळमळ ।
ध्यान-धारणा ते विधि । मने न पावेचि सिध्दि ।
ऐशिया मना काय करावे । कोठे निवांत बैसावे ।
एका जनार्दनी शरण । मन धावे सहजपणे ।

भावार्थ:

मन हे अत्यंत चंचळ असून ते सतत सहजपणे एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी भरकटत असते, तळमळत असते. ध्यानधारणा यासारख्या विधिंमध्ये मन एकाग्र होत नाही, त्यामुळे ध्यानधारणेतून् सिध्दी प्राप्त होत नाही. अशा चंचळ मनाला कोणत्या उपायाने एकाग्र करावे हे समजत नाही. जेथे मनाला निवांतपणा लाभेल असे ठिकाण सापडत नाही. एका जनार्दनी म्हणतात, गुरुचरणांपाशी मात्र हे मन सहजपणे धाव घेऊन स्थिर होते.


६४
शत्रु असती दूर देशी । येता बहु दिवस लागती तयांसी ।
बाह्य शत्रुंचे अल्पं दु:ख । मन: शत्रुंचे वर्म अशेख ।
आसनी शयनी एकांती । जगी अथवा ध्यान-स्थिती ।
ऐशिया मना न जिंकिता । देवपण न ये हाता ।
देवपणाचे भुलले हावे । एका जनार्दनी नेणती देव ।

भावार्थ:

बाह्य शत्रू आपल्यापासून दूर असतात, त्यांना जवळपास येण्यास काही कालावधी लागतो, बाह्य शत्रुंचे भय काही प्रमाणात कमी वाटते. परंतु मनात असलेले अविवेक, अहंकार, संशय यासारख्या शत्रुंचे मूळ रहस्य समजत नाही. आसनावर बसलेले असतांना किंवा मंचकावर निद्रिस्त असतांना, एकांतात जप करीत असतांना किंवा ध्यानात असतांना या मनाला जिंकता न आल्यास देवपण येत नाही एका जनार्दनी म्हणतात. देवपणाचा हव्यास धरणारे देवालामात्र नीटपणे ओळखत नाहीत.


६५
वैर करूनि मन मारावे । मना-अधीन न व्हावे ।
मनामागे जाऊ नये । मन आकळूनि पाहे ।
मन म्हणे ते न करावे । मने मनासी बांधावे ।
मन म्हणेल ते सुख । परि पाहता अवघे दु:ख ।
एका जनार्दनी मन । दृढ ठेवावे आकळून ।

भावार्थ:

मनाचा शत्रू होऊन त्याचे दमन करावे, मनाच्या अधीन होऊ नये, मन सांगेल तसे आचरण करू नये. आपण मनामागे न जाता मनाला आपल्या बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करावा. मनाला जे सुखाचे वाटते ते दु:खाचे कारण असू शकते. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनाला निश्चयपूर्वक संयमाचे बांध घालावेत.


६६
माझ्या मनाचे ते मन । चरणी ठेवावे बांधून ।
मग ते जाऊ न शके कोठे । राहे तुमच्या नेहटे ।
मनासी ते बळ । देवा तुमचे सकळ ।
एका जनार्दनी देवा । मन दृढ पायी ठेवा ।

भावार्थ:

देवाने आपले मन त्याच्या चरणांशी दृढ करावे. त्यामुळे ते कोठेही जाऊ शकणार नाही, तर चरणकमळी गुंतून राहिल. मनाला एकाग्र करण्याची शक्ति केवळ एका परमेश्वराकडे आहे. देवाने कृपा करून मनोबल वाढवावे अशी प्रार्थना करतात.


६७
आम्ही अलकापुरचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी ।
तेणे चुकती चौऱ्यांशी । होरा ऐका दादांनो ।
नका जाऊ मनामागे । थोर-थोर झाले दगे ।
मी बोलत नाही वाउगे । सावध राहा दादांनो ।
वासना वाईट बा ही थोर । पुरविले लहान थोर ।
फिरती चौऱ्यांशी लक्ष घरे । पडाल फशी दादांनो ।
एका जनार्दनी जोशी । सांगेन शकून सर्वत्रांसी ।
राम-नाम वाचेसी । तेणे तरती विश्वासी दादांनो ।

भावार्थ:

एका जनार्दनी म्हणतात, आपण देवनगरीचे ज्योतिष असून या शास्त्रात निष्णात आहोत. ज्यामुळे चौऱ्यांशी लक्ष योनींचे फेरे चुकतिल असा होरा (भविष्यातील मार्ग) सुचवतो, चंचळ मनाच्या मागे गेल्याने फसवणूक होण्याची शक्यता असते. मनोवासना अतिशय वाईट असते असा अनुभव आहे. वाचेने सतत रामनामाचा जप केल्याने संसार सागरातून विश्वासाने तरून जाता येते, हा शकून सर्वांना कल्याणकारी आहे.


६८
सर्व भावे सुख असता घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा ।
ऐसा अनुताप घडता मानसी । भजन ते मुखासी येत स्वभावे ।
एका जनार्दनी अनुतापेविण । भजन प्रमाण नोहे देवा ।

भावार्थ:
सर्व प्रकारची सुखे हात जोडून समोर असतांना परमेश्वरप्राप्तीसाठी जो कठोर साधना करतो, संसारातील दु:ख व क्लेष यांनी जो पोळला गेला आहे, ज्याला पश्चाताप झाला आहे तो साधक ईश्वरभजनाचा संकल्प करतो. त्याच्या वाणीतून सहजपणे भजन घडते. एका जनार्दनी म्हणतात, अनुतापाशिवाय घडलेले भजन देवाला मान्य होत नाही.


६९
अनुतापावाचूनि नाम न ये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ।
मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुध्द तेणे ।
अनुताप झालिया सहज समाधि । तुटेल उपाधी सहजचि ।
एका जनार्दनी अनुतापे पाहे । मग देव आहे जवळी तया ।

भावार्थ:

संसाराती तापाने होरपळलेला जीव पश्चातापदग्ध होतो, तेव्हा त्याच्या मुखातून हरीनामाचे भजन सहजपणे घडते. अनुतापातूनच भजनाचा संकल्प होतो, त्यामुळे चित्त शुध्द होते. अनुताप झाल्यावर ईश्वरभजनात मन तल्लीन होऊन सहज समाधि लागते आणि सर्व उपाधी (सर्व शीण, कष्ट) नाहिसे होतात, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अशा साधकाच्या जवळ देव सतत राहतो.


७०
देही वाढे जो जो शांति । तो तो विरक्ती अंगी बाणे ।
ऐसा आहे अनुभव । देही देव प्रकाशे ।
देही आत्मा परिपूर्ण । भरला संपूर्णची देही ।
एका जनार्दनी रिता ठाव । नाही वाव पाहता जगी ।

भावार्थ:
साधक सातत्याने साधना करीत असतांना मनाला शांतीचा अनुभव येऊ लागतो. या शांतीतून विरक्तिचा लाभ होतो आणि दैवीकृपेचा लाभ होवून देहातून दैवी गुण प्रकाशू लागतात असा अनुभव येतो. देहात आत्मतत्व संपूर्णपणे व्यापून राहिले आहे असा प्रत्यक्ष अनुभव येऊन विश्वातील प्रत्येक अणुरेणूत हे आत्मतत्त्व भरले असून कोठेही रिकामा ठाव नाही याची जाणिव होते, असे एका जनार्दनी म्हणतात.


७१
साधक सर्वदा पुसती । कोण बाधा चित्त-वृत्ती
एकचि गुण जे पुरता जोडे । ते एकविधा वृत्ति
एकचि न जोडे गुणावस्था । या लागी नोहे एकविधता
एका जनार्दनी पूर्ण । चित्त चैतन्य संपूर्ण

भावार्थ:

साधक नेहमीच असा प्रश्न विचारतात की, कोणत्या गुणांमुळे चित्तामध्ये बाधा निर्माण होऊन चित्त विचलित होते. या प्रश्नाला उत्तर देताना एका जनार्दनी सांगतात की एकच गुण पूर्णपणे आत्मसात करून एकविध वृत्ति वाढते. एकाच प्रकारची गुणावस्था जोडली गेली नाही, तर एकविधता साधली जात नाही. चित्त हे चैतन्याने पूर्णपणे भरलेले आहे.


७२
आंबेया पाडू लागला जाण । अंगी असे आंबटपण ।
सेजे मुरल्याची गोडी । द्वैताविण ते चोखडी ।
अग्नीपोटी निपजे अन्न । वाफ जिरता परमान्न ।
एका जनार्दनी गोडी । तोडा लिगाडाची बेडी ।

भावार्थ:

आंबा पाडाला लागला तरी त्याची चव आंबट असते. तो भट्टीत घालून पिकवला की गोड होतो. अग्नी देवून अन्न शिजवतात, पण वाफ जिरली की ते परमान्न होते. साधक साधनेत एकाग्र झाला, तेव्हाच परमेश्वराशी एकरूप होतो.

नाम-स्मरण आणि कीर्तन

नादमाधुर्य

७३

उदार धीर-निधि । श्रीविठ्ठल-नाम आधी ।
पतित-पावन सिध्दि । श्रीविठ्ठल-नाम आधी ।
सुख-सागर-निधि । श्रीविठ्ठल-नाम आधी ।
एका जनार्दनी बुध्दि । श्रीविठ्ठल-नाम आधी ।

भावार्थ:

जो औदार्य व धैर्य यांचा ठेवा आहे, अशा विठ्ठलाचे नामस्मरण आधी करावे. ज्याच्याकडे पतितांना पावन करणारी सिध्दि आहे, अशा विठ्ठलाला आधी स्मरावे. जो सुख देणारा सागरनिधी आहे, अशा विठ्ठलाचे नाम आधी जपावे. एका जनार्दनी म्हणतात, विठ्ठलनामस्मरण करण्याची बुद्धी सद्गुरूंकडे मागावी.


७४

आंबे केळी द्राक्ष-घडु । नामापुढे अवघे कडु ।
नाम गोड नाम गोड । हरि म्हणता पुरे कोड ।
गुळ साखर कायसी निकी । अमृताची चवी झाली फिकी ।
एका जनार्दनी पडली मिठी । चवी घेतली ती कधीच नुठी ।

भावार्थ:

विठ्ठलाच्या नामाची गोडी एकदा चाखली की त्यापुढे आंबे, केळी, द्राक्षे यांची गोडी अगदीच फिकी वाटते. नाम इतके गोड आहे की हरिउच्चारण करताच सर्व इच्छा पूर्ण होतात. गुळसाखरच काय, पण अमृताची चवसुध्दा हरिनामाच्या तुलनेत फिकी वाटते. एका जनार्दनी म्हणतात, हरिनामाच्या गाडीने जिभेला अशी मिठी पडते की एकदा चव घेता ती कधीच विसरत नाही.


७५

लौकिकापुरता नव्हे हा विभाग । साधले अव्यंग सुख-सार ।
अवीट विटेना बैसले वदनी । नाम संजीवनी ध्यानी-मनी ।
एका जनार्दनी भाग्य ते चांगले । म्हणोनि मुखा आले राम-नाम ।

भावार्थ:'

एका जनार्दनी म्हणतात, ज्याचे भाग्य चांगले असेल त्यालाच रामनामाचा छंद लागून मुखात सतत रामनामाचा जप असेल. रामनामाची अवीट गोडी निर्माण होईल. ध्यानी-मनी-स्वप्नी ही नामसंजीवनी वदनी वसेल. साधकाला निरंतर सुखाची प्राप्ती होईल, तो केवळ लौकिक व्यवहार उरणार नाही.


७६

गुंतला भ्रमर कमळिणी-कोशी । आदरे आमोदासी सेवितसे ।
तैसे राम-नामी लागता ध्यान । मन उन्मन होय जाण ।
एका जनार्दनी राम परिपूर्ण । प्रपंच परमार्थ रामचि जाण ।

भावार्थ:

मध सेवन करण्यासाठी गेलेला भ्रमर कमळफुलात गुंतून पडतो आणि अत्यंत आनंदाने आदरपूर्वक मधाचा आस्वाद घेतो. तसेच साधकाचे रामनामी ध्यान लागून मन उच्च पातळीवर स्थिर होते. मन रामनामात एकाग्र होऊन मनाची चंचलता नाहिसी होऊन त्याचे उन्मन होते. एका जनार्दनी म्हणतात, राम परिपूर्ण असून तोच प्रपंच व परमार्थ साधण्याचे साधन आहे.


७७

भुक्ती-मुक्तीचे कारण । नाही नाही आम्हा जाण ।
एक गाऊ तुमचे नाम । तेणे होय सर्व काम ।
धरिलिया मूळ । सहज हाती लागे फळ ।
बीजाची आवडी । एका जनार्दनी गोडी ।

भावार्थ:

रामनामात रंगलेला साधक नामसाधनेने भुक्ती, मुक्ती मिळेल किंवा नाही हे जाणत नाही. कारण साध्यापेक्षा त्याचे साधनेत मन गुंतलेले आहे. रामाचे नामस्मरण आणि किर्तन या साधनेतच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. राममंत्र हे बीज असून त्याने मूळ धरले की फळ मिळणारच. एका जनार्दनी म्हणतात, फळापेक्षा बीजमंत्राची गोडी अवीट आहे.

नाम-सोलभ्य

७८

सेवेचे कारण मुख्य तो सद्भाव ।
इतर ते वाव इंद्रिय-बाधा ।
साधन हेचि साधी तोडी तू उपाधी ।
नको ऋध्दि-सिध्दि आणिक काही ।
नामाचा उच्चार मुख्य हेंचि भक्ति ।
एका जनार्दनी विरक्ती तेणे जोडे ।

भावार्थ:

मनातला भक्तिभाव हेच ईश्वरसेवेचे प्रमुख कारण आहे, बाकी सर्व केवळ उपाधी असून इंद्रियांना शीण देणाऱ्या आहेत. नामस्मरण हेच ईश्वरभक्तीचे खरे साधन असून ऋध्दि-सिध्दि यांपासून अलिप्त होऊन नामजपांत तल्लीन झाल्यानेच विरक्ती येईल असे एका जनार्दनी सांगतात.


७९

राम कृष्ण हरि । नित्य वदे जी वैखरी ।
तयापाशी नुरे पाप । नासे त्रिविध हा ताप ।
नाम तेचि पर-ब्रह्म। जप-यज्ञ तो परम ।
एका जनार्दन जपा । राम-कृष्ण मंत्र सोपा ।

भावार्थ:

राम कृष्ण हरि या नामाचा जो नित्य जप करतो तो खरा पुण्यवान समजावा, त्यांच्या मनात पापाचा लवलेशही राहात नाही. या साधकाचे आध्यात्मिक,आधिभौतिक,आधिदैविक असे तिनही ताप नाहिसे होतात.असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, नामजप श्रेष्ठ यज्ञ असून नाम हेच परब्रह्म आहे.राम-कृष्ण हा सोपा (सहज करण्यासारखा) मंत्र असून त्याचा नित्य जप करावा.


८०

कृतांताचे माथा देऊनिया पाय । वाचे नाम गाय अहर्निशी ।
उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र । शिव जपे स्तोत्र राम-नाम ।
एका जनार्दनी न करी आळस । चौऱ्यांशीचा लेश नको भोगू ।

भावार्थ:

राम-नाम जप हा अतिशय सहज-सुलभ मंत्र आहे. समजण्यास सोपा व उच्चारण करण्यास सुलभ असून राम-नामाचा जपाचे स्तोत्र शिवशंकर सदैव गातात असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, रामनामाचा जप करण्यात साधकांनी आळस करु नये, कारण चौर्यांशी लक्ष जन्म-मरणाचे फेरे चुकवणारा हा अगाध मंत्र आहे. रात्रंदिवस वाचेने रामजप करणारा भक्त कळीकाळाला जिंकू शकतो.


८१

देवासी तो प्रिय एक नाम आहे । म्हणोनि तू गाये सदोदित ।
कळा हे कौशल्य अवघे विकळ । मंगळ मंगळ रामनाम ।
एका जनार्दनी नाम मुखीं गाता । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ।

भावार्थ:

साधकाने देवाच्या नामाचा अखंड जप करावा. कारण देवाला एकच गोष्ट अत्यंत प्रिय आहे, ती म्हणजे त्याचे नाम. कोणतीही कला किंवा कौशल्य हे अपूर्ण आहे, रामनाममात्र मंगलदायी, पवित्र आहे. एका जनार्दनी म्हणतात, सायुज्य मुक्ती ही सर्वश्रष्ठ मुक्ती असून मुखाने नाम गाणाऱ्या साधकाला सायुज्यता प्राप्त होते.


८२

अबध्द पढता वेद बाधी निषिध्द ।
अबध्द नाम रडता प्राणी होती शुध्द ।
अबध्द मंत्र जपता जापक चळे ।
अबध्द नाम जपता जड मूढ उध्दरले ।
स्वधर्म कर्म करिता पडे व्यंग ।
विष्णु-स्मरणे ते समूळ होय सांग ।
एका जनार्दनी नाम निकटी ।
ब्रह्मानंदे भरली सृष्टी ।

भावार्थ:

न समजता अशुध्द उच्चारपध्दतीने वेदांचे वाचन निषिध्द, बाधक मानतात. परंतु नामजपाला शुध्दाशुध्देचे कोणतेही बंधन नाही, नामाने प्राणी शुध्द होतो. चुकीच्या पध्दतीने मंत्राचे पठण केले तर साधक बुध्दीभ्रष्ट होतो तर अजाणता नामजप केला तरी मूर्खच नव्हे तर जड (अचेतन) सुध्दा उध्दरुन जातात. स्वधर्माचे आचरण करतांना काही उणिवा राहून जातात, परंतु विष्णुस्मरणाने सर्व मुळापासून पवित्र होते असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, नामाच्या सान्निध्यात सर्व सृष्टी ब्रह्मानंदाने भरून जाते.

नाम-माहात्म्य

८३

सर्वांमाजी सार नाम विठोबाचे । सर्व साधनांचे घर जे का ।
शुकादिका नाम साधिलेसे दृढ । प्रपंच-काबाड निरसिले ।
एका जनार्दनी जनी ब्रह्म-नाम । तेणे नेम धर्म सर्व होय ।

भावार्थ:

विठोबाचे नाम हे सर्व साधनांचे सार आहे, सर्व साधना जेथे फलदायी होऊ शकतात असे धाम म्हणजे विठोबाचे नाम. शुक, सनकादिक ऋषी नामावर दृढ श्रध्दा ठेवून प्रपंचाच्या बंधनापासून मुक्त झाले. एका जनार्दनी म्हणतात, सामान्य जनांसाठी नाम हेच ब्रह्म असून नामाने सर्व धर्म साध्य होतात.


८४

संसार-सागरी बुडलिया प्राणी । करी सोडवणी कोण त्याची ।
अविद्यादी पंचक्लेश हे तरंग । बुडाले सर्वांग प्राणियांचे ।
एका जनार्दनी उच्चारील नाम । सुखाचा आराम प्राप्त होय ।

भावार्थ:

संसार-सागरात अविद्येसारखे पाच प्रकारांचे क्लेश-तरंग उसळत असतात. त्यांत प्राण्याला बुडण्याचे भय सतत भेडसावत असते. संसारसागरात बुडणाऱ्या प्राण्याला हात देवून सोडवणारे फक्त नामच आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, जो परमेश्वराच्या नामाचा मनापासून वैखरीने जप करतो त्याला सुख-शांति प्राप्त होते.


८५

ओखद घेतलिया पाठी । जेवी होय रोग-तुटी ।
तैसे घेता राम-नाम । नुरे तेथे क्रोध-काम ।br> घडता अमृत-पान । होय जन्माचे खंडन ।
एका जनार्दनी जैसा भाव । तैसा भेटे तया देव ।

भावार्थ:

औषध घेतल्यानंतर ज्याप्रमाणे शारिरीक व्याधींचे निराकरण होते किंवा अमृत प्राशन करताच अमरपद प्राप्त होऊन जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते, त्याप्रमाणे राम-नाम हे अत्यंत प्रभावशाली औषध किंवा अमृत आहे असे समजावे. राम-नाम रुपी रसाने मनातिल काम क्रोधादि विकारांचा निचरा होतो असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, जशी ज्याची श्रध्दा तशी त्याच्यावर देवाची कृपा होते.


८६

आपुले कल्याण इच्छिणे जयासी । तेणे या नामासी विसंबू नये ।
करील परिपूर्ण मनाचे हेत । ठेवलिया चित्त नामापाशी ।
भक्ति आणि मुक्ति वोळंगती सिध्दि । होईल ही बुध्दि आत्मनिष्ठे ।
एका जनार्दनी जाता हे नाम । पुरवील काम जो जो हेतु ।

भावार्थ:

ज्या साधकाला आपले कल्याण साधायचे असेल त्याने हे नामाचा जप करण्याचा आळस करू नये. हे नाम चित्तात सतत धारण केल्याने मनातील सर्व हेतू पूर्ण होतील. भुक्ति आणि मुक्ति या सिध्दि पायाशी लोटांगण घालतील, बुध्दी देहनिष्ठा सोडून आत्मनिष्ठ बनेल. या नामाचा जप करणाऱ्या साधकाच्या सर्व कामना पूर्ण होतील असे एका जनार्दनी खात्रीपूर्वक सांगतात.


८७

नाही जया भाव पोटी । तया चावटी वाटे नाम ।
परी येता अनुभव । चुकवी हाव संसार ।
येरझारी पडे चिरा । नाही थारा जन्माचा ।
एका जनार्दनी खंडे कर्म । सोपे वर्म हाता लागे ।

भावार्थ:

ज्याची परमेश्वराच्या नामावर श्रध्दा नाही, मनात भक्तिभाव नाही त्याला नाम निरर्थक वाटते. परंतु अनुभवांती नामस्मरणात संसारातील ऐहिक इच्छा चुकवण्याचे सामर्थ्य आहे, जन्म-मरणाच्या वाटेवर धोंडा पडतो आणि जन्माचा थारा राहात नाही. एका जनार्दनी म्हणतात, जन्ममरणाचे मुळ कारण कर्म असून त्याचे खंडन नामस्मरणाने होते हे रहस्य जाणून घेतले पाहिजे.


८८

विठ्ठल म्हणता विठ्ठलचि होसी । संदेह ये विशी धरू नको ।
सागरी उठती नाना पै तरंग । सिंधु तो अभंग विठ्ठल एक ।
तैसे मन करी द्वैत न धरी । सर्व चराचरी विठ्ठल एक ।
एका जनार्दनी विठ्ठलावाचूनि । दुजा नेणो कोणी स्वप्नी आम्ही ।

भावार्थ:

सागरांत अनेक तरंग उमटतांना दिसतात. परंतु त्या तरंगांनी सिंधुचे एकत्व भंगत नाही, तो सागर अभंग असतो. तसा विठ्ठल नाना रुपांनी चराचरांत प्रतिबिंबीत होत असला; तरी तो एकमेवाद्वितीय, अभंग आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात; मनांत द्वैतभाव न आणता एका विठ्ठलाशिवाय दुसरा कोणी आहे, अशी कल्पना स्वप्नातदेखिल करू नये. विठ्ठलाचे नाम घेता-घेता त्या चराचरांत व्यापून राहिलेल्या विठ्ठलाशी एकरुप होशील यात संदेह धरु नये.


८९

लोह परिसासी झगटे । मग काळिमा कैची भेटे ।
तैसे विनटो राम-नामा । पहिलेपण कैचे भेटे ।
गंगा मीनली सागरी । परतेना ती ब्रह्म-गिरी ।
एका जनार्दनी भेटी । चौ देहाची सुटे गाठी ।

भावार्थ:

लोखंड परिसाच्या सान्निध्यात आले की, त्याचा काळिमा लोपून त्याच्यात परिसाचे गुणधर्म येतात. गंगेचा प्रवाह सागराला जाउन मिळाला की, तो उगमस्थाकडे परत येत नाही. तसे मन एकदा रामनामी गुंतले की ते फिरुन संसारिक व्यापात गुंतत नाही. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, परमेश्वरी कृपेने जेव्हा सद्गुरूंची भेट होते तेव्हा स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण या चारी देहाच्या गाठी सुटून देहबुध्दी लयास जाते.

नामावर विश्वास

९०

जनार्दने मज सांगितला मंत्र । रामनाम पवित्र जप करी ।
सोडवील राम संसार-साकडी । ना पडेचि बेडी अरिवर्गा ।
एका जनार्दनी टाकूनि संशय । नाम मुखी राहो प्रेम पोटी ।

भावार्थ:

जनार्दनस्वामींनी राममंत्र देवून रामनामाचा पवित्र जप करण्यास सांगितले. संसार-संकटापासून राम सुटका करतील आणि काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर या षड्रिपुंची बेडी तुटून पडेल. एका जनार्दनी म्हणतात, मनातील सर्व संशय टाकून हृदयात प्रेम व मुखी रामनामाचा जप असावा.


९१

असंख्य वचने असोनि नसती । कोण तया रीती चालतसे ।
हरि-नाम वचन एकचि प्रमाण । हे तो अप्रमाण करील कोण ।
जनार्दनाचे वचना द्यावे अनुमोदन । एका जनार्दन प्रमाण तेचि ।

भावार्थ:

भक्तिमार्गावरुन वाटचाल करतांना अनेकांची असंख्य उपदेशपर वचने ऐकावयास मिळतात. ती सर्वच आचरणात आणणे शक्य नसते असा अनुभव येतो. हरिनाम वचन हेच प्रमाण मानले जाते. ते कोणीही अमान्य करीत नाही. एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूवचनास प्रमाण मानून, त्यास अनुमोदन देऊन त्याचा स्वीकार करावा.


९२

जागृती स्वप्नं सुषुप्ती माझारी । जपे नाम हरि सर्व काळ ।
साधन आणिक न लगे सकळ । रामनाम निखळ जपे आधी ।
पापाचे पर्वत छेदी नाम-वज्र । हाचि निर्धार ऋषीश्वर ।
एका जनार्दनी नाम निज-धीर । पावन साचार राम-नाम ।

भावार्थ:

जागेपणी, स्वप्नी व गाढ झोपेत असताना सतत हरिनामाचा जप अखंडपणे सुरू ठेवावा. हेच परमेश्वर प्राप्तीचे एकमेव साधन आहे, याशिवाय वेगळ्या साधनाची गरज नाही. अनंत पापांचे पर्वत छेदून टाकण्याचे सामर्थ्य या नामरुपी वज्रात (अमोघ शस्त्र) आहे असे थोर ऋषी सांगतात. नाम हे आत्मधैर्य देणारे साधन असून ते मनाला पावन करते असे एका जनार्दनी सांगतात.


९३

चिंतातुर मन नसावे कदा काळी । हृदयी नामावळी जप करी ।
वारंवार चिंतावी देवाची पाउले । जेणे जन्म जाळे उकलेल ।
एका जनार्दनी आलासे प्रत्यय । सर्व भावे गाय नाम त्याचे ।


भावार्थ:

मनातील सर्व चिंता सोडून देऊन अंत:करणात नामाचा सतत जप करावा आणि वारंवार देवाच्या पावलांचे चिंतन करावे. अत्यंत भक्तिभावाने देवाला आळवावे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, त्यामुळे जन्माचे जाळे उकलून त्यातून सुटका होईल याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा.

९४

चिंतने नासतसे चिंता । चिंतने सर्व कार्य ये हाता ।
चिंतने मोक्ष सायुज्यता । घर शोधितसे ।
ऐसें चिंतनाचे महिमान । तारिले अधम खल जन ।
चिंतने समाधान । प्राणिमात्रा होतसे ।
चिंतने तुटे आधि-व्याधि । चिंतने तुटतसे उपाधि ।
चिंतने होय सर्व सिध्दि । एका जनार्दनाचे चरणी ।

भावार्थ:

येथे एका जनार्दनी ईश्वरचिंतनाचे महत्त्व सांगत आहेत. चिंतनाने सर्व चिंताचा परिहार होतो. चित्त शुध्द होऊन सायुज्यता मुक्तीचा लाभ होतो व प्राणिमात्रांचे समाधान होते. चिंतनाने शरिराच्या व्याधी व मनाच्या व्यथांचा निरास होतो. चिंतनाने जीवनातील सर्व कटकटी मिटून जातात व सर्व कार्ये सिध्दीस जातात. अनेक दुष्ट व पापी लोकांचा उद्धार केवळ ईश्वरचिंतनाने होतो असा अनुभव आहे.

९५

घाली देवावरी भार । आणिक न करी विचार ।
योगक्षेम निर्धार । चालवील तुझा ।
वाचे नाम नामावळी । वासुदेवी वाहे टाळी ।
प्रेमाचे कल्लोळी । नित्यानंदे सर्वदा ।
सोस घेई का रे वाचे । राम-कृष्ण वदता साचे ।
धरणे उठते यमाचे । नि:संदेह ।
शरण एका जनर्दनी । करी राम-नाम-ध्वनि ।
कैवल्याचा दानी । रक्षिल तुज ।

भावार्थ:

साधकाने देवावर विश्वास ठेवून भविष्याचा विचार न करता परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन व्हावे. देव सर्व योगक्षेम चालविल अशी खात्री बाळगावी. ईश्वरप्रेमात रंगून सतत भजनात दंग व्हावे. वाचेने राम-कृष्णाच्या नामाचे संकिर्तन करीत असताना यमयातना चुकतील. स्वामी जनार्दनांना शरणागत असलेले संत एकनाथ म्हणतात, श्रीराम कैवल्याचा दानी असून केवळ नामस्मरण केल्याने तो भक्तांचे रक्षण करतो.

९६

पशु आणि पक्षी तरले स्मरणे । तो तुम्हा कारणे उपेक्षीना ।
धरूनि विश्वास आळवावे नाम । सद्गद ते प्रेम असो द्यावे ।
सुख-दु:ख कोटी येती आणि जाती । नामाविण विश्रांती नाही ।
एका जनार्दनी नामाचा प्रताप । नुरेचि तेथे पाप ओखदासी ।

भावार्थ:

परमेश्वराच्या नामस्मरणाने पशु-पक्षीसुध्दा संसार-सागरातून तरून नेले जातात; तर नामावर विश्वास ठेवून प्रेमाने आळवल्यास देव उपेक्षा करणार नाही अशी खात्री धरावी. संसारात अनेक प्रकारची सुख-दु:खे येतात आणि जातात, परंतु नामाशिवाय विश्रांती मिळवण्याचा दुसरा साधना-मार्ग नाही. एका जनार्दनी म्हणतात, नाम इतके प्रत्ययकारी आहे की पाप तेथे औषधालासुध्दा उरत नाही.


९७

कोणी काहीतरी म्हणो। आम्ही न जाणो तया बोला ।
गाऊ मुखे नामावळी । सुख-कल्लोळी सर्वदा ।
नाचु संत-मेळा सदा । कीर्तनी गोविंदा रंजवू ।
एका जनार्दन हाचि धंदा । वाया शब्दा न लागु ।

भावार्थ:

एका जनार्दनी म्हणतात, आम्ही संतजन मुखाने गोविंदाची नामावळी गात, त्याच्या कीर्तनात रंगून जाऊन भक्तीसुखात गोविंदाला रंजवु. कोणी काही बोलले तरी त्यांच्या बोलण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करु. हाच आमचा एकमेव धंदा आहे.

नाम-स्मरणाचे पथ्य

९८

जग राम-नाम म्हणे । तयां का न येती विमाने ।
नवल स्मरणाची ठेव । नामी नाही अनुभव ।
नष्ट गणिका राम म्हणे । तिसी वैकुंठीचे पेणे ।
एका जनार्दनी ध्यात । राम पाहे ध्याना आत ।

भावार्थ:

सामान्य माणसे रामनामाचा जप करतात. पण त्यांच्यावर राम-कृपा होऊन मुक्ती मिळत नाही, नामाचा अनुभव येत नाही. कारण त्यांचा जप वरवरचा असतो, ती स्मरणातील ठेव नसते. एका जनार्दनी म्हणतात, रामानामाचा ध्यानी-मनी-स्वप्नी ध्यास लागला तरच गणिकेवर झाली तशी रामकृपा होईल.

९९

नाम घेता हे वैखरी । चित्त धावे विषयावरी ।
कैसे होता हे स्मरण । स्मरणामाजी विस्मरण ।
नाम-रूपा नव्हता मेळ । नुसता वाचेचा गोंधळ ।
एका जनार्दनी छंद । बोला माजी परमानंद ।

भावार्थ:

केवळ मुखाने रामनामाचा जप सुरू आहे पण चित्त मात्र इंद्रिय-विषयांचे चिंतन करीत असेल, तर ते राम-स्मरण नव्हे विस्मरण आहे. नामस्मरण करतांना रामरुप ध्यानी नसेल, तर तो केवळ वाचेचा गोंधळ समजावा असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, रामनामात परमानंद असून तो मनाला लागलेला छंद आहे.


१००

भव रोगासी ओखद । राम-हेचि शुध्द ।<।br> येणे तुटे रोग-व्यथा । भक्ति मुक्ति वंदिती माथा ।
न लगे आणिकांचे काम । वाचे वदे राम-नाम ।
पथ्य एक शुध्द क्रिया । एका जनार्दनी लागे पाया ।

भावार्थ:

राम-नाम हेच भव-रोगावरचे शुध्द औषध आहे. त्यामुळे सर्व रोग, आधि-व्याधी समूळ नाहिशा होतील. रामनामाशिवाय वेगळ्या उपायांची गरज नाही. वाचेने राम-नाम घेणे ही एक प्रकारची शुध्दी-क्रिया असून ते भव-रोगावरचे पथ्य आहे ते पाळणे आवश्यक आहे असे एका जनार्दनी आग्रहाने सांगतात.


१०१

हरिनाम स्मरतो म्हणोनि आचरसी दोष ।
श्रवण स्मरण भक्ति तेणे पडली ओस ।
हरिनामाचेनि बळे करिसी अधर्म ।
देवाचेनि तमुचे शुध्द नोहे कर्म ।
सत्यव्रती धर्म सद्-यज्ञ-निष्ठ ।
असत्य-वचनी त्याचा पडला अंगुष्ठ ।
एका जनार्दनी संत-सोयीने चाले ।
सद्गुरू-वचन सबाह्य शुध्द झाले।

भावार्थ:

हरिनाम घेऊन भक्ति करणारा साधक दोषपूर्ण आचरण करीत असेल त्याचे नामस्मरण आणि भक्ति व्यर्थ आहे असे समजावे. हरिनामाच्या बळावर केलेला अधर्म हे अशुध्द कर्म होय. सत्याचे व्रत घेऊन आचरलेला धर्म हा सद्-यज्ञ आहे. असत्यवचनाने तो यज्ञ फलद्रुप होणार नाही असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, हे सद्गुरूवचन असून अंतर्बाह्य शुध्द आहे. संतजन त्याप्रमाणे आचरण करतात.


१०२

व्यापक विठ्ठलनाम तेव्हाचि होईल । जेव्हा जाईल मी-तूपण
आपुले ते नाम जेव्हा ओळखील । व्यापक साधेल विठ्ठल तेणे ।
आपुले ओळखी आपण सापडे । सर्वत्र हि जोडे विठ्ठलनाम ।
नामाविण जन पशूच्या समान । एका जनार्दनी जाण नाम-जप ।

भावार्थ:

जेव्हा साधकाच्या मनातील मी-तूपण (द्वैतभाव) समूळ नाहीसा होईल, हे सर्व विश्व एकाच आत्मरूप चैतन्याने भरलेले आहे याचा साक्षात्कार होईल तेव्हाच विठ्ठलनामाची व्यापकता समजून येईल आणि स्वत:ची खरी ओळख पटेल. तेव्हा मनाचे उन्मन होईल. एका जनार्दनी म्हणतात, नाम-जपाने माणुस पशूचा माणुस बनेल.


एकनाथांचा परिपाठ

१०३

हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावे जैसा तैसा हरि एक ।
हरि मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ।
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगे हरिरुप ।
हरिरुप ध्यानी हरिरुप मनी । एका जनार्दनी हरि बोला ।

भावार्थ

हरिदासाला उत्कट भावभक्तिमुळे सर्वत्र दाही दिशांना हरिरुप दिसते. हरीनामाचा सतत जप करीत असल्याने हरिदासाच्या सर्व चिंता मिटून जातात, त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही, कारण त्याच्या सर्व वासना हरिरुप झालेल्या असतात. एका जनार्दनी म्हणतात, हरिरुप ध्यानी-मनी धरुन केवळ हरिनामाचा जप करावा.


१०४

हरि हरि बोला नाही तरी अबोला । व्यर्थ गलबला करू नका ।
नको नको मान सांडी आभिमान । सोडी मी-तूपण तोचि सुखी ।
सुखी जेणे व्हावे जग निववावे । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ।
मार्ग जया कळे भाव-भक्ति बळे । जगाचिये मेळे न दिसती ।
दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी । एका जनार्दनी ओळखिले ।


भावार्थ:

जो कोणी मानापमानाच्या कल्पनांचा त्याग करुन अभिमान, आपपर भाव सोडून इतरांशी मित्रत्वाचे नाते जोडतो तो जीवनात सुखी होतो. ईश्वरावरील अतूट भक्तिभावामुळे जगाचे बाजारी स्वरुप दिसत नाही अशा भक्ताला जनी-वनी केवळ जनार्दनच भरला आहे हे ओळखता येते असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अज्ञानी लोकांना सन्मार्ग दाखवून त्यांचे दु:ख दूर करावे. मुखाने केवळ हरिनामाचा जप करावा किंवा मौन धरावे व्यर्थ गलबला करु नये.


१०५

ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरी सिध्दी सहित ।
सिध्दि लावी पिसे कोण तया पुसे । नेले राजहंसे पाणी काई ।
काय ते करावे संदेही निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केले ।
केले कर्म झाले तेचि भोगा आले । उपजले मेले ऐसे किती ।
एका जनार्दनी नाही यातायात । सुखाची विश्रांती हरी संगे ।

भावार्थ:

ज्याने परमेश्वरी तत्व जाणून घेतले त्याला सिध्दीसहित मोक्ष प्राप्त होतो. परंतु सिध्दी साधकाच्या मनाला वेड लावतात. त्यामुळे साधक देवाच्या भक्तिला पारखा होतो. राजहंसाला दूधापासून पाणी वेगळे करण्याची सिध्दी प्राप्त झालेली असते. पण त्या सिध्दीला फारसे महत्त्व नसते. परमेश्वरी तत्व सगुण की निर्गुण या संदेहात पडलेले मन ज्ञानमार्गाने जावे की भक्तिमार्ग आचरावा याविषयी साशंक बनते. कर्ममार्ग अनुसरला तरी कर्माची फळे भोगावी लागतात. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, यापैकी कोणतीही यातायात न करता हरिस्मरणात सुखाची विश्रांती मिळते.


१०६

जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ।
वैकुंठ-कैलासी तीर्थक्षेत्री देव । तयाविण ठाव रिता कोठे ।
वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत । अनंतासी अंत पाहता नाही ।
आदि-मध्य-अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ।
एकाकार झाले जीव-शिव दोन्ही । एका जनार्दनी ऐसे केले ।

भावार्थ:

जे जे डोळ्यांना दिसते ते ते सर्व हरिरुप आहे, सर्वत्र चैतन्य रुपाने हरि व्यापून राहिला असून कोठेही रिकामी जागा नाही सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही अवस्थांमध्ये हरि हेच अविनाशी तत्व अस्तित्वात आहे आणि हे तत्व अनंत असून त्याला अंत नाही. एकच हरिरुप सृष्टीतिल अनंत रुपानें नटले आहे.जीव व शिव एकरुप होतो तेव्हा सर्वत्र हरिदर्शन विनासायास घडते. वैकुंठात, कैलास पर्वतावर आणि तीर्थक्षेत्री भक्तांसाठी देव तिष्ठत उभा आहे. एका जनार्दनी म्हणतात, पूजा, ध्यान, तप यांची गरज नाही. सद्गुरुकृपेने वैष्णवांचे हे रहस्य समजून येते.


१०७

सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया । आनंद-पद जया म्हणती हरि ।
सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण-निर्गुण हरी-पायी ।
तत्सदिति ऐसे पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ।
हरिपद-प्राप्ति भोळ्या भाविकांसी । अभिमानियासी गर्भवास ।
अस्ति भाति प्रिय ऐशी पदे तिन्ही । एका जनार्दनी तेची झाले ।

भावार्थ:

सच्चिदानंद या परमेश्वरी नामाची फोड करून सांगतांना एका जनार्दनी म्हणतात, ब्रह्म हे सत्पद (सत्य), माया हे चित्पद (सनातन) आणि हरि हे आनंद-पद आहे. ब्रह्म हे निर्गुण, माया ही सगुण तर हरि हा सगुण, निर्गुण असून आनंदमय आहे. ब्रह्म आणि माया ह्या पैलवस्तु डोळ्याला अगोचर आहेत असे गीतेमध्ये भगवान सांगतात. भोळ्या भाविकांना हरिपदाची प्राप्ति होऊन मोक्षाचा मार्ग सुलभ होतो, तर ज्ञानामुळे अहंकार निर्माण होऊन जन्ममरणाच्या बंधनात पडावे लागते.


१०८

हरि बोला देता हरि बोला घेता । हांसता खेळता हरि बोला ।
हरि बोला गाता हरि बोला खांता । सर्व कार्य करिता हरि बोला ।
हरि बोला एकांती हरि बोला लोकांती । देह-त्याग अंती हरि बोला ।
हरि बोला भांडता हरि बोला कांडता । उठता बैसता हरि बोला ।
हरि बोला जनी हरि बोला विजनी । एका जनार्दन हरि बोला ।

भावार्थ:

कोणतीही वस्तू देतांना, घेतांना, खातांना तसेच गातांना हरिचे नाम घ्यावे. हसून खेळून आनंदात असतांना, कष्टाची कामे करतांना किंवा रागाने भांडतांनासुध्दा हरिनाम स्मरण करावे. एकांतामध्ये चिंतन करतांना किंवा चारचौघांत हास्य विनोद करतांना, जनी-विजनी हरीच्या नामाचा वाचेने सतत जप करावा.


१०९

आवडीने भावे हरि-नाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।
नको खेद धरू कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ।
सकळ जीवांचा करिता सांभाळ । तुज मोकलील ऐसे नाही ।
जैसी स्थिति आहे तैशापरि राहे । कौतुक तु पाहे संचिताचे ।
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकृपे त्याचा नाश झाला ।

भावार्थ:
लक्ष्मीचा पती सर्व जीवांचे पालन-पोषण, सांभाळ करणारा व सर्वांची चिंता करणारा आहे, सर्व कांही जाणणारा आहे. या परमेश्वरी शक्तिवर विश्वास ठेवून ज्या परिस्थितीत आहे तिचा स्विकार करावा व भविष्यात जे घडेल त्याचा संचित म्हणून अंगिकार करावा. या घटना आपल्या प्रारब्धाचा भोग आहेत असे मानावे. कोणत्याही गोष्टीचा खेद न करता मनापासून हरिचे नामस्मरण करावे. त्यामुळे हरिकृपा होऊन प्रारब्धातील दु:खांचा नाश होईल असे एका जनार्दन सांगतात.

कीर्तन देवास प्रिय, कीर्तनाने सामाजिक चित्त-शुध्दि


११०

आवडी करिता हरि-कीर्तन । हृदयी प्रगटे जनार्दन ।
थोर कीर्तनाचे सुख । स्वये तिष्ठे आपण देख ।
घात आलिया नावाची । चक्र गदा घेउनी करी ।
कीर्तनी होऊनी सादर । एका जनार्दनी तत्पर ।

भावार्थ:

आवडीने हरिचे कीर्तन करतांना मनाला जे सुख मिळते त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही सुखाची होऊ शकत नाही. हे सुख अप्रतिम असते कारण त्या वेळी प्रत्यक्ष जनार्दन हृदयात प्रगट होतात. काही संकट आल्यास चक्र, गदा हाती घेऊन येतात व त्या संकटाचे निवारण करतात म्हणुनच एका जनार्दनी कीर्तनभक्ती सर्वांत श्रेष्ठ भक्ती आहे असे मानतात.


१११

कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धावा
नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनी नाचतसे ।
भोळ्या भावासाठी । धावे त्याच्या पाठोपाठी ।
आपुले सुख तया द्यावे । दु:ख आपण भोगावे ।
दीन-नाथ पतित-पावन । एका जनार्दनी वचन ।

भावार्थ:

दीनांचा नाथ, पतित-पावन अशा देवाला कीर्तनाची इतकी आवड आहे की तो कीर्तनासाठी वैकुंठाहून धावत येतो आणि नवल असे की, तो संताच्या मेळ्यात, कीर्तनाच्या रंगात रंगून नाचतो. भोळ्या भाविकांच्या भावासाठी देव त्यांच्यापाठोपाठ धावत येतो. त्यांचे दु:ख आपण भोगतो आणि त्यांच्या सुखाचा भागीदार बनतो. हे एका जनार्दनीचे वचन सार्थ आहे.


११२


नवल रोग पडिपाडु । गोड परमार्थ झाला कडु ।
विषय व्याधीचा उफाडा । हरि-कथेचा घेई काढा ।
ऐसा रोग देखोनि गाढा । एका जनार्दनी धावे पुढा ।

भावार्थ:

अंगामध्ये ताप असला की, जिभेची चव जाते आणि गोड पदार्थ कडु लागतात. तसेच इंद्रियविषयांचा मोहरुपी रोग जडला की, परमार्थ कडु वाटतो. हा रोग बळावला असता हरिकथेचा काढा घ्यावा आणि रोग विकोपाला गेला तर गुरुचरणांना शरण जावे असे एका जनार्दनी म्हणतात.


११३

हरि-कीर्तने चित्त शुध्द । जाय भेद निरसूनि ।
काम-क्रोध पळती दुरी । होत बोहरी महापापा ।
गजरे हरीचे कीर्तन । पशुपक्षी होती पावन ।
एका जनार्दनी उपाय । तरावया भव-नदीसी ।


भावार्थ:

हरिकीर्तनाने चित्त शुध्द होते. मी-तूपणाचा द्वैतभाव लयास जातो. काम-क्रोधरुपी शत्रु परागंदा होतात. महापापांची होळी होते. हरिकीर्तनाच्या गजराने पशुपक्षीसुध्दा पावन होतात. एका जनार्दनी म्हणतात, संसारसरिता तरून जाण्याचा हरिकीर्तन हा एकच उपाय आहे.


११४

करिता कीर्तन श्रवण । अंतर्मळाचे होत क्षालन ।
तुमचे कीर्तन पवित्र कथा । पावन होत श्रोता वक्ता ।
तुमचे कीर्तनी आनंद । गाता तरले ध्रुव प्रल्हाद ।
एका जनार्दनी कीर्तन । तिन्ही देव वंदिती रण ।

भावार्थ:

परमेश्वराचे कीर्तन म्हणजे त्याच्या पवित्र कथांचे श्रवण. या श्रवणभक्तीने अंत:करणातील वाईट भावनांचे निर्मूलन होते, कीर्तन करणारा आणि ऐकणारा दोघेही पावन होतात. भक्त प्रल्हाद आणि ध्रुव दोघेही कीर्तनभक्तीने मोक्षाप्रत गेले. एका जनार्दनी म्हणतात, ब्रह्माविष्णुमहेश हे तिन्ही देव कीर्तनकारांना वंदन करतात.


११५

तुमचे वर्णिता पोवाडे । कळिकाळ पाया पडे ।
तुमची वर्णिता बाळलीळा । ते तुज आवडे गोपाळा ।
तुमचें वर्णील हास्य-मुख । त्याचे छेदिसी संसार-दु:ख ।
तुमचे दृष्टीचे दर्शन । एका जनार्दनी ते ध्यान ।

भावार्थ:

देवाच्या कीर्तीचे गुणगान कळीकाळालासुध्दा वंदनीय आहे. आपल्या बाळलीळांचे वर्णन गोपाळकृष्णाला ऐकायला आवडते. देवाच्या हास्यमुखाचे वर्णन करणाऱ्या भक्तांचे संसारदु:ख देव नाहीसे करतो. एका जनार्दनी म्हणतात, देवाच्या कृपादृष्टीचे मनाला ध्यान लागते.


११६

मागणे ते आम्ही मागु देवा । देई हेवा कीर्तनी ।
दुजा हेत नाही मनी । कीर्तनावाचूनि तुमचिया ।
प्रेमे हरिदास नाचत । कीर्तन होत गजरी ।
एका जनार्दनी कीर्तन । पावन होती चराचर जाण ।


भावार्थ:

हरिकीर्तनाच्या गजरात हरिदास जेव्हा आनंदाने नाचतात, तेव्हा सर्व चराचर सृष्टी पावन होते. या कीर्तनसुखाची मागणी एका जनार्दनी देवाकडे करतात. याशिवाय दुसरी कोणतीही मागणी नाही असे ते देवाला सांगतात.

कीर्तनभक्तीचा आदर्श

११७

नवल भजनाचा भावो । स्वत: भक्तचि होय देवो ।
वाचे करिता हरिकीर्तन । उन्मनी मन निशीदिनी ।
नाही प्रपंचाचे भान । वाचे सदा नारायण ।
एका जनार्दनी मुक्त । सबाह्य अभ्यंतरी पुनीत ।

भावार्थ:

कीर्तन \भक्तीचा महिमा एवढा आश्चर्यकारक आहे की, कीर्तनात रंगलेला भक्त स्वत:च देव बनतो. मन एका उच्च पातळीवर पोचून तेथेच स्थिर होते. ह्या उन्मनी अवस्थेत मन रात्रंदिवस गुंतुन राहते. वाचेने सतत हरिनामाचा जप अखंडपणे सुरू असतो. प्रपंचाचे भान हरपून जाते. आंतरबाह्य शुध्द झालेले मन देहबंधनापासून मुक्त होते असा अनुभव एका जनार्दनी येथे व्यक्त करतात.


११८

आजी नवल झाले वो माझे । पाहण्या पाहणे दृष्टि धाये ।
ऐसा लाघवी सुखकर मूर्ति । संतसंगे झाली मज विश्रांति ।
योगीश्वर जया चिंतिती । सनकादिक जया ध्याती ।
योग-साधन नातुडे जो माये । एका जनार्दनी कीर्तनी नाचतु आहे ।

भावार्थ:

योगी-मुनीजन ज्याचे सतत चिंतन करतात आणि सनकादिक श्रेष्ठ मुनी ज्याच्यावर निरंतर ध्यान लावतात, अशा पांडुरंगाचे दर्शन योगसाधनेने मिळत नाही. हरिची लाघवी, सुंदर मूर्ती पाहून डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी धावत असताना नवल घडले आणि संतकृपेने मिळालेल्या दर्शनसुखाने मन अपार भरून विश्रांत झाले. आनंदाने एका जनार्दनी कीर्तनरंगी रंगून गेले.


११९

जे पदी निरुपण तेचि हृदयी ध्यान । तेथे सहजी स्थिर राहे मन ।
कीर्तनासी तोषोनि कळिकाळ । तुष्टला समाधीसी समाधान रे ।
कीर्तनी सद्भाव अखंड अहर्निशी । पाप न रिघे त्याच्या देशी ।
निज-नामे निष्पाप अंतर देखोनि । देव तिष्ठे तयापाशी रे ।
हरि-नाम-कीर्तने अभिमान सरे । आणिक श्रेष्ठ आहे काज ।
सद्भावे कीर्तनी गाता पै नाचता । लोकेषणा सांडी लाज रे ।
व्रता तपा तीर्था भेटे जो न पाहता । तो कीर्तनी सापडे देवो ।
तनु मनु प्राणे कीर्तनी विनटले । भावा विकिला वासुदेवो रे ।
एका जनार्दनी कीर्तन भावे । श्रोता वक्ता ऐसे लाहावे ।
गर्जत नामे निशाण लागुनी । सकळिका वैकुंठासी जावे रे ।

भावार्थ:

कीर्तनातील पदात ईश्वरीतत्वांचे जे निरुपण केले असेल त्याचे हृदयात ध्यान करीत असतांना तेथे मन सहजपणे स्थिर राहते. कीर्तनात रंगलेला कळिकाळसुध्दा आनंदी होवून समाधानाने समाधिस्त होतो. अत्यंत सात्विक भावाने जो अखंडपणे दिवस-रात्र कीर्तनात रंगतो त्याच्याकडे पाप प्रवेश करीत नाही. नामजपाने निष्पाप बनलेले अंत:करण पाहून देव त्या ठिकाणी उभा राहतो. हरि-नाम-कीर्तनात रंगून गातांना, नाचतांना भक्त लौकिकाची, लाज-लज्जेची चाड विसरून जातो. अभिमान, मीपणा पिकलेल्या फळाप्रमाणे गळून पडतो. जो परमेश्वर अनेक प्रकारच्या व्रतांनी, खडतर तपाने, तीर्थक्षेत्री भेटत नाही तो कीर्तनात हमखास सापडतो. कीर्तन भक्तीभावाला वासुदेव हरि विकला गेला आहे. एका जनार्दनी म्हणतात, कीर्तनभक्तीत श्रोता, वक्ता हाती हरिनामाचा झेंडा घेऊन हरिचा नामघोष करित वैकुंठाची वाटचाल करतात.

१२०

नित्य नवा कीर्तनी कैसा ओढावला रंग ।
श्रोता आणि वक्ता स्वये झाला श्रीरंग ।
आल्हादे वैष्णव करिती नामाचा घोष ।
हरि-नाम गर्जता गगनी न माये हरुष ।
पदोपदी कीर्तनी निवताहे जग मन ।
आवडी भुकेली तिने गिळिले गगन ।
एका जनार्दनी गाता हरीचे नाम ।
निमाली इंद्रिये विषय विसरली काम ।

भावार्थ:

कीर्तनभक्तीत रंगून गेलेले श्रोते आणि वक्ते श्रीरंगात तल्लीन होऊन स्वत: श्रीरंगमय होतात. जेव्हा वैष्णव हरिनामाचा जयघोष करतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. भक्तांच्या प्रत्येक पदागणिक श्रोत्यांचे मन निवत जाते, विश्रांती पावते. एका जनार्दनी म्हणतात, हरिचे नाम गातांना इंद्रिये विषयवासना विसरून जातात, मन निष्काम बनते; हा एक अलौकिक पारमार्थिक अनुभव आहे.


१२१

कीर्तनाची मर्यादा कैसी । देव सांगे उध्दवासी ।
गावे नाचावे साबडे । न घालावे कोडे त्या काही ।
मिळेल तरी खावे अन्न । अथवा पर्णे ती भक्षून ।
जाईल तरी जावो प्राण । परी न संडावे कीर्तन ।
किरकीर आणू नये । बोलू नये भलती गोष्टी ।
स्वये उभा राहून । तेथे करी मी कीर्तन ।
घात आलिया निवारी। माता जैसी बाळावरी ।
बोले उध्दवासी गूज । एका जनार्दनी बीज ।

भावार्थ:

या भजनात श्रीहरी उध्दवाला कीर्तनभक्तीच्या मर्यादा विशद करुन सांगत आहेत. हरिभजनात गावे, नाचावे. मिळाले तर अन्न खावे नाहीतर झाडाची पाने खाऊन भुक भागवावी. प्राण गेला तरी कीर्तन सोडू नये. कीर्तनात कोणतीही तक्रार करु नये किंवा अजाणतेपणी भलत्याच गोष्टींची चर्चा करु नये. कीर्तनकाराच्या ठिकाणी आपण स्वत: उभा असून कोणतेही संकट निवारण्यास सज्ज असतो, जशी माता आपल्या बाळाचे संकट निवारण करते. एका जनार्दनी म्हणतात, कीर्तन-भक्तीचे हे रहस्य देव भक्त उध्दवाला सांगतात.

१२२

सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी ।
सज्जन-वृंदे मनोभावे आधी वंदावी ।
संत-संगे अंतरंगे नाम बोलावे ।
कीर्तन-रंगी । देवा-संनिध सुखे डोलावे ।
भक्तिज्ञानविरहित गोष्टी इतरा न कराव्या ।
प्रेमभरे । वैराग्याच्या युक्ति विवराव्या ।
जेणे करुनी मूर्ति ठसावे । अंतरी श्रीहरिची ।
ऐशी कीर्तन-मर्यादा हे संताचे घरची ।
अद्वय-भजने अखंड-स्मरणे । वाजवी कर-टाळी ।
एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी ।

भावार्थ:

सज्जनांच्या समुदायाला मनोभावे वंदन करुन परमेश्वराची अत्यंत पवित्र अशी सगुण-चरित्रे कीर्तनात वर्णन करावी. संतजनांबरोबर मनापासून ईश्वर नामाचा जयघोष करावा. प्रेमाने, विवेकाने वैराग्य कसे मिळवता येईल याचे विवरण करावे. श्रोत्यांच्या अंतकरणात श्रीहरिची स्पष्ट प्रतिमा स्थापन करावी. ही संतांची कीर्तनभक्तीची पध्दत आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीच्या अखंड नाम स्मरणाने अद्वैत निर्माण होऊन भक्त ईश्वराशी एकरुप होऊन तात्काळ भव-बंधनातून मुक्त होतो.

१२३

धन्य तोचि जगी एक हरि-रंगी नाचे ।
राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे ।
सुख दु:ख समान सकळ जीवांचा कृपाळ ।
ज्ञानाचा उद्बोध भक्ति-प्रेमाचा कल्लोळ ।
विषयी विरक्त जया नाही आप-पर ।
संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार ।
जाणीव शाहणीव ओझे सांडूनिया दूरी ।
आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ।
एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन ।
आसनी शयनी नित्य हरीचे चिंतन ।
एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन ।
आसनी शयनी नित्य हरीची चिंता ।

भावार्थ:

राम कृष्ण वासुदेव या नामाने स्मरण करुन हरिकीर्तनात दंग होऊन नाचतो तो धन्य होय. या हरिभक्ताच्या दृष्टीने सुखदु:खे समान असतात. तो सुखाने हरखून जात नाही आणि दु:खाने खचून जात नाही. तो सृष्टीतील सर्व जीवांवर प्रेम करतो. त्याच्या अंतरात भक्ती-प्रेम उसळून येते व बुद्धीत विवेकाचा संचार होतो. विवेकातून वैराग्याचा उगम होतो, मी-तूपणा, आपपर भाव लयास जातो. तो सदा संतुष्ट, समाधानी असतो. ज्ञानाचे ओझे दूर फेकून तो एखाद्या वाटसरूसारखा विरक्तपणे संसारात राहतो. आसनावर बसून किंवा मंचावर शयन करतांना तो सतत हरीकीर्तनात, चिंतनात मग्न असतो. त्याचा हरिभक्तीचा निर्धार पक्का असतो. असा भक्त धन्य होय असे एका जनार्दनी म्हणतात.

सत्संगती आणि गुरुभक्ती

१२४

वैष्णवा घरी देव सुखावला । बाहीर न वजे दवडो निघातला ।
देव म्हणे माझे पुरतसे कोड । संगत या गोड वैष्णवांची ।
जरी देव नेउनी घातला दूरी । परतोनि पाहे तंव घराभीतरी ।
कीर्तनाची देवा आवडी मोठी। एका जनार्दनी पडली मिठी ।

भावार्थ:

वैष्णवांच्या गोड संगतीत देव सुखावला, कारण देवाला कीर्तन-भक्ती अतिशय प्रिय आहे. वैष्णव देवाच्या सर्व इच्छा पुरवतात. वैष्णवांची संगत देवाला आवडते. वैष्णव देवाला दूर करतात, पण देवाला वैष्णवांचा दुरावा सहन होत नाही. एका जनार्दनी म्हणतात, देव आनंदाने कीर्तन-भजनात भक्तांशी एकरुप होतो.

१२५

संता-अंकी देव वसे । देवा-अंकी संत बैसे ।
ऐसी परस्परे मिळणी । समुद्रतरंग तैसे दोन्ही ।
हेम-अलंकारवत । तसे देव-भक्त भासत ।
पुष्पी तो परिमळ असे । एका जनार्दनी देव दिसे ।

भावार्थ:

देव व संत यांचा निकटचा संबंध वर्णन करतांना एका जनार्दनी म्हणतात, सागराच्या पृष्ठभागावर जसे लाटांचे तरंग उमटतात तसे देव व संत एकरुप असतात. सोने आणि सुवर्णाचे अलंकार भिन्न-रुप भासतात, परंतु ते एकरुप असतात. सुमन आणि सुगंध जसे वेगळे करता येत नाहीत तशी संत व देवाची संगत असते.

१२६

संत आधी देव मग । हाचि उमग आणा मना ।
देव निर्गुण संत सगुण । म्हणोनी महिमान देवासी ।
मुळी अलक्ष लक्षा नये । संती सोय दाविली ।
एका जनार्दनी संत थोर । देव निर्धार धाकुला ।

भावार्थ:

संताची थोरवी वर्णन करतांना एका जनार्दनी सांगतात, भक्तिमार्गावर साधकाला संत आधी भेटतात. संताच्या मार्गदर्शनाने देव ओळखता येतो. संत सगुण असून देव निर्गुण आहे. संत आपल्या विवेकाने, विचारांनी, वाणीने, कृतीने देवाला निर्गुणातून सगुणात आणतात. दृष्टीला जो अगोचर असतो तो प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा करतात. संत वाल्मिकींनी निर्गुण विष्णुरूप रामरुपाने सगुणात आणले. त्यामुळे देवाचा महिमा वाढला. संत हे देवापेक्षा थोर आहेत हे समजून घ्यावे.

१२७

संताचा महिमा देवचि जाणे । देवाची गोडी संतासी पुसणे ।
ऐसी आवडी एकमेका । परस्परे नोहे सुटिका ।
बहुत रंग उदक एक । या परी देव संत दोन्ही देख ।
मागे पुढे नव्हे कोणी । शरण एका जनार्दनी ।

भावार्थ:

देवाच्या नवविधा-भक्तीची गोडी चाखण्यासाठी संतांच्या सहवासात राहावे आणि संतांचा महिमा देवच जाणतो. देव आणि संत एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. जसे पाण्याचे रंग वेगवेगळे दिसतातम् पण उदक एकच असते. एका जनार्दनी म्हणतात, देव आणि संत दोन्ही सारखेच प्रत्ययकारी असतात. दोघांना समदृष्टीने बघावे.

अभंग १२८

अभक्ता देव कंटाळलो । परी सरते करिती संत त्या ।
म्हणोनी महिमा त्यांचा अंगी । वागविती अंगी सामर्थ्य ।
मंत्र-तंत्रा नोहे बळ । भक्ति प्रेमळ पाहिजे ।
आगम-निगमाचा पसारा । उगाचि भारा चिंध्यांचा ।
वेद-शास्त्रांची घोकणी । ती तो कहाणी जुनाट ।
एका जनार्दनी सोपा मार्ग । संत-संग चोखडा ।

भावार्थ:

अभक्तांना देव कंटाळतो, परंतु संतकृपेने तो भवसागर तरुन जातो. असे सामर्थ्य संताच्या अंगी असते. प्रेमळ भक्तीचे बळ मंत्र-तंत्रापेक्षा अधिक असते. वेद-शास्त्रांचे पाठांतर ही जुनाट पध्दत असून वेद, उपनिषदे हे केवळ कालबाह्य, जीर्ण भांडार आहे असे सांगून एका जनार्दन म्हणतात, संतांचा सहवास हा सर्वात सोपा व अचूक मार्ग आहे.

अभंग १२९

संतासी जो नांदी देवासी जो वंदी । तो नर आपदी आपदा पावे ।
देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय ।
कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी । सायुज्य-सदनी पदवी पावे ।
एका जनार्दनी गूज सांगे कानी । रहा अनुदिनी संत-संगे ।

भावार्थ:

संतांची निंदा करून जो भक्त देवाला वंदन करतो, तो परमेश्वरी कृपेला पात्र होत नाही. पण संतांना आदरभावाने वंदन करतो आणि देवाची निंदा करतो. असा भक्त मात्र गोविंदाला आपलासा वाटतो हे पटवून देण्यासाठी एका जनार्दनी कंसाचे उदाहरण देतात. कंस सतत कृष्णाचा द्वेष करतोम् पण नारदांचा सन्मान करत असतो. त्याला सायुज्य मुक्तीचा लाभ होतो. सतत संतांच्या सहवासात रममाण व्हावे असे एकनाथ महाराज सांगतात.

संतांचे अवतार-कार्य

अभंग १३०

मेघापरिस उदार संत । मनोरथ पुरवितो ।
आलिया शरण मनें वाचा । चालविती त्याचा भार सर्व ।
लिगाड उपाधि तोडिती । सरते करिती आपणामाजी ।
शरण एका जनार्दनी । तारिले जनी मूढ सर्व ।

भावार्थ:

संत हे मेघाप्रमाणे उदार असून मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. काया-वाचा-मनाने शरण आलेल्या भक्ताचा सर्व प्रकारे भार हलका करतात. भक्तांच्या सर्व उपाधी, संकटे दूर करतात. भक्ताला आपल्यासारखे बनवतात. अज्ञानीजनांना मार्गदर्शन करून तारुन नेणाऱ्या गुरूचरणांना एका जनार्दनी शरणागत होतात.

अभंग १३१

जया जैसा हेत । तैसा संत पुरविती ।
उदारपणे सम देणे । नाही उणे कोणासी ।
भलतिया भावे संत-सेवा । करिता देवा माने ते ।
एका जनार्दनी त्याचा दास । पूर्ण वोरस कृपेचा ।

भावार्थ:

प्रत्येक साधकाच्या मनातील हेतु समजून संत तो हेतु पूर्ण करतात. उदारपणे सर्वांना समप्रमाणात, कोणताही दुजाभाव न ठेवता दान देतात. कोणत्याही भावनेने संत-सेवा केली तरी परमेश्वराला ती मान्य असते. एकनाथमहाराज जनार्दनस्वामींचे दास असून ते आपल्यावर पूर्ण कृपेचा वर्षाव करतात असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग 131

संतांचे ठायी नाही द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाचि ।
संतांचे देणे अरि-मित्रा सम । कैवल्याचे धाम उघडे ते ।
संतांची थोरवी वैभव गौरव । न कळे अभिप्राव देवासी तो ।
एका जनार्दनी करी संत-सेवा । परब्रह्म ठेवा प्राप्त झाला ।


भावार्थ:

संतांच्या मनात कोणताही दुजाभाव नाही, त्यांना धनवान आणि निर्धन सारखेच असतात. त्यांना शत्रू आणि मित्र समानच वाटतात. संत म्हणजे मोक्षाचे उघडे द्वार ! संतांचा गौरव हेच त्यांचे वैभव असून तेच त्यांचा थोरपणा, त्याचा ठाव देवांना सुध्दा लागत नाही. एका जनार्दनी म्हणतात, संतसेवेमुळेच त्यांना परब्रह्मज्ञानाचे भांडार प्राप्त झाले.

अभंग 132

संत माय-बाप म्हणता । लाज वाटे बहु चित्ता ।
माय बाप जन्म देती । संत चुकविती जन्म-पंक्ति ।
माय बापा परिस थोर । वेद-शास्त्री हा निर्धार ।
शरण एका जनार्दनी । संत शोभती मुकुट-मणी ।

भावार्थ:

संतांना जेव्हा आपण माय-बाप म्हणतो, तेव्हा मनापासून लाज वाटते. कारण माय-बाप जन्म देतात तर संत जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करतात. वेद-शास्त्र जाणणारे संत मायबापापेक्षा खात्रीपूर्वक श्रेष्ठ आहेत. संत सर्वात मुकुटमण्याप्रमाणे शोभून दिसतात असे एका जनार्दनी म्हणतात.


अभंग १३३


जयाचेनि चरणे तीर्था तीर्थपण । तो ह्रदयी केला साठवण ।
नवल महिमा हरिदासंतसाची । तीर्थे उपजती त्याचे कुशी ।
काशी-मरणे होय मुक्ति । येथे वचने न मरता मुक्ति ।
एका जनार्दनाचे भेटी । सकळ तीर्थे वोळंगती दिठी ।

भावार्थ:

ज्यांच्या चरणस्पर्शाने तीर्थाला पावित्रपणा येतो त्या संतांची ह्रदयात साठवण केली. संतांचा महिमा इतका मोठा आहे की त्यांच्या कुशीतून तीर्थे उगम पावतात. काशी या तीर्थक्षेत्री मरण आल्यास मुक्ति मिळते असे सांगितले जाते, पण संतांच्या गावी न मरताच मुक्तिचा लाभ होतो. एका जनार्दन जेव्हा गुरूंना भेटतात तेव्हा सर्व तीर्थे पायाशी लोळण घेतात असे एका जनार्दनी अभिमानाने सांगतात.

अभंग 134

सर्वांगी सुवास परि तो उगला न राहे ।
सभोवते तरु चंदन करीतचि जाये ।
वैरागर मणि पूर्ण तेजाचा होये ।
सभोवते हरळ हिरे करितचि जाये ।
एका जनार्दनी पूर्ण झालासे निज ।
आपणा सारिखे परी ते करितसे दुजे ।

भावार्थ:

चंदनाचे झाड़ सर्वांगात सुवासाने भरलेले असते. परंतु ते वेगळे न राहता आपल्या सभोवतालच्या वृक्षांना सुगंधित करते. पूर्ण तेजस्वी असा वैरागर मणि जवळपासच्या पाषाणांचे मौल्यवान हिरे बनवतो. एका जनार्दनी म्हणतात आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण असलेले संत आपल्या संगतीने सामान्यांना उन्नत करतात.

अभंग १३५

निवृत्ति शोभे मुकुटाकार । ज्ञान सोपान वटेश्वर ।
विटु पंढरीचे राणे । ल्याले भक्तांची भूषणे ।
गळा शोभे वैजयंती । तिसी मुक्ताई म्हणती ।
अखंड शोभे माझ्या बापा । पदकी तो नामा शिंपा ।
कासे कसिला पीतांबर । तो हा जाणावा कबीर ।
चरणी वीट निर्मळ । तो हा झाला चोखामेळ ।
चरणा तळील ऊर्ध्वरेखा । झाला जनार्दन एका ।

भावार्थ

पंढरीचा विठुराणा आपल्या भक्तांची भूषणे लेऊन विटेवर उभे आहेत अशी सुंदर कल्पना एकनाथमहाराज या अभंगात करतात. विठुरायाच्या मस्तकावर निवृत्ती रूपी मुकट शोभून दिसते आहे आणि गळ्यात मुक्ताई नावाची वैजयंतीमाळ विराजमान झाली आहे. या वैजयंतीमाळेतील मोहक पदक म्हणजे संत नामदेव ! पंढरीरायाने कमरेला बांधलेला रेशमी पीतांबर हेच संत कबीर, विठोबा ज्या विटेवर उभा आहे ती वीट झाली आहे संत चोखामेळा तर चरण तळीची वर जाणारी रेषा म्हणजे संत एकनाथ असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १३६

धर्माची वाट मोडे । अधर्माची शीग चढे ।
तै आम्हा येणे घडे । संसार-स्थिती ।
आम्हा का संसारा येणे । हरिभक्ति नामस्मरणे ।
जड जीव उध्दरणे । नाम-स्मरणे करुनि ।
सर्व कर्म ब्रह्मस्थिति । प्रतिपादाच्या वेदोक्ति ।
हेचि एक निश्चिती । करणे आम्हा ।
नाना मते पाखंड । कर्मठता अति बंड ।
तयाचे ठेंचणे तोंड । हरि-भजने ।
विश्वरूप सृष्टी । अर्जुना दाविली दृष्टी ।
भिन्न भेदाची गोष्टी । बोलू नये ।
एका जनार्दनी । धरिता भेद मनी ।
दुर्हावले येथुनी । निंदक जाण ।

भावार्थ:

जेव्हा धर्माची अवनती होते आणि अधर्माचे प्राबल्य वाढते, तेव्हा संतांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. हरिभक्ति व नामस्मरण या साधनांनी जड जीवांचा उध्दार करणे व वेद वाणीचे प्रतिपादन करून कर्म योगाचे महत्त्व वाढवणे या दोन गोष्टी संताना कराव्या लागतात. नास्तिकता वाढवणारी पाखंडी मते व कर्मठता यांचा हरिभजनाने निरास करण्याचा प्रयत्न करावा लागतो. अर्जुनासारख्या भक्तांना विश्वरुप दाखवण्यासाठी नविन दृष्टी देवून भगवंतानी त्याच्या मनातील सर्व संशय, भेदाभेद नाहिसे केले. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनातले सर्व भेद नाहिसे झाले तर चित्त परमेश्वरी शक्तीशी एकरूप होते आणि निंदक दुरावतात.

21 संतांची लक्षणें

अभंग 137

जे जे बोले तैसा चाले । तोचि वहिले निवांत ।
अंगी असोनि जाणपण । सदा सर्वदा तो लीन ।
निंदा अथवा वंदा । नाही विषम ती बाधा ।
शांतीचा मांदूस । भरला असे सदोदित ।
एका जनार्दनी धन्य । त्याचे दर्शन जग-मान्य ।

भावार्थ:

जो जे बोलतो तसेच वागतो, ज्याच्या मनात कोणतीही चलबिचल नसते त्याचे मन निवांत असते. तो अत्यंत जाणता असूनही विनम्र असतो.कोणाच्या निंदेने अगर स्तुतीने तो विचलित होत नाही. तो शांतीचा मांदूस (पेटी)असतो, ही लक्षणे असलेला संत धन्य असून त्याचे दर्शन सर्वांना प्रिय असते असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग 138

असोनी संसारी आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा ।
नाहीं मानसी तळमळ । सदा शांत गंगाजळ ।
असोनिया अकिंचन । ज्याची वृत्ती समाधान ।
एका जनार्दनी ऐसे थोडे । लक्षामधे एक निवडे ।

भावार्थ:

प्रपंचात अनेक प्रकारची कमतरता असूनही सतत देवाच्या नामस्मरणात रममाण असलेला संत गंगाजळाप्रमाणे शांत असतो. त्याच्या अंतरंगात कोणत्याही गोष्टीची तळमळ नसते. निर्धन (गरीब) असूनही तो समाधानी असतो. एका जनार्दनी म्हणतात, असे भक्त क्वचितच पहावयास मिळतात, लाखामधे एखादाच !

139

मज कोणी न देखावे । मज कोणी नोळखावे ।
मान देखोनिया दृष्टी । पळे देह-उपेक्षा पोटी ।
मी एक लौकिकी आहे । ऐसे कवणा ठावे नोहे ।
ऐसा निरपेक्ष सज्ञानी । एका शरण जनार्दनी ।

भावार्थ:

आपणास कोणी ओळखु नये यासाठी लोकांच्या नजरा चुकवून अलिप्तपणे साधना करणारे काही भक्त असतात. त्यांना मान-सन्मान, आत्म-स्तुती यांची अपेक्षा नसते. आपण सर्व सामान्यांपैकी एक आहोत असे ते मानतात. एका जनार्दनी म्हणतात असे भक्त सज्ञानी असून अत्यंत निरपेक्ष असतात.

अभंग १४०

छळिता न येती रागावरी ।तदाकारी वृत्ति मुराली ।
आप-पर नाही येथे । भेद तेथे नसेचि ।
याती असो भलते परी । एक सरी जगासी ।
एका जनार्दनी भाव अवघिया ठाव एकचि ।

भावार्थ:

काही साधक असे असतात की, त्यांच्या अखंड साधनेमुळे ते परमात्मशक्तीसी एकरुप झालेले असतात. त्यांच्या मनातील सर्व संशय मिटतात आणि भेदाभेद संपून जातात. कोणताही आपपर भाव नसतो. जाती-पातिचा भेद न मानता सर्वांसी समभाव ठेवून वागतात असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १४१

आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा ।
क्रोधाचा थारा अंतरी न ये ।
आपुलेच धन तस्करे नेता जाण ।
जयाचे मन उद्विग्न नव्हे ।
आपुलाचि पुत्र वधोनी जाय शत्रु ।
परी मोहाचा पाझर नेत्री न ये
आपुले शरीर गांजितां पर-नरे ।
परी शांतीचे घर चळो नेदी ।
एका जनार्दनी जया पूर्ण बोधु ।
तोचि एक साधु जगामाजी ।

भावार्थ:

आपली पत्नी व्यभिचारी आहे हे जाणूनही ज्याच्या अंतरात क्रोध निर्माण होत नाही, आपले धन चोराने चोरुन नेले आहे हे लक्षात येऊनही ज्याचे मन विचलित होत नाही, शत्रुने आपल्या मुलाचा वध केला आहे हे समजूनही जो मोहाने शोकाकुल होऊन रडत नाही, परक्या माणसाने आपल्या शरीराला वेदना दिल्या तरी ज्याची मन:शांती ढळत नाही, अशा साधुपुरुषाला पूर्ण बोध झाला असून असा साधु जगामधे एखादाच सापडतो असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १४२

मुखी नाही निंदा-स्तुती । साधु वर्ते जो आत्म-स्थिती ।
राग-द्वेष समूळ गेले । द्वैताद्वैत हारपले ।
घेणे देणे हा पसारा । नाही जयासी दुसरा ।
एका जनार्दनी संत । ज्याचे हृदयी भगवंत ।

भावार्थ:

मुखाने जो कुणाचीही निंदा किंवा स्तुती करत नाही जो स्वत:च्या आत्मस्वरुपात रममाण असतो, ज्याच्या मनातील सर्व राग-द्वेष विलयास गेले आहेत, देण्याघेण्याच्या व्यवहारातून जो अलिप्त झाला आहे. अशा साधुसारखा दुसरा कोणी नाही. एका जनार्दनी म्हणतात, अशा संताच्या हृदयात भगवंताचा निवास असतो.

अभंग १४३

देही असोनि विदेही । चाले बोले सदा पाही ।
असे अखंड समाधी । नसे काही आधि-व्याधी ।
उपाधीचे तोडोनि लाग । देही देहपणे भरले जग ।
एका जनार्दनी संग । सदा समाधान सर्वांग ।

भावार्थ:

जो साधक देहाने या जगात वावरत असला तरी मनाने तो देहातीत असतो आपण देह नसून आत्मतत्व आहोत असा आत्मबोध झालेला असतो. ध्यानयोगाच्या अखंड साधनेमुळे तो सतत समाधी अवस्थेत असतो. त्याला कोणतीही मानसिक अथवा शारिरीक आधि-व्याधी नसते. तो जगातील सामान्य व्यवहारापासून मुक्त असतो तो मनाने संपूर्ण समाधानी असतो असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात.

अभंग १४४

जो वस्तु झाला केवळ । त्याचे अंतर कोमळ ।
भूतमात्री दयाळ । सर्वांपरी भजन ।
जेथे रज तम वसती । तेथे द्वेष लोभ नांदती ।
त्याचे संगे ज्ञान-ज्योती । विझोनि जाय ।
एका जनार्दनी शरण । जेथे शुध्द तत्वाचे प्राधान्य ।
तो वस्तुसी जाय मिळोन । सहजी सहज ।

भावार्थ:

जो भक्त परमेश्वर चिंतनाने ब्रह्मरुप झाला आहे. त्याच्या मनात संपूर्ण प्राणिमात्रांविषयी दयाभाव निर्माण झालेला असतो. त्याचे अंतकरण कोमल भावनेने भरलेले असते. रज, तम गुणांचे उच्चाटन होऊन केवळ सत्वगुणांची वस्ती असते, तेथे द्वेष लोभ यांना थारा नसतो. तेथे केवळ ज्ञानज्योती प्रकाशत असते. या शुध्द ब्रह्मज्ञानामुळे तो ब्रह्मरुपाशी सहज एकरुप होतो असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग 145

ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथे आन नाही विषम ।
ऐसे जाणती ते अति दुर्गम । तयाची भेटी झालिया भाग्य परम ।
एसे कैसियाने भेटती ते साधु । ज्याचा अतर्क्य तर्कवेना बोधू ।
ज्यांसी निजानंदी आनंदु । ज्यांचा परमानंदी उद्बोधु ।
पवना पालवेल पालाण । पायी चढवेल गगन ।
भूतभविष्य कळो येईल वर्तमान । परी त्या साधुचे न कळे महिमान ।
चंद्रामृत सुखे सेववेल । रवि अस्ता जाता धरवेल ।
बाह्या हेळा सागर तरवेल । परी त्या साधूंची भेटी नव्हेल ।
जप, तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता-विवर्जित ज्ञान । ज्ञाना-ध्यानाचे मूळ हे साधूजन ।
निजवृत्तीचा करवेल निरोधु । जीव-शिवाचा भोगवेल आनंदु ।
एका जनार्दनी निज-साधु । त्यांच्या दर्शने तुटे भव-बंधु ।

भावार्थ:

ब्रह्म हे सर्वत्र सलगपणे समप्रमाणात व्यापून राहिलेले आहे. जेथे कोठेहि विषमता नाही हे समजण्यास अत्यंत कठीण असलेले शुध्द तत्व जे जाणतात अशा ब्रह्मज्ञानी साधुंची भेट होणे हे अतिशय भाग्याचे लक्षण आहे. ज्यांचा उपदेश तर्काने जाणतां येत नाही.असे साधू आत्मानंदात निमग्न असतात त्यांचा उपदेश परम आनंद देणारा असतो. या साधुंचा महिमा समजून घेणेसुध्दा सामान्य माणसाच्या कुवती बाहेरचे आहे. कदाचित वाऱ्याला पदरात बांधणे शक्य होईल, पायाने आकाश चढून जाणे शक्य होईल, वर्तमान काळात राहून भूत आणि भविष्याचा वेध घेता येईल, पण या साधुंचा महिमा वर्णन करतात येणार नाही. एखादे वेळी मावळत्या सूर्याला रोकता येईल चंद्राचे शीतल चांदणे सुखाने सेवन करता येईल केवळ दोन्ही हातांनी सागर तरून जाता येईल परंतु या साधुंची भेट होणे संभवत नाही. ध्यानस्थ, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी संपून ध्याता ध्येयाशी समरस होईल. ज्ञाता ज्ञेयाशी एकरूप होऊन ब्रह्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करीत असतांना समजून येईल की हे साधुजन ज्ञान आणि ध्यानाचे मूळस्थान आहेत. असे साधू स्वाभाविक वृतींचा नरोध करून जीवा-शिवाचे ऐक्य घडवून आनंद देणारे आहेत, त्यांच्या केवळ दर्शनाने संसाराची बंधने गळून पडतात असे एका जनार्दनी म्हणतात.

संतांची सेवा हे सर्वोत्तम साधन

अभंग १४६

संताचिये द्वारीं होईन द्वारपाळ ।
न सांगता सकळ करी काम
तेणें माझ्या जीवा होईल समाधान।<br. या परते साधन आणिक नाहीं
शेष उष्टावळी काढीन पत्रावळी ।
पूर्व कर्मा होळी सहज होईल
एका जनार्दनी हे चि मागत ।
नाही दुजा हेत सेवेविण


भावार्थ:

या अभंगात संत एकनाथ संतसेवेचे महत्त्व सांगत आहेत. संतांच्या घराचा द्वारपाळ होऊन त्यांची सर्व कामे केल्याने मनाला समाधान मिळेल. संतांच्या घरच्या उषट्या पत्रावळी काढल्याने पूर्वीच्या संचितकर्माची होळी होईल. एका जनार्दनी म्हणतात, हाताने संतसेवा घडावी एवढीच मागणी आहे. संतसेवेशिवाय अन्य कोणताही हेतू नाही.

अभंग १४७

संताचिये परिवारी । लोळेन मी निर्धारी ।
जीवा होईल महालाभ । ऐसा घडता उद्योग ।
सांडोनिया थोरपण । शिव घाली लोटांगण ।
आपुले महत्त्व । तेथे मिरवु नये सत्य ।
शरण एका जनार्दनी । ओवाळावा जीव चरणी ।

भावार्थ:

संताच्या परिवाराचा सुखेनैव सहवास घडल्याने जीवाला मोठा लाभ होईल. यामुळे शिवशंकर आपला थोरपणा सोडून पायाशी लोळण घेईल. एका जनार्दनी म्हणतात, संतपरिवारात आपला थोरपणा विसरून संतांच्या चरणी जीव ओवाळून टाकावा.

अभंग १४८

संत जाती हरि-कीर्तना । त्यांच्या वाहीन मोचे वहाणा ।
हेचि भवसिंधुचे तारु । तेणे उतरू पैल पार ।
जन्मोजन्मींचे भेषज । ते हे संत-चरण-रज ।
संत-चरणीच्या पादुका । झाला जनार्दन एका ।

भावार्थ:

संत हे संसारसागर तारून नेणारी होडी (तारू) असून त्यांच्या मदतीने भवसिंधु पार करणे सहज शक्य होते. संतांची पायधूळ हे जन्मोजन्मींची दु:खे दूर करणारे औषध आहे. संत जेव्हा हरिकीर्तनाला जातील तेव्हा त्यांच्या चरणांच्या पादुका होईन असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १४९

संतांचिये घरी होईन श्वान-याती ।
उच्छिष्ट ते प्रीती मिळेल मज ।
तेणे या देहाची होईल शुध्दता ।
भ्रम मोह ममता निवारेल ।
आशा-पाश सर्व जातील तुटोनी ।
जीव हा बंधनी मुक्त होय ।
एका जनार्दनी भाकीन करुणा ।
श्री संत-चरणा वारंवार ।

भावार्थ:

संताच्या घरचा कुत्रा बनून राहिल्याने संतानी प्रेमपूर्वक दिलेले उष्टे अन्न खाण्यास मिळेल त्यामुळे देह-शुध्दी होईल. मोह, ममता यांचे निवारण होऊन सर्व प्रकारचा भ्रमनिरास होईल. आशा-पाश तुटून जीव बंधनातून मोकळा होईल. एका जनार्दनी म्हणतात, संतचरणांना वंदन करून त्यांच्या करुणेची वारंवार याचना करावी.

अभंग १५०

संत भलत याती असो । परी विठ्ठल मनी वसो ।
तया घालीन लोळणी । घेईन मी पायवणी ।
भलते ज्ञातीचा । विठ्ठल उच्चारी वाचा ।
तेथे पावन देह चारी । एका जनार्दनी निर्धारी ।

भावार्थ:

ज्याच्या मनात विठ्ठलभक्ती आहे असा संत कोणत्याही जातीचा असला तरी तो वंदनीयच आहे. विठ्ठलाचे नामस्मरण करणारा संत कोणत्याही जातीचा असला तरी त्याचे स्थूल, सुक्ष्म, कारण, महाकारण हे चारी देह नामजपाने पावन झालेले असतात. त्यांच्या पायाशी लोळण घ्यावी असे एका जनार्दनी खात्रीपूर्वक सांगतात.

अभंग १५१

तुम्ही संत जन । माझे ऐका हो वचन ।
कृपा करा मजवरी । एकदा दाखवा तो हरि ।
आहे तुमचे हाती । म्हणोनि येतो काकुळती ।
एका जनार्दनी म्हणे थारा । संती द्यावा मज पामरा ।

भावार्थ:

या अभंगात संत एकनाथ संतांना विनंती करीत आहेत की संतांनी कृपा करून एकदा तरी हरिदर्शन घडवावे. कारण ते त्यांना सहज शक्य आहे. हरी संतांच्या भक्तीचा भुकेला आहे. एका जनार्दनी म्हणतात, संतानी आपल्या पायाशी आसरा द्यावा अशी काकुळतीची याचना आहे.

==== संतसंगतीचा एकनाथांस आलेला अनुभव ====

अभंग १५२

संत-संगतीने झालें माझें काज । अंतरी ते निज प्रगटले ।
बरवा झाला समागम । अवघा निवारिला श्रम ।
दैन्य दरिद्र्य दूर गेले । संत-पाउले देखता ।
एका जनार्दनी सेवा । करीन मी आपुल्या भावा ।

भावार्थ:

संतकृपेने अंतरंगात हरिचे रूप प्रगट झाले. मनीचा हेत पूर्ण झाला. ही जिवा-शिवाची भेट फारच सुखदायक झाली. सर्व परिश्रमाचे निवारण झाले. संतांच्या चरण-दर्शनाने अवघे दैन्य, दारिद्र्य लयास गेले. एका जनार्दनी म्हणतात, अत्यंत भक्तिभावाने संताची सेवा करावी.

१५३

कैवल्य-निधान तुम्ही संत जन । काया वाचा मन जडले पायी ।
सर्व भावे दास अंकित अंकिला । पूर्णपणे झाला बोध देही ।
जे जे दृष्टी दिसे ते ते ब्रह्मरूप । एका जनार्दनी दीप प्रज्वळला ।

भावार्थ:

संतजन मोक्षप्राप्तीचे सर्वोतम साधन आहे, ते कैवल्य-निधान म्हणून ओळखले जातात. देहाने मनाने व वाचेने साधक संतांशी जोडले जातात. जे जे दृष्टीला दिसते ते ते सर्व ब्रह्मरूप आहे असा संपूर्ण बोध होऊन अंतरात ज्ञानदीप प्रकाशित होतो. या अपूर्व लाभाने साधक संताचा कायमचा दास बनतो.

अभंग १५४

धन्य दिवस झाला । संत समुदाय भेटला ।
कोडे फिटले जन्माचे । सार्थक झाले पै साचे ।
आजि दिवाळी दसरा । संत-पाय आले घरा ।
एका जनार्दनी झाला । धन्य दिवस तो माझा ।

भावार्थ:

संतांचा समुदाय भेटल्याने मनातले सर्व संशय विलयास गेले. मनुष्य देहाचे सार्थक झाले. आजचा दिवस धन्य झाला कारण संतांचे पाय घराला लागले. जनार्दनस्वामींनी एकनाथांचा शिष्य म्हणून स्विकार केला.घरात दिवाळी, दसरा साजरा झाला असे एका जनार्दनी म्हणतात.

155

केला संती उपकार । दिधले घर दावूनी ।
न ये ध्यानी मनी लक्षी । तो प्रत्यक्षी दाविला ।
संकल्पाचे तोडिले मूळ। आले समूळ प्रत्यया ।
एका जनार्दनी कृपावंत । होती संत सारखे ।

भावार्थ:

ज्या परमेश्वराचे रुप ध्यानाने, मनाने, बुध्दीने प्रयत्न करूनही दिसत नाही त्या विठ्ठलाचे घर दाखवून तो प्रत्यक्ष डोळ्यांना दाखवला हे संतांचे फार मोठे उपकार आहेत. मनातला संकल्प फळास आला. एका जनार्दनी म्हणतात, सर्व संत सारखेच कृपावंत असतात.

अभंग १५६

मोकळे ते मन ठेविले बांधूनि । जनार्दन-चरणी सर्व भावे ।
स्थिर मती झाली वार्ता तेहि गेली । द्वैताची फिटली सर्व सत्ता ।
एका जनार्दनी धन्य संतसेवा । उगविला गोवा गुंतत सर्व ।

भावार्थ:

मोकाट भटकणारे मोकळे मन सद्गुरू जनार्दनस्वामींच्या चरणाशी बांधून ठेवले. सर्वभावे त्यांना शरण गेल्याने बुध्दी गुरुचरणांशी स्थिर झाली. मनातील द्वैतभाव विलयास गेला. मनातील संशयाचा गोंधळ निमाला. एका जनार्दनी म्हणतात, संतसेवेमुळेच हे सर्व घडून आले. संतसेवा धन्य होय.


अभंग 157

संत-द्वारी कुतरा झालो । प्रेम-रसासी सोकलो ।
भुंकत भुंकत द्वारा आलों। ज्ञान-थारोळ्या बैसलो ।
कुतरा भुंकत आला हिता । संती हात ठेविला माथा ।
कुत्रा गळ्याची साखळी । केली संतांनी मोकळी ।
एका जनार्दनी कुतरा । दात पाडुनी केला बोचरा ।

भावार्थ:

संत एकनाथ सांगतात, कुत्रा होऊन भुंकत भुंकत संताच्या दाराशी आलो. संताच्या ज्ञानरुपी थारोळ्यात (डबक्यात) बसून प्रेमरसाचे प्राशन केले. आपल्या हितासाठी याचना करीत असतांना संतानी कृपा करुन मस्तकावर हात ठेवला आणि गळ्याची साखळी मोकळी केली. याचना करणारे तोंड दात पाडून बोचरे केले. येथे एका जनार्दनी आपली गुरुनिष्ठा व विनयशीलता प्रकर्षाने प्रकट करीत आहेत.

गुरु-भक्ति

अभंग 158

मनोभाव जाणोनि माझा । सगुण रुप धरिलें वोजा
पाहुणा सद्गुरू-राजा। आला वो मायें
प्रथम अंत:करण लाभ । चित्त शुध्द आणि मन
चोखाळोनि आसन। स्वामींनी केलें
अनन्य आवडीचे जळ । प्रक्षाळिलें चरण-कमळ
वासना समूळ । चंदन लावी
अहं जाळियेला धूप। सद्भाव उजळिला दीप
पंच प्राण हे अमूप । नैवेद्य केला
एका जनार्दनी पूजा । देव भक्त नाहीं दुजा
अवघा चि सद्गुरु-राजा होवोनी ठेला

भावार्थ:

शिष्याचे मनोगत सद्गुरूंनी जाणून घेतले आणि सगुण रुपाने साकार झालें. सद्गुरु-राजा पाहुणा होऊन घरासी आला असून त्यांच्या कृपेनें अंत:करण म्हणजे चित्त व मन शुध्द झाले.या निर्मळ अंतकरणांत स्वामींनी आपले आसन स्थिर केलें गंगाजला सारख्या पवित्र जलानें सद्गुरुंचे चरण धुतले. वासना रुपी चंदनाचे खोड उगाळून त्याना चंदनाचा टिळा लावला.अहंकार रुपी धूप व सद्भावनेचा दीप प्रज्वलित केला.प्राण,आपान, व्यान उदान,समान या पंच-प्राणांचा नैवेद्य केला.अशा प्रकारे सद्गुरुंची षोडपोचारे पूजा केली,असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,देव व भक्त यांमध्ये द्वैत नसून सद्गुरू हेच देवता रुप आहेत यांत संशय नाही.

अभंग १५९

श्रीगुरुंचे नाम-मात्र । तेचि आमुचे वेदशास्त्र |
श्रीगुरुंचे चरण-रज । तेणे आमुचे झाले काज |
श्रीगुरुंची ध्यान-मुद्रा । तेचि आमुची योग-निद्रा |
एका जनार्दनी मन । श्रीगुरु-चरणी केले लीन |

भावार्थ:

श्रीगुरुंचे नाम हेच शिष्यांचे वेदशास्त्र असून सद्गुरुंच्या चरणाची धूळ मस्तकी धारण केल्याने शिष्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. श्रीगुरुंच्या प्रतिमेवर ध्यान लावून उपासना करणे हीच शिष्याची योग-निद्रा होय असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरुंच्या चरणी मनाला सर्वार्थाने लीन केल्याने योग-निद्रेचा अपूर्व अनुभव मिळाला.

अभंग १६०

गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु |
देव तयाचा अंकिला । स्वये संचला त्याचे घरा |
एका जनार्दनी गुरु देव । येथे नाही बा संशय |

भावार्थ:

गुरु हाच प्रत्यक्ष परमेश्वर आहे असा ज्याचा दृढ विश्वास असतो त्याच्यावर परमेश्वराचा विश्वास असतो. देव त्याचा अंकित असतो. देव स्वत: हा त्याच्या घरच्या पाहुणा म्हणून येतो. सद्गुरू जनार्दनस्वामी परमेश्वराचे रूप आहेत याबाबत कोणताही संशय नाही असे एका जनार्दनी नि:संशयपणे सांगतात.


अभंग १६१

सेवेची आवडी । आराम नाही अर्ध घडी |
नित्य करिता गुरु-सेवा । प्रेम पडिभर होत जीवा |
आळस येवोचि सरला । आराणुकेचा ठावो गेला |
तहान विसरली जीवन । भूक विसरली मिष्टान्न |
ऐसे सेवे गुंतले मन । एका जनार्दनी शरण |

भावार्थ:

गुरुसेवेची मनात आवड निर्माण झाली की अर्धा ताससुध्दा आराम करावा असे वाटत नाही. सतत गुरुसेवेत गुंतलेल्या मनात गुरुविषयीचा प्रेमभाव वाढत असून आळस कायमचा पसार होतो. आराम करण्याची इच्छाच होत नाही, तहान, भूकेची जाणिवच होत नाही. गुरुसेवेत अशारितीने मन एकाग्र होते, असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १६२

येवढे जया कृपेचे करणे । रंक राजेपणे मिरवती |
तो हा कल्पतरु गुरु जनार्दन । छेदी देहाभिमानु भव कंदु |
कृपेचे गोरसे धावे कामधेनु । तैसा माझा मनु देखलासि |
एका जनार्दनी तया वाचुनि कही । दुजे पाहणे नाही मनामाजी |

भावार्थ:

सद्गुरू जनार्दनस्वामी इच्छिलेले फळ देणारे कल्पतरु असून त्यांनी देहाभिमान समूळ नाहीसा करुन भव-बंधने छेदून टाकावित. संतकृपेने रंकाचा राजा बनतो. सद्गुरू जनार्दनस्वामी हे कामधेनु असून त्यांच्या कृपारुपी गोरसासाठी मनाला वेध लागला आहे. स्वामींच्या कृपाप्रसादाशिवाय कोणत्याही इतर वासना मनात नाही असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १६३

साधावया परमार्था । साह्य नव्हेती माता-पिता |
साह्य नव्हेती व्याही जावुई । आपणा आपण साह्य पाही |
साह्य सद्गुरू समर्थ । तेचि करिती स्व:हित |
एका जनार्दनी शरण । नोहे एकपणा वाचून |

भावार्थ

परमार्थ साधण्यासाठी आई-वडील, व्याही, जावई यापैकी कुणाचेही साह्य होत नाही. आपणच आपले साह्यकारी असतो. परमार्थात सद्गुरूच समर्थपणे मदत करु शकतात. तेच आपले हित करु शकतात. एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूचरणी एकनिष्ठपणे शरणागत होण्यानेच परमार्थ साधणे शक्य आहे.

अभंग १६४

दासा दु:ख झाले फार । वेगी करा प्रतिकार |
पुण्य-स्थान मी पावलो । गुरु-चरणी विश्रामलो |
कर जोडूनिया सिर । ठेवियेले पायांवर |
जन्म-नाम जनार्दन । मुखी गुरु-अभिमान |

भावार्थ:

संत एकनाथ म्हणतात, सद्गुरू जनार्दनस्वामींच्या पुण्यपावन नगरात येऊन गुरुचरणांचा आश्रय घेतला, दोन्ही कर जोडून चरणांवर मस्तक ठेवले. स्वामींवर पूर्णपणे विसंबून दासाच्या दु:खाचा प्रतिकार करण्याची काकुळतीने विनंती केली.

अभंग १६५

जन्मोजन्मीचे संचित । गुरु-पायी जडले चित्त |
ते तो सोडिल्या न सुटे । प्रेम-तंतू तो न तुटे |
दु:खे आदळली वरपडा । पाय न सोडा हा धडा |
एका जनार्दनी निर्धार । तेथे प्रगटे विश्वंभर |

भावार्थ:

अनेक जन्मांचे साचलेले पुण्य-कर्म फळास आले आणि गुरु-चरणांशी चित्त (मन) जडले. प्रयत्न करुनही आता ते गुरुचरणांपासून अलग होणार नाही, हा प्रेमाचा धागा तुटणार नाही. कितीही दु:खे कोसळली तरी गुरु-चरण सोडणार नाही असा मनाचा निश्चय असून गुरुचरणीच विश्वंभर प्रगट होईल असा विश्वास एका जनार्दनी प्रगट करतात.

अभंग १६६

जय जय वो जनार्दने विश्वव्यापक संपूर्ण वो |
सगुण अगुण विगुण पूर्ण पूर्णानंदघन वो |
ब्रह्मा विष्णु रुद्र निर्माण तुजपासोनी वो |
गुण-त्रय उभय-पंचक तूचि अंत:करणी वो |
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या उन्मनी हे स्थान वो |
विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा तू संपूर्ण वो |
त्वंपद तत्पद आणिक असिपद ते तू एक वो |
नसोनि एकपणी एका एकी जनार्दन वो |

भावार्थ:

सद्गुरू जनार्दनस्वामी प्रत्यक्ष परमेश्वराचे रूप असून ते संपूर्ण विश्वव्यापक आहेत. ते सगुण, निर्गुण या दोन्ही विशेष रुपाने अस्तित्वात असून आनंदमय आहेत. ब्रह्मा, विष्णु, महेश ही सद्गुरुंची वेगवेगळी रूपं आहेत. सत्व, रज, तम, पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये या सर्वांच्या अंतर्यामी सद्गुरूरुपच अवस्थित आहे. सावधानता, स्वप्नावस्था, गाढ झोप, साक्षात्कारी व मनाची उदात्तता या सर्व अवस्थांचा सद्गुरू साक्षीदार आहे. सद्गुरू विश्वरूप, स्वयंप्रकाशी, सर्वज्ञानी असून चैतन्यरुपाने सर्वात्मक आहेत.अहम्, त्वम् व तत्पदाने सद्गुरू सर्वांच्या चित्तात विराजमान आहेत. सद्गुरू जनार्दन व एका जनार्दनी देहाने वेगळे दिसले तरी आत्मरुपाने ते एकरुपच आहेत असे एका जनार्दनी म्हणतात.

१६७'

रामाईवो । सीतेकारणे रामे रावण वधिलियो |
देवगण सोडून सुखी केलीयो |
कृष्णाईवो देवकी बंदीशाळे त्याकारणे धावलीयो |
धरुन लीला कंसमामासी मारलीयो |
बोधाईवो | भक्तिभाव देखुनी तिष्ठत भीमातीरीयो |
पुंडलीकाकारणे सकळ जग उधादरिलीयो |
एका जनार्दनी देखिलीयो | आई वैदीण प्रसन्न झालीयो | सकळ सुख देखलियो |

भावार्थ

या भजनात संत एकनाथ राम-कृष्ण लीलांचे वर्णन करतात. सीतेसाठी श्रीरामांनी रावणाचा वध करून सर्व देवांची रावणाच्या बंदीवासातून सुटका केली. श्रीकृष्णाने आपल्या देवकीमातेची कंसाच्या बंदीशाळेतून सुटका करण्यासाठी कंसमामाचा वध केला. पुंडलिकाचा भक्तिभाव पाहून त्याच्यासाठी भीमा नदीच्या तीरावर अठ्ठावीस युगे तिष्ठत उभा राहून सकळ जगाचा उध्दार केला. एका जनार्दनी म्हणतात, आई जगदंबा प्रसन्न झाल्याने सर्व सुख प्राप्त झाले.

भक्ति-योग

परमेश्वर-स्तवन

१६८

सुंदर ते ध्यान मांडिये घेउनी | कौसल्या जननी गीती गाये |
सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी । गोपाळ गौळणी खेळताती |
सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी । पुंडलिका पाठी, उभे असे |
सुंदर ते ध्यान एका जनार्दनी । जनी वनी मनी भरलासे |


भावार्थ

अत्यंत मोहक अशा रामाला मांडीवर घेऊन कौसल्यामाता गीत गाते. मनमोहन बालकृष्ण नंद राजाच्या अंगणात गोपाळ, गोपिकांबरोबर खेळ खेळतो. सर्वांगी सुंदर असा श्रीकृष्णभक्त पुंडलिकासाठी चंद्रभागेच्या तटावर उभा राहिला आहे. एका जनार्दनी म्हणतात, हाच परमेश्वर विश्वातील सकळ लोकात, सर्व वनस्पतींमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात भरून राहिला आहे.

'१६९

वेद जया लागलं नित्य वाखाणिती । तो हा वेदमूर्ति पांडुरंग |
रवि-शशी दीप्ति जेणे प्रकाशती । तो हा तेजोमूर्ति पांडुरंग |
पांचा भूतांची जो करितो झाडणी । तो ज्ञान-खाणी पांडुरंग |
राजा त्रैलोक्याचा गुरुराज स्वामी । वसे अंतर्यामी पांडुरंग |
प्रभा हे जयाची पसरली जनी । चि ची खाणी पांडुरंग |
परोपकारी लागी अवतार केला । आनंदाचा झेला पांडुरंग |
नेई भक्तांसी जो आपल्या समीप । तो हा मायबाप पांडुरंग |
इतिकर्तव्यता हेचि दास लागी । सेवावा हा जगी पांडुरंग |
एका जनार्दनी देह हरपला । होउनी राहिला पांडुरंग |

भावार्थ

सामवेदासह चारही वेद ज्याचे नित्य स्तवन करतात असा हा पांडुरंग वेदमूर्ती म्हणुन पुजला जातो. सूर्य,चंद्र या ज्योती प्रकाशित करणारा पांडुरंग तेजोमूर्ती म्हणुन ओळखला जातो. पृथ्वी,आकाश,जल,अग्नी,वायु या पाचही महाभूतांवर ज्याची सत्ता आहे असा पांडुरंग ज्ञानाची खाण असून तो स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांचा गुरुराज स्वामी आहे. असा हा पांडुरंग सर्वांच्या अंतरंगी वसत असल्याने त्याची प्रभा सर्वत्र व्यापून राहिली आहे आणि जगत्-जन याच पांडुरंगाच्या रुपाने नटले आहे. सामान्य लोकांच्या उध्दारासाठी पांडुरंग अनेक अवतार धारण करतो. एकनिष्ठ भक्तांना वैकुंठात स्थान देवून चिरंजीव करतो. असा हा पांडुरंग प्रेमळ भक्तांचा मायबाप बनून त्यांना आनंदी करतो, अशा पांडुरंगाचे दास होऊन सेवा करण्यातच जीवनाची सार्थकता आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अनन्य भक्त पांडुरंगाशी एकरुप होऊन पांडुरंगच होतो.

१७०

विश्व पाळिताहे हरि | दासा केवी तो अव्हेरी |
नव मास गर्भवास | नाही भागला आम्हांस |
बाळपणी वाचविले | स्तनी दुग्ध ते निर्मिले |
कीटक-पाषाणात असे | त्याचे मुखी चारा असे |
धरा धरा हा विश्वास | एका जनार्दनी त्याचा दास |

भावार्थ

जो पांडुरंग विश्वाचे पालन करतो, तो आपल्या भक्तांकडे दुर्लक्ष करणार नाही. नऊ महिन्यांच्या गर्भवासात सांभाळ करतो, बाळपणी पोषण करण्यासाठी दुधाची सोय करतो. पाषाणात वसत असलेल्या बेडकीसाठी जो चारा पुरवतो, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा असे एका जनार्दनी सांगतात.

१७१

चरणांची थोरी । जाणे गौतम-सुंदरी |
हृदयाची थोरी । भक्त जाणती परोपरीने |
करांची ती थोरी । जाणे सुदामा निर्धारी |
सम-चरणींची शोभा । एका जनार्दन उभा |

भावार्थ

श्री रामाच्या चरणांची थोरवी गौतम ऋषीची पत्नी पतिव्रता अहिल्याच जाणू शकते.ऋषींच्या शापाने पाषाण बनलेली अहिल्या रामाच्या केवळ पद-स्पर्शाने शाप-मुक्त होते. परमेश्वराच्या हृदयाची थोरवी भक्त प्रल्हाद, ध्रुव, पुंडलिक या सारखे प्रेमळ भक्तच समजू शकतात.मित्र सुदाम्याची नगरी सुवर्णाची करणाऱ्या श्री हरिच्या हातांची थोरवी केवळ सुदामा च जाणू शकतो.विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या सम-चरणांची शोभा केवळ एका जनार्दनच अनुभवू शकतात.

172

चरण वंदिती कां निंदिती । ते हि हरिपदा जाती
चरण वंदितां तरली शिळा। निंदिता तारिलें शिशुपाळा
ऐसे चरणांचे महिमान । एका जनार्दनी शरण

'भावार्थ

परमेश्वराच्या चरणांना वंदन करणारे एकनिष्ठ भक्त जसे परमेश्वराच्या समीप राहाण्याचा मान मिळवतात तसेच देवाची निंदा करणारे सुध्दां सलोकांत जातात. श्रीरामाच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करणारी अहिल्या राघवाने शाप -मुक्त केली. शिशुपाळ सतत श्री कृष्णाचा द्वेष करीत असे ,पांडवांच्या राजसूय यज्ञ-प्रसंगी गवळ्याचा पोर असे संबोधून श्री कृष्णाला भर-सभेंत अपमानित केले. अखेर शंभर अपराधा नंतर श्री कृष्णाने शिशुपालाचा सुदर्शन चक्राने वध केला परंतू शिशुपाल ही मुक्ती चा अधिकारी झाला.एका जनार्दनी परमेश्वराच्या चरणांचे महिमान वर्णंन करतात.

173

बहुतांची मतांतरे तीं टाकुनी । विठ्ठल-चरणी बुडी दे का
नव्हे तुज बाधा काळाची आपदा। ध्याई तूं गोविंदा प्रेम-भरित
जनार्दनाचा एका लिहून चरणी। बोलतसे वाणी करुणा-भरित

भावार्थ

जगांत अनेक भिन्न भिन्न स्वभावाचे लोक असतात त्यांची मते, विचार भिन्न असणे स्वाभाविक आहे.या मत -भिन्नतेकडे दुर्लक्ष करून विठ्ठल भक्तिंत दंग होऊन राहिल्यास कोणतिही संकटे ,काळाची बाधा भेडसवणार नाहीत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,भक्ती-प्रेमाने गोविंदाचे ध्यानांत मग्न व्हावे.

174

निवांत श्रीमुख पहावें डोळे भरी ।
तेथें नुरे अंतरी इच्छा कांही
चरणीं ते मिठी घालावें दंडवत।
तेणें पुरे आर्त सर्व मनीचे
हृदय-कमळीं पहावा तैसा ध्यावा।
एका जनार्दनी विसांवा सहज चि

भावार्थ

निवांतपणे बसून श्री हरीचे मुख डोळे भरून पहावें या दर्शनाने मनातील सर्व वासना लोप पावतात.श्री हरीला दंडवत घालून चरणांना मिठी घातली की, मनातील सर्व कामना पूर्ण होतात.अंतरंगात दडलेल्या श्री मुर्तीचे ध्यान करतांना मनाला सहजपणे विसावा प्राप्त होईल असे एका जनार्दनी सांगतात.

175

राम हें माझ्या जीवींचे जीवन । पाहतां मन हें झालें उन्मन
साधन काही नणें मी अबला । श्याम हें बीज बैसलेंसे डोळां
लोपली चंद्र सूर्याची कळा। तो माझा राम जीवींचा जिव्हाळा
प्रकाश दाटला दाही दिशा। पुढें हो मार्ग न दिसे आकाशा
खुंटली गति श्वासा -उच्छवासा। तो राम माझा भेटेल कैसा
यांसी हो साच परिसा कारण। एका जनार्दनी शरण तरी च साधन

भावार्थ

सावळ्या श्री रामाची मूर्ती पाहातांना ती डोळ्यांत रुतून बसली.राम-मुर्तीच्या प्रभेने चंद्र सूर्याचा प्रकाश लोपून गेला.राम-मुर्तीची प्रभा दाही दिशांत व्यापून राहिली.आकाशातिल पुढील मार्ग दिसेनासा झाला.श्वासाची गती खुंटली. श्री राम हा साधकांच्या जीविचा विसावा असून त्याच्या दर्शनानें मनाचे उन्मन होते.मन व्यवहारिक पातळीवरुन पारमार्थिक पातळीवर स्थिर होते. राम-भेटीची आस लागते.एका जनार्दनी म्हणतात,राम-चरणी संपूर्ण शरणागती हे च एकमेव साधन आहे.त्यां मुळे मनाची तळमळ शांत होईल.


176

कृष्णा धांव रे लवकरी । संकट पडलें भारी
हरि तूं आमुचा कैवारी । आलें विघ्न निवारी
आजि कां निष्ठुर झालासी होईल बा गति कैसी
अनाथ मी देवा परदेशी । पांव तूं वेगेसीं
आतां न लावी उशीर । अनर्थ करील फार
एवढा करीं उपकार । दे दर्शन सत्वर
कंठ शोषला अनंता । प्राण जाईल आतां
पदर पसरितें अच्युता । पाव रुक्मिणी -कांता
ऐकुनी बहिणीची करुणा । आला यादव -राणा
द्रौपदी लोळत हरि-चरणा । एका जनार्दना

भावार्थ

येथे एका जनार्दनी द्रौपदी वस्त्र हरणाच्य प्रसंगाचे वर्णन करतात.या प्रसंगी द्रौपदीने केलेला कृष्णाचा धांवा करूण-रसाने भरला आहे.आपण भयंकर मोठ्या संकटांत सापडलो असून हे विघ्न निवारण करण्यासाठी श्री हरीने सत्वर धावून यावे कारण हरि आपला कैवारी असून अनाथ एकाकी पडलेल्या बहिणीसाठी त्यानें वेगाने धाव घ्यावी अशी कळकळीची विनंती द्रौपदी करीत आहे.कंठ शोषला असून प्राण जाईल अशी व्याकूळ अवस्था झाली आहे.आता उशीर केल्यास फार मोठा अनर्थ घडून येईल,या प्रसंगी निष्ठुर न होतां,अच्युताने त्वरेने येऊन उपकार करावा अशी पदर पसरून विनंती केली आहे.बहिणीची करुणा येऊन दयाघन यादव-राणा धावत आला आणि द्रौपदीने हरि-चरणाशी लोळण घेतली.

177

तें मन निष्ठुर कां केलें । जें पूर्ण दयेनें भरलें
गजेंद्राचे हाके सरिसे । धांवुनियां आलें
प्रल्हादाच्या भावार्थासी । स्तंभी गुरगुरलें
पांचाळीच्या करुणा-वचने । कळवळूनी आलें
एका जनार्दनी पूर्ण कृपेनें ।निशिदिनी पदीं रमले

भावार्थ

परमेश्वराचे मन कृपेने,कारुण्याने पूर्णपणे भरलेलें आहे,याची अनेक वेळां प्रचीती आली आहे.जेव्हां गजेंद्राचा पाय मगरीने पकडून त्याला पाण्यांत ओढून नेवू लागली तेंव्हा प्राणांतिक वेदनेनें संकटात सापडलेल्या गजेंद्राने श्री हरिची प्रार्थना केली असतां श्री कृष्णाने धावत येऊन गजेंद्राची सुटका केली.प्रल्हादाचा भक्तिभाव जाणून नरसिंह रुपाने खांबातून प्रगट होऊन हिरण्यकश्यपू नावाच्या दैत्याचा वध केला.द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगी पांचाळीचा करुणेचा धांवा ऐकून कळवळले आणि मदतीसाठी धावून आले.एका जनार्दनी म्हणतात,सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पूर्ण कृपेने मन प्रेम-भक्तिने रात्रं-दिवस प्रभू-चरणीं रममाण झाले.

178

भजन नाहीं मी अकर्मी वायां।अभिनव अवगति झाली देवराया
नीचा नीच मीचि एक। मजवरी उपरी वर्ते सकळ लोक
अंधा अंध अधोगत पाहीं । मजहूनि अंध कोणी नाहीं
एका जनार्दनी नीच हा गेला। मुंगियेचे पायी सगळा सामावला।

भावार्थ

जो मनुष्य जन्माला येऊन परमेश्वराचे भजन करीत नाही तो कर्म न करणारा कर्म-करंटा समजला जातो.ही माणसाची अधोगती आहे. तो सर्वांत नीच पातळीवर असतो.त्याच्यापेक्षा सर्व लोक उच्च पातळीवर असतात.अज्ञानी व्यक्ती इतरांना अज्ञानी समजते.परंतू त्याच्या पेक्षा अज्ञानी कोणी नाही हे त्याच्या लक्षात येत नाही.एका जनार्दनी विनयाने आपली गणना अशा अज्ञानी लोकांमध्यें करतात.

179

आनंदाचा भोग घालीन आसनी। वैकुंठ-वासिनी तुझे नांवे
येई वो विठ्ठल अनाथांचे नाथें । पंढरी -दैवते कुळ-देवी
आपुलें म्हणावे सनाथ करावें।एका जनार्दनी वंदावें संत-जना ।

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ आपण अनाथ असून वैकुंठवासी विठ्ठलाने आपणास साथ करावें अशी प्रार्थना करीत आहेत. पंढरीच्या या कुल-देवीने या भक्तास आपलेसे केल्यास ही पंढरी आनंदाने भरुन टाकीन असे एका जनार्दनी म्हणतात.

180

मागणें हें चि माझें देवा । दुजेपण दुरी ठेवा
मी-तूं ऐसी नको उरी । जनार्दना कृपा करीं
रंक मी एक दीन । माझें करावें स्मरण
नीच सेवा मज द्यावी । एका जनार्दनी आस परवावी

भावार्थ

या भजनांत एका जनार्दनी देवाला प्रार्थना करतात कीं,देव व भक्त यां मध्ये दुजेपणा,मी-तू पणा असा द्वैतभाव नसावा.गुरु-कृपेनेच परमेश्वराशी अद्वैत साधणे शक्य होईल अशी श्रद्धा असल्याने संत एकनाथ सद्गुरू कडे याचना करतात,आपण अत्यंत दीन-दुबळे असून स्वामींनी कोणत्याही प्रकारची नीच सेवा देऊन उपकृत करावे.आपली आठवण ठेवून मनाची आस पुरवावी.

181

जेथे जेथें मन जाईल वासना। फिरवावें नारायणा हें चि देई
वारंवार द्यावा नामाचा आठव। कुबुध्दीचा ठाव पुसा सर्व
भेदाची भावना तोडावी कल्पना। छेदावी वास-समूळ कंद
एका जनार्दनी नको दुजा छंद । राम कृष्ण गोविंद आठवावा

भावार्थ

ज्या ज्या ठिकाणी मनाची वासना जाईल तेथून ती परत फिरवावी एव्हढी एकच मागणी एका जनार्दनी नारायणाकडे करीत आहेत. वारंवार नामाची आठवण द्यावी, भेदाची भावना तोडून वाईट वासना समूळ नाष्ट करावी राम कृष्ण गोविंदा शिवाय मनाला दुसरा कोणताही छंद नसावा आशी ईच्छा एका जनार्दनी येथें व्यक्त करतात.

182

सर्वा भूतीं तुझे रूप। हृदयी सिध्द चि स्वरूप
इतुलें देई अधोक्षजा । नाही तरी घोट भरीन तुझा
सकळांहूनी करी सान। सकळिका सम समान
नि:शेष दवडोनिया स्वार्थ । अवघा करी परमार्थ
एका जनार्दनी मागे। नाही तरी घाला घालीन अंगे

भावार्थ

सर्व प्राणिमात्रांच्या अंतरंगी परमात्म्याचे रुप विराजमान आहे याची जाणीव सतत हृदयांत जागृत राहू द्यावी अशी अपेक्षा संत एकनाथ येथे व्यक्त करतात.सर्वच सजींवांवर सारखीच कृपा-दृष्टी ठेवावी,मनातील स्वार्थीपणाची भावना नाहिशी करून सर्वांना परमार्थी करावें,अशी निर्वाणिची मागणी एका जनार्दनी श्री हरीच्या (अधोक्षज) चरणांशीं करीत आहेत.

183

तुज सगुण जरी ध्याऊं तरी तूं परिमाण होसी
तूज निर्गुण जरी ध्याऊं तरी तू लक्षा न येसी
सात चि वेद-पुरुषा न कळसी श्रृती -अभ्यासेंसीं
तो तूं नभाचा जो साक्षी शब्दीं केवीं आतुडसी
जय रामा रामा सच्चिदानंद रामा
भव-सिधु-तारक जय मेघ-श्यामा
अनंत-कोटी-ब्रह्मांडधीशा अनुपम्य महिमा
अहं सोनं ग्रासून हें तों मागतसे तुम्हां
अष्टांग योगे शरीर दंडुनी वायुसी झुंज घेऊं
तेथें बहुसाल अंतराय तयाचा येतसे भेऊ
कर्म चि जरीं आचरूं दृढ धरूनियां बाहो
तेथें विधि - निषेधाचा मोठा अंगीं वाजतसे धावो
जनीं जनार्दन प्रत्यक्ष डोळां कां न दिसे यासी
समताहंकृती योगी बुडविती साधन आश्रमासी
एका जनार्दनी सिध्द साधन कां न करिसी
सांडी मांडी न लगे मग तूं अवघा राम चि होसी

भावार्थ

परमेश्वराचे सगुण रुपांत ध्यान करावे तर तो विश्व-व्यापी परमेश्वर एकदेशी बनून स्थळ-काळानें मर्यादित होतो. निर्गुण रूपांत ध्यान करीत असतांना रुप डोळ्यांना अगोचर असल्याने ध्यानात येत नाही.याच कारणाने वेदांना आणि श्रुतींना परमेश्वराचे रूप अगम्य आहे.जो परमात्मा अनंत आकाशाचा साक्षी आहे त्याचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे.अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायकाचा महिमा वर्णनातित आहे.अष्टांग योगाच्या अभ्यासाने किंवा कर्मयोगाचे नियमित आचरण करूनही या परम तत्वाचा वेध घेता येत नाही. एका जनार्दनी म्हणतात,या सर्व अवघड मार्गांनी जाण्यापेक्षा भक्ती-मार्गाचा अंगीकार करणे सुलभ आहे.राम-नामाचा जप करता करता भक्त देव बनतो.सत् चिदानंद ,भवतारक मेघश्याम रामाचे नाम च सिध्द-मंत्र आहे.


184

जय गोविंदा परमानंदा ऐक माझे बोल
निर्गुणरूपे असतां तुझें कांहीं च नव्हे मोल
मग तूं माया धरूनि अति झालिसी सबळ
नसतें देवपण अंगीं आणुनि चाळविसी केवळ
नसतां तुज मज भेद देवा लटिके जीवपण देसी
आपुलें ठाईं थोरपण आणुनी आमुची सेवा घेसी
नसती अविद्या पाठीं लावुनी संसारीं गोंविसी
नाना कर्मे केली म्हणुनि आम्हां कां दंडिसी
आपुली महिमा वाढो म्हणुनी आकस आरंभिलें
तुज मज देवा वैर ऐसे करितां नव्हे भले
ऐसें तुज मज वैर म्हणुनी गुरुसी शरण गेलों
देव-भक्तपण कोण्या कर्मे मग पुसों लागलं
सद्गुरु म्हणती सर्व हि मायिक निश्चयें वोलिलों
देव आणि भक्त एक चि गोष्टीसी पावलों
आतां सद्गुरु-वचनें तुझे गिळीन देवपण
तुझिया नेणों भक्तावरी घालीन पाषाण
जीव शिव दोन्ही मिळोनि मग मी सुखें राहीन
तुज मज रुप ना रेखा त्याते निर्धारीन
ऐसे भक्तबोल ऐकुनी देवा थोर उपजली चिंता
विवेक-बळें करुनी माझे देवपण उडवील आतां
या लागीं भिणें भक्त-जनांसी ऐक्य करुनी तत्वतः
एका जनार्दनी दर्शन द्यावें लागेल त्वरितां

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ देवापुढे देवा विषयी तक्रार करीत आहे. परमानंद गोविंदाला आपले खडे बोल सुनावले आहेत. परमेशाने सगुण रुप धारण केले नसते तो केवळ निर्गुण निराकार रुपांत असतां तर भक्तांच्या दृष्टीने काहीं मोल नाही. हे भक्तांचे मनोगत जाणून देवाने मायेचा आधार घेऊन नसते देवपण स्विकारलें आणि भक्तांना खोटे जीवपण दिले. स्वता:कडे थोरपणा घेऊन भक्तांकडून सेवा घेऊ लागला. भक्तांची अविद्या, अज्ञान यांचा फायदा घेऊन त्यांना जन्म-मरणाच्या संसार-चक्रांत अडकवले. आपले महत्त्व वाढवण्यासाठी कर्मफल म्हणून शिक्षा देऊ लागलास. एका जनार्दनी म्हणतात. असा आकस धरून वैर करणे योग्य नाही. देव -भक्तांत असे वैर निर्माण झाल्याने भक्त गुरु-चरणाला शरण गेले. देवाला देवपण आणि भक्ताला भक्तपण कोणत्या कर्माचे फळ आहे असे विचारु लागले. ही सर्व माया (नश्वर) आहे असा सद्गुरुंनी निर्णय दिला. देव आणि भक्त एकरुप आहेत या सद्गुरू वचनाने देवाचे देवपण गळून पडले. जीव हे शिवाचे अंशरुप आहे, देव -भक्तांत अद्वैत आहे. या सिध्दाताने भक्त सुखी झाले असून देवाला चिंता लागली. भक्त विवेक बळाने आपले देवपण उडवील अशी चिंता लागून राहिल्याने देव च भक्त -जनांना घाबरू लागला. आता भक्तांसी ऐक्य करण्यासाठी देवाला दर्शन द्यावे च लागेल असे एका जनार्दनी म्हणतात.

भक्ताचा संकल्प

185
आम्हांसी तो पुरे विठ्ठ चि एक। वाउगा चि देख दुजा न मनीं
ध्यान धरुं विठ्ठल करुं त्याचे कीर्तन। आणिक चिंतन नाही न
ध्येय ध्याता ध्यान खुंटला पै शब्द। विठ्ठल उद्बोध सुख आ
एका जनार्दनी विठ्ठल भरला। रिता ठाव उरला कोठें सांगा

भावार्थ
भक्तांच्या मनांत एका विठ्ठला शिवाय दुसरी कोणतीही गोष्ट नाही.विठ्ठलाचे सतत ध्यान करावें त्याच्या कीर्तनात रमावें या शिवाय कशाचेही चिंतन एकनिष्ठ भक्त करीत नाही.ध्यानाची क्रिया,ध्यान करणारा आणि ज्याचे ध्यान करायचे तो विठ्ठल ही त्रिपुटी संपून भक्त देवाशी एकरूप होतो तेव्हां अणुरेणु सह सर्व विश्व एकाच परमात्मा तत्वाने व्यापले आहे, असा साक्षात्कार होऊन परमानंद होतो.असे एका जनार्दनी म्हणतात.

186
गाऊं तरी एक विठ्ठल चि गाऊन। ध्यान तरी विठ्ठल चि
पाहून तरी एक विठ्ठल चा पाहून। आणिक न गोवूं वासना ही
आठवून तो एक विठ्ठल आठवूं।आणिक न सांठवूं हृदयामाजी
एकाजनार्दनी जडला जिव्हारी। विठ्ठल चराचरी व्यापून ठेका

भावार्थ
एका जनार्दनी म्हणतात, एकाग्रतेने ध्यान लावून विठ्ठलाची च मूर्ति पहावी. किर्तनांत विठ्ठलाचे च गुण गावेत.मनांत विठ्ठला शिवाय कोणतिही वासना नसावी.विठ्ठलाचे अखंड स्मरण करावें, हृदयात विठ्ठलाची मूर्ती सांठवून ठेवावी.चराचराला व्यापून राहिलेला विठ्ठल जिव्हारी बसला आहे.

187

तुमचे नाम-संकीर्तन । हें चि माझें संध्या-स्नान
तुमच्या पायाचें वंदन । हें चि माझें अनुष्ठान
तुमच्या पायाचा साक्षेप । हा चि माझा काळ-क्षेप
तुमच्या प्रेमे आली निद्रा । ही च माझी ध्यान-मुद्रा
एका जनार्दनी सार । ब्रह्म-रुप हा संसार

भावार्थ
सद्गुरू जनार्दन स्वामींचे संकीर्तन हें च आपले संध्या-स्नान असून त्यांच्या चरणांचे वंदन हेच अनुष्ठान आहे.सद्गुरूंची चरण-सेवा हाच मनाचा विरंगुळा,स्वामींच्या नामस्मरणांत आलेली निद्रा हीच ध्यान-मुद्रा.हा सर्व संसार ब्रह्म-रुप आहे हे जाणून घेणे हे च परमार्थाचे सार आहे असे एका जनार्दनी सांगतात.

188

गातों एका ध्याती एका। अंतर्बाही पाहतों एका
अगुणी एका सगुणी एका । गुणातीत पाहतो एका
जनीं एका वनीं एका। निरंजनी देखो एका
संतजना पडिये एका । जनार्दनी कडिये एका

भावार्थ
एका जनार्दनी कीर्तनांत परमेश्वराचे गुण गातात,ध्यानमग्न होऊन अंतरंगांत आणि जन-वनांत परमात्म्याचे च दर्शन घेतात एका जनार्दनी देवाला सगुण,निर्गुण या दोन्ही स्वरुपात पाहतात तसेच सृष्टीतील गुणातित रुपही जाणतात. जनार्दन स्वामींच्या कृपा-प्रसादाने देवाचे निरंजन रूपांत एकाकार होतात.


189

चरणांची सेवा आवडी करीन। काया वाचा मन धरुनी जीवीं
या परते साधन न करीं तुझी आण। हा चि परिपूर्ण नेम माझा
एका जनार्दनी एकत्वें पाहीन। ह़दयीं ध्याईन जनार्दन

भावार्थ
देह,मन वाचा एकाग्र करून गुरु-चरणांची सेवा अत्यंत आवडीने करीन.याशिवाय कोणतिही वेगळी साधना करणार नाही हाच एकमेव नेम निष्ठेने करीन असे एका जनार्दनी शपथ घेऊन सांगतात.हृदयांत सद्गुरूंचे निरंतर ध्यान करीत असताना अद्वैत-भक्तीचे आचरण करावे असे मत व्यक्त करतात.

190

जगदात्मा श्रीहरि आनंदे पूजीन। अंतरी करीन महोत्सव
द्वैत विसरुनि करीन पाद-पूजा। तेणें गरुड-ध्वजा पंचामृत
शुध्दोदक स्नान घालीन मानसीं। ज्ञाने स्वरूपासी परिमार्जन
सत्व क्षीरोदक देवा नेसवीन। राजस प्रावरण पीतांबर
दिव्य अलंकार तोडर सोज्वळ।सहजस्थिति लेईलस्वामीमाझा
भक्ति नवविधा घालुनी सिंहासन। एका जनार्दन पूजा करी

भावार्थ

अंत:करणामध्यें जगताचा आत्मा जो श्री हरी त्याचे आनंदाने पूजन करुन भक्तिचा सोहळा साजरा करीन असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,देव-भक्तातिल द्वैत विसरून एकात्मतेने चरणांची पूजा करीन ही अद्वैत भक्ती हे च ज्याचे वाहन गरूड आहे अशा श्री हरिच्या पूजेतिल पंचामृत होय. मनातील शुध्द भावना हे स्नानासाठी उदक तर ज्ञान रुपी चंदनाने श्री हरीला परिमार्जन करीन.सत्व गुणाचे धवल वस्त्र जगदिश्वराला नेसवून रजोगुणाचा पिवळा शेला पांघरायला देईन.सोज्वळ तोडर हा दिव्य अलंकार घालून नव-विधा भक्तीच्या सिंहासनावर श्री हरीची प्रतिस्थापना करुन षोडपचारे पूजा करीन असे एका जनार्दनी म्हणतात.

सगुण--साक्षात्कार

191

अवघें चि त्रैलोक्य आनंदाचें आतां।चरणीं जगन्नाथा चित्त ठेले
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ। अनाथांचा नाथ जनार्दन
एका जनार्दनी एकपणें उभा । चैतन्याची शोभा शोभलीसे

भावार्थ

अनाथांचे नाथ अशा स्वामी जनार्दनांच्या कृपा-प्रसादानें माय-बाप जगन्नाथाच्या चरणीं चित्त एकाग्र झाले. एका जनार्दनी एकटाच जगन्नाथाच्या चैतन्याची शोभा अवलोकन करीत असताना तिन्ही लोक आनंदाने भरून गेले आहेत अशी अनुभूती त्यांना आली.

192

चंद्राहूनि शीतळ रवीहूनि सोज्वळ। तेणें मज केवळ वेधिलें बाई
अमृताहूनि स्वादु गगनाहूनी मृदु। रुपेविण आनंदु देखिला बाई
एका जनार्दनी आनंदु परिपूर्णं। काया वाचा मन वेधिलें बाई

भावार्थ

चंद्रापेक्षा शीतल,सूर्यापेक्षा निर्मळ, प्रकाशमान, अमृतापेक्षा रुचकर,आकाशापेक्षा मृदु अशा श्रीहरीनें चित्त वेधून घेतले. काया, वाचा मन पूर्णपणे एकरूप झाले. श्रीहरीचे रुप दिसेनासे झाले आणि केवळ परिपूर्ण आनंद सर्व विश्व व्यापून उरला आहे असा भास झाला.श्रीहरी-दर्शनाचे असे यथार्थ वर्णन एका जनार्दनी करतात.

193

आनंद अद्वय नित्य निरामय। सावळा भासतसे मज लागीं
वेधू तयाचा माझिया जीवा। काया वाचा मनोभावा लागलासे
वेधलेसें मन झालें उन्मन। देखतां चरण गोड वाटें
पाहतां पावतां पारुषला जीव। एका जनार्दनी देव कळों आला

भावार्थ

सावळा श्री हरी म्हणजे नित्य,निरामय,अतुलनीय आनंद आहे असे मनाला वाटते.काया,वाचा,मनाला या सावळ्या रुपाने जीवाला भुरळ घातली असून वेध लावला आहे.या रुपाकडे आकर्षित झालेल्या मनाचे उन्मन झालें असून ते उच्च पारमार्थिक पातळीवर स्थिर झाले असून देहभान विसरून केवळ चरण-कमळावर दृष्टी खिळून राहिली आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,या अनुभवातून देव सत् चिदानंद स्वरुप आहे याची प्रचिती आली.

194

जगाचें जीवन मनाचे मोहन। योगियांचे ध्यान विठ्ठल माझा
द्वैताद्वैताहूनि वेगळा विठ्ठल । कळां पौर्णिमेची
न कळे चि आगमा नेणवे चि दुर्गमा। एका जनार्दनी आम्हां सापडला

भावार्थ

विठ्ठल जगताचा आधार,भक्तांच्या मनाला मोह घालून भक्ती.-साधनेंत गुंतवून टाकणारे, योग्यांना ध्यान लावणारे असामान्य रुप असून हा विठ्ठल द्वैत व अद्वैत यापेक्षा वेगळा आहे.पौर्णिमेच्या चंद्र कलेप्रमाणे तो परिपूर्ण आहे. विठ्ठलाचे स्वरूप वेद,शास्त्र,श्रुती यांना सुध्दा समजण्यास कठीण आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,प्रेमळ भक्तांना मात्र हा विठ्ठल सहज सापडतो.

195

आजीचा सुदिनु आम्हां झाला आनंदु ।
सकळां स्वरूपीं स्वयें देखें गोविंदु
पाहिला गे मायें आतां सांगू मी कैसे।
जेथें पाहें तेथें गोविंद दिसे
पाहतां पाहणें तटस्थ ठेलें ।
सबाह्य अभ्यंतरी पुरुषोत्तमें कोंदलें
या परी पाहतां हरुष होतसे मना ।
एका जनार्दनी धणी न पुरे मना ।

भावार्थ

या अभंगात संत एकनाथ गोविंद-भेटीचा आनंद व्यक्त करीत आहेत. सर्वांच्या मनाला आणि देहाला व्यापून उरणारा गोविंद पाहिला पण तो अनुभव शब्दांत वर्णन करता येत नाही. जेथे पहावे तेथे गोविंद च दिसतो.गोविंदाला पहात असतांना दृष्टी त्याच्या ठिकाणी खिळून राहिली आणि मन तटस्थ झाले.या पुरुषोत्तमाने मन आतून बाहेरून व्यापून टाकले.मनाला एव्हढा आनंद झाला असूनही दर्शन सुखाने मनाचे समाधान होईना.असे एका जनार्दनी म्हणतात.

196

चतुर्भुज श्याम मूर्ति । शंख-चक्र ते शोभती
पीतांबर वैजयंती । रुळती गळां
देव देखिला देखिला । तेणें संसाराचा ठावो पुसिला
विदेही तो भेटला । भक्त तयातें
दोघां होतां चि मिळणी । नुरे देव-भक्तपणीं
फिटली आयणी सर्व कोड कठिण
छंद पाहिजे नामाचा । निश्चयो काया मनें वाचा
एका जनार्दनी त्याचा । देव होय अंकित

भावार्थ

चार भुजा असलेली, हातामध्ये शंख,चक्र परिधान केलेली, पीतांबर नेसलेली, गळ्यांत वैजयंती माळ शोभून दिसणारी सांवळी मूर्ती पाहिली आणि विश्वाचा पसारा दिसेनासा झाला.देहाचे भान हरपून गेले. हा विदेही भक्त जेव्हां देवाला भेटला तेव्हां देवाचे देवपण आणि भक्ति एकरुप झाली. भक्तीचे रहस्य उलगडले.या अनुभवाचे वर्णन करून एका जनार्दनी म्हणतात,काया,वाचे,मने नामाचा छंद जोपासल्याने देव भक्ताच्या अंकित होतो.

197

अवघा व्यापक दाविला । माझा संदेह फिटला
मन होते गुंडाळले । आपुले चरणीं पै ठेविलें
नाहीं पहावया दृष्टी । अवघा जनार्दन सृष्टि
दुजा हेत हारपला । एका जनार्दनी एकला

भावार्थ

सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने विश्वव्यापक परमात्म्याचे दर्शन घडले आणि मनतील सर्व शंकांचे निरसन झाले. मनाच्या सर्व वृत्ती आवरून ते सद्गुरू चरणांशी एकाग्र केले. अवघी सृष्टी जनार्दन स्वामींच्या रूपाने नटली आहे,दृष्टी या रूपांत हरवून गेली,मनांत दुसरी कोणतीही ईच्छा उरली नाही असे एका जनार्दनी म्हणतात.


198

जन्म मरणाचे तुटलें सांकडें । कैवल्य रोकडें उभें असे
डोळियाचा डोळा उघड दाविला । संदेह फिटला उरी नुरे
एका जनार्दनी संशय चा नाहीं। जन्म-मरण देहीं पुन्हां नये

भावार्थ

कैवल्याचा दानी विटेवर उभा असलेला प्रत्यक्ष पाहिला, ज्ञानियाच्या राजा डोळ्यापुढे साकार उभा राहिला आणि मनातला संदेह फिटला. जन्म मरणाचे संकट कायमचे टळले. एका जनार्दनी या देहाला पुन्हा जन्म-मरण येणार नाही असे खात्रीपूर्वक सांगतात.

199

सायासाचें बळ । तें आजि झालें अनुकूल
धन्य झालें धन्य झालें । देवा देखिलें हृदयी
एका जनार्दनी संशय फिटला ।देव तो देखिला चतुर्भुज

भावार्थ

अंतकरणाच्या गाभाय्रांत देवाचे दर्शन झाले आणि धन्य झालो, जीवनात आतापर्यंत केलेले सायास (साधना) फळाला आली.शंख,चक्र,गदा,पद्म परिधान केलेल्या या चतुर्भुज देवाला पाहिलें आणि मनातले सारे संशय समूळ नाहिसे झाले असे एका जनार्दनी कृतार्थ भावनेनें सांगतात.

200

आजी देखिलीं पाउलें । तेणें डोळें धन्य झाले
मागील शीण भारु । पाहतां न दिसे निर्धारु
जन्माचें तें फळ । आजि झालें सुफळ
एका जनार्दनी डोळां । विठ्ठल देखिला सांवळा

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, सावळ्या विठ्ठलाची चरण-कमल दृष्टीस पडली आणि या डोळ्यांचे पारणे फिटले.जन्मभर केलेल्या साधनेचे सुफळ पदरांत पडले. मागचा सारा शीण-भार उतरुन गेला,कुठल्या कुठे दिसेनासा झाला.

201

इच्छा केली तें पावलो । देखतां चि धन्य झालों
होतें सुकृत पदरीं । तुमचे चरण देखिले हरि
गेलें भय आणि चिंता । कृतकृत्य झालों आतां
आजि पुरला नवस । एका जनार्दनी झालों दास

भावार्थ

परमेश्वर दर्शनाची अंत्यंतिक इच्छा होती ती पूर्ण झाली. देव -दर्शन होतांच धन्यता पावलो.जन्मोजन्मीच्या सत्-कृत्याचे फळ पदरांत पडले,हरि-चरणांचे दर्शन झाले. आजवर केलेल्या तपस्येचे सार्थक झाले,मनातले सारे भय सगळ्या चिंता लयास गेल्या. एका जनार्दनी सांगतात, सद्गुरू जनार्दन स्वामींचा दास व्हावे असा नवस केला होता तो पुरवला गेला.

भक्तीचे स्वरूप आणि गौरव

202

भगवद्भावो सर्वां भूतीं । हें घि ज्ञान हें चि भक्ति
विवेक विरक्ति । या चि नांवें
हें सांडूनि विषय- ध्यान । तें चि मुख्यत्वें अज्ञान
जीवीं जीवा बंधन । येणें चि दृढ।
आठव तो परब्रह्म । नाठव तो भव-भ्रम
दोहींचे निज-धर्म । जाण बापा
आठव विसर चित्तीं । जेणें जाणिजेती
तेंचि एक निश्चिती । निजरूप
एका जनार्दनी । सहज निज-बोधनी
सबाह्य अभ्यंतरीं । पूर्ण परमानंदु

भावार्थ

सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी आत्मरुपाने (चैतन्य रुपाने) एकच भगवंत भरून राहिलेला आहे हा सर्वाभूती असणारा भगवत्-भाव हेच ज्ञान, हिच भक्ति! याच भगवत् -भावाला विवेक आणि विरक्ति। अशी ही नावें आहेत. या ज्ञान, भक्ति, विवेक, विरक्ती चा त्याग करून इंद्रिय विषयांचे चिंतन करणे हे च अज्ञान होय. त्यामुळेच जीवाला जन्म-मृत्युचे बंधन पडतें. परमात्म्याची सतत आठवण हें च परब्रह्म आणि परमात्म्याचा विसर हाच संसार-सुखाचा मोह.परब्रह्म हे अविनाशी, शाश्वत तर संसार विनाशी, अशाश्वत आहे. या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत हे जाणून घेणे जरूरी आहे. आठव आणि विसर यांची जाणिव करून देणारे आपले च निजरूप आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,एकदां हा बोध झाला कीं, चित्त आतून बाहेरून पूर्णानंदाने भरून जाते कारण सगळी कडे याच विश्वंभराची विविध रूपे दिसू लागतात.

203

भक्तीचे उदरीं जन्मले ज्ञान । भक्तीने ज्ञानाला दिधलें महिमान
भक्ति तें मूळ ज्ञान तें फळ। वैराग्य केवळ तेथींचे फूल
फूल फळ दोन्ही येत येरा पाठीं। ज्ञान वैराग्य तेवीं भक्तीचे पोटी
भक्तीविण ज्ञान गिवसती वेडे। मूळ नाही तेथे फळ केवीं जोडे
एका जनार्दनी शुध्द भक्ति-क्रिया। ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पायां

भावार्थ

येथे संत एकनाथ भक्तीचे महत्त्व वर्णन करतात. भक्ती ही ज्ञानाचे उगमस्थान असून भक्तिमुळे च ज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भक्ती हे मूळ असून वैराग्य हे भक्तिच्या रोपट्यावर उमललेले सुंदर फूल असून ज्ञान हे फळ आहे. फूल व फळ एकमेकांच्या पाठोपाठ येतात तसे भक्तिच्या पोटी ज्ञान व वैराग्य! भक्ती शिवाय ज्ञान मिळवू पाहणे म्हणजे मुळा शिवाय फळाची अपेक्षा करण्या सारखे वेडसर पणाचे आहे. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, भक्ती-साधना ही एव्हढी पवित्र गोष्ट आहे कीं, ब्रह्मज्ञान भक्तिच्या पायाशी लोळण घेते.

204

भक्ति-प्रेमाविण ज्ञान नको देवा।
अभिमान नित्य नवा तयामाजी
प्रेम-सुख देई प्रेम -सुख देई।
प्रेमे विण नाहीं समाधान
एका जनार्दनी प्रेम अति गोड ।
अनुभवी सुरवाड जाणतील

भावार्थ

भक्ति-प्रेमा शिवाय जे ज्ञान प्राप्त होते त्यां मुळे मनांत अहंकार निर्माण होऊन अभिमान वाढतो तो साधनेत बाधा निर्माण करतो असे सांगून एका जनार्दनी असे ज्ञान देऊ नये अशी विनंती देवाला करतात. देवाने आपल्याला प्रेमसुख द्यावे कारण प्रेम-भक्तिच्या समाधानाची गोडी अवीट असून अनुभवी लोक ती जाणतात,असे एका जनार्दनी म्हणतात.

205

भक्तीच्या पोटीं मुक्ति पै आली। भक्तीनें मुक्तीतें वाढविले
भक्ति ते माता मुक्ति ते दुहिता। जाणोनि तत्वतां भजन करीं
भक्ति सोडूनि मुक्ति वांछिती वेडी। गूळ सोडुनी कैसी ते गोडी
एका जनार्दनी एक भाव खरा।भक्ति मुक्ति वाटूनि आलिया घरा

भावार्थ
भक्ति-साधना करता करता साधकाला मुक्ती प्राप्त होते भक्ती ही माता असून मुक्ती ही तिची कन्या (दुहिता) आहे हे जाणून घेऊन परमेश्वराचे भजन करावें असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, भक्ती सोडून मुक्तिची ईच्छा करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे, गूळ टाकून देऊन गोडी चाखण्याची ईच्छा करण्या सारखे अडाणी पणाचे आहे.भक्तिद्वारे सलोकता - मुक्ति मिळवून परमेश्वराच्या सन्निध जाणे हा च खरा भक्ति-भाव आहे.

206

अभेदा वांचून । न कळे भक्तीचे महिमान
साधितां साधन । विठ्ठल-रूप न कळे
मूळ पाहिजे विश्वास । दृढता आणि त्रास
मोक्षाचा सायास । येथे कांहीं नको चि
आशा मनीषा सांडा परते। काम क्रोध मारा लाते
तेणें चि सरते । तुम्ही व्हाल लोकी
दृढ धरा एक भाव। तेणें चरणीं असे ठाव
एका जनार्दनी भेव । नाहीं मग काळाचें

भावार्थ

ध्यान-योग, ज्ञान-योग, कर्म-योग या पैकी कोणत्याही मार्गाने विठ्ठलाचे रूप कळेलच असे नाही. भक्तिमार्गात देव व भक्त वेगळे राहत नाही, अभेदा शिवाय परमात्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर च भक्तीचे महत्त्व समजून येते. मोक्ष प्राप्तीसाठी करावे लागलेले सायास, साधना करतांना घेतलेला त्रास, चंचल मनाला वळवतांना करावा लागणारा निर्धार या पैकी काहिही भक्ती मार्गात अपेक्षित नाही. विठ्ठलावर असलेला अढळ विश्वास पुरेसा असतो. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनातील सर्व ईच्छा, कामना, सोडून देऊन काम, क्रोधाला जिंकून विठ्ठलावर दृढ भक्तिभाव ठेवल्यास त्याच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करल्याने कळीकाळाचे भय संपून जाईल यात शंका नाही.

207

अभाग्य न भजती भगवंती। त्यांस पृथ्वी असे जडत्व देती
जळें दिधली त्यां अधोगती। तेजे दिधली संताप-वृत्ति
वायूने दिधलें त्यां चंचलत्व। नभें दिधलें भाव-शुन्यत्व
महातत्वें हरिलें निज-सत्व । मायें दिधलें त्यां ममत्व
सभाग्य भावें भजती भगवंती।त्यास पृथ्वी देतसे निज शांती
जळें दिधली मधुररस-वृत्ति।तेजें दिधली निजतेज-प्रभादिप्ति
वायु उपरमे दे निश्चलत्व। नभें दिधलें त्यां अलिप्तता
महत्तत्वें दिधलें शोधित-तत्व। मायें दिधलें सद्विद्या परमतत्व
एका जनार्दनी निज-भक्ति । तै अलभ्य लाभ होय प्राप्ति
भूते महाभूतें प्रसन्न होती । तेणें न भंगे ब्रह्म-स्थिति

भावार्थ

अभागी लोक परमेश्वराचे भजन करीत नाहीत, पृथ्वी अशा लोकांना जडत्व देते कारण जडत्व हा पृथ्वीचा। गुण आहे. दुसरे महत्-तत्व जळ (पाणी), पाणी नेहमी उताराकडे वाहते, भाग्यहीन लोकांना हें तत्व अधोगती देते. तिसरे तत्व आहे तेज ,तेजाचा गुण आहे दाहकता, अभागी लोकांना तेज संताप-वृत्ति देते. वायुचा गुण चंचलपणा अभागी लोक मनाने वायुसारखे चंचल असतात परमेश्वराच्या भजनांत रंगून जाऊ शकत नाही. भावशुन्यता अलिप्तपणा हा आकाशाचा गुण आहे अभागी लोक भक्ति.-रसांत रममाण होऊ शकत नाही.या उलट भाग्यवंत भगवंताला भक्तिभावाने पुजतात, पृथ्वी त्यांना शांति देते. पाण्यापासून समरसता मिळते. तेजा पासून बुध्दीची तेजस्विता प्राप्त होते. वायूकडून निश्चलता आणि आकाशाकडून अलिप्तपणा प्रदान केला जातो. अशा प्रकारे पंच महाभूतांकडून भाग्यवान लोक अलौकिक सत्वे मिळवतात. एका जनार्दनी म्हणतात, या गुणांमुळे भाग्यवंत प्रेम-भक्तीत रंगून जातात, समाधान, शांति यांचा अलभ्य लाभ होतो. माते कडून सद्विद्या हे परम-तत्व मिळते. पंच-महाभूतें प्रसन्न होतात अशा भाग्यवंतांची ब्रह्मस्थिती कधी भंग पावत नाही.

२०८


देव प्रसन्न झाला माग म्हणे वहिला ।
भक्त घरोघरी विचार पुसो गेला ।
भाव की भ्रांति आळस की भक्ति ।
विचारुनि व्यक्ति ठायी ठेवा ।
अरे हे गुह्य कुडे करू नये उघडे ।
तरी द्वारोद्वार पुसो जाय वेडे ।
एका जनार्दनी शीतल भाव ।
आळसेचि देव दुरावला ।

भावार्थ

एका साधकावर देव प्रसन्न झाला आणि हवे ते माग असे म्हणाला. साधक प्रत्येक घरात जाऊन देवाकडे काय मागावें असे विचारू लागला. भक्ति मागावी की भ्रांति, आळस मागावा की भक्ति? एका जनार्दनी म्हणतात, हे भक्तीचे रहस्य असून ते जाणून घेणें आवश्यक आहे ते सद्गुरू च सांगू शकतात.आळसाने देव आणि भक्त यांच्यांत दुरावा निर्माण होतो.

209

मी वासुदेव नामे फोडिता नित्य टाहो ।
देखिले पाय आता मागतो दान द्या हो ।
सावळे रुप माझ्या मानसी नित्य राहो ।
पावन संत-वृंदे सादरे दृष्टि पाहो ।
सांडोनि सर्व चिंता संतपदी लक्ष लागो ।
मुक्त मी सर्व संगी सर्वदा वृत्ति जागो ।
भाविक प्रेमळांच्या संगतीं चित्त लागो ।
अद्वैत-वृत्ति चालो अक्षयी भक्ति-योग ।
स्वप्नी हि मानसाते नातळो द्वैत-संग ।
अद्वयानंद-वेधे नावडो अन्य भोग ।
अक्रियत्व चि वाहो सक्रियारूप बोध ।
पाहता विश्व माते निजरुप दाखवी ।
सत्कथा -श्रवण कर्णी पीयुष चाखवी ।
रसने नाममंत्र सर्वदा प्रेम देई ।
तोषला देवराणा म्हणे बा रे घेई
हे दान पावले सद्गुरू शांति-लिंगा ।
हें दान पावलें आत्मया पांडुरंगा ।
हें दान पावलें व्यापका अंतरंगा ।
हें दान पावलें एका जनार्दनी दोष जाती भंगा ।

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ देवाकडे प्रार्थना करून काही मागणे मागत आहेत. ते वासुदेवाच्या नावाने व्याकुळतेने टाहो फोडून दान देण्यासाठी चरणांशी विनंती करतात. पांडुरंगाचे सावळें रुप मनांत सतत राहावें आणि संतजनां विषयीं आदरभावना असावी. सर्व चिंताचे निराकरण होऊन संत -चरणांचे ध्यान लागावें , जे भाविक प्रेमळ भक्त असतील त्यांच्या संगतींत चित्त रममाण व्हावें, ईंद्रियविषयांच्या मोहा पासून मन मुक्त व्हावें, अशी ईच्छा व्यक्त करून संत एकनाथ म्हणतात, मनातले द्वैत संपून अद्वैत भक्तियोगाचे अखंड आचरण घडावे, या भक्तीत मिळणाऱ्या आनंदात ईतर सर्व भोगांचा विसर पडावा.स्वप्नांत सुध्दा द्वैत भावनेचा स्पर्श ना घडावा. या सर्व चल आणि अचल सृष्टींत भरलेला परमात्मा डोळ्यांना दिसावा. परमेश्वराच्या सत्कथा रुपी अमृत कर्णांना चाखावयास मिळावे, रसनेला देवाच्या नामाचे प्रेम निर्माण व्हावे. एकनिष्ठ भक्ताची ही प्रार्थना ऐकून देवानें आनंदाने दान दिले. हे दान शांतीरुप सद्गुरूंना, आत्मरुप पांडुरंगाला, सर्वव्यापी सर्वेश्वराला पावलें असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, या दानाने आपले सर्व दोष नाहिसे झाले, आपण कृतार्थ झालो.

२१०

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ।
भाव-भक्ति भीमा उदक त वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ।
दया क्षमा शांती हेचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ।
देखिली पंढरी देही जनी वनी । एका जनार्दनी वारी करी ।

भावार्थ
संत एकनाथांनी रचलेले आणि भीमसेन जोशींनी स्वरबद्ध केलेले हे भजन अतिशय लोकप्रिय झाले असून त्यात संत एकनाथांनी मनुष्यदेहाला पंढरीची उपमा देऊन विठ्ठल हा या देहातील आत्मा आहे असे सूचित केले आहे. पंढरपूर ज्या भीमानदीवर वसलेले आहे त्या नदीतून भाव-भक्ती चे उदक वाहत आहे अशी सुंदर कल्पना केली आहे. चंद्रभागेचे वाळवंट दया, क्षमा, शांतीरुपी वाळूने बनलेले आहे, या पंढरीत पांडुरंग शोभून दिसत आहे आणि वैष्णवजन पांडुरंगाच्या प्रेमरसात तल्लीन होऊन नाचत आहेत. एका जनार्दनी म्हणतात, या पंढरीचे दर्शन प्रत्येकाने आपल्या अंतरंगात, आपल्या सहवासातील जनमानसात आणि सभोवतालच्या सजीव सृष्टीत घ्यावे. ही पंढरीची वारी हा अत्यंत आनंददायक अनुभव आहे.

२११

नवविधा भक्ति नव आचरती । त्यांची नाम-कीर्ति सांगू आता ।
एक एक नाम घेता प्रात:काळी । पापा होय होळी क्षणमात्रे ।
श्रवण परीक्षिति तरला भूपती । साता दिवसात मुक्ति झाली तया ।
श्रीशुक आपण करूनि कीर्तन । उध्दरिला जाण परीक्षिति ।
हरिनाम-घोषे गर्जे तो प्रल्हाद । स्वानंदे प्रबोध झाला त्यासी ।
पायांचा महिमा स्वयें जाणे रमा । प्रिय पुरुषोत्तमा झाली तेणे ।
पृथुराया बाणले देवाचे अर्चन । तेणे समाधान पावला तो ।
गाईचिया मागे श्रीकृष्ण-पाउले । अक्रूरे घातले दंडवत ।
दास्यत्व मारुती अर्चे देह-स्थिती । सीता-शुध्द कीर्ति केली तेणे ।
सख्यत्व स्वजाति सोयरा श्रीपति । सर्व भावे प्रीति अर्जुनाची ।
आत्म-निवेदन करुनियां बळी । झाला वनमाळी द्वारपाल ।
नवविधा भक्ति नव जे केली । पूर्ण प्राप्ती झाली तया लागी ।
एका जनार्दनी आत्म-निवेदन । भक्ती दुजेपण उरले नाही ।

भावार्थ

या भजनात संत एकनाथ नवविधाभक्तीचे आचरण करणाऱ्या नऊ भक्तांची महती सांगत आहेत. प्रात:काळी या भक्तांचे नामस्मरण केल्यास काया, वाचा मनाने केलेल्या सर्व पापांची होळी होते. पांडवांचा वंशज परिक्षित राजाने सात दिवस भागवत ग्रंथाचे श्रवण केले आणि त्यांची संसार-बंधनातून सुटका होऊन मुक्ति मिळाली. श्रीशुकानी केलेले कृष्णलीलांचे किर्तन श्रवण करुन परिक्षिताचा उध्दार झाला. हरिनामाचा अखंड जप करुन प्रल्हादाला प्रभुकृपेचा लाभ झाला. पादसेवन भक्तीने लक्ष्मी पुरषोत्तम विष्णुला प्रिय झाली अर्चनभक्तीने पृथुराजाला निरंतर शांती-समाधानाचे वरदान मिळाले. कृष्ण-वधाचा हेतूने प्रेरित होऊन कंसाने अक्रुराला गोकुळात पाठवले तेथिल गोप-गोपिकांचे निष्काम प्रेम पाहून आणि गाईंच्या मागे फिरणारी श्रीकुष्णाची पाऊले पाहून वंदनभक्तीने अक्रुर तरुन गेला. दास्यत्वभक्तीने मारुतीने सीता-शुध्दी केली आणि श्रीरामाकडून चिरंजीवपद प्राप्त केले. सख्यभक्तीने अर्जुन श्रीहरीचा सखा, सोयरा बनला. आत्मनिवेदनभक्तीने बळीराजाने श्रीहरीला आपला द्वारपाळ बनवले. या नऊ अनन्य भक्तांना नवविधाभक्तीने परमेश्वराची प्राप्ती झाली. एका जनार्दनी म्हणतात, आत्मनिवेदनभक्तीने देव व भक्तात दुजेपण उरत नाही.


देव-भक्ताचे प्रेम (नाथांच्या मुखाने)

२१२

भजन भावाते निपजवी । भाव देवाते उपजवी ।
ऐसा भजने देव केला । भक्त वडील देव धाकुला ।
भक्ताकारणे संकल्प । भक्त देवाचाहि बाप ।
देव भक्ताचे पोटी । झाला म्हणोन आवड मोठी ।
एका जनार्दनी नवलावो । कैसा भक्तचि झाला देवो ।

भावार्थ

भक्त जेव्हा देवाच्या भजनात तल्लीन होतो तेव्हा भक्तिभाव निर्माण होतो आणि या भक्तिभावातून देव जागृत होतो. अशाप्रकारे साधकाच्या भजनातून देव जन्म घेतो. भक्ताच्या संकल्पातून देवाची निर्मिती होते. भक्त देवाचा बाप आहे, म्हणून भक्ताच्या मनात देवाविषयी स्वाभाविक प्रेम (आवड)आहे. एका जनार्दनी म्हणतात, ही मोठी नवलाची गोष्ट आहे की भक्त देवत्वाला पोचला आहे.

२१३

आधी देव पाठी भक्त । ऐसे मागे आले चालत ।
हे हि बोलणेचि वाव । मक्ता आधी कैचा देव ।
भक्त शिरोमणी भावाचा । देव लंपट झाला साचा ।
भक्तासाठी अवतार । ऐसा आहे निर्धार ।
वडील भक्त धाकुला देव । एका जनार्दनी नाही संदेह ।

भावार्थ

आधी देवाचा अवतार आणि नंतर भक्त असे मानण्याची पूर्वी पध्दत होती. परंतु हे बोलणे सत्य नाही. भक्त हा भावाचा शिरोमणी असून देव या भक्तीभावामुळे वेडा झाला असून तो भक्तांसाठी अवतार धारण करण्याचा निर्धार करतो. एका जनार्दनी म्हणतात, भक्त वडील असून देव धाकटा आहे, याविषयी मनामध्ये कोणताही संशय नाही.

२१४

भक्तपणा सान नव्हे रे भाई । भक्ताचे पाय देवाचे हृदयी ।
भक्त तोचि देव भक्त तोचि देव । जाणती हा भाव अनुभवी ।
दान-सर्वस्वे उदार बळी । त्याचे द्वार राखे सदा वनमाळी ।
एका जनार्दनी मिती नाही भावा । देवचि करितो भक्तांची सेवा ।

भावार्थ

भक्तांची भावभक्ती ही छोटी गोष्ट नाही, या भक्तिभावाने देव भक्ताचे पाय आपल्या हृदयात धारण करतो. भक्त हाच देव असून ते एकरुप आहेत, हे केवळ अनुभवी सद्गुरूच जाणतात. सर्वस्वाचे दान देणारा दैत्यराजा बळी याचा वनमाळी द्वारपाल झाला. एका जनार्दनी म्हणतात, भक्तिभावाची महती अमर्याद आहे, भक्तांसाठी देव तिष्ठत राहून त्यांची सेवा करतो.

२१५

भक्तालागी अणुमात्र व्यथा । ते न साहवे भगवंता ।
करूनि सर्वांगाचा ओढा । निवारीतसे भक्त-पीडा ।
होऊनी भक्तांचा अंकित । सारथीपण तो करीत ।
ऐसा अंकित चक्रपाणि । एका शरण जनार्दनी ।

भावार्थ

भक्ताला होत असलेले थोडेसेही दु:ख भगवंताला सहन होत नाही. आपले सर्वस्व पणाला लावून देव या भक्ताचे संकट निवारण करतो. भक्ताचा अंकित होऊन तो त्याचा सारथी होतो. एका जनार्दनी म्हणतात, देव हा भक्तिभावाचा भुकेला आहे.

२१६

साचपणे देवा शरण पै जाती । तया वैकुंठपति विसरेना ।
जैसी कन्या दूर देशी एकटी । रात्रंदिवस संकटी घोकी मायबाप ।
पतिव्रतेचे सर्व मन पति-पायी । तैसा देव ठायी तिष्ठतसे ।
एका जनार्दनी मज हा अनुभव । जनार्दनी देव दाखविला ।

भावार्थ

एकनिष्ठपणे देवाला जे शरण जातात त्यांना वैकुंठपती विप्णु कधीच विसरत नाही. जशी परक्या देशात सासरी गेलेली मुलगी आई-वडिलांची, माहेरची सारखी आठवण काढत असते, जसे पतिव्रतेचे मन सतत पतीभोवताली घोटाळत असते, तसा देव भक्ताच्या ठिकाणी गुंतून पडतो. एका जनार्दनी स्वानुभवाने सांगतात की जनार्दनस्वामींच्या कृपेने आपल्याला देव-भक्ताचे नाते समजले.

२१७

मिठी घालुनीया भक्ता । म्हणे शिणलेती आता ।
धावे चुरावया चरण । ऐसा लाघवी आपण ।
योगियासी भेटी नाही । तो आवडीने कवळी बाही ।
एका जनार्दनी भोळा । भक्ता आलिंगी सावळा ।

भावार्थ

एका जनार्दनी या भजनात परमेश्वराच्या भक्ताविषयी वाटणाऱ्या आत्मभावाचे वर्णन करीत आहे. थकला-भागलेला भक्त दिसताच देव त्याचा श्रमपरिहार करण्यासाठी धावतो. प्रेमाने आलिंगन देतो. योगीजनांची भेट घेण्यासाठी देव अत्यंत आतूर असतो. भोळ्या भाविकांना सावळा श्रीहरी प्रेमाने मिठी घालतो.

२१८

देव धावे मागे न करी आळस । सांडिता भवपाश माया-जाळ ।
सर्व भावे जे का शरण रिघती । तयांचे ओझे श्रीपती अंगे वाहे ।
नको भक्ति मुक्ति सदा नामी हेत । देव तो अंकित होय त्यांचा ।
एका जनार्दनी ऐसा ज्यांचा भाव । तया घरी देव पाणी वाहे ।

भावार्थ

संसाराची सर्व बंधने, सर्व मायापाश तोडून, पूर्ण शरणागत होऊन, भक्तिभावाने जे भक्त श्रीपतीला शरण जातात त्यांच्या संसाराचे ओझे श्रीपती स्वत: वाहतो. अनन्य भक्त भुक्ति-मुक्तिची अपेक्षा करीत नाही. सतत देवाचा नामजप करीत असतो, देव त्याचा अंकित असतो. एका जनार्दनी म्हणतात, अशा अनन्य भक्ताच्या घरी देव पाणी भरतो.

२१९

एका घरी द्वारपाळ । एका घरी होय बाळ ।
एका घरी करी चोरी । एका घरी होय भिकारी ।
एका घरी युध्द करी । एका घरी पुजा बरी ।
एका घरी खाय फळे। एका घरी लोणी बरे ।
एका एकपणे एकला । एका जनार्दनी प्रकाशला ।

भावार्थ

या भजनात एका जनार्दनी भगवंताच्या विविध लिलांचे वर्णन करतात. बळीराज्याच्या घरी भगवंत दारावरचा पहारेकरी होतो तर नंदाच्या घरी बालक बनतो आणि लोण्याची चोरी करतो, सुभद्रा आणि द्रौपदीघ्या घरी चिंधी मागणारा भिकारी होतो. दुर्योधनाच्या घरी युध्दाची भाषा करतो तर विदुराच्या घरी पूजा करुन घेतो. शबरीच्या घरी उष्टी बोरे खातो तर यशोदेच्या घरी लोणी चाखतो. या कृष्णलीलांचा आनंदात एका जनार्दनी रममाण होतो.

२२०

खुर्पु लागे सावत्यासी । न पाहे यातीसी कारण ।
घडी मडके कुंभाराचे । चोख्यामेळ्याची ढोरे ओढी ।
सजन कसायाचे विकी मांस । दामाजीचा दास स्वये होय ।
एका जनार्दनी जनीसंगे । दळू कांडू लागे आपण ।

भावार्थ

पंढरीचा पांडुरंग संताच्या भक्तिप्रेमाचा भुकेला असून तो त्यांच्यासाठी अनेक कामे करतो. सावता माळ्याबरोबर भगवंत मळ्याची खुरपणी करतो तर गोरा कुंभाराची मडकी घडवतो. चोखामेळ्यासाठी गुरे ओढतो. सजन कसायाचे घरी मांस विकायचे काम करतो. दामाजीचा दास बनून त्याची संकटातून सुटका करण्यासाठी निजरुप प्रकट करतो. जनाबाईबरोबर दळण, कांडण करुन तिला मदत करतो असे एका जनार्दनी सांगतात.

२२१

तुम्ही कृपाळु जी देवा । केली सेवा आवडी ।
करुनि सडा संमार्जन । पाळिले वचन प्रमाण ।
उगाळूनी गंध पुरविले । सोहळे केले दासाचे ।
ऐसा अपराधी पतित । एका जनार्दनी म्हणत ।

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, आपण देवाचा अपराध केला आहे. देवाकडून सडासंमार्जन, पुजेसाठी चंदन उगाळून घेतले असून आपण अत्यंत पतित आहोत. परंतु देवाने भक्ताचे सर्व सोहळे पूर्ण केले आहेत, अत्यंत आवडीने सेवा केली आहे कारण देव कृपाळु आहे आणि दिलेले वचन पूर्ण करणारा आहे.

२२२

देव विसरे देवपण । अर्पी वासना भक्तांसी ।
भक्त देही सदा वसे । धर्म अर्थ अर्पीतसे ।
जे जे भक्तांची वासना । पुरवी त्याचि क्षणा ।
एका जनार्दनी अंकित । उभा तेथेचि तिष्ठत ।

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, देव आपला देवपणा विसरून भक्ताच्या देही निरंतर वास करतो. धर्म आणि अर्थ अर्पण करतो. भक्तांच्या मनोकामना, वासना तत्परतेने पूर्ण करतो. तो भक्ताचा अंकित होतो, त्याच्या दाराशी तिष्ठत उभा राहतो.

२२३

अभेद भजनाचा हरिख । देव भक्त झाले एक ।
कोठे न दिसे भेद-वाणी । अवघी कहाणी बुडाली ।
हरपले देव-भक्तपण । जनी झाला जनार्दन ।
एका जनार्दनी देव । पुढे उभा स्वयमेव ।

भावार्थ

भजनाचा निर्भेळ आनंद लुटताना देव-भक्त एकरुप होतात. कोठेही भेदाभेदाचा लवलेश ऐकू येत नाही. सारा भूतकाळ या आनंदात बुडून जातो. देवाचे मोठेपण आणि भक्ताचे सानपण हरपून नाहिसे होते. जनार्दन भक्तीरंगात रंगून जातो. एका जनार्दनी म्हणतात, देव प्रत्यक्ष पुढे उभा राहतो.

२२४

देव म्हणे भक्तांसी आवडी । मी झालो तुमचा गडी ।
सांगाल ते करीन काम । मजवरी ठेवा तुमचे प्रेम ।
भाव मज द्यावा । आणिक मज नाही हेवा ।
आवडीने देव बोले । भक्तांमाजी स्वये खेळे ।
खेळता गोपाळी । एका जनार्दनी गोकुळी ।

भावार्थ

देव भक्तांना लडिवाळपणे म्हणतो, तो त्यांचा सेवक झाला आहे. भक्तांच्या प्रेमासाठी तो त्यांचे कोणतेही काम करण्यास तयार असून तो केवळ निरपेक्ष भावाचा भुकेला आहे. आणखी कोणतीही गोष्ट त्याला हवीशी वाटत नाही. मनापासून देव बोलतो आणि भक्तांबरोबर गोकुळात गोपाळांसह खेळ खेळतो असे एका जनार्दनी म्हणतात.

२२५

बहु बोलाचे नाही कारण । मी देह भक्त आत्मा जाण ।
माझा देह शरीर जाण । भक्त आत पंचप्राण ।
नांदे सहज भक्त आत । मी देह भक्त देहातीत ।
एका जनार्दनी भक्त । देवपणा मी भक्तांकित ।

भावार्थ

देव हा केवळ पंचभूतात्मक शरीर असून भक्त त्याचे पंचप्राण आहेत. देवाच्या शरिरात भक्त आत्मरुपाने नांदतो. देव देह असून भक्त त्या देहापलिकडील अविनाशी आत्मतत्व आहे. एका जनार्दनी म्हणतात, देवाचे देवपण भक्तांच्या अंकित आहे, देवावर भक्तांचे स्वामित्व आहे.

२२६

तुमचे अप्रमाण होता बोल । मग फोल जीवित्व माझे ।
कासया वागवू सुदर्शन । नाही कारण गदेचे ।
तुमचा बोल व्हावा निका । हेचि देवा मज प्रिय ।
मज याचे उणेपण । तुमचे थोरपण प्रकाशू द्या ।
एका जनार्दनी देव । स्वयमेव बोलती ।

भावार्थ

भक्तांचे देवाविषयीचे वचनांचा प्रत्यय येत नसेल तर देवाचे अस्तित्व सिद्ध होणार नाही, देवाचे जीवित्व व्यर्थ होईल आणि हातातील गदा, सुदर्शनचक्राला काही कारण उरणार नाही. भक्तांच्या श्रध्देला उणेपणा येऊ नये अशी देवाची इच्छा आहे. भक्तांचा थोरपणा प्रकाशित व्हावा असे देवाचे मनोगत आहे असे एका जनार्दन म्हणतात.

२२७

मज जे अनुसरले काया वाचा मने । त्यांचे चालवणे सर्व मज ।
ऋणविई त्यांचा अनंत जन्मांचा । जे गाती वाचा कीर्ति माझी ।
तयांचिया द्वारी लक्ष्मीसहित । उभा मी तिष्ठत याचकपणे ।
सर्व जड भारी जाणे योगक्षेम । एका जनार्दनी नेम जाण माझा ।

भावार्थ

जे भक्त देवाची काया, वाचा, मने करून भक्ति करतात, सतत भगवंताचे चिंतन करतात, परमेश्वराचे किर्तन करतात त्या भक्तांचा देव अनंत जन्माचा ऋणी असतो. त्यांच्या दारात श्रीहरी लक्ष्मीसह याचक रुपाने उभा असतो. या एकनिष्ठ भक्तांचा योगक्षेम चालवून त्यांचे ओझे हलके करतो. एका जनार्दनी म्हणतात, भक्तांची पाठराखण करणे हा देवाचा नेम आहे.

२२८

मजसी जेणे विकिले शरीर । जाणे मी निर्धार अंकित त्याचा ।
त्याचे सर्व काम करीन मी अंगे । पडो नेदी व्यंगे सहसा कोठे ।
एका जनार्दनी त्याचा मी अंकित । राहे पै तिष्ठत त्याचे दारी ।

भावार्थ

जे भक्त देवाच्या सेवेत देह झिजवतात, वाणीने देवाचे किर्तन करतात, मनाने देवाचे चिंतन करतात त्या भक्तांचा देव अंकित असतो. त्यांची सर्व कामे देव स्वत: करतो, त्यांचा कमीपणा कोठे दिसू देत नाही. या भक्तांची ताबेदारी स्विकारून देव त्यांच्या दारात तिष्ठत उभा राहतो असे एका जनार्दनी म्हणतात.

२२९

माझा शरणागत न दिसे केविलवाणा ।
ही तो लाज जाणा माझी मज
एकविध भावे आलिया शरण ।
कर्म धर्म जाण पूर्ण त्याचे
समर्थाचे मुला काय खावयाची चिंता ।
तैसे मी तत्वता न विसंबे
एका जनार्दनी हा माझा नेम ।
आणिक नाही वर्म भावेविण

भावार्थ

भगवंताला शरण गेलेला भक्त केविलवाणा दिसत असेल तर ती गोष्ट देवाला कमीपणा आणणारी आहे. समर्थाचा मुलगा अन्नावाचून उपाशी राहत असेल तर समर्थ या नावाला विरोध करणारी आहे. एका जनार्दनी म्हणतात, भगवंताला भाव-भक्तिने पूर्णपणे शरणागत झाल्याने भक्ताचे कर्म-धर्म विनासायास घडतात. भावपूर्ण भक्ति याशिवाय देवाला कसलिही अपेक्षा नाही.


२३०

सर्व कर्म मदर्पण । करिता मन होय शुध्द
न्यून ते चढते जाण । करी संपूर्ण मी एक
मन ठेवुनी माझ्या पायीन्। असो कोठे भलते ठायी
एका जनार्दनी मन । करा मजचि अर्पण

भावार्थ

आपल्याकडून घडणारी सर्व कर्मे भगवंताला अर्पण केल्यास मन शुध्द होते. ही कर्मे करीत असतांना काही उणिवा राहिल्यास भगवान ते पूर्णत्वास नेतात. भक्त देहाने कोठेही असला तरी मनाने तो देवाच्या सन्निध असावा. एका जनार्दनी म्हणतात, भक्ताने आपले मन देवाला अर्पण करावे, त्याने देव प्रसन्न होईल.

२३१

ऐके उध्दवा प्रेमळा । सांगतो जीवींचा जिव्हाळा
तू भक्त-राज निर्मळा । सुचित ऐके
मी बैसोनी आसनी । पूजा करितो निशिदिनी
ते पूज्य मूर्ति तुजलागुनी । नाही ठाउकी उध्दव

भावार्थ

उध्दव हा श्रीहरीचा प्रेमळ भक्त आहे. त्याला श्रीहरी आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. देव उध्दवाला भक्तराज असे संबोधून आपल्या मनातील विचार ऐकावे अशी सूचना करतात. भगवंत स्थिरचित्ताने आसनावर बसून ज्या मूर्तीची रात्रंदिवस पूजा करतात ती मूर्ती कोणाची आहे हे त्यांच्या प्रिय भक्ताला (उध्दवाला) देखिल माहिती नाही. भगवंताचे हे कोडे उलगडण्याचा प्रयत्न उध्दवाने करावा अशी देवाची इच्छा आहे असे एका जनार्दनी सूचित करीत आहेत.

२३२

माझे आराध्य दैवत । ते कोण म्हणती सत्य ।
भक्त माझे जीवींचे हेत । जाणती ते ।
माझे विश्रांतीचे स्थान । माझे भक्त सूख-निधान ।
काया वाचा मन । मी विकिलो तयाची ।
ते हे भक्त परियेसी । उध्दवा सांगे हृषीकेशी ।
एका जनार्दनी सर्वांची । तेचि वदतसे ।

भावार्थ

भगवंत ज्याची आराधना करतात ते दैवत कोणते हे भगवंताचे भक्त जाणतात, कारण भगवंताच्या जीवनाचे हेत केवळ भक्तच जाणू शकतात. भक्त हे भगवंताच्या विश्रांतीचे स्थान, सुख मिळण्याचे ठिकाण असून या प्रेमळ भक्तांनी भगवंताला काया, वाचा, मनाने विकत घेतले आहे. या भक्तांची नावे हृषीकेशी (श्रीकृष्ण) उध्दवाला सांगतात. एका जनार्दनी सर्वांना त्याच भक्तांची नावे सांगतात.

== आत्म-दर्शन ==

भाव-दशा

२३३

एका देहा माजीं दोघे पै बसची। एकासी बंधन एका मुक्तगति
पहा हो समर्थ करी तैसे होय। कोण त्यासी पाहे वक्र -दृष्टि
पाप पुण्य दोन्ही भोगावी एका हातीं।ऐसी आहे गति अतर्क्य ते
एका जनार्दनी जनीं जनार्दन । तयासी नमन सर्वभावें

भावार्थ

एकाच देहामध्यें जिवात्मा आणि शिवात्मा दोन्हीं वसत असतात. जिवातम्याला जन्म,मृत्युचे बंधन असते तर शिवात्मा मुक्त आहे. त्याच्या कडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. शिवात्मा सामर्थशाली असून तो करील तसेच घडते. पाप आणि पुण्य दोन्ही जिवाला भोगावी लागतात.कर्मगती माणसाच्या तर्क शक्तीच्या पलिकडे आहे. एका जनार्दनी म्हणतात, शिवशक्ती अतर्क्य आहे या शक्तीला सर्वभावे वंदन करावें.

234

सात्विका भरणे रोमांसी दाटणें। स्वेदाचे जीवन येऊन लागे
कांदे तो थरारी स्वरूप देखे नेत्रीं। अश्रु त्या भीतरीं वाहताती
आनंद होय पोटी स्तब्ध झाला कंठी।मौन वाक्-पुटीधरुनीराहे
टाकी श्वासोच्छ्वास अश्रुभाव देवा। जिरवून एका स्वरुप होय
एका जनार्दनी ऐसे अष्टभाव। उत्पन्न होतां देव कृपा करी

भावार्थ

अंगावर शहारे येणे, स्वाद (घाम फुटणे), शरिराला कंप सुटणे, डोळे अश्रुंनी डबडबणे, कंठ गद्गदणें, शब्द कुंठित होणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढणे, स्वरुप दर्शनाने अंत:करण आनंदाने भरून जाणे हे अष्ट-सात्विक भाव आहेत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, स्वरुपाशी एकरुप झाल्यावर या सात्विक भावांचा अनुभव येतो, तेव्हां देवाची कृपा होते.

235

सहज सहज ऐशा करिताती गोष्टी
परि सहजाची भेटी विरळा जाणे
सहजाची आवडी विद्या अविद्या तोडी
जाणीव-नेणीवेची राहूं नेदी बेडी
जाणीवा जाणपण नेणीवा नेणपण
दोहींच्या विंदानें सहजाचे दर्शन
एका जनार्दनी जाणीव ना नेणीव
सहज चैतन्यासी देउनि ठेला खेंव

भावार्थ

अध्यात्मिक अनुभवांत परमेश्वर भेटीच्या अनेक कथा सांगितल्या जातात परंतू ईश्वर भेटीचे रहस्य एखादाच जाणतो. परमेश्वर कृपेची ओढ निर्माण झालेल्या साधकाचे ज्ञान, अज्ञान, जाणीव, नेणीव यांच्या बेड्या आपोआपच तुटून पडतात. असा साधक जाणीव आणि नेणिवेच्या कक्षा ओलांडून पलीकडे जातो आणि प्रत्यक्ष चैतन्याला मिठी घालतो. हा अनुभव विरळा च असतो.

236

मीतू ऐसी परी । जैसे तरंग सागरीं
दोहीं माजी एक जाणा । कृष्ण द्वारकेचा राणा
तंतु वस्त्र दोन्ही एक । तैसें जयासी व्यापक
देव भक्त ऐसी बोली ।भ्रांती निरसेनासी झाली
एका जनार्दनी कृपा। भ्रांति कैसी जगीं पहा पां

भावार्थ

समुद्रावर लाटांचे तरंग उठतात तसेच चित्तात मी-तूं पणाचे तरंग उमटतात.सागरावरचे तरंग जसे पाण्याचे असतात तसेच मनावर उमटणारे तरंग एकाच श्रीकृष्ण रुपी परम तत्वा पासून निर्माण झाले आहेत.तंतू पासून विणलेलें वस्त्र आणि तंतु जसे एकरुप असतात तसेच विश्व आणि विश्वाला प्रकाशित करणारा परमात्मा एकच आहेत हे जाणून घ्यावे म्हणजे देव आणि भक्त भिन्न आहेत या भ्रांतिचे निरसन होईल.एका जनार्दनी म्हणतात, परमेश्वरी कृपेने च या भ्रांतिचे निरसन होते.

ब्रह्मनिष्ठांची लक्षणे

237

वर्म जाणे तो विरळा । त्याची लक्षणें पै सोळा
देही देव पाहे डोळा। तो चि ब्रह्म -ज्ञानी
जन निंदो अथवा वंदो । तया नाही भेदाभेद
विधि -निषेधाचे शब्द । अंगी न बाणती
कार्य कारण कर्तव्यता । हें पिसें नाहीं सर्वथा
उन्मनी समाधि अवस्था । न मोडे जयाची
कर्म - अकर्माचा ताठा । न बाणें चि अंगीं वोखटा
वाउग्या त्यां चेष्टा । करी ना कांहीं
शरण एका जनार्दनी । तो चि एक ब्रह्मज्ञानी
तयाचे दर्शनी । प्राणियासि उध्दार

भावार्थ

ब्रह्म-स्वरुपाचे रहस्य जाणणारा ब्रह्मनिष्ठ सोळा लक्षणांनी ओळखला जातो. जो आपल्या देहातच देव पाहतो तो खरा ब्रह्मज्ञानी समजावा. लोकांनी केलेली निंदा किंवा स्तुती तो समान भावानें स्विकारतो. कोणी स्विकार अगर धिक्कार करो ब्रह्मज्ञानी भेदाभेद मानत नाही. असा ब्रह्मज्ञानी कार्य व त्याची कारणे यांची चर्चा करीत नाही. त्याची उन्मनी व समाधी अवस्था कधी भंग पावत नाही. ब्रह्मज्ञानी आपण केलेल्या कामाचा किंवा न केलेल्या अयोग्य कामाचा कधी गर्व मानत नाही. निरुपयोगी प्रयत्नांचा हव्यास धरीत नाही. अशा ब्रह्मज्ञात्याला एका जनार्दनी शरण जातात, त्याच्या केवळ दर्शनाने अनेकांचा उध्दार होतो असे ते म्हणतात.

238

निरपेक्ष निरद्वंद्व तो चि ब्रह्म-ज्ञानी
नायके चि कानीं परापवाद
सर्वदा सबाह्य अंतरीं शुचित्व
न देखे न दावी महत्त्व जगीं वाया
एका जनार्दनी पूर्णपणें धाला
शेजेचा मुराला रसीं उतरून

भावार्थ

जो मनाने पूर्णपणे निरपेक्ष आहे, ज्याला कुणाकडूनही कांही मिळावे अशी अपेक्षा नाही तो ब्रह्मज्ञानी समजावा.तो सदोदित अंतर्बाह्य शुध्द, निर्मल असतो कारण तो इतरांची निंदा किंवा स्तुति कानाने ऐकण्याचे टाळतो. ब्रह्मज्ञानी इतरांचा मोठेपणा डोळ्यांनी बघत नाही आणि स्वता:चा मोठेपणा जगाला दाखवत नाही.एका जनार्दनी म्हणतात,हा ब्रह्मज्ञानी स्वता:च्या आत्मानंदांत रममाण असतो.परिपक्व झालेले फळ आढींत घातले असतां जसे मधुर आणि रसमय बनते तसा हा ब्रह्मज्ञानी समजावा.

239

जागा परीं निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे
सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा
संकल्प विकल्पाची ख्याति । उपजे चि ना कदा चित्तीं
या परी जनी ं असोनि वेगळा। एका जनार्दनी पाहे डोळा

भावार्थ

ब्रह्मज्ञानी सदैव जागृत असुनही निश्चल, शांत असतो.सतत कर्मरत असूनही कर्माचे स्फुरण चढले आहे असे वाटत नाही. निवांत मनांत संकल्प, विकल्पाचे तरंग उठत नाही. अशा प्रकारे लोकांमध्ये वावरत असूनही सर्वांपेक्षा निराळा असतो असे एका जनार्दनी म्हणतात.


240

दृष्टी देखे पर-ब्रह्म । श्रवणीं ऐके पर-ब्रह्म
रसना सेवी ब्रह्मरस । सदा आनंद उल्हास
गुरु-कृपेचे हें वर्म ।जग देखे पर-ब्रह्म
एका जनार्दनी चराचर अवघें ज्यासी परात्पर

भावार्थ

ब्रह्मज्ञानी आपल्या डोळ्यांनी केवळ परब्रह्मच पहातो.कानांनी केवळ परब्रह्मच ऐकतो.जिव्हेनें केवळ ब्रह्मरसच सेवन करतो. चित्त सतत आनंद व उल्हासानें उचंबळत असते.सर्व जग हे ब्रह्मज्ञानीला षर-ब्रह्म च वाटते. अवघी सजीव निर्जीव सृष्टी परब्रह्माचेच प्रतिबिंब आहे असा अनुभव येणे हे गरु-कृपेचे रहस्य आहे असे एका जनार्दनी म्हणतात.

241

ब्रह्मस्थितीचे हें वर्म । तुज दावितों सुगम
सर्वां भूती भगवद्भाव । अभेदत्वें आपण चि देव
संसार ब्रह्म-स्मृति । सांडोनिया अहंकृति
शरण एका जनार्दन । कृपा पावला परिपूर्ण

भावार्थ

एका जनार्दन ब्रह्मस्थितीचे रहस्य वर्णन करुन सांगतात, सर्व चराचर हे भगवंताने अंशरुपाने व्यापले आहे असा भगवद्भाव मनांत निर्माण होऊन आपण परमेश्वराचे च अंशरुप आहोत , देव व भक्त यांत द्वैत नाही असा अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव येऊन अहंकार, मी-पणा गळून पडणे हे गुरु-कृपेचे लक्षण आहे असे एका जनार्दन सांगतात.

गुरु कृपेचा चमत्कार

242

जनार्दने मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा
प्रपंच पारखा झाला दुराचारी । केलीसे बोहरी काम-क्रोधा
आशातृष्णा ह्यांचे तोडियेले जाळे ।कामनेचें काळें केलें तोंड
एका जनार्दनी तोडिलें लिगाड । परमार्थ गोड दाखविला

भावार्थ

जनार्दन स्वामींनी आपल्यावर फार मोठा उपकार केला आहे. त्यांच्या कृपेनें नश्वर प्रपंचाची बंधने तुटून पडली आणि प्रपंचाचा विसर पडला. ज्या प्रपंच्याच्या मोहाने अनेक दुराचार घडतात त्या प्रपंचा पासून सुटका झाली, काम व क्रोध चित्तातून हद्दपार झालें. आशातृष्णा जाळ्यांत अडकलेलें मन जाळे तोडून मुक्त झाले. कामनेचे पूर्ण उच्चाटन झाले, अत्यंत गोड फळे देणार्या परमार्थाची ओळख पटली. असे एका जनार्दनी म्हणतात.

243

सर्व भावें दास झालों मी उदास। तोडिला मायापाश जनार्दने
माझें मज दाविलें माझें मज दाविलें। उघडें अनुभवले परब्रह्म
रविबिंबा परी प्रकाश तो केला। अंधार पळविला काम क्रोध
एका जनार्दनी उघडा बोध दिला।तो चा टिकवला हृदया माजी

भावार्थ

जनार्दन स्वामींनी केलेल्या उपदेशाने ऐहिक गोष्टीं बाबत उदासीन वृत्ती निर्माण झाली. स्वामींचा एकनिष्ठ दास बनलो. स्वता:चे आत्मरुप बघावयास मिळाले, परब्रह्म स्पष्टपणें अनुभवास आले.आत्मबोधारुपी सूर्यप्रकाशाचा उदय झाला, काम क्रोधाचा अंधार नाहीसा झाला. सद्गुरू जनार्दन स्वामींचा उपदेश हृदयांत कायमचा ठसविला असे एका जनार्दनी सांगतात.

244

अभिनव गुरुने दाखविले। ओहं सोनं माझे गिळिलें प्रपंचाचे उगवोनि जाळे ।केलें षडवैरियांचे तोंड काळें उदो-अस्ताविण प्रकाश । स्वयें देही दाविला भास मीपण नाहीं उरले। एका जनार्दनी मन रमलें

भावार्थ

सद्गुरूघ्या कृपेने मी-तू पणाचे सर्व भेदाभेद नाहिसे झाले.प्रपंचाचे जाळें मोकळे झाले.काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ,अहंकार या षड्ररिपूंनी तोंड काळें केले.सूर्योदय व सूर्यास्त या शिवाय निरंतर आत्मबोधाचा प्रकाश सर्व देही भरून राहिला.एका जनार्दनी म्हणतात सद्गुरू वचनात मन कायमचे गुंतून राहिले.

245

अभिनव सांगतां विस्मयो दाटला। देही च भासला देव माझ्या
नवल कृपेचे विंदान कसे। जनार्दनें सरसें केलें मज
साधनाची आटी न करितां गोष्टी। हृदय-संपुटी दाविला देव
एका जनार्दनी एकपणें शरण । न कळे महिमान कांहीं मज

भावार्थ

सद्गुरूंनी सांगितलेल्या अभिनव गोष्टींनी विस्मय वाटला. आपल्या देहातच देव सामावलेला आहे या सत्य वचनाची प्रचिती आली. कोणत्याही साधनेचा आटापिटा न करता अंत:करणांत वसत असलेला देव दाखवला. एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूंचा महिमा अपार असून त्याचे वर्णन करणे शक्य नाही. सद्गुरूंना अनन्यपणे शरण जाणे च योग्य आहे.

246

पीक पिकलें प्रेमाचे। साठवितां गगन टांचें
भूमि शोधोनि पेरिलें बीज। सद्गुरू -कृपें उगवले सहज कामक्रोधांच्या उपटोनी बेडी। कल्पनेच्या काथा काढी एका जनार्दनी निभाव। विश्वंभरित पिकला देव

भावार्थ

प्रेमाचे एव्हढे अमाप पीक पिकले कीं, ते साठवण्यासाठी गगन अपुरे पडले. सुयोग्य अशी भूमी शोधून तेथे बी पेरले आणि सद्गुरू कृपेने ते बीज सहज उगवले. काम क्रोधाचे तण काढून टाकले, कल्पनेचा समूळ नाश केला. एका जनार्दनी म्हणतात, भाव-भक्तिच्या योगानें विश्वंभर देव प्रसन्न झाला.

247

भक्ति आणि मुक्ति फुकाचें ठेवणे। गुरु जनार्दन तुच्छ केलें
साधन आष्टांग यज्ञ तप दान ।तीर्थे तीर्थाटण शीण वाया
एका जनार्दनी दाविला आरसा।शुध्द त्यां सरिसा सहज झालों

भावार्थ

सद्गुरू जनार्दन स्वामींनी भुक्ति आणि मुक्ति या गोष्टी निरुपयोगी ठरवल्या आहेत. स्वामी या गोष्टी तुच्छ मानतात. यज्ञ, तप, दान, तीर्थयात्रा ह्या अष्टांग साधनांचा निरर्थक शीण होतो. एका जनार्दनी म्हणतात सद्गुरूंनी परम तत्वाचा आरसा दाखवून निजरुप प्रत्ययास आणले.

248

गुरु-कृपांजन पायो मेरे भाई। राम बिना कछु जानत नाहीं
अंतर राम बिहार राम। जहूं देखो तहं राम ही राम
जागत राम सोवत राम। सपनेमें देखो राजा राम
एका जनार्दनी भाव ही नौका। जो देखो सो राम सरिखा

भावार्थ

गुरु-कृपा रुपी अंजन डोळ्यांत घातले की, सारे विश्व रामरुप दिसू लागते. देहाच्या अंतरांत आणि बाहेर सर्वत्र रामाचे दर्शन घडते. जिकडे पहावे तिकडे रामरुप भरून राहिले आहे याचा प्रत्यय येतो.जागेपणी आणि झोपेंत तसेच स्वप्नांत देखील केवळ राम च दिसतो. एका जनार्दनी म्हणतात, राम-चरणाशी असलेला भक्ति -भाव हा च प्रत्ययकारी असून या भक्तिभावाने भेटणारा प्रत्येक जण राम च आहे असे वाटते.

249

ओहं कोहं सोहं सर्व आटलें। दृश्य द्रष्टत्व सर्व फिटले ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली द्वैत -अद्वैताचे जाळें । उगविलें कृपा-बळें शरण एका जनार्दनी । एकपणें भरला अवनी

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात मी-तूं पणाचे सर्व भेदाभेद नाहिसे झाले. दृष्टीस भासणारे सर्व विश्व निराभास झाले .द्रुष्य, द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी विलयास जाऊन द्वैत-अद्वैत यांचे मायाजाल विरुन भक्त आणि देव एकरुप झाले, हे सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा-प्रसादाने घडून आले.

250

वेणुनादाचिया किळा। पान्हा फुटला निराळा आर्तभूत जीव तिन्हीं । चातक निघाले जीवनीं स्वानुभवाचे सरिता। जेंवि जीवना दाटे भरते एका एक गर्जे घनीं । पूर आला जनार्दनी

भावार्थ

श्री हरीच्या बासरीचा स्वर कानी पडला आणि भक्तिभावना उचंबळून आल्या. आर्त, जिज्ञासू, आणि साधक हे तिन्हीं चातकरुपी जीव स्वानुभवरुपी सरितेच्या जीवनाने तृप्त झाले. एका जनार्दनी म्हणतात, जनार्दन स्वामींच्या कृपा प्रसादानें जीवनाचे सार्थक झाले.

आत्म-साक्षात्कार

251

चित्त चैतन्या पडली गांठी । न सुटे मिठी।
संचित कर्माची झाली आटी । उफराटी दृष्टि
कैचा आठव दृश्याचा खुंटली वाचा। उदय झाला सुखाचा
देह विदेह वाढले मीतूंपणे। एका जनार्दनी सहज एकपणें

भावार्थ

सद्गुरू कृपेने चित्त चैतन्य या अविनाशी तत्वाशी एकरुप झाले आतां त्यांची ताटातुट होणे शक्य नाही.पूर्विच्या संचित कर्मांची बंधने तुटून पडली.बाह्य विश्वाच्या दृश्यांवर जडलेलें मन उलटे फिरुन अंतर्यामी स्थिर झाले. अनिर्वचनिय सुखाचा उदय झाला, त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द सापडेनासे झाले. देह बुध्दी लयास जावून मी तूं पणाच्या द्वैत भावनेचा निरास झाला.एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरू कृपेने विदेही अवस्था सहज प्राप्त झाली.

252

जाणती हे कळा हारपोनि गेली ।वृत्ति मावळली तया माजीं
पाहतां पाहणें हारपोनि गेले। मी माझे सरलें तयामाजीं
अंतरी बाहेरीं पाहतां शेजारी। शून्याची वोवरी ग्रासियेली
ग्रासियेले तेणें चंद्र सूर्य दोन्ही। एका जनार्दनी आनंद झाला

भावार्थ

जाणिवेची कळा लोप पावली, मनाच्या सर्व वृत्ती मुळापासून मावळल्या, पाहतां पाहतां सर्व दृष्ये हारपून गेली. एका जनार्दनी म्हणतात, मनाचे मीपण त्या साक्षात्कारांत संपून गेलें. चित्ताच्या अंतरंगात,बाह्यविश्वांत सभोवतालच्या अवकाशात ते च आत्मरुप व्यापून राहिले. त्या आत्मरुपाने चंद्र, सूर्याला ग्रासून टाकलें.या आत्मरुपाच्या साक्षात्काराने अवर्णनीय आनंदाचा अनुभव आला.

253

सत्व रज तम गेले निरसोनि । दृश्याची लावणी कैसी झाली
गेल्या माघारीं पाहतां न दिसे । स्वतां तो प्रकाश सदोदित
अंतरीं बाहेरीं पाहतां शेजारी। प्रकाश अंतरीं लखलख
एका जनार्दनी प्रकाश संपूर्ण । सवे नारायण बिंबलासे

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, या अविनाशी आत्मरुपांत त्रिगुणात्मक (सत्व,रज,तम)सृष्टी विरुन गेल्या सारखं वाटले.सारे विश्व मावळलें.मागे वळून पाहताना केवळ प्रकाशा शिवाय कांहीच दिसेनासे झाले.त्या लखलखीत प्रकाशाने सर्व विश्व अंतर्बाह्य व्यापून टाकले.सूर्यनारायण उदयास आले.

254

त्रिभुवनाचा दीप प्रकाश देखिला। हृदयनाथ पाहिला जनार्दन
दीपांची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देहीं दिसे
चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योति। एका जनार्दनी भ्रांति निरसली

भावार्थ

अंतरंगात वसत असलेल्या सद्गुरू जनार्दन स्वामींचे दर्शन झाले आणि त्रिभुवन उजळून टाकणाऱ्या दिपाच्या प्रकाशाचा भास झाला. सद्गुरू कृपेचा दीप व वातीचा प्रकाश दीप कलिके सारखा हृदयाच्या गाभार्यांत प्रकाशमान झाला असे एका जनार्दनी सांगतात.

255

काना वाटे मी नयनासी आलो। शेखीं नयनाचा नयन मी झालो
दृष्टि, द्वारा मी पाहें सृष्टि। सृष्टि हरपली माझें पोटी
ऐसें जनार्दनें मज केलें। माझें चित्ताचें जीवपण नेले
एका जनार्दनी जाणोनि भोळा । माझे सर्वांग झाला डोळा

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेची किमया आपण कानांनी ऐकली आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालो, स्वामींचे दर्शन होतांच नयनांना नविन दृष्टी प्राप्त झाली. आत्म-स्वरुपाचे रहस्य समजून आले आणि बाह्य- सृष्टि लोप पावली. आत्मरुपाच्या साक्षात्काराने देहाचे मी पण , चित्ताचे जीवपण विलयास गेले. सर्वत्र चैतन्य रुप दिसू लागले. सर्वांग डोळा बनून या चैतन्य स्वरुपाचा विलक्षण अनुभव आला.

256

उपाधीच्या नांवे घालियेलें शून्य। आणिक दैन्यवाणें काय बोलू
टाकुनिया संग धरियेला देव। आतां तो उपाय दुजा नाहीं
सर्व वैभव सत्ता जयाचें पदरीं। झालों अधिकारीं आम्ही बळें
एका जनार्दनी तोडियेला संग।झालों आम्ही नि:संग हरिभजनें।

भावार्थ

एका जनार्दनी या भजनांत म्हणतात,सद्गुरू जनार्दन स्वामींच्या उपदेश प्रमाणे त्यांनी सर्व उपाधी सोडून दिल्या इंद्रियांचा संग सोडून देऊन केवळ देवाला आपलासा केला.हरिभजनाचा छंद लागला,या छंदाने मन नि:संग झाले. सर्व वैभव,सद्गुरूंचे असून ते च सर्व सत्ताधारी आहेत,त्यांच्या च कृपेनें अधिकारी बनलो.

257

माझें मीपण देहीं चि मुरालें । प्रत्यक्ष देखिलैं परब्रह्म
पर -ब्रह्म सुखाचा सोहळा । पाहिलास डोळा भरुनिया
ब्रह्म-ज्ञानाची तें उघडली पेटी। झालो असें पोटीं शीतळजाणा
एका जनार्दनी ज्ञानाचें तें ज्ञान। उघड समाधान झालें जीवा

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ परब्रह्म स्वरुपाचा अनुभव वर्णन करीत आहेत.परब्रह्म सुखाचा अवर्णनीय सोहळा त्यांनी डोळे भरून पाहिला आणि त्यांचे मीपण लयास गेले.ब्रह्मज्ञानाचे रहस्य उलगडले,अंतःकरण शांत झाले. एका जनार्दनी म्हणतात परब्रह्म हे साक्षात ज्ञान त्या ज्ञानाचे रहस्य समजले.मन पूर्ण समाधान पावले.

258

मन रामीं रंगलें अवघे मन चि राम झालें
सबाह्य अभ्यंतरी अवघें रामरुप कोंदलें

चित्त चि हारपलें अवघें चैतन्य चि झालें
देखतां देखतां अवघे विश्व मावळलें

पाहतां पाहतां अवघें सर्वस्व ठकलें
आत्मा रामाचें ध्यान लागलें मज कैसे

क्रिया कर्म अवघे येणें चि प्रकाशें
सत्य मिथ्या प्रकृती पर राम चि अवघा भासे

भक्ति अथवा ज्ञान शांति आणिक योग - स्थिति
निर्धारितां न कळें राम-स्वरूपीं जडली प्रीति
एका जनार्दनी अवघा राम चि आदी अंती

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ अपूर्व भक्ती-रसाच्या अनुभवाचे वर्णन करतात.मन राम-नामांत इतके रंगून गेले की मन रामरुपच झालें.अंतरांत आणि बाह्य विश्वांत सर्वत्र रामरुपच कोंदून राहिले आहे असे वाटले.चित्त या रामरुपी चैतन्यांत हारपून गेले आणि पाहतां पाहतां सारा विश्वाचा भास दिसेनासा झाला. मी पणाची जाणिवच संपून गेली.आत्मारामाच्या स्वरुपाचे अखंड ध्यान लागले. भासमान,मायावी प्रकृतीत केवळ रामच भरून राहिला.भक्ति, ज्ञान योग आणि शांति यांचे मनवरील पटलच दूर झाले आणि राम-स्वरूपावर प्रिति जडली.एका जनार्दनी म्हणतात, रामच केवळ विश्वाच्या आदी अंती आहे याचा साक्षात्कार झाला.

सर्वत्र देवदर्शन

259

जन देव जन विजन । देवीं जडले तन मन
देव घरीं देव दारीं । देव दिसे व्यवहारी।
देव मागे देव पुढें । दृष्टि चैतन्य उघडें
एका जनार्दनी देव । सहज चैतन्य स्वयमेव

भावार्थ

तन मन परमेश्वरी चरणांशी गुंतून राहिले कीं, जनांत आणि वनांत सगळीकडे देवाचे अस्तित्व जाणवते. चार भिंतिंच्या आंत घरांत आणि बाहेर व्यवहारात देव दिसू लागतो. मागे पुढे सभोताली दृष्टिपुढे चैतन्याचा अनुभव येतो. एका जनार्दनी म्हणतात, चैतन्य सहजपणे एकमेव पुढे उभे ठाकले आहे असे वाटते.

260

पाहो गेलो देवालागीं । देवरुप झालो अंगी।
आतां मी-तूंपणा ठाव । उरला नाहीं अवघा देव
सुवर्णाची झालीं लेणीं । देव झाला जगपणीं
घटीं मृत्तिका वर्तत । जगीं देव तैसा व्याप्त
एकानेक जनार्दन । एका जडला एकपणें

भावार्थ

देव-दर्शनासाठी दवालयांत गेलो आणि देवाशी एकरुपता पावून देवरुप झालो. देव व भक्त वेगळे उरलेच नाही, सारे द्वैत संपून गेले. सुवंर्णाचे अलंकार घडवले, रुप आणि आकार बदलला तसाच परमेश्वर सर्व सृष्टीत भरून राहिला आहे. मातीच्या घटांत आंतबाहेर जशी माती च असते तसा देव सर्व जग व्यापून उरणारा आहे. एका जनार्दनी म्हणतात , तसेच ह्या गुरुतत्वाशी आपण एकरुप झालो आहे.

261

देव झाला पाठीं पोटीं । तया नाहीं आटाआटी
जेथें जाय तेथें देव । नाहीं भेद सर्वथा
संसारासी मारुनि लाथा । केला तत्वतां देशोधडी
विषयाचे ठेचिलें तोंड । मोडिलें बंड पाचांचे
एका जनार्दनी एकपणा साठीं ।देव पाठी पोटी भक्ता मागें

भावार्थ

ज्या भक्ताला पुढे मागे देवाचे अस्तित्व जाणवू लागते त्याला साधनेचा आटापिटा करावा लागत नाहीं. स्थल-कालाचा भेद नाहिसा होऊन त्याला सर्वत्र देव दिसतो. पअसा एकनिष्ठ भक्त संसाराला लाथ मारून जगापासून अलिप्त होतो. इंद्रिय विषयांचा संग टाळून मुक्त होतो. पंचमहाभुतानी बनलेल्या देहाचे बंड मोडून टाकतो. एका जनार्दनी म्हणतात, या एकनिष्ठ भक्तांच्या भक्ति साठी देव त्यांच्या मागे पुढे वावरत असतो.

262

अष्ट हि दिशा पूर्ण भरला देव। मा पूर्व-पश्चिम भाव तेथें कैचा
पाहे तिकडे देव व्यापूनि भरला। रिता ठाव उरला कोठे नाही
समाधि समाधान मनाचे उन्मन। मा देवा भिन्नपण नाही नाही
एका जनार्दनी एकपणा साठीं। देव पाठीं पोटीं भक्ता मागे

भावार्थ

परमेश्वर आठही दिशा व्यापून भरून राहिला आहे.सर्वत्र देवाचे अस्तित्व जाणवत असल्याने पूर्व , पश्चिम असा भेद नाहिसा झाला. सर्व विश्वांत देव व्यापून राहिल्याने रिक्त जागा दिसेनासी झाली. बघता बघता मन समाधी अवस्थेत गेले. उच्च पातळीवर जाऊन स्थिर झाले आणि अपूर्व समाधान झाले.असा आत्म साक्षात्काराचा अनुभव वर्णन करुन एका जनार्दनी म्हणतात, भक्ताच्या प्रेमसुखाचा आनंद घेण्यासाठी देव भक्ताच्या सभोवती सतत नांदतो.

263

साकर दिसे परी गोडी न दिसे । ती काय त्या वेगळी असें
तैसा जनीं आहे जनार्दन। तयातें पहावया सांडीं अभिमान
कापुरा अंगीं परिमळू गाढा । पाहतां पाहतां केवीं दिसे
पाठ पोट जैसें नाही चि सुवर्णा। एका जनार्दनी यापरी जाणा

भावार्थ

साखर आणि साखरेची गोडी जशी एकजीव असूनही साखर डोळ्यांना दिसते पण गोडी वेगळी दिसत नाही.कापुराचा नाकाला जाणवणारा सुवास उघड्या डोळ्यांनी बघता येत नाही. सोन्याचे नाणे जसे अंतर्बाह्य सोन्याने भरलेलें असते तसे सृष्टीच्या अणुरेणूत भरलेले आत्मतत्व जाणावे, जनांत अंशरुपानें भरलेला जनार्दन प्रत्यक्षात दिसत नाही ,या दैवी शक्ती चा अनुभव घेण्यसाठी अहंकार दूर करावा. असे एका जनार्दनी म्हणतात .

264

मागें पुढे विठ्ठल भरला । रिता ठांव नाहीं उरला
जिकडे पाहावे तिकडे आहे। दिशा-द्रुम भरला आहे
एका जनार्दनी सर्व देशी । विठ्ठल व्यापक निश्चयेंसीं

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ विठ्ठल तत्व किती व्यापक आहे हे सांगत आहेत . जिकडे पाहावे तिकडे , मागे, पुढे दाही दिशांत हे इश्वरी रुप भरुन राहिलें आहे. हा विठ्ठल एकदेशीय नसून सर्व चराचरात त्याचे अस्तित्व जाणवते हे नि:संशय सत्य आहे असे एका जनार्दनी म्हणतात.

265

पहा कैसा देवाचा नवलाव। पाहे तिकडे अवघा देव
पाहणें पातलें देवे नवल केलें। सर्व हि व्यापिलें काय पाहीं
पहाणेयाचा ठाव समूळ फिटला।अवघा देहीं दाटला देव माझ्या
एका जनार्दनी कैसे नवल झाले। दिशाद्रुम दाटले देहें सहजी

भावार्थ

परमेश्वरी शक्तीचा चमत्कार असा कीं, जिकडे पाहावे तिकडे देव च दिसतो. देव रुप च सर्व आसमंतात व्यापून राहिले आहे तर त्या इश्वरी रुपा शिवाय अन्य काही नजरेस पडत नाही आणि पहाणाराही त्या रुपाशी एकरुप होतो. हे दैवी-रुप देहाच्या अणुरेणूत व्यापून राहते. एका जनार्दनी म्हणतात, सारे विश्व या देहांत सामावले आहे ही अनुभूती विस्मयकारक आहे.


266

देवासी कांहीं नेसणें नसे । जेथे तेथें देव उघडा चि दिसे
देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पहा तुम्ही
लाजेसीं जेथें नाही ठाव ।पांढरा डुकर झाला देव
एका जनार्दनी एकल्या काज । भक्ति तेणें चि नेली लाज

भावार्थ

देव भक्तिभावाचा एव्हढा भुकेला आहे कीं, त्याचा लज्जा भाव लोपून गेला आहे अशी एक वेगळी कल्पना या भजनांत वाचायला मिळते. देव भक्तांसाठी आपले अंतर्बाह्य स्वरुप उघड करुन दाखवतो , देव निलाजरा आहे असा संदैश एका जनार्दनी देतात.

267

एक धरलिया भाव । आपण चि होय देव
नको आणिक सायास । जाय तिकडें देव भास
ध्यानीं मनीं शयनीं । देव पाहे जनीं वनीं
अवलोकीं जिकडे । एका जनार्दनी देव तिकडे

भावार्थ

मनामध्ये भक्तिभाव दृढ असला म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी आणखी काही वेगळे सायास करण्याची गरज नाही.असा एकनिष्ठ भक्त ध्यान करीत असताना, चिंतन करताना , एकांतवासांत अथवा जनसमुहांत कोठेही असला तरी तो देवाच्या अस्तित्वाचा अनुभव घेत असतो, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, असा भक्त आपणच देव होतो.

268

मज करुं दिली नाहीं सेवा । दाविलें देवा देहीं च
जग व्यापक जनार्दन । सदा असे परिपूर्ण
भिन्न भिन्न नाहीं मनीं । भरलासे जनीं वनीं
अवलोकी जिकडे । एका जनार्दनी देव तिकडे

भावार्थ

सद्गुरु कृपेने आपणास या देही च परमेश्वरी शक्तिची प्रचिती आली कोणत्याही प्रकारची सेवा न घडतां हे फळ मिळाले असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सर्व विश्व व्यापून असलेला हा जनार्दन सर्वज्ञानी, परिपूर्ण असून भेदातीत आहे.

269

पाहलें रे मना पाहलें रे। बुध्दी -बोधें इंद्रिया सम जालें रे
नयनी पाहतां न दिसे बिंब। अवघा प्रकाश स्वयंभ
एका जनार्दनी पहाट। जनीं वनीं अवनी लखलखाट

भावार्थ

बुध्दिला झालेल्या पारमार्थिक बोधाने इंद्रियांना समत्व प्राप्त झाले, डोळ्यांना सूर्य-बिंब दिसनासे झाले. ज्ञान-सूर्याचा उदय झाल्यानें अवघे विश्व स्वयंभू प्रकाशाने उजळून निघाले. एका जनार्दनी म्हणतात, नगर, वन, सारी पृथ्वी या स्वयंभू प्रकाशाने न्हावून निघाली, सगळीकडे लखलखाट झाला.

270

जळ स्पर्शो जातां स्नानीं । तंव चिन्मय भासे जीवनी
कैसी वाहताहे गंगा । स्नानें हरपलें अंग
अंगत्व मुकलें अंगा । स्नानीं सोवळीं झाली गंगा
एका जनार्दनी मज्जन । सकळ तीर्थे झाली पावन

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरू गंगेच्या प्रवाहांत स्नानासाठी उतरले आणि त्या पवित्र जलाने देहाचे देहपण च हरपले, चिरंतन इश्वरी तत्वाचा जीवनाला स्पर्श झाला आहे असा भास झाला. गंगा-जलाची मलिनता लोप पावली. सकळ तीर्थे पावन झाली.

271

स्वयं प्रकाशामाजीं केले असे स्नान।
द्वैतार्थ त्यागून निर्मळ झालो
सुविद्येचे वस्त्र गुंडोनि बैसलो ।
भूतदया ल्यालों विभूति अंगीं

चोविसा परतें एक ओळखिलें ।
तें चि उच्चारिलें मूळारंभीं।
एका भावें नमन भूतां एकपणीं ।
एका जनार्दनी संध्या झाली

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ पारमार्थिक संध्येचे वर्णन करीत आहेत. ज्ञान -सूर्याच्या स्वयं प्रकाशांत स्नान केल्याने चित्तातिल द्वैत-भावाची मलिनता लोप पावून चित्त निर्मळ झाले. सुविद्येचे वस्त्र नेसून भूतदयेची विभूति अंगाला लावली. चोविस तत्वाच्या पलिकडे असजलेल्या ॐ काराचा उच्चार मूळारंभी करून सर्व प्राणिमात्रांना नमन केले. अशा प्रकारे संध्या-पाठ संपूर्ण झाला.

272

झाली संध्या संदेह माझा गेला ।आत्माराम ह्रदयीं प्रगटला
गुरु-कृपा निर्मळ भागीरथी। शांति क्षमा यमुना सरस्वती
ऐसीं पदे एकत्र जेथें होती। स्वानुभव स्नान हे मुक्त-स्थिति
सद्बुद्धीचे घालुनि सुखासन। वरी गुरुची दया परिपूर्ण
शम-दम विभूति चर्चुनि जाण। वाचे उच्चारी केशव नारायण
सहज कर्मे झालीं तीं ब्रह्मार्पण। जन नोहे अवघा हा जनार्दन
आइकता निववी साधुजन। एका जनार्दनी बाणली निजखूण

भावार्थ

एका जनार्दनी या भजनांत सांगतात, संध्या झाली आणि मनातिल संदेह समूळ नाहिसा झाला. ह्रदयांत आत्माराम प्रगट झाला .गुरु-कृपेची भागीरथी, शांतिरुपी यमुना आणि क्षमा रुपी सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमांत स्वानुभवाचे स्नान करून मुक्त-स्थिती प्राप्त झाली. सद्बुद्धीचे सुखासन घालून शम-दमाची विभूति अंगाला लावली. वाचेने केशव नारायण या नामाचा जप सुरू केला. या पुण्याईने सारी कर्मे सहजपणे इश्वर-चरणी अर्पण केली. गुरु-कृपेने जनीं वनीं अंत:करणी एकच जनार्दन भरुन राहिला आहे असा साक्षात्कार झाला. ही श्रध्दा चित्तांत कायम स्वरुपी दृढ झाली.

273

बोधभानु तया नाहीं मध्याह्नु।
सायंप्रातर् नाही तेथें कैचा अस्तमानु
कर्म चि खुंटले करणें चि हारपलें।
अस्तमान गेलें अस्तमाना
जिकडे पाहे तिकडे उदयो चि दिसे।
पूर्व पश्चिम तेणें कैची भासे
एका जनार्दनी नित्य प्रकाश ।
कर्माकर्म झालें दिवसा चंद्र जैसा

भावार्थ

निरंतर प्रकाशणाय्रा ज्ञान -सूर्याला सकाळ, दुपार,संध्याकाळ या काळाचे बंधन नसते, उदय आणि अस्त या स्थितिच्या मर्यादा नसतात. तसेच पारमार्थिक बोध झालेल्या साधकाचे कर्म ,अकर्माचे बंधन गळून पडते.या साधकाच्या दृष्टीने जिकडे पाहावे तिकडे प्रकाशच असतो ,मावळणे ही क्रियाच अस्तित्वांत नसते. पूर्व, पश्चिम (उगवती आणि मावळती) या दिशांचे भान ही हरपून जाते. एका जनार्दनी म्हणतात, या आत्मज्ञानी साधकाचे कर्माकर्म दिवसा दिसणाऱ्या चंद्रा सारखे निस्तेज असते.

274

कृष्ण चंदन आणिलें । सकळ वेधिलें परिमळें
तेथें फुटती अंकुर । अंगी भावाचे तरुवर
खैर घामोडे चंदन । कृष्ण-वेधे वेधिलें मन
एकाएक हरिख मनीं । वसंत दाटे जनार्दनी

भावार्थ

या भजनांत संत एकनाथांनी कृष्ण भक्तीवर सुंदर रुपक योजले आहे. श्री कृष्णरुपी चंदनाच्या सुगंधाने सर्वांचे मन वेधून घेतले. सर्वांच्या देहावर भावभक्तीचे अंकुर फुटले. एका जनार्दनी म्हणतात, मनाच्या प्रांगणात वसंताचे आगमन झाले. आनंदाने मन भरून गेले.

275

आतां कैसेनि पुजूं देवा । माझी मज घडें सेवा
तोडू गेलो तुळसी-पान । तेथें पाहतां मधूसूदन
पत्र गंध धूप दीप । तें हि माझें चि स्वरुप
एका जनार्दनी पुजा । पूज्य पूजक नाही दुजा

भावार्थ

या। भजनांत संत एकनाथ देवपुजेच्या संदर्भांत एक नविनच कल्पना मांडतात. देवपुजेसाठी तुळशीचे पान तोडायला गेलो असतांना मधुसूदनाचे दर्शंन घडलें. पाने, फुले, गंध, धूप, दीप हे सर्व पूजा साहित्य स्वता:चीच रुपे आहेत असे वाटले. एका जनार्दनी म्हणतात, पूजा करणारा आणि पूजेचे आराध्य दैवत वेगळे नसून एकरुप च आहेत आतां देवाची पूजा कशी करता येईल.

276

मी चि देवो मी चि भक्त । पूजा उपचार मी समस्त
ही चि उपासना भक्ति । धर्म अर्थ सर्व पुरती
मी चि गंध मी चि अक्षता । मी चि आहे मी चि पुरता
मी चि धूप मी चा दीप । मी माझें देव स्वरूप
मी चि माझी करीं पूजा । एका जनार्दनी बोले वाचा

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ देवपूजे विषयी एक वेगळाच दृष्टिकोन व्यक्त करतात. पूजा करणारा भक्त हाच पूजेचा उपचारही आहे,पूजे पासून मिळणारे फळ (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) हे सुध्दा तो भक्त च आहे, पूजेला लागणारे सर्व साहित्य (गंध, धूप, दीप, अक्षता इ.) हे सुध्दा त्यां भक्ताचे च रुप आहे. ईतकेच नव्हे तर ज्याची पूजा केली जाते तो देव देखील भक्त च आहे. एका जनार्दनी म्हणतात, सतत केलेल्या उपासनेने देव भक्तातील द्वैत संपून भक्त आणि देव एकरुप होतात.

39 ज्ञोनोत्तर जीवन

277

मी तो स्वयें परब्रह्म । मी चि स्वयें आत्माराम
मी तो असे निरूपाधी । मज नाही आधि -व्याधि
मी तो एकट एकला । द्वैत-भाव मावळला
मज विण नाहीं कोणी । एका शरण जनार्दनी

भावार्थ
आत्मज्ञान झालेल्या साधकाचे मनोगत या अभंगांत संत एकनाथ व्यक्त करतात. आपणास कोणतिही आधि, व्याधी, उपाधी नाहीं. चित्तातील द्वैत भाव लयाला जाऊन परब्रह्म रुपाशी एकरूप झालो असून सद्गुरू चरणी सर्वभावे शरणागत आहे असे एका जनार्दनी म्हणतात.

278

घर सोडोनि जावें परदेशा । मज सवें देव सरिसां
कडे कपाटें सीवरी । जिकडे पाहे तिकडे हरि
आतां कोणीकडें जावें । जिकडें पाहे तिकडें देव
एका बैसला निरंजनी । न जाईजे जनीं वनीं

भावार्थ

घराचा त्याग करून परदेशी गेलो तरी देव सतत आपल्या समवेत आहे ही जाणीव असल्याने एकनिष्ठ भक्ताला जिकडे पाहावे तिकडे देवाचे अस्तित्व जाणवते. एका जनार्दनी म्हणतात, देव नाही असे ठिकाण च नसल्याने नगरांत किंवा अरण्यांत कोठेही न जातां एका ठिकाणी निवांत बसावे.

279

जिकडे जावें तिकडे देवचि सांगातें। ऐसे केले नाथें पंढरीच्या
शब्द तेथें झाला समूळ चि वाव। गेला देहभाव हारपोनि
अंतरी बाहेरीं एकमय झाले। अवघे कोंदाटलें परब्रह्म
एका जनार्दनी ऐसी झाली वृत्ती। वृत्तीची निवृत्ती चिदानंदीं

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, पंढरीच्या विठ्ठलाने अशी जादू केली कीं, जिकडे जावे तेथे देव सन्निध आहे असे वाटते. बाहेरील विश्व आणि अंतरंग विठ्ठलमय झालें. देहाचे भान हरपून गेले. सृष्टीतील अणू, रेणू या परब्रह्म स्वरुपाने व्यापून टाकले.या चे वर्णन शब्दात करावें तर शब्द च पोकळ ठरले. या चिदानंद स्वरूपांत वृत्तीची निवृत्ती झाली.

280

येणें जाणें खुंटलें क्रिया -कर्म ठेले। मज माझें भेटले आत्मरुप
त्यागूं तें काय भोगूं ते काय। सर्व ब्रह्मरूप पाहे कोंदाटलें
क्रिया कर्म धर्म निखिल परब्रह्म। त्यागूं भोगूं तेथें केवळ भ्रम
एका जनार्दनी सहजीसहज एक। एकी एक पाहतां कैंचेअनेक

भावार्थ

साधकाच्या ज्ञानोत्तर जीवनात कोठे येणे जाणें, क्रिया कर्म संपून जाते.आत्मज्ञान झाल्यानंतर कांही मिळवायचे बाकी राहत नाही.काही भोग किंवा कशाचा त्याग करण्याची ईच्छा च उरत नाही. त्याग, भोग या केवळ भ्रामक कल्पना आहेत असे वाटते.सर्व क्रिया, कर्म, धर्म एका परब्रह्मांत विलीन होतात. एका जनार्दनी म्हणतात, सर्वत्र व्यापून राहिलेल्या परब्रह्माचा एक अंश बनल्यावर दुजेपणाची वार्ता संपून जाते.

281

सकळ गोडिये जें गोड आहे । तें रसना चि झाली स्वये
आतां चाखावें तें कायें। जिव्हा अमृता वाकुल्या दिये
तया गोडपणाच्या लोभा । कैशा सर्वांगीं निघती जिभा
एका जनार्दनी गोडी । तया क्षण एक रसना न सोडी

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेल्या उपदेशामृताची गोडी रसनेने चाखली आणि सर्व गोड पदार्थापेक्षा मधुर रुप रसनेनें धारण केले. रसनेलाच एव्हढी गोडी प्राप्त झाली कीं त्यापुढे अमृताची गोडी फिकी पडली. रसनेचे हे माधुर्य चाखण्यासाठी सर्वांगाला जिभा फुटल्या. गुरु- मुखांतून आलेल्या उपदेशाच्या अमृताची गोडी एक क्षणभरही सोडण्यास रसना तयार नाही.

एकनाथांचे अभंग

मंगलाचरण

1

ॐ नमो सद्गुरूनिर्गुणा। पार नाही तंव गुणा। बसोनि माझिया रसना। हरिगुणा वर्णवी ।।1।।
हरिगुण विशाल पावन। वदवीं तूं कृपा करून । मी मूढमती दीन। म्हणोनि कींव भाकितसें।। 2।।
तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसें चरण। सद्गुरू आदरें।। 3।।

भावार्थ

मंगलाचरणाच्या आरंभी संत एकनाथ आपले सद्गुरू जनार्दन स्वामी जे अपरंपार गुणांनी युक्त असून निर्गुण(सत्व,रज,तम) या गुणांच्या अतीत आहेत त्यांची करुणा भाकित आहेत. आपण मूढमती असून श्रीहरिचे अगणित, पावन गुण वर्णन करण्यास असमर्थ आहोत असे विनयाने सांगून सद्गुरूंच्या चरणांना वंदन करून त्यांचा कृपा प्रसाद मागत आहेत.सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली की हरिगुण वर्णन करणे शक्य होईल असा विश्वास ते प्रकट करतात.

2

नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचे।। 1।।
करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्वतां चालतसे ।।2।।
एका जनार्दनी तुमचा मी दास। येवढी ही आस पुरवावी ।।3।।

भावार्थ

सद्गुरू चरणांचे दास असलेले एका जनार्दनी आपली मागणी सद्गुरूंनी पूर्ण करावी अशी विनंती करतात आणि व्यासादिक कवी जे पारमार्थिक धनाचे भांडार असून ज्यांच्या उपदेशाने अनेक साधक तरून गेले आहेत अशा ज्ञान वंतांनी आपणास उपदेश करून उपकृत करावें अशी ईच्छा व्यक्त करतात.

3

परा पश्यंती मध्यमा वैखरी। नमियेली खरी आदिमाया।।1।।
वसोनिया जिव्हे वदावें कवित्व।हरिनामीं चित्त निरंतर ।।2।।
आणि संकल्प नाहीं माझे मनीं। एकाजनार्दनी वंदितसे।।3।।

भावार्थ

परा पश्यंती,मध्यमा,वैखरी या चारी वाणींची देवता आदिशक्ती आदिमाया असून तिला वंदन करुन एका जनार्दनी या आदिमायेने आपल्या जिव्हाग्री वसून कवित्व वदवावे अशी प्रार्थना करतात. हरिनामाशी आपलें चित्त निरंतर जडून राहावे या शिवाय वेगळा कोणताही संकल्प आपल्या मनांत नाही अशी मागणी एका जनार्दनी आपल्या सद्गुरूकडे करतात.

4

श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी। म्हणोनि विनवणी करीतसों ।।1।।
मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादर वदवावें ।।2।।
न कळेचि महिमा उंच नीचपणें। कृपेचे पोसणें तुमचे जाहलो ।।3।।
एका जनार्दनी करुनी स्तवन। घातिलें दुकान मोलेंविण ।।4।।

भावार्थ

सद्गुरूंचे अगणित गुण आठवून त्या गुणांचे स्तवन करुन विनवणी करतांना एका जनार्दनी म्हणतात, हरिनामाचा आदर करुन आपण हरिचे गुण काव्यात रचण्याचा संकल्प केला असून सादरी करणासाठी सद्गुरुंची कृपा प्राप्त व्हावी अशी मनोमन प्रार्थना करीत आहेत.यासाठी लागणारी काव्यप्रतिभा अंगी नसतांना हा (मालाविण दुकान घालण्याचा उद्योग) काव्य-रचनेचा घाट घातला आहे.आतां कृपावंत होऊन सद्गुरूंनी सहाय्य करावें.

5

असतां बंदीशाळे। देवकी डोहळे। गर्भ घननिळे आथियेला।।1।।
गुज पुसे भ्रतारा। आनु नेणें दुसरा आवडी अवधारा । जिवा होय ।।2।।
मेळवुनि लेंकुरें । खेळ खेळावा साकार। गोकुळीं अवतार। गौळिया घरी।। 3।।
वर्षता शिळाधारीं। उचलला महागिरीं। वेणु पावे करीं। वाजवीत ।। 4।।
जळीं रिघ करावा । भवसर्प नाथावा। वरि बैसो बरवा। भाव माझा।। 5।।
कंसादिक वीर। त्यांचा करावा संहार । कीजे राज्यधर। उग्रसेना ।।6।।
एका यश द्यावे। त्रैलोक्य जिंकावें । कनकपूर वसवावें। सिंधूमाजीं ।।7।।
एका जनार्दनी । डोहाळे संपूर्ण । पुरवी नारायण। वासनेचे ।।8।।

भावार्थ

कंसाच्या बंदीशाळेंत असलेली देवकी आपले डोहाळे वासुदेवाला सांगत आहे. गोकुळांत गवळ्या-घरी अवतार घेऊन सवंगडी जमवून खेळ खेळणारा, हातांत वेणू घेऊन पावा वाजवणारा, शिळंधार पावसांत गोवर्धन पर्वत करांगुली वर उचलून धरणारा, यमुनेच्या जळांत शिरून कालिया सर्पाला घालवून लोकांना भय-मुक्त करणारा,कंसा सारख्या दुष्टांचा संहार करणारा, उग्रसेनाला राजपद मिळवून देणारा, त्रैलोक्य जिंकून समुद्रात सोन्याची द्वारका वसवणारा, असा घननीळ जन्माला यावा असे वाटते. हे आपल्या मनीचे डोहाळे नारायणाने पूर्ण करावेत असे देवकी आपल्या पतीदेवाला कारागृहांत सांगत आहे.


6


देवकी  निज उदरीं। गर्भाची  पाहे थोरी। तंव सबाह्य  अभ्यंतरीं। व्यापक श्रीकृष्ण ।।1।।

अगे  हा स्वत: सिध्द हरी।  स्वयंप्रकाश  करीं । मीपणा  माझारीं। गर्भ वाढे।। 2।।

आतां  नवल कैसे  परी। आठवा गर्भ धरी। त्याहि  गर्भा माझारीं।  मज मी देखे।। 3।।

दाहीं  ईद्रिया माझारीं। गर्भाची वाढे  थोडी। कर्म तदाकारी । इंद्रिय वृत्ति  ।।4।।

चितप्रकाशासी डोहळे। सद्रूप सोहळे। आनंदकल्लोळे  गर्भ वाढे।। 5।।

तेथें  स्वस्वरूपस्थिती ।सुखरुप  प्रसुती। आनंद त्रिजगतीं  परिपूर्ण।।6।।

एकाजनार्दनी । ज्ञानगर्भु  सार । चिद्रूप  चराचर। निखळ नांदू।। 7।।


भावार्थ


आपल्या  उदरांत वाढणाऱ्या  गर्भाचे देवकी माता कौतुकाने निरिक्षण  करीत असतांना  देहाच्या आंतबाहेर  व्यापकपणे  श्रीकृष्ण  रुप भरुन राहिले आहे,  हे रुप स्वयंसिद्ध असून स्वयंप्रकाशी  आहे असा अनुभव  येऊ लागला. विशेष नवलाची  गोष्ट अशी कीं,  या आठव्या गर्भाच्या  अंतरी देवकी  मातेला आपले  रुप दिसत आहे, पांच कर्मेंद्रिये  आणि पांच ज्ञानेंद्रियें यांच्या  सर्व वृत्ति हरिरुपाशी तदाकार झाल्या  आहेत असा  अनोखा अनुभव येऊ लागला. सद्चिदानंद स्वरुपांत देवकी तल्लीन झाली. स्वस्वरुपस्थिची  अखंड जाणीव चित्त व्यापून राहिली , त्रैलोक्य निरामय  आनंदाने पूर्ण भरून गेले. सारी चराचर सृष्टी श्रीकृष्ण  रुपाशी एकरुप झाली. निखळ आनंदात सुखरुप  प्रसुती झाली. असे  एका जनार्दनी म्हणतात.



देवकी करी चिंता । केवी आठवा वाचे आता । ऐसी \ भावना भाविता । जिवी तळमळ ।।१।।

तंव न दुखताच पोट । वेण न लगता उध्दट । कृष्ण झाला प्रगट । स्वयें अयोनिया ।।२।।

हरि सुनीळ सांवळे । बाळ निजतेजे तेजाळे । देखोनि वेल्हाळ । स्वयें विस्मीत ।।३।।

ऐसे देखोनि श्रीकृष्णासी । मोहे आच्छादु जाय त्यासी । तंव प्रकाशु तियेसी कैसा वरेना ।।४।।

वेगी वासुदेवाते म्हणे । तुम्ही गोकुळासी न्या तान्हे । एका जनार्दने कृपा केली ।।५।।


भावार्थ


देवकीच्या मन हे आठवे अपत्य कसे वाचेल या भयाने चिंताग्रस्त  झाले, या भावनेने जीव तळमळु लागला. बाळाचे आकाशासारखे निळेसावळे रुप स्वतेजाने झळाळत होते, ते पाहून ती विस्मयचकित झाली. प्रसुतिच्या कोणत्याही कळा (वेदना) न येता कृष्ण प्रगट झाला. त्या कृष्णरुपाने देवकीला मोहिनी घातली. हे अवर्णनीय कृष्णरुप कोणाला दिसु नये म्हणून ती त्याला पांघरूणाने झाकण्याचा प्रयत्न करु लागली. परंतु ते झळाळणारे स्वयंतेज देवकीला आवरणे शक्य नव्हते. एका जनार्दनी म्हणतात, देवकी आवेगाने वसुदेवाला सांगते की बाळाला त्वरेने गोकुळाला घेऊन जावे.



देवकी म्हणे वासुदेवासी । वेगी बाळक न्यावे गोकुळासी । घवघवीत तेजोराशी । देखे श्रीकृष्ण ।।१।।

पूर्ण प्रकाश निजतेजे । पाहता न दिसे दुजे । तेथ कैचे माझे तुझे । लपणे छपणे ।।२।।

सरसर अरजे दुरी । परब्रह्म आम्हा करी । अहं कंसाचे भय भारी । बाधी कवणा ।।३।।

सर्वेचि पाहे लीळा । मुगुट कुंडले वनमाळा । कंठी कौस्तुभ तेजाळा । कटी तटी सूत्र ।।४।।

क्षुद्र घंटिका किंकणी । बाहु भूषणे भूषणी । चिद्रत्ने महामणी । वीर कंकणे ।।५।।

कमलवदन हरी । कमल नेत्रधारी । लीला कमळे करी । झेलीतसे ।।६।।

करकमळी कमळा । सेवी चरणकमळा । ऐशी वसुदेव देखे डोळा । दिव्य मूर्ति ।।७।।

लक्ष्मी डावलुनिया जाण । हृदयी श्रीवत्सलांछन । द्वीजपदाचे महिमान । देखे दक्षिणभागी ।।८।।

शंख चक्रादि आयुधे चारी । पीतांबर धारी । सगुण निर्गुण हरि । समसाम्य ।।९।।

ऐसे सगुण निर्गुण भाका । पहात पहात देखा। भिन्न भेदाची न रिघे रेखा । कृष्णपर्णीं ।।१०।।

एका जनार्दन खरे । निजरूप निर्धारे । अहं कंसाचे वावरे । मिथ्या भय ।।११।।


भावार्थ


घवघवीत तेजोराशीसारखा दिसणाऱ्या या बाल्काला वेगाने गोकुळात न्यावे असे देवकी वासुदेवाला सांगते. श्रीकृष्णाच्या स्वयं तेजासमोर दुसरे  काही दिसेनासे झाले असता तेथे तुझेमाझ ही द्वैतभावनाच लोपून जाते, लपणे छपणे संभवत नाही. प्रत्यक्ष परब्रह्म जवळ असतांना कंसाचे भय बाधू शकत नाही असे सांगून वासुदेव कृष्णरुपाचे वर्णन करतात. कमलासारखे वदन असलेल्या श्रीहरीचे नेत्र कमलदलासारखे आहेत. हातामध्ये धारण केलेले कमळ हरीच्या चरण-कमळाला स्पर्श करीतआहे मस्तकावर मुकुट, कानांत कुंडले, गळ्यात वनमाळा, कंठाशी तेजस्वी कौस्तुभमणी, हातामध्ये छोटया घंट्या असलेली बाहुभुषणे, रत्नजडित मणी असलेली वीर-कंकणे अशी दिव्यमूर्ति वासुदेवानी डोळ्यांनी अवलोकन केली. छातीवर उजव्या बाजूला द्विज-पदाचे चिन्ह धारण करणार्या चतुर्भुज श्रीहरीने हातात शंख, चक्र ही आयुधे धारण करून पीतांबर परिधान केलेला दिसत होता. निर्गुण परब्रह्ममाचे हे सगुण साकार रुप निरखित असतांना वसुदेवाला मनातील कंसाचे भय मिथ्या आहे याची खात्री पटली, असे एका जनार्दनी सांगतात.



देवकी  वसुदेवाकडे  पाहे। तंव तो  स्वानंदे गर्जताहे। येरी धावून  धरी पाये। उगे  रहा।। 1।।

जळो जळो  ही तुमची  बुध्दी  । सरली संसारशुध्दी। कृष्ण  लपवा त्रिशुध्दी। जग प्रगट न  करावा ।।2।।

आतां मी करूं कैसे। भ्रतारा  लागलें पिसे। मज मायेच्या ऐसें। पुरुष ममता न  धरी।।3।।

मज मायेची  बुध्दी ऐसी।  म्यां आच्छादिलें  श्रीकृष्णासी। वेगें  होईन तुमची दासी। अति  वेगेंशीं बाळ न्यावें ।।4।।

येरु म्हणे  नवल जालें  । तुज कृष्णे  प्रकाशिलें । त्वां  केवीं  आच्छादिलें  कृष्णरुप ।।5।।

सरसर  अरजे मूढें। कृष्णरुप वाडें  कोडें । माया  कैंची ।।6।।

येरी  म्हणे सांडा चावटी । कोरड्या  काय सांगू  गोष्टी गोकुळासी  उठाउठी बाळ न्यावें  माझें ।।7।।

अवो  कृष्णीं चिंतिसी जन्ममरण  ।हेंचि तुझें  मूर्खपण  कृष्णनामे  जन्ममरण । समूळ  निर्दळिलें ।।8।।

सरो  बहू बोलाचा  बडिवारु । परि  निर्धारु न धरवे  धीरु। या  लागीं  लेंकरूं  । गोकुळा न्यावें  ।।9।।

तुम्हीं न माना माझिया बोला  । वेणेंवीण उपजला। नाहीं  योनिद्वारां आला । कृष्णनाथु  ।।10।।

आतां  मी काय करूं  वो। वसुदेव म्हणे  नवलावो। तुझ्या  बोलाचा अभिप्रावो। तुझा तुजची न कळे।।11।।

चोज कैसेविण । ज्या नाहीं जन्ममरण। त्यासी  मारील  कवण। समूळ  वावो ।।12।।

जेणें  मीपण आभासे । तेणें  माझें मूर्खपणें  तुम्हां दिसे । हें  अंगीचें निजरुप पिसें । न  कळे तुम्हां  ।।13।।

कृष्ण निजबोधु  सुंदरा। यासी जीवें जतन  करा । जाणिवेच्या अहंकारा। गुंता  झणीं।। 14।।

आतां  काय मी बोलूं  शब्दू। ऐसा करितां अनुवादू  । बोले  खुंटला  शब्दू । प्रगटला  कृष्ण ।।15।।

प्रकृति  पुरुष दोन्ही। मीनली  एकपणीं । एका  जनार्दनी बंदी मोक्ष  ।।16।।


भावार्थ


श्री  कृष्ण दर्शनाने  हर्षभरित होऊन गर्जना करणाऱ्या  वसुदेवाला पाहून देवकी हतबुद्ध होते. स्त्री  सुलभ ममतेने  तिने  कृष्णाला  अच्छादिलें  पण पुरुष स्नेहाच्या  बंधनांत बांधला  जात नाही  असे असतांना  बाळाच्या संरक्षणाचा विचार  न करतां  वसुदेव मोहबंधनात  अडकत आहे हे पाहून  त्याला शांत करून , वेगाने  बाळाला गोकुळी न्यावें अशी  विनंती  करते. श्री  कृष्ण स्वयंप्रकाशी  असून त्यानेच हे विश्व  प्रकाशित केले आहे, त्याला अच्छादिलें  असे म्हणणे मूर्खपणा आहे, ज्याच्या केवळ  नामस्मरणाने जन्म मरणाचे  बंधन तुटून पडते, जो  जन्म मरणाच्या अतित आहे  त्याला कोणी मारील असे म्हणणे  अज्ञानाचे लक्षण आहे असे तत्वज्ञान  सांगणाऱ्या वसुदेवाला सावध करण्यासाठी श्रीकृष्ण  स्वयंमसिध्द असूनही तो बाळरुपांत असल्याने  प्राण पणाला  लावून त्याचे कंसापासून  रक्षण करा असे कळकळीने सांगून  देवकी स्तब्ध होते. देवकीचा भावार्थ  लक्षांत येताच  पती-पत्नीच्या विचारांचे  मीलन होऊन संकटापासून मोक्ष (सुटका)  मिळतो. असे एका जनार्दनी सांगतात.

10


श्रीकृष्ण  न्यावा गोकुळा  । पायीं स्नेहाच्या  शृंखळा। कायाकपटीं  अर्गळा । मोह   ममतेच्या ।। 1।।

कृष्णीं  धरितां आवडी  । स्वये  विराली स्नेहाची  बेडी । मुक्तद्वार परवडी  । नाही  अर्गळा  शृंखळा।।  2।।

कृष्ण जंव  नये हातां । तंवचि बंधनकथा  । पावलिया  कृष्णनाथा। बंदी  मोक्ष।। 3।।

ते संधि  रक्षणाईते। विसरली रक्षणातें।  टकमकीत पहाते। स्वयें कृष्ण नेतां ।।4।।

श्रीकृष्ण  अंगशोभा। नभत्व लोपलें नभा।  दिशेची  मोडली प्रभा  । राखते कवण।। 5।।

अंधारामाजी  सूर्य जातू । श्रीकृष्णासी असे  नेतु । सत्व स्वभावे असे सांगतु । कृष्ण  कडिये पडियेला ।।6।।

अंध ते बंधन गेले। राखतो  राखणे ठेलें । एका जनार्दनी केलें। नित्य  मुक्त ।।7।।


भावार्थ 


श्री  कृष्णाला  गोकुणाला न्यावे  पण पायांत स्नेहाच्या  साखळ्या , देहाच्या तिजोरीला  ममतेची कडी आणि मोहाचे बंधन! कृष्णाचा  ध्यास लागताच स्नेह-ममतेची बेडी आपोआप गळून  पडते, मोक्षाची पर्वणी येते, जो पर्यंत कृष्ण सखा  आपलासा होत नाही तोपर्यंत सर्व बंधन बांधून ठेवतात. कृष्ण-कृपा  होताच मोक्षच बंदी बनतो. बाळाचे रक्षण करु पाहणारी देवकी, रक्षण  करण्याचे विसरून दूर जाणाऱ्या कृष्णाकडे एकटक बघत राहते. कृष्णाच्या  निळसर, सावळ्या अंगकांतीघ्या शोभेत  आकाशाची निळसर शोभा लोपून जाते. दिशांची  प्रभा निस्तेज बनते. मावळता सूर्य अंधारांत  अलगद बुडत जातो तसा मोह-बंधनाचे, अज्ञानाचे  पटल दूर सारून  वसुदेव  कृष्णाला  घेऊन यमुनेच्या  दिशेने निघतो, वसुदेव नित्यमुक्त  होतो असे एका  जनार्दनी म्हणतात.


11


तीरा  आणिला श्रीकृष्ण  । हरिखे यमुना झाली  पूर्ण । चढे स्वानंद  जीवन । चरण  वंदनार्थ।।1।।

वसुदेव म्हणे कटकटा यमुना  रोधिली वाटा।  कृष्ण असतां निकटा। मोहे  मार्ग न दिसे।। 2।।

कृष्ण  असतां हातीं। मोहें  पडली भ्रांती। मोहाचिये  जाती। देव नाठवे बा।। 3।।

मेळी  मुकी वेताळ।मारको  मेसको वेताळ। आजी  कृष्ण राखा सकळ। तुम्ही  कुळदेवतांनो ।।4।।

अगा वनींच्या  वाघोबा। पावटेकीच्या  नागोबा  । तुम्ही  माझिया कान्होबा। जीवें  जतन करा।। 5।।

हातीचा  कृष्ण विसरुन। देव  देवता होतों दीन। मोहममतेचे महिमान। देवा  ऐसें आहे।। 6।।

मोहे  कृष्माची आवडी ।तेथें न  पडे  शोक सांकडीं।  एका जनार्दनी पावले  परथडी। यमुनेच्या  ।।7।।


भावार्थ


वसुदेव  श्री कृष्णासह  यमुनेच्या तीरावर  पोचलें. हर्षभरित  झालेल्या  यमुनेला स्वानंदाचा  पूर आला. श्री हरिच्या  चरण-वंदना साठी यमुनेच्या  पाण्याला भरती आलेली पाहून  वसुदेव संभ्रमात पडलें, परमात्मा  श्रीकृष्ण जवळ  असूनही  मार्ग दिसेनासा  झाला.मोहानें चित्त  भ्रांत झाले. काकुळतीला  येऊन कुळदेवतेची,  वन्य प्राणी वाघोबा, नागोबा  यांना कान्होबाचे रक्षण करण्यासाठी  विनवू लागले. मोह ममतेची झापड आल्याने हाती  असलेले कृष्ण रुपी भाग्य विसरून देव-देवतांपुढे  दीन झालें. परंतू जेथें  कृष्ण प्रेमाची  आवड तेथील दु:ख, संकटे  आपोआप दूर पळतात असे सांगून  एका जनार्दनी म्हणतात, वसुदेव कृष्णासह  यमुनेच्या पैलतीरावर  सुखरूप पोचले.


12


गोकुळीं  ठेवितां श्रीकृष्णनाथ  । वसुदेवास माया प्राप्त। तेणें पावला  त्वरित । देह  बंदीशाळे।। 1।।

तंव  तुटली जडली बेडी ।कपाटा  पडली कडी। भव भयाच्या काडी।  अहं कंस पावे ।।2।।

श्रीकृष्ण  सांडिला मागें । पंचमहाभूत पाठी  लागे । मिथ्या बंधन वाउगें । उठी  मरण भये ।।3।।

कंस  पुसे लवलाह्या।  काय प्रसवली तुझी  जाया। म्हणोनी आणिली  योगमाया  । वसुदेवें  ।।4।।

वेगें देवकी  म्हणे । कंस पुसेल जेव्हां  तान्हें। तेव्हां तुवां देणें  । हे तया  हातीं  ।।5।।

ते  देतां देवकीजवळी  । गर्जे ब्रह्मांड किंकाळी। टाहो  फुटली आरोळी  । दैत्यनिधीची ।।6।।

तेणें  दचकलें दुर्धर  । कामक्रोधादि  असुर । कंस पावला  सत्वर । .धरावयासी ।।7।।

वेगीं  आठवा आणवी। तंव हातां आली आठवी  । कंस दचकला दुर्धर जीवीं । नोहें  जालेंचि  विपरीत  ।।8।।

आठवा  न दिसे डोळां  । आठवी पडली गळां  । कर्म न सोडी कपाळा।  आलें मरण मज ।।9।।

परासि  मारितां  जाण । मारिल्या  मारी मरण । कंस भीतसे आपण  । कृष्ण  भय करी ।।10।।

आठवी  उपडितां तांतडी। तंव  तें ब्रह्मांड  कडाडी। हातांतून  निष्टली हडबडी। कंस भयाभीतु  ।।11।।

तंव  ती गर्जलीं अंबरी  । पैल गोकुळी  वाढे  हरी। तुज  सकट बोहरी । करील  दैत्यकुळाची।।12।।

वधितां  देवकीची बाळें।  माझे पाप मज फळलें। माझे  निजकर्म  बळें। आलें  मरण मज ।।13।।

भय  संचलें गाढे। तेणें  पाऊल न  चले पुढें।  पाहतां गोकुळाकडे  । मूर्चिछित कंस  बा ।।14।।

आसनीं  भोजनीं शयनीं। भये  कृष्ण देखे  नयनीं।  थोर भेदरा  मनीं । जनीं  वनीं हरी देखे  ।।15।।

कृष्ण  भयाचे मथित  । कंसपणा विसरे  चित्त। एका जनार्दनी भक्त  । भयें  जीवन्मुक्त  ।।16।।


भावार्थ


कृष्णरुपी   परमात्मा गोकुळीं  पोचतांच वसुदेवानें   कृष्णाला  यशोदेच्या  पुढे ठेवले  आणि यशोदेने प्रसवलेली  योगमाया घेऊन  वेगानें  मथुरेला पोचले. कंस  येतांच त्याच्या हातीं  ही योगमाया द्यावी असे सांगून  योगमायेला देवकीच्या स्वाधीन केली.  मरण भयाने गांजलेला, कामक्रोधाने पेटलेला  कंस त्वरेने देवकीच्या काराग्रुही आला असतां आठव्या  कृष्णा ऐवजी  आठवी माया त्याच्या  गळ्यांत पडली. दुष्कर्माची  फळे कपाळावरील कर्म रेषांना  पुसता येत नाही म्हणून पश्चातापाने पोळलेला  कंस योगमायेला हतांत  घेऊन शिळेवर  आपटणार तोच हातांतून  निसटून कडाडत  वरचेवर आकाशाकडे  झेपावतांना गरजली ,संपूर्ण दैत्यकुळाचा  विनाश करणारा  श्रीहरी गोकुळांत  नांदत आहे , असे सांगून  एका जनार्दनी म्हणतात, देवकीच्या बाळांचा  वध करणारा  कंस आपल्याच  पाप कर्माचे फळ काळरुपाने  समोर उभे राहिले  असे पाहून मृत्यु भयाने मूर्चिछित  झाला. कृष्ण भयाने  कंसाचे चित्त व्यापून  टाकले.आसनी,  भोजनीं,  शयनीं ( आसनावर  बसला असता, जेवण  घेत असतांना, झोपला  असतांना ) नगरात किंवा वनांत  सर्वत्र कंसाला मृत्यु-रूपांत  कृष्ण दिसू लागला .कृष्ण-भयाने  कंस आपला कंसपणा  (दुष्टपणा) विसरून गेला. एका  जनार्दनी म्हणतात,  कृष्ण भयाने कंस जीवनमुक्त  झाला.

13

गोकुळीं  आनंद जाहला । रामकृष्ण  घरा आला ।नंदाच्या दैवाला  । दैव आले  अकस्मात।। 1।।

श्रावण  वद्य अष्टमीसी। रोहिणी  नक्षत्र ते दिवशीं। बुधवार  परियेसी । कृष्णमूर्ति  प्रगटली ।।2।।

आनंद  न समाये त्रिभुवनीं । धांवताती  त्या गौळणी । वाण भरुनी  नंदराणी। सदनाप्रती।।3।।

एका  जनार्दनी अकळ । न कळे ज्याचें  लाघव  सकळ । तया  म्हणती बाळ जो  म्हणती बाळ। हालविती।। 4।।


भावार्थ


श्रावण वद्य अष्टमीला  रोहिणी नक्षत्रावर  बुधवारी नंदाच्या घरीं  बलराम व  श्रीकृष्णमूर्ति  प्रगट झाली. नंदाचे  भाग्य उजळले. गोकुळीचा आनंद त्रिभुवनांत  मावेनासा झाला. बाळासाठी वाण घेऊन गौळणी  नंदाराणीच्या सदनाकडे झेपावू  लागल्या.ज्याचे  लिलालाघव अगम्य आहे अशा सर्वसाक्षी परब्रह्माला जो जो बाळा म्हणून पाळणा हलवणार्या गोपींच्या भावना अकलना पलिकडच्या आहेत असे  एका जनार्दनी  म्हणतात.  


14


एक  धांवूनी  सांगती । अहो  नंदराया म्हणती। पुत्रसुख  प्राप्ती । मूख पहा चला ।।1।।

सवें  घेऊनि ब्राह्मणा । पहावया  पुत्रवदन। धांवूनियां  सर्वजण । पहावया येती।। 2।।

बाळ  सुंदर  राजीवनयन । सुहास्यवदन  घनश्यामवर्ण । पाहूनियां  धालें मन सकळिकांचे तटस्थ  ।।3।।

पाहूनि परब्रह्म सांवळा  । वेधलें मन तमालनीळा। एका जनार्दनी पाहतां  डोळा। वेधें  वेधिलें सकळ ।।4।।


भावार्थ


पुत्रप्राप्तीची  आनंददायक बातमी कुणीतरी  घाईघाईने नंद  रायाला  सांगते आणि  पुत्रमुख पहावयास  चला असे  सुचवतो. ब्राह्मणाला  बरोबर घेऊन सर्वजण उत्सुकतेने  पुत्रवदन  पहाण्यासाठीं  निघतात. कमलनयन,  मेघश्याम, हसतमुख, सुंदर   कृष्णवदन पाहून सगळे  कौतुकाने स्तब्ध होतात. निळेसावळे  परब्रह्मरुप सर्वांचे  मन वेधून घेते. मनाला  कृष्णरुपाचे  वेध लागतात असे  एका जनार्दनी म्हणतात.


15


वेधल्या  गोपिका सकळ । गोवळ  आणि गोपाळ। गायी म्हशी  सकळ । तया कृष्णाचे ध्यान  ।। 1।।

नाठवे दुजें मनीं कांहीं।  कृष्णावांचुनी आन नाहीं। पदार्थमात्र सर्वही। कृष्णाते  देखती ।।2।।

करितां  संसाराचा धंदा । आठविती त्या  गोविंदा । वेधें  वेधल्या कृष्णछंदा। रात्रंदिवस  समजेना  ।।3।।

एका जनार्दनी  छंद । हृदयीं तया गोविंद  । नाही  विधि आणि  निषेध। कृष्णावांचुनी  दुसरा ।।4।।


भावार्थ 


सर्व  गोप, गोपिका  आणि गुराखी तसेच  गाई म्हशी सारखे मुके  प्राणी यांना  श्रीहरिचे ध्यान  लागलें. कृष्णावांचून  दुसरे कांहीं  सुचेनासे  झाले. सर्व  वस्तुमात्रांत  कृष्णरुप दिसू लागले.  गोपिका संसाराची कामे  करतांना गोविंदाला आठवूं लागल्या. मनाला    कृष्णाचा छंद जडला. काळाचे भान , बाह्य जगाचे  नियम आणि बंधने विसरून गोविंदाशी एकरुप झाल्या .

16

गोकुळीच्या  जनां ध्यान । वाचे  म्हणती कृष्ण कृष्ण। जेवितां बैसतां  ध्यान । कृष्णमय  सर्व।। 1।।

ध्यानीं  ध्यातीं कृष्ण।आणिक  नाहीं दुजी तृष्णा  । विसरल्या विषयध्याना  । सर्व देखती  कृष्ण ।।2।।

घेतां  देतां वदनीं कृष्ण। आन  नाहीं कांहीं मन। वाच्य  वाच्य वाचक कृष्ण । जीवेभावे सर्वदा  ।।3।।

कृष्णरुपी  वेधली वृत्ती । नाही  देहाची पालट स्थिती  । एका जनार्दनी देखती  । जागृति स्वप्नीं कृष्णाते  ।।4।।


भावार्थ


गोकुळीच्या  लोकांना कृष्णाचे  ध्यान लागले. त्यांना  सर्व जग कृष्णमय दिसू  लागले. जेवताना, उठतां बसतां  ते कृष्णाचे  नामस्मरण करु लागले. इंद्रिय विषयांचे  ध्यान विसरून , सर्व ईच्छा आकांक्षांचा  त्याग करून , मन कृष्णाला अर्पण करून त्या  सर्व गोप-गोपिका जीवे -भावे कृष्ण चरणी लीन  झाल्या. गाढ झोपेत,स्वप्नावस्थेंत, जागृत असतांना, त्यांच्या   सर्व वृत्ती कृष्णरुपानें  वेधून घेतल्या. काया, वाचा  मनाने ते कृष्णरुप  झाले, आपल्या देहाचा विसर पडला. असे  एका जनार्दनी या अभंगात म्हणतात.

गर्गाचार्याचे जातक

17

व्रजांत कोणे एक वेळेशी। आले गर्गाचार्य ऋषी। त्यासी दाखवितां कृष्णासी । चिन्हें बोलतां झाला.।। 1।।

यशोदाबाई ऐक पुत्राची लक्षणें ।।ध्रु0।। मध्यें मुख्य यशोदा बाळा । सन्मुख रोहिणी वेल्हाळा।

भोंवता गोपिकांचा पाळा । त्या गोपाळा दाखविती ।।2।।

करील दह्या दुधाची चोरी। भोगिल गौळियांच्या पोरी। सकळ सिंदळांत चौधरी। निवडेल निलाजरा।। 3।।

चोरूनी नेईल त्यांची लुगडीं। त्यांचे संगे घेईल फुगडी। मेळवुनी गोवळ गडी । सुगडी फोडी शिंकींचीं । ।।4।।

पांडव राजियांचे वेळी । काडील उष्टया पत्रावळी । ढोरें तुमच्या घरची वळी । निवडेल निलाजरा ।।।5।।

यावरी कलवंडतील झाडें ।लत्ता खळाळ हाणील घोडे । महा हत्ती धरील सोंडें। परी ती विघ्ने मावळतीं ।।6।।

यावरी गाडा एक पडावा ।अथवा डोहामाजीं बुडावा। वावटुळीनें उडुनी जावा ।सांपडावा वैरीयाला ।।7।।

कारण सच्चिनंदाचें । बीज नोहे हें नंदाचें । जन्मांतर गोविंदाचे नव्हे कथिल्या मथिल्यांचें ।।8।।

हृदयीं श्रीवत्सलांछन । ब्राह्मणलत्तेचें भूषण ।हा होईल ब्राह्मण जन । एका जनार्दनीं घरींचा ।।9।।


भावार्थ


एकदां व्रजभूमीत गर्गाचार्य ऋषी आले ,त्यांनी कृष्णाची बाल-लक्षणे अवलोकन करून यशोदेला भविष्यात घडून येणार्‍या कृष्ण -लीलां वर्णन करुन सांगितल्या. मध्यें यशोदेचा कृष्ण, त्याच्या समोर रोहिणीचा बलराम, भोवती गोपाळांचा मेळा भरला असतांना ऋषी श्रीकृष्णाचे जातक सांगतात. हा कृष्ण गोकुळांत दह्यादुधाची चोरी करील,गौळणींची लुगडी चोरून नेऊन त्यांच्या खोड्या काढील गोपाळ-गडी जमवून गवळ्यांच्या घरांत शिरून शिंक्यावरची दह्यादुधाची भांडी फोडील. गोप-गोपिकांना जमवून रासक्रीडा, फुगडी असे खेळ करील नंद-यशोदेच्या घरच्या गाई राखिल. बालपणी कृष्णावर अनेक संकटे येतील. बालकृष्णावर झाडे कोसळतील, घोड्यांच्या टापांचे प्रहार होतील, बलाढ्य हत्ती सोंडेत पकडतील , या शिवाय गाडा अंगावर पडणे, डोहांत पडणे, वावटळीने उडून जाऊन वैर्याच्या हाती सापडणे अशा अनेक दुर्घटना घडून येतील परंतू ही सर्व विघ्ने मावळतील. पांडवांच्या शराजसूय यज्ञाच्या वेळी श्रीकृष्ण उष्टया पत्रावळी काढील. कारण नंदाचे बीज नसून सच्चिदानंदाचा अवतार आहे. त्याने गोविंद रुपाने जन्म घेतला असून हृदयावर ब्राह्मणाने मारलेल्या लाथेचा प्रहाराने झालेल्या जखमा भूषण म्हणून धारण करील. श्रीकृष्णाचे ऋषींनी सांगितलेले जातक एका जनार्दनी या अभंगात वर्णन करुन सांगतात.

नंदास विश्वरुप दर्शन

अभंग 18


एके दिनी नवल जालें। ऐकावें भावें वहिलें।। 1।।

घरीं असतां श्रीकृष्ण । योगियांचे निजध्यान।।2।।

नंद पुजेसी बैसला। देव जवळी बोलाविला।। 3।।

शाळीग्राम देखोनि । मुखांत घाली चक्रपाणी।। 4।।

नंद पाहे भोंवतालें। एका जनार्दनी बोले।। 5।।


भावार्थ


एका जनार्दनी एक दिवस घडलेली नवलाची गोष्ट या अभंगात कथन करीत आहेत.योग्यांच्या निजध्यानाचा विषय असलेला श्रीकृष्ण तेव्हां घरात असतांना नंदराजा पुजेला बसले होते.त्यांनी श्रीकृष्णाला जवळ बोलावून घेतले. पुजेच्या देवामधील शाळीग्राम पाहून कृष्णाने तो तोंडात घातला. नंदराजा भोवताली शाळीग्राम शोधू लागले.


19

म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरे लवलाही वदन पसरी।। 1।।

चवदा भुवनें सम ती पाताळें ।देखियेलीं तात्काळें मुखामाजी ।।2।।

स्वर्गीचे देव मुखामाजी दिसती । भुलला चित्तवृति नंदराव ।।3।।

एका जनार्दनी नाठवे भावना। नंद आपणा विसरला।। 4।।


भावार्थ

नंदरायाने कृष्णा कडे शाळीग्राम मागितला असतां श्रीकृष्णाने लगेच मुख पसरून दाखविले,तेव्हां नंदरायाला वदनामध्ये चौदा भुवने सप्त पाताळांचे दर्शन घडलें तसेच स्वर्गीय देवांचे दर्शंन घडले. हा चमत्कार बघून नंदाच्या चित्तवृत्ती लोप पावल्या, नंदराया स्वता:चे अस्तित्व विसरून गेले. एका जनार्दनी म्हणतात, नंदराया सर्व ऐहिक भावना विसरून गेले.


20


घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ।।1।।

संसारसुख भोगाल चिरकाल । परब्रह्म निर्मळ तया भजे ।।2।।

नंद म्हणे देव दूर आहे बापा। आम्हांसी तो, सोपा कैसा होय।। 3।।

ऐकतांचि वचन काय करी नारायण । प्रगटरूप जाण दाखविलें ।।4।।

शंख चक्र गदा पद्म तें हस्तकीं मुगुट मस्तकीं शोभायमान ।।5।।

ऐसा पाहतां हरी आनंद पै झाला। एका जनार्दनी भेटला जीवेंभावें ।। 6।।


भावार्थ

मायेचे हे नवल बघून नंदराया काया, वाचा, मनानें यादव रायाचे भजन करु लागला, तेव्हां निर्मळ परब्रह्माचे सतत भजन केल्यास चिरकाल संसारसुख भोगतां येईल परंतु देव भक्तापासून खूप दूर असल्याने भक्तांना तो सहजसुलभ कसा होईल हे नंदरायाचे वचन ऐकतांच नारायणानें शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले, मस्तकावर सुंदर मुगुट असलेले आपले शोभायमान रूप प्रगट केले. हरीचे हे मनोहर रुप पाहून नंदरायास अवर्णनीय आनंद झाला. एका जनार्दनी म्हणतात, नंदाला श्रीहरी जीवेभावे भेटला.

श्रीकृष्ण भगवानाचें चौर्यकर्म

21

सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें। खेळें तें वहिलें वृन्दावनी।। 1 ।।

नागर गोमटें शोभे गोपवेषें। नाचत सौरसें गोपाळासीं।। 2।।

एका जनार्दनी रुपासी वेगळें। अहं सोहमा न कळे रूपगुण ।।3।।


भावार्थ


सावळ्या रंगाचा बालकृष्ण वृंदावनात क्रिडा करतो गोपवेष घालून गोपाळांसवे नृत्य करणाऱ्या बालकृष्णाचे नागर रूप अतिशय विलोभनीय दिसते. एका जनार्दनी म्हणतात, ह्या आगळ्या-वेगळ्या रुपाचे रहस्य वेदशास्त्रांनादेखिल उलगडत नाही.


२२


वेदादिक श्रमले न कळे जया पार । शास्त्रसी निर्धार न कळेची ।।१।।

तो हा श्रीहरी नंदाचिया घरी । क्रीडे नानापरी गोपिकासी ।।२।।

चोरावया निघे गोपिकांचे लोणी । सौंगडे मिळोनी एकसरे ।।३।।

एका जनार्दनी खेळतसे खेळ । न कळे अकळ आगमानिगमा ।।४।।


भावार्थ


नंदाघरी नांदणाऱ्या श्रीहरीच्या अवतार लीलेचे रहस्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात असताना वेद थकून गेले आणि शास्त्रांना त्याचा निर्णय करणे अशक्य झाले. सवंगडी मिळवून गोपिकांच्या घरातील लोणी चोरून नेणे, गोपिका जमवून त्यांच्यासवे रासक्रीडा करणे, नाना प्रकारचे खेळ खेळणे यांची कारणे समजून घेणे वेदशास्त्रांना कळेनासे झाले, असे एका जनार्दनी म्हणतात.


२३


मेळवोनि मुले करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्ण ।।१।।

पाळती पाहती एका जाणविती । सर्वे जाऊनी खाती दहीदूधा ।।२।।

सांडिती फोडिती भाजन ताकाचे । कवळ नवनीताचे झेलिताती ।।३।।

एका जनार्दनी नाटकी तो खेळ । न कळे अकळ वेदशास्त्रा ।।४।।


भावार्थ


बलराम आणि श्रीकृष्ण अवतारी पुरुष असतांना मुले गोळा करून, पाळत ठेवून, एकमेकांना बोलावून, सर्व मिळून गोपिकांच्या घरचे दहीदूध खातात, ताकाचे मडके फोडतात, लोण्याचे गोळे झेलतात. एका जनार्दनी म्हणतात, या नाटकी खेळांचा अर्थ वेदशास्त्रांना आकलन होत नाही.


२४


पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ।।१।।

गोपाळ सवंगडे मेळवोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ।।२।।

निजलियाच्या मुखा माखिती नवनीत । नवल विपरीत खेळताती ।।३।।

न कळे लाघव करी ऐशी चोरी । एका जनार्दनी हरी गोकुळात ।।४।।


भावार्थ


गोपाळ सवंगडी जमवून त्यांच्यामधे बसून सावळा श्रीहरी लोणी खातो, झोपेत असलेल्या गोप-गोपिकांच्या मुखास लोणी माखतो असे नवलाईचे विपरीत खेळ खेळतो. चोरी करताना अशा सहजपणे करतो की त्याचे लाघव कळतच नाही असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात.


२५


मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ।।१।।

धाकुले सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ।।2।।

ठेवियेलें लोणी काढिती बाहेरी ।खाती निरंतरीं सवंगडी ।।3।।

एका जनार्दनी तयाचें कौतुक । न पडे ठाऊके ब्रह्मादिका ।।4।।


भावार्थ


बाल सवंगड्यांना सवे घेऊन राम-कृष्ण गोरसाची चोरी करायला निघतात. गोपिकांनी ठेवलेले लोणी बाहेर काढून सवंगडी ते नेहमी च खाऊन फस्त करतात. एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीच्या या लीलांचे कौतुक ब्रह्मदेवांना सुध्दा कळत नाही.


विचार

26


मिळती गौळणी दारवटां बैसती । धरूं आतां निश्चिती घरामध्ये ।।1।।

येतो जातो हे न कळे त्याची माव । वाउगीच हांव थरिताती ।।2।।

पांच सात बारा होऊनिया गोळा बैसती सकळां टकमक ।।3।।

एका जनार्दनी न सांपडेचि तयां । योगी ध्याती जया अहर्निशी ।।4।।


भावार्थ

पाच, सात, बारा असे गट करून गौळणी श्री हरीला पकडण्यासाठीं दाराआड लपून बसतात. एकटक नजरेने सगळीकडे बघत असतात. श्री हरीला पकडण्याची निरर्थक खटपट करु पाहतात पण श्रीहरी त्यांना चकवा देऊन येतो आणि निघून जातो. एका जनार्दनी म्हणतात, रात्रंदिवस ध्यान धारणा करूनही योग्यांना श्रीहरी सापडत नाही.


27

अहर्निशी योगी साधिती साधन । तयांसी महिमान न कळेची ।।1।।

तो हा श्रीहरी बाळवेषे गोकुळीं । खेळे वनमाळी गोवळियांसी ।।2।।

एका जनार्दनी न कळे महिमान । तटस्थ तें ध्यान मुनीजनीं।। 3।।


भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, रात्रंदिवस ध्यान योगाची साधना करुनही योगी जनांना ज्या श्रीहरीचा अवतार महिमा कळत नाही तो वनमाळी बाळवेष धारण करून गवळ्यांच्या सवे खेळ खेळतो.


28

न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ।।1।।

बैसती समस्ता धरू म्हणोनि धावे। तंव तो नेणवें हातालागीं ।।2।।

समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारें। नेणवेचि खरे येतो जातो।। 3।।

एका जनार्दनी न सांपडेचि तयां । बोभाट तो वांयां वाउगाची।। 4।।


भावार्थ

श्रीहरीला पकडण्यासाठी दारामागे लपून बसलेल्या गोपी श्रीहरी हाती लागत नसल्याने निराश झाल्या,त्यांना वेगळ्याच प्रकारची तळमळ लागून राहिली. एका जनार्दनी म्हणतात, गोपींना श्रीहरी केव्हां येतो आणि जातो हे समजत नाही त्यांचा हा खटाटोप व्यर्थ आहे.


29

वाउगे ते बोल बोलती अबळा । कवळ ते गोपाळा धरूं शके ।। 1।।

प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी येरझारी घरामध्यें ।।2।।

एका जनार्दनी गोपीकांसी शीण। म्हणोनि विंदान करीतसे।। 3।।


भावार्थ

एका जनार्दनी या अभंगात म्हणतात, गोपींचे बोलणे वाउगे (अयोग्य) असून श्रीहरी प्रेम भक्ती शिवाय कोणालाही आपलासा करता येऊ शकत नाही. गोपिकांना यामुळे शीण होत असून त्या घे ते हम मी हे व्यर्थ गोंधळ घालीत आहे.

30

नवल ती कळा दावी गोपिकांसी। लोणी चोरायासी जातो घरा ।।1।।

धाकुले सवंगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशे भीतरीं आपणची ।।2।।

द्वार झाकोनियां बैसती गोपिका । देखियेला सखा गोपाळांचा ।।3।।

एका जनार्दनी धांवुनि धरिती । नवल ते रीती करीतसे ।।4।।


भा हे ते मऊ मऊवार्थ

लोणी चोरायला घरांत जातांना श्रीहरी बाळ सवंगड्यांना बाहेरच ठेवून आपण एकटाच घरांत प्रवेश करतो. दार बंद करून बसलेल्या गोपिकांना गोपाळांचा सखा हरी दिसतो .एका जनार्दनी म्हणतात, गोपी धावत जाऊन हरीला पकडण्याचा खटाटोप करतात. गोपिका हरीच्या मागे धावून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, एका जनार्दनी म्हणतात, हरी अशा प्रकारे नवलाचे खेळ खेळतो.


31

गोपी धावुनिया धरिती तयातें । उगा पाहे बहतें न बोले कांही ।।1।।

करीती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ।

कां रे चोरा आतां कैसा सांपडलासी। म्हणोनी हातासी धरियेलें।।3।।

वोडोनियां नेती यशोदे जवळी। आहे वनमाळी कडेवरी ।।4।।

एका जनार्दनी यशोदेच्या करी । उभा श्रीहरी लोणी मागें ।।5।।


भावार्थ


गोपी धांवून वनमाळीला पकडतात तो कांही न बोलतां त्यांच्याकडे बघतो.गोपी एकच गलबला करुन श्रीहरीची वाईट शब्दांनी कानउघाडणी करतात.चोर बरा सांपडला असे बोलून हाताला धरुन ओढत यशोदेकडे घेऊन जातात.एका जनार्दनी म्हणतात, नवल असे कीं,यशोदेच्या कडेवर बसून श्रीहरी लोणी मागत असतो.


32


घरोघरीं कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारीं ।।1।।

पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ।।2।।

गोपिका धांवती घेऊनिया कृष्ण । न कळे विंदान कांही केल्या ।।3।।

घेऊनिया येती तटस्थ पाहती। विस्मित त्या होती आपुलें मनीं ।।4।।

एका जनार्दनी दावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिका।।5।।


भावार्थ


गोपींनी कृष्णाला पकडलें ही बातमी घरोघरी पोचली.या धिटुकल्या हरीला राजद्वारी आणले, आणि पाहतात तर बालकृष्ण यशोदे जवळ उभा आहे. हा वेगळाच चमत्कार गोपी तटस्थपणे बघत राहिल्या. विस्मयचकित झाल्या.एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीचे लाघव,अवतार लीला ब्रह्मादी देवांना सुध्दा उमजत नव्हत्या.


33


मिळाल्या गोपिका यशोदे जवळा। तटस्थ सकळां पाहताती।। 1।।

यशोमती म्हणे आलेती कासया । वाऊगें तें वांयां बोलताती ।।2।।

एका जनार्दनी बोलण्याची मात। खुंटली निवांत राहिल्या त्या।। 3।।


भावार्थ


सगळ्या गोपिका एकत्र जमून यशोदेकडे गेल्या.त्यांच्याकडे आश्चर्याने बघत यशोमती माता म्हणते,येथे येऊन निरर्थक कागाळ्या करीत आहात.एका जनार्दनी म्हणतात,यापुढे बोलण्याची सोय न राहिल्याने गोपी अवाक् होऊन निवांत राहिल्या.


34


आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्ती कांहीं ।।1।।

परस्परें बोल बोलती अबला । कैसी नवल कळा देखियेली ।।2।।

धरुनिया करी जाती तेथवरी । उभा असे हरी जवळीच ।।3।।

एका जनार्दनी न कळे लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजी ।।4।।


भावार्थ


दुसरा कोणताही हेतू मनांत न ठवता,नि:शब्द होऊन गोपी यशोदे कडून निघाल्या. एक-दुसरीला दोष देत,मनांत आश्चर्य व्यक्त करीत त्या मूकपणे घरी परतल्या. एका जनार्दनी म्हणतात, ही विस्मयकारक लीला बघून गोपी मनामध्ये कांही सुचेनासे होऊन तटस्थ झाल्या.


35


आपुल्या मनासी करिती विचारले । न धरवे साचार कृष्ण ज्अभाविक करीं ।।1।।

योगियांचे ध्यानीं न संपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणती ।।2।।

धरितां न धरणे तळमळ । वाऊगा कोल्हाळ करिती वांयां ।।3।।

एका जनार्दनी शुध्द भक्तिविण । न पवे। नारायण कवणा हातीं ।।4।।


भावार्थ


कृष्णाला हातात पकडणे अशक्य आहे, हे नि:संशयपणे सत्य आहे. अथक प्रयत्नांनंतर सुध्दां जो ध्यानांत देखील योग्यांना सापडत नाही, त्याला हातांत पकडू असे गोपी म्हणतात, त्यासाठी मनांत तळमळतात, अकारण गोंधळ करतात. एका जनार्दनी म्हणतात,नि:ष्काम भक्ती शिवाय नारायण कोणाच्याही हातीं सापडणार नाही.


36

अभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवळी हरी भाविकांसी ।। 1।।

म्हणोनि अभावें ठकती गोपिका । त्या यदुनायका न धरती।। 2।।

वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासे सायास शिणताती ।।3।।

एका जनार्दनी शीण गोपिकांसी । तेणें हृषीकेशी हांसतसे ।। 4।।

भावार्थ

अभाविक लोकांना हरी जवळ अजूनही प्रेमभक्ती नसल्याने दुरावलेला असतो तर निष्काम भाविकांना तो दूर असूनही अगदी सहजसाध्य असतो.अंत:करणांत प्रेमभक्ती नसल्याने गोपिकांची फसगत होते, त्या श्रीहरीला आपलासा करु शकत नाही. मनाच्या हव्यासामुळे त्यांना कष्ट सोसावे लागतात, एका जनार्दनी म्हणतात, गोपिकांचा हा व्यर्थ शीण पाहून हृषीकेश मनांत हसत असतो.


37

भाविका त्या गोपी येती काकुळती । तुमचेनी विश्रांती मजलागी ।।1।।

मज निराकारा आकारासी येणें । तुमचे ते ऋण फेडावया ।।2।।

दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शहाणे तयासी न संपडे ।।3।।

एका जनार्दनी भाविकांवाचून । प्राप्त नोहे जाण देव तया ।।4।।

भावार्थ

एका जनार्दनी या अभंगात सांगतात,भावनाप्रधान गोपी कृष्णासाठी काकुळतीला येतात. निराकार परमेश्वराला भाविक भक्तांसाठी अवतार धारण करावे लागतात. भाविकांच्या प्रेमभक्तीचे कर्ज फेडण्यासाठी निरनिराळ्या लीला दाखवाव्या लागतात.भाविकांशिवाय देवाला देवपण येत नाही.


38

भोळे ते सावडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ।।1।।

यज्ञमुखी तोंड करी जो वाकुडें। तो गोपिकांचें रोकडे लोणी खाये।। 2।।

घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवविती ।।3।।

एका जनार्दनी व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे।। 4।।

भावार्थ

भक्तांसाठी वेडा झालेला परमात्मा गोपिकांना सापडतो.त्या श्रीहरीचे कोडकौतुक पुरवतात.यज्ञातील हविर्भागाकडे पाठ फिरवणारा श्रीहरी गोपिकांच्या घरचे लोणी आवडीने खातो.गोपिकांनी घरी नेऊन घातलेले भोजन श्रीहरी पंचामृत समजून आवडीने खातो.एका जनार्दनी म्हणतात, विश्वाला व्यापून उरणारा परमात्मा गोकुळांत खेळ खेळतो.


39

खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे।। 1।।

जयाचिये चित्तीं जे कांहीं वासना । तेचि नारायणा पुरविणें ।।2।।

जया जैसा हेत पुरवी तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ।।3।।

एका जनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावें जगजेठी वनोवनीं ।4।।

भावार्थ

एका जनार्दनी या अभंगात म्हणतात, भक्तांच्या मनातील सर्व ईच्छा नरायण पुरवतो. श्रीहरी सवंगड्यां बरोबर खेळ खेळतो, गोपिकांच्या मनातील भावना जाणून त्यांचे हेतु पूर्ण करतो. काया, वाचा, मनाने नरायण भक्तांचा अंकित असून भक्तांच्या प्रेमामुळे तो भक्तांसाठी वनोवनी धावतो.


वेणी-दाढीची ग्रंथी

40

गोकुळामाजीं कृष्णें नवल केलें । स्री आणि भ्रतारा विंदान दाविलें ।।1।।

खेळ मांडिला हो खेळ मांडिला। न कळे ब्रह्मादिका अगम्य त्याची लीळा वो ।।2।।

एके दिनीं गृहा गेले। चक्रपाणी बैसोनी ओसरी पाहे पाळतोनी लोणी ।।3।।

गौळणी आली घरां म्हणे शारंगपाणी । चोरीचे विंदान पाळती पाहसी मनीं ।।4।।

चोरी करावया जरी येसी सदनी । कृष्णा धरुनी तुझी शेंडी बांधीन खांबालागुनी ।।5।।

एका जनार्दनी ऐसें बोले व्रजबाळी। दाविलें लाघव ब्रह्मादिकां न कळे ते काळी ।। 6।।

भावार्थ

एके दिवशी कृष्ण गौळणीच्या घरी जावून ओसरीत बसले तेथून लोण्याचे मडके कोठे बांधले आहे याचा अंदाज घेतला. गौळणीने शारंगपाणीच्या मनातिल हेतू जाणून हरीला ताकीद दिली कीं, चोरी करण्यासाठी घरांत आल्यास शेंडी खांबाला बांधली जाईल.एका जनार्दनी म्हणतात, त्या वेळी हरीने अशी लीला दाखवली कीं, ब्रह्मादी देवांना सुध्दां त्यातील रहस्य जाणतां आले नाही.


41

उठोनि मध्यरात्रीं तेथें आला सांवळा । सुखसेजे पहुडली देखे गोपी बाळा ।।1।।

पती आणि गौळणी एके सेजे पहुडली। बैसोनियां सेजे विपरीत करणी केली ।।2।।

धरूनी गोपी वेणी दाढी पतीची बांधली। न सुटे ब्रह्मादिका ऐशी गांठ दिधली ।।3।।

करुनी कारण आले आपुले मंदिरा । यशोदे म्हणे कृष्णा काय केलें सुंदरा ।।4।।

जाहला प्रात:काळ लगबग उठे कामिनी । वोढतसे दाढी जागा झाला ते क्षणीं ।।5।।

कां गे मातलीस दिली वेणी गांठी । एका जनार्दनी आण वाहे गोरटी ।।6।।

भावार्थ

मध्यरात्री पती सह गौळणी सुखसेजेवर झोपली असताना सावळा हरी तेथे आला. गोपीची वेणी, पतीची दाढी एकत्र बांधून ब्रह्मदिक देवांना सुध्दां सोडवता येणार नाही अशी गांठ दिली. हे काम करून श्रीहरी आपल्या मंदिरी परतले.प्रात:काळ होताच गोपी लगबगीने उठली,दाढी ओढली गेल्याने पतीदेव जागे झाले आणि संतापले.श्रीहरीच्या या विपरीत करणीचे वर्णन करून एका जनार्दनी सांगतात कीं, गौळणीने ही गोष्ट शपथेवर नाकारली.


42

उभयतां बैसोनि क्रोधे बोलती । कैशी जाहली करणी एकमेक रडती ।।1।।

गोदोहन राहिलें दिवस आला दुपारी । धाउनी शेजारी येती पहाती नवलपरी ।।2।।

शस्रे घेऊनिया ग्रंथी बळें कापिती । कापिताचि शस्रे न कांपे कल्पांतीं ।। 3।।

घेऊनिया अग्नि लाविताती दाढी वेणी । न। जळेची वन्ही ऐशी केली कृष्णे करणी ।।4।।

ऐसा अनुभव लक्षावधि मिळाला । बोल बोलती बोला भलतेंचि बरळा ।।5।।

धांवुनिया नंदरायातें सांगती । एका जनार्दनीं नवल विपरित गती ।।6।।

भावार्थ

गौळण पतिसह संतापाने रुदन करीत असतां दुपार झाली.गाईंचे दूध काढायचे राहिले,शेजारी धावून आले, त्यांनी दाढी वेणीच्या गांठीचे नवल पाहिले.शस्रे घेऊन गांठ कापणे त्यांना जमेना,अग्नि लावून गांठ जाळण्याचा प्रयत्न केला पण ते ही जमेना,अग्नीच विझून गेला.अनेक लोकांनी हा चमत्कार बघितला.लोक तोंडाला येईल ते बोलू लागले.एका जनार्दनी म्हणतात,या विपरित करणीचे नवल नंदरायाला सांगण्यासाठी लोक राजमंदीराकडे धांवले.


43

नंदें आणविलें उभयतां राजबिंदी । गोवळे आणि गोवळी भोवतीं जनांची मांदी ।।1।।

येवोनि चावडीये उभयतां रडती । म्हणे नंदराव कैशी कामांची गती ।।2।।

अंकावरी बैसोनि सांवळा गदगदां हांसे । विंदान दाविलें तुज बांधिलें असे ।।3।।

आमुची तूं शेंडी काल बांधीन म्हणसी । न कळे देवाची माव देवें बांधिलें तुजसी ।।4।।

आतां माझी गती कैशी हरी ते सांगां । करुणाभरीत देखोनि गेलें लाघव वेगा ।।5।।

एका जनार्दनी रुणाकर मोक्षदानी । सहज दृष्टि पाहतां सुटली ग्रंथी दोनी ।।6।।

भावार्थ

नंदरायाच्या सेवकांनी गवळ्यासह गवळणीला चावडींत आणलें. ते दोघेही रडून आकांत करत असताना भोवतीं घरलोकांची गर्दी जमली.नंदरायाच्या मांडीवर बसून गदगदां हास्य करणारा सावळा हरी या विपरित करणीचे कारण व देवाचा न्याय स्पष्ट करतो.गौळण,गवळ्याचे दु:खित चेहरे बघून श्रीहरीचे मन दयेने भरले,त्याने लाघव करुन दोघांना मुक्त केले.एका जनार्दनी म्हणतात, करुणाकर, मोक्षदानी श्रीहरीने सहज दृष्टीने बघतांच वेणी दाढीची गांठ सुटली.


44

आल्हादयुक्त गोपिका आली आपुलें सदनीं । नंदासहित मोक्षदानी प्रवेशले भुवनी ।।1।।

म्हणे यशोदा बा कृष्णा न करी तूं खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ।।2।।

एका जनार्दनी माझा अपराध नाहीं। जया जैसा भाव तया तोचि देहीं ।।3।।

भावार्थ

या प्रसंगानंतर गोपिका आपल्या घरीं आणि नंदासह श्री हरी राजभुवनी परतले तेव्हां कुष्णाने अशा खोड्या करु नयेत त्यामुळे गोपिका वाईट बोलतात असे यशोदेने स्पष्ट केले.एका जनार्दनी म्हणतात,यांत मोक्षदानी श्री हरीचा दोष नाही, ज्याच्या मनांत जसा भाव असेल त्याप्रमाणेच त्याला देव दिसतो.


45

घरोघरीं चोरी करितो हृषीकशी । गाऱ्हाणें सांगती येऊनी यशोदेसी ।।1।।

भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निजभक्तांलागी दाखविसी लीला ।।2।।

कवाड उघडोनि शिंकें वो तोडिलें । दही दूध भक्षूनि ताक उलंडिलें ।।3।।

अंतर बाहेर मज व्यापियलें माया । एका जनार्दनी म्हणे न सोडी पाया ।। 4।।

भावार्थ

गोपींच्या घरी जाऊन हृषीकेशी चोरी करतो,दार उघडून शिंके तोडून दही दूध खातो,ताकाचे भांडे लवंडून टाकतो.असे गाऱ्हाणे गोपी येऊन यशोदेला सांगतात. गोविंदाची ही करणी भक्तांना लीला दाखवण्यासाठी आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, भक्तांचे मन अंतर्बाह्य व्यापून टाकणाऱ्या श्रीहरीचे चरण कधी सोडणार नाही.


46

एकमेक गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर ।।1।।

नायके वो बाई करुं गत काई । धरूं जातां पळून जातो न सांपडेचि बाई ।।2।।

दही दूध लोणी चोरी करूनियां खायें । पाहें जातां कवाड जैसें तैसें आहे ।।3।।

एका जनार्दनी न कळें लाघव तयाचें । न कळेचि ब्रह्मादिकां वेडावलें साचे ।। 4।।

भावार्थ

गौळणी एकमेकींना भेटून विचार करतात नंदाचा कान्हा चोरी करून पळून जातो,धरायला गेलो तर सांपडत नाही.दही दूध लोणी चोरी करून खातो,नवल असे कीं,घराचे दार जसेच्या तसे बंद असते.एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीची ही लीला कुणालाच समजत नाही.ब्रह्मदिक देवांना सुध्दां ही माया कळत नाही.


47

मार्गी जातां विस्मय करीं । कैसे विंदान केलें नवल परीं ।

आम्ही अबला घालितो चोरी। श्रीहरी परापश्यंती वेगळा ।।1।।

नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे ।

घरां घेऊनि जातां उभा आहे । न कळे विंदान सखे काय सांगू ।।2।।

एका जनार्दनी परिपूर्ण व्यापक सर्वांठायीं संपूर्ण ।

जनींवनीं जनार्दन । पाहतां महिमान न कळे ।। 3।।

भावार्थ

श्रीहरीला चोरी करतांना धरले आणि यशोदेच्या घरी जाऊन पाहतां यशोदे जवळ कान्हा उभा आहे असे दिसले.ही काय जादू आहे हे गोपींना कळत नाही. हा काहीतरी चमत्कार आहे असे त्यांना वाटते.एका जनार्दनी म्हणतात, अबलांच्या घरी चोरी करणारा श्रीहरी परा आणि पश्यंती या वाणींच्या पलिकडे आहे परमेशाने हा अवतार धारण केला असून तो विश्वव्यापक, सर्वांठायी जनींवनीं पूर्णात्वाने भरून राहिला आहे.


48

यशोदेसी गौळणी सांगती गाऱ्हाणें । नट नाटक कपटी

सांभाळ आपुलें तान्हें । किती खोडीं याच्या सांगूं तुजकारणें ।।1।।

सहस्रमुख लाजला । निवांतचि ठेला ।

वेद परतला । गाती अनुछंदे ।

वेध लाविला गोविंदें । परमानंदें आनंदकंदें ।। ध्रु0।।

एके दिवशीं मी गेले यमुनातट जीवना । गाई गोप सांगाते घेऊनि आला कान्हा ।

करीं धरीं पदरा न सोडी तो जाणा । एकांत घातलीं मिठी ।

न सुटे गांठीं पाहिला दृष्टी । नित्य आनंदु । वेध लाविला ।।3।।

किती खोडी याच्या सांगु तुज साजणी । गुण यांचे लिहितां न पुरे मेदिनी ।

रूप सुंदर पाहतां न पुरे नयनीं । एका जनार्दनी देखिला ।

ध्यानीं धरिला । मनीं बैसला । सच्चिदानंद । वेध लाविला.

भावार्थ

श्रीहरी अतिशय नाटकी, कपटी असून तो नाना प्रकारे खोड्या काढतो, हजारमुखे असलेला शेष सुध्दां श्रीहरीचा महिमा वर्णन करुं शकला नाही, वेदवाणीही मुक झाली.परमानंद आनंदकंद गोविंदाने मनाला वेध लावले आहे.यमुना किनारी पाणी भरण्यासाठी गेले असतां गोपांसंगे गाई घेऊन कान्हा तेथें येवून एकांतात पदर धरुन घट्ट मिठी घालतो, जी सोडवतां येत नाही. केवळ दृष्टीने आनंदाचा वर्षाव करतो असे सांगून गोपी म्हणते, श्रीहरीच्या गुणांचे वर्णन करायचे ठरवले तर संपूर्ण पृथ्वी देखील अपुरी पडेल.हरीचे सुंदर रुप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी नयन अपुरे पडतात, एका जनार्दनी म्हणतात, हा सच्चिदानंद श्री हरी डोळ्यांनी पाहिला, मनामध्ये रूतून बसला, ध्यानी,मनी वेध लागला.


49

हासोनिया राधा बोले यशोदेसी । पहा वो हा चोर बोले विश्वासी ।।1।।

आण वाहतसे लाटकीची मामिसें । याचिया वचनीं सर्वास विश्वासे ।।2।।

खोडी न करी ऐशी वाहे तूं आण । गोरसांवांचुनि न करीं तुझी आण ।। 3।।

एका जनार्दनी बोले विनोद वाणी । यशोदेसह हांसती गौळणी।। 4।।

भावार्थ

कान्हा नांवाचा चोर अत्यंत विश्वासाने बोलतो, कांहीतरी सबबी सांगून खोट्या शपथा घेतो असे असुनही याच्या शब्दावर सर्वांचा विश्वास बसतो.खोडी करणार नाही अशी शपथ घ्यायला सांगतांच गोरसाशिवाय शपथ घेणार नाही (गोरसाशिवाय दुसरी चोरी करणार नाही)असे म्हणतो असे राधा यशोदेला सांगून हसते.एका जनार्दनी म्हणतात, कान्हाच्या या गर्भितार्थी विनोद वाणीवर यशोदेसह सर्व गौळणी हांसतात.


50

मिळोनि अबला बैसली परसद्वारीं । येरेयेरे कृष्णा म्हणोनि वाहाती व्रजनारी ।। 1।।

ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ।।2।।

वेदश्रृतीसी । न कळे जयांची शुध्दी । तो नवनीत खावया लाहे। लाहे घरामधीं ।।3।।

एका जनार्दनी ब्रह्म परिपूर्ण । तेणे वेधें वेधिलें आमुचे मनाचें मन ।। 4।।

भावार्थ

गोकुळातील सगळ्या गोपिका मिळून परसद्वारीं बसतात आणि कृष्णाला बोलावतात, कृष्णाच्या (नंदनंदन) भेटीच्या लालसेने घरीच बसून असतांना त्यांचे सारे लक्ष कृष्णाकडे लागलेलें असते.वेदश्रुतींना देखील ज्याचा ठाव लागत नाही तो कान्हा लोणी खाण्यासाठी घरांत शिरतो. एका जनार्दनी म्हणतात, परिपूर्ण ब्रह्मरुपाने अवतरलेल्या श्री कृष्णाने सर्वांच्या अंतरंगाला वेध लावले आहेत.


51

मार्गी जातां विस्मय करी । कैसें विंदान केले नवल परी।

आम्हीं अबला घालितो चोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ।।1।।

नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे ।

घरां घेऊनि जातां उभा आहे। न कळे विंदान सये काय सांगू ।।2।।

एका जनार्दनी परिपूर्ण व्यापक सर्वांठायीं संपूर्ण । जनींवनीं जनार्दन ।

पाहतां महिमान न कळे ।। 3।।

भावार्थ

रस्त्याने जातांना विस्मयचकित झालेल्या गोपी श्रीहरीने दाखवलेल्या चमत्कारा विषयी विचार करतात, चोरी करताना पकडलेल्या कान्हाला यशोदेकडे नेले तव्हां तो यशोदा जवळ उभा असलेला दिसतो.श्री हरीच्या लीलांचे रहस्य अगम्य असून तो परापश्यंती वाणीच्या पलिकडे आहे.एका जनार्दनी म्हणतात, परब्रह्मरुपी परमात्मा सर्वांच्या अंत:करणांत वसत असून व्यापक असून परिपूर्ण आहे.जनींवनीं दिसणार्या या जनार्दनाचा महिमा बुध्दीला आकलन होत नाही.

५२

आम्ही असता माजघरी । रात्र झाली दोन प्रहरी ।

मी असता पतिशेजारी । अवचित हरी तुझा आला ।।१।।

काय सांगू सखये बाई । वेदशास्त्रा अगम्य पाही ।

आगमानिगमा न कळे कांही । मन पवन पांगुळले गे बाई ।।२।।

आम्ही असतां निदसुरी । मुंगुस घेऊनी आपुले करी ।

सोडियेले दोघा माझारी । तंव ते बोचकरी आम्हांते ।।३।।

आम्ही भ्यालो उभयतां । चीर फिटलें बाई तत्वता ।

नग्नचि जाहले मी सर्वथा । भूतभूत म्हणोनि भ्याले ।।४।।

ऐसे करूनि आपण पळाला । जाउनि माये आड लपला ।

एका जनार्दनी म्हणे भला । आता सापडता न सोडी त्याला ।।५।।

भावार्थ

गोकुळीची एक गोपी तिचे गाऱ्हाणे सखीला सांगतांना म्हणते, रात्रीच्या दोन प्रहरी माजघरात पतीसह शयन केले असतांना वेदशास्त्रांना अगम्य असणारा श्रीहरी हातात मुंगुस घेऊन घरात शिरला आणि दोघांमध्ये मुंगुस सोडले. त्या मुंगसाने बोचकारून हैराण केले, अंगावरची वस्त्रे फाडली. दोघे भयाने गर्भगळीत झाले. ही खोडी काढून कान्हा घरी जाऊन आईमागे लपला. एका जनार्दनी म्हणतात, हे सावळे परब्रह्म हाती सापडल्यास मोकळे सोडणार नाही.


५३

गौळणी बारा सोळा । होउनी येके ठायी मेळा ।

म्हणती गे कृष्णाला । धरु आजी ।।५३।।

कवाड लाउनी । बैसल्या सकळजणी ।

रात्र होतांचि माध्यानीं । आला कृष्ण ।।2।।

दहीं दूध तूप लोणी । यांची भाजनें आणुनी ।

रितीं केलीं तत्क्षणीं । परी तयां न कळे ।।3।।

थोर लाघव दाविलें । सकळां निद्रेनें व्यापिलें ।

द्वार तें नाहीं उघडिलें । जैसें तैसेंचि ।।4।।

खाउनी सकळ । मुखा लाविलें कवळ ।

आपण तात्काळ । पळे बाहेरी ।।5।।

एका जनार्दनी । ऐशी करूनी करणी ।

यशोदे जवळी येउनी । वोसंगा बैसे ।।6।।

भावार्थ

बारा ते सोळा गौळणी एकत्र जमून कृष्णाला चोरी करतांना पकडण्याचा विचार करतात.दार बंद करून दबा धरून बसतात.मध्य रात्रीं श्री कृष्ण आपले लाघव दाखवतो,दार न उघडता घरांत शिरतो, चमत्कार करून सर्वांना निद्राधीन करतो.दही, दूध तूप,लोणी यांची मडकी आणून सर्व काही खाऊन फस्त करतो. कुणालाही न कळत मडकी रिकामी करून पळ काढतो.यशोदे जवळ साळसूदपणे येऊन बसतो, असे एका जनार्दनी या अभंगात कथन करतात.

यशोदा राधा संवाद

54

नानापरी समजाविलें न परी राहे श्रीहरी । दहीभात कालवोनी दिला वेगीं झडकरीं ।

कडेवरी घेऊनिया फिरलें मी द्वारोद्वारी।।1।।

राधे राधे राधे राधे घेई श्यामसुंदरा । नेई आतां झडकरीं आपुलिया मंदिरा ।।ध्रु0 ।।

क्षणभरी घरी असतां करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरी जातां आळ घेती गौळणी ।

थापटोनि निजवितां पळोनि जातो राजद्वारा ।।2।।

राधा घेऊनि हरिला त्वरें जात मंदिरीं । हृदयमंचकी पहुडविला श्रीहरी ।

एका जनार्दनी हरीला भगी राधा सुंदरा ।।3।।

भावार्थ

यशोदा राधेला सांगते, श्रीहरीला दही भात कालवून दिला, कडेवर घेऊन दारोदारीं फिरले.अनेक प्रकारे त्याला समजावले.घरांत क्षणभर सुध्दां खोड्या केल्याशिवाय राहात नाही.खेळायला बाहेर गेला कीं, गौळणी गाऱ्हाणी घेऊन येतात.थापटून झोपवण्याचा प्रयत्न केला तर राजद्वारीं पळून जातो. राधा हरीला घेऊन घाईघाईने घरी येते.अत्यंत प्रेमाने त्याला मंचकावर झोपवतें.एका जनार्दनी म्हणतात, प्रेमरुप भक्तिभावाने राधिका श्रीहरीला आपलेसे करते.


55

करूं देईना मज दूध तूप बाई । मथितां दधि तो धरीं रवी ठायीं ठायीं ।

हट्टे हा कदापि नुमजे समजाविल्यास काई । समजावुनी यातें तुझ्या घरांत नेई नेई ।।1।।

राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेई घेई । रडतांना राहिना करुं यांस गत काई काई ।।ध्रु0।।

हरिसी आनंदे राधा मृदु मृदु बोलविते । पाळण्यांत तुला कृष्णा निजवोनी हालवितें ।

गृहा नेऊनियां दहीं भात कालवितें । यशोदेसी सोडी कान्हा माझ्याजवळी येई येई ।। 2।।

हट्ट मोठा घेतो मला छळितो गे राधे पाहाणें । असाच हा नित्य राधे हरिघरा नेत जाणें ।

उगाचि हा निश्चळ कैसा राहे त्वां समजावल्याने । तुझी धरितें हनुवटी यासी गृहा नेई नेई ।।3।।

गोविंदा गोपाळा कृष्णा मुकुंदा शेषशाई । जगज्जीवना गोकुळभुषणा गोपी भुलवणा बाई ।

उगा नको रडूं कृष्णा यशोदेसी सोडीं तूंही । एका जनार्दनी शरण राधे घेऊनी यासी जाई जाई ।।4।।

भावार्थ'

दही घुसळत असतांना कान्हा परत परत रवी धरुन ठेवतो, कितिही समजावले तरी त्याला समजत नाही.या कान्हाला कडेवर उचलून घरी घेऊन जाण्यास यशोदा राधेला सांगते.राधा आनंदाने हरीला हळुवार पणे बोलवतें, पाळण्यांत निजवून झोके देण्याचे,दही भात कालवून देण्याचे, अमिष दाखवते.यशोदेला सोडून येण्यासाठी कान्हाची विनवणी करते. तेव्हां हरि निश्चळ होतो.एका जनार्दनी म्हणतात, शेषशाई भगवान गोकुळाचे भुषण बनून गोविंद, गोपाळ, कृष्ण, मुकुंद ही नावे धारण करून गोकुळीच्या गवळणींना भुलवतो.


56

एके दिवशीं शारंगपाणीं । खेळत असतां राजभुवनीं ।

तेव्हां देखिलीं नयनीं । गौळणी ते राधिका ।।1।।

मीस करुनी पाणीयाचें । राधा आली तेथें साचें ।

मुख पहावया कृष्णाचें । आवड मोठी ।।2।।

देव उचलोनि घेतला । चुंबन देउनि आलंगिला ।

सुख संतोष जाहला । राधेलागीं ।।3।।

यशोदा म्हणे राधिकेसी । क्षणभरी नेई गे कृष्णासी ।

कडे घेउनी वेगेसीं आणिला घरा ।।4।।

हृदयमंचकी बैसविला । एकांत समय देखिला ।

हळूच म्हणे कृष्णाला । लहान असशी ।।5।।

कृष्ण म्हणे राधिकेसी । मंत्र आहे मजपाशीं ।

थोर होतों निश्चयेंसी । पाहें या आतां ।।6।।

वैकुंठीचा मनमोहन । सर्व जगाचे जीवन ।

एका जनार्दनी विंदान । लाघव दावीं ।। 7।।

भावार्थ

एके दिवशी श्रीकृष्ण (शारंगपाणी) राजवाड्यांत खेळत असतांना गौळण राधिकेने पाहिला.कृष्णाला बघण्यासाठी पाणी आणण्याचे निमित्त करून राधा गौळण तेथें गेली.कृष्णाला उचलून घेऊन आलिंगन देऊन चुंबन घेतले आणि सुख-संतोष पावली.यशोदेने राधिकेला कृष्णाला तिच्या घरी घेऊन जाण्यास सांगितले आणि राधा कान्हाला घेऊन घरी आली. एकांतात लहान आहेस असे राधिकेने कृष्णाला सांगताच आपल्याकडे थोर होण्याचा मंत्र आहे असे कृष्णाने स्पष्ट केले. एका जनार्दनी म्हणतात, मनमोहन,जगत् जीवन, वैकुंठीचा राणा आपले लिला लाघव जगाला दाखवत आहे.


57

हर्ष न माये अंबरीं । येऊनियां झडकरी ।

द्वार उघडी निर्भरी । आनंदमय ।।1।।

वृध्दा येऊनियां पाहें । उचलोनि लवलाहे ।

मुख चुंबिलें तें पाहे । कृष्णाचें देखा ।।2।।

मोहिलें वृध्देचें मन । नाठवे आपपर जाण ।

लाघवी तो नारायण । करूनियां अकर्ता ।।3।।

दोहीं करें उचलिला । राधिकेजवळीं तो दिला ।

म्हणे राधेसी ते वेळां । यासी नित्य आणी ।।4।।

तुज न गमे एकटी । आणित जाई जगजेठी ।

एका जनार्दनीचे भेटी । रे कांहीं विकल्प ।।5।।

भावार्थ

राधा गौळण हरीला घेऊन घरी येतांच वृध्देने दार उघडून बघितले आणि कृष्ण दर्शनाने झालेला आनंद गगनांत मावेनासा झाला, घाईघाईने कृष्णाला उचलून तिने त्याचे चुंबन घेतांच तिचे मन मोहरलें, मनातला आपपर भाव क्षणांत मावळला.कान्हाला राधेकडे देवून तिने सांगितले एकटेपणा घालवण्यासाठी याला नेहमी घरी आणावे.एका जनार्दनी म्हणतात, हा जगजेठी श्री कृष्ण अत्यंत मायावी, लाघवी असून सर्व कांही करूनही अकर्ता आहे,मनातले सगळे विकल्प नाहीसे करणारा आहे.


58

निमासुर वदन । शंखचक्रांकित भूषण ।

शोभतसे राजीवनयन । राधेजवळी ।।1।।

नवल मांडिलें विंदान । वेदां न कळे महिमान ।

वेडावली दरुशनें । न कळे तयां ।।2।।

रत्नजडित पर्यंकी। पहुडले हर्ष सुखे ।

नवल जाहलें तें ऐकीं । सासू आली घरा ।। 3।।

वृद्धा म्हणे राधेसीं । दार उघड वेगेंशीं ।

गुह्य गोष्टी बोलसी । कवणाशीं आंत ।।4।।

राधा म्हणे मामिसे । गृहामध्यें कृष्ण असे ।

मज गमावया सरिसें ।आणिला घरीं ।।5।।

क्षणभरीं स्थिर रहा । भाले पायीं आंत न या ।

भोजन जाहलिया । उघडिलें द्वार ।।6।।

म्हणे कृष्णा आतां कैसें । द्वारी वृध्दा बैसलिसे।

लज्जा जात अनायासें उभयतांसी ।।7।।

कृष्ण म्हणे राधेसी । मंत्र नाठवें मजसी ।

काय उपाय गोष्टीसी । सांगे तूं मज ।।8।।

नेणो कैसी पडली भुलीं । मंत्र चळला यां वेळीं ।

ऐकोनी राधा घाबरली । दीनवदन ।।9।।

करुणा वचनें बोले राधा । विनोद नोहे हा गोविंदा ।

माझी होईल आपदा । जगामाजी।। 10।।

भक्त वत्सल मनमोहन । शरण एका जनार्दन ।

ऐकोनी राधेचें वचन । सान जाहला।। 11।।

भावार्थ

कमला सारखे नयन, सुंदर मुखचंद्रमा, हातामध्यें शंख,चक्र धारण केलेला श्रीहरी राधे समीप रत्नजडित मंचकावर आनंदांत सुखाने पहुडला असतांना विस्मयकारक गोष्ट घडली. राधेची सासु घरी येऊन दार उघडायला सांगते.घरांत कृष्ण असून भोजनाला बसला आहे तेव्हां थोडा वेळ थांबा, बाहेरच्या पावलांनी आंत येऊं नका असे राधा सासुला विनविते. दारांत वृध्द सासु बसली असून दोघांना ही गोष्ट लज्जास्पद आहे असे ती कृष्णाला सांगते.आतां आपण मंत्र विसरलो असून कसा विसर पडला हे सांगता येत नाही असे कृष्णाने सांगताच राधा अतिशय घाबरली. लोकांत आपली निंदा नालस्ती होईल या विचाराने दीन वदनाने ती कृष्णाची करुणा भाकते. एका जनार्दन म्हणतात,शरणागत झालेल्या राधेची शोकमग्न अवस्था पाहून भक्तवत्सल श्रीहरी परत सानरुप धारण करतो.


59

मथुरेसी गोरस विकूं जातां नितंबिनी । तयामाजीं देखिली राधिका गौळणी ।

जवळीं जाऊनियां धरिली तिची वेणी ।।1।।

सोडीं सोडीं कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातिलें पाणी ।

नांव रूप माझे बुडविलें जनीं । राधा म्हणे येथुनियां बहु चाट होसी ।

घरीं चोरीबकरूनिया वाट आडविसी । ओढोनिया नेते आतां तुज मातेपाशीं ।।3।।

धरिलीं पदरीं राधा न सोडीच निरी । दान दे आमुचे म्हणे मुरारी ।

भोवतालीं हांसती व्रज सुंदरीं ।।4।।

भक्तीचियां पोटीं राधा समरस जाली । कृष्णरुप पाहूनियां देहभावा विसरली ।

एका जनार्दनी राधा शेजें पहुडली ।।5।।

भावार्थ

गोकुळीच्या गौळणी दूध विकण्यसाठी मथुरेला जाण्यासाठी निघाल्या असतां कान्हाने राधिकेला पाहिले.जवळ जाऊन तिची वेणी धरली.घरांत चोरी करून वाट आडवणार्या लोकांमध्ये नाव रुपाला काळिमा लावणाऱ्या शारंगपाणीला ओढून यशोदा कडे नेते अशी धमकी राधेने दिली असतां कान्हा साडीचा पदर पकडून आपले गोरसाचे दान मागू लागला. हे पाहून बाकीच्या गौळणी हसू लागल्या. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तीप्रेमाने राधा देहभान विसरून श्रीहरीशी समरस झाली.


60

फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनी नारंगी फाटा।।1।।

वारियानें कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ।। 2।।

राधा पाहून भरले हरी । बैल दुभे नंदाघरीं ।।3।।

हरी पाहुनि भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ।।4।।

मन मिनलेसें मना । एका भुलला जनार्दना ।।5।।

भावार्थ

फणस, डाळिंब कर्दळी यांचा लाकुडफांटा घैऊन मार्गीं चाललेल्या राधेच्या कानातील कुंडल वाऱ्याने हालत आहेत आणि कावरी बावरी नजर कान्हाला शोधत आहे असे वर्णन करून या अभंगात एका जनार्दनी म्हणतात,राधेला पाहून भुललेले श्रीहरी नंदाघरी बैलाचे दूध काढतात तर हरीला पाहून भुललेली राधा रिकामा डेरा घुसळते.भक्तीरसांत मने समरस होतात.


61

आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करूनी ।।ध्रु0 ।।

पहिली गौळण रंग सफेद । जशी चंद्राची ज्योत ।

गगनीं चांदणी लखलखित । ऐका तिची मात ।

मंथन करीत होती दारांत । धरून कृष्णाचा हात ।

ऐशा आल्या पांच गौळणी ।।1।।

दुसरी गौळण साधीभोळी । रंग हळदीहुनि पिवळी ।

पिवळा पितांबर नेसून आली । अंगी बुटेदार चोळी ।

एक लहान तनु उमर कवळी । जशी चांफ्यांची कळी ।

ऐशा आल्या पांच गवळणी ।।2।।

तिसरी गौळणी रंग काळा । नेसून चंद्रकळा ।

काळे काजळ लेऊन डोळा । रंग तिचा सांवळा ।

काळीं गरसोळी लेऊन गळां । आली राजस बाळा ।

ऐशा आल्या पांच गौळणी ।।3।।

चवथी गौळण रंग लाल । लाल लालही लाल ।

कपाळीं कुंकुम चिरी लाल । भांगीं भरून गुलाल ।

मुखी विडा रंग लाल । जसे डाळिंबांचे फूल ।

ऐशा आल्या पांच गौळणी ।।4।।

पांचवी गौळण हिरवा रंग । अवघ्या झाल्या दंग ।

हिरव्या कांकणांचा पहा रंग । जसे आरशीत जडलें भिंग ।

फुगडी खेळतां कृष्णासंग । एकनाथ अभंग ।

ऐशा आल्या पांच गौळणी ।।5।।

भावार्थ

या अभंगांत संत एकनाथ पांच रंगाचा शृंगार करून आलेल्या पांच गवळणींचे प्रत्ययकारी वर्णन करतात. पहिली गौळण सफेद रंगाचा साज चढवून आली असून आकाशातील चमकदार चांदणी प्रमाणे शोभून दिसते.चंद्राच्या प्रकाशांत न्हाऊन निघाल्या सारखी ही गौळण दारात उभी राहून कृष्णाचा हात धरून दह्याचा डेरा घुसळीत आहे.दुसरी गौळण साधीभोळी असून हळदी सारखी पिवळ्या रंगाची असून पिवळा पितांबर नेसून आली असून अंगांत बुट्टेदार चोळी घातली आहे. तिसरी कोवळ्या वयातील सुबक, सुंदर लहान बांधा चाफेकळी सारखा चंद्रकळा नेसलेली ,सांवळ्या रंगाची असून तिने डोळ्यांत काजळ घातले असून गळ्यांत काळी गरसोळी शोभून दिसते आहे आहे. चवथी गौळण लाल शृंगार लेऊन आली आहे. भागामध्ये लाल गुलाल, कपाळावर लाल कुंकुम टिळा, तोंडात लाल विडा, डाळिंबाच्या फुलासारखी. पांचवी गौळण, हिरवा साज चढवला असून करांत हिरवी कांकण (बांगड्या) घालून कृष्णा बरोबर फुगडी खेळते.


62

देखे देखे गे जशोदा मायछे। तोरे छोरीयानें मुजें गारी देवछे ।।1।।

जमूनाके पानीयां मे जावछे । बीच मीलके घागरीया फोडछे ।।2।।

मैनें जाके हात पकरछे। देखे आपही रोवछे मायना ।।3।।

एका जनार्दन गुन गावछे । फेर जन्म नही आवछे मायना ।।4।।

भावार्थ

गोकुळातील एक गवळण यशोदेला कान्हाचे गाह्राणे सांगते. गौळण यमुनेवर पाणी आणण्यासाठी गेली असतां कान्हाने सवंगडी जमवून घागर फोडली. गौळणीने कान्हाचे हात पकडले.कांगावा करुन कान्हा आपणच रडू लागला.एका जनार्दन श्री हरीचे गुण वर्णन करतांना म्हणतात, श्रीहरी जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करणारे परमात्मा आहेत.


63

माई मोरे घर आयो शामछे। गावढी छोडी मोरे मनछे ।।1।।

दधी दूध माखन चुरावें हमछे । छोकरीया खालावत देवछे।। 2।।

मारी सुसोवन लगाछे । बालन उनके पकड लीनछे।। 3।।

एका जनार्दन थारो छोडछे। वेड लगाये माई हमछे।। 4।।

भावार्थ

एक गौळण कान्हाची तक्रार करते कीं, संध्याकाळी श्यामने गोठ्यांत दावणीला बांधलेली गाय सोडून दिली.घरातील दही, दूध,लोणी चोरून नेऊन बालगोपाळांना खाऊं घातले. सुनेने प्रतिकार केला तेंव्हा तिचे केस पकडले. एका जनार्दन म्हणतात, यशोदेच्या कान्हाने सर्वांना वेड लावून सतावून सोडलं.


64

हो भलो तुम नंदन लालछे । गांवढी बतावछे ।।1।।

आगल पिछिल ध्यानमें आवछे । मंगल नाम तोरा मे गावछे ।।2।।

तारो सुंदर रूप मोरे मनछे। प्रीत लगी कान्हा हमसे।। 3।।

एका जनार्दनी तोरे नामछे गावत घ्यावत हृदयमेछे।। 4।।

भावार्थ

गोकुळीची गौळण सांगते, नंदलाल नंदाचा लाडला असून त्याचे मंगलमय नाम आणि सुंदर रूप मनामध्ये ठसले आहे,सर्वांना त्याने भक्तीप्रेमानें जिंकले आहे.वारंवार मनाला त्याचे ध्यान लागते. एका जनार्दन सतत श्री हरीचे नामस्मरण करतात, हृदयात ध्यान लावतात.


65

मारी गावडी चुकलीसे भाई । देखन देखन त्रिभुवनसे आई ।

उन शोधन लागछे भाई । अब कैसी गत करूछे आई ।।1।।

मथुरा लमानीन मारो नामछे । गावढी देखत आई गांवछे।

दृष्टी देखन नहीं मनछे। कैसे भुलाय कन्हयानछे ।।2।।

भूली भूली जाई मानछे । कहीं मिलन मोरे ध्यानछे।

एका जनार्दनसे पगछे। अखंड चित्त जडो गावढीसे।। 3।।

भावार्थ

लमानी नावाची मथुरेची गौळण वाट चुकलेल्या आपल्या गाईला त्रिभुवनांत शोधून आली असून कन्हैयाला पाहून भुलून गेली.आपले मनच हरवून बसली.कन्हैया ने आपल्याला ध्यांनात दर्शन द्यावे अशी ती प्रार्थना करते. एका जनार्दनी म्हणतात,कन्हैयाच्या चरणकमलाशी अखंड चित्त जडावें.


66

दिसे सगुण परि निर्गुण। आगमां निगमां न कळे महिमान ।

परा पश्यंती खुंटलीया जाण । त्याचें न कळे शिवासी महिमान ।।1।।

पहा हो सांवळा नंदाघरीं । नवनीताची करीतसे चोरी ।

गौळणी गाह्राणी सांगती नानापरी । त्याचें महिमान न कळे श्रमले सहाचारी ।।2।।

कोणी म्हणती यासी शिक लावूं । कोणी म्हणती आला बाऊ ।

दाखवी लाघव नवलाऊ । अगम्य खेळ ज्याचा कवणा न कळे कांहीं ।।3।।

चोरी करितां बांधिती उखळी दावें । येतो काकुळती माते मज सोडावें।

एका जनार्दनी दावीं सोंग बरवें ।ज्याची कीर्ति ऐकतां अघ नासे सर्वे।। 4।।


भावार्थ

नंदाघरी सावळा श्रीहरी नवनीताची चोरी करतो. गोकुळीच्या गौळणी नाना प्रकारे कन्हैयाच्या तक्रारी यशोदेकडे करतात. कोणी म्हणतात याला चांगली अद्दल घडवून आणली पाहिजे. श्रीहरी आश्चर्य वाटतील अशा अनेक लीला करतो. हरीचे हे खेळ कुणालाही न कळणारे अगम्य वाटतात.चोरी करताना पकडून त्याला दोरीने उखळाला बांधतात तेव्हां हा त्रिभुवनपती काकुळतीला येऊन सुटकेसाठी यशोदा मातेची विनवणी करतो.एका जनार्दनी म्हणतात, सगुणरूपात दिसणारा हा परमात्मा निर्गुण आहे, त्याचा महिमा वेद आणि श्रुतींना देखील अगम्य वाटतो. त्याचे वर्णन वैखरी, मध्यमाच नव्हे तर परा आणि पश्यंती या वाणी सुध्दा करु शकत नाहीत. निरनिराळी सोंग घेऊन मती गुंग करतो कीं, शिव शंकराला सुध्दां त्याचे रहस्य उलगडून दाखवतां येत नाही. या परमेशाची कीर्ती केवळ श्रवणाने सर्व पापांचा नाश करते.


67

आवरी आवरी आपुला हरी। दुर्बळ्याची केली चोरी ।

घरा जावयाची उरी ।कृष्णे ठेविली नाहीं ।।1।।

गोळणी उतावेळी। आली यशोदेजवळी।

आवरी आपुला वनमाळी। प्रळय आम्हां दिधला।। 2।।

कवाड भ्रांतीचें उघडिलें। कुलूप मायेचे मोडिलें शिंके अविद्येचे तोडिलें।

बाई तुझिया कृष्णें ।।3।।

होती क्रोधाची कर्गळा। हळूचि काढिलेसे बळां।

होती अज्ञानाची खिळा तीहि निर्मूळ केली।। 4।।

डेरा फोडिला दंभाचा। त्रिगुण तिवईस ठाव कैसा ।

प्रपंच सडा हा ताकाचा। केला तुझिया कृ जे जे मी मीष्णे।।5।।

अहंकार होता ठोंबा। उपडिला धुसळखांबा ।

तोही टाकिला स्वयंभू। बाई तुझिया कृष्णें ।।6।।

संचित हे शिळें लोणी । याचि केली धुळधाणीं।

संकल्प विकल्प दुधाणीं । तींही फोडिलीं कृष्णें ।।7।।

प्रारब्ध हें शिळें दहीं । माझें खादलें गे बाई।

क्रियमाण दूध साई । तींही मुखीं वोतिली ।।8।।

द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे ।

होतें कामाचें तें पाळें। तेंहि फोडिलें कृष्णें ।।9।।

सुचित दुश्चित घृत घागरी । लोभें भरल्या होत्या घरीं ।

त्याहीं टाकिल्या बाहेरी। तुझिया कृष्णें।। 10।।

कल्पनेची उतरंडी। याची केली फोडाफोडी ।

होती आयुष्याची दुरडी। तेंही मोडिली कृष्णें ।।11।।

पोर रे अचपळ आमुची। संगती धरली या कृष्णाची ।

मिळणी मिळाली तयांची। संसाराची शुध्द नाहीं ।। 12।।

ऐशीं वार्ता श्रवणीं पडे। मग मी धावोनि आलें पुढें।

होतें द्वैताचें लुगडें । तेंही फिटोनि गेलें।। 13।।

आपआपणा विसरलें। कृष्णस्वरूपीं मिळालें।

एका जनार्दनी केलें । बाई नवल चोज।। 14।।

भावार्थ

कन्हैयाच्या चमत्कारिक लिलांनी हैराण झालेली गवळण उताविळपणे यशोदेकडे येऊन आपली तक्रार दाखल करते, जो अतिशय दुर्बल आहे त्याच्या घरीं कृष्ण चोरी करतो, संसार मायेने भ्रांत(भयभीत) झालेल्या चित्ताची कवाडे उघडून श्रीहरी मायेचे कुलूप मोडून टाकतो. शिरावर असलेलें अविद्येचे शिंके (अज्ञान) फोडून गळ्यांत असलेली क्रोधाची शृंखला सहजपणें दूर करतो. अज्ञान समूळ नाहिसे करतो.सत्व,रज,तमोगुणाच्या तिवुईवर उभारलेला दंभाचा डेरा फोडून जीवाची प्रपंचातून सुटका करतो. अहंकार रूपी मजबूत खांब समूळ उपटून टाकतो. जन्मोजन्मीच्या पापपुण्याचा संचय म्हणजे शिळे लोणी, या संचिताची श्रीहरी धूळधाण करुन जीवाची मुक्तता करतो.संकल्प आणि विकल्प यांच्या पासून मन मुक्त करतो. प्रारब्ध रूपी शिळे दही खाऊन संपवतो.माणसाचे भलेबुरे कर्म म्हणजे दुधावरची साय! ह्या कर्मफलापासून सुटका करतो.मानवी मन म्हणजे द्वेषाने भरलेले रांजण, त्याला स्पर्श करताच हात काळे होतात,या द्वेषापासून श्रीहरी मनाची सुटका करतो. लोभीपणाने भरून ठेवलेल्या सुचित आणि दुश्चित रूपी तुपाच्या घागरी श्रीकृष्ण बाहेर काढतो, कल्पनांची उतरंडी फोडून आणि आयुष्याची दुरडी मोडून मुक्तीचा मार्ग मोकळा करतो. कृष्णरूपाशी एकरूप होतांच देहबुध्दी लयास जाऊन द्वैताचे बंधन फिटून जाते, आपपर भाव संपून चित्त कृष्णस्वरुपांत मिळून जाते असे एका जनार्दनी सांगतात.


गौळणीस श्रीकृष्णाचा वेध

68

चंद्रहुनी शीतळ रवीहुनी सोज्वळ। तेणे मज केवळ वेधियेलें ।।1।।

वेध कैसा मज लागला वो बाई ।।ध्रु0।।

अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदु । रुपेविण आनंदु देखिला बाई ।।2।।

एका जनार्दनी आनंदु परिपूर्ण। काया वाचा मने वेधिलें वो बाई ।।3।।

भावार्थ

चंद्र किरणापेक्षा शीतळ, सूर्यनारायणाच्या तेजापेक्षा निर्मळ अशा श्रीहरीच्या रूपाने चित्त वेधले जाते, अमृतापेक्षा गोड, आकाशापेक्षा तरल, इंद्रियजन्य सुखाशिवाय निरागस आनंद अनुभवास आला असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीचे दर्शन म्हणजे काया वाचा मनाला भरून टाकणारा परिपूर्ण आनंद!


69

गौळणींचा थाट निघाला मथुरेला हाटालागीं । तें दखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगीं ।।1।।

कान्हया सरसर परता नको आरुता येऊन। तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं।। ध्रु0।।

सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊं दे रहे हरी । बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरी ।।2।।

आम्ही बहुजणी येकला तूं शारंगपाणी दिससी येथें । हृदयमंदिरीं ठेऊनी तूंतें जाऊं मथुरापंथें ।।3।।

एका जनार्दनी ब्रह्मवदिनी गोपिया वरवंटा । कृष्णपदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ।।4।।

भावार्थ

सर्व मिळून गौळणी मथुरेच्या बाजारीं जाण्यासाठीं निघाल्या हे पाहून जगदीश श्रीकृष्ण आपले गोप सवंगड्यांना गोळा करून वेगानें निघाला. त्या सासुरवासिनी गौळणी कान्हाला परत मागे फिरण्याची ,वाट न अडविण्याची विनंती करतात. घरी सासुसासरे प्रतिक्षा करीत असून विलंब झाल्यास क्रोध करतील असे त्या गौळणी परोपरीने सांगतात. शारंगपाणीला हृदयमंदिरी ठेवून मथुरेची वाट चालू लागतात असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,कृष्णपदी शरणागत झालेल्या त्या गोपिका एकनिष्ठपणे भक्तिभावाने समरस झाल्या आहेत.


70

ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगून काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ।।1।।

देवकीनें वाईला यशोदेने पाळिला। पांडवांचा बंदीजन होऊनियां राहिला ।।2।।

ब्रह्मांडाची सांठवण योगीयाचें निजधन । चोरी केली म्हण्ऊनी उखळासी बंधन।।3।।

सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूलपाणी ।राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ।।4।।

शरण एका जनार्दनी कैंवल्याचा मोक्षदानीं । गाई गोप गोपीबाळां मेळवीले आपुलेपणी।।5।।

भावार्थ

एक गौळण आपल्या सखीला नवलाची गोष्ट सांगते कीं,तिन्ही लोकांचा स्वामी श्रीहरी यशोदेला आई म्हणतो. देवकीने नऊ महिने गर्भांत जतन केला, यशोदेने गोकुळात पालनपोषण केले. पांडवांच्या प्रेमभक्ती बंधनांत बंदी बनून राहिला.तिन्ही ब्रह्मांड ज्याच्या रुपांत साठवलेली आहेत,जो योगीजनांचे परम भाग्य आहे अशा बाल कृष्णाला चोरीच्या निमित्ताने उखळाला बांधून ठेवलें.सगळी तीर्थे ज्याच्या चरण स्पर्शाने पावन होतात तो शूलपाणी आवडीनें राधिकेची वेणीफणी करतो.जनार्दन स्वामींच्या पायी शरणागत असलेले एका जनार्दनी म्हणतात, कैवल्याचे दान देवून जो जन्म बंधनातून मुक्त करतो तो श्रीहरी गोकुळातील गोप गोपिकांना आपलेपणाने हृदयाशी कवटाळतो.


71

कृष्णमूर्ती होय गे कळों आली सोय गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगू काय गे ।।1।।

तुळशी माळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । अर्धांगी रुक्मिणी विंझणें वारित गोपी बाळा गे ।।2।।

पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे। नारद तुंबर गायन करती पुढें निजदास गे ।।3।।

भक्त कृपेची माय गे वोळखिली विठाई गे । एका जनार्दनी विटे जोडियेले पाय गे।। 4।।

भावार्थ

एकनिष्ठ भक्तांना प्राणाहून प्रिय असलेली कृष्णाची मूर्ती पाहून जीवनाचे सार्थक झाले असे वाटते,सारे सुख दाटून येते. राणी रुक्मिणी सह विराजमान असलेल्या श्री कृष्णाच्या कपाळावर कस्तुरीचा टिळा आणि गळ्यांत तुळशीची माळ शोभून दिसते आहे .कमरेला पिवळा पीतांबर कसला आहे. गोपी पंख्याने वारा घालीत आहेत तर नारद तुंबर पुढे उभे असून गायन करीत आहेत. भक्तांवर कृपेची सावली धरणारी विठाई पाहून एका जनार्दनी विटेवरील कृष्णमूर्ती पुढे नतमस्तक होतात.


'72'

देखिला अवचिता डोळां सुखाचा सागरु । मन बुध्दी हारपली झाले एकाकारु ।

न दिसे काया माया कृष्णीं लागला मोहर।। 1।।

अद्वया आनंदा रे अद्वया आनंदा रे । वेधियेल्या कामिनी अद्वया आनंदा रे ।।2।।

खुंटलें येणे जाणें घर सासुर। नाठवे आपपर वेधियेलें सुंदर ।

आंत सबाह्य व्यापिलें कृष्ण परात्पर नागर वो ।।3।।

सावजी कळलें आतां लोधलें निर्गुणा।, एका जनार्दनी कृपा केली परिपूर्णा।

गगनीं गिळियेलें उणें उरी नुरेचि आपणा।। 4।।

भावार्थ

श्री कृष्णरुपाने सुखाचा सागर अचानक सामोरा आला.मन,बुध्दी हरपून केवळ एकाकार कृष्णरुप सगळीकडे भरून राहिले.देहाचे,संसाराचे भान विलयास गेले. कृष्ण रुप पाहून मन मोहरून आलें.अनुपमेय आनंदाने मन वेधले. आपपर भाव नाहीसा झाला, घर,संसाराचा विसर पडला.आंतबाहेर सर्व विश्व कृष्णरुप व्यापून राहिलें.सद्गुरू कृपेने निर्गुण स्वरुपाचा साक्षात्कार झाला. एका जनार्दनी या अनुभवाचे साक्षात दर्शन या अभंगात कथन करतात.


73

दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती । अगणित लावण्य तेज प्रभा दिसती गे माये ।।1।।

कानडा वो सुंदर रुपडा गे। अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ।।2।।

आलिंगनालागीं मन उताविळ होय। क्षेम देतां माझें मीपण जाय।। 3।।

मागें पुढें चहूंकडे उघडें पाही । पाहावयासी गेलें मजला ठक पडले बाई।। 4।।

बाहेरी पाहूं जातां अंतरीं भासे । जे जें भासें तें तें येकींयेक समरसें ।।5।।

एका जनार्दनी जिवीचा जिव्हाळा। एकपणें पाहतां न दिसे दृष्टीवेगळा ।।6।।


भावार्थ

या अभंगात एका जनार्दनी कृष्ण रुपाचे वर्णन करतांना म्हणतात,कृष्ण मुखावर दिव्य तेज झळकत आहे ते अगणित रत्नांच्या तेजाप्रमाणे दैदिप्यमान आहे.त्याचा कानडा सुंदर रूपडा मन मोहून टाकतो आणि आलिंगन देण्यासाठी जीव उताविळ होतो.प्रेमभराने मिठी घालतांच माणसाचे मीपण संपून जाते.आंत बाहेर सगळीकडं ते च कृष्णरुप भरून राहिले आहे असे वाटते.बाहेर पाहू गेल्यास तो अंतरांत प्रगट झाल्याचा भास होतो,मन कोड्यांत पडते.मागे,पुढें चहूकडे ते रुप नजरेसमोर दिसते,मन तेथे समरस बनते.जीवाला वेड लावते.चित्त एकाग्र बनते.


84

गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी । भोवत्यां वेष्टित बैसल्या गौळणी ।

मध्यें सुकुमार सावळा शारंगपाणी । चिमणा पितांबर पिवळा ।

गळां वैजयंती माळा। घवघवित घनसांवळा पाहे नंदाराणी ।।1।।

नाच रे कृष्णा मज पाहूं दे नयनी ।।ध्रु0।।

नाचतो सांवळा सुंदर निमासुर वदन । वाळे घोळ घागरियांचा झणत्कार पूर्ण ।

आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुनी भुले मदन । हातीच्या मुद्रिका झळकती।

क्षुद्र किंकिणी सुस्वर गाती । वाकी नेपुरे ढाळ देती ।

पहाती गौळणी ।।2।।

सप्तही पाताळें नाचती हरिचिया छंदे । आकाश धरणी स्वर्गी देव नाचती आनंदे।

गण गंधर्व देव सर्व हरिपदें । वैकुंठ कैलास नाचती ।

चंद्र सूर्य रसनायक दीप्ती । ऋषीमंडळ धाक तोडिती ।

अद्भुत हरिकरणी ।।३।।

नाचती हरिपदें चतुर्दशलोकपाळ । शेष वासुकी नाचती सर्वही फणीपाळ ।

परिवारेसी नाचती पृथ्वीचे भूपाळ । मेरु पर्वत भोगी नायक ।

वनस्पति नाचती कौतुक । वेदशास्त्र पुराण पावक ।

नाचत शूळपाणी ।।४।।

नाचती गोपाळ गोपिका सुंदर मंदिरे । उखळे जाती मुसळे पाळी आणि देव्हारे ।

धातुमूर्ति नाचू लागल्या एकसरे । गौळणी अवघ्या विस्मित ।

देहभाव हरपला समस्त। यशोदेसी प्रेम लोटत ।

धरिला धांउनी ।।५।।

शिणलासी नाचता आता पुरे करी हरी । विश्वरूप पाहतां गोपी विस्मित अंतरी ।

यशोदेनें कृष्ण घेतला कडियेवरी । एका जनार्दनी भक्तिभाव अनन्य भक्ता दावी लाघव ।

निज भक्तांचे काज सर्व । करितां शिण न मानीं ।।६।।

भावार्थ

गोकुळामध्ये चक्रपाणी आपल्या अवतार लीला दाखवतो. सगळ्या गौळणी गोलाकार बसल्या असून मध्ये सुकुमार, सावळा शारंगपाणी शोभून दिसत आहे. मेघाप्रमाणे सावळ्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा पितांबर नसलेला, गळ्यात वैजयंती माळ घातलेल्या घनश्याम हरीकडे नंदराणी कौतुकाने पाहत आहे. कृष्णाचा नाच पहाण्यासाठी यशोदा आतुर झाली आहे. पायातील वाळे, घोळ यांच्या घंटानादाच्या तालावर सावळा, सुंदर हरी नाचत आहे. श्रीहरीचे विशाल नयन, हसरा चेहरा पाहून मदनालासुध्दा भूल पडते. श्रीहरीच्या हातातील अंगठ्या, पायातील पैंजणे यांच्याकडे गौळणींचे मन वेधले गेले आहे. आकाश, धरणी, सप्तपाताळे हरीच्या छंदी नाचत आहेत. स्वर्ग, वैकुंठ, कैलासामधील देव, गण, गंधर्व हरिपदांच्या तालावर नृत्य करतात. सारे ऋषीमंडळ, चंद्र-सूर्य श्रीहरीच्या या अद्भुत नृत्यात रंगून गेले आहे. शेष, वासुकी यांसह सर्व नागदेवता, चौदा भुवनांचे लोकपाळ, पृथ्वीवरचे सर्व भूपाळ (सम्राट) कैलासपती शिवशंकर परिवारासह या नृत्यानंदात मग्न आहेत. गोपाळ, गोपिका सुंदर मंदिरात नाचत आहेत. त्यांच्याबरोबर सर्व वनस्पती, वृक्षवेली कौतुकाने हर्षभरित होऊन डुलत आहेत. सजीव सृष्टीसह जडसृष्टीसुध्दा उखळे, जाती, मुसळे, पाळी, देव्हारा, धातुमूर्ती या आनंदात सहभागी झाली आहे. आश्चर्यचकित झालेल्या गौळणी देहभान विसरून गेल्या आहेत. अलोट प्रेमाने धावत जाऊन यशोदा श्रीहरीला कडेवर उचलून घेते. हे विश्वरूप दर्शन घेऊन गोपी धन्य होतात असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, एकनिष्ठ, अनन्य भक्तांसाठी श्रीकृष्ण असे लाघव दाखवतो, आपल्या भक्तांसाठी काम करतांना तो कधी थकत नाही.


८५

प्रथममत्स्यावतारी तुमचे अगाध चरित्र । न कळे ब्रह्मादिका वैष्णव गाती पवित्र ।।1।।

उठोनि प्रात:काळीं गौळणी घुसळण घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयीं परोपरीं ध्याती ।।2।।

द्वितीय अवतारीं आपण कच्छरूप झाला ।सृष्टि धरुनी पृष्ठीं शेवटीं सांभाळ केला ।।3।।

तृतीय अवतारीं आपण वराहरूप झाला । धरणी धरुनी दाढे हिरण्याक्ष वधिला ।।4 ।।

चतुर्थ अवतारीं आपण नरहरि रूप । रक्षुनि प्रल्हाद वधिला हिरण्यकश्यप ।।5।।

पांचवें अवतारीं आपण वामन झाला। बळी घालुनि पाताळीं शेखीं द्वारपाळ ठेला ।।6।।

सहावें अवतारीं आपण परशुराम झाला। धरुनी परशु हातीं सहस्रभुजा वध केला ।।7।।

सातवे अवतारीं आपण दाशरथी राम। वधोनी रावण कुंभकर्ण सुखी देव परम ।।8।।

आठवे अवतारी आपण वसुदेवाघरीं । वधोनि कंसादिक असूर मारिले भारी ।।9।।

नववे अवतारीं आपण बौध्दरूप झाला। धरूनियां मौन भक्ताघरीं राहिला ।।10।।

दहावे अवतारीं आपण झालासें वारूं । एका जनार्दनी वण्रिला त्याचा वडिवारूं ।।11।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनी श्री विष्णूच्या दशावताराचा अगाध महिमा वर्णन करतात.पहिल्या मत्स्यावतारांत श्रीहरीने अगाध लीलाचरित्र दाखवले जे ब्रह्मादिक देवांनासुध्दां कळले नाही.प्रात:काळीं उठून गौळणी लोण्याचे डेरे घुसळतांना कृष्णाचे पोवाडे गातात. दुसर्‍या अवतारांत कासवरुप धारण करून पाठीवर पृथ्वी धारण करून तिचा सांभाळ केला.तिसऱ्या अवतारांत वराहरुप घेऊन दाढेवर धरणी धरून हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.चवथ्या अवतारांत नरहरी रूप घेऊन हिरण्यकश्यपुचा वध करून भक्त प्रल्हादाचे रक्षण केले.पाचव्या अवतारांत वामन झाला आणि बळीला पाताळात धाडून शेवटी बळीचा द्वारपाळ झाला. सहाव्या अवतारांत परशु हतांत धरलेला परशुराम बनून सहस्रभुजाचा वध केला.सातव्या अवतार दाशरथी रामाचा असून रावण,कुंभकर्णाचा वध करून देवांची मुक्तता केली,देवांना परम सुखी केलें. आठव्या अवतार वसुदेवाचे घरीं जन्म घेऊन कंस,चारुण जरासंघ या राक्षसांचा संहार केला.नवव्या अवतरांत बौध्दरुप घेऊन,मौनरुप धारण करून भक्ताघरी राहिला.दहाव्या अवतारीं अश्वरुप धारण केले. या दश्अवतारांचा महिमा एका जनार्दनी वर्णन करतात.


गौळणींची विरहावस्था

86

आजि वो कां हो कृष्ण नाहीं आला।
म्हणोनि खेद करी गोळणी बाळा।
काय हो ऐसा देहीं लागला चाळा।
का रे ना येसी बाळा नंदाचिया ।।1।।
कवण देवा नवसीं नवसूं।
कवणा गुरुतें मार्ग पुसून।
कैं भेटेल हा हृषिकेशु म्हणोनि।
मन जाहलें उदासू।। 2।।
आतां काय करुं यासी उपाय ।
एका जनार्दनी धरुं जाय पाय।
तेंच दरुशन होय आजीं याचें।। 3।।


भावार्थ

नंदाचा बाळ श्रीहरीची वाट पाहाणाऱ्या गोपिका खेद करीत आहेत. त्यांचे मन उदास झाले आहे. कोणत्या देवाला नवस करावा, कोणत्या गुरुचे मार्गदर्शन घ्यावे, कोणत्या उपायाने कृष्ण भेटेल याचा विचार करीत आहेत. एका जनार्दनी म्हणतात, संपूर्ण शरणागती पत्करून श्रीहरी चरणांशी लीन होणे हाच परमेश्वरप्राप्तीचा एकमेव मार्ग आहे.

८७
कोण्या वियोगे गुंतला कवणे हाती ।
परा पश्यंती मध्यमा जया ध्याती ।
श्रुति शास्त्र जया भांडती ।
तो का हा रुसला श्रीपती ।।१।।
येई येई कान्हा देई आलिंगन ।
भेटी देऊन पुरवी मनोरथ पूर्ण ।
विरह विरहा करी समाधान ।
दावी तू आपुले चरण ।।२।।
येथे अपराध आमुचा नाही ।
खेळ सर्व तुझा पाही ।
एका जनार्दनी नवल काई ।
एकदा येऊनी भेटी देई ।।३।।

भावार्थ

परा-पश्यंती-मध्यमा या वाणी निरंतर ज्याचे ध्यान करतात, श्रुति आणि सहा शास्त्रे ज्याच्यासाठी वादविवाद करतात असा श्रीपती कोणी अडवला, तो का रुसला असा प्रश्न विचारून गोपी कान्हाने भेट देऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करावे अशी विनवणी करीत आहेत. यात आपला काही अपराध नसून हा सर्व श्रीहरीचा खेळ आहे हे सांगण्यास गोपी विसरत नाही. एका जनार्दनी म्हणतात, अनन्य भक्तांसाठी श्रीकृष्ण धावून येवून भेट देतात यात नवल नाही.


८८

नको नको रे दूर देशी । आम्हा ठेवी चरणापाशी ।
मग या विरहा कोण पुसी । ऐसी इच्छा देई आम्हांसी ।।१।।
पुरे पुरे संसार विरह छंद । तेणे तू अंतरसी गोविंद ।
द्वैताचा नसो देऊ बाध । ह्रदयी प्रगटोनी दावी बोध ।।२।।
विरह हरी सत्वर देवराया । परेपरता प्रगटोनी दावी पाया ।
दुजें मागणें आणिक नाहीं कान्हा । एका जनार्दनी शरण तुझिया पायां ।।3।।


भावार्थ

गोकुळीच्या गोपिका श्री कृष्णाला प्रार्थना करतात कीं, ह्या संसार छंदातून सुटका करावी कारण त्यामुळे गोविंद दुरावतो. श्रीहरीने अंतरांत प्रगट होऊन मनातिल द्वैत भावना दूर करावी.विरहव्यथा समूळ नाहिसी करून हरिचरणाशी ठाव द्यावा.एका जनार्दनी म्हणतात विरही गोपिकांप्रमाणे सर्व अनन्य भक्तांची हीच मागणी असते.

89

समचरणीं मन माझें वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें ।
हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिणी विरह बोले ।।1।।
सांवळिया कान्हया नको जाऊं दुरी । राहे परेपरता परतोनि हरी ।
पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ।।2।।
तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामीं असो अनुसंधान ।
शरण एका जनार्दन । काया वाचा मनें जाणोन ।।3।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनी गोपिकांच्या विरहिणी च्या माध्यमातून आपली मनोव्यथा प्रगट करीत आहेत. विठ्ठलाच्या समचरणाशी एकाग्र झालेल्या मनाच्या हर्ष आणि विषाद या भावना विलयास जाऊन मनाचे उन्मन झाले. त्यां समचरणांचा विरह होतांच चित्त अस्वस्थ होते.वैखरी,मध्यमा, परा, पश्यंति या चारी वाणी तटस्थ होतात.श्रीहरिचा कधीहि वियोग होऊं नये, हरिनामाचे अखंड अनुसंधान राहावें ,अशी प्रार्थना काया,वाचा,मनाने सद्गुरु चरणांशी शरणागत झालेले एका जनार्दनी करतात.

90

जन्म जन्मांतरीं विरहिणी। होती दुश्चित अंत:करणी ।
दु:ख सोशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थळ कारणीं ।।1।।
येऊनी भेटी देही देहातील । तयाचा विरह मजलागीं होत।
मना समूळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ।।2।।
दु:ख फिटलें सुख जालें थोर। हर्षे आनंदें आनंद तुषार।
एका जनार्दनी भेटला परात्पर । तेणें संसार विरह गेला निर्धार ।।3।।

भावार्थ

श्रीहरीचा अनेक जन्मांचा विरह विरहिणीने सहन केल्यानें तिचे चित्त दुश्चित झाले. मागील जन्मीं सोसलेल्या सर्व दु:खाचे या खेपेस निर्मूलन होईल.देहातीत परमात्मा येऊन भेट देईल, ज्याचा विरह सहन करावा लागला तो गोपीनाथ मनोमनीं भेटला. एका जनार्दनी सांगतात, विरही मनाचे सारे दु:ख मावळलें.अपार सुख झाले.आनंदाच्या तुषारांत मन न्हाऊन निघाले.परात्पर परमेशाची भेंट होऊन संसार विरह संपला.

91

काम क्रोध वैरी हे खेळ । लोभ अहंकार आशा बरळ ।
कर्म बळीवंत लागलें सबळ। तेणें वेधिलें आमुतें निखळ।।1।।
नको नको वियोग हरी । येईं येईं तूं झडकरी ।
आम्हा भेटें नको धरूं दुरी । वियोग झाला तो आवरीं ।।2।।
तुझिया भेटीचें आर्त मनीं। याकारणें विरह बोलणें वाणी ।
एका शरण जनार्दनी वियोग गेला पाहतां समचरणीं ।।3।।

भावार्थ

श्रीहरीचा वियोग झालेल्या गोपी कृष्णाला विनवितात कीं,त्याने लवकर येऊन हा वियोग संपवावा,काम,क्रोध हे वैरी असून लोभ,अहंकार आशा हे निरर्थक आहेत.कर्म अत्यंत बलवान असून त्याने वेढून टाकले आहे.परमात्म भेटीची तळमळ लागून राहिली आहे. एका जनार्दनी म्हणतात, विटेवरील विठ्ठलाच्या समचरणांचे दर्शंन होताच वियोगव्यथा संपून जाते.

92

विषय विरह गुंतलें संसारीं । तया जन्म जन्मांतरी फेरीं।
कोणी न सोडवी निर्धारीं। यालागीं न गुंता संसारीं ।।1।।
मज सोडवा तुम्ही संतजन। या विषयविरहापासोन ।।ध्रु0।।
क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर।
यांतुनी उतरीं पैलपार । संतसंग मिळलिया ।।2।। यासी शरण गेलिया वांचुनी । संतसंग न जोडे त्रिभुवनीं ।
शरण एकाभावें जनार्दनीं । विरह गेला समूळ निरसोनी।। 3।।

भावार्थ

संसारातिल विषय विरहांत गुंतून पडलेला जीवाची जन्म मरणाच्या फेऱ्यातून जन्म जन्मांतरी सुटका होत नाही.या साठी या संसार पासून निर्धाराने दूर राहिलें पाहिजे.हा भवसागर क्षणभंगूर असून तो पैलपार होण्यासाठी संतसज्जनांची संगती जोडावी असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरू कृपेशिवाय हा संतसंग त्रिभुवन शोधून मिळणार नाही.अन्यनपणे सद्गुरू जनार्दन स्वमींना शरण गेल्यानंतर श्रीहरीपदाचा विरह संपूर्ण निरसून गेला.

93

ऐशीं निर्धारें विरहिणी करीं । परेपरता देखेन श्रीहरी ।
मन पवन साधन न करीं । संतसंग घडलिया धन्य संसारीं ।।1।।
धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावलें सुखधामा ।।ध्रु0।।
नामविरहित विरह तो कोण । विषय विरह थुंकीन मी जाण ।
नामाविंचुनी नेणें साधन । तो विरह न व्हावा पूर्ण ।।2।।
एका जनार्दनी सत्य वचन । विरहाविरह गेला मुळींहून।
नाम जपतां स्थिर झालें मन। विरह गेला त्यागून ।।3।।

भावार्थ

मन पवनाचे कोणतीही साधना न करतां संत-संगतीनें परा वाणीच्या पलिकडे असलेल्या श्रीहरीचे दर्शन घेण्याचा निर्धार विरहिणी गोपी करते.श्रीहरिचे नामस्मरण हाच परमेश्वर प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे,नामांत रंगलेल्या मनाला विरह जाणवत नाही. एका जनार्दनीचे हे सत्यवचन आहे,नामसाधना करतांना विरहिणीचा विरह समूळ नाश पावला.मन स्थिर झाले.

94

रात्रंदिवस मन रंजलें । हरिचरणी चित्त जडलें ।
विरहाचे दु:ख फिटलें । धन्य झालें संसारी ।।1।।
विरह गेला सुख झालें वो माय । पंढतोपुढती आनंद न समाये ।।ध्रु0।।
संतसंग घडला धन्य आजी । मोह ममता तुटली माझी ।
भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झालें सहजीं ।।2।।
धन्य धन्य संतसंगती । अवघी झाली विश्रांती ।
एका जनार्दनी चित्तीं । विरहभ्रांती निरसली।।3।।

भावार्थ

रात्रंदिवस मनाला श्रीहरीचा छंद जडला, हरिचरणांशी चित्त गुंतून गेलें.विरहाचे दु:ख सरून सुख झाले.संसार आनंदाने फुलला, संत-संगतीने मोह ममता विलयास गेली, चित्तावरील भ्रांतीचे पटल सहजपणे गळून पडले. विरहिणी गोपीचा संसार धन्य झाला.असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, संतांच्या संगतीने विरहभ्रांती निरसून चित्ताला पूर्ण विश्रांती मिळाली.असे संत धन्य होत.

95

युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवी ध्यानीं मनीं चक्रपाणी ।
म्हणोनि वियोगाची जाचणी । तो भेटला संतसंग साजणी ।। 1।।
विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मीची तुटे येरझारा वो ।।ध्रु0।।
घडतां संतसंग विश्रांती । तुटली माया पडळभ्रांति।
भव संसार याची झाली शांती । संतमहिमा वर्णावा किती।। 2।।
महिमा वर्णितां विरहा फिटलें । एका जनार्दनी तया भेटलें ।
सुख अनुभवें अंतरीं दाटलें । विरहाचे बीज भाजिलें वो ।।3।।

भावार्थ

अनेक युगामध्ये विरहिणीने वियोगाची जाचणी सहन केली कारण ध्यानी मनी गोपीला चक्रपाणी श्रीधराचा विसर पडला. संतकृपेने साजणीचा विरह संपून अपार सुख झाले.जन्ममृत्युचे चक्र थांबलें. मायेचा पडदा दूर होऊन भवसंसाराची शांती झाली. एका जनार्दनी म्हणतात संतांचा महिमा वर्णन करताना शब्द अपुरे पडतात.अंतरांत सुखाचा अनुभव दाटून येतो. विरहाचे बीज भाजून निघाल्याने त्याला कधीच अंकूर फुटून ते फोफावत नाही.

वनक्रीडा

96

उठोनि एके दिनीं म्हणे यशोदा कान्हया ।
गोधनें घेऊनियां जाई वनासी लवलाह्या ।।1।।
सवें मिळाले चिमणे सवंगडी ।
शिदोरी काठी कांबळी जाळी घेती आवडी।। 2।।
एका जनार्दनी गाई सोडिल्या सार्या।
रामकृष्ण सवंगडीया देव येती पहावया ।।3।।

भावार्थ

एके दिवशी यशोदा कन्हयाला गाई घेऊन वनाला जाण्यास सांगते.सर्व बाळगोपाळ आनंदानें काठी,कांबळी,जाळी आणि शिदोरी घेऊन कृष्णा बरोबर निघतात.एका जनार्दनी म्हणतात,रामकृष्ण सवंगड्यां सोबत गाईंना घेऊन निघाले तेव्हां कौतुकाने त्यांना बघण्यासाठी देवांनी आकाशांत दाटी केली.

97

सैराट गोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ।।1।।
सावळे चतुर्भुज मेघ:श्याम वर्ण ।गाईगोपाळां समवेत खेळे मनमोहन ।।2।।
यमुनेचे पाबळीं मिळोनियां सकळीं । खेळें चेंडूफळी गडियांसम ।।3।।
एका जनार्दनी मदनपुतळा । देखियेला डोळां नंदरायाचा ।।4।।

भावार्थ

गोकुळीची गोधनें वनाकडे सैराट चालली असतांना वैकुंठीचा राणा श्रीकृष्ण त्यांच्यामागे निघाला.मेघाप्रमाणे सांवळ्या रंगाचा चार भुजा असलेला मनमोहन श्रीहरी गोपांसमवेत यमुनेच्या काठीं चेंडूफळीचा खेळ खेळतो. एका जनार्दनी म्हणतात, नंदराजाचा श्रीहरी मदना सारखा शोभून दिसत असलेला या डोळ्यांनी पाहिला.

98

विष्णुमूर्ती चतुर्भुज शंख चक्र हातीं । गदा पद्म वनमाळा शोभती ।।1।।
गाई गोपाळ सवंगडे वनां । घेऊनियां जाय खेळे नंदाचा कान्हा ।।2।।
विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी । खेळ मांडियेला यमुनेचे तीरीं ।।3।।
एका जनार्दनी पाहतां तन्मय । वेधलें मन वृत्तिसहित माय।। 4।।

भावार्थ

गाई आणि गोपाळ सवंगड्यांना सोबत घेऊन नंदाचा कान्हा वनांत जातो.यमुनेच्या तीरावर विटी दांडू चेंडू लगोरी असे नाना प्रकारचे खेळ खेळतो. एका जनार्दनी म्हणतात, चित्त वृत्तीसह या रूपाकडे वेधले जाते, मन तन्मय होते.शंख,चक्र, गदा पद्म हातांत धारण केलेली चतुर्भुज विष्णुमूर्ती नयनांसमोर साकार होते.या मुर्तिच्या गळ्यांत वनमाळा शोभून दिसतात.

९९

जयाच्या दरुशने शिवादिका तृप्ती । योगी हृदयी सदा जया ध्याती ।
सहा चार अठरा जया वर्णिती । सहस्रमुखा न कळे जयाची गती ।।१।।
तो हा नंदनंदनु यशोदेचा तान्हा । सवंगडे गोपाळ म्हणती कान्हा ।
परा पश्यंती मध्यमा वैखरी नातुडे जाणा। वेडावले जया ठायी रिघाले साधना ।।२।।
अष्टांग साधन साधिता अटी । नोहे नोहे मुनिजना ज्याची भेटी ।
एका जनार्दनी हाती घेऊनि काठी । गोधने चारी आवडी जगजेठी ।।३।।

भावार्थ

नंदाचा नंदन, यशोदेचा तान्हा ज्याला त्याचे सवंगडी गोपाळ प्रेमाने कान्हा असे म्हणतात, त्याच्या दर्शनाने शिवशंकरासह स्वर्गीच्या देवांची तृप्ती होत नाही. सहा शास्त्रे, चारी वेद, अठरा पुराणे ज्याच्या रूप-गुणांचे वर्णन करतात, योगीजन सदासर्वकाळ हृदयात ज्याचे ध्यान लावतात, असे असताना हजार मुखे असलेला शेषनाग श्रीहरीचा महिमा वर्णन करु शकत नाही. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी त्याला पूर्णपणे जाणू शकत नाहीत, त्या श्रीकृष्णाच्या दिव्यरुपाचे ठायी वेडावलेलें मुनिजन अष्टांग साधन करतात पण त्यांना श्रीहरीची भेट घडत नाही. असे वर्णन करून एका जनार्दनी म्हणतात, हातात काठी घेऊन तो जगजेठी आवडीने गोपाळांसह नंदाघरच्या गाई चारतो.

१००

उठोनि प्रात:काळी म्हणे यशोदा मुरारी ।
गोपाळ वाट पाहती उभे तुझ्या द्वारी ।
शिदोरी घेऊन वेगी जाय रानी ।।१।।
यमुनेचे तीरी खेळ खेळतो कान्हा ।
नानापरी क्रीडा करी यादवांचा राणा ।।ध्रु0।।
मागे पुढे गोपाळ मध्ये चाले हरी ।
सांवळा सुकुमार वाजवी मुरली अधरी ।
पुच्छे वर करुनी गाई नाचती नाना ।।२।।
मुरलीचा नाद न समाय त्रिभुवनी ।
किती एक नादे भुलल्या गौळणी ।
देह गेह सांडोनि चालताती वनी ।।३।।
खग मृग गायी व्याघ्र नसे दुजा भाव ।
सकळी उच्चारण एक कृष्ण नाव ।
काया वाचा मने शरण एका जनार्दनी ।।४।।

भावार्थ

पहाट समयी उठून यशोदा माता कृष्णाला सांगते,गोपाळ दाराशी वाट पहात उभे आहेत,शिदोरी घेऊन रानांत जाण्याची वेळ झाली आहे.मागे, पुढे गोपाळ आणि मध्यें हरी असे सर्वजण वनांत जाण्यसाठी निघतात. यमुनेच्या तीरावर गोपाळांसह यादवांचा राणा नाना प्रकारच्या क्रिडा करतो.सावळ्या सुकुमार मुरारीच्या मुरलीचा नाद ऐकून आनंदित झालेल्या गाई नाचु लागतात,त्या नादाने वेड्या झालेल्या गौळणी देहभान विसरून घर सोडून वनाकडे निघतात.पक्षी, हरिणी, गाई, वाघ आपला वैरभाव विसरुन हरीनादांत दंग होतात असे वर्णन करुन एका जनार्दनी काया वाचा मनाने श्रीहरीच्या पायी शरणागत होतात.

मुरली

101

नंदनंदन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला।। 1।।
प्रपंच धंदा नाठवे कांहीं। मुरलीचा नाद भरला हृदयीं ।।2।।
पती सुताचा विसर पडिला । याच्या मुरलीचा छंद लागला ।।3।।
स्थावर जंगम विसरूनि गेले । भेदभाव हारपले ।।4।।
समाधि उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐकतां मना विश्रांती ।।5।।
एका जनार्दनी मुरलीचा नाद ऐकतां होती त्या सद्गद ।।6।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनी श्रीहरीच्या मुरली-नादाचा गोकुळच्या गोपींना कसा वेध लागतो याचे वर्णन करतात.मुरलीचा नाद गोपींचे ह्रदय भरून टाकतो.मुरलीचा त्यांना छंद लागतो,प्रपंच, कामधंदा,पती,मुल या सगळ्याचा विसर पडतो. सभोवतालची चराचर सृष्टी,मनातले सारे भेदभाव विलयास जाऊन मन मुरली नादासी एकरूप होते.ध्यानधारणेतील समाधी, उन्मनी या अवस्था कवडीमोलाच्या वाटू लागतात.मुरलीनदाने गोपी सद्गतींत होतात.मनाला प्रगाढ विश्रांतीचा लाभ होतो.

102

तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडला कानीं।
विव्हळ जालें अंत:करणी । मी घरधंदा विसरलें ।।1।।
अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ।।ध्रु0।।
मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरीला माझा प्राण ।
संसार केला दाणादीन । येऊनि ह्रदयी संचरली ।।2।।
तुझ्या मुरलीचा सूर तान। मी विसरले देहभान ।
घर सोडून धरिलें रान ।मी वृंदावना गेले ।।3।।
एका जनार्दनी गोविंदा | पतितपावन परमानंदा ।
तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ।।4।।

भावार्थ

मुरलीचा आवाज ऐकून वेडी झालेली गवळण आपली व्यथा व्यक्त करीत आहे.ही मुरली नसून केवळ बाण आहे, त्याने आपले प्राण हरण केले आहेत,आपल्या हृदयांत संचारली आहे.मुरलीच्या सूरांनी ती देहभान विसरून गेली आणि घरसंसार सोडून वनाचा रस्ता धरून ती वृंदावनात गेली.संसाराची दाणादाण झाली. गवळणीची ही अवस्था वर्णन करून एका जनार्दनी म्हणतात,गोविंद पतितपावन असून परम आनंद देणारा आहे. गोविंदाच्या नामाचा छंद लागला कीं,भक्तांच्या सर्व वृत्ती त्याच्या पायीं लीन होतात.

१०३

मुरली धरूनी अधरीं । वाजवी छंदे. नानापरी ।
भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें ।।१।।
तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये ।
कांही केलीया तो न राहणे। नाठवे गेह गे माय ।।२ ।।
स्थुल सूक्ष्म कारणांपरतां । चहु वाचा वेगळा तत्वतां ।
आगमां निगमांही वरतां। ज्याचा वेध शिवाचिया चित्ता गे माय।।३।।
अचोज वेदा चोजवेना । श्रुतीशास्त्रा नये अनुमाना ।
शरण एका जनार्दना । एकपणें जाणा सर्वा ठायीं । ।४।।

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, यमुनेच्या तीरावर मधुर सुरांत मुरली वाजविणारा नंदाचा कान्हा स्थूल. सूक्ष्म, कारण या देहाच्या पलिकडील महाकारण देह साक्षात् परब्रम्ह असून तो वैखरी, मध्यमा, परा वाणीहून वेगळा आहे. या परब्रम्ह स्वरुपाचे.अनुमान चारी वेद आणि सहा शास्त्रे यांनाही आकलन होत नाही, शिवशंकरांच्या चित्ताला.ज्याचा वेध सतत लागलेला असतो तो हा परमात्मा. सर्व जीवांचे ठिकाणी एकपणे विलसत आहे.केवळ सदगुरू कृपेनेच हा परमात्मा जाणता येतो.

१०४

कशी जाऊं मी वृंदावना । मुरली वाजवी कान्हा ।।ध्रु०।।
पैलतीरीं हरी वाजवी मुरली । नदी भरली यमुना ।।१।।
कांसे पितांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ।।२।।
काय करूं बाई कोणाला सांगू । नामाची सांगड आणा।।३।।
नंदाच्या हरीने कौतुक केलें । जाणे अंतरीच्या खूणा।।४।।
एका जनार्दनी मनीं म्हणा । देव. माहात्म्य कळेना कोणा ।।५।।

भावार्थ

दुथडी भरून वाहाणार्या यमुनेच्या पैलतीरावर नंदाचा कान्हा मुरली वाजवतो आहे, कान्हाच्या कानांत कुंडल,कपाळीं कस्तुरी टिळा, कमरेला पितांबर शोभून दिसतो.कान्हाच्या मुरलीने घायाळ झालेली गोपी वृंदावनात जाण्यासाठी आतुर झाली असून भरलेल्या यमुनेतून पैलथडी कसे जावे, काय करावे असा प्रश्न पडला आहे.पाण्याने भरलेली यमुना नदी संसाराचे प्रतिक असून हरीनाम हे नावे सारखे संसार बंधनातून मुक्त करणारे साधन आहे (सांगड) आहे.असे सुचवून एका जनार्दनी म्हणतात, परमात्मा भक्तांच्या अंतरीचे भाव जाणून अवतार लीला करतो पण देवाचे महात्म्य भोळ्या भक्तांच्या लक्षात येत नाही.

१०५

यमुनेच्या तीरीं नवल परी वो । तेथें गोपाळ वत्सें स्वयें झाला हरी वो ।।१।।
नवल देखा ठक तिन्ही लोकां ।
भुली. ब्रह्मादिकां पार नाहीं सुखा ।।२ ।।
कृष्णवत्साची ध्वनी गाई. पान्हा. ।
तेथें वोळलें निराळे. विस्मयो गौळीजनां. ।।३।।
गोपाळांचे. वचनीं. सुखें सुखा. भेटी ।
तेथें. वोसंडला. आनंद माय कृष्णी भेटी. ।।४ ।।
ऐसा रचिला. आनंदु. देखोनि निवाडा ।
तेथें. सृष्टीकर्ता तोहि झाला वेडा ।।५ ।।
ऐसें अचोज. पैं. मना. नये अनुमाना ।
अचुंबीत. करणें एका जनार्दना ।।६ ।।

भावार्थ

नवलाची गोष्ट अशी कीं, यमुनेच्या तीरावर श्रीहरी स्वये गाईचे वासरू झाला आहे. स्वर्ग,पृथ्वी,पाताळ यां तिन्ही लोकांत तसेच सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला देखील भूल पडली आहे.अपरंम्पार सुख दाटून आले आहे. कृष्णाच्या मुरलीचा स्वर ऐकून.गाईंना पान्हा फुटतो ,गौवळ्यांना हे पाहून विस्मय वाटतो.गोमाय आणि कान्हाची भेटीने गोकुळांत.आनंद ओसंडून वाहत आहे. सृष्ट कर्ता आश्चर्य चकित झाला असे कथन करून एका जनार्दनी म्हणतात, अचंबित झालेले देवाधिदेव सुध्दां याचे.अनुमान करु शकत नाही.

रासक्रीडा

१०६

वनामाजीं नेती. गोपिका तयांसी ।
रासक्रिडा खेळावयासी एकांती ।।१।।
जैसा जया चित्ती हेत आहे मनीं ।
तैसा चक्रपाणी खेळतसे ।।२।।
जया जैसा भाव तैसा पुरविणें ।
म्हणोनि नारायणें अवतार ।।३।।
एका जनार्दनी घेऊनी
अवतार भक्तांचें अंतर जैसें तैसें ।।४ ।।

भावार्थ

एकांतात रासक्रीडा खेळण्यासाठी गोपिका वनामध्ये जातात, ज्याच्या चित्तांत जसा भाव असेल तसा चक्रपाणी त्याच्याशी खेळतो. प्रत्येक व्यक्तिच्या मनातिल भाव पुरविण्यासाठीं नारायण अवतार धारण करतात असे एका जनार्दनी म्हणतात.

१०८

कृष्णरुपी भाळल्या गोपिका नारी । नित्यनवा कृष्ण जीवा आवडतो भारी ।
पवन वेगीं चालिल्या कालिंदीतीरीं । चिदानंद. भावें भोगावा श्रीहरी ।।१।।
वाजती गाजती अनुहत टिपरी । बारा सोळा मिळोनी गौळ्याच्या नारी ।
प्रात:काळीं जाती यमुनातीरीं | कृष्ण प्राप्तिलागीं पूजिती गौरी ।।२।।
एकमेकीतें खुणविती दृष्टी । हरिरुपीं आवड जीवा लागली मोठी ।
समयी एकांत होईल काय भेटी । मनींचे आर्त सांगू गुज गोष्टी ।।३।।
कृष्णरुपीं वेधल्या विसरल्या अन्नपान । माया विलास नेघे अंजन चंदन ।
रात्र आणि दिवस कृष्णाचे ध्यान । एका जनार्दनी चरणीं वेधिलें मन ।।४।।

भावार्थ

कृष्णाच्या रुपावर गोपिका नारी भाळल्या ,नेहमी नविन रुप धारण करणारा कृष्ण त्यांना विशेष आवडू लागला. सद्चीद् आनंदाचा नित्य अनुभव घेऊ लागल्या. बारा किंवा सोळा नारी मिळून सकाळीं. यमुनेच्या तीरावर जाऊन कृष्णासाठी गौरीपुजू लागल्या. श्रीहरीची एकांतात भेट घेऊन त्याच्याशी गुजगोष्टी कराव्या,मनीचे दु:ख सांगावे अशी आस लागली. कृष्णाचे वेध लागले, अन्नपाणी सुचेनासे झाले. माया,विलास विसरून हरीचरणाशी एकरुप झाल्या. असे वर्णन एका जनार्दनी. या अभंगात करतात.

१०९

खांद्यावरी. कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी । ।१।।
राधे राधे राधे. राधे. मुकुंद. मुरारी. । वाजवितो. धेणू. कान्हा श्रीहरी ।।२।।
एकएक गौळणी एक एक गोपाळा । हातीं धरूनि नाचती रासमंडळा ।।३।।
एका जनार्दनी रासमंडळ रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघें. ब्रह्म कोंदलें ।।४।।

भावार्थ

हातामध्ये काठी आणि खांद्यावरी घोंगडी घेऊन सांवळा श्रीहरी गोकुळांत गाई चारीत आहे आणि बासरी वाजवत आहे.गोकुळीच्या गौळणी आणि गोपाळ एकमेकांचे हात धरून नाचत आहेत. रासमंडळाचे. असे वर्णन करून एका जनार्दनी. म्हणतात, जिकडे पहावे तिकडे ब्रह्मानंद कोंदून राहिला आहे.

११०

रासक्रीडा खेळ खेळोनियां श्रीहरी । येती परोपरी गोकुळासी ।।१।।
न कळेची कवणा कैसें में विंदान । वेदांदिका मौन पडिलेंसें ।।२।।
तें काय कळें आणिकां जीवांसी । ऋषी मुनी तापसी धुंडिताती ।।३।।
एका जनार्दनीं ऐसा खेळे खेळां परब्रह्म पुतळा नंदाघरीं ।।४।।

भावार्थ

गोकुळांत श्रीहरी नाना प्रकारे रासक्रीडा खेळत आहे.या विस्मयकारी अवतार लीला बघून वेदांना देखिल मौन पडलें आहे, ते सामान्य जीवांनाच काय ऋषी,मुनी,तापसी यांना सुध्दां हे कोडे सोडवतां येत नाही. एका जनार्दनी म्हणतात,परब्रह्म नंदाघरी असे खेळ खेळत आहेत.

१११

रासक्रीडा करूनी आलिया कामिनी ।
कृष्णीं लांचावल्या आन न रिघे मनीं ।।१।।
जें जें. दृष्टी दिसे तें तें कृष्ण भासे ।
गोपिका समरसे नित्य बोधु ।।२।।
आसनीं नयनीं भोजनीं गमनागमनीं |
सर्व कर्मीं सदा. कृष्णमय कामिनीं ।।३।।
एका जनार्दनी. व्यभिचार. परवडी ।
गोपिका. तारिल्या. सप्रेम आवडीं ।।४।।

भावार्थ

गोकुळातील स्त्रिया रासक्रीडा खेळून परतल्या. कृष्ण भावनेने भारावून गेलेल्या त्यांच्या मनाला दुसरा विचार सुचत नव्हता. नजरेस पडणारी. प्रत्येक गोष्ट त्यांना कृष्णमय भासत होती. बसतां,उठतां, येतां जातां, खातां,पितां, झोपेत असताना सुध्दां त्या गोपी कृष्णरुपाशी समरस झाल्या .

काला

११२

ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ. रामकृष्ण खेळती खेळ नाना ।।१।।
यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं । मांळियला काला गोपाळांची. दाटी ।।२।।
आणिती. शिदोय्रा आपआपल्या । जया जैसा हेत तैशा. त्या चांगल्या. ।।३।।
शिळ्या विटक्या. भाकरी दही. भात. लोणी । मिळवोनी मेळा करी चक्रपाणी ।।४।।
एका जनार्दनीं अवघ्या करीतो कवळ । ठकविलें तेणे ब्रह्मादिक सकळ । ।५।।

भावार्थ

गोपाळ नित्यनेमाने वनांत जाऊन बलराम, कृष्णा बरोबर नाना प्रकारे खेळ खेळतात.यमुनातीरावर कदंब वृक्षाखाली श्रीहरीने काला मांडला. प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे शिदोय्रा आणून गोपाळांनी एकच दाटी केली दही भात लोणी आणि शिळ्या भाकरी एकत्र करून काला केला.या काल्याचे कवळ श्रीहरी प्रत्येकाच्या मुखी भरवतो, हे लाघव पाहून ब्रह्मादिक देव अचंबित होतात,असे एका जनार्दनी म्हणतात.

११३

बैसोनि कळंबातळीं । गडी मिळाले सकळीं ।
मिळोनि गोपिळीं करती काला ।।१।।
नानापरीचीं पक्वान्नें ‌। वाढिताती उत्तम गुणें ।
सर्वा परिपूर्ण । मध्यें शोभे सांवळा ।।२।।
वडजा वांकुडा पेंदा । आणि. सवंगडी बहुधा ।
काल्याच्या. त्या मुदा । घेती आपुलें करीं ।।३।।
लोणचें तें नानापरी । वाढिताती कुसरीं ।
सर्व वाढिले निर्धारी । परिपूर्ण अवघीयां ।।४।।
एका जनार्दनी म्हणे । कृष्णा कवळ. तूं घेणें ।
गडियांसी देव म्हणे । तुम्हीं. घ्यावा आधीं ।।५।।

भावार्थ

कळंबातळीं बसून सकळ गोपाळांनी मिळून काला केला.नानापरींची उत्तम पक्वान्नें सर्वांना योग्यप्रकारे वाढली.मध्यभागीं सावळा. हरी शोभून दिसतो. बोबडे बोलणारा पेंदा आणि सवंगड्यांनी काल्याच्या मुदी आपल्या हातात घेतल्या आणि सर्वांना समान मिळतील अशा कौशल्याने वाढण्यांत आले. असे वर्णन करून. एका जनार्दनी म्हणतात, कृष्णाने पहिला कवळ मुखी घ्यावा अशी गोपाळांची ईच्छा पण कृष्णदेव सवंगड्यांनी प्रथम भोजनास सुरवात करावी असे सुचवतात.

११४

गडी म्हणती सकळ । कृष्णा तूं घेई कवळ ।
हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्ही ।।१।।
गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेघें आतां ।
म्हणोनी रूसोनी तत्वतां ।चालिला कृष्ण ।। २।।
कृष्णा नको जाऊं जाण । तुझैं एकूं वचन ।
म्हणोनि संबोधून । आणिला कृष्ण ।।३।।
एका जनार्दनीं । लाघव दावी चक्रपाणी।
भक्ता वाढवुनी । ‌महिमा वदवी ।।४।।

भावार्थ

सगळे सवंगडी कृष्णाने कवळ घ्यावा म्हणुन आग्रह करतात. कृष्ण ते मान्य करत नाही, सवंगडी आपला. हट्ट. सोडत नाहीत. कृष्ण नाराज होऊन वृदांवन सोडून चालू लागतो, सवंगडी कृष्णाची आज्ञा. पाळण्याचे. वचन देऊन श्रीहरीला माघारी आणतात. एका जनार्दनीं म्हणतात, चक्रपाणी आपले लाघव दाखवून भक्तांची मने जिंकून भक्तिमहिमा वाढवतात.

११५

काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती सवंगडी |
बैसवुनी हरी । कवळ. घेती ।।१ ।।
कृष्ण आपुलेनी हातें । कवळ घाली गडीयातें ।
त्यांची उच्छिष्ट शितें । घालितसे मुखीं ।।२।।
मुखामाजी कवळ । सवंगडे घालिती सकळ ।
वैकुंठीचा. पाळ ब्रह्मानंदें डुल्लत ।।३।।
तृप्त झाला जनार्दन । एका वंदितसे चरण ।
काया वाचा मन । खूण भक्त जाणती ।।४।।

भावार्थ

काळ्या. कांबळ्यवर सवंगडी हरीला बसवून मुखीं कवळ घालतात. कृष्ण आपल्या हाताने सवंगड्यांना घास भरवून त्यांची उष्टी शिते आनंदाने मुखीं घालतो ,ब्रह्मानंदांत मग्न होतो . एका जनार्दनीं म्हणतात, काया. वाचा मनाने भक्त देवाशी एकरूप होतात हीच एकाग्र भक्तिची खूण आहे.

११६

मिळोनि गोपाळ सकाळीं । यमुनेतटीं खेळे चेंडूफळी ।
गाई बैसविल्या. कदंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ।।१।।
काला मांडिला वो काला मांडिला । नवलक्ष. मिळोनी
काला मांडिला वो ।।ध्रु ०।।
नानापरींचें. शोभतीं दहीभात। पंक्ती बैसविल्या पेंदा बोबडा वाढीत ।
जो. जया संकल्प तें तया मिळत । अनधिकारिया तेथें कोणी न पुसत ।।२।।
पूर्वसंचित खाली पत्रावळी । वाढती भक्तिभावाची पुरणपोळी ।
नामस्मरणाची क्षुधा. पोटीं आगळीं । तेणें तृप्ती होय. सहजी सकाळीं ।।३।।
ऐसे. तृप्त जाहले परमानंदें । कवळ कवळाचे निजछंदें ।
एका जनार्दनी. अभेदें. । शुध्द समाधिबोधें मुख संवादें ।।४।।

भावार्थ

गाईंना कदंबातळी बसवून सर्व गोपाळ मिळून यमुनातटीं चेंडूफळीचा खेळ खेळू लागली. खेळतां. खेळतां दुपार झाली.नवलक्ष गोपाळांनी मिळून काला मांडिला. पंगती बसल्या. बोबडा पेंदा पंगतीला नानापरींचे भात,भक्तिभावाची पुरणपोळी वाढूं लागला.जयाला जे आवडते तें त्याला मिळू लागलें. नामस्मरणाची भूक लागली असल्यानें सहजपणे सर्वांची तृप्ती झाली,परमानंदाचा प्रसाद मिळाला. एका जनार्दनीं म्हणतात, कोणताही भेदभाव नसलेल्या शुध्द मनाला समाधी सुखाचा बोध झाला.

११७

नित्य तो सोहळा करिताती काला । तो पहावयाला देव येती ।।१।।
अंतरीं सुरवर विचार करिती । काला श्रीपती करीत स्वयें ।।२।।
उच्छिष्ट प्रसाद सेवूं धणीवरी । मत्स्यरूप निर्धारी घेती. सर्व ।।३।।
एका जनार्दनी जाणितसे खूण । म्हणोनी विंदान आरंभीं ।।४।।

भावार्थ

वृंदावनांत नित्य चालू असलेला कालासोहळा पाहण्यासाठीं देव आतुर झाले. श्रीपती स्वता: काला करीत आहे तर देव उच्छिष्ट प्रसाद सेवन करण्यासाठी मत्स्यरुप धारण करतात. एका जनार्दनी परब्रह्म स्वरुपाची खूण जाणून विस्मयकारी अवतार लीला समजून घेतात.

११८

गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजीं. आला भेंवों यमुनेंत ।।१।।
जीवनालागीं तेथें कोण्ही पै न जावें । डाऊन आला आहे तया ठायीं ।।२।।
तयाचे बोलणें लागे सर्वा गोड । म्हणोनि धरिती. चाड सवंगडे ।।३।।
एका जनार्दनी. ऐकोनि वचन । पुढती. वचन पेंदा बोले ।।४।।

भावार्थ

वैकुंठीचा राणा श्रीकृष्ण सवंगड्यांना सांगतो कीं, यमुनेवर पाण्यासाठी. कुणी जाऊं नये कारण तेथें बागुलबुवा आला आहे. कृष्णाचे मधुर बोल. सर्वांना आवडतात,सगळे त्याला संमती दर्शवतात असे सांगून. एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरिचे वचन ऐकून पुढे पेंदा बोलतो.

११९

आजी कांहो कृष्णा वर्जिली यमुना। बाऊ तो जाणा कोठोनि आला ।।१।।
कैसा आहे बाऊ पाहिन तयातें । म्हणोनि त्वरित उठिलासे. ।।२।।
वारितां वारितां पेंदा. पैं गेला । पहातसे. उगला यमुनेंत ।।३।।
बाऊ तो न दिसे कोठें वाजत । पैंदा तया. म्हणत क्रोधयुक्त ।।४।।
म्हणतसे पेंदा यमुनेसी जाण। स्त्री. तूं. होऊन. हुंबरी. घेसी ।।५।।
मी कृष्णदास घेसी तूं हुंबरी. । तुज निर्धारी बळ बहु ।। ६।।
मी. काय निर्बळ घेसी तूं हुंबरी । आतांचि निर्धारी पाहे माझें ।।७।।
म्हणोनियां पेंदा तेथेंचि बैसला । हुंबरी तो तयाला. घालीतसे ।।८।।
पेंदा कां नये काय. जाहलें त्याला । कृष्णे पाठविला दुजा एक ।।९।।
तोही मीनला तयांसी तत्काळ । गडी तों सकळे आलें तेथें ।।१०।।
उरलेले दोघे कृष्ण आणि राम । गुंतले सकाम गडी तेथें ।।११ ।।
काय जाहलें म्हणोनि आले उभयतां।पाहुनी तत्वतां हासताती।।१२।।
सावध करितां न होती सावध । लागलासे छंद घुमरीचा ।।१३।।
एका जनार्दनीं कौतुकें कान्हया । आली असे दया भक्ताची ते ।।१४ ।।

भावार्थ

श्रीकृष्णाने यमुनेवर जाऊ नका असे कां सांगितले आणि तो बाऊ कोठून आला असे विचारून पेंदा तो बाऊ कसा आहे ते पाहतो असे बोलून त्वरित उठला आणि यमुना जळांत शिरला. यमुनेचे पाणी खळखळ आवाज करून वाहत होते पण बाऊ मात्र कोठे दिसेना तेंव्हां पेंदा रागाने आपण कृष्णाचे दास असून बलशाली आहे स्त्री असून कृष्णदासासी हुंबरी. घेणे योग्य नाही असे यमुनेला बोलून मनाचा निर्धार करून पेंदा तेथें बसला. पेंदाला शोधण्यासाठी क्रृष्णाने एका सवंगड्याला. पाठवले एकामागून एक असे सगळे यमुनेकांठी. गोळा झाले . रामकृष्ण दोघेही काय झाले हे समजून घेण्यसाठी यमुनेवर आले आणि घुमरीच्या छंदाने देहभान विसरून गेलेल्या गोपाळांना सावध केले. एका जनार्दनी म्हणतात, भोळ्या भक्तांची दया येऊन कान्हा त्यांच्या प्रेमानें.धावून येतो.

१२०

पाहूनियां हरी गोपिळाचें चोज । म्हणे तेणें तो निर्वाणीचें निज मांडियेलें ।।१।।
मेठा खुंटी येउनी हुंबरी घालिती। खर तोंडाप्रती येती जाहली ।।२।।
कळवळला देव जाहलासे घाबरा । मुरली अधरा. लावियेली ।।३।।
मुरलीस्वरें चराचरी. नाद तो भरला । तेणें स्थिर झाला पवनवेगीं ।।४।।
यमुनाही शांत झाली तेच क्षणीं । म्हणे चक्रपाणी सावध. व्हा. रे ।।५।।
पेंदीयाचे तो शब्द ऐकिला कानीं । एका. जनार्दनीं स्थिर. झाला. ।।६।।

भावार्थ

गोपाळांचे निर्वाणीचे प्रयत्न पाहून देव कळवळला, काळजीने घाबरला. गोपाळांना सावध करण्यासाठी कृष्णानें मुरलीचे सूर छेडलें, चराचर या नादानें भरून गेले. वायूचा वेग मंदावून स्थिर झाला. यमुनेचा खल्लाळ थांबला, ती शांत झाली. हा प्रसंग वर्णन करुन एका जनार्दनी म्हणतात, सावध व्हा रे हे श्रीहरीचे शब्द ऐकून पेंदा निश्चिंत झाला.

१२१

ऐकतां तो नाद मोहिलेंसे मन ।
न कळे विंदान तिहीं लोकां ।।१।।
सावध. होउनी. गडी ते पहाती ।।२।।
स्थिर पैं होती यमुना ते ।।३।।
एका जनार्दनीं. ऐसा दासाचा. कळवळा ।
म्हणोनी भक्त लळा पाळितसे ।।४।।
यैवोनि गोपाळ कृष्णासी. बोलती ।
यमुनेचा बाऊ पळाला वो श्रीपती ।।५।।
धन्य बळिया आम्हीं की वो त्रिभुवनी।
धन्य धन्य कृष्णा म्हणोनि नाचती|
अवनी आनंदे गोपाळ तयाशीं खेळे ।।६।।

भावार्थ

कृष्णाच्या मुरलीनादाने सर्व सृष्टी मोहून गेली. स्वर्ग, पृथ्वी, आणि पाताळ तिन्हीं लोक विस्मयचकीत झालें.सावध झालेले गोपाळ स्थिर झालेले यमुनाजळ पाहून कृष्णाला सांगतात यमुनेतला बाऊ त्यांचे धाडस पाहून पळाला. ते त्रिजगती धन्य झाले.कारण त्यांच्यावर श्रीपतीने कृपा केली. सर्वजण आनंदाने नाचू लागले, श्रीहरी त्यां आनंदात सहभागी झाले.

१२२

खेळतां खेळतां गडियासी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें ।।१।।
आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें खेळ मांडावया भाई ।।२।।
धांवती सवंगडी पाठोपाठ लवलाह्या । गुंतल्या त्या गाई. न येती वळाया ।।३।।
येवोनि दीन मुख करिती हरीपुढें । एका जनार्दनीं तया. पाहतां प्रेम चढे ।।४।।

भावार्थ

खेळत असतांना सावळा कृष्ण गोपगड्यांना खेळ थांबवून आपआपल्या गाई वळवावयास सांगतो'. सगळे जण एका पाठोपाठ वेगानें धावतात, गाई चारा खाण्यांत गुंतल्या असल्याने घराकडे वळत नाहीत. नाराज होऊन दीनवाणीने गोपाळ हरीपुढे उभे राहतात.एका जनार्दनौ म्हणतात, गोपगड्यांच्या दीन मुद्रा पाहून हरीच्या मनांत त्यांच्या विषयीं प्रेम दाटून येते.

१२३

काकुलती गोपाळ म्हणती रे. कान्हया ।
गाई न येती माघारी कोण. बळी कासया ।।१।।
आमुची. खुंटली गति आवरीं तूं हरी ।
तुजवाचूनी कोण सखा आमुचा कैवारी ।।२।।
नको येरझारा. पुरे आतां हरी ।
एका जनार्दनी ऐशी करूणा करी ।।३।।

भावार्थ

काकुळतीला येऊन गोपगडी हरीला विनंती करतात, गाई माघारी फिरत नाहीत, प्रयत्न. करून थकून मार्ग खुंटला आहे, असे बोलून ते कृष्णाला सांगतात, कृष्ण सख्यावाचून त्यांना मदत करणारा कैवारी कोणी नाही. एका जनार्दनी म्हणतात, संसाराच्या येरझर्यातून भक्तांची सुटका करणारे श्रीहरिशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही.

१२४

गडियांचे उत्तर ऐकोनि सावळा । वेधियेलें मन तटस्थ सकळां ।।१।।
घेऊनी मोहरी गाई पाचारी सकळां। नवल तें जाहलैं गोपाळा सकळां ।।२।।
येउंनी गाई अवघ्या जमा होती। पाहूनियां कृष्णा त्या हुंबरती ।।३।।
एका जनार्दनीं विश्वाचा निवासी । गाई आणि गोपाळां वेधिलैं सर्वांसी ।।४।।

भावार्थ

गोपगड्यांचे हे उत्तर ऐकून श्रीकृष्णाने नवलाई केली.त्याने गोपाळांसह सर्व गाईंचे मन स्वस्वरुपाशी वेधून घेतले.सकळ गोपाळ आश्र्चर्यचकित झाले, सगळ्या गाई कृष्णा सभोवताली येऊन कृष्णाला पाहून हंबरु लागल्या.एका जनार्दनी म्हणतात, विश्वनायक गाई आणि गोपाळांचे मन वेधून घेतो.

१२५

काळे गोरे एकापुढे एक । धांवताती बिदो बिदी देख ।
अलक्ष लक्ष्या नये सम्यक । तो नंदनंदन त्रिभुवननायक गे माय ।।१।।
गाईवत्स नेताती वनां । गोपाळ म्हणती अरे कान्हा ।
जो नये वेदां अनुमाना । ज्यासी चतुरानन ध्यानीं ध्यातसे ।।२।।
योगीजनांचे ध्येय ध्यान । ज्याकारणें अष्टांग योगसाधन ।
तयांसि नोहे कधीं दृश्यमान। तो गोळ्यांचे उच्छिष्ट खाय जाण गे माय ।।३।।
एका जनार्दनीं व्यापक । सर्वां ठायीं समसमान देख ।
अरिमित्रां देणें. ज्याचें एक । तो हा नायक वैकुंठींचा।।४।।

भावार्थ

काळे सावळे गोपगडी एका पुढे एक वेगानें धावतात,सारे लक्ष त्यां नंदनंदन त्रिभुवननायक,जो अलक्ष्य लक्ष्य असल्याने सम्यक दर्शन घडत नाही. ज्याचे वेद सुध्दां सम्यक वर्णन करु शकत नाहीत. ध्यान लावूनही सृष्टीकर्ता ब्रह्मा देखील ज्याला जाणून घेऊ शकत नाही,ज्याच्या साठी योगीजन ध्यानधारणा,अष्टांग योगसाधना करतात त्यांना तो परमात्मा दृष्टीपथांत येत नाही तो गोकुळात गौळ्यांच्या सह गोपाळ काला करून त्यांचे उच्छिष्ट आवडीने खातो.एका जनार्दनी म्हणतात, हा जनार्दन सर्व सृष्टीत व्यापकरुपे भरून राहिला आहे. हा वैकुंठीचा नायक शत्रु आणि मित्र यांना समान दृष्टीने बघणारा असून चराचरावर प्रेम करणारा आहे.

१२६

जाहला अस्तमान आलें गोकुळां । वोवाळिती आरत्या गोपिका बाळा ।।१।।
जाती सवंगडी आपुलाले घरां । रामकृष्ण. दोघे आले. मंदिरां ।।२।।
नानापरींची पक्वान्ने वाढिती भोजना । यशोदा. रोहिणी राम आणि कृष्णा ।।३।।
एका जनार्दनीं पहुडले देव । गोकुळामाजीं दावी ऐसे लाघव ।।४।।

भावार्थ

सूर्य मावळला, सर्व गोपाळ आपल्या घरां परतलें, गोपिकांनी गोपबाळांना आरतीने ओवाळलें.रामकृष्ण दोघे राजमंदिरांत परतलें परतलें यशोदा रोहिणीने नाना प्रकारची पक्वान्ने रामकृष्णाला भोजनीं वाढलें. गोकुळांत आपली अवतार लीला दाखवणारे देव सुख शय्येवर पहुडलें असे एका जनार्दनी म्हणतात.

१२७

कृष्ण देखतांची गेलें ज्ञान । शेखीं बुडविलें महिमान।।१।।
भली नव्हे हे कृष्णगती । सखे पळविले सांगाती ।।२ ।।
मायेचा करविला बंदु । शमदमादि पळविले बंधु ।।३।।
द्रष्टा दृश्य दर्शन । तिन्ही सांडिले पुसून ।।४।।
ब्रह्माहमस्मि शुध्द जाण । तेथील शून्य केला अभिमान ।। ५।।
एका जनार्दनाची प्राप्ती । ज्ञान अज्ञान हारपती ।।६।।

भावार्थ

सखे सांगाती यांचे पाश तोडून टाकणारी, मायेच्या बंधनातून सोडवणारी, व्यक्तिमहात्म्य बुडविणारी शमदमादि साधनांचा खटाटोप संपवणारी ही कृष्णगती भली नव्हे असे स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात,कृष्ण स्वरुपाचे दर्शन होतांच दृश्य (देखावा) द्रष्टा,( पहाणारा ) आणि दर्शन क्रिया ही त्रिपुटी लयास जावून अज्ञाना सहित ज्ञानाचा निरास होतो. मी ब्रह्म आहे ही शुध्द जाणीव होऊन अभिमान शून्य होतो .हे सर्व गुरुकृपेने समजते.

१२८

करुनिया काला सर्व आले गोकुळीं । गोपाळांसहित गाईवत्स सकळीं ।।१।।
वोवाळिती श्रीमुख कुर्वंडी करिती । रामकृष्णातें सर्व वोवाळिती ।।२।।
जाहला. जयजयकार आनंद सकळां । एका जनार्दनीं धणी पाहतां डोळां ।।३।।

भावार्थ

काल्याचा सोहळा संपवून गाईवासरे, गोपाळ सर्वजण गोकुळांत परतलें. गोपिकांनी सर्व गोपगड्यांना ओवाळले. रामकृष्णाला ओवाळून आनंदाने जयजयकार केला. एका जनार्दनी म्हणतात, हा आनंद सोहळा पाहून मन समाधानाने भरून गेले.

१२९

अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरीं ।।१।।
आपुलिया गृही रामकृष्ण आले । यशोदेनें केले निंबलोण ।।२।।
षड्ररस पक्वान्नीं विस्तारिलें ताट. । जेविती वैकुंठ नंदासवें ।।३।।
नंदासवें जेवी वैकुंठीचा हरी । ब्रह्मादिक सरी न पावती ज्याची ।।४ ।।
एका जनार्दनीं ऐसी लीला. खेळे । परब्रह्म सांवळें कृष्णरुप ।।५।।

भावार्थ

सुर्यास्त होतांच गोकुळांत. परतलेलें गोपाळ घरोघरी गेले.रामकृष्ण घरीं. येतांच. यशोदेनें लिंबलोण केले. सहा रसांनी युक्त अशा पक्वानांनी ताट सजविली वैकुंठाचा हरी नंदासवे भोजनास बसलें.ज्याची गोडी ब्रह्मदेवांना देखील.चाखण्यास मिळाली नसेल. असे वर्णन एका जनार्दनी करतात.

श्रीकृष्णाचे मथुरेस प्रयाण गौळणींचा आकांत

१३०

गौळणी म्हणती यशोदेला । कोठें गे सांवळा ।
कां रथ शृंगारिला । सांगे वो मजला । अक्रूर उभा असे बाई गे साजणी ।।१।।
या नंदाच्या अंगणी । मिळाल्या गौळणी ।।ध्रु०।।
बोले नंदाची पट्टराणी । सद्गदीत होउनी ।
मथुरेसी चक्रपाणी । जातो गे साजणी ।।१।।
विव्हळ झाले मन वचन ऐकोनी ।।२।।
अक्रूरा चांडाळा । तुज कोणी धाडिला ।
कां घात करुं आलासी । बधिशी सकळां ।
अक्रूरा तुझें नाम तैशीच करणी ।।३।।
रथीं चढले वनमाळी । आकांत गोकुळीं ।
भूमि पडल्या व्रजबाळी । कोण त्या सांभाळी ।
नयनींच्या उदकानें भिजली धरणी ।।४।।
देव बोले अक्रूरासी । वेगें हांकी रथासी । या गोपींच्या शोकासी ।
न पहावें मजसी । एका जनार्दनीं रथ गेला निघोनी ।।५।।

भावार्थ

नंदाच्या अंगणात जमा झालेल्या गौळणी यशोदेला विचारतात की सावळा कोठे आहे ? हा रथ कशासाठी सजविला आहे ? तेव्हां भरल्या कंठाने यशोदा मैत्रिणींना सांगते की चक्रपाणी मथुरेला जात आहेत. शोकाकूल होऊन गौळणी अक्रूराला दूषण देऊन त्याची निंदा करतात की तो नावाप्रमाणेच क्रूर असून घात करण्यासाठीं गोकुळांत आलेला चांडाळ आहे. वनमाळी रथारूढ होतांच गोकुळांत एकच आकांत माजतो. व्रजकन्या भूमीवर कोसळून आकांत करु लागतात. त्यांच्या अश्रुंनी धरणी भिजून जाते. गोपींच्या शोकाने घायाळ झालेल्या श्रीहरीच्या विनंतीनुसार अक्रूर वेगाने रथ हाकतो. कृष्णासह रथ निघून गेला असे एका जनार्दनी खिन्नपणे वर्णन करतात.

गोपळांच्या शांतवनाची उध्दवास आज्ञा

१३१

उध्दवासी एकांतीं बोले गुज सांवळा ।
गोकुळासी जाऊनी बोधी सुंदरी गोपीबाळा ।
रथीं बैसोनी निघाला वेगीं पावला गोकुळां ।
तो उध्दव देखोनी दृष्टी गोपींनी वेढिला । ।१ ।।
उध्दवा जाय मथुरेला ।
आणी. लौकरी हरीला ।।ध्रू० ।।
मुख सुंदर शोभे कपाळीं टिळक रेखिला।
नवरत्नजडित मुद्रिका हार कंठीं घातिला. ।।२।।
झळकती कुंडलें कानीं शिरीं मुगूट शोभला ।
मुरली मोहिला भाळला तिच्या रुपासी ।
डोळे पिचके खुरडत जे चाले काय. |
वानूं मुखासी शुध्द भाव. देखोनी तिचा अनुसरला तियेसी ।।३।।
रासमंडळी नाचे मुरारी कधीं भेटेल तो न कळे ।
वेणू वाजवी सुस्वर सोज्वळ पदकमळें ।
धणी न पुरे तया पाहतां. मन आमुचे वेधिलें ।।४।।
हा अक्रूर कोठोन आला हरी गेला घेऊनी ।
तो वियोग जाळी न जाय जीव आमुचा अझुनी ।
घरदार सोडोनी जावें गोकुळ हे सोडोनी ।
उध्दवा कधीं भेटविसी हरीला आणुनी ।।५।।
घडी घडी घरां येतो चोरितो श्रीहरी ।
तो. झडकरी दाखवीं लौकरी ।
धन्य. प्रेम तयाचें सद्गदित अंतरीं ।
एका जनार्दनीं हरिरुपीं ।
वेधल्या नारी ।।६।।

भावार्थ

गोकुळांत जाऊन गोपींना उपदेश करून त्यांचे वियोगी मन शांत करावे असे श्रीकृष्ण उध्दवास सांगतो.वेगाने निघून उध्दव गोकुळांत येतांच गोपी त्याला मथुरेस जाऊन कृष्णाला घेऊन येण्यास विनवितात. श्रीहरीच्या रुपाचे सुंदर वर्ण़न करतात. कपाळीं कस्तुरी टिळक,गळ्यांत हार,बोटांत रत्नजडित अंगठी, कानांत कुंडलें,मस्तकी मुगुट ,अधरावर मुरली धारण करणारा श्री हरी गोकुळ सोडून मथुरेला जाऊन राहिला. खुरडत चालणार्या, पिचक्या डोळ्यांच्या कुब्जेच्या भोळ्या भावाला भुलून गोपिकांना विसरला. रासमंडळी नाचणारा,सुस्वर मुरली वाजवणारा, मनाला वेध लावणारा अशा श्रीहरीचा वियोग जीव जाळून टाकीत आहे.हे घरदार,गोकुळ यांचा त्याग करून हरिदर्शनाची आस पुरवावी असे व्याकूळ गोपी उध्दवाला सांगतात.असे कथन करून एका जनार्दनीं गोपी -कृष्णाचे हे अलौकिक,निर्व्याज प्रेम धन्य होय.असे म्हणतात.

श्रीकृष्णमाहात्म्य

सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई वधियेलें मन आमुचे तें पायीं ।।१।।
नवल लाघव न कळे ब्रह्मादिका । वेदश्रुती शिणल्या ठक पडलें सकळिकां ।।२।।
साही दरूशनें गौळण जयासाठीं । खांदी घेउनी कांबळा गोधन राखी जगजेठी‌।।३।।
एका जनार्दनीं ब्रह्म गोकुळीं उघडें ।पाहतां. पाहतां चित्त तेथे वेधलें ।।४।।

भावार्थ

ज्याच्या पायीं मन गुंतून गेले आहे तो सांवळा हरी गोकुळांत गाई राखित आहे. भक्तीप्रेमाचे हे विस्मयकारी रुप ब्रह्मादिदेवांना सुध्दां अनाकलनीय आहे. हे जाणून घेण्यांच्या प्रयत्नांत वेदश्रुती थकल्या. साही दर्शने अचंबित झाली.खांद्यावर कांबळे घेऊन गाई राखणाय्रा जगजेठीला पाहून सगळे कोड्यांत पडलें.एका जनार्दनीं म्हणतात,गोकुळांत नांदणारे हे उघडे परब्रह्म पाहतांना मन तेथें गुंतून पडलें.

१३२

ब्रह्मादिकां न कळे तें रुप सुंदर। गोकुळीं परिकर नंदाघरीं ।।१।।
रांगणा रांगतु बाळलीले खेळतु । दुडदुडां धांवतु गायीपाठीं ।।२।।
गौळणींचे घरीं चोरूनि लोणी खाये। पिलंगता जाये हातीं न लगे ।।३ ।।
एका जनार्दनीं त्रैलोक्या व्यापक । गाई राखे कौतुक गोळियांसी ।।४।।

भावार्थ

नंदाच्या अंगणात रांगणारे, बाळलीला करणारे,गाईंच्या मागें दुडदुडा धावणारे,गौळणींच्या घरीं चोरून.लोणी खाणारे, पळून जातांना कधी हातीं न लागणारे, हे परब्रह्म रुप ब्रह्मादीदेवांना सुध्दां कोड्यांत टाकते . एका जनार्दनीं म्हणतात, स्वरुपाने जे त्रैलोक्य व्यापून टाकते ते परब्रह्म गवळ्यांच्या गाई राखते हे कौतुक केले.

१३३

ओंकारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरूंतें वसे ।।१।।
सांवळें सगुण चैतन्य परिपूर्ण । सवंगडियांसी क्रीडा करी।।२।।
आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा । तोचि बाळ नंदाचा म्हणताती ।।३।।
एका जनार्दनीं वेगळाचि पाही । हृदयीं धरूनी राही सांवळियासी ।।४।।

भावार्थ

ओंकारा पेक्षां श्रेष्ठतम, निर्गुणा पेक्षां वेगळे,भक्तांना निकट असे परब्रह्म हे स्वरुप सांवळे, सगुण,चैतन्यपूर्ण असून सवंगड्यांसह.क्रीडा करीत आहे. या रुपाचा आरंभ,मध्य, अंत बुध्दीला आकलन होत नाहीं . सामान्य जन या परब्रह्माला नंदबाळ म्हणतात.असे कथन करून एका जनार्दनीं म्हणतात,या आगळ्या वेगळ्या सावळ्या रुपाला अंत:करणांत धारण करावें.

१३४

सांवळा श्रीकृष्ण. राखितो गाई ।
वेधियेलें मन आमुचे तें पायीं ।।१।।
नवल लाघव न कळे ब्रह्मादिका ।।१।।
वेदश्रुती शिणल्या ठक पडलें सकळिका ।।२।।
साही दरूशनें वेडावलीं जयासाठीं ।
खांदी घेऊनी कांबळा गोधन राखी जगजेठी ।।३।।
एका जनार्दनीं चित्त वेधलें ।।४।।

भावार्थ

खांद्यावर कांबळे घेऊन जगजेठी गोकुळांत गाई राखतो,या विस्मयकारक करणीचे मर्म ब्रह्मादिदेवांना देखील उलगडत नाही.वेद आणि श्रुती याची मिमांसा करतांना थकून गेल्या, साही दर्शने हतबुद्ध झाली. सगळेजण कोड्यांत पडलें.एका जनार्दनीं म्हणतात,या सांवळ्या श्रीकृष्णाने सर्वांचे चित्त वेधून घेतले.

१३५

जाणते नेणते होतु ब्रह्मज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची।।१।।
सुलभ सोपारा गोकुळामाझारीं । घरोघरींचोरी खाय लोणी ।।२।।
न कळे ब्रह्मादिका करितां लाघव। योगियांची धांव खुंटे जेथें ।।३।।
एका जनार्दनीं चेंडूवाचे मिसें । उडी घालितसे डोहामाजीं ।।४।।

भावार्थ

ब्रह्मज्ञान जाणणारे योगीजन ज्याच्या रुपाची आस धरून निरंतर ध्यान लावून बसतात त्यांना देखील जो सापडत नाही. ब्रह्मादिदेव आणि जाणते योगीजन यांना जो अनाकलनीय आहे तो श्रीहरी गोपाळांना सहज प्राप्त होतो, घरोघरीं जाऊन चोरून लोणी खातो.एका जनार्दनींम्हणतात,चेंडू आणण्याच्या निमित्ताने श्रीहरी यमुनेच्या डोहांत उडी घालतो .

१३६

पाहुनी कृष्णासी आनंद मानसीं । प्रेमभरित अहर्निशीं कृष्णनामे।।१।।
आजीं. कां वो कृष्ण आलां. नाहीं घरां । करती येरझारा नंदगृहीं ।।२।।
भलतीया मिसें जातीं त्या घरासी । पाहतां कृष्णासी समाधान ।।३।।
एका जनार्दनीं वेधल्या गौळणी । तटस्थ त्या ध्यानीं कृष्णाचिया।।४।।

भावार्थ

प्रेमभराने कृष्णाच्या नामाचा जप करणार्या गौळणी कृष्ण दर्शनाने आनंदित होतात.कृष्ण भेटला नाहीतर त्या कांहीतरी.कारण.काढून नंदाघरीं येरझरा घालतात.कृष्ण भेटताच समाधान. पावतात. एका जनार्दनीं म्हणतात, गोपींचे चित्त श्रीहरीने हरण केले आहे.

१३७

वैधिल्या त्या गोपी नाठवे आपपर । कृष्णमय शरीर वृत्ति जाहली ।।१।।
नाठवे भावना देह गेह कांहीं । आपपर त्याही विसरल्या ।।२।।
एका जनार्दनीं व्यापला हृदयीं । बाहेर मिरवी दृष्टिभरित ।।३।।

भावार्थ

गोकुळीच्या गोपींच्या देहवृति आणि मनोवृत्ति कृष्णमय झाल्या.देह आणि घरा विषयींच्या ममत्वाच्या भावनांचा.पूर्ण निरास झाला.आपपर भाव लोपला. बाह्य सृष्टीत नजरेला दिसणाय्रा कृष्णरूपाने हृदय व्यापून टाकले. या शब्दांत गोपींच्या प्रेमभक्तीचे वर्णन एका जनार्दनीं करतात.

१३८

जगाचे जीवन ब्रह्म परिपूर्ण । जनीं जनार्दन व्यापक तो।।१।।
तो हरी गोकुळीं रांगणा नंदाघरीं । गौळणी त्या सुंदरी खेळविती ।।२।।
वेद गीतीं गाणी शास्त्रें विवादती । खुंटलीसे मति शेषादिकांची ।।३।।
एका जनार्दनीं चहूं वाचांपरता । उच्छिष्ट सर्वथा भक्षी सुखें ।।४।।

भावार्थ

परिपूर्ण ब्रह्म,विश्वाचे चैतन्य असा हा जनार्द़न अणुरेणुमध्यें भरून राहिला आहे. ज्याचा महिमा वेद, पुराणे गीतांमधून गातात, साही शास्त्रे वाद विवाद करतात.त्याचे यथार्थ वर्णन सहस्त्र मुखीं शेष सुध्दा करु शकत नाही. तो हरी नंदाघरी रांगतो,गौळणी त्याला खेळवतात.एका जनार्दनी म्हणतात,वैखरी,मध्यमा,पश्यंती,परा या चारी वाचा या रुपाचे वर्णन करण्यासाठी असमर्थ ठरतात.

१३९

चहूं वाचांपरता चहूं वेदां निरूता । न कळे तत्वतां चतुर्वक्त्रा ।।१।।
चौबारा खेळतु सौंगडी सांगातु । लोणी चोरुं जातु घरोघरीं ।।२।।
चौसष्टा वेगळा चौदांसी निराळा । अगम्य ज्याची लीळा सनकादिका ।।३।।
एका जनार्दनीं चहूं देहावेगळा । संपुष्टीं आगळा भरला देव ।।४ ।।

भावार्थ

वैखरी,मध्यमा,पश्यंती आणि परा या चारी वाचा ज्याचे यथार्थ वर्णन करु शकत नाही,चारी वेद ज्या परमात्म रुपाचे वर्णन करतांना नेती नेती म्हणून मूक होतात,चार मुखी ब्रह्मदेव ज्याला तत्वतां जाणू शकत नाही,जो चोसष्ट विद्या आणि चौदा कला यांच्याहून निराळा आहे.सनकादिक ऋषीं देखील या परमात्म्याच्या अगम्य लिळांचे वर्णन करु शकत.नाही. असे कथन.करून एका जनार्दनीं म्हणतात, स्थूल, सुक्ष्म,कारण आणि महाकारण या चारी देहावेगळा हा परमात्मा अंतरंग व्यापून टाकतो.

१४०

अबोलणें बोल कुंठीत पै जाहलें । तें निधान देखिलें नंदाघरीं ।।१।।
अधिष्ठान मूळ व्यापक सकळ । जगाचें तें कुळ कल्पद्रुम ।। २।।
एका जनार्दनीं. बिंबी बिंबाकार। सर्वत्र श्रीधर. परिपूर्ण. ।।३।।

भावार्थ

नंदाघरीं नांदत असलेलें विश्वाचे निधान पाहून शब्द कुंठीत होऊन वाचा अबोल झाली.सकळ विश्वाचे व्यापक अधिष्ठान, जगाला ईच्छिले फळ देणारा कल्पतरु श्रीधर सर्वत्र ओतप्रोत भरून राहिला आहे.असे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, परमात्म्याच्या प्रतिबिंब रूपी सृष्टितिल बिंब असुन सर्वसाक्षी आहे.

१४१

राखितो गोधनें मनचेनि मनें । न पुरे अवसरू धांवण्या धांवणें ।
कुंठित जाहली गति पवनाची तेणें । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हैं ।।१।।
देखिला देखिला मंडित चतुर्भुज । वैकुंठीचा भूपती तेज:पुंज ।
पहातांचि तया नावडे कांहीं दुजें । ऐसें लाघव याचें सहज ।।२।।
चित्त चैतन्य पडिली मिठी । कामिनी मनमोहना जगजेठी।
तुझ्या वेधें ध्यानस्थ धूर्जटी । ऐसा गोवळु योगीयांसी नोहे भैटी।।३।।
एका जनार्दनीं शब्दांवेगळा। आगमांनिगमां कांहीं न कळे लीळा ।
सोहं कोहं शब्दांवेगळा। पहा पहा परब्रह्म पुतळा।।४।।

भावार्थ

नंद यशोदेचा नंदन मनोवेगाने धांवून गाई राखतो,त्या वेगापुढे वायुची गती कुंठित होते.शंख,चक्र,गदा,पद्म यांनी मंडित असलेला चतुर्भुज तेज:पुंज असा वैकुंठीचा राजा पाहतांच दुजें कांही पाहण्याची ईच्छाच उरत नाही. मनमोहन जगजेठी दृष्टीस पडतांच चित्ताला चैतन्याची मिठी पडतें.प्रत्यक्ष शिवशंकर ध्यानस्थ बसून या भेटीची अपेक्षा करतात.एका जनार्दनीं म्हणतात,वेदश्रुतींना या परब्रह्म्याच्या अवतार लीळांचे रहस्य कळत नाही.हा परब्रह्म पुतळा शब्दांनी वर्णन करण्या पलिकडील आहे.

१४२

चतुर्भुज शामसुंदर । गळां गुंजांचे हार |
निडळीं चंदन शोभे परिकर । मिरवे नंदरायाचा किशोर ।।१।।
हातीं काठी खांदां कांबळीं । गाई राखे यमुनेचे पाबळी ।
नाचती गोपाळ धुमाळी। पृष्टी जाळी दहीभात ।।२।।
जें निगमांचे ठेवणें । सनकसनंदाचे घोसुलें येणें ।
शंभूचे आराध्यदैवत केणें । तें चारित. गोधने नंदाचीं ।।३।।
ऐसा अकळ नाकळें हरी । वेणू वाजवी छंदे नानापरी ।
एका जनार्दनीं वाटी शिदोरी गोपाळा ।।४।।

भावार्थ

चारभुजाधारी शामसुंदर नंदरायाच्या किशोराचे रूप घेऊन यमुनेच्या तीरावर गाई राखतो निडळावर चंदनाचा रेखीव टिळा,गळ्यांत गुंजांचे हार,खांद्यावर कांबळी,हातामध्ये काठी घेऊन वेणू वाजवितो.सभोवती गोपाळ आनंदाने नाचतात.शिवशंकराचे आराध्यदैवत,सनकादिक ऋषींचे ध्याननिधान,वेदांचे उगमस्थान असा हा वैकुंठीचा हरी कळूनही पूर्ण समजल्या सारखा.वाटत नाही. असे कथन करून एका जनार्दनीं म्हणतात, हा गोपवेषातील श्रीहरी गोपाळांना शिदोरी वाटतो.

१४३

राखीत गोधनें भक्तांचिया काजा । उणीव सहजा येवो नेदी।।१।।
आपुलें थोरपण सारूनी परतें । भक्तांचे आरुतें काम करी ।।२।।
उच्छिष्ट काढणें सारथ्य करणें । उच्छिष्ट तें खाणें तयांसवें ।।३।।
चुकतां वळतीआपण वोळणें । एका जनार्दनीं पुण्य धन्य त्यांचे।।४।।

भावार्थ

वैकुंठीचा राणा गोकुळांत भक्तांसाठी गोधने राखतो.यांत कोणतिही उणीव जाणवूं देत नाही. आपला थोरपणा बाजूला सारून भक्तांचे काम पूर्ण करतो. रथाचे सारथ्य करतो, उष्ट्या पत्रावळी उचलतो,उच्छिष्ट खातो.चुका सुधारून घेतो.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,या गोकुळवासी जनांचे पुण्य थोर असल्याने त्यांना हे भाग्य प्राप्त झाले.

१४४

न देखतां कृष्णवदन । उन्मळती तयांचे नयन ।
न घेती अन्नजीवन । कृष्णमुख न पाहताना ।।१।।
कोठें गुंतला आमुचा कृष्ण । ऐशी जया आठवण।
गायी हुंबरती अधोवदन । कृष्णमुख न पाहताना ।।२।।
सवंगडे ठायीं ठायीं उभे । कृष्णीं द्रष्टी ठेवुनी लोभें ।
आजी कृष्ण कांहो नये । आम्हांशीं खेळावया ।।३।।
ऐशी जयांची आवडीं। तयां पडो नेदी सांकडी ।
एका. जनार्दनीं उडी। अंगें घाली आपण ।।४।।

भावार्थ

गोपगड्यांना कृष्णाचे दर्श़न न झाल्यास त्यांचे डोळे आसवांनी भरून वाहू लागतात.ते अन्नपाणी सोडून देतात.कृष्ण कोठे गुंतला असेल या विचाराने अस्वस्थ होतात, त्याच्या आठवणीने व्याकुळ होतात.गाई खाली माना घालून हंबरतात. सवंगडी ठिकठिकाणी उभे राहून कृष्ण केव्हां खेळायला येईल याची वाट पहातात गोपगड्यांच्या या प्रेमभक्तीने ते कृष्णसख्याला एक क्षणही विसंबत नाहीत असे एका जनार्दनीं म्हणतात.

१४५

ज्याचें उदारपण काय वानुं । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु ।
वेधी वेधियेलें आमुचे मनु । तो हा देखिला सांवळा श्रीकृष्ण ।।१ ।।
मंजुळ मंजुळ. वाजवी वेणू । श्रुतीशाखां न कळे अनुमानु ।
जो हा परापश्यंती वेगळा वामनु । तया. गोवळ म्हणती कान्हू ।।२।।
रुप अरुपाशीं नाही ठाव. । आगमांनिगमां न कळे वैभव ।
वेदशास्त्रांची निमाली हाव । एका जनार्दनीं देखिला स्वयमेव ।।३।।

भावार्थ

ज्याच्या औदार्याला कल्पतरू आणि कामधेनुची उपमा अपुरी पडेल त्या सांवळ्या श्रीकृष्णाने चित्त वेधून घेतले आहे. हा वामन अवतार परा,पश्यंती वाणींच्या पलिकडे रेअसून त्याचे अनुमान वेदश्रुतींना सुध्दां अनाकलनीय वाटते,अशा परब्रह्माला गोकुळचे गोप कान्हा म्हणतात.प्रेमभक्तीचे असे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात,ज्याच्या रुपाचे.आणि वैभवाचे आकलन आगमानिगमाला होत नाही असा श्रीपती स्वयमेव याच देहीं याच डोळां पहावयास मिळाला .

१४६

मागे पुढे उभा हाती घेउनी काठी वळत्या धावे पाठीं गाईमागें ।।१।।
गोपाळ बैसती आपण धांवे राणा । तयाच्या वासना पूर्ण करी।२।।
वासना ते देवें जया दिली जैशी । पुरवावी तैसी ब्रीद साच ।।३।‌।
ब्रीद तें साच करावें आपुलें । म्हणोनियां खेळे गोपाळांत ।।४ ।।
एका जनार्दनीं खेळतो कान्हया । ब्रह्मादिका माया न कळेची ।।५।।

भावार्थ

वैकुंठीचा राणा हातांत काठी घेऊन गाईंच्या मागे पुढे उभा राहतो आणि वळत्या गाईंच्या पाठीमागे धावतो.गोपाळांच्या वासना पूर्ण करण्यासाठी त्यांना विश्रांती देवून आपण गाईंच्या मागे धावतो.मनांत वासना निर्माण करणारा देव त्यां वासना पुरवतो हे ब्रीद खरे करतो.देव भक्तांचे कोड पुरविण्यासाठी गोपाळां समवेत खेळ खेळतो. एका जनार्दनीं म्हणतात कान्हाची ही माया ब्रह्मादिदेवांना आकळत नाही.

१४७

तिन्हीं त्रिभुवनी सत्ता जयाची । तो गोपाळांचे उच्छिष्ट खाय ।।१।।
खाउनी उच्छिष्ट तृप्तमय. होय । यज्ञाकडे न. पाहे वांकुडें तोंडें. ।।३।।
ऐसा तो लाघव गोपाळांसी दावी । एका जनार्दनीं कांहीं कळों नैदी ।।३।।

भावार्थ

स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही भुवनांत ज्याची सत्ता चालते तो गोपाळांचे उच्छिष्ट खाऊन तृप्त होतो.यज्ञयागाकडे दुर्लक्ष करतो. एका जनार्दनीं म्हणतात, गोपाळांविषयी श्रीहरीला जो आपलेपणा. वाटतो ते अनाकलनीय आहे.

१४८

न कळे लाघव तया मागें. धावें । तयाचे ऐकावें वचन देवें ।।१।।
देव तो अंकित भक्तजनांचा । सदोदित साचा मागें धांवे ।।२।।
गोपाळ आवडीं म्हणती कान्हया । बैसे याची छाया सुखरूप ।।३।।
सुखरूप बैसे वैकुंठीचा राव ।भक्ताचा. मनोभाव जाणोनियां ।।४।।
जाणोनियां भाव पुरवी वासना । एका जनार्दना शरण जाऊं ।।५।।

भावार्थ

वैकुंठीचा राजा गोपाळांच्या मागे धावतो,त्यांचे वचन ऐकून त्यांचा अंकित होतो.गोपाळ देवाला प्रेमाने कान्हा म्हणतात आणि भक्तांच्या मनांतिल भाव जाणून कान्हा त्यांच्या सर्व ईच्छा पूर्ण करतो. एका जनार्दनीं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणीं शरणागत होतात.

१४९

भक्तांचा पुरवी लळा । तो सांवळा श्रीकृष्ण ।।१।।
उचलिला पर्वतगिरी । नाथिला. काळ्या यमुनेतीरीं ।।२।।
अगबग. केशिया असुर । मारिला तो कंसासुर ।।३।।
उग्रसेन मथुरापाळ । द्वारका बसविलीं सकळ ।।४।।
द्वारकेमाजीं आनंदघन । शरण एका जनार्दन ।।५।।

भावार्थ

सांवळा श्रीकृष्ण भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलतो.यमुनेचे पाणी विषारी बनवणार्या कालिया सर्पाचे मर्दन करतो.कशिया असुराचा वध करतो. कंसासुराला मारून उग्रसेनेला मथुरेच्या सिंहासनावर बसवतो.द्वारका नगरी वसवून प्रजेला आनंद देतो या आनंदघन श्रीकृष्णाला एका जनार्दनीं सर्वभावें शरण जातात.

१५०

कमळगर्भीचा पुतळा ।
पाहतां दिसे पूर्ण कळा ।
शशी लोपलासे. निराळा रुपासही ।।१।।
वेधक वेधक नंदनंदनु ।
लाविला अंगीं चंदनु ।
पुराणपुरुष पंचाननु ।
सांवळां कृष्ण ।।२।।
उभे पुढें अक्रुर उद्धव ।
मिळाले सर्व भक्तराव ।
पहाती मुखकमळभाव ।
नाठवे द्वैत ।।३।।
रूप साजिरें गोजिरें ।
दृष्टी पाहतां मन न पुरे ।
एका जनार्दनीं झुरे ।
चित्त तेथें सर्वदा ।।४।।

भावार्थ

भक्त प्रल्हादा साठी नृसिंह रूपानें अवतार धारण करणारा श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या नाभिकमळांतून जन्मला असे या पुराणपुरूषाचे वर्णन विष्णुपुराणांत आढळते.चंद्राचे तेज ज्याच्या तेजापुढे फिके पडते असे याचे रूप सोळा कलांनी परिपूर्ण भासते.सर्वांचे लक्ष वेधून घेणार्या या नंदनंदनाने चंदनाची उटी अंगाला लावली आहे.या सांवळ्या श्रीकृष्णापुढे अक्रूर,उध्दवा समवेत सर्व भक्त उभे राहून त्याचे साजिरे,गोजिरे रूप डोळ्यांत साठवित आहेत. श्रीकृष्णरूपाचे असे यथार्थ वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात,या रूपाच्या दर्शनाने मनाची आस कधीच पुरी होत नाही चित्त सतत झुरत राहते.

१५१

जगाचें जीवन भक्तांचे मोहन । सगुण निर्गुण ठाण शोभतसें ।।१।।
तें रुप गोकुळीं नंदाचिये घरीं । यशोदे मांडीवरी खेळतसे ।।२।।
ईंद्रादी शंकर ध्यान धरती ज्याचे । तो. लोणी. चोरी गौळ्याचे घरोघरीं ।।३।।
सर्वांवरी चाले जयाची तें सत्ता । त्यासी. बागुल आला म्हणतां उगा राहे ।।४।।
एकाचि पदें बळी. पाताळीं घातला । तो उखळीं बांधिला यशोदेनें ।।५।।
जयाचेनी तृप्त त्रिभुवन. सगळें तो लोणियाचे गोळे मागून खाय।।६।।
एका जनार्दनीं भरुनी उरला । तो असे संचला विटेवरी ।।७।।

भावार्थ

निर्गुणरुपे जो विश्वाचे अधिष्ठान असून सगुणरुपाने भक्तांचे मनमोहन रूप गोकुळांत नंदाघरीं यशोदेच्या मांडीवर खेळत आहे. शिवशंकरासह इंद्रादि देव ज्याच्यासाठी ध्यानधारणा करतात तो गवळ्यांचे घरी लोणी चोरुन खातो. सर्वांवर ज्याची सत्ता चालते तो बागुलबुवा आला म्हणतांच उगा राहतो. ज्याने एका-पदाने दैत्यराजा बळीला पाताळांत ढकललें त्याला यशोदेने उखळाला बांधले.जो त्रिभुवनाची भूक भागवून तृप्त करतो तो गोकुळांत लोण्याचे गोळे मागून खावून संतोष पावतो. एका जनार्दनीं म्हणतात,जो अखिल विश्व केवळ दशांगुळे व्यापून उरला तो प्रेमभक्तीसाठी पंढरींत एका विटेवर उभा ठाकला आहे.

१५२

अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनी कर ठैउनी कटी उभा येथें ।।१।।
धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन । म्हणौनि कर जघन ठेऊनी उभा ।।२।।
कंसादी मल्ल मारी जरासंघ । ते चरणविंद उभे विटे।।३।।
धर्माघरीं उच्छिष्टपात्र काढी करे । म्हणौनि श्रमें निर्धारिं ठेविलें कटीं कर ।।४।।
पुंडलिक भक्त देखौनि तल्लीन जाला एका जनार्दनीं ठेविला कटीं कर ।।५।।

भावार्थ

अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करुन थकल्यामुळे जगजेठी श्रीकृष्ण कर कटीवर ठेवून उभा आहे. गोकुळजनांवर गोवर्धन पर्वताचे छायाछत्र धरुन सात दिवस उभा राहून थकल्याने हात कंबरेवर ठेवून उभा आहे. कंसाच्या मल्लांचा पराभव करून आणि जरासंघाचा वध करुन जगजेठीचे हे वंदनीय चरण विटेवर उभे ठाकले आहेत.धर्मराजाच्या राजसूय यज्ञात उष्टी पात्रे उचलून श्रमपरिहारा साठी भकतवत्सल श्रीहरी करकटीं ठेवून उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात,भक्त पुंडलिकाला पाहून तल्लीन झालेला श्रीकृष्ण पंढरींत कटीकर ठेवून उभे आहे.


पंढरी महात्म्य

१५३

जेथें वाजविला वेणु शुध्द ।म्हणोनि म्हणतीं वेणुनाद ।।१।।
सकळिक देव आले । तें भांवतीं राहीले ।।२।।
जोडिलें जेथें समपद । तया म्हणती विष्णुपद ।।३।।
भोवताली पदे उमटती । तेथें गोपाळ नाचती ।।४।।
जेथें उभे गाईंचे भार । ते अद्यापि दिसत खूर।।५।।
गोपाळांचीं पदें समग्र । ठाईं शोभत सर्वत्र ।।६।।
एका जनार्दनीं हरी शोभलें । कर कटावरीं ठेऊनि भले ।।७।।

भावार्थ

श्रीहरी जेथे उभा राहून वेणु वाजवित असे त्या स्थळाला वेणुनाद असे म्हणता. जेथें गोपाळ समचरण ठेवून उभे राहिलें,तेथे सकळ देव येऊन सभोवतालीं उभे राहिलें त्याला विष्णुपद म्हणतात. जेथें गाईंचे कळप उभे असून सभोवती गोपाळ नाचतात तेथे अजुनही गाईंचे खूर उमटलेलें दिसतात अशी भक्तांची श्रध्दा आहे. एका जनार्दनीं म्हणतात,पंढरींत दोन्ही कर कटावर ठेवून उभा असलेला पांडुरंग शोभून दिसतो.

१५४

द्वारका समुद्रांत बुडविली। परी पंढरी रक्षिली अद्यापि।।१।।
द्वारकेहूनि बहुत सुख । पंढरिये अधिक एक आहे ।।२।।
भीमातीरीं दिगंबर । करूणाकर. विठ्ठल ।।३ ।।
भक्तांसाठीं निरंतर । एका जनार्दनीं कटीं धरिले कर।।४।।

भावार्थ

द्वापार युगाच्या अंती श्रीकृष्णाने यादव कुळाचा नाश करून द्वारका समुद्रांत बुडविली असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, द्वारकेपेक्षां पंढरीचे सुख अपार आहे म्हणून पंढरीचे रक्षण करून करूणाकर विठ्ठल भीमातीरीं भक्तांसाठी कटीवर कर ठेवून निरंतर उभा आहे.

१५५

जाश्वनीळ सदां ध्याये ध्यानौं । बैसोनि स्मशानीं निवांतपणे ।।१।।
तें हें उघडें रुप विठ्ठल साचार । निगमाचे माहेर पंढरी हे ।।२।।
न बुडे कल्पांती. आहे ते संचले । म्हणोनी म्हणती भले वैकुंठ ।।३।।
एका जनार्दनीं कल्पपचे. निर्धारी । निर्विकल्प पंढरी. उरतसे ।।४।।

भावार्थ

नीळकंठ शिवशंकर स्मशानांत निवांतपणे ध्यानस्थ बसून विठ्ठलाचे पंढरपूरांत उभे ठाकलेले सगुण रुपआठवतात. असे कथन करुन एका जनार्दनीं म्हणतात,पंढरी हे वेदांचे माहेरघर असल्याने ते चारी युगांचे अंती (कल्पांती) देखील बुडणार नाही.म्हणुनच पंढरी पृथ्वीवरील वैकुंठ म्हणून ओळखले जाते.

१५६

जो हा उद्गार प्रसवे ओंकार । तें रुप सुंदर विटेवरी।।२।।
ध्याता ध्यान ध्येय जेथें पैं खुंटलें। तें रुप प्रगटलें पंढरीये।।२।।
ज्ञेय ज्ञाता ज्ञान प्रेमाचे आथिलें । तें रुप सानुलें पंढरिये।।३।।
एका जनार्दनीं रुपाचे रुपस । वैकुंठनिवास पंढरिये ।।४।।

भावार्थ

ज्या परब्रह्म रुपातून ओंकाराचा उगम झाला ते सुंदर रुप पंढरीत प्रगटरुपाने कर कटीवर ठेवून उभे आहे असे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात,त्यां रुपाचे दर्श़न घेत असताना भाविकांचे चित्त त्या रुपाशी एकरुप होऊन जाते आणि पांडुरंग,(ध्येय) ध्यान करणारा भाविक आणि ध्यानाची क्रिया ही त्रिपुटी लयास जाते आणि तो पंढरीनाथ सारी पंढरी व्यापून उभा आहे अशी प्रचिती येते. हे सानुले रुप ज्ञेय,ज्ञाता,ज्ञान हे द्वैत संपवून परमात्म्याच्या भक्तीप्रेमाचा अवीट आनंद देते.

१५७

जाश्वनीळ सदां ध्याये ध्यानीं मनीं । बैसोनि स्मशानीं निवांतपणें ।। १।।
तें हें उघडें रुप विठ्ठल साचार । निगमाचें माहेर पंढरी हे ।।२।।
न बुडे कल्पांती आहे ते संचले। म्हणोनी म्हणती भले. भूवैकुंठ ।।३।।
एका जनार्दनीं कल्पाचें निर्धारी । निर्विकल्प पंढरी उरतसे ।।४।।

भावार्थ

समुद्रमंथनातून निघालेले विष प्राशन केल्याने जे जाश्वनीळ या नावाने ओळखले जातात ते शिवशंकर निवांतपणे स्मशानांत ध्यानस्थ बसून विठ्ठलरुपाचे ध्यान लावतात,त्यां वेदरुपी पांडुरंगाचे पंढरी हे माहेरघर असल्याने ते कल्पांती देखील बुडणार नाही.असा विश्वास व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात,पंढरी हे भुतलावरील वैकुंठ असून कल्पाचे अंती केवळ निर्विकल्प पंढरी उरणार आहे.

१५८

रमा रमेश मस्तकीं हर । पुढें तीर चंद्रभागा ।।१।।
मध्यभागीं पुंडलिक । सुख अलोलिक न वर्णवे ।।२।।
बहुता वैष्णवांचा मेळ । गदारोळ नामाचा ।। ३।।
वामभागीं रुक्मिणी राही । जनार्दन तेथे पाही ।।४।।

भावार्थ

चंद्रभागेच्या तीरावर लक्ष्मीसह विष्णु मध्यभागीं भक्त पुंडलिका समवेत उभे ठाकले आहेत.या पंढरीचे सुख असामान्य असून वर्णंन करणे शब्दातीत आहे.अगणित वैष्णवजन जमले असून नामाचा अखंड जयघोष सुरु आहे.विठ्ठलाच्या डाव्या बाजूला रुक्मिणी विराजित आहे.एका जनार्दनीं हे विलोभनीय दृष्य अवीट गोडीने अवलोकन करतात.

१५९

सारांचें सार गुह्याचें निजगुह्य । तें हें उभें आहे पंढरीये।।१।।
चहूं वाचांपरते वेदां जे आरुतें । तें उभे आहे सरते पंढरीये ।।२।।
शास्त्रांचें निज सार निगमा न. कळे पार । तोचि हा. परात्पर पंढरीये ।।३।।
एका जनार्दनीं भरूनि उरला । तोचि हा देखिला पंढरीये ।।४।।

भावार्थ

विश्र्वातील सर्व चिरंतन तत्वाचे जे आत्मतत्व,गुढरम्य तत्वातील गहन तत्व पांडुरंग रुपाने पंढरींत उभे असून वैखरी,मध्यमा,परा,पश्यंती या चारी वाणी या रुपाचे यथार्थ वर्णन करु शकत नाही.साही शास्त्रांचे सार असून जे वेदांना देखिल अनाकलनीय आहे.एका जनार्दनीं म्हणतात,सर्व विश्व व्यापून जो उरला त्या परात्पर विठ्ठलाचे दर्श़न पंढरींत घडते.

१६०

गाई गोपांसमवेत गोकुळींहून आला । पाहूनि भक्तीं भुलला वैष्णवाला ।।१।।
मुगुटमणी धन्य पुंडलिक निका । तयालागीं देखा उभा गे माय ।।२।।
युगें अठ्ठावीस झालीं परी न बैसे खालीं । मर्यादा धरली प्रेमाची गे माय ।। ३।।
ऐसा व्यापक जगाचा जीवन । एका जनार्दनीं शरण गे माय ।।४।।

भावार्थ

गाई आणि गोपाळांचे सवंगडी यांच्या समवेत गोकुळाहून श्रीहरी पंढरींत आले.भक्तशिरोमणी पुंडलिकाच्या भक्तीला भुलून त्याच्यासाठी विटेवरी कर कटीवर ठेवून निरंतर अठ्ठाविस युगे उभा आहे.एका जनार्दनीं म्हणतात, प्रेम भक्तीचा आदर करणार्या या विश्वव्यापी जगज्जीवन परब्रह्माला शरण जातो.

१६१

जयाकारणें श्रमले भांडती । वेदादिकां न कळे मती ।
वोळला सगुण मूर्ती । पुंडलिका कारणें ।।१।।
धन्य धन्य पावन देखे । पुण्यभूमि पावन सुरेख ।
तया गातां होतसै हर्ष । प्रेमानंदें डुल्लती ।।२ ।।
एका जनार्दनीं. शरण । पाहतां पाहतां वेधलें मन ।
मोक्ष मुक्ति कर जोडून । उभे तिष्ठती सर्वदा ।।३ ।।

भावार्थ

निर्गुण निराकार परमात्मा भक्त पुंडलिकालाच्या भावभक्तीला भुलून सगुण साकार रुप धारण करतो याचे रहस्य जाणून घेण्यासाठी साहीशास्त्रे वादविवाद करून थकून जातात,वेदांची मती कुंठित होते.तो भक्तराज पुंडलिक धन्य होय असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,पंढरीची ही पुण्यपावन भूमी अतिशय सुंदर असून या भूमीचे वर्णन करतांना मन प्रेमानंदाने डोलू लागते. भाविकांना मोक्ष आणि मुक्ती प्रदान करण्यासाठी परमात्मा कर जोडून उभे ठाकले आहेत.

१६२

उदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंडलिकें ।।१।।
धन्य धन्य केला जगाचा उध्दार । नाहीं लहानथोर निवडिले.।।२।।
एका जनार्दनीं. दावियेला तारू। सुखाचा. आगरू. विठ्ठल देव ।।३।।

भावार्थ

भगवंताचे अनेक भाग्यवंत भक्त होवून गेले परंतु पुंडलिक सर्वश्रेष्ठ भक्त मानले जातात कारण पुंडलिकांनी लहान थोर असा भेदाभेद न करता,परब्रह्म परमात्म्याचे विठ्ठलाचे दर्शंन सर्व भक्तांना घडवून जगाचा उध्दार केला.संसार सागर पार करून मोक्षाची प्राप्ती करून देणारा तारु, केवळ सुखाचे आगर असा पांडुरंग नजरेसमोर आणून उभा केला या शब्दांत एका जनार्दनीं आपली कृतज्ञता आदरपूर्वक. व्यक्त करतात.


१६३

पंढरीचें सुख. पुंडलिक जाणें । येर सोय नेणें तेथील पैं ।।१।।
उत्तम हें स्थळ तीर्थ चंद्रभागा । स्नाने पावन. जगा करितसे ।।२।।
मध्यभागीं शोभे पुंडलीक मुनी । पैल ते जघनीं कटीं कर ।।३।।
एका जनार्दनीं विठ्ठल बाळरुप । दरूशनें ताप हरे जगा ।।४।।

भावार्थ

पंढरी हे उत्तम तीर्थक्षेत्र असून चंद्रभागेच्या पाण्याने स्नान करून भक्त पावन होतात. जगातील सर्व लहान थोरांची पापे धुतली जातात पंढरीचे सुख भक्तराज पुंडलिक पुर्णाशाने जाणू शकतो मध्यभागीं पुंडलिक मुनी उभे असून समोर विठ्ठल कमरेवर कर ठेवून सान रुपांत तिष्ठत उभे राहिले आहेत.केवळ दर्शनाने जगाचा संसार ताप हरण करीत आहेत असे एका जनार्दनीं सांगतात.

१६३

वैकुंठीचें वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिके ।।१।।
बहुतांसी लाभ देतां घेतां जाहला । विसावा वोळला. पांडुरंग ।।२।।
योग याग साधनें करिती जयालागीं । तो उभाचि भक्तालागीं तिष्ठतसे ।।३।।
हीन दीन पापी होतुका भलते याती । पाहतां विठ्ठलमूर्ती मुक्त होती ।।४।।
एका जनार्दनीं सुखाचें माहेर । बरवें भीमातीर उत्तम तें ।।५।।

भावार्थ

वैकुंठाचे स्वामी भक्तीप्रेमाने पंढरींत आले आणि भक्तराज पुंडलिकासाठी अठ्ठविस युगे कर कटावर ठेवून विटेवर उभे आहेत असा भाविकांचा विश्वास आहे. पांडुरंग दर्शनाचा लाभ होऊन मोक्षाचा मार्ग सोपा होतो अशी भक्तांची श्रध्दा आहे.पाप,पुण्य, गरीब, श्रीमंत, उच्च-नीचता असा भेदाभेद न मानता सर्वसमावेशक असा हा भागवत धर्म सुखाचे माहेर आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

१६४

तीन अक्षरीं जप पंढरी म्हणे वाचा । कोटी या जन्माचा शीण जाय ।।१।।
युगायुगीं महात्म्य व्यासे कथियेलें । कलियुगींकेलें सोपें पुंडलिकें ।।२।।
महा पापराशी त्यांची होय होळी। विठ्ठलनामें टाळी वाजवितां ।।३।।
एका जनार्दनीं घेतां पै दर्शन । जड जीवा उध्दरण कलियुगीं ।।४।।

भावार्थ

पंढरी या तीन अक्षरी नामाचा जप केला असतां जन्म-मरणाच्या फेर्यातून सुटका होते असा पंढरीचा महिमा महाभारतकार महर्षी व्यासांनी सांगितला आहे.कलियुगांत भक्त पुंडलिकाच्या पुण्याईने हा मार्ग सोपा झाला आहे. विठ्ठल नामाचा टाळी वाजवत गजर केला असतां महा पापराशी लयास जातात असा पंढरीचा महिमा वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, कलियुगांत पांडुरंगाच्या दर्शनाने जड जीवांचा उध्दार होतो.

१६५

अनुपम्य सप्तपुय्रा त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये ।।१।।
अनुपम्य तीर्थ सागरादि असती । अनुपम्य सरती पंढरिये ।।२।।
देव उदंडे असती । अनुपम्य विठ्ठलमूर्ति पंढररिये ।।३।।
अनुपम्य संत वैष्णवांचा. मेळ । अनुपम्य गदारोळ पंढरिये ।।४।।
अनुपम्य शरण एका जनार्दनीं। अनुपम्य चिंतनीं डुल्लतसे ।।५।।


भावार्थ

अयोध्या,मथुरा,माया,काशी,कांची,अवंतिका आणि द्वारका या सात नगरी मोक्षदायिका मानल्या जातात. तसेच कन्याकुमारी सारखी अनेक अनुपम तीर्थक्षेत्रे भारतात आहेत परंतु पंढरीचे तीर्थस्थान सर्वांत वरती आहे.या अध्यात्मिक देशांत अनेक देव देवतांची भव्य दिव्य मंदिरे आहेत पण पंढरीची विठ्ठलमुर्ती अनुपम आहे. आषाढी कार्तिकेला येथे भरणारा वैष्णवांचा मेळावा, हरीनामाचा गदारोळ,काळ- चिपळ्यांचा गजर यांना इतर कशाची उपमा देता येत नाही. असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, हरीचरणांशी शरणागत होऊन या नामगजरांत तल्लीन होऊन जाण्यासारखे दुसरे सुख नाही.

१६६

अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ।।१।।
अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान ।अनुपम्य दान नाम वाचे ।।२।।
अनुपम्य घडे क्षेत्र प्रदक्षिणा । अनुपम्य जाणा नारीनर ।।३।।
अनुपम्य सोहळा नित्य दिवाळी । अनुपम्य. वोवाळी विठोबासी ।।४।।
अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य ध्यानीं एक नाम ।।५।।

भावार्थ

पंढरीचा निवास आणि चंद्रभागेचे स्नान हे केवळ दैवयोगाने लाभणार्या गोष्टी आहेत. या तीर्थक्षेत्राची प्रदक्षिणा विठ्ठलाच्या नामघोषांत तल्लीन होऊन नाचण्यातला आनंद ज्या स्त्री- पुरुषांना मिळतो ते भाग्यवान समजले जातात.आषाढी कार्तिकी एकादशीचा सोहळा म्हणजे वारकर्यांसाठी नित्य आनंदाची दिवाळी असते.त्यांच्या ध्यानीमनीं विठ्ठल मुर्तीशिवाय आणि वाणींत विठ्ठल नामाशिवाय अन्य कांहीच नसते.विठ्ठल चरणांशी अनन्य भक्तीने शरणागत होतात.असे एका जनार्दनीं म्हणतात.

१६७

अनुपम्य पुराणें सांगती सर्वथा । अनुपम्य तत्वतां पंढरिये ।।१।।
अनुपम्य योग. अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरिये ।।२।।
अनुपम्य ध्यान अनुपम्य धारणा ।अनुपम्य पंढरीराणा विटेवरी ।।३।।
अनुपम्य क्षेत्र तीर्थ तें पवित्र । अनुपम्य गोत्र उध्दरती ।।४।।
अनुपम्य शरण एका जनार्दनीं । अनुपम्य. भुवनीं नांदतसे ।।५।।

भावार्थ

पंढरीचे परब्रह्म तत्व केवळ अनुपम असे वर्णन पुराणे करतात. पंढरीत होणारे योग, याग, भक्ती रसातील अनुराग हे कल्पनातीत पुण्यफल देणारे आहेत.विटेवर उभे असलेल्या पांडुरंगाची ध्यान-धारणा अनुपम शांती प्रदान करणारी आहे.पंढरी हे भुतलावरील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र भक्तांच्या संपूर्ण गोत्राचा उद्धार करणारे आहे.असे वर्णन करुन एका जनार्दनीं या पुण्यक्षेत्राला अनन्यभावें शरण जातात.

१६८

अनुपम्य ज्ञान अनुपम्य मतें । अनुपम्य सरतें पंढरिये ।।१।।
अनुपम्य वेद अनुपम्य शास्त्र। अनुपम्य पवित्र पंढरिये ।।२।।
अनुपम्य भक्ति अनुपम्य मुक्ति। अनुपम्य वेदोक्ती पंढरिये।।३।।
अनुपम्य कळा अनुपम्य सोहळा । अनुपम्य जिव्हाळा पंढरिये ।।४।।
अनुपम्य दया अनुपम्य शांती ।अनुपम्य विरक्ती एका जनार्दनीं ।।५।।

भावार्थ

चारी वेद आणि साही शास्त्रे यांच्यातून मिळणार्या प्रगाढ ज्ञानाच्या तुलनेत भेदाभैद न मानता सर्वांना आपुलकीने जवळ करणार्या भागवत धर्माचे ज्ञान अनुपमेय आहे. पंढरींत पहावयास मिळणारी भोळी भाबडी भक्ति,आपपर भाव न ठेवता एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा, विठ्ठलभक्तिचा सोहळा अतुलनीय आनंद देणारा आहे. मनामध्यें दया, शांती, निर्माण करुन, चित्तशुध्दी करुन विरक्तीच्या मार्गाने मुक्ति मिळवून देणार्या पंढरीचा महिमा अनुपमेय असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात.

१६९

पंचक्रोशीचें आंत । पावन तीर्थ हें समस्त ।।१।‌।
धन्य पंढरीचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ।।२।।
तीर्थ क्षेत्र देव । ऐसा नाहीं कोठें ठाव ।। ३।।
नगर प्रदक्षिणा । शरण एका जनार्दनी ।।४।।

भावार्थ

गुरू पदाला शरणागत होऊन एका जनार्दनीं म्हणतात, पैठणच्या जवळपास वसलेले.पंढरपुर हे पावन तीर्थ आहे.वेदमूर्ती पांडुरंग, पुंडलिका सारखा श्रेष्ठ भक्तराज आणि चंद्राकृती भीमेचे पावन तीर्थ हे तिन्ही एका ठिकाणीं एकवटलेले असे हे एकमेव अद्वितीय तीर्थस्थान आहे.

१७०

प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ।।१।।
मुंडन ती काया निराहार. राहणें। येथें न मुंडणें काया कांहीं ।।२।।
म्हणोंनी सर्व तीर्थामाजीं उत्तम ठाव ।एका जनार्दनीं जीव ठसावला ।।३।।

भावार्थ

प्रयाग,वाराणसी, हरिद्वार या सारखी कोट्यावधी तीर्थक्षेत्रे या भूतलावर आहेत.परंतु प्रत्येकांत कांहीतरी उणीव आहे. काशीला जाऊन डोक्यावरील केसांचे मुंडन करावे लागते असा रिवाज आहे तर दुसरीकडे केवळ गंगाजल प्राशन करून निराहार राहावे लागते.पण पंढरीला असे कोणतेही बंधन नाही.केवळ भक्तिप्रेमांत बुडून आनंदाने विठ्ठलाच्या नामघोषांत तल्लीन होऊन नाचणे हे च अपेक्षित असते.म्हणुन एका जनार्दनीं म्हणतात,पंढरी सर्व तीर्थात उत्तम स्थळ असून तेथे जीव अडकून पडतो. पंढरीच्या वारीचे वेध लागतात.

१७१

बहुत तीर्थ क्षेत्रें बहुतापरी। न पावती सरी पंढरीची।।१।।
वाहे दक्षिणभाग भीमा । पैल परमात्मा विटेवरी ।।२।।
मध्य स्थळीं पुंडलिक । दरूशनें देख उध्दार ।।३।।
वाहे तीर्थ चंद्रभागा ।देखतां भंग पातकां ।।४।।
एका जनार्दनीं सार । क्षराक्षर पंढरी हे ।।५।।

भावार्थ

अनेक देवस्थाने,अनेक तीर्थस्थाने आहेत पण त्यांना पंढरीची सर नाही.उजवीकडे अर्धचंद्राकृती भीमेचे पात्र आणि पलिकडे विटेवर उभा असलेला परमात्मा,मध्यभागीं भक्त पुंडलिक. यांच्या दर्शनाने सर्व पातके समूळ नाहीशी होतात. भाविकांचा उध्दार होतो असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,पंढरी हे अविनाशी तीर्थक्षेत्र असून पांडुरंग दर्शन हे जीवनाचे सार आहे.

१७२

उदंड तीर्थे क्षेत्रें पाहतां दिठीं । नाही सृष्टीं तारक ।।१।।
स्नानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ।।२।।
पुंडलिका नमस्कार । सकळ पूर्वजां ऊध्दार ।।३ ।।
पाहतां. राऊळाची. ध्वजा । मुक्ती सहजा. राबती ।।४।।
एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । मग लाभा. नये तुटी ।।५ ।।

भावार्थ

अनेक तीर्थै आणि अनेक क्षेत्रांचे दर्शन घेतले पण पंढरीसारखे चराचर सृष्टीला तारक असे दुसरे क्षेत्र अनुभवास आले नाही. चंद्रभागेचे सामर्थ्य असे कीं, ती केवळ जल-स्नाने मुक्ति प्रदान करते. भक्त पुंडलिकाला साधा नमस्कार केला असतां सकळ पूर्वजांचा उध्दार होतो.पंढरीनाथाच्या मंदिरावरील ध्वजा भाविकांना संसार-तापातून मुक्त करते. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठभेटी पासून केव्हढां लाभ होत असेल याची कल्पना च करतां येणे शक्य नाहीं.

१७३

सकळिक तीर्थे पाहतां डोळां। निवांत नोहे हृदयकमळा।।१।।
पाहतां तीर्थ चंद्रभागा । सकळ दोष गेले भंगा ।।२।।
पाहतां विठ्ठल सांवळा । परब्रह्म डोळां देखियेलें ।। ३।।
एका जनार्दनीं पाहोनि ध्यान । भुललें मन त्या ठायीं ।।४।।

भावार्थ

सकळ तीर्थे पाहून झाली पण अंत:करणाला निवांतपणा लाभला नाही. चंद्रभागा तीर्थ पहातांच सगळ्या दोषांचे निराकरण झाले. सावळ्या विठ्ठलाचे रूपाने प्रत्यक्ष परब्रह्म डोळयांना दिसलें. पांडुरंगाचे ध्यान लागले, मन तेथेच गुंतून गेले. असा दर्शन सुखाचा अनुभव एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.

१७४

अवघें परब्रह्म क्षेत्र । अवघें तेथें तें पवित्र ।।१।।
अवघा पर्वकाळ । अवघे दैवाचे सकळ ।२।।
अवघीयां दु:ख नाहीं। अवघें सुखचि. तया ठायीं ।।३।।
अवघें आनंदभरित । एका जनार्दनीं सदोदित ।।४।।

भावार्थ

पंढरी हे परब्रह्म क्षेत्र असून येथे सदैव पर्वकाळ पर्वणी असून पवित्र वातावरणाने परिसर भरून गेलेला असतो.सगळेच पंढरीवासी अत्यंत भाग्यवान असून येथे दु:खाचा लवलेश नसलेले निरामय सुख नांदते.पंढरीच्या आनंदभरित वातावरणाचे वर्ण़न एका जनार्दनीं या अभंगात करतात.

१७५
नाभीकमळीं जन्मला ब्रह्मा । तया न कळे महिमा ।।१।।
पंढरी क्षेत्र हें जुनाट । भूवैकुंठ साजिरीं ।।२।।
भोळे भाळे येती आधीं । तुटली उपाधी तयांची ।।३।।
एकपणे रिगतां शरण । एका जनार्दनी तुटे बंधन ।।४।।

भावार्थ

श्री भगवान विष्णूंच्या नाभीकमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले परंतू त्यांना देखील या परब्रम्ह परमात्म्याचा महिमा आकलन होत नाही, असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी क्षेत्र पुरातन असून अत्यंत पवित्र असे पृथ्वीवरील दुसरे वैकुंठच आहे. परमार्थाचे विशेष ज्ञान नसलेले पण भोळ्याभाबड्या भक्तीरसांत तल्लीन होऊन विठ्ठलनामाचा गजर करणार्या भाविकांच्या सगळ्या उपाधी तुटून जातात. पंढरीनाथाशी एकरुप होऊन शरणागत झाल्याने जन्म-मरणाची सारी बंधने लयास जातात.

१७६

बहुत काळाचे हें क्षेत्र । सकळ देवांचे माहेर ।
सकळ संतांचे निजमंदीर । तें हें पंढरपूर जाणावें ।।१।।
धन्य पंढरीचा महिमा । नाहीं आणिक. उपमा ।
जेथें वास पुरषोत्तमा । रुक्मिणी सहित सर्वदा ।।२।।
धन्य भक्त पुंडलिक । सकळ संतांचा नायक ।
एका जनार्दनीं देख। श्री विठ्ठल आवडी ।।३।।

भावार्थ

सर्व देवांचे माहेर (विश्रांतीचे स्थान )संतांच्या उपासनेचे मंदीर म्हणुन नावाजलेले पंढरपूर हे पुरातन तीर्थ क्षेत्र आहे. पुरषोत्तम भगवान श्रीकृष्ण येथे माता रुक्मिणी सहित सर्वदा निवास करुन आहेत. सर्व संतांचा शिरोमणी असा भक्त पुंडलिक धन्य आहे. पंढरीला केवळ पंढरीचीच उपमा शोभून दिसते ,अन्य नाही. असे एका जनार्दनीं म्हणतात.

१७७

ज्या सुखा कारणें योगाभ्यास । शरीर दंड काया क्लेश।
तें उभें आहे अपेस । भीमातीरीं वाळुवंटीं ।।१।।
न लगे दंडन मुंडनीं आंटी । योगायोगाची कसवटी ।
मोकळी राहाटी । कुंथाकुंथी नाही येथें ।। २।।
न लगे अष्टांग धूम्रपान । वायु आहार पंचाग्नि साधन ।
नग्न मौन एकांत स्थान आटाआटी न करणें ।।३ ।।
धरूनियां संतसंग। पाहें पाहें पांडुरंग ।
देईल सुख अव्यंग । एका जनार्दनीं निर्धारें ।।४।|

भावार्थ

परब्रह्म परमेशाच्या दर्शनसुखाचा लाभ होण्यासाठी योगी अष्टांग योगाची साधना करतात. देहाला क्लेश देवून उग्र तपश्चर्या करून देह झिजवतात. केवळ वायु भक्षण करुन निराहार पंचांग्नि साधन करतात.एकांत ठिकाणी केवळ वल्कले परिधान करून एका पायावर उभे राहून तप करतात. तो परमात्मा पुंडलिकाच्या प्रेमभक्तिसाठी वैकुठाचा त्याग करून भीमातीरीं वाळवंटी येऊन भक्तिसुखांत दंग होतो. येथे दंडमुंडन ,योग याग , यांचा अट्टाहास नाही. एका जनार्दनीं म्हणतात, केवळ संत- सहवासांत पांडुरंगाच्या दर्शंन सुखाचा लाभ हे च पंढरीचे अमाप वैभव आहे.मोकळे जीवन दर्शन आहे.

१७८

जप तपें तपतां कोटी । होती हिंपुटी भाग्यहीन ।।१।।
तया विश्रांतिसी स्थान । पंढरी जाण भूमंडळीं ।।२।।
योगायोग धूम्रपान करिती । नोहे प्राप्ति तयासी ।।३।।
तो उभा कटीं कर ठेवुनी । समचरणीं विटेवरी ।।४।।
एका जनार्दनीं पाहतां दिठीं । कंदर्प कोटी वोवाळिजे ।।५।।

भावार्थ

अनेक कोटींचा विठ्ठल नामाचा जप करुन, अष्टांग योगाची साधना करुन, यज्ञ, धुम्रपान अशी कडक तपश्चर्या करुनही कांहीं भाग्यहीनांना परमेश्वर प्राप्ति होत नाही.तो परमात्मा पुंडलिकाच्या भक्तीला भुलून विटेवरी कर कटी ठेवून निरंतर समचरणी उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, केवळ एका दर्शनानेच भाविकांची कोटी जन्माची पातके समूळ नाहीशी होतात.

१७९

जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ।।१।।
या ब्रंह्मांडामाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ।।२।।
एक एक पाऊल तत्वतां । घडे अश्वमेध पुण्यता ।।३।।
एका जनार्दना साठी । विठ्ठल उभाचि सरसा ।।४।।

भावार्थ

एका जनार्दनीं म्हणतात, या ब्रह्मांडामध्यें जे स्थान देवांनाही मिळणे कठीण , ते सामान्य माणसाला अत्यंत सुलभ आहे असे तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरी . पंढरीच्या वाटेवरील एक एक पाऊल वारकर्यांना अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळवून देते यांत शंका नाहीं. संतासाठी आणि भक्तांसाठीं विठ्ठल निरंतर समचरणी उभा आहे.

१८०

व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतिति चिंतनीं ।
येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दरुशना ।।१।।
मिळोनि सर्वांचा मेळ । गायी नाचती कल्लोळ ।
विठ्ठल स्नेहाळ। तयालागीं पहाती ।।२।।
करिती भिवरेचे स्नान।पुंडलिका अभिवंदन।
एका जनार्दनीं स्तवन । करिती विठ्ठलाचे।।३।।

भावार्थ

रामायणकर्ते ब्रह्मर्षी वाल्मिक,महाभारतकार व्यासमुनी, नारद मुनी आपल्या चिंतनांत पंढरपुर भुवनीं येऊन विठ्ठल दर्शनाची अभिलाषा करतात. पंढरीला जमलेले वैष्णव आणि गाईंचे कळप वाळवंटी नाचत हरिनामाचा गजर करतात , भक्तिप्रेमांत रंगलेल्या श्रीहरीचे दर्शन घेतात. भिमा नदीत स्नान करतात, भक्त पुंडलिकाला नमस्कार करतात, विठ्ठलाची स्तवने ,संतांचे अभंग गातात. पंढरीच्या वारीचे असे वर्णन संत एकनाथांनी या अभंगात केले आहे.

१८१

देखोनिया देवभक्त । सनकादिक आनंदात ।।१।।
म्हणती जावें पंढरपुरा । पाहूं दीनांचा सोयरा ।।२।।
आनंदें सनकादिक । पाहूं येती तेथें देख ।।३।।
विठ्ठलचरणीं शरण एका जनार्दनीं ।।४।।

भावार्थ

देवभक्तांचा आनंदमेळा अवलोकन करून सनकादिक मुनी हर्षभरित होतात. दीन-दुबळ्या भाविकांचा सखा श्रीहरीला पाहण्यासाठी पंढरीला येतात. पंढरीचा तो सोहळा पाहून विठृठलचरणीं लीन होतात. एका जनार्दनीं विठ्ठलचरणांशी शरणागत होतात.

१८२

देव भक्त एके ठायीं । संतमेळ तया गावीं ।।१।।
तें हें जाणा पंढरपूर । देव उभा विटेवर ।।२।।
भक्त येती लोटांगणीं । देव पुरवी मनोरथ मनीं ।।३।।
धांवे सामोरा तयासी । आलिंगून क्षेम पुसी ।।४।।
ऐशी आवडी मानी मोठी । एका जनार्दनीं घाली मिठी।।५।।

भावार्थ

देव,भक्त आणि संतांचा मेळावा जेथे एका ठिकाणी बघायला मिळतो असे एकमेव क्षेत्र म्हणजे पंढरी हे जाणून घ्यावे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विटेवर उभा असलेल्या देवापुढे नतमस्तक होण्यासाठी भाविक लोटांगणे घालित येतात. देव भक्तांना सामोरे जाऊन प्रेमभराने आलिंगन देतो, त्यांचे क्षेमकुशल विचारतो. भक्तांच्या मनोकामना जाणून त्या पूर्ण करतो. देव भक्तांचे हे प्रेम पाहून आनंदाने मिठी माराविशी वाटते.

१८३

उभारूनी बाह्या पाहतसे वाट। पीतांबर नीट सांवरूनी।।१।।
आलीयासी इच्छा मिळतसे दान । जया जें कारण पाहिजे तें।।२।।
भुक्ति मुक्ति तेथें लोळती अंगणीं । कोण तेथें मनीं वास नाहीं ।।३।।
कामधेनू कल्पतरू चिंतामणी । लोळती अंगणीं पंढरीये ।। ४।।
एका जनार्दनीं महालाभ आहे । जो नित्य न्हाये चंद्रभागे ।।५।।

भावार्थ

भाविकांच्या सर्व कामना पूर्ण करणारे कल्पतरू (सर्व ईच्छा पूर्ण करणारा वृक्ष),ईच्छिले फळ देणारा चिंतामणी , मनाच्या कामना पूर्ण करणारी कामधेनू ज्या पंढरीत सहजसुलभ आहेत तेथे प्रत्यक्ष पांडुरंग पीतांबर सावरून आणि बाहु उभारून ईच्छादान देण्यास उभा आहे. पंढरीस आलेल्या प्रत्येक भक्ताला ,त्याच्या मनाप्रमाणे दान देण्याचा भगवंतांच्या संकल्प आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, चंद्रभागेच्या पात्रात नेहमी स्नान करणार्या भक्तांसाठी हा महालाभ आहे.

१८४

जो परात्पर परेपरता। आदि मध्य अंत नाही पाहतां ।
आगमानिगमां न कळे सर्वथा। तो पंढरिये उभा राहिला।।१।।
धन्य धन्य पांडुरंग । भोवतां शोभें संतसंग ।
धन्य भाग्याचे जे सभाग्य । तेचि पंढरी पाहती ।।२।।
निरा भिवरापुढे वाहे। मध्यें पुंडलिक उभा आहे।
समद्ष्टी चराचरी विठ्ठला पाहे । तेचि भाग्याचे नारीनर ।।३।।
नित्य दिवाळी दसरा । सदा आनंद पंढरपुरा ।
एका जनार्दनीं निर्धार । धन्य भाग्याचे नारीनर ।।४।।

भावार्थ

जो परात्पर परमात्मा वैखरी, मध्यमा, पश्यंती या सह परा वाणीच्या पलिकडे ब्रह्मलोकांत निवास करतो, ज्याचा आदि,मध्य आणि अंत वेदशास्त्रांना आकलन होत नाही तो भक्तिप्रेमाने पंढरींत उभा आहे. संतांच्या मेळाव्यात उभा असलेला पांडुरंग धन्य होय. ज्या भक्तांचे भाग्य थोर त्यांनाच पंढरीचे दर्शन घडते. असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, निरा आणि भीमा नदीच्या प्रवाहासमोर भक्तराज पुंडलिक उभा असून चराचर सृष्टींत भरुन राहिलेल्या विठ्ठलाचे समदृष्टीने अवलोकन करीत आहे. पंढरीत नित्यानंद देणारा दिवाळी दसरा साजरा होतो. येथील रहिवासी भाग्यवान आहेत.

१८५

तया ठायीं अभिमान नुरे । कोड अंतरीचें पुरे ।।१।।
तें हें जाणा पंढरपुर । उभा देव विटेवरी ।।२ ।।
आलिंगनें काया । होतसे तया ठाया ।।३।।
चंद्रभागे स्नान । तेणें पूर्वजा उध्दरण ।।४।।
एका जनार्दनीं शरण । पंढरी भूवैकुंठ जाण।।५।।

भावार्थ

जेथे देहबुध्दी, मनातिल अहंकार लयास जाऊन अंतरीच्या ईच्छा पूर्ण होतात असे तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरी! येथे भक्त पुंडलिकासह सर्व भक्तांना आलिंगन देण्यासाठी देव विटेवरी उभा आहे. चंद्रभागेच्या स्नानाच्या पुण्याईने भक्तांच्या पूर्वजांचा उध्दार होतो. एका जनार्दनीं विठ्ठलचरणी शरणागत होतांना पंढरी हे भुतलावरील वैकुंठ आहे हे जाणून घ्यावे असे सुचवतात.

१८६

पंढरीये अन्नदान । तिळभरीं घडतां जाण ।।१।।
तेणें घडती अश्वमेध । पातकापासोंनी होती शुध्द ।।२।।
अठरा वर्ण याती । भेद नाहीं तेथें जाती ।।३।।
अवघे रंगले चिंतनीं। मुखीं नाम गाती कीर्तनीं ।।४।।
शुध्द अशुध्दाची बाधा ।एका जनार्दनीं नोहे कदा ।।५।।

भावार्थ

पंढरीच्या तीर्थक्षेत्रात तिळाभरा इतक्या अन्नदानाने अश्वमेधाचे पुण्य प्राप्त होते . भाविक पातकांपासून मुक्त होतात. अठरापगड जाती आणि कोणताही वर्णभेद न मानता सर्वजण विठ्ठल चिंतनांत मग्न होतात. मुखाने पांडुरंगाचे नाम घेत कीर्तनांत दंग होतात. एका जनार्दनीं म्हणतात, येथे मनाला शुध्द,अशुध्द, सोवळे,ओवळे या भ्रामक कल्पनांची बाधा होत नाही.

१८७

वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरी दरूशनासी ।
तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवनीं दूजें नाहीत ।।१।।
धन्य क्षेत्र भीवरातीर । पुढें पुंडलिक समोर ।
तेथें स्नान करती नर । तया जन्म नाहीं सर्वथा ।। २।।
करती क्षेत्र प्रदक्षिणा । त्यांच्या पार नाहीं पुण्या ।
जगीं धन्य ते मान्य । एका जनार्दनीं म्हणतसे ।।३।।

भावार्थ

पंढरीचे निवासी नित्यनेमाने हरी दर्शन चा लाभ घेतात त्याच्या सारखे पुण्यवान लोक त्रिभुवनांत शोधून सापडणार नाहीत असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, भीमातीरावरील हे तीर्थक्षेत्र धन्य होय. चंद्रभागेच्या पुण्य जलांत स्नान करणार्या भाविकांची जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते,जे या क्षेत्राला प्रदक्षिणा घालतात त्यांचे पदरी अपार पुण्यराशी पडतात,ते भक्त धन्य होत.

१८८

नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठल दरूशन ।।१।।
त्यांच्या पुण्या नोहे लेखा । पहा दृष्टी पुंडलिका ।।२।।
उजवें घेतां राउळासी । जळती पातकांच्या रासी ।।३।।
संतांसवें कीर्तंन करितां । आनंदे टाळी वाजवितां ।।४ ।।
मोक्ष जोडोनियां हात । तयाची तो वाट पहात ।।५।।
धन्य पंढरीचा संग एका जनार्दनीं अभंग ।।६ ।।

भावार्थ

ज्या भाविकांना नेहमी चंद्रभागाचे स्नान व विठ्ठलाचे दर्शन घडते , भक्त पुंडलिक डोळ्यांना दिसतो त्यांच्या पुण्याला गणती नाही. मंदिराला उजव्या बाजूने प्रदक्षणा घातल्यास पातकांच्या रासी जळून जातात. संतांच्या मेळाव्यात आनंदाने टाळी वाजवून किर्तन करीत असतांना मोक्ष हात जोडून पुढें उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात, पंढरीचा हा सोहळा धन्य होय.

१८९

भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं ।।१।।
प्रात:काळीं नामस्मरण जो गाय । तीर्थी सदा न्हाये पुण्य जोडे ।।२।।
वदतां वाचें नाम घडतां एक स्नान । पुनरपि आगमन मृत्यूलोकीं ।।३।।
एका जनार्दनीं भीमरथीं वदतां । प्रयागीं समता सरी न पवे ।।४।।

भावार्थ

‌‌एका जनार्दनीं म्हणतात,या कलीयुगांत भागीरथी (गंगा) आणि भिमा समान पुण्यदायी आहेत. प्रात:काळीं विठ्ठल नामाचा जप करीत तीर्थात स्नान केले असतां जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होऊन मृत्यूलोकांत आगमन होत नाही. गंगा, यमुना, सरस्वती यांच्या प्रयाग तीर्थांत स्नान केल्याने मिळणारे मोक्षफल प्राप्त होते.

१९०

चंद्र पौर्णमेचा दिसे पां सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंढरिये।।१।।
क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करितां जाय महापाप ।।२।।
सनकसनंदनसम पुंडलीक । शोभा अलोलिक वर्णूं काय ।।३।।
लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही। एका जनार्दनीं पायीं लीन जाला ।।४।।

भावार्थ

पौर्णिमेच्या चंद्राची उपमा पंढरीच्या विठ्ठलाला देऊन एका जनार्दनीं भीमा नदीला क्षीरसिंधुची उपमा देतात. तर भक्त पुंडलिक सनकादिक ऋषीं प्रमाणे थोर आहे असे सांगतात विष्णूपत्नी लक्ष्मी रुक्मिणी च्या रूपांत विराजित आहे. पंढरीची शोभा अलौकिक असून एका जनार्दनीं विठ्ठलचरणीं लीन होतात.

१९१

जयां आहे मुक्ती चाड । तयांसी गोड पंढरी ।।१ ।।
देव तीर्थ क्षेत्र संत । चहूंचा होत मेळा जेथ ।।२।।
कृष्णरामादि नामगजर । करिती उच्चार अट्टाहासे ।।३।।
स्त्रिया आदि नर बाळें । कौतुकलीळे नाचती ।।४।।
एका जनार्दनीं तयासंगीं । विठ्ठलरंगी नाचतुसे ।।५।।

भावार्थ

ज्या भाविकांना मुक्तीची लालसा त्यांना पंढरीचे विशेष आकर्षण आहे कारण देव , भक्त , संत आणि तीर्थक्षेत्र यांचा अद्वितीय मेळ पहावयास मिळतो. स्त्री-पुरुष, लहान थोर नामगजरांत कौतुकाने नाचतात. एका जनार्दनीं या नामघोषांत तल्लीन होऊन नाचतात.

१९२

त्रिविधतापें तापले भारी । तया पंढरी विश्रांती ।।१।।
आणीक सुख नाहीं कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ।।२।।
काळाचेंहि न चले बळ । भूमंडळ पंढरिये ।।३।।
भूवैकुंठ पंढरी देखा । ऐसा लेखा वेदशास्त्री ।।४ ।।
एका जनार्दनीं धरुनि कास । पंढरीचा दास वारकरी ।‌।५।।

भावार्थ

आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या तीन प्रकारच्या तापांनी पोळून निघालेल्या लोकांसाठी पंढरी हे विश्रामधाम असून पंढरीसारखे सुख अनेक जन्म घेऊनही लाभणार नाही. प्रत्यक्ष कळीकाळाचेही सामर्थ्य येथे चालत नाही. पंढरी भूतलावरील वैकुंठ आहे असे वेदशास्त्रात सांगितले आहे. एका जनार्दनीं म्हणतात, असा दृढ विश्वास. धरून वारकरी पंढरीची वारी करतात.

१९३

पतित पातकी खळ दुराचारी । पाहतां पंढरी मोक्ष तयां ।।१।।
स्वमुखें सांगतो आपण । नका अनुमान धरुं कोणी ।।२।।
चंद्रभागा दृष्टीं पाहतां नरनारी । मोक्ष त्यांचे घरीं मुक्तीसहित ।।३।।
चतुष्पाद पक्ष कीटकें अपार । वृक्ष पाषाण निर्धार उध्दरती ।।४।।
एका जनार्दनीं न घ्यावा संशय । दरुशनें जाय पापताप ।।५।।

भावार्थ

दुष्ट प्रवृत्तीने निरपराधी लोकांवर अन्याय करणारे, पाप करणारे पतित,दुष्ट या सर्वांसाठी पंढरी ही मोक्षभूमी आहे. हे आपण स्वमुखाने सांगत असून या विषयीं कोणी संशय घेऊं नये. वृक्ष पाषाण या सारखे अचरांपासून चार पायांचे प्राणी, पक्षी, कीटक यां सारखे चर प्राण्यांपर्यंत सर्वांचा उध्दार पंढरींत होतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठुरायाच्या केवळ दर्शनाने सर्वांचे पापताप विलयास जातात. या विषयीं कोणी संशय धरुं नये.

१९४

राहुनी पंढरिये जाण । जो न घे विठ्ठलदरुशन ।।१।।
महापातकी चांडाळ । त्याचा न व्हावा विटाळ ।।२।।
जिताची भोगी नर्क जो विठ्ठला विन्मुख।।३।।
न करी स्नान चंद्रभागे तो कुष्ठी सर्वागें ।।४।।
नेघे पुंडलिकदरुशन । एका जनार्दनीं तया बंधन ।।५।।

भावार्थ

जो अभक्त पंढरीस राहून विठ्ठलाचे दर्शन घेत नाही तो महापातकी चांडाळ समजावा तो जिवंतपणी नरकयातना भोगतो. भाविक या पातक्याचे दर्शन अभद्र समजतात. जो चंद्रभागेंत स्नान करण्याचे टाळतो त्याच्या सर्वांगावर कोड (कुष्ठरोग) येते. जो पंढरींत भक्त पुंडलिकाचे दर्शन घेत नाही तो संसार बंधनांत अडकतो. असे एका जनार्दनीं म्हणतात.

१९५

पूर्व सुकृताची गांठोडी पदरीं। तरीच पंढरीं वास घडे ।।१।।
कोटी यज्ञफळ भीमरथी पाहतां । मोक्ष सायुज्यता तत्क्षणीं ।।२।।
पृर्थ्वीचें दान असंख्य गोदानें । पुंडलिक दरुशनें न तुळती ।।३।।
एका जनार्दनीं विठ्ठलाचे भेटी । वेरझारा तुटी जन्मोजन्मीं ।।४।।

भावार्थ

अनेक जन्म जन्मांतरीच्या सत्कृत्यांचे पुण्य पदरीं असेल तरच पंढरींत निवास घडतो. कोटी यज्ञांचे पुण्य-फळाने चंद्रभागेचे स्नान घडते, त्याच क्षणीं सायुज्यता मुक्ती लाभते. असंख्य गाईंचे दान किंवा भूदानाने मिळणार्या पुण्याची तुलना पुंडलिक दर्शनाने मिळणार्या पुण्यराशींशी होऊ शकत नाही. असे खात्रीपूर्वक सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलाच्या भेटीने जन्ममृत्युच्या चक्रातून कायमची सुटका होते.

१९६

अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वार्ता न ये मना ।।१।।
सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथें उभा पाहे पांडुरंग ।।२।।
आटणी दाटणी मुंडणी सर्वथा । नाहीं पै तत्वतां यया तीर्था ।।३।।
करावें तें स्नान पुंडलिके वंदन । देखावे चरण विठोबाचे ।।४।।
जनार्दनाचा एका पंढरी सांडुनी । न जाय अवनीं कवण तीर्थीं ।।५।।

भावार्थ

पंढरी हे भुतलावरील चिरंतन टिकणारे शाश्वत क्षेत्र असून अद्वितीय आहे. येथे पांडुरंग भक्तांची वाट पहात उभा आहे. इतर क्षेत्रीं विधी-निषेधांची बंधन आहेत. पंढरींत केवळ भोळ्या भाबड्या मनाचा भक्तिभाव पुरेसा आहे. तीर्थांत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घ्यावें आणि विठोबाच्या चरणी नतमस्तक व्हावे . एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी सोडून पृथ्वीवरील कोणत्याही तीर्थक्षेत्रीं जाण्याची ओढ वाटत नाही.

१९७

भाविकांसी नित्य नवें हे सोपारें । पंढरी उच्चार करितां वाचें ।।१।।
हो कां अनामिक अथवा शुध्द वर्ण । ज्ञातीसी कारण नाहीं देवा ।।२।।
एका जनार्दनीं भलती ज्ञाती असो। परी पांडुरंग वसो हृदयामाजीं ।।३।।

भावार्थ

भाविकाचे नाव, गांव, जातपात,वर्ण कोणताही असो पवित्र तीर्थक्षेत्र पंढरी या नामाच्या वाचेने केलेला उच्चार देवाला पोचतो.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, अंतकरणात वसत असलेला पांडुरंग आणि शुद्ध,सात्विक भक्तिभाव देवाला प्रिय आहे.

१९८

सप्तपुर्यांमाजीं पंढरी पावन । नामघोष जाण वैष्णव करिती ।।१।।
देव तो विठ्ठल देव तो विठ्ठल । आहे सोपा बोल वाचें म्हणतां ।।२।।
आणिक कांहीं नको यापरतें साधन । विठ्ठल निधान. टाकूनियां ।।३।।
एका जनार्दनीं विठ्ठलावांचुनी । आण नेणें दुजें कांहीं ।।४।।

भावार्थ

मथुरा, मायावती, वाराणसी ,कांची , अवंतिका, अयोध्या, आणि द्वारका या सात नगरी मोक्षदायिका मानल्या जातात. यापेक्षां पंढरी पावन नगरी आहे हे जाणून वैष्णव पंढरीचा नित्य नामघोष करतात. पंढरीचा विठ्ठल केवळ वाचेने नाम घेताच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. या शिवाय वेगळी कांहीं साधना करावी लागत नाही. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलावाचुन अन्य दैवत नाही.

१९९

तयाचे संगतीं अपार । विश्रांती घर पंढरी ।।१।।
म्हणोनि वारकरी भावें । जाती हावे पंढरीसी ।।२।।
योगयागीं जो न संपडे । तो पुंडलिका पुढें उभा असें ।।३।।
शोभे चंद्रभागा उत्तम। धन्य जन्म जाती तेथें।।४।।
घेऊनि आवडी माळ बुका । वाहती फुका विठ्ठला ।।५।।
एका जनार्दनीं भावें। हेंचि मागणें मज द्यावें ।।६।।

भावार्थ

पंढरी हे तीर्थक्षेत्र संताचे माहेर मानले जाते. अनेक वारकरी संतांच्या संगतीने भक्तिभावाने पंढरीची वारी करतात. अष्टांगयोग आणि यज्ञयाग करुनही जो परमात्मा प्राप्त होत नाही तो पंढरीत भक्त पुंडलिका साठी उभा आहे. तेथील चंद्रभागेच्या प्रवाहाची शोभा रमणीय आहे. जे भाविक पंढरीस जातात त्यांचा जन्म धन्य होय.हे भक्त अत्यंत आनंदाने फुलांची माळ व बुका देवाला अर्पण करतात. असे वर्णन करून एका जनार्दनीं गुरुचरणीं विनंती करतात कीं,आपणास हे भाग्य लाभावे.

२००

घडती पुण्याचिया रासी । जे पंढरीसी जाती नेमें ।।१।।
घडतां चंद्रभागे स्नान । आणि दरूशन पुंडलिक ।।२।।
पाहतां विटेवरी जगदीश । पुराणपुरूष व्यापक ।।३।।
वारकरी गायी सदा । प्रेमे गौविंदा आळविती ।। ४ ।।
तया स्थळीं मज ठेवा. । आठवा जनीं जनार्दन ।।५।।
शरण एका जनार्दन । करा माझी आठवण ।।६।।

भावार्थ

जे भाविक नित्यनेमाने पंढरीची वारी करतात त्यांच्या पुण्याचा राशींनी संचय होतो . या भाविकांना चंद्रभागेचे स्नान घडते, भक्त पुंडलिकाचे दर्शन घडते. चराचरात व्यापलेल्या पुराणपुरुष जगदीशाचे ध्यान याच देही याचडोळां बघावयास मिळतें. वारकरी सतत विठुनामाचा घोष करुन देवाला आळवतात . त्यां पवित्र स्थळीं निवास लाभावा अशी इच्छा व्यक्त करुन एका जनार्दनीं सद्गुरु जनार्दन स्वामींना शरण जातात.

२०१

पंढरीस ज्याचा नेम । तो न करी अन्य कर्म ।।१।।
सांडूनियां विठ्ठल राजा । आणिक देव नाहीं दुजा ।।२।।
सांडूनियां चंद्रभागा । कोण जाय आणिके गंगा ।।३।।
सांडूनियां पुंडलिका । कोण आहे आणीक सखा ।।४।।
सांडोनियां वेणूनाद । कोण आहे थोर पद ।।५।।
एका जनार्दनीं भाव।अवघा विठ्ठलचि देव ।।६।।

भावार्थ

जो पंढरीची नेमाने वारी करतो त्या भक्ताला अन्य साधनेची गरज नसते. विठ्ठला सारखा परम देव दुसरा नाही. चंद्रभागे सारखी पवित्र गंगा नाही. पुंडलिका सारखा दुसरा सखा नाही. वेणूनादा सारखा अन्य नाद नाही. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, मन भक्तिभावाने भरलेलें असेल तर सारे देव विठ्ठच आहेत.एकाच विठोबाची सारी रुपे आहेत.

२०२

देव वसे पंढरीसी ।येती सनकादिक ऋषीं ।
वंदोनी पुंडलिकासी । चरण वंदिती विठ्ठलाचे ।।१।।
करिती कीर्तन गजर । नाना वाद्यें परिकर ।
नाचती निर्धार । बाळें भोळे आवडी ।।२।।
दिंडी जागरण एकादशी । क्षीरापती द्वादशी करिताती आवडीसी ।
भक्त मिळोनी सकळ ।।३।।
मिळताना क्षीरापती शेष तेणें सुख सुरवरास ।
एका जनार्दनीं दास ।वैष्णवांचा निर्धारें ।। ४।।

भावार्थ

पांडुरंग पंढरीत वसत असल्याने सनकादिक ऋषीं पंढरीस येतात,भक्त पुंडलिकाला नमस्कार करून विठ्ठलाचे चरण- वंदन करून कीर्तनरंगी रंगून जातात. नाना वाद्यांच्या गजरांत आनंदाने नाचतात. एकादशीला दिंडी निघते. रात्रीचे जागरण करतात. द्वादशीला आवडीनें दुधाच्या खीरीचा नैवेद्य दाखवला जातो खीरीच्या शेष भागाने देवदेवताप्रसन्न होतात. एका जनार्दनीं म्हणतात, स्वर्गीच्या या देवदेवता वैष्णवांच्या दास बनतात.

२०३

पंढरीये पांडुरंग । भोवतां संग संतांचा।।१।।
चंद्रभागा वाळुवंट । आहे देव नीट उभा ।।२।।
पुंडलिक वेणुनाद । होतो आनंद अखंड ।।३।।
पद्मतळें गोपाळपूर । संत भार आहे तेथें ।।४।।
वैष्णवांचा गजर मोठा । आषाढी चोहटा नाचती ।।५।।
जाऊं तैथें लोटांगणी । फिटेल आयणी गर्भवास ।।६।।
भाळे भोळे येती भक्त । आनंदें नाचत वाळुवंटीं ।।७।।
लोटांगणीं. घालूं चरणीं । शरण एका जनार्दनीं ।।८।।

भावार्थ

पांडुरंग पंढरीत समचरणी उभा आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात संतांचा मेळा वेणुनादांत तल्लीन होऊन नाचत आहेत. गोपाळपूर , पद्मतळे येथे संतासवे भक्तांची अपार गर्दी असून वैष्णव नामघोषाच्या मोठ्या गजरांत नाचतात.एकमेकांना आलिंगन देवून लोटांगणे घालतात. एका जनार्दनीं या सर्व भक्तांच्या आणि सतांच्या चरणीं शरणागत होतात.

२०४

हरीचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ।।१।।
येती नेमें पंढरीसी । दरूशन घेती विठ्ठलासी ।।२।।
करिती चंद्रभागे स्नान । पूर्वजा उध्दरतीं जाण ।।३।।
करिती गोपाळकाला । गोपाळपुरी मिळोनि मेळा ।।४।।
ऐसा जया घडे नेम । एका जनार्दनीं निष्काम ।।५।।

भावार्थ

हरीचे दास पंढरीस नित्यनेमाने येऊन विठ्ठलाचे दर्श़न घेतात. चंद्रभागेचे स्नान करुन लाभलेल्या पुण्यफलाने पूर्वजांचा उध्दार होतो. गोपाळपुरीं एकत्र जमून गोपाळकाला करतात. असा नेम ज्यांना घडतो ते भक्त निष्काम कर्मयोगी आहेत असे एका जनार्दनीं म्हणतात.

२०५

तुम्ही पंढरिये जातां । तरी मी पायां लागेन आतां ।
चरणरजें जाली साम्यतां । तुमचे पाऊल माझे माथां ।।१।।
तेथें जेथें पाऊल बैसे । एका एकपणेंविण असे ।।ध्रृ०।।
पंढरीचे वाटे । पसरिलें ते मीं गोटे ।
पाया लागेन अवचटे । तें सुख आहे न मज मोठें ।।२।।
जेथें पाउलांचा माग । तेथें माझें अखंड अंग ।
चरणरज आम्हां भोग । काय करशील वैकुंठ चांग ।।३।।
संत भेटतील वाडेकोडें । तरी मी आहे पायांपुढें ।
हे हि आठवण. न घडे । तरी मी वाळवंटींचे खडे ।।४।।
यात्रा दाटेल घसणीं । लागेन अवचितां चरणीं।
एका जनार्दनीं कीर्तनीं । आठवा आसनी शयनीं ।।५।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं पंढरीच्या वारकर्यांना विनंती करीत आहेत. विठ्ठलाच्या भक्तांच्या पायावर डोके टेकवून त्यांची चरणधूल मस्तकी धारण करतात. पंढरीच्या वाटेवरील गोटे बनून भक्तांच्या चरण-स्पर्शाचे सुख लाभावे अशी ईच्छा व्यक्त करुन एका जनार्दनी म्हणतात, भक्तांचे चरणरज हे आनंदाचे भोग असून वैकुंठीचे सुख सुध्दा त्यां पेक्षा कमी च आहे. संतांच्या भेटीसाठी चंद्रभागेच्या वाळवंटीचे खडे बनून संतांच्या चरणी लीन होण्याची कामना करतात. संताची बसतां ,उठतां कीर्तन करतांना, विश्रांती घेतांना नित्य आठवण करतात.

२०६

मूर्ति अनुपम्य विटेवरी साजिरी । पाऊलें गोजिरीं कोंवळी तीं ।।१।।
तेथें माझें मन वेडावलें भारी । परत माघारीं परतेना ।।२।।
वेधलासे जीव सुखा नाही पार । माहेरा माहेर पंढरी लेखा ।।३।।
एका जनार्दनीं सुखाची वसती । भाविका विश्रांति पंढरीराव ।।४।।

भावार्थ

पंढरीला विटेवरील अनुपम सुंदर मूर्ति, गोजिरे, कोमल समचरण पाहून वेडावलेंले मन माघारीं परतेना . मन वेधून घेणार्या ते दर्श़न सुख अपार आनंददायी अनुभव आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी ही सुखाचे, विश्रांतीचे वसतीस्थान आहे पंढरी हे संताचे माहेर असून भाविकांचे विश्रांती स्थान आहे म्हणजे वारकर्यांसाठी पंढरी माहेराचे माहेर आहे .

२०७

आशा धरूनी आलों येथवरीं । पाहतां पंढरी पावन झालों ।।१।।
आलीया जन्माचें सुफळ झालें काज । दृष्टी गरूडध्वज पाहतांचि ।।२।।
एका जनार्दनीं पावलों विश्रांती । पाहतां विठ्ठलमूर्ती भीमातटीं ।।३।।

भावार्थ

सर्व पापांचे परिमार्जन व्हावे या अपेक्षेने पंढरीस आलो आणि पावन झालो. मंदीरावरील गरूडध्वज पाहताच मानवी जन्माचे सार्थक झाले.भीमेच्या तीरावरील पांडुरंगाची मूर्ती पाहून सर्व श्रमाचा परिहार होऊन मन विश्रांत. झाले. असा पंढरीचा महिमा या अभंगात एका जनार्दनीं वर्णन करतात.

२०८

ऐसे संतभार ऐसें भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा कोठें ।।१।।
समुद्रवलयांकित तीर्थे असतीं पावन ।परी ऐसें महिमान नाहीं कोठें ।।२।।
ऐसा नामघोष आनंद सोहळा । न देखे आणिके स्थळां माझे नेत्रीं ।।३।।
एका जनार्दनीं पंढरीवाचुनी । आनंद माझे मनीं नाही कोठें।।४।।

भावार्थ

सागरतीरावरील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे या भरत खंडांत आहेत. परंतू भीमातीरी जमणारा असा संतमेळावा, विठ्ठ नामाचा असा जयघोष, असा आनंदसोहळा इतर क्षेत्रीं पहावयास मिळत नाही. असा पंढरीचा. महिमा एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.

२०९

सारूनी दृष्य देखतां जालीसे ऐक्यता । पाहे कृष्णनाथा पंढरिये।।१।।
कर ठेउनी कटीं बुंथी वाळुवंटीं । वैजयंती कंठीं आती माझी ।।२।।
एका जनार्दनीं शरण त्याची कृपा पूर्ण । पाहतां पाहतां मन. हारपलें ।।३।।

भावार्थ

सभोवतालचे सारे दृष्य विश्र्व बाजूला सारून भीमेच्या वाळवंटी कर कटीवर ठेवून उभा असलेला, कंठी वैजयंती माळ परिधान केलेला कृष्णनाथ पाहिला आणि त्याच्याशी मन एकरुप झाले. मनाचे मनपण हरपून गेले. पूर्ण कृपा झाली. असा विलक्षण अनुभव या अभंगात एका जनार्दनीं सांगतात.

२१०

देव भक्त उभे दोन्ही एके ठायीं । चला जाऊं पायीं तया गावा ।।१।।
आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चरितां वाचा विठ्ठल नाम ।।२।।
करूनियां स्नान पुंडलिकाची भेटी । नाचूं वाळवंटीं वाहूं टाळी ।।३।।
जाऊं महाद्वारीं पाहूं तो सांवळा । वोवाळूं गोपाळा निंबलोण ।।४।।
एका जनार्दनीं मनोरथ पुरे। वासना न नुरे मागे कांहीं ।।५।।

भावार्थ

देव आणि भक्त जेथें एके ठिकाणी उभे आहेत त्या पंढरीला पायीं चालत जावे, चंद्रभागेत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घ्यावें, महाद्वारी उभ्या असलेल्या सांवळ्या श्रीकृष्णाला निंबलोण उतरावे. विठ्ठल नामाचा गजर करुन वाळवंटी नाचावे. विठ्ठलाच्या नामाचा वाचेने उच्चार करतांच मनीचे सर्व हेतू पूर्ण होतील. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन कोणतिही वासना उरणार नाही.

२११

निंबलोण करूं पंढरीच्या सुखा । आणि पुंडलिका भक्तराया ।।१।।
परलोकींचे येती परतोनी मागुती । सर्व सुख येथें पहावया ।।२।।
अष्ट महासिध्दी जयाचिये द्वारीं । होऊनि कामारी वोळंगती ।।३।।
मुक्तिपद देतां न घे फुकासाठी । ते हिंडे वाळुवंटी दीनरूप ।।४।।
एका जनार्दनीं करी निंबलोण । विटेसहित चरण ओवाळावें ।।५।।

भावार्थ

पंढरीचे सुख,भक्तराज पुंडलिक यांना कुणाची नजर लागू नये म्हणून त्यांच्या वरुन लिंबू ओवाळून टाकावे. परलोकीचे देवदेवता हे सुख पहाण्यासाठीं पंढरीला येतात.अष्ट महासिध्दी पंढरीच्या महाद्वारीं लोळण घेतात.विठ्ठलभक्तांना पंढरीच्या सुखापुढे मुक्तीच्या वरदानाची चाड नाही. मोक्ष-मुक्ती चंद्रभागेच्या वाळवंटात दीनरुप होऊन हिंडतात.असे सांगून एका जनार्दनीं विठ्ठलाचे विटेसहित चरण ओवाळून लिंबलोण करतात.

२१२

दक्षिण द्वारका पंढरी । शोभतसे भीमातीरीं ।।१।।
चला जाऊं तयां ठायां । वंदूं संतांचिया पायां ।।२।।
नाचूं हरूषे वाळुवंटीं । पुंडलिक पाहुनी दृष्टीं ।।३।।
पद्मतळें पाहतां डोळां। सुखसोहळा आनंद ।।४।।
एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । लाभे लाभ दुणावें पोटीं ।।५ ।।

भावार्थ

भीमातीरी वसलेली अत्यंत शोभायमान पंढरीं नगरी दक्षिण द्वारका म्हणून ओळखली जाते.तेथें जाऊन संतांचे चरण वंदावे, भक्त पुंडलिकाला पाहून आनंदाने नाचावे.अशी ईच्छा व्यक्त करुन एका जनार्दनीं म्हणतात,पद्मतळें पाहताना सूखसोहळा पाहिल्याचा आनंद मिळतो.विठ्ठल दर्शनाने हा आनंद द्विगुणित होऊन पोटांत मावेनासा होतो.

२१३

आम्ही मागतो फुकाचें । तुम्हां देतां काय वेंचे ।।१।।
संतसंग देई देवा । दुजा नको कांहीं गोवा ।।२।।
पंढरीसी ठाव द्यावा । हेंचि मागतसें देवा ।।३।।
एका जनार्दनीं मागत। तेवढा पुरवी मनींचा हेत ।।४।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं संतसंग द्यावा आणि पंढरीत निवासासाठी ठिकाण द्यावे अशी मागणी पांडुरंगाच्या चरणी शरणागत भावाने करीत आहेत.ही मागणी अत्यंत अल्पमोलाची असून ती पुरवण्यात कांही मोल खर्च करावे लागणार नाही तरी विठुरायाने मनीचा हा हट्ट पुरवावा असे ते आर्ततेने सांगतात.

२१४

तुमचे देणे तुमचे देणें । नको वैकुंठ हें पेणे ।।१।।
नानामतें मतांतर । अंतर गोवूं नये तेथ ।।२।।
पेणें ठेवा पंढरीसी । अहर्निशीं नाम गाऊं ।।३।।
भाळे भोळे येती संत । बोलूं मात तयांसी ।।४।।
चरणवंदीन साचें । एका जनार्दनीं म्हणे त्यांचे ।।५।।

भावार्थ

श्रीहरीचे निवासस्थान वैकुंठ असून ते आवडत्या भक्तांना वैकुंठनिवास देवून सायुज्यमुक्ती प्रदान करतात.वैकुंठात नाना मते आणि मतभिन्नता आढळते.भोळ्या भाबड्या भक्तांची एकनिष्ठ भगवद् भक्ती वैकुंठात नाही, तेथे मन गुंतून पडत नाही.असे मत व्यक्त करुन एका जनार्दनीं म्हणतात,श्रीहरीने पंढरीस निवास केल्यास अखंड नामजप, संतांचे चरणवंदन आणि हितगुज होईल.

२१५

पाहतां विश्राम सुखवस्ती धाम । पंढरीं पुण्यग्राम भूमीवरी ।।१।।
जावया उद्वेग धरिला माझ्या मनें । उदंड शहाणें तये ठायीं ।।२।।
एका जनार्दनीं मानिला विश्वास। नाहीं दुजी आस पायांविण ।।३।।

भावार्थ

पंढरी ही सुखाची वस्ती असून मनाचे विश्रांती स्थान आहे.भुतलावरील पुण्यक्षेत्र असून अनेक शास्त्री, पंडित ,संत पंढरींत निवास करतात.या वचनांवर विश्वास ठेवून पंढरीस जाण्याचा हट्ट घेतला,असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पांडुरंगाच्या चरणांशिवाय मनाला कोणतिही आस नाही.

२१६

येणें पुरतें सर्व काज । विश्वास हा जाहला मज ।
सांपडलें तें निज । बहुकाळाचें ठेवणें ।।१।।
केला पुंडलिकें उपकार । दाविला सोपा मार्ग निर्धार ।
जडजीवां उध्दार । नाममात्रे एकाची ।।२।।
तुटलीं बंधने । मागा पाहा अनुभवणें एका
जनार्दनीं म्हणे । धन्य वास पंढरिये ।।३।।

भावार्थ

भक्त पुंडलिकाने सर्व भक्तांना भगवंत भक्तिचा सोपा मार्ग दाखवला. विठ्ठलाच्या नामाचा जप करून जड जीवांचा उध्दार होतो, जन्म-मरणाची बंधने तुटून जातात. हे पटवून देऊन भाविकांवर मोठे उपकार केले आहेत.पंढरीत बहुकाळाचा ठेवा सापडला, जीवनाचे सार्थक झाले, असा विश्वास निर्माण झाला. पांडुरंगाचे दर्शन घ्यावें, मनातिल ईच्छा सांगावी आणि मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव घ्यावा असे एका जनार्दनीं म्हणतात.

२१७

आशा धरुनि आलों येथवरी
पाहतां पंढरी पावन झालों।।१।।
आलीया जन्माचें सुफळ झालें काज ।
दृष्टी गरूडध्वज पहातांचि ।।२।।
एका जनार्दनीं पावलों विश्रांती।
पाहतां विठ्ठलमूर्ती भीमातटीं ।।३।।

भावार्थ

पंढरींत विठ्ठल मंदिरावरील गरूडध्वज पाहतांच आशा धरुन पंढरीला आल्याने पावन झालो, जन्म सुफळ झाल्याचे समाधान वाटले. भीमा तटावरील पांडुरंगाची मूर्ती पाहून मनाला अपूर्व शांतीचा अनुभव आला असे एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.

२१८

श्रीमुखाचें सुख पाहतां पाहतां ।
नयन तत्वतां वेधलें माझें ।।१।।
सांवळा सुंदर कटीं ठेवुनी कर ।
रूप तें नागर भीमातीरीं ।।२।।
नित्य परमानंद आनंद सोहळा ।
सनकादिक या स्थळां येती जाती ।।३।।
वैष्णवांचा थाट टाळ घोळ नाद ।
दिंड्या मकरंद हर्ष बहु ।।‌४।।
सन्मुख ती भीमा वाहे अमृतमय नीर ।
जडजीवां उध्दार स्नानमात्रें ।।५।।
एका जनार्दनीं मुक्तीचें माहेर ।
क्षेत्र तें साचार पंढरपूर ।।६।।

भावार्थ

पंढरपूर या धार्मिक क्षेत्राचे वर्णंन करतांना.एका जनार्दनीं म्हणतात,भीमा तटावरील सावळ्या सुंदर हरीचे श्रीमुख पाहतांना डोळे तेथे खिळून राहातात.परमानंदाचा अनुभव येतो. पंढरीचा नित्य आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी सनकादिक ऋषी या क्षेत्रीं येतात.वैष्णवांचा मेळा टाळांच्या निनादांत विठ्ठलनामाचा जयघोष करतात.दिंड्या पताकांची शोभा रमणीय असते.भीमेच्या अमृतमय प्रवाहात स्नान करून जडजीवांचा उध्दार होतो.पंढरपूर हे मुक्तिचे माहेरघर आहे.

२१९

जन्मासी येऊनि पहा रे पंढरी ।
विठ्ठल भीमातीरीं उभा असे ।।१।।
ठेविले चरण दोन्ही विटेवरी ।
आलियांसी तारी दरूशनें औएका ।।२।।
पंचक्रोशी प्राणी पुनीत पैं सदा ।
ऐशी ही मर्यादा पंढरीची ।३।।
एका जनार्दनीं कीर्तनगजर ।
ऐकतां उध्दार सर्व जीवा ।।४।।

भावार्थ

भीमातीरावर सम चरण विटेवर ठेवून उभा असलेला परमात्मा पांडुरंग केवळ दर्शनाने भाविकांना संसार सागरातून तारुन नेतो. पंढरीच्या पंचक्रोशीचे सर्व भक्त पावन होतात असे या तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगितले आहे. एका जनार्दनीं म्हणतात,पंढरीतील कीर्तनाचा गजर श्रवण केला तरी जीवांचा उध्दार होतो.

२२०

निर्धारितां सुख पंढरीसी आहे ।
म्हणोनि उभारिती बाह्या वेदशास्त्रें ।।१।।
साधन पसारा न करी सैरावैरा ।
जाय तूं निर्धारा पंढरिये ।।२।।
एका जनार्दनीं धरुन विश्वास ।
विठोबाचा दास होय वेगें ।।३।।

भावार्थ

वेदशास्त्रे दोन्ही हात उभारून घोषणा करतात की, भावभक्ती आणि श्रध्देने मिळणारे अमाप सुख पंढरींत आहे.कोणत्याही वैदिक उपचारांचे स्तोम पंढरींत नाही.केवळ भागवत धर्मावर विश्वास ठेवून विठोबाचा अनन्य भक्त व्हावे असे एका जनार्दनीं या अभंगातून सुचवतात.

२२१

स्वहित हित विचारीं मानसीं । कां रे नागविसी देहासी या।।१।।
सावधान होई पाहे बा पंढरी । धरीं तूं अंतरीं संतसंग ।।२।।
नको पडूं फेरी चौर्यांयशी आवृत्ती । गाय तूं कीर्ती वैषणवांची ।।३।।
तरले बहुत तरती भरंवसा । विश्वास हा बापा धरीं ऐसा ।।४।।
सुगम सोपा चुकती तेणें खेपा । एका जनार्दनीं जपा विठ्ठलनाम ।।५।।

भावार्थ

मनांत स्वहिताचा विचार करुन देहाला क्लेश न देतां सावधान होऊन,संतसंगतीची ईच्छा चित्तात धारण करुन पंढरीची वाट धरावी. वैष्णवांचे गुणगान करुन त्यांची किर्ति वाढवावी.संतसंगतीने अनेक भक्त मोक्षपदास पोचले याचा विश्वास धरुन विठ्ठल भक्तीचा सोपा सुगम मार्ग स्विकारावा.असा उपदेश करून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलनामाच्या जपाने चौर्यांशी लक्ष योनीच्या फेर्यातून सुटका होते.

२२२

करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट ।
पुंडलिकाची पेठ । सोपी आहे सर्वांसी ।।१।।
नाहीं कोठें गोवा गुंती । दुजा नको रे सांगाती ।
एक चित्तवृत्ति । दृढ करी मानसीं ।।२।।
नको माझें आणि तुझें । टाकी परतें कीं रे वोझैं ।
संतचरण रज । सेवीं कां रे आदरें ।।३।।
तुटतीं भक्तीजाळ गुंती। सहज होतसे विरक्ति ।
एका जनार्दनीं प्रीती । धरा संतचरणीं ।।४।।

भावार्थ

पंढरी ही भक्त पुंडलिकाची पेठ सर्वांसाठीं अत्यंत सुगम,सोपी आहे.येथें जातांना कोणी सांगाती, सखासोबती यांची गरज नाहीं.मनाचा पूर्ण निश्चय करुन,सगळ्या चित्तवृत्ती दृढ करुन आणि मी तूं पणाचे ओझे बाजूला सारून संतचरणांची माती आदराने मस्तकीं धारण करावी. त्या मुळे संसारातिल गुंता सुटून सहज विरक्ती येते.असे एका जनार्दनीं म्हणतात.

२२३

श्री पांडुरंगाचें दरूशन । वास पंढरीसी जाण ।
कोटी यागांचे पुण्य । तया घडे नित्याची ।।१।।
हाचि माना रे विश्वास । धरा संतचरणीं निजध्यास ।
मोक्षाचा सायास । न लगे कांहीं अणुमात्र ।।२।।
न रिघा तयांचे हव्यासें । साधनाचे नको फांसे ।
कीर्तन सौरसें । प्रेमें नाचा रंगणीं ।।३।।
नका माझें आणि तुझें । टाका परतें उतरूनी वोझें ।
एका जनार्दनीं सहजे। विठ्ठलनामें मुक्त व्हां ।।४।।

भावार्थ

पंढरीचा निवास आणि पांडुरंगाचे दर्शन या मुळे कोटी यागांचे पुण्य लाभते असा विश्वास धरुन संतसहवासाचा ध्यास धरल्यास मोक्ष मिळवण्यासाठी वेगळे सायास करण्याची गरज नाही. मोक्षमुक्तीचा हव्यास धरुन योग याग तप यांच्या फासांत गुंतून जाण्यापेक्षां मी तूं पणाचे ओझे फेकून कीर्तनरंगी रंगून भक्तीप्रेमाने विठ्ठलनामाच्या गजरांत आनंदाने नाचावें आणि मुक्त व्हावे असे एका जनार्दनीं सांगतात.

२२४

देशविरहीत काळासी अतीत । ते देवभक्त पंढरिये ।१।।
जाऊनियां कोणी पहा । देवाधिदेवा विठोबासी ।।२।।
जन्ममरणाचे तुटतील फांसे। पाहतां उल्हासें देवभक्तां ।।३।।
एका जनार्दनीं विटेवरी निधान । लेवुनी अंजन उघडे पहा हो ।।४।।

भावार्थ

देश कालाच्या मर्यादा ज्यांना नाहीत असे देव-भक्त पंढरीत उभे आहेत.देवाधिदेव विठोबा कोणीही पाहूं शकतो.उल्हसित अंत;करणाने दर्श़न घेतल्यास जन्ममरणाची बंधने तुटून पडतात. प्रेमभक्तीचे अंजन घालून विटेवरील पांडुरंग रुपी निधान डोळ्यांत साठवावें असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

२२५

भाव धरूनी शरण येती । तयां मोक्ष सायुज्यप्राप्ती ।
ऐसी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर ।।१।।
म्हणोनी न करा आळस । सुखे जा रे पंढरीस ।
प्रेम कीर्तनाचा रस । सुखें आदरें सेविजे ।।२।।
पाहतां नीरा भीवरा दृष्टीं । स्नानें वास त्यां वैकुंठीं ।
पूर्वजही कोटी । उध्दरती सर्वथा ।।३।।
एका जनार्दनीं सांगे । भाक दिधली पांडुरंगे ।
धन्य संचित जें भाग्य । तेंचि योग्य अधिकारी ।।४।।

भावार्थ

भक्तिभाव धरुन जे परमेश्वराला शरण येतात त्यां भाविकांना मोक्ष प्राप्त होऊन सायुज्यमुक्ती मिळते. पुनरपि जन्म घ्यावा लागत नाही.असे वेद,श्रुती आदराने गर्जून सांगतात.नीरा भीमेचा पावन संगमांत स्नान केल्याने वैकुंठ पदाची प्राप्ती होते,पूर्वजांचा उध्दार होतो.एका जनार्दनी म्हणतात,ज्या भाग्यवंताचे पुण्य संचित असेल ते पंढरीच्या सुखाचे अधिकारी होतात,ते धन्य होत असे प्रत्यक्ष पांडुरंगाचे वचन आहे तेव्हां आळस झटकून सुखाने पंढरीस जावे.

२२६

मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा ।।१।।
येचि मार्गे सुखें जातां । हरे संसारिची चिंता ।।२।।
मार्गी नाही गोवा -गुंती। पाहतां निवृत्ती क्रोधकामां ।।३।।
एका जनार्दनीं सोपें वर्म । आहे ते सुधर्म सर्वांसीं ।।४।।

भावार्थ

परमात्म प्राप्तीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत परंतू पंढरीचा भगवद्भक्तीचा पंथ सुगम असून या मार्गाने संसार चिंतेचे हरण होते, कामक्रोध पळून जातात. मनातिल संशयाचे जाळे नाहिसे होते.सर्वांसाठी भागवत धर्म आचरणास सहजसुलभ आहे असे एका जनार्दनीं प्रतिपादन करतात.

२२७

करूनी निर्धारा । जाय जाय पंढरपुरा।।१।।
उणें पडो नेदी कांहीं । धांवे देव लवलाहीं ।।२।।
संकट कांहीं व्यथा । होऊं नेदी सर्वथा ।।३।।
शंख चक्र घेऊनी करीं । एका जनार्दनीं घरटी करी ।।४।।

भावार्थ

भाविकांनी मनाचा निर्धार करुन पंढरीस जावें, तेथें कशाचीच कमतरतां नाही. भक्तांची संकटे, व्यथा दूर करण्यासाठी देव शंख,चक्र घेउन त्वरेने धावत येऊन रक्षण करतो असे एका जनार्दनीं सांगतात.

२२८

पुंडलीक म्हणतां वाचें । पाप जातें रे जन्माचं ।
जिहीं देखिलें पद याचें । धन्य भाग्याचे नर ते ।।१।।
जाती पंढरीसी आधी। तुटे तयांची उपाधी।
ऋध्दि सिध्दी मांदी । तिष्ठतसे सर्वदा ।।२।।
भुक्ति मुक्ति धांवती मागें । आम्हां अनुसरा वेगें।
ऐसे म्हणोनि वेगें । चरणीं मिठी घालिती ।।३।।
शरण एका जनार्दनीं । विटे उभा मोक्षदानीं ।
लागतां तयाचे चरणीं । पुनरावृत्ती न येतीं ।।४।।

भावार्थ

भक्त पुंडलिकाच्या नामाच्या उच्चाराने जन्माच्या पापाचे परिमार्जन होते,भाग्यवान भाविकांनाच पुंडलिकाचे चरणदर्शन घडते.जे भक्त पंढरीची नित्यनेमाने वारी करतात त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होते ,त्यांना ऋध्दि सिध्दी प्राप्त होतात. भुक्ति मुक्ति चरण वंदन करुन त्यांचा अंगिकार करण्याची विनंती करतात असा पंढरीचा महिमा सांगून एका जनार्दनीं म्हणतात, मोक्ष देणारा परात्पर परमात्मा विटेवर उभा आहे ,त्याच्या चरण-स्पर्शाने पुनरपि जन्मास यावे लागत नाही.

२२९

विठ्ठल देवाधिदेवो । भक्तजनांचे निवारी बिहो ।
तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला ।।१।।
मना लागो त्याचा छंद । निरसोनि भेदाभेद ।
अवघाचि गोविंद । ठसावें हदयीं ।।२।।
स्नान केल्या चंद्रभागे । पातकें नासतील वेगें ।
संकल्प विकल्प त्याग । दरुशन घेतांची।। ३।।
ऐसा घडतां हा नेम । तयापाशीं पुरुषोत्तम।
एका जनार्दनीं काम । देव करी स्वयें अंगें ।।४।।

भावार्थ

भक्तजनांचा निर्वाह चालविणारा देवाधिदेव विठुराणा पंढरींत विटेवर उभा आहे.मी तूं पणाचे,उच्च-नीचतेचे जाती-पातीचे सारे भेदाभेद विसरुन या गोविंदाला हदयांत धारण करावा,मनाला त्याचा छंद लागावा .चंद्रभागेच्या पाण्यांत स्नान करतांच सर्व पातके समूळ नाहीशी होतील.भक्त पुंडलिका सह पांडुरंगाचे दर्शन घेतांच मनातील सर्व संशय,संकल्प,विकल्प विलयास जातील.तीर्थस्नान व चरणदर्शन हा नित्यनेम केल्यास पुरुषोत्तम श्रीहरीचा निरंतर सहवास लाभेल,त्या भक्तांचे सर्व मनोरथ देव पूर्ण करील अशी ग्वाही एका जनार्दनीं या अभंगात देतात.

२३०

जाणत्या नेणत्या एकचि ठाव । तेणेंही भजावा पंढरीराव।।१।।
नका पडूं आणिका भरी । तणें फेरी चौय्रांशीची।।२।।
लागा पंढरीच्या वाटे। तेणे तुटे बंधन ।।३।।
अनुभवें अनुभव पाहां । येच देहीं प्रत्यक्ष।।४।।
एका जनार्दनीं प्रचीत । विठ्ठल नामें. मुक्त सत्य ।।५।।

भावार्थ

वेद शास्त्रे जाणणारे पंडित आणि भोळी भाबडी भक्ति करणारे भाविक यांनी एका पंढरीनाथाचे भजन कीर्तन करावे योग,याग,तप या सारख्या साधनांच्या भरीस पडू नये. पंढरीची वाट धरुन संसार बंधनातून मुक्त व्हावे. याच देहीं या भगवद्भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेउन पहावा. विठ्ठल नामाच्या सत्यतेची प्रचिती घ्यावी.असे एका जनार्दनीं या अभंगातून सुचवतात.

२३१

रमेसह पंढरी आला । येऊनि भेटला पुंडलिका।।१।।
म्हणे उभारूनि हात । तरतील नामें महापतित ।।२।।
नका कांहीं आटाआटी । योग यागांची कसवटी ।।३।।
ब्रह्मज्ञान न साधे लोकां । मुखीं धोका विठ्ठला ।।४।।
शरण एका जनार्दनीं । सांगे वचनीं पुंडलिक ।।५।।

भावार्थ

लक्ष्मी सह विष्णु पंढरींत आले आणि भक्तराज पुंडलिकाला भेटलें.दोन्ही कर उभारून भक्तांना ईच्छादान दिले.योगयाग,दानधर्म, तप या साधनांचा खटाटोप न करता केवळ नामजपाने महापतित तरुन जातील.सामान्य जनांना ब्रह्मज्ञान साधत नाही. वेदांच्या ऋचा गाताना उच्चरांत चुकांमुळे धोका संभवतो.असे एका जनार्दनीं म्हणतात.

२३२

प्रेमळांसी विश्रांतिस्थान । महा मुक्ति कर जोडोन ।
ऋध्दी सिध्दी वोळंगण । तिष्ठती जाण पंढरिये ।।१।।
धन्य धन्य विठ्ठलराव । उभा देवांचा तो देव ।
दरूशनें निरसे भेव । यम काळ दूताचे ।।२।।
नाम न विटेचि रसना । सुलभ हा पंढरीराणा ।
एका शरण जनार्दना । सदा वाचे उच्चारी ।।३।।

भावार्थ

पंढरी ही प्रेमळ भाविकांचे विश्रांतिस्थान असून मोक्ष मुक्ति येथे दोन्ही कर जोडून उभ्या राहतात. ऋध्दी सिध्दी पंढरीच्या दारी लोटांगणी येतात.देवांचा देव विठ्ठल येथे यमदूतांपासून अभयदान देत उभा आहे. पंढरीच्या विठ्ठल नामरसाला भाविकांची रसना कधीच कंटाळत नाही एका जनार्दनीं म्हणतात,वाचेने नामजप करणार्या भाविकांना हा पंढरीराणा सहजसुलभ आहे.

श्रीविठ्ठलमहात्म्य


आवडीच्या सुखा सुखावला | वैकुंठ सांडोनीं पंढरिये आला ||१||
देखोनियां पुंडलिका उभा सम पाई देखा ||२||
न बैसे खालीं | युगे अठ्ठावीस जालीं ||३||
ऐशी भक्ताची माउली | उभी तिष्ठत राहिली ||४||
एका जनार्दनीं देव | उभा राहिला स्वयमेव ||५||

भावार्थ

भक्तिप्रेमाने सुखावलेला पांडुरंग वैकुंठ सोडून पंढरीला आला आणि भक्तराज पुंडलिकाला पाहून विटेवर समचरण ठेवून अठ्ठाविस युगांपासून तिष्ठत उभा आहे.एका जनार्दनीं म्हणतात,पांडुरंग रुपानें स्वयमेव परब्रह्म भक्तासाठी वाट पाहत आहे.


धन्य धन्य पुंडलिका तारिले लोका सकळां ||१||
तुझें भाकेगुंतुनी यथें | तारीन पतीत युगायुगीं ||३||
भाळे भोळे येतील जैसे | दरुशनें ते तैसे वैकुंठी ||३||
एका जनार्दनीं देऊनी वर | राहे विटेवर मग उभा ||४||

भावार्थ

धन्य धन्य पुंडलिक असे म्हणुन एका जनार्दनीं सांगतात,परब्रह्म सच्चिदानंद परमेश्वर भक्तांचे मनोगत जाणून भक्त पुंडलिकाला वरदान देतात कीं, दर्शनास येणार्या सर्वपतितांचा उध्दार करण्यासाठी वचनबध्द आहे. आपले वचन पूर्ण करण्यसाठी देव विटेवर उभे आहेत.


भक्तांदारी उभाचि तिष्ठे | न बोले न बसै खालुता ||१||
युगे जाहलीं अठ्ठावीस | धरुनी आस उभाची ||२||
जड मूढ हीन दीन | तारी दरुशनें एकाची ||३||
एका जनार्दनीं ऐसा वर | दिधला साचार भक्तांसी ||४||

भावार्थ

भक्ताला दिलेले वरदान खरे (साचार) करण्यासाठी परमात्मा अठ्ठाविस युगांपासून तिष्ठत उभा राहिला आहे.खाली न बसतां मुकपणे आस धरुन,जड,मूढ(अजाण) दीनदुबळे यांना दर्शन देऊन पतितांचा उध्दार करुन वचनपूर्ती करतो. असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात.


घेऊनियां परिवारा | आला असे पंढरपुरा ||१||
भक्ता पुंडलिकासाठीं | उभा ठेवुनी कर कंटीं||२||
केशर कस्तुरी चंदन टिळा | कांसे शोभे सोनसळा||३||
वामांकीं शोभे रुक्मिणी | शरण एका जनार्दनीं ||४||

भावार्थ

वैकुंठीचा राणा भक्त पुंडलिकासाठी परिवारासह पंढरपुरा आला. केशर,कस्तुरी मिश्रीत चंदनाचा टिळा कपाळीं रेखून,पिवळा पितांबर लेवून,दोन्ही कर कटावर ठेवून विटेवर समचरणी उभा ठाकला आहे. डाविकडे रुक्मिणी शोभून दिसत आहे. एका जनार्दनीं विठ्ठल भेटीचे असै वर्णन या अभंगांत करतात.


एकरुप मन जालेंसें दोघांचे | देव आणि भक्तांचे रूप एका ||१||
पुंडलिका कारणें समुच्चय उभा | त्रैलोक्याची शोभा पांडुरंग ||२||
ध्यातां चित्त निवे पाहतां पहावें | एका जनार्दनीं साठवीं हृदयीं रुप ||३||

भावार्थ

देव आणि भक्तांचे मन एकरूप झाले.स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही भुवनांत शोभून दिसणारे परब्रह्म पांडुरंग आणि भक्तीप्रैमाने कृतार्थ झालेला भक्तराज पुंडलिक यांच्या रुपाचे ध्यान लागले असतां चित्ताला विलक्षण शांतीसुखाचा लाभ होतो.एका जनार्दनीं म्हणतात, हे रुप हृदयांत सांठवावें.


ऐशी आवडी मीनली सुखा |देव उभा भक्तद्वारीं देखा ||१||
धन्य धन्य पुंडलिका | उभे केले वैकुंठनायका ||२||
युगे अठ्ठावीस नीट | उभा विटे कर ठेवुनियां कर ||३||
एका जनार्दनीं शरण जाऊं | काया वाचा मनें त्यासी ध्याऊं ||४||

भावार्थ

भक्ताच्या भक्तिप्रेमाने सुखावलेला पांडुरंग भक्ताच्या दारी अठ्ठाविस युगांपासून कर कटीवर ठेवून उभा आहे. वैकुंठनायकाला भक्तिरंगात रंगवून टाकणारा पुंडलिक धन्य होय असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या देव भक्ताला शरण जावें, देहाने, वाचेने, मनाने त्यांचे सतत चिंतन करावे.


विठ्ठल रुक्मिणी राही सत्यभामा | एकरुपी परमात्मा पंढरीये ||१||
कैवल्य उघडें क्षीरसागर निवासी | तपे पुंडलिकासी वश्य जाहलें ||२||
अणुरेणुपासोनि भरूनि उरला | तो म्यां देखियेला पंढरिये ||३||
एका जनार्दनीं सांवळा श्रीकृष्ण | जनीं जनार्दन पूर्ण भरला ||४||

भावार्थ

क्षीरसागरांत निवास करणारा कैवल्यदानी परात्पर परमात्मा रुक्मिणी,सत्यभामेसह भक्त पुंडलिकाच्या तपाने प्रसन्न होऊन पंढरींत आले. जे परब्रह्म विश्र्वातील सर्व अणुरेणुंत भरून उरले ते पंढरींत पहायला मिळाले. एका जनार्दनीं म्हणतात, सावळ्या श्रीकृष्णाचे हे विश्वव्यापी रुप सर्व जन मानसांत प्रतिबिंबित झाले आहे.


कैसा पुंडलीका उभा केला | वैकुंठाहुनी भक्ती चाळविला ||१||
नेणें रे कैसे वोळलें | अधीन केलें आपुलिया ||२||
दर्श़नमात्रें प्राणिया उध्दार | ऐशी किर्ति चराचरा ||३||
एका जनार्दनीं म्हणे पुंडलिका | भक्त शिरोमणी तूंचि लेखा ||४||

भावार्थ

एकनिष्ठ भक्तीने पुंडलिकाने वैकुंठ नायकाला आपल्या अधीन केलें.हा चमत्कार कसा झाला हे समजणे कठीण आहे.केवळ दर्शनाने सर्व प्रकारच्या प्राण्यांचा उध्दार होईल अशी किर्ति चराचरांत पसरली. एका जनार्दनीं म्हणतात,पुंडलिक भक्त शिरोमणी म्हणून ओळखला जातो.


डोळियाची भूक हारपली | पाहतां श्रीविठ्ठल माउली ||१||
पुंडलिके बरवें केलें | परब्रह्म उभें केलें ||२||
अठ्ठावीस युगें जालीं | अद्यापि न बैसें खालीं ||३||
उभा राहिला तिष्ठत | आलियासीं क्षेम देत ||४||
ऐसा कृपाळु दीनाचा | एका जनार्दनीं साचा ||५||

भावार्थ

पुंडलिकाच्या अनन्य भक्तीने प्रत्यक्ष परात्पर परब्रह्म पंढरींत विटेवर उभे केले.अठ्ठावीस युगांपासून परमात्मा तिष्ठत उभा आहे.दर्शनास येत असलेल्या भक्तांना ईच्छादान देत आहे. दीनदुबळ्यांना कृपेची सावली देत उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तराज पुंडलिकाचा सर्व भक्तांवर हा मोठा उपकार आहे. श्रीविठ्ठलाच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटले.

१०

म्हणती दक्षिण द्वारका | पुण्यभूमी वैकुंठ लेखा |
पाहूनिया पुंडलिका | राहिलासे उभा विटेवरी ||१||
काय वर्णावा महिमा|न कळेचि आगम निगमा |
वेदादिक पावले उपरमा | जयासी पैं वर्णितां ||२||
तो आला आपुले पायीं | भक्त इच्छा धरूनी हृदयीं |
एका जनार्दनीं साची | सर्वांवरीं सारखी ||३||

भावार्थ

पंढरी दक्षिण द्वारका या नावाने ओळखली जाते.पंढरी वैकुंठा सारखी पुण्यनगरी आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे.पुंडलिकाला पाहून विटेवर समचरणीं उभा राहिलेल्या विठ्ठलाचा महिमा वर्णन करणे अशक्य आहे. चार वेद आणि सहा शास्त्रे यांनाही हे परब्रह्म स्वरुप पूर्णपणे जाणता आले नाही. ज्याचे वर्णन करतांना वेद मूक झाले. असा पंढरीचा राणा स्वता:च्या पायाने पंढरींत आला.भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी तिष्ठत उभा राहिला आणि भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी वरदान दिले.या पांडुरंगाची सर्व भक्तांवर सारखीच माया आहे असे एका जनार्दनीं सांगतात.


११

उभा पुंडलिकापुढें |कटीं कर ठेउनी रुपडें ||१||
पाहतां वेडावलें मन| शिवा लागलेंसे ध्यान ||२||
सनकादिक वेडावले | तें पुंडलिकें भुलविले ||३||
भक्तां देखोनि भुलला |एका जनार्दनीं सांवळां ||४||

भावार्थ

कर कटीवर ठेवून विटेवर उभा असलेल्या सावळ्या सुंदर पांडुरंगाचे रुप मन वेडावून टाकते,सनकादिक ऋषीं या दर्शनासाठी आतुर होतात आणि शिवशंकराला या रुपाचे ध्यान लागते. एका जनार्दनीं म्हणतात, सावळा श्रीहरी भक्तराज पुंडलिकाची प्रेमभक्ती पाहून भुलला.

१२

आला पुंडलिकासाठीं | उभा सम पाय विटीं ||१||
विठु मदनाचा पुतळा | भुलावणा तो सकळां ||२||
अराध्य दैवत शिवाचें | कीर्तनी उघडाची नाचें ||३||
एका जनार्दनीं मन | वोवाळावें पायांवरून ||४||

भावार्थ

पंढरीचा विठुराया मदनाचा पुतळा असून सर्व भक्तांना भुलवाणारा आहे. शिवशंकराचे आराध्यदैवत असलेला परमात्मा कीर्तनाच्या रंगात देहभान विसरून नाचतो. विठ्ठलाचे असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, पुंडलिकाच्या भक्तीनें वेडा होऊन पंढरींत आलेला परमात्मा समचरणीं विटेवर उभा आहे. त्या भक्तवत्सल पांडुरंगाच्या चरणांवरुन मन ओवाळून टाकावें.

१३

सर्वांचे जे मूळ सर्वांचे जें स्थल | ते पदयुगल विटेवरी ||१||
साजिरें साजिरें कर दोन्हीं कटी| उभा असे तटी भीवरेच्या ||२|
नये ध्याना मना आगमाच्या खुणा | कैलासीचा राणा ध्यात जया ||३||
एका जनार्दनीं पुरे परता दुरी | पुंडलिकाचे द्वारीं उभा विटे ||४||

भावार्थ

सर्व चराचर सृष्टी जेथुन उत्पन्न झाली आणि ही सृष्टी जेथे विलीन होते ते परात्पर परब्रह्म भीवरेच्या तीरावर साजिरे गोजिरे कर कटीवर ठेवून विटेवर उभेठाकलेआहे.पराकाष्ठेची योगसाधना करुनही योगी जनांना ध्यानांत सापडत नाही,वेद,पुराणे ज्या स्वरुपाचे यथार्थ वर्णन करु शकत नाही,कैलासीचा राणा निरंतर ज्याचे ध्यान करतो.जे स्वरुप परावाणीच्या पलिकडे ब्रह्मलोकांत निवास करते ते परब्रह्म पुंडलिकाचे दारी विटेवर उभे आहे असे एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.

१४

ॐकार सह मकार आदि अंत नाहीं जया |
ते पुंडलिकें भुलवोनी आणिलें या ठायां ||१||
भुललें वो माय पुंडलिकाप्रीती|
उभाचि राहे परी खेद न करी चित्तीं ||२||
अठरा पुराणांसी वाढ शास्त्रे वेवादिती |
तो सांवळा श्रीकृष्ण उभा विटे पुंडलिकाचे भक्ती ||३||
वेद वेदांतरें मत मतांतरें न कळे श्रुती पैं वेवादती |
तो एका जनार्दनाचे हृदयीं सांवळा घेऊनि बुंथी ||४||

भावार्थ

ब्रह्मा, विष्णु, महेश ही तिन्ही ज्या स्वरुपांत एकवटलेली आहेत ,ज्याचा आरंभ आणि अंत वेदशास्त्रांना आकलन होत नाही असे परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप पुंडलिकाने भक्ती रसाने भुलवून आणले. अठ्ठावीस युगांपासून चित्तांत खेद न करतां सावळा श्रीहरी विटेवर उभा राहिला आहे. वेदशास्त्रे, श्रुती या परब्रम्ह स्वरुपाविषयी विविध प्रकारची मते व्यक्त करुन वादविवाद करतात.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,चित्तांत या सावळ्या श्रीहरीला धारण करुन त्याचे ध्यान करावे.

१६

परात्पर परिपूर्ण सच्चिदानंदघन | सर्वा अधिष्ठान दैवताचें गे माय||१||
तें लाधलें लाभलें पुंडलिकाचे प्रीती | येत पंढरीप्रती अनायसें गे माय ||२||
जगदंबा पसारा लपवोनि सारा गे माय| धरियेला थारा पुंडलिकाचेनि प्रेमें गे माय ||३||
ओहं मा न कळे कांहीं सोहं देती ग्वाही गे माय | काहमाची तुटली बुंथी एका जनार्दनीं प्रीती गे माय ||४||

भावार्थ

सर्व चराचर सृष्टी ज्या देवतेच्या आधाराने निर्माण होते आणि लयास जाते असा चिरंतन,आनंदस्वरुप परिपूर्ण परमात्मा भक्त पुंडलिकाच्या भक्तीप्रेमाने सर्व भाविकांना लाभला.अनायसे पंढरींत अवतरला. मायेचा सारा पसारा बाजूला सारुन पुंडलिकाच्या प्रेमाचा आसरा घेतला. एका जनार्दनीं म्हणतात, परब्रह्म परमात्म्याच्या दर्शनाने मी कोण ?या संशयाचे निराकरण झाले आणि देव आणि भक्त यांच्या एकरुपतेचा प्रत्यय आला.

१७

वर्णितां वेदमती कुंठित पैं जाली | पुराणें भागलीं विवादितां ||१||
सोपारा सुगम पुंडलिकापाठीं | उभा जगजेठी विटेवरीं ||२||
लक्ष्मी ते स्वयें रुक्मिणी शोभत | विंझणैं वारीतसत्यभामा ||३||
सांडुनि रत्नकिळा गळां तुळसीमाळा | चंदनाचा टिळा कैशरयुक्त ||४||
गोपाळ गजरें आनंदे नाचती | मध्ये विठ्ठलमूर्ति प्रेमे रंगें ||५||
मनाचे मोहन योगाचे निजधन | एका जनार्दनीं शरण विटैवरीं ||६||

भावार्थ

ज्या स्वरुपाचे वर्ण़न करतांना वेदांची मती कुंठित झाली, ज्याचा स्वरुपाचा यथार्थ निर्णय करतांना अठरा पुराणे वाद-विवाद करुन थकून गेली. असा जगजेठी पुंडलिकाच्या अनन्य भक्तीने भाविकांना सहजसोपा झाला. विटंवर रुक्मिणी सह उभ्या असलेल्या श्रीहरीला सत्यभामा पंख्याने वारा घालीत आहे. मौल्यवान रत्नहाराचा त्याग करून श्रीहरीने तुळशीची माळ परिधान केली आहे.केशरयुक्त चंदनाचा टिळा कपाळावर शोभून दिसतो.विठ्ठलाचे सभोवती गोपाळ हरीनामाचा गजर करुन आनंदानै नाचत आहेत. सर्वांचे मन मोहून टाकणारा या योगेश्वर श्री कृष्णाला एका जनार्दनीं अनन्य भक्तीने शरण जातात.

१८

स्थूल ना सूक्ष्म कारण ना महाकारण | यापरतां वेगळाचि जाण आहे गे माय ||१||
पुंडलिकाचे प्रेमें मौनस्थ उभा | कोणा न बोले उगला उभा ठेला गे माय ||२||
निंद्य वंद्य जगीं याचे भेटीलागीं | दरुशनें उध्दार वेगीं तयां गे माय ||३||
ऐसा लाघवी खेळ खेळोनी निराळा | एका जनार्दनीं डोळां देखिला गे माय ||४||

भावार्थ

स्थूल, सूक्ष्म,कारण व महाकारण या चारही देहांपेक्षा वेगळा असलेला पांडुरंग पुंडलिकाच्या अनन्य भक्तीप्रेमाने मुकपणे विटेवर उभा आहे. एका शब्दानेही कोणाशी संभाषण न करता, वंदनीय तसेच निंदनीय असा भेदभाव न बाळगता दर्शनास येणार्या सर्व भाविकांचा उध्दार करीत आहे.अत्यंत आपुलकीने भक्तांशी खेळ खेळणारा हा परमात्मा अलिप्तपणे निराळा आहे.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,असा हा निर्विकल्प पंढरीचा राणा डोळ्यांनी प्रत्यक्ष पहावयास मिळाला.

१९

अभक्त सभक्त दोघांसी सारखा दिसे | लवणी जैसैं न दिसे दुजेपण गे माय ||१||
ऐसा परात्पर सोइरा पुंडलिकाचे पाठीं | मौन्य वाक्पुटीं धरूनी गे माय ||२||
पुण्य पाप सर्व देखतसे दृष्टीं | चालवी सर्व सृष्टी गे माय ||३||
ऐसा वेषधारी उभा भीवरेतीरीं एका जनार्दनीं | अंतरीं दृढ ठसावे गे माय ||४||

भावार्थ

अभक्त आणि सभक्त तसेच पाप पुण्य असा भेदाभेद न करता सर्वांना समदृष्टीने अवलोकन करणारा, ह्या चराचर सृष्टीतिल सर्व व्यवहार अलिप्तपणे चालवणारा,नाना वेषधारी,बहुरुपी परात्पर परमात्मा भीवरेच्या तीरावर भक्त पुंडलिकाचा सोइरा बनून त्याच्या पाठीशी मौन धरुन उभा राहिला आहे.परब्रह्म परमात्म्याचे हे रुप अंत:करणांत कायमचे दृढपणे धारण करावे अशी ईच्छा एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.

२०

विठ्ठल सांवळा पंढरीये उभा | धन्य त्याची शोभा शोभतसे||१||
पुंडलिका मागें कर ठेवूनी कटीं | समपाय विटीं देखियेला ||२||
राही रखुमाई शोभती त्या बाहीं | वैष्णव दोही बाहीं गरूडपारी ||३||
एका जनार्दनीं पाहूनियां ध्यान | मनाचे उन्मन होत असे ||४||

भावार्थ

सांवळा श्रीहरी भक्तराज पुंडलिकाच्या मागे दोन्ही हात कमरेवर ठेवून, विटेवर समचरण ठेवून गरुडपारी उभा आहे. विठ्ठलाच्या बाजूला रुक्मिणी शोभून दिसत आहे. वैष्णवांचा मेळा सभोवताली जमला आहे. एका जनार्दनीं म्हणतात, विठोबाचे हे नयनरम्य रुप पाहून मन परमात्म्याच्या रुपाशी एकरुप होऊन उन्मनी (उच्चतर अवस्थेत ) स्थिर होते.

२१

अणुरेणुपासोनि सबाह्य भरला | भरुनी उरला संतांपुढे ||१||
उघडाचि दिसे सर्वां ठायीं वसे | मागणेचि नसे दुजें कांहीं ||२||
कर ठेवुनि कटीं तिष्ठत रहाणें | वाट ते पहाणें मागेल कांहीं ||३||
चंद्रभागा तीर पुंडलिकासमोर | एका जनार्दनीं हरिहर उभे राहाताती ||४||

भावार्थ

चराचर सृष्टीतिल अणुरेणुंमध्यें अंतरबाह्य व्यापून उरलेला हा परमात्मा उघडपणे संतासमवेत उभा ठाकला आहे.कर कटीवर ठेवून पुंडलिकासमोर तिष्ठत उभा आहे. चंद्रभागेच्या तीरावर मुकपणे उभ्या असलेल्या सांवळ्या श्रीकृष्णाच्या दर्श़नासाठी शिवशंकर विष्णुसह उभे आहेत असे एका जनार्दनीं म्हणतात.

२२

ध्वज वज्रांकुश शोभती चरणीं | तो उभा रंगणीं वैष्णवांचे ||१|
झळकतसे हातीं पद्म आणि गदा | पुंडलिक वरदा उभा विटे ||२||
चरणीं भागीरथी गंगा ती शोभली | भक्तांची क्षाळिली महत्पापें ||३||
एका जनार्दनीं सकळ तीर्थराव | उभा राहे प्रभव विटेवरी ||४||

भावार्थ

ध्वज,वज्र,अंकुश ज्याच्या चरणीं शोभून दिसतात, करांत कमळ आणि एका हातीं गदा घेऊन पुंडलिकाला वरदान देणारा श्रीहरी विटेवर उभा आहे.गंगा भागिरथी प्रमाणे चरण स्पर्शाने पावन झालेली चंद्रभागा भक्तांची महापापे धुवून काढीत आहे. एका जनार्दनीं म्हणतात, सकळ तीर्थस्थानांचा अधिपती असलेला परमात्मा पांडुरंग विटेवर उभा आहे.

२३

सुकुमार हरीची पाऊलें | सुंदर हरीचीं पाउलें ||१||
भीमातटीं देखिलैं |वोळलें तें पुंडलिका ||२||
शेषशयनीं जीं पाऊलें | लक्ष्मीकरीं तीं पाऊलें ||३||
गरूडपृष्ठीं जीं पाऊलें | बळीयागी तीं पाउलें ||४||
विटेवरी जी पाउले | एका जनार्दनीं तीं पाउलें ||५||

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं श्रीहरीच्या सुकुमार सुंदर पाउलांचे अत्यंत समर्पक वर्णन करतात. क्षीरसागरांत शेष नागाच्या शय्येवर विश्रांती घेणार्या भगवतांची पाऊलें लक्ष्मी ज्यांची चरणसेवा करते त्या भगवान विष्णुंची पाउलें, गरुडाच्या पाठीवर विसावलेली पाऊलें ,बळीराजाला तीन पाउलांच्या भूमीचे दान मागून त्याला पाताळांत लोटणारी बलशाली पाउले, भक्तराज पुंडलिकाला वर देऊन विटेवर उभी राहिलेली ही सुकुमार सुंदर पाऊले आहेत असे एका जनार्दनीं सांगतात.

२४

या पाउलासाठीं लक्ष्मी पिसी | सनकादिक वेडावले मानसीं||१||
सुख जोडलें पुंडलिकासी | विटेवरी हृषीकेशी ||२||
म्हणे जनार्दनाचा एका | धन्य धन्य पुंडलिका ||३||

भावार्थ

ज्या पाउलांच्या सेवेसाठी लक्ष्मी आतुरलेली असते, सनकादिक ऋषीं मनापासून ज्या चरणांची अभिलाषा करतात त्या हृषीकेशीची परमपावन पाऊलें भक्त पुंडलिकाच्या सुखासाठी विटेवर उभी आहेत तो भक्तराज पुंडलिक धन्य होय असे एका जनार्दनीं म्हणतात.

२५

चरण गोमटे गे माय | पाहतां पाहतां मन न धाय |
पुनरपि फिरूनी तेथें जाय | ऐसा वेध होय तयाचा गे माय ||धृ०||
नवल गे माय न कळे वेदां | अचोज विवादा शास्त्रांचिया||१||
पुराणें भागलीं दरूशने वेडावलीं | कांही केलिया न कळे तयां ||२||
या पुंडलिकिचे आवडीं विटे धरूनी मीस | युगें अठृठावीस उभा असे ||३||
परे परता परात्पर पश्यंती न कळे विचार। | या मध्यमा वैखरीचा निर्धार थकीत ठेला ||४||
एका जनार्दनीं आहे तैसा देखिला | सबाह्य भरला हृदयीं गे माय ||५||

भावार्थ

भक्त पुंडलिकाच्या भक्तीप्रेमासाठी अठ्ठावीस युगे पांडुरंग विटेवर उभा आहे. नवलाची गोष्ट म्हणजे चारी वेदांना ज्याच्या स्वरुपाचे यथार्थ आकलन झाले नाही , साही शास्त्रे अथक वादविवाद करुनही ज्या स्वरुपाचा निर्णय करु शकली नाही.अठरा पुराणे आणि दर्शने ज्याचा महिमा वर्णन करतांना थकून मूक झाली. मध्यमा वैखरीच नव्हे तर परा पश्यंती या चारी वाणी स्तब्ध झाल्या.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरीनाथाचे हे गोमटे चरण पाहतांना तो देवाधिदेव अंतरबाह्य हृदय व्यापून राहिला. कितीही वेळ त्या चरणांचे दर्श़न घेतले तरी मनाचे समाधान होईना. त्या स्वरुपाचा असा वेध लागला कीं, मन परत परत माघारीं जाऊन तेथे गुंतून पडते.

२६

जे या चराचरीं गोमटें | पाहतां वेदां वाट न फुटें |
तें पुंडलिकाचे पेठे | उभें नीट विटेवरी ||१||
सोपारा सोपारा झाला आम्हां | शास्त्रें वर्णिता महिमा |
नकळे जो आगमा निगमा | वंद्य पुराणा तिही लोकीं ||२||
सहस्त्र मुखांचे ठेवणें | योगी ध्याती ज्या ध्यानें |
तो नाचतो किर्तनें | प्रेमभक्त देखोनी ||३||
एका जनार्दनीं देखा | आम्हां झाला सुलभ सोपा |
निवारूनी भवतापा | उतरीं पार निर्धारें ||४||

भावार्थ

या चराचर सृष्टींत जे अतिशय सुंदर आहे, ते स्वरुप पाहून वेद मुक होतात, तो पांडुरंग पुंडलिकाच्या पंढरींत विटेवर समचरणीं उभा आहे.साही शास्त्रे या परमात्म स्वरुपाचा महिमा गातात परंतु तो वेदांना सुध्दा पूर्णपणे आकलन झाला नाही तो सामान्य भाविकांना भक्तिमार्गाने सहज सुलभ झाला आहे. अठरा पुराणे तिन्ही लोकी मान्य झाली असून सहस्त्र मुखांचा शेष ज्या परत्पर परमेशाचे वर्णन करतांना थकून गेला तो देवाधिदेव प्रेमळ भक्तांची भक्ती पाहून किर्तनरंगी रंगून नाचतो. ऐका जनार्दनीं म्हणतात, भागवत धर्म आचरणास सोपा असून भवताप नाहिसे करुन भाविकांचा उध्दार करतो.

27

आनंदाचा कंद उभा पांडुरंग | गोपाळांचा संघ भोवता उभा ||१||
चंद्रभागा तीरी शोभे पुंडलिक | संत अलौकिक गर्जताती ||२||
भोळे भाळे जन गाती | ते साबडे विठ्ठला आवडे प्रेम त्यांचे ||३||
नारीनर मिळाले आनंदे गजर | होत जयजयकार महाद्वारी ||४||
एका जनार्दनी प्रेमळ ते जन | करिती भजन विठोबाचे ||५||

भावार्थ

सच्चिदानंद परमात्मा पांडुरंगरुपाने विटेवर उभा असून भोवताली गोपाळांचा मेळा उभा आहे. चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिक, हरीनामाचा गजर करीत असलेल्या संतांच्या मेळाव्यात शोभून दिसत आहे. भोळेभाबडे भाविक हरीनामाचा जयजयकार करीत आहेत, ह्या प्रेमळभक्तांचा प्रेमभाव विठ्ठलाला विशेष आवडतो. एका जनार्दनी म्हणतात, हे प्रेमळ भक्त अनन्यभावाने विठोबाचे भजन करतात.

२८

अनंताचे गुण अनंत अपार | न कळेचि पार श्रुतीशास्त्री ||१||
तो हा महाराज विटेवरी उभा | लावण्याचा गाभा शोभतसे ||२||
कटावरी कर ठेवी जगजेठी | पाहे कृपादृष्टी मित्रांकडे ||३||
पुंडलिकाचे तेजे जोडलासे ठेवा | एका जनार्दनी सेवा देई देवा ||४||

भावार्थ

ज्या अनंताच्या गुणांचा पार वेद आणि श्रुतींना कळत नाही, तो अपरंपार गुणसागर परमात्मा विटेवर कटीवर कर ठेवून उभा आहे. लावण्याचा गाभा असा तो जगजेठी आपला मित्र पुंडलिकाकडे कृपादृष्टीने बघत आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, पुंडलिकाच्या भक्तीप्रेमाने हा पांडुरंगरुपी ठेवा पंढरीसी जोडला गेला आहे. त्याची सेवा करुन कृतार्थ व्हावे.

29

विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा | श्रीमुखाची शोभा काय वानूं ||1||
कटी पितांबर तुळशीचे हार |उभा सर्वेश्वर भक्तिकाजा ||2||
लावण्य रुपडें पाहे पुंडलिक |आणिक सम्यक नसे दुजा||3||
पाहतां पाहतां विश्रांती पैं जागी| एका जनार्दनीं माउली संतांची ते|| 4||


भावार्थ

कटीवर पितांबर,गळ्यांत तुळशीचे हार धारण करून सर्व विश्वाचा परमेश्वर भक्तांच्या उद्धारासाठी विटेवर उभा आहे. या आनंदघन श्रीहरीच्या मुखाची शोभा अवर्णनीय आहे. या लावण्यरुपाची शोभा भक्त पुंडलिक डोळे भरुन बघत आहे. या एकमेव,अद्वितीय सर्वेश्वराचे रुप पाहतांना सर्व कामना पूर्ण होउन मन अपूर्व शांततेने भरुन जाते.सर्व संतांची माउली असलेला हा पांडुरंग भाविकांचे विश्रांतीस्थान आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

3०

सर्वाघटीं बिंबला व्यापून राहिला | पुंडलिके उभा केला विटेवरी ||1||
सांवळा चतुर्भुज कांसे पितांबर | वैजयंती माळ शोभे कंठीं ||2||
कटावरी कर पाउलें साजिरीं| उभा तो श्रीहरी विटेवरीं ||3||
एका जनार्दनीं बिंबें तो बिंबला| बिंब बिंबोनी ठेला देहामाजी|| 4||

भावार्थ

चराचर सृष्टीतिल प्रत्येक अणुरेणुत प्रतिबिंबीत होऊन सर्व विश्वांत व्यापून असलेला हा चतुर्भुज, पितांबरधारी,सावळ्या रंगाचा हा विश्वंभर साजिरे समचरण विटेवर ठेवून पुंडलिका साठी उभा आहे.श्रीहरीने गळ्यांत वैजयंती माळ परिधान केली असून दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत.एका जनार्दनीं म्हणतात, आत्मरुपाने हा परमात्मा प्रत्येक देहांत प्रतिबिंबित झाला आहे.

31

आदि भध्य अंत न कळे कोणासी | तो हृषिकेशी पंढरिये ||1||
जया वेवादती साही दरूशनें | न कळे म्हणोन स्तब्ध जाहलीं ||2||
वेडावल्या श्रुती नेती पै म्हणती | तो पुंडलिकाचे प्रीतीं विटे उभा ||3||
एका जनार्दनीं आनंदाचा कंद | उभा सच्चिदानंद भीमातीरीं|| 4||

भावार्थ

प्रत्येक देहांत आत्मरुपाने वास करुन जो सर्व इंद्रियांना आनंद देतो, जो अनादि,अनंत असून ज्याचा आरंभ, मध्य, अंत कुणालाही निश्चित करता येत नाही तो हृषिकेशी पुंडलिकाच्या प्रेमभक्तिसाठी विटेवर उभा आहे.साही दर्शने ज्या स्वरुपाचे वर्णन करतांना वादविवाद करतांना पूर्ण आकलन न झाल्याने थकून स्तब्ध झाली. श्रुती न इति असे म्हणुन नि:शब्द झाल्या तो सच्चिदानंद परमात्मा भीमातिरी उभा आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

32

देती मोक्ष मुक्ति वांटितसे फुका | ऐसा निश्चयो देखा करुनी ठेलो ||1||
सांवळें रूपडें गोजिरें गोमटें |उभें पुंडलिकें पेठे पंढरीचे ||2||
वांटितसे इच्छा जयासी जे आहे । उभारूनी बाह्या देत असे ||3||
एका जनार्दनीं देतां न सरे मागे| जाहली असती युगें अठ्ठावीस ||4||

भावार्थ

अत्यंत शोभिवंत साजिरेगोजिरे सांवळे रुप धारण करुन श्रीहरी पुंडलिकाच्या नगरी पंढरीला उभा असून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करीत आहे .मोक्ष आणि मुक्ति यांची लयलूट होत असून पुंडलिकाला दिलेले वरदान खरे करीत आहे. एका जनार्दनीं म्हणतात, अठ्ठाविस युगांपासून पांडुरंग दोन्ही हातांनी भक्तांना इच्छिले फळ देत आहे.

33

अगाध चरणांचे महिमान|वाणितां वेदा पडिलें मौन्य ||1||
पुराणें वर्णितां भागलीं | सहाशास्त्रे वेडावलीं ||2||
तें पुंडलिकाचे लोभें |एका जनार्दनीं विटे उभे|| 3||

भावार्थ

पांडुरंगाच्या चरणांचा महिमा वर्णन करताना चारी वेद नि:शब्द बनले. श्रीहरीच्या लीलांचे गुणगान गातांना अठरा पुराणे थकून गेली. परात्पर परमेश्वराच्या स्वरुपाचे यथार्थ आकलन न झाल्याने सहा शास्त्रे हतबल झाली.तो विश्वव्यापक विश्वेश्वर पुंडलिकाच्या भक्तीप्रेमामुळे विटेवर उभा आहे.असे एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात.

34

एकाच्या कैवारें | कली मारिले सर्व धुरे |
तयांसी ते बरे| आपणाशीं ठेवी|| 1||
ऐसा कृपावंत स्नेहाळ | भरलें कीर्ती भूमंडळ
| तया स्मरे हळाहळ | निशीदिनीं ||2||
भक्ति भावाचेनि प्रेमें | द्वारपाळ जाहला समे।
अद्यापि तिष्ठे नेमें । वचन तें नुल्लंघी।। 3।।
अंकितपणें तिष्टत उभा। एका जनार्दनीं धन्य शोभा।
पुंडलिकाच्या लोभा। युगें अठ्ठवीस ।।4।।

भावार्थ

एका अर्जुनाच्या प्रेमासाठी कौरवांचा सर्व सैन्यासह विनाश करून पांडवांचा सांभाळ करणारा कृपावंत,प्रेमळ श्रीहरीची किर्ती भुमंडळांत गर्जत आहे.पुंडलिकाच्या भक्तिभावाने वेडा होऊन त्याच्या द्वारपाळ बनून विटेवर तिष्टत उभा आहे.समुद्रमंथनातून निघालेले हळाहळ पचवणारे शिवशंकर या भक्तांच्या अंकित असलेल्या श्रीहरीचे रात्रंदिवस ध्यान करतात.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पुंडलिकासाठी तिष्टत उभा असलेल्या या पांडुरंगाची शोभा अवर्णनीय आहे.

35

कल्पतरू दाता पुंडलिक मुनी। तयासाठीं परब्रह्म तिष्टे अझुनी।।1।।
नवलाव गे माय नवलाव गे माय विटे ठेऊनी पाय उभा असे ।।2।।
शेष श्रमला शास्त्र भागलें। वेवादिती वहिली अठरा ज्यासी।। 3।।
आदि अंत कोणा न कळे जयाचा। मौनावली वाचा वेदादिकीं।।4।।
तो डोळेभरीं पाहिला श्रीहरी। एका जनार्दनीं येरजारी खुंटली देवा।। 5।।

भावार्थ

ज्या परात्पर परब्रह्ममाचा महिमा वर्णन करताना सहस्र जिव्हा असलेला शेष नाग अवाक् झाला. साही शास्त्रे आणि अठरा पुराणे ज्याचे वर्णन करतांना असमर्थ ठरली .ज्याचा आदि अंत कुणालाही सांगता येत नाही, जेथे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारी वाणी तटस्थ होतात तो श्रीहरी विटेवर उभा आहे ही मोठी नवलाची गोष्ट आहे या परब्रह्म परमेशाला डोळे भरुन पाहिला आणि जन्म मरणाच्या चक्रातून कायमची सुटका झाली असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, भक्तराज पुंडलिक भाविकांसाठी कल्पतरू आहे, मोक्षमुक्तीचे फळ देणारा!

36

क्षीरसागरीचें निजरूपडें । पुंडलिकाचेनि पडिपाडें ।
उभें असे तें रोकडें । पंढरिये गोजिरें।। 1।।
पहा पहा डोळेभरी। शंख चक्र मिरवे करीं।
कास कसिली पितांबरी। हृदयावरी वैजयंती।। 2।।
भीमरथी वाहे पुढं। करीत पापाचा रगडा।
पुंडलिकाचे भिडा। उभा उगा राहिला।। 3।।
शरण एका जनार्दनीं । त्रैलोक्याचा धनी।
नाचतो कीर्तनीं । भक्तांमागे सर्वदा।। 4।।

भावार्थ

क्षीरसागरांत निवास करणारे लक्ष्मीपती श्रीविष्णु पुंडलिकाच्या वचनपूर्तीसाठी गोजिरे रुप धारण करून भक्तांना साक्षात दर्शन देण्यासाठी पंढरीत उभे आहेत. हातामध्ये शंख, चक्र घेऊन , गळ्यांत वैजयंती माळ लेऊन, कमरेला पितांबर कसून भीमेच्या तीरावर उभे आहेत. भीमेच्या प्रवाहांत भाविकांचे पापक्षालन करून भक्त पुंडलिकाला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी मौन धारण करून तिष्ठत उभे आहे. जनार्दनस्वामींचे शरणागत असलेले एका जनार्दनीं म्हणतात, त्रैलोक्याचा स्वामी भगवान श्रीकृष्ण भक्तांमागे उभे राहून कीर्तनांत नाचतात,त्यांचे हे रुप डोळे भरून पहावे.

37

बहुती वर्णिला बहुतीं ध्याईला । परी तो पाहिला पुंडलिका ।।1।।
करूनी कैवाड उभा केला नीट। धरुनी दोन्ही कर कटीं देखा।। 2।।
पंचमहापातकी येताती ज्या भावे। दरूशनें त्या द्यावें वैकुंठपद।। 3।।
एका जनार्दनीं भक्तांचा अंकीत । उभाची तिष्टत अठ्ठावीस युगे।। 4।।

भावार्थ

ज्या भगवंता साठी अनेक साधकांनी ध्यानधारणा, तप केले , अठरा पुराणे लिहून अनेकांनी ज्याच्या रुपाचे वर्णन केले तो भगवान पुंडलिकाने भक्तीयोगाने कैद करुन विटेवर नीट उभा केला . दोन्ही कर कटीवर ठेवून उभे असलेले ह्या परब्रह्म रूपाचे दर्शन घेण्यासाठी अनेक महापातकी येतात आणि केवळ दर्शनाने वैकुंठपदाचा लाभ घेतात.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, भक्तांचा अंकित असा परमेश्वर अठ्ठविस युगांपासून विटेवर उभा आहे.

38

येऊनियां पंढरपुरा। उभा सामोरा पुंडलिका।। 1।।
उभारूनी बाह्या हात। भक्तां इच्छिले तें देत।। 2।।
भलते याती नारीनर । दरूशनें उध्दार सर्वांसी।। 3।।
साक्ष भीमरथी आई। एका जनार्दनीं पाही।। 4।।

भावार्थ

वैकुंठनायक श्रीपती पंढरपुरला येऊन भक्तराज पुंडलिकासमोर उभा ठाकून दोन्ही हात उभारून भक्तांना इच्छित दान देत आहे. जातीभेद, लिंगभेद न करतां दर्शनाने सर्वांचा उद्धार करीत आहे या अलौकिक दानाला भिमानदीचा प्रवाह साक्षित्वानें अखंडपणे वाहत आहे असे एका जनार्दनीं सांगतात.

39

सखी पुसे सखियेसी। युगे झालीं अठ्ठावीसी।
उभा ऐकिला संतांमुखीं। अद्यापी वर।
कटावरी कर। भीवरा तीर।
वाळुवंटीं संतसभा सभा।। 1।।
देव कांहो विटेवरी उभा उभा।। ध्रृ0।।
पुसूं नका बाई। वेदासी काई।
कळलेंचि नाही। शेष शिणल्या जाहल्या द्विसहस्र जिभा जिभा।। 2।।
जेथें करिताती गोपाळकाला। हरीनामीं तयांचा गलबला।
देव भावाचा भुकेला। मिळाले संत मदनारी।
तो हरी आला। तयांचिया लोभा लोभा।। 3।।
हरी वैकुंठाहूनी। आला पुंडलिक लागुनी।
उभा राहिला अझुनीं। युगानुयुगे। भक्तांसंगे।
एका जनार्दनीं संतशोभा शोभा।। 4।।

भावार्थ

चंद्रभागेच्या वाळवंटी संतसभा भरली असतांना अठ्ठावीस युगांपासून देव विटेवर उभा आहे अशी संतवाणी ऐकून सखी आपल्या सखीला देव विटेवर का उभा आहे असा प्रश्न विचारते.ह्या प्रश्नाचे समाधान सहस्रजिव्हाधारी शेष नाग च काय पण चारी वेद ही करु शकले नाही. भिवरेच्या तीरावर सगळे गोपाळ मिळून गोपाळकाला करतात. विठ्ठलनामाचा गजर करीत आनंदाने नाचतात .या भोळ्या भाबड्या भाविकांच्या भक्तिभावाला भुकेलेला श्रीहरी त्यांच्या लोभाने वैकुंठ सोडून भक्त पुंडलिका साठी पंढरपुरी येऊन विटेवर उभा आहे.

40

श्यामसुंदर मूर्ति विटेवरी साजिरी। पाउलें गोजिरी कोवळीं ती।। 1।।
ध्वजवज्रांकुश चिन्हे मिरवती। कटीं धरीले कर अनुपम्य शोभत।। 2।।
ऐसा देखिला देव विठ्ठलु माझे। एका जनार्दनीं त्यासी गाये।। 3।।

भावार्थ

ध्वज, वज्र, अंकुश या चिन्हांनी सुशोभित अशी श्यामसुंदर विठ्ठलमूर्ति गोजिरे पाउले विटेवर ठेवून उभी आहे. कमरेवर ठेवलेले दोन्ही कर अनुपम्य शोभून दिसतात. असा विठ्ठल डोळे भरुन पाहून एका जनार्दनीं या अभंगात देवाचे गुणगान करतात.

41

देव सुंदर घनसांवळा। कांसे सोनसळा नेसला।। 1।।
चरणीं वाळे बाकी गजर। मुकुट कुंडलें मनोहर।। 2।।
बाही बाहुवाटे मकराकार। गळां शोभे वैजयंती हार।। 3।।
एका जनार्दनीं ध्यान। विटे शोभे समचरण।। 4।।

भावार्थ

समचरण विटेवर ठेवून उभ्या असलेल्या ,मेघश्याम, सुंदर विठ्ठलाचे वर्णन एका जनार्दनीं या अभंगात करतात. या सावळ्या रंगाच्या मूर्तिच्या चरणीं छोट्या घंटा लावलेले वाळे, मस्तकावर मनोहर मुकुट, कानामध्यें कुंडले आणि गळ्यांत वैजयंती माळ शोभून दिसते आहे आहे. कटीवर ठेवलेले सुबक सुंदर बाहु मकराकार (माश्याचा आकाराचे) आहेत.

42

चतुर्भुज साजरी शोभा। चिन्मात्र गाभा साकार।। 1।।
शंख चक्र गदा कमळ। कांसे पीतांबर सोज्वळ।। 2।।
मुगुट कुंडले मेखला। श्रीवत्स शोभे वक्षस्थळां।। 3।।
निर्गुण सगुण ऐसे ठाण। एका जनार्दनीं ध्यान।। 4।।

भावार्थ

चिरंतन चैतन्याचा गाभा,निर्गुण,निराकार,परब्रह्म चतुर्भुज, सगुण रूप धारण करून भक्तांसाठी उभा आहे. चारी भुजा शंख, चक्र, गदा ,पद्म धारण केल्याने सुशोभित दिसत आहेत. कटीवर सोज्वळ पीतांबर कसला असून वर मेखला शोभत आहे. मस्तकीं मुगुट, कानी कुंडले डुलत आहेत. वक्षस्थळावर(छाती) भक्ताची पदचिन्ह दिसत आहेत. निर्गुण परमेशाच्या या सगुण,साकार रुपाचे ध्यान एका जनार्दनीं अनन्य भावाने करीत आहेत.

43

परब्रह्म पुतळा कौस्तुभ गळां । वैजयंती माळा कंठी शोभे।। 1।।
शंख चक्र गदा पद्म शोभे करीं। पीतांबरधारी चतुर्भुज।। 2।।
कटीं कडदोसें वाळे वाक्या पायीं। सुंदर रूप कान्हाई शोभता।। 3।।
लेणीयांचे लेणे भूषण साजिरें। एका जनार्दनीं गोजिरें चरण दोन्ही।। 4।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं वैकुंठीचा राणा परब्रह्म परमेशाचे वर्णन करीत आहेत. गळ्यामध्यें वैजयंती माळ कौस्तुभ मण्यासह शोभून दिसत आहे.पीतांबरधारी भगवंताने चारी हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले असून कटीवर कडदोरा व पायांमध्ये वाळे व वाक्या दिसत आहेत. कान्होबाच्या या सुंदर रूपाने धारण केलेल्या अलंकारांना अधिक तेज आले आहे.

44

चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगनीं। तैसा मोक्षदानी विटेवरी।। 1।।
बाळ सूर्य सम अंगकांती कळा। परब्रम्ह पुतळा विटेवरी ।।2।।
मृगनाभी टिळक मळवटीं शोभला।तो घननीळ सांवळा विटेवरी।। 3।।
एका जनार्दनीं ध्याचें ध्यान। ते समचरण विटेवरी।। 4।।

भावार्थ

भाविकांना मोक्ष-मुक्ती चे दान देणारा परमात्मा पौर्णिमेच्या चंद्र जसा आकाशांत शोभून दिसतो तसा विटेवर शोभत आहे. या परब्रह्म पुतळ्याची अंगकांती बालसूर्या सारखी तेजस्वी असून भाळीं कस्तुरी तिलक लावला आहे. मेघासारखा सांवळा पांडुरंग समचरण विटेवर ठेवून उभा आहे. त्याचे निरंतर ध्यान मनाला लागते असे एका जनार्दनीं म्हणतात.

45

अंगी चंदनाची उटी । माथां शोभे मयोरवेटी।। 1।।
शंख चक्र पद्म करीं। उभा विटेवरी श्रीहरी।। 2।।
भोवते उभे सनकादिक। नारद तुंबरादि आणिक।। 3।।
ऐसा आनंद सोहळा। एका जनार्दनीं पाहे डोळां।। 4।।

भावार्थ

चंदनाची उटी अंगाला लावलेला, मस्तकावर मोरपिसांचा तुरा खोवलेला, हातांमध्ये शंख, चक्र, कमळ धारण केलेला श्रीहरी विटेवर उभा असून सभोवतालीं नारद, तुंबर उभे आहेत असा आनंद सोहळा एका जनार्दनीं अवलोकन करीत आहेत. असे या अभंगांत सांगतात.

46

शोभती दोनी कटीं कर। रूप सांवळें सुंदर।
केशराची उटी नागर। गळां माळ वैजयंती।। 1।।
वेधें वेधक हा कान्हा। पहा वेधतुसे मना।
न बैसेचि ध्याना। योगियांच्या सर्वदा ।।2।।
उभारूनी दोन्ही बाह्या। भाविकांची वाट पाहे।
शाहाणे न लभती पाय। तया स्थळीं जाऊनी।। 3।।
ऐसा उदार मोक्षदानी। गोपी वेधक चक्रपाणी।
शरण एका जनार्दनीं नाठवे दुजे सर्वदा।। 4।।

भावार्थ

सर्वांगाला केशराची उटी लावून , गळ्यांत वैजयंती माळ परिधान करून दोन्हीं कर कमरेवर ठेवून भाविकांची वाट पाहत उभा असलेला हा कान्हा अंत:करणाला वेध लावतो. हे सांवळे सुंदर रुप निरंतर ध्यान लावून साधना करणार्या योगीजनांना ध्यानात सापडत नाही. वेदशास्त्र जाणणार्या ज्ञानी लोकांना पंढरीला जाऊनही या चरणांचे दर्शन घडत नाही. तो उदार मोक्षदानी चक्रपाणी सामान्य गोप-गोपींच्या भक्तीला भुलून युगानुयुगे वाट पाहतो. एका जनार्दनीं या पांडुरंगाला अनन्यभावे शरण जातात.

48

सगुण निर्गुण मूर्ति उभी असे विटे। कोटी सूर्य दाटे प्रभा तेथें।। 1।।
सुंदर सगुण मूर्ति चतुर्भुज। पाहतां पूर्वज उध्दरती ।।2।।
त्रिभुवनीं गाजे ब्रीदाचा तोडर। तोचि कटीं कर उभा विटे।। 3।।
एका जनार्दनीं नातुडे जो वेदां। उभा तो मर्यादा धरूनि पाठी।। 4।।

भावार्थ

सत्व, रज, तम या गुणांच्या अतित असलेल्या परब्रह्म परमात्म्याचे सगुण रूप विटेवर उभे आहे. कोटी सूर्याचे तेज या मूर्तीच्या मुखावर एकवटले आहे. ही सगुण, सुंदर, चतुर्भुज मूर्ति पाहताच अनंत पापांच्या राशी लयास जावून पूर्वजांचा उध्दार होतो. भक्त वत्सल हे भगवंताचे ब्रीद स्वर्ग पृथ्वी आणि नरक या तिन्ही भुवनांत गाजत असून करातिल तोडर हे ब्रीद सार्थ करतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, ज्याच्या स्वरुपाचे रहस्य वेदांना सुध्दां आकलन होत नाही तो देवाधिदेव भक्तिच्या मर्यादा सांभाळून विटेवर उभा आहे.

49

आल्हाददायक श्रीमुख चांगले। पाहतां मोहिले भक्त सर्व ।।1।।
गाई गोपाळ वेधिल्या गोपिका। श्रीमुख सुंदर देखा साजिरे तें।। 2।।
आल्हाददायक तें मुखकमळ। वैजयंती माळ हृदयावरी ।।3।।
एका जनार्दनीं पाहतां रुपडें । आनंदी आनंद जोडे आपोआप।। 3।।

भावार्थ

पांडुरंगाचे प्रसन्न श्रीमुख पाहून सर्व भाविकांचे मन मोहून जाते. गोपाळ गोपिकाच नव्हे तर गाई सुध्दां त्या रूपाकडे आकर्षित होतात.गळ्यांत वैजयंतीमाला असलेले हे मुखकमल अतिशय आल्हाददायक दिसते. असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, हे रूप पाहतांच मनातील आनंदाला भरती येते.

50

व्यापक तो हरी पंढरिये राहिला। वेदांदिकां अबोला जयाचा तो।। 1।।
सांवळें नागर कटीं ठेउनी कर। वैजयंती हार तुळशी गळां ।।2।।
एका जनार्दनीं विश्वव्यापक। उभाची सम्यक विटेवरी।। 3।।

भावार्थ

विश्वंभर विश्वव्यापक परमेश्वर मूर्तरूपांत पंढरींत निवास करतो. सांवळे, सुंदर कर कमरेवर ठेवून भक्ती प्रेमामुळे हा वैकुंठपती विटेवर तिष्ठत उभा आहे.परब्रह्मपरमेशाचे हे स्वरूप पाहून वेडावलेले वेद मूक झाले आहेत असे एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात.

51

जयाकारणें योगी रिघती कपाटीं। तो उभा असे तटीं चंद्रभागे ।।1।।
सांवळे रूपडें गोजिरे गोमटें ।धरिलें दोन्ही विटे समचरण।। 2।।
वैजयंती माळा तुळशीहार मिरवला। निढळीं शोभला चंदन वो माय।। 3।।
एका जनार्दनीं मौन्य धरूनी उभा। चैतन्याचा गाभा पांडुरंग।। 4।।

भावार्थ

ज्या स्वरुपाचे यथार्थ ज्ञान मिळवण्यासाठी योगीजन गिरीकंदरी राहून निरंतर तप करतात तो चैतन्याचा गाभा पांडुरंग चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे. सांवळ्या रंगाचे गोजिरे सुंदर रूप धारण करून विटेवर समचरण ठेवून उभा आहे. कपाळीं चंदनाचा टिळा, गळ्यांत तुळशीहार आणि वैजंयती माळ शोभून दिसत आहे. एका जनार्दनीं मूकपणे या पांडुरंगाचे रूप डोळ्यांत साठवत आहेत.

53

गगनामाजीं जैसे शोभे तारांगण ।तैसा विटेवरी शोभे समचरण।। 1।।
देखतांचि मना समाधान होय। आनंदी आनंद होय ध्यातां जया।। 2।।
चतुर्भुज शंख चक्र ते शोभती । गळां वैजयंती मिरवे शोभा।। 3।।
कांसे पीतांबर मेखला झळाळ। एका जनार्दनीं भाळ पायांवरी।। 4।।

भावार्थ

आकाशात जसे चंद्र आणि चांदण्या शोभून दिसतात तसा विटेवर समचरण ठेवून उभा असलेला, शोभून दिसणारा पांडुरंग पाहून मनाला समाधान होते. या पुरुषोत्तमाचे ध्यान धरल्यास चित्त आनंदित होते. चारही भुजांत शंख, चक्र, गदा, पद्म आणि गळ्यातील वैजयंतीमाळेची शोभा केवळ अवर्णनीय आहे. कमरेला पीतांबर व त्यावर मेखला झळकत आहे असे वर्णन करुन एका जनार्दनी भक्तीभावाने पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवतात.

५४

अनंताचे अनंत गुण । अपार पार हे लक्षण ।
तो समचरण ठेवून । विटे उभा राहिला ।।१।।
करी दास्यत्व काळ । भक्तजना प्रतिपाळ ।
उदार आणि स्नेहाळ । तो उभा भीवरे ।।२।।
धीर सर्वस्वे बळसागर । निद्रा करी शेषावर ।
लक्ष्मी समोर । तिष्ठतौ सर्वदा ।।३।।
खेळे कौतुके खेळ । तोडी भक्तांचे मायाजाळ ।
एका जनार्दनी कृपाळ । स्वामी माझा विठ्ठल ।।४।।

भावार्थ

अनंत गुणांचा सागर असलेला, ज्याचा महिमा अपरंपार असून काळाचा नियंता शिवशंकर ज्याचे दास्यत्व करीत आहे, जो अत्यंत उदार, प्रेमळपणे भक्तांचा सांभाळ करणारा आहे असा देवाधिदेव भीवरेच्या तिरी उभा आहे. अत्यंत धीरोदात्त, बलशाली भगवंत क्षीरसमुद्रात शेषशय्येवर निद्रा करतो. सदासर्वदा प्रत्यक्ष लक्ष्मी सेवेसाठी समोर आहे, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अत्यंत कृपाळु असा परमेश्वर कौतुकाने लीला करून भक्तांचे विश्वरुपी मायाजाल तोडून मोक्षपद देणारा विठ्ठल भक्तांचा स्वामी आहे.

५५

वेदे सांगितले पुराणी आनुवादिले । शास्त्र बोले बोलत पांगुळले ।।१।।
न कळेचि कोणा शेषादिका मती । कुंठिता निश्चिती राहियेल्या ।।२।।
श्रुती अनुवादती नेति नेति पार । तोचि सर्वेश्वर उभा विटे ।।३।।
एका जनार्दनी ठेवुन कटी कर । उभा असे तीरी भीवरेच्या ।।४।।

भावार्थ

सर्वेश्वर सर्वव्यापी भगवंताची चारी वेद भरभरुन स्तुती करतात.अठरा पुराणे भक्तांच्या अनेक कथा सांगून वेदांना अनुमोदन देतात. सहस्र मुखांचा शेष या परब्रह्म परमेशाचे स्वरूप वर्णन करतांना मती गुंग होऊन मूक होतो. व्यतिरेकाने या सर्वेश्वराचे स्वरूप निश्चित करतांना श्रुती हतबल होतात असे मत व्यक्त करुन एका जनार्दनी म्हणतात, वेद, श्रुती, पुराणे यांना अनाकलनीय असा हा परमात्मा कटीवर कर ठेवून भीवरेच्या तीरावर उभा आहे.

५६

वेदांचा विवेक शास्त्रांचा हा बोध । तो हा परमानंद विठ्ठलमूर्ती ।।१।।
पुराणासी वाड साधनांचे कोड । ते गोडाचे गोड विठ्ठलमूर्ती ।।२।।
ब्रह्मादी वंदिती शिवादि ज्या ध्याती । सर्वांसी विश्रांती विठ्ठलमूर्ती ।।३।।
मुनीजनांचे ध्यान परम पावन । एका जनार्दनी पावन विठ्ठलमूर्ती ।।४।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनी पंढरीच्या विठ्ठलाचा अगाध महिमा वर्णन करतात. हा पांडुरंग वेदमूर्ती असून ज्ञानाची खाण आहे. अठरा पुराणे भागवत धर्मातितील भक्तीरसाचे सविस्तर वर्णन करतात. या मधुर भक्तीरसाचे माधुर्य या विठ्ठलमूर्तीत एकवटले आहे. सृष्टीचे सृजन करणारे ब्रह्मदेव या पांडुरंगाला वंदन करतात आणि शिवादिदेव या विठ्ठलमूर्तीचे ध्यान करतात. मुनीजनांच्या तपसाधनेचा, ध्यानधारणेचा हा परमात्मा हा आवडता विषय आहे. परम पावन अशी ही विठ्ठलमूर्ती आहे.

५७

वेदी जैसा वर्णिला । तैसा विटेवरी देखिला ।।१।।
पुराणे सांगती ज्या गोष्टी । तो विटेवरी जगजेठी ।।२।।
शास्त्रे वेवादती पाही । तोचि विटे समपाई ।।३।।
न कळे न कळे आगमा । निगमांही न कळे सीमा ।।४।।
जाला अंकित आपण । एका जनार्दनी शरण ।।५।।

भावार्थ

वेदांनी या जगजेठीचे जसे वर्णन केले आहे, त्याच स्वरूपांत तो विटेवर पाहिला असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पुराणे कथारूपाने आणि साही शास्त्रे वादविवाद करून ज्या परमेशाचे गुणगान करतात तोच विटेवर समचरणीं उभा आहे. भक्तीप्रेमाने अंकित असलेल्या या भगवंताच्या महिमा चारी वेद, श्रुती ,पुराणे यथार्थपणे करू शकत नाही. त्या पांडुरंगाला अन्यनभावे शरण जावे.

58

वेदांचे सार निगमाचे माहेर। तो हा परात्पर उभा विटे।। 1।।
शास्त्रांचे निजघर पुराणाचे निजसार। तो हा विश्वंभर उभा विटे।। 2।।
काळाचा तो काळ भक्तांचा प्रतिपाळ। तो हा दीनदयाळ उभा विटे।। 3।।
एका जनार्दनीं शोभे दीनमणी। भक्त भाग्य धणी पंढरीये।। 4।।

भावार्थ

विटेवर उभा असलेला हा विश्वंभर चारी वेदांचे सार असून श्रुतींचे माहेरघर आहे. साही शास्त्रे याच परमात्म तत्वातून निर्माण झाली असून अठराही पुराणे याच पुराणपुरूषाच्या चरित्रकथा सांगतात. सृष्टीचा संहार करणार्या काळावर ज्याची सत्ता चालते तो दीनदयाळ भक्तांचा सांभाळ करण्यासाठी विटेवर सूर्यासारखा तळपत उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, पंढरपूरच्या भक्तांचे भाग्य च फळाला आले आहे.

59

जयाची समदृष्टी पाहूं धांवे मन। शोभते चरण विटेवरी।।1।।
कानडे कानडे वेदांसी कानडें। श्रुतीसी जो नातुडें गीतीं गातां ।।2।।
परात्पर साजिरें बाळरूप गोजिरे। भाग्याचे साजिरे नरनारी।। 3।।
एका जनार्दनीं कैवल्य जिव्हाळा। मदनाचा पुतळा विटेवरी।। 4।।

भावार्थ

ज्याच्या दर्शन सुखासाठी भाविकांचे मन आतुर होते त्या कानडा ( देह तीन ठिकाणी वाकवून उभा असलेला) विठ्ठलाचे चरण विटेवर शोभून दिसतात. वेद आणि श्रुती या कैवल्यदानी पांडुरंगाचे सतत गुणगान करतात त्यांना सुध्दां त्या स्वरुपाचे रहस्य पूर्णपणे आकलन होत नाही. परात्पर परब्रह्माचे सांवळे, गोजिरे बाळरूप ज्यांच्या घरीं नांदत आहे ते पंढरीचे निवासी भाग्यवंत आहेत असे एका जनार्दनीं म्हणतात.

60

वेदांचें सार निगमाचें माहेर । तो हा परात्पर उभा विटे ।।1।।
शास्त्रांचे निजघर पुराणाचे निजसार। तो हा विश्वंभर उभा विटे।। 2।।
काळाचा तो काळ भक्तांचा प्रतिपाळ। तो हा दीनदयाळ उभा वाटे।। 3।।
एका जनार्दनीं शोभे दीनमणी। भक्त भाग्य धणी पंढरीये।। 4।।

भावार्थ

ज्याच्या स्वरूपातून चारी वेद निर्माण झाले आहेत, सारी उपनिषदे जेथून उत्पन्न झाली आहेत तो परात्पर परमात्मा साही शास्त्रे आणि अठरा पुराणे यांच्या चिंतनाचा मुख्य विषय आहे. प्रत्यक्ष काळावर ज्याची सत्ता चालते तो दीनदयाळ भक्तांचा सतत सांभाळ करतो. एका जनार्दनीं म्हणतात, पंढरीच्या भक्त-जनांचे भाग्य फळाला आले असून हा विश्वंभर उगवत्या सूर्याप्रमाणे विटेवर शोभून दिसत आहे.

61

जया कारणें वेद अनुवादती। शास्त्रे पुराणें भांडती ।।1।।
तो हा देवाधिदेव बरवा। विठ्ठल ठावा जगासी ।।2।।
नये श्रुतीसी अनुमाना। तो देखणा पुंडलिका।। 3।।
आगमा निगमा, न कळें पार । एका जनार्दनीं निर्धार।। 4।।

भावार्थ

चारी वेद ज्याच्या उपदेशाचे अनुसरण करतात. शास्त्रे, पुराणे ज्याच्या स्वरूपाची चर्चा करीत वादविवाद करतात तो देवाधिदेव विठ्ठल रूपाने सर्व भाविकांना माहित आहे. श्रुती ज्याचे स्वरूप आकलन करू शकत नाही तो भक्त पुंडलिकाने सहज प्रेम भक्तीने आपलासा केला आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात , या अपरंपार विश्वंभराचा महिमा वेद, उपनिषदे यांना निश्चितच समजला नाही.

62

शेषादिक श्रमले वेद मौनावले। पुराणे भागलीं न कळे त्यांसी।। 1।।
तोचि हा सोपा सुलभ सर्वांसी। विठ्ठल पंढरीसी उघड डोळा।। 2।।
शास्त्रांचिया मता न कळे लाघव। तो हा विठ्ठलदेव भीमातीरीं ।।3।।
कर्म धर्म जयालागीं आरती। ती ही उभी मूर्ति विटेवरी।। 4।।
आगमा निगमां न कळे दुर्गमा ।एका जनार्दनीं प्रेमा भाविकांसी ।।5।।

भावार्थ

सहस्त्र मुखे असलेला शेष नाग या परब्रह्म स्वरूपाचे वर्णन करतांना थकून गेला. वेद नि:शब्द होऊन त्यांनी मौन धारण केले. त्या पूर्णानंद परमेश्वर चरित्राच्या कथा सांगून पुराणे स्तब्ध झाली. शास्त्रांची मती कुंठित झाली. ज्याच्या प्राप्तीसाठीं कर्मयोगी यज्ञ जप तप करतात, तत्वज्ञानी तर्कशास्त्राचा आधारावर हे परमात्म तत्व जाणून घेण्याचा अटोकाट प्रयास करतात तो वेदमूर्ती पांडुरंग भाविकांची वाट पहात विटेवर उभा आहे असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.

63

पाउलें गोजिरी ध्यान विटे मिरवलें। शोभत तान्हुलें यशोदेचे।। 1।।
न कळे पूराणां शास्त्रादि साम्यता। तो हरी तत्वतां पंढरिये ।।2।।
एका जनार्दनीं ऐक्यरूप होउनी। भक्तांची आयणी पुरवितसे।। 3।।

भावार्थ

गोजिरे पाउले विटेवर ठेवून उभा असलेला यशोदेचा कान्हा शोभून दिसते आहे.शास्त्रे आणि पुराणे यांचे ज्याच्या स्वरूपाविषयी एकमत होत नाही तो श्रीहरी भाविकांच्या भोळ्या भक्तीप्रेमाशी एकरुप होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करीत आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

64

परा ही पश्यंती मध्यमा वैखरी। वसे तो श्रीहरी पंढरीये देखा ।।1।।
चारी वाचा तया सदोदित गाती। पुराणें भांडती अहोरात्र।। 2।।
वेद श्रुति नेति नेति म्हणताती। तो पुंडलिकापुढें प्रीती उभा असे।। 3।।
सनकसनंदन जयासी पैं ध्याती । तो हरी बाळमूर्ती खेळतसे।। 4।।
योगियां हृदयींचें ठेवणें सर्वथा। एका जनार्दनीं तत्वतां वोळखिलें।। 5।।

भावार्थ

परा, पश्यंती, मध्यमा वैखरी या चारी वाणी सदोदित ज्याच्या गुणरुपाचा महिमा गातात, पुराणे रात्रंदिवस वादविवाद करतात, वेद आणि उपनिषदे ज्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी तत्वज्ञानाचा आधार घेऊन अट्टाहास करतात. तो श्रीहरी भक्तराज पुंडलिकापुढे भक्तीप्रेमाने वेडा होऊन उभा आहे. सनक, सनंदन मुनी ज्याचे ध्यान लावून साधना करतात तो श्रीहरी बाळस्वरूपांत गोप गोपिकांसवे क्रीडा करतो. हेच परमात्मा तत्व योगी जनांच्या अंतरीचा ठेवा आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

65

योगियांचा योग साधन तें चांग। तो पांडुरंग विटेवरी ।।1।।
मुमुक्षु संपदा ज्ञानीयांचा बांधा। तो पांडुरंग बोधा विटेवरी।। 2।।
सच्चिदानंद अमूर्त मधुसूदन। एका जनार्दन विटेवरी।। 3।।

भावार्थ

योगी जनांच्या योग साधनेचे लक्ष असलेला पांडुरंग पंढरीला विटेवर उभा आहे. मोक्षसंपदा संपादन करण्यासाठी यज्ञयाग, जप, तप अशी खडतर साधना करणारे योगी ज्या परमात्म तत्वाचे निरंतर चिंतन करतात तो सच्चिदानंद ,निराकार, निर्गुण मधुसुदन विठ्ठलरूपाने विटेवर उभा आहे असे एका जनार्दनीं सांगतात.

66

कर्मी कर्मठपणा धर्मी धर्मिष्ठपण। हीं दोन्ही अनुसंधाने चुकती जगीं।। 1।।
कर्माचे जें कर्म धर्माचा अधिधर्म। तो हा सर्वोत्तम विटेवरी।। 2।।
निगमाचे निजसार आगमाचे भांडार। न कळे ज्याचा पार वेदशास्त्रा।। 3।।
एका जनार्दनीं श्रुतीसी नाकळे। तो भक्तिवळें उभा विटे।। 4।।

भावार्थ

यज्ञयाग, पूजा अर्चना, जप, तप ईश्वर प्राप्ती साठी ही कर्मे करणार्या कर्मयोग्यामध्यें निर्माण होणारा कर्मठपणा आणि धर्मनिष्ठ धार्मिक मार्तंडामध्ये असलेला अंध धर्माभिमान असे दोष निर्माण होतात असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, कर्मयोग्यांचा कर्मयोग, धार्मिकांचे धर्मतत्व तसेच उपनिषदांचे सार आणि वेदांचे तत्वज्ञान भगवतभक्ती रुपाने विटेवर उभे आहे. पांडुरंगाचा हा अवतार वेद आणि श्रृती यांना अनाकलनीय आहे.

67

सिध्द साधक जया हृदयीं ध्याती । तो गोपिकेचा पती विठ्ठलराव।। 1।।
सांवळें सांवळें रूप ते सांवळें। देखतांचि डोळे प्रेमयुक्त।। 2।।
जीवाचे जीवन मनाचें उन्मन। चैतन्यघन पूर्ण विटेवरीं।। 3।।
एका जनार्दनीं आनंद अद्वय। न कळे त्याची सोय ब्रह्मादिकां।। 4।।

भावार्थ

जे जे जगीं जगते त्यांना चैतन्य देणारा, मनाचे उदात्तीकरण करणारा असा चैतन्यमूर्ती, गोपीकेचा स्वामी सांवळा विठ्ठल विटेवर उभा असून त्याच्या दर्शनाने अंतरांत प्रेम दाटून येते. एका जनार्दनीं म्हणतात, हा चैतन्यघन परमात्मा अद्वितीय आनंद देणारा असून ब्रह्मादिक देव याच्या अवतार लीलांचे रहस्य जाणूं शकत नाही.

68

सप्त दिन जेणे गोवर्धन धरिला। काळिया नाथिला देउनी पाय।। 1।।
तो हा गोपवेषे आला पंढरपुरा। भक्त समचारा विठ्ठल देवो।। 2।।
बाळपणीं जेणे पूतने शोषले। अघ बघ मारिले खेळु खेळे।। 3।।
कंसचाणुराचा करूनियां घात। केला मथुरानाथ उग्रसेन।। 4।।
समुद्राचे तटीं द्वारके उभविलें। सोळा सहस्त्र केले कुटुंबासी।। 5।।
धर्माचीये घरीं उच्छिष्ट काढिलें। दुष्ट या वधिलें कौरवांसी।। 6।।
एका जनार्दनीं ऐसी बाळलीला । खेळ खेळोनी वेगळा पंढरीये।। 7।।

भावार्थ

इंद्राच्या क्रोधाने कोसळणार्या मुसळधार पावसापासून गोकुळातिल लोकांचे रक्षण करण्यासाठी श्री कृष्णाने गोवर्धन पर्वत एका करांगुलीवर सात दिवस तोलून धरला. यमेनेच्या डोहांत राहून पाणी विषारी करणार्या कालिया नागाला यमुनापार केले. बाळपणीं ज्याने पुतना राक्षसीच्या शरीरातिल विष शोषून तिला ठार केले. खेळ खेळताना याच श्रीहरीने अघ, मघ या राक्षसांचा संहार केला. आपला कंसमामा आणि चाणुराचा वध करुन मथुरा नगरीला जुलमी राजसत्तेतून मुक्त करून पदभ्रष्ट झालेल्या आपल्या आजोबांना राजपद मिळवून दिले. सागराच्या तटावर द्वारका नावाची सुंदर नगरी वसविली.नरकासुराचा कारागृहातून सोळा सहस्र स्त्रियांची मुक्तता करून त्यांना पत्नीपदाचा मान देवून सन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा केला. पांडवांच्या राजसूय यज्ञाचे वेळी आपले राजपद विसरून श्रम प्रतिष्ठा वाढविण्यासाठी उष्टया पत्रावळी उचलण्याचे काम केलें. कौरवांची जुलमी सत्ता उखडून टाकून पांडवांना न्यायाचे राज्य स्थापन करण्यासाठी मदत केली. श्री कृष्ण चरित्रातिल या महत्वाच्या घटना सांगून एका जनार्दनीं म्हणतात, असा पुरुषोत्तम भक्तांच्या उध्दारासाठी गोपवेष धारण करुन पंढरपुरा आला. या बाळलीला खेळून त्या पासून वेगळा होउन विठ्ठरूपानें समचरणीं विटेवर उभा आहे.

69
अवघियांसी विश्रांतीस्थान । एक विठ्ठल चरण।। 1।।
देह वाचा अवस्थात्रय।अवघें विठ्ठलमय होय।।
जागृतीं स्वप्नीं सुषुप्तीं । अवघा विठ्ठलचि चित्ती ।।3।।
जनीं वनीं विजनीं। शरण एका जनार्दनीं ।।4।।

भावार्थ

विटेवरचे विठ्ठलचरण हे भाविकांचे विश्रांतीस्थान असून या चरणांचे दर्शन होतांच काया, वाचा, मन हे या विठ्ठलरूपाशी एकरुप होतात. जागेपणीं ,स्वप्नांत आणि गाढ निद्रेत असताना हे विठ्ठरुप चित्ताला व्यापून राहते. नगरांत, जनसमुदायांत, वनांत किंवा निर्जनस्थळीं सर्वत्र हा विठ्ठल भरून राहिलेला आहे अशी प्रचिती येते. एका जनार्दनीं परमात्म दर्शनाचा हा आगळावेगळा अनुभव या अभंगात वर्णन करतात.

70

जयालागीं शिणती रात्रंदिन। यज्ञ यागादी करिती हवन।
ध्येय ध्यान धारणा अनुष्ठान। साधिती अष्टांग आणि पवन ।।1।।
तो गे माय सोपा केला सर्वांसी। लांचावला देखोनि भक्तीसी।
उभा राहिला युगे अठ्ठावीस विटेसी। न बोले न बैसे नुल्लंघी मर्यादेसी।। 2।।
एका जनार्दनीं कृपेचा सागर। भक्त करूणाकर तारू हा दुस्तर।
उभा भीवरेचे तीरीं कटीं धरुनी कर। जडजीवां दरूशने उध्दार।। 3।।

भावार्थ

ज्या परात्पर परमेशासाठी साधक रात्रंदिवस विविध प्रकारे साधना करतात. यज्ञ, याग, होमहवन करतात. तर कांहीं ध्यान, धारणा, व्रत, अनुष्ठाने करतात. हटयोगी अष्टांग योगाची साधना करतात. तो भगवंत भक्तिमार्गाने सामान्य जनांसाठी सहजसुलभ केला. भोळ्याभाबड्या भक्तिभावाने वेडा होऊन अठ्ठाविस युगे विटेवर उभा राहिला आहे. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तांवर करुणा करणारा हा कृपासागर असून भवसागर तारून नेणारा नावाडी भीवरेच्या तीरावर उभा राहून आपल्या चरण दर्शनाने जड जीवांचा उध्दार करतो.

71
सर्वा आदि मूळ न कळे अकळ। तो भक्त प्रतिपाळ भीमातीरीं ।।1।।
योगियांच्या ध्याना न ये अनुमाना। कैलासीचा राणा ध्यात ज्यासी।। 2।।
शुकादिका ज्याचा वेध अहर्निशीं तो उभा हृषिकेशी विटेवरी।। 3।।
एका जनार्दनीं ब्रह्म परिपूर्ण। सगुण निर्गुण तोचि एक।। 4।।

भावार्थ

अनादी अनंत निर्गुण निराकार परब्रह्म भक्तांचा प्रतिपाळ करण्यासाठी सगुणरुपांत प्रकट होऊन भिमातिरी साकार रूपांत उभे आहे. ज्याच्या स्वरुपाचे कैलासीचा राणा निरंतर ध्यान करतो. शुका सारखे परम विरागी रात्रंदिवस ज्याच्या स्वरुपाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात तो सर्व इंद्रियांना सुखानंद देणारा (हषिकेशी) जीवसृष्टीचे आदिमूळ आहे असे स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात, सगुण निर्गुण ही दोन्हीं एकाच परब्रह्माची दोन रुपे आहेत.

72

सगुण निर्गुण बुंथीचे आवरण। ब्रह्म सनातन पंढरीये।। 1।।
तो हा श्रीहरी नंदाचा खिल्लारी। योगी चराचरीं ध्याती जया ।।2।।
शिवाचे जे ध्येय मुनिजनांचे ध्यान। ब्रह्म परिपूर्ण पंढरिये।। 3।।
एका जनार्दनीं अठरां निराळा । लाविलासे चाळा सहां चहुंसी।। 4।।

भावार्थ

कळीकाळाचा नियंता शिवशंकर, मुनिजन आणि योगीजन ज्याच्या स्वरुपाचे यथार्थ ज्ञान मिळवण्यासाठी ध्यानमग्न होऊन अविरत साधना करतात ते सनातन परब्रह्म श्रीहरी रुपाने नंदाच्या घरीं गाई राखतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, सगुण आणि निर्गुण हे केवळ देहाचे आवरण असून अठरा पुराणे ज्या स्वरुपाचे वर्णन करतात ते अनाकलनीय असून चारी वेद आणि साही शास्त्रे या स्वरुपाचे रहस्य जाणून घेण्यासाठी सतत प्रयत्न करतात.

73

कैवल्याची रासी वैष्णवांच्या घरीं। मुक्ति भुक्ति कामारी आहे जेथे।। 1।।
तो हा विठ्ठल निधार परेपरता उभा। सांवळी ती प्रभा अंगकांती।। 2।।
मुनिजनांचे ध्येय योगियांचे उन्मन। ज्या पैं माझें लीन चित्त जाहलें।। 3।।
जया अष्टांग योगां सांकडें साधित। तें उघडें पाहतां उभे विटेवरीं।। 4।।
एका जनार्दनीं सगुण निर्गुण। यापरतां चैतन्यघन उभा असे।। 5।।

भावार्थ

ज्या वैष्णवांच्या घरी भुक्ति मुक्ति पाणी भरतात तेथें सावळ्या रंगाची तेजस्वी अंगकांती असलेला कैवल्यदाता श्रीहरी विठ्ठलरुपाने उभा राहिला आहे. मुनीजनांची ध्येयपूर्ती करणारा ,योगीजनांच्या योगसाधनेत मनाचे उन्मन (उच्चतर पातळीवर) स्थिर करण्यात सहाय्य करणारा, अष्टांग योगाची साधना करणार्यांच्या योगसाधनेतिल अडचणी (सांकडें) दूर करणारा ,सगुण निर्गुण या पलिकडचे चैतन्यतत्व भाविकांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभे आहे असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात.

74

एकाचीं काजें फिटलें सांकडे । उगविली कोडे बहुतांची।।1।।
तोचि हरी उभा चंद्रभागा तरी। कर ठेउनी कटीं अवलोकित।। 2।।
पडतां संकट धांवतसे मागें। गोपाळांचिया संगे काला करी।। 3।।
चोरूनी शिदोरी खाय वनमाळी। प्रेमाचे कल्लोळीं आनंदाने।। 4।।
यज्ञ अवदानीं करी वांकुडें तोंड। लोणी चोरितां भांड गौळणी म्हणती।। 5।।
एका जनार्दनीं ठेवणें संतांचे उभें तें साचे विटेवरी।। 6।।

भावार्थ

एका भक्त पुंडलिकासाठी अनेक भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारा श्रीहरी चंद्रभागेच्या तिरावर दोन्ही कर कटीवर ठेवून अवलोकन (निरिक्षण) करीत उभा आहे. संकटकाळीं तो भक्तांना मदत करण्यासाठी धांवत जातो. गोपाळांबरोबर गोपालकाला करतो. यज्ञातिल अविर्भाग (प्रसाद) स्विकारतांना नाराज असलेला श्रीपती गौळणींघरचे लोणी आणि शिदोरी चोरुन आनंदाने खातो. एका जनार्दनीं म्हणतात, संतांघरचा हा ठेवा पंढरीला विटेवर उभा आहे.

75

एकाचिया द्वारीं भीकचि मागणें। उभेंचि राहाणें एका द्वारी।।1।।
एकाचिया घरीं उच्छिष्ट काढणे। लोणी जें चोरणें एका घरी।। 2।।
एकाचिये घरीं न खाये पक्वान्न। खाय भाजीपान एका घरीं।। 3।।
एकाचिये घरीं व्यापुनी राहाणें। एकाती तो देणें भुक्तिमुक्ती।। 4।।
एका जनार्दनीं सर्वठायीं असे। तो पंढरीये वसे विटेवरी।। 5।।

भावार्थ

वामन अवतारांत दैत्यराजा बळी याच्या दारांत उभे राहून तीन पावले भूमीचे दान मागणारा श्रीपती राजसूय यज्ञांत पांडवांच्या घरीं उष्टया पत्रावळी उचलतो. नंद यशोदेच्या घरचे लोणी चोरून खातो. दुर्योधनाच्या राजवाड्यातिल पक्वानें नाकारणारा श्रीहरी द्रौपदीच्या थाळीतिल भाजीचे उरलेले पान खाऊन तृप्त होतो. सुदाम्याचे पोहे मिटक्या मारत खातो आणि विदुराच्या घरी समाधानाने निवास करतो. भोळ्याभाबड्या भाविकांना भुक्तिमुक्ती देणारे, सर्व जिवांमध्ये चैतन्यरुपाने अस्तित्वांत असणारे परब्रह्म पंढरींत विटेवर उभे आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

७६

कृपाळु माउली अनाथा साउली । उभी ती राहिली विटेवरी ।।१।।
भक्त करूणाकर कैवल्याचा दानी । उभा तो जघनी ठेवूनी कर ।।२।।
मोक्षमुक्ति फुका वाटितो दरुशने । नाही थोर सान तयासी तेथे ।।३।।
एका जनार्दनी एकपणे उभा । कैवल्याचा गाभा पांडुरंग ।।४।।

भावार्थ

अनाथांना आपल्या कृपेची सावली देणारी विठ्ठलमाऊली विटेवर उभी ठाकली आहे. भक्तांवर करूणा करून त्यांना मोक्षपद देणारा कैवल्यदानी उच्चनीच, लहानथोर असा भेदभाव न करता केवळ भक्तीभावाने दर्शनास येणाऱ्या सर्वांना मोक्ष-मुक्तीचे दान देणारा कैवल्याचा गाभा एकपणे उभा आहे असे एका जनार्दनी या अभंगात स्पष्ट करतात.

७७

सकळ देवा शिरोमणी । सकळ तीर्थे वंदिती चरणी ।
सकळासी मुगुटमणी । तो उभा पंढरीये ।।१।।
सकळ तेजाचा पुतळा । सकळ जयांच्या अंगी कळा ।
सकळ जीवांचा आकळा । तो उभा राहिला विटेवरी ।।२।।
सकळ मंत्रांचा मंत्र । सोपा सकळ पवित्र ।
सकळ पर्वकाळ परत्र । दर्शनेचि घडती ।।३।।
सकळ अधिष्ठानांचे सार । सकळ गुह्यांचे माहेर ।
सकळ भक्तांचे जे घर । निजमंदिर पंढरी ।।४।।
सकळ वैराग्याचा निधी । सकळां कृपेची तो मांदी ।
एका जनार्दनी निरूपाधी । आशापाश विरहित ।।५।।

भावार्थ

सर्व पवित्र तीर्थे ज्याच्या चरणांना वंदन करतात असा देवाधिदेव पंढरीत उभा आहे. सर्व विद्या आणि कला ज्याला अवगत आहेत असा अत्यंत तेज:पुंज असा पंढरीनाथ विटेवर उभा राहिला आहे. सर्व पवित्र मंत्रांना ज्याचे अधिष्ठान आहे, तो सकळ गुह्य गोष्टींचे माहेरघर असून त्याचे मंगलमय मंदिर पंढरी हे सकळ भक्तांचे घर आहे. वैराग्यरुपी धनाचा मालक असून आशापाशविरहित आहे. या पंढरीनाथाला कोणत्याही प्रकारची उपाधी नसून सकळांवर कृपेची सावली धरणारी कृपामुर्ती आहे असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात.

७८

जीव शिव व्यापूनि राहिला वेगळा । परब्रह्म पुतळा विटेवरी ।।१।।
तयाचिये पायी वेधले मन । झाले समाधान पाहता रुप ।।२।।
विश्रांति समाधि लोपोनिया ठेली । पाहता सावळी मूर्ति देखा ।।३।।
एका जनार्दनी सर्वा वेगळा । तो बाळलीला खेळे कृष्ण ।।४।।

भावार्थ

चैतन्यरुपाने सजीवसृष्टीतील सर्व जीवांना आणि ध्यानरुपाने जो शिवाच्या मनाला व्यापून उरले ते परब्रह्म विटेवर उभे आहे. त्याच्या चरणांशी मन खिळून राहते आणि रुप पाहून मन समाधानाने भरून जाते. समाधी अवस्थेतील विश्रांती लाभून चित्त त्या सावळ्या मुर्तीशी एकरूप होते. एका जनार्दनी म्हणतात, सर्वांठायी असुनही सर्वांपेक्षा वेगळा असलेला हा श्रीहरी बाळलीला करीत आहे.

७९

एकपणे एक पाहता जग दिसे । योगियांसी पिसे सदा ज्याचे ।।१।।
आनंद अद्वय नित्य निरामय । परापश्यंति वेगळा हाय पंढरिये ।।२।।
व्यापक विश्वंभर भरूनि उरला । तो प्रत्यक्ष संचला कीर्तन मेळी ।।३।।
एका जनार्दनी त्रिगुणावेगळा । पहा पहा डोळा विठ्ठल देव ।।४।।

भावार्थ

ज्याच्या रुपाचे एकाग्रपणे दर्शन घेताना त्या स्वरुपात सर्व विश्व एकपणे प्रत्ययास येते, त्या स्वरुपाचा योगीजनांना सतत वेध लागतो. हे परब्रह्मस्वरुप आनंदमय, अद्वितीय, निरामय असून परा-पश्यंती वाणीलासुध्दा यथार्थ वर्णन करता येत नाही. तोच हा विश्वव्यापक विश्वंभर वैष्णवांच्या कीर्तनमेळ्यात प्रत्यक्ष दिसतो. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांनी व्यापलेल्या चराचर सृष्टीतील सर्व जीवांपेक्षा वेगळा असलेला विठ्ठल डोळे भरून पहावा असे एका जनार्दनी सांगतात.

८०

चैतन्याचा साक्षी सर्वांसी परिक्षी । अलक्षाच्या लक्षी न ये ध्याना ।।१।।
बहुत भागले बहुत श्रमले । परी नाही लाभले रूप ज्याचे ।।२।।
भक्तांचेनि भावे पंढरिये उभा । आनंदाचा गाभा सावळा तो ।।३।।
एका जनार्दनी तो सर्वव्यापक । उभा आहे नायक वैकुंठीचा ।।४।।

भावार्थ

चैतन्यमय परमात्मा सर्वांचे परिक्षण करीत असतो. परंतु हे लक्षात न घेणाऱ्यांना ते उमजत नाही. योग-याग विधी करुन भागलेल्या, ध्यानधरणा करुन थकलेल्या साधकांना या रुपाचे दर्शन घडत नाही. भोळ्याभाबड्या भक्तीला भुलून तो सर्वव्यापक, वैकुंठीचा नायक सावळ्या विठ्ठलाचे रूप घेऊन भक्तांचा आनंदगाभा बनून पंढरीत उभा आहे असे एका जनार्दनी म्हणतात.

८१

वेडावला वेडावला । उभा ठेला मौन्यची ।।१।।
ब्रह्मादिका अंत न कळे रूपाची । तो माझे माझे साचा भक्ता म्हणे ।।२।।
कमळाचरणी विनटली न कळे तीस थोरी । ते चरण विटेवरी देखियेले ।।३।।
एका जनार्दनी विश्वव्यापक हरी । सबाह्य अभ्यंतरी कोंदलासे ।।४।।

भावार्थ

भक्तराज पुंडलिकाच्या भगवद्भक्तीने वेडावलेला श्रीहरी मौन धारण करून विटेवर उभा आहे. अनन्य भक्तांना त्याने आपलेसे केले आहे. श्रीहरीच्या चरणकमळांची सतत सेवा करणाऱ्या लक्ष्मीला ज्या चरणांची थोरवी कळली नाही, ते चरण विटेवर पाहिले. एका जनार्दनी म्हणतात, विश्वव्यापक हरी या विश्वाला अंतरबाह्य कोंदून राहिला आहे.

८२

समचरणी उभा चैतन्याचा गाभा । त्रैलोक्याची शोभा पांडुरंग ।।१।।
भक्तांचे जीवन साधकांचे साधन । सुखाचे निधान पांडुरंग ।।२।।
मुक्ति कल्पद्रुम महाफळ उत्तम । गोपिकांचा काम पांडुरंग ।।३।।
एकाएकी विनटला तो सदा संचला । एका जनार्दनी भेटला पांडुरंग ।।४।।

भावार्थ

स्वर्ग, पृथ्वी व पाताळ या तिन्ही लोकांची शोभा वाढवणारा चैतन्यरुपी पांडुरंग हा भक्तांचे जीवन, साधकांची साधना आणि सकळजनांचे सुखनिधान आहे. एकाएकी प्रकट झालेला, मुक्तीरूपी फळ देणारा हा कल्पवृक्ष असून सदासर्वदा भक्तांच्या उध्दारासाठी उभा राहिला आहे असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात.

८३

देवो न कळे अभाविका । उघड पंढरीसी देखा ।
भोळे सकळां भाविका । ठाऊका असे ।।१।।
न कळे तयाचे विंदान । भेटी जाता वेधी मन ।
तोडले बंधन । संसाराचे क्षणार्धे ।।२।।
रुप पाहता गोजिरे । आवडे डोळिया साजिरे ।
चित्त तेथे झुरे । पापांचे सकळ ।।३।।
नुरे काम आणि क्रोध । अवघा तो परमानंद ।
एका जनार्दनी गोविंद । अभेदपणे पाहता ।।४।।

भावार्थ

भोळ्याभाबड्या सर्व भाविकांना ठाऊक असलेला देव अभाविक लोकांना कळत नाही. त्या देवाचे दर्शन होताच मन त्या चरणांशी खिळून राहते. संसाराची सारी बंधने आपोआप तुटून पडतात. देवाचे साजिरे रूप पाहतांना डोळ्यांचे पारणे फिटते. त्या चरणांशी चित्त एकरुप होताच मनातील काम-क्रोध विकार लोप पावून केवळ परमानंदाने मन भरून जाते. एका जनार्दनी म्हणतात, या परमानंदासाठी गोविंदरूपाचे दर्शन अभेदपणे (अद्वैतभावाने) घ्यावे.

८४

अनन्य शरण विठोबास निघाले । ते जीवन्मुक्त जाले याचि देही ।।१।।
देही याचि देवो विटेवरी पाहे । सबाह्य उभा आहे कर कटी ।।२।।
कर कटी उभा लावण्याचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानू ।।३।।
कोटी रवीतेज वोवाळावे चरणी । एका जनार्दनी धन्य तोची ।।४।।

भावार्थ

दोन्ही कर कटीवर ठेवून उभा असलेला विठोबा लावण्याचा गाभा असून त्याच्या मुखकमळाची शोभा अवर्णनीय आहे. कोटी सूर्याचे तेज या विठ्ठलमूर्तीच्या चरणांवरून ओवाळून टाकावे. असे कथन करून एका जनार्दनी म्हणतात, जे भक्त या चरणांशी संपूर्ण शरणागत होतात ते याच देही जीवन्मुक्त होतात, ते धन्य होत.

८५

उभा विटेवरी । कट धरूनिया करी ।
भीमा ती सामोरी । वहात आहे ।।१।।
जाऊ तया ठाया । आनंद तेणे काय ।
वैष्णवांचिया पाया । लोटांगणी ।।२।।
कर्माकर्म नाही वाद । भेदभ्रम नाही भेद |
वैष्णवांचा छंद । नाम गाती आनंदे ।।३।।
सुख अनुपम्य अभेदे । एका जनार्दनी छंदे ।
गाता नाचता आल्हादे । प्रेम जोडे ।।४।।

भावार्थ
भीमा नदीच्या तीरावर कटी दोन्ही हातांनी धरून पांडुरंग विटेवर उभा आहे. त्याठिकाणी कर्म, अकर्म, विकर्म याविषयी वाद नाही. अमंगळ भेदाभेद नाही, अभेदाचे अनुपम सुख नांदत आहे. टाळ-चिपळ्यांच्या तालावर वैष्णव आनंदाने हरिनामाचा गजर करीत नाचत आहेत. तेथे वैष्णवांच्या पायी लोटांगणी जाण्यात अनुपम आनंद आहे. एका जनार्दनी म्हणतात, हरीनामाच्या छंदात गात नाचतांना भक्तीप्रेमाने मन भरून जाते.

८६

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ।।१।।
कानडा विठ्ठल नामे बरवा । कानडा विठ्ठल हृदयी ध्यावा ।।२।।
कानडा विठ्ठल रूपे सावळा । कानड विठ्ठल पाहिला डोळा ।।३।।
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ।।४।।
कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठले मन वेधियेले ।।५।।
वेधियेले मन कानडीयाने माझे । एका जनार्दनी दुजे नाठवेची ।।६।।

भावार्थ

तीन ठिकाणी देह वाकवून विटेवर उभ्या असलेल्या कानडा विठ्ठलाच्या गोड नामाचा गजर करीत त्याला चित्तात धारण करावा. या कानड्या विठ्ठलाचे सावळे रूप डोळे भरून पहावे. कानडा विठ्ठलाचे कानडे बोल भक्तांचे मन वेधून घेतात. हा कानडा विठ्ठल मन असे गुंतवून ठेवतो की संसारातील सर्व तापत्रयांचा विसर पडतो असे एका जनार्दनी म्हणतात.

८७

तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरिये ।।१।।
विठ्ठल कानडे भक्त हे कानडे । पुंडलिके उघडे उभे केले ।।२।।
कानडीया देवा चालविले भक्ते । कवतुके तयाते उभे केले ।।३।।
एका जनार्दनी भक्तांचिया चाडा । विठ्ठल कानडा विटेवरी ।।४।।

भावार्थ

पंढरपुरी भीमानदीच्या प्रवाहाने चंद्रकोरीसारखे वळण घेतले आहे. त्यामुळे हा तीर्थप्रवाह व तीरावर वसलेले क्षेत्र दोन्ही कानडे असून सावळा पांडुरंगही भीमेच्या सन्मुख विटेवर तीन ठिकाणी वाकून उभा आहे. या कानडा विठ्ठलाचे भक्तही कानडे आहेत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, देव पुंडलिकाच्या भक्तीसाठी कौतुकाने उभा आहे.

८८

उतावेळपणे उभा । त्रैलोक्य शोभा पंढरिये ।।१।।
मना छंद घेई वाचे। विठ्ठल साचे पाहू डोळा ।।२।।
गळा तुळशीच्या माळा । केशर टिळा लल्लाटी ।।३।।
चंदनाची शोभे उटी । वैजयंती कंठी मिरवत ।।४।।
दृष्टी धाय पाहता रूप । एका जनार्दनी स्वरुप ।।५।।

भावार्थ

त्रैलोक्याची शोभा वाढवणारा परमात्मा पंढरीत भक्तांची उताविळ होऊन वाट पहात उभा आहे. मनाने विठ्ठलनामाचा छंद घेऊन निराकार परब्रह्माचे साकार रूप डोळे भरून पहावे. गळ्यात वैजयंतीमाळेसह तुळशीच्या माळा शोभत आहेत, कपाळावर केशरी टिळा असून अंगाला चंदनाची उटी लावली आहे. एका जनार्दनी म्हणतात, हे सावळे सुंदर रूप डोळ्यात साठवण्यासाठी नजर परत-परत धाव घेते.

८९

जया कारणे योगयाग तपे करती । ती हे उभी बाळ विठ्ठलमूर्ती ।
अंगी तेजाची न माय दीप्ती । कंठी वैजयंती शोभती गे माय ।।१।।
तयाचा वेधु लागला जीवी । क्षण परता नोहे देही ।
काया वाचा मने भावी । वेगे वेधक गे माये ।।२।।
न माये त्रैलोकी तो उभा विटी । दोन्ही कर समपदे ठेवुनी कटी ।
सर्वांगी चंदन कस्तुरी उटी । वामभागी रूक्मिणी गोमटी गे माय ।।३।।
ऐसा सर्व सुखाचा आगरू । उभारूनी बाह्या देत अभयकरू ।
एका जनार्दनी निर्धारू । विठ्ठलराज गे माय ।।४।।

भावार्थ

ज्या परमात्म्याचे दर्शन व्हावे म्हणुन योगी योग-याग आणि तपस्वी तप करतात तो विठ्ठल बाळरूप धारण करून उभा आहे. तेजाची प्रभा देही न सामावल्याने आसमंतात पसरली आहे. त्रैलोकी भरुन उरलेले हे परब्रह्मस्वरुप दोन्ही कर कटीवर ठेवून विटेवर सामावले आहे. सर्वांगावर कस्तुरीमिश्रित चंदनाची उटी लावली असून कंठात वैजयंतीमाळ धारण केली आहे. डाव्या बाजूला गोमटी रूक्मिणी उभी आहे. असा सर्वसुखाचे निधान असलेला विठ्ठलराज दोन्ही हात उभारून भक्तजनांना अभयदान देत आहे. एका जनार्दनी देव-भक्तांच्या सोहळ्याचे वर्णन या अभंगात करतात.

९०

वैजयंती माळ किरीट कुंडले । रुप ते सावळे विटेवरी ।।१।।
वेधले वो मन तयाच्या चरणी । होताती पारणी डोळीयांची ।।२।।
पुराणासी वाड शास्त्रासी ते गूढ । ते आम्हालागी उघड परब्रह्म ।।३।।
ध्यानी ध्याती मुनी चिंतिती आसनी । तो हा चक्रपाणी सुलभ आम्हा ।।४।।
सन्मुख भीवरामध्ये पुंडलिक । एका जनार्दनी सुख धन्य धन्य ।।५।।

भावार्थ

अठरा पुराणे ज्याचा चरित्रमहिमा वर्णन करण्यास असमर्थ ठरली, योगी आणि मुनिजन सतत ध्यानमग्न होऊन ज्याची आराधना करतात तो चक्रपाणी भोळ्या भाविकांच्या भक्तिने सहज वश होतो. एका जनार्दनी म्हणतात, कंठी वैजयंती माळ, मस्तकी मुकुट, कानी कुंडले लेऊन विटेवर उभ्या असलेल्या या सावळ्या रुपाचे चरण मन वेधून घेतात, डोळ्याचे पारणे फिटते.

९१

न कळे जयाचे महिमान । वेदश्रुतीसी पडिले मौन ।
वेडावले दरूशन । जयालागी पाहता ।।१।।
तोचि उभा विटेवरी । भक्त करुणाकर हरी ।
रूक्मिणी निर्धारी । वामभागी शोभती ।।२।।
गरूड सन्मुख उभा । शोभे चैतन्याचा गाभा ।
नभी लोपली तेजप्रभा । ऐसा उभा विठ्ठल ।।३।।
मन ध्याता न धाये । दृष्टी पाहता न समाये ।
एका जनार्दनी पाय । वंदू त्याचे आवडी ।।४।।

भावार्थ

भक्तांचा करुणाकर श्रीहरी विटेवर उभा असून वामांगी रूक्मिणी आणि समोर गरुड हात जोडून उभा आहे. चैतन्यरुपाने शोभून दिसणार्‍या विठ्ठलमूर्तीच्या मुखावरील तेज गगनात सामावत नाही. या श्रीहरीचा महिमा वर्णन करतांना वेदश्रुती नि:शब्द होतात. अविरत ध्यान धरूनही मनाचे समाधान होत नाही. एकटक दर्शनसुख घेऊनही तो नजरेत सामावत नाही, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीचरणांना आवडीने वंदन करावे.

९२

पाहता विठ्ठल रूप । अवघा निवारिला ताप ।।१।।
ध्यानी आणिता ते रूप । अवघा विराला संकल्प ।।२।।
बैसलासे डोळा । एका जनार्दनी सावळा ।।३।।

भावार्थ

एका जनार्दनी या अभंगात म्हणतात, सावळे विठ्ठलरूप डोळ्यात रुतून बसते. त्या दर्शनाने त्रिविध (आधिभौतिक, आध्यात्मिक, आधिदैविक) तापांचे निवारण होते. सारे संकल्प, विकल्प विरून जातात.

९३

आणिकाचे मते सायास न करणे । आम्हासी पाहुणे पंढरीराव ।।१।।
डोळा भरूनिया पाहिले देवासी । तेणे चौर्यांशी चुकली सत्य ।।२।।
एका जनार्दनी देवाधिदेव । देखिला स्वयमेव विटेवरी ।।३।।

भावार्थ

देवाधिदेव स्वयमेव विटेवर उभा असलेला पाहिला आणि चौर्यांशी लक्ष योनींमधील जन्म-मृत्युचे फेरे चुकले. आता आणिक सायास करण्याची गरज नाही, कारण पंढरीनाथ भक्तांचे पाहुणे असून आनंदाने पंढरीत नांदत आहेत.

९४

स्वर्गसुख आम्ही मानू जैसा ओक । सांडूनिया सुख पंढरीचे ।।१।।
पंढरी पावन चंद्रभागा स्थान । आहे तो निधान विठ्ठल देव ।।२।।
मध्यस्थळी राहे पुंडलिक मुनी । तयाचे दर्शनी पातक हरे ।।३।।
दोन्ही कर कटी उभा जगजेठी । एका जनार्दनी भेटी सुख होय ।।४।।

भावार्थ

चंद्रभागेच्या तीरावरील पंढरी पावन तीर्थक्षेत्र असून विठ्ठल देव भक्तांचा अमोल ठेवा आहे. भक्तराज पुंडलिक मध्यभागी उभा असून त्याच्या दर्शनाने पातकांच्या राशी जळून जातात. वैकुंठीचा जगजेठी दोन्ही कर कटी ठेवून उभा आहे. पंढरीच्या या सुखापुढे स्वर्गसुख तुच्छ वाटते. पांडुरंगभेटीचे हे सुख अतुलनीय आहे असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात.

९५

कैसे चरण गोमटे । देखिले विटे पंढरीये ।।१।।
पाहतांचि वेधले मन । जाहले समाधान जीव शिवा ।।२।।
विश्रांतीचे विश्रांतिघर । आगमानिगमाचे माहेर ।।३।।
म्हणे एका जनार्दनी । काया कुर्वंडी करूनी ।।४।।

भावार्थ

पंढरीला विटेवर ठाकलेले दोन गोमटे चरण पाहून मनाला वेध लागले. देह आणि देह धारण करणारा आत्मा दोघांनाही विलक्षण समाधान झाले. वेद आणि श्रुती यांचे माहेर असलेले हे तीर्थक्षेत्र विश्रांतीचे विश्रांतीघर आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, या चरणांवरून देह ओवाळून कुर्वंडी करावा असे वाटते.

'९६

उंचा उंचपण नीचा नीचपण । ते नाही कारण विठ्ठलभेटी ।।१।।
उंच नीच याती असो भलते जाती । विठ्ठल म्हणता मुक्ती जड जीवा ।।२।।
उभारूनी बाह्या कटी कर उभा । एका जनार्दनी शोभा विटेवरी ।।३।।


भावार्थ

दोन्ही हात उभारून भाविकांच्या भेटीसाठी विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या चरणी उच्च-नीच असा दुजाभाव नाही. उच्च जातीला श्रेष्ठत्व नाही, नीच जाती कनिष्ठ मानली जात नाही. विठ्ठलाच्या केवळ नामस्मरणाने जड जीवांना मुक्तीचे वरदान लाभते असे एका जनार्दनी या अभंगात सांगतात.

९७

काळे ना सांवळे गोरे ना पिवळे । वर्ण व्यक्ती वेगळे विटेवरी ।।१।।
आनंद स्वानंद नित्य परमानंद । आनंदाचा कंद विटेवरी ।।२।।
निर्गुण सगुण चहू वाचांवेगळा । आदि अंत पाहता डोळा न दिसे काही ।।३।।
एका जनार्दनी देखिला तो डोळा । त्रिगुणा वेगळा विटेवरी ।।४।।

भावार्थ

विटेवर उभा असलेला आनंदाचा कंद, भक्तांना निरंतर लाभणारा परमानंद निराकार निर्गुण परब्रह्म सगुण रुपाने विटेवर उभे आहे. तो अनादी, अनंत परमात्मा सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या अतीत असून वैखरी, मध्यमा, परा, पश्यंती या चारी वाणींच्या पलिकडे वेगळा आहे. जो अनादी अनंत असून डोळ्यांना अगोचर आहे. एका जनार्दनी म्हणतात, विटेवर दिसणारा हा परमात्मा गोरा, सावळा, काळा, पिवळा यापैकी कोणत्याही वर्णाचा नसून सत्व, रज, तम या गुणाहून वेगळा आहे.

९८


जे जे देखिले ते ते भंगले । रूप एक उरले विटेवरी ।।१।।
डोळियांची धणी पाहता पुरली । परी वासना राहिली चरणांजवळी ।।२।।
एका जनार्दनी विश्वास तो मनी । संतांचे चरणी सदा बैसो ।।३।।

भावार्थ

डोळ्यांना दिसणारे हे सारे विश्व नश्वर आहे असा अनुभव आल्यानंतर विटेवर उभे असलेले हे परब्रह्म रूपच शाश्वत (अविनाशी) आहे याची खात्री होते. हे रूप डोळे भरून पाहतांना मनाला अतीव समाधान लाभते, पण या दर्शनाची वासना चरणांशी खिळून राहते. एका जनार्दनी या विठ्ठलचरणी प्रार्थना करतात की,ब्संताच्या चरणी मनाचा विश्वास सदासर्वदा अभंग राहो.

९९

भीष्मे जया ध्याईले । ते विटेवरी देखिले ।।१।।
धर्मराये पूजियेले । ते विटेवरी देखिले ।।२।।
शिशूपाळा अंतक जाहले । ते विटेवरी देखिले ।।३।।
एका जनार्दनी पुजिले । ते विटेवरी देखिले ।।४।।

भावार्थ

महाभारत युध्दप्रसंगी भीष्माचार्य शरपंजरी पडून उत्तरायणाची वाट पहात असतांना ज्या श्रीकृष्णाचे ध्यान करीत होते, राजसूय यज्ञानंतर इंद्रप्रस्थनगरी धर्मराजाने ज्या श्रीधराला प्रथम पूजेचा मान दिला, शंभर अपराध सहन करून ज्या चक्रपाणीने शिशुपालाला मृत्युदंड दिला त्याच जगदीश्वराला विटेवर उभा असलेला पाहून त्याचे पूजन केले असे एका जनार्दनी म्हणतात.

१००

गोकुळी जे शोभले । ते विटेवरी देखिले ।।१।।
काळ्या पृष्टी शोभले । ते विटेवरी देखिले ।।२।।
पूतनेहृदयी शोभले । ते विटेवरी देखिले ।।३।।
काळयवने पाहिले । ते विटेवरी देखिले ।।४।।
एका जनार्दनी भले । ते विटेवरी देखिले ।।५।।

भावार्थ

गोकुळात गोप गोपिकांबरोबर क्रीडा करीत असताना जे श्रीहरी रूप शोभून दिसत होते, यमुनेच्या काळ्या डोहात कालियानागाच्या फण्यावर श्रीधराने जे रूप धारण केले होते, पूतनेचा वध करतांना बाळकृष्णाचे जे स्वरुप प्रत्ययास आले, काळयवनाच्या अंतसमयी योगेश्वराचे जे भयानक रौद्र रूप दिसले तेच रुप विटेवर दिसत आहे असे एका जनार्दनी या अभंगात कथन करतात.

101

जें द्रौपदीने स्मरिलें। तें विटेवरी शोभलें ।।1।।
जे अर्जुनें स्मरिलें। तें विटेवरी शोभलें।। 2।।
जेणें गजेंद्रा उध्दरिले। तें विटेवरी शोभलें ।।3।।
जे हनुमंतें स्मरिलें। तें विटेवरी शोभलें ।।4।।
जें पुंडलिके ध्याइलें । ते एका जनार्दनीं देखिलें।। 5।।

भावार्थ

हस्तिनापूरच्या राजसभेंत द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगीं द्रौपदीने ज्याचा धावा केला.महाभारताच्या अंतिम युध्दांत अर्जुनाने सतत ज्याचे स्मरण केले,मगरीच्या मगरमिठींत सापडलेल्या गजेंद्राला ज्याने मुक्त केले,भक्तराज पुंडलिकाने ज्या चरणांना अठ्ठावीस युगे विटेवर उभे केले त्याच चरणांचे एका जनार्दनीं एकाग्र चित्ताने दर्शन घेतात.

102

मुख सुंदर मंडित साजिरा। विंझणे वारिती राहीरखुमाई सुंदरा ।।1।।
नवल वो हरी देखिला डोळां। पाहतां पाहतां मन विरालें अबळा।। 2।।
नेणें तहान भूक लज्जा अपमान। वेधिलें देवकीनंदनें गे माय।। 3।।
एका जनार्दनीं पाहतां मुख। मुख पाहतां अवघें विसरलो दु:ख ।।4।।

भावार्थ

साजिरे सुंदर मुखकमल धारी श्रीहरीला रखुमाई पंख्याने वारा घालित आहे.हे अनुपम सौंदर्य डोळ्यांत साठवित असतांना त्या रुपाने मन असे वेधले गेले की,तहान भूक हे देहभाव तसेच लज्जा,अपमान हे मनोभाव त्यां रूपांत विरघळून गेले.एका जनार्दनीं म्हणतात,अपूर्व सुंदर मुख दर्शनाने सारे दु:ख विसरले.

103

जयाचे पाहतां श्रीमुख। हरे कोटी जन्म दु:ख ।।1।।
तो हा उभा विटेवरी। भक्तकाज म्हणवी कैवारी ।।2।।
वेदासी जो दुर्गम । आम्हां कळलें तयाचे वर्म ।।3।।
ऐसा भक्तवत्सल तो एक दीनानाथ। एका जनार्दनीं तया ध्यात।। 4।।

भावार्थ

भक्तांच्या उध्दारासाठी विटेवर उभा असलेला पांडुरंग भक्तांचा कैवारी असून वेदांना ह्या अवतार लीला अगम्य वाटतात. भागवत धर्माचे आचरण हाच ह्या रुपाला समजून घेण्याचा मार्ग आहे.भक्तवत्सल पांडुरंग दीनांचा नाथ आहे. या पांडुरंगाचे दर्शंन कोटी जन्माचे दु:ख संपवते. एका जनार्दनीं सतत या विठ्ठलमूर्तीचे ध्यान करतात.

104

ठेवणें अनंत जन्माचे। सांपडलें आजी साचें।। 1।।
पुंडलिके ते पोखलें। जगा उपकार केलें।। 2।।
महा पातकी चांडाळ। मुक्त होय दरूशनें खळ।। 3।।
एका जनार्दनीं निश्चय। वेदादिका हा आश्रय।। 4।।

भावार्थ

अनंत जन्म घेऊन जे परमात्म तत्व शोधण्याचा प्रयास केला ते सहज सापडले.भक्त पुंडलिकाने ते निधान विटेवर उभे करून भाविकांवर मोठे उपकार केले.महापातकी दुष्ट चांडाळ सुध्दां या चरणांच्या दर्शनाने मुक्त होतो असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,वेदश्रुतींना याच चरणांचे अधिष्ठान आहे.

105

साजिरें सुंदर श्रीमुख पाहतां । नाठवें ती चिंता संसाराची ।।1।।
तो हा पांडुरंग विटेवरी उभा ।त्रैलोक्याचा गाभा शोभतसे।। 2।।
एका जनार्दनीं कर ठेवूनी कटीं ।उभा वाळुवंटी चंद्रभागे।। 3।।

भावार्थ

चंद्रभागेच्या वाळवंटी दोन्ही कर कटीवर ठेवून उभा असलेला त्रैलोकीचा गाभा पांडुरंगाच्या सगुण रुपांत शोभून दिसतो. हे साजिरे सुंदर श्रीमुख पाहतांच भक्त संसाराच्या सगळ्या भय-चिंता विसरून जातो.

106

कृपाळु उदार। उभा कटीं ठेवुनी कर।।1।।
सर्व देवांचा हा देव। निवारी भेव काळाचें ।।2।।
निघतां शरण काया वाचा। चालवी त्याचा योग क्षेम ।।3।।
दृढ वाचे वदतां नाम। होय निष्काम संसारी।। 4।।
एका जनार्दनीं ठेवणें खरें तें जाणें पंढरी ।।5।।

भावार्थ

भाविकांवर उदारपणे सतत कृपेचा वर्षाव करणारा देवाधिदेव कटीवर कर ठेवून उभा आहे.जे भक्त काया,वाचा,मनाने या देवाला शरण जातात त्यांच्या उदरनिर्वाह तो चालवतो.श्रध्दापुर्वक या विठ्ठलाच्या नामाचा घोष करणार्या भक्तांच्या संसारातील मायेंत गुंतलेल्या वासना नाहिशा करून त्यांना निष्काम भक्तीप्रेमाचा मार्ग दाखवतो.एका जनार्दनीं म्हणतात,या देवाचे सत्य स्वरुप पंढरीचे भोळेभाबडे भक्त जाणतात.

107

काया वाचा मन एकविध करी। पाहे तो श्रीहरी पंढरीये ।।1।।
ब्रह्मादिक जया ध्याती शिवादि वंदिती ।ती विटेवरी मूर्ति पांडुरंग ।।2।।
वेद पैं भागले शास्त्रें वेवादती । पुराणांसी भ्रांती अद्यापवरी ।।3।।
नेति नेति शब्दें श्रुती त्या राहिल्या । न कळे तयाला पार त्याचा ।।4।।
एका जनार्दनीं भक्तालागीं सोपा। भीमातटीं पाहें यां विठ्ठलासी।। 5।।

भावार्थ

ब्रह्मादि देव ज्या रूपाचे ध्यान करतात, शिवशंकर ज्या पदांना वंदन करतात,या परमात्म स्वरूपाचे वर्णन करतांना वेदश्रुती थकून स्तब्ध होतात.साही शास्त्रे निरंतर चर्चा करूनही या परमेश्वरी स्वरूपाचा निश्चित निर्णय करू शकत नाही.अठरा पुराणे या देवाधिदेवाच्या अवतार लीलांचे रहस्य जाणून घेऊ शकत नाही. त्या पंढरीच्या श्री हरी दर्शनाने भक्त काया वाचा मने एकाग्र होतात.भीमातटीं उभा असलेला हा पांडुरंग भक्तीप्रेमाने सहज आपलासा करता येतो असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.

108

परब्रह्म मूर्ति विठ्ठल विटेवरी। चंद्रभागेतीरीं उभा असे ।।1।।
तयाचे चरण आठवी वेळोवळां। सर्व सुख सोहळा पावशील ।।2।।
अविनाश सुख देईल निश्चयें। करीं या लवलाहें लाहो त्याचा।। 3।।
श्रीविठ्ठलचरणीं शरण तूं जाई। एका जनार्दनीं पाहीं अनन्यभावें ।।4।।

भावार्थ

परब्रह्म परमात्मा विठ्ठलमूर्ति स्वरूपांत चंद्रभागेच्या तीरावर विटेवर उभा आहे त्याच्या चरणांचे नित्य स्मरण करावे.अविनाशी सुखाचा सोहळा प्राप्त होईल. या विठ्ठल चरणांना अनन्यभावें शरण जावे असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.

109

अनंता जन्मींचे पुण्य बहुत। तें देखे पंढरीनाथ ।।1।।
वांयां शिणतात बापुडीं । काय गोडी धरुनी।। 2।।
पाहतां विठ्ठलाचे मुख ।हरे सर्व पाप निवारें दु:ख ।।3।।
एका जनार्दनीं विठ्ठल उभा । त्रैलोक्याचा गाभा विटेवरी।। 4।।

भावार्थ

अनंत जन्म घेऊन मोठा पुण्यसाठा गाठीं असेल तरच पंढरीनाथाचे दर्शन घडते या अलभ्य दर्शनाने सर्व पापांचे हरण होऊन सर्व दु:खांचे निवारण होते.त्रैलोक्याचा गाभा विठ्ठलरूपाने विटेवर उभा आहे,या दर्शनाची गोडी सोडून अन्य तीर्थयात्रा करून निष्कारण देह शिणवतात असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

110

उदार उदार। सखा पांडुरंग उदार ।।1।।
ठेवा मन त्याचे पायीं। तुम्हां उणें मग कायीं।। 2।।
दुजीयांसी कींव। कां रे भाकितसां जीव।। 3।।
तीं काय देतील बापुडीं । एका जनार्दनीं धरा गोडी।। 4।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं विठ्ठल भक्तीची मनाला गोडी लावा असे सांगत आहेत.भक्तांचा सखा पांडुरंग अतिशय उदार असून भक्तांच्या सर्व कामना पुर्ण करण्यास समर्थ आहे.दुसर्या कुणापुढे भिक मागण्याची गरज नाही.जे स्वता:च दीन आहेत ते इतरांना मदत करू शकत नाहीत. विठ्ठलाच्या चरणांवर दृढ विश्वास ठेवावा.

111

आणिकांसी जातां शरण । हें तों तुम्हां उणीवपण ।।1।।
दास विठोबाचे व्हावें। तिहीं सर्व सुख भोगावें ।।2।।
एका जनार्दनीं म्हणा दास। तुमची आस पुरवील।। 3।।

भावार्थ

विठोबाचे चरण सोडून आणखी कोणाला शरण जाणे हे कमीपणाचे आहे.विठोबाचे दास होऊनि सर्व सुखाचे भागीदार व्हावे.एका जनार्दनीं म्हणतात,विठोबा दासांच्या सर्व कामना पूर्ण करतो.

112

पुरवावया मनोरथ । उभा अनाथनाथ विठ्ठल।। 1।।
भोळेभाळे येती शरण। चुकवी त्यांचे जन्ममरण।। 2।।
एका जनार्दनीं भाव।अर्पूनिया भाका कींव।। 3।।

भावार्थ

अनाथांचा नाथ विठ्ठल शरण आलेल्या भोळ्याभाबड्या भाविकांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी उभा आहे.एका जनार्दनीं म्हणतात,भक्तीभाव अर्पून करुणा भाकणार्या भक्तांचे तो जन्ममरण चुकवतो.

113

आणिकांचे मत नका पडूं तेथ। भजा पंढरीनाथ एकभावें ।।1।।
काय होणार तें होईल देहाचें। नाशिवंत साचें काय हातीं ।।2।।
मृत्तिकेचा गोळा गोळाचि मृत्तिका। वाउगाचि देखा शीण वाहे।। 3।।
घट मठ जेवीं आकाश निराळें। एका जनार्दनीं खेळे अकळची।। 4।।

भावार्थ

मानवी देह पृथ्वी,आकाश,वायु,अग्नीं,पाणी यांपासून बनलेला असून नाशवंत आहे.हा देह मातीचा असून शेवटी मातितच मिळतो.या देहाची चिंता करणे निरर्थक आहे.एका जनार्दनीं म्हणतात, याविषयीं अनेक मत मतांतरे आहेत त्यांत लक्ष न घालतां भक्तीभावाने पंढरीनाथाचे भजन करणे श्रेयस्कर आहे.

114

भलते भावे शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता।
उदार लक्ष्मीचा दाता। साक्ष पुंडलिक करूनी सांगे।। 1।।
येथें या रे लहान थोर । भावें नारी अथवा नर।
मोक्षाचा विचार। न करणे कवणाही।। 2।।
एका दरूशने मुक्ती। पुन्हां नाहीं जन्मावृत्ती।
एका जनार्दनीं चित्तीं। सदोदित तें सुख ।।3।।

भावार्थbr>

लक्ष्मीपती श्रीहरी अत्यंत उदार असून भक्तीभावानें शरण जाणार्या भाविकांची जन्ममरण चिंता निवारण करतो. कोणत्याही वयाचे लहान थोर नर नारी पंढरींत आल्यास त्यांना मोक्षाची चिंता करावी लागत नाही. केवळ एका दर्शनाने जन्ममरणाचे फेरे चुकवून मुक्ति मिळतें,शाश्वत सुख प्राप्त होते असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात.

114

भलते भावे शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता।
उदार लक्ष्मीचा दाता। साक्ष पुंडलिक करूनी सांगे।। 1।।
येथें या रे लहान थोर । भावें नारी अथवा नर।
मोक्षाचा विचार। न करणे कवणाही।। 2।।
एका दरूशने मुक्ती। पुन्हां नाहीं जन्मावृत्ती।
एका जनार्दनीं चित्तीं। सदोदित तें सुख ।।3।।

भावार्थ

लक्ष्मीपती श्रीहरी अत्यंत उदार असून भक्तीभावानें शरण शरण जाणार्या भाविकांची जन्ममरण चिंता निवारण करतो. कोणत्याही वयाचे लहान थोर नर नारी पंढरींत आल्यास त्यांना मोक्षाची चिंता करावी लागत नाही.केवळ एका दर्शनाने जन्ममरणाचे फेरे चुकवून मुक्ति मिळतें, शाश्वत सुख प्राप्त होते असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात.

115

ॐकार स्वरूप सद्गुरू असंग। अक्षय अभंग पांडुरंग।।1।।
नसे ज्याचे ठायीं द्वैताद्वैत भाव । ब्रह्म स्वयमेव पांडुरंग।। 2।।
मस्तक हें माझें तयाचे चरणीं। असे जनीं वनीं पांडुरंग ।।3।।
सद्सद्भाव हे नसती ज्याचे ठायीं। नित्य तो मी गाई पांडुरंग ।।4।।
गुरूराज माझा दीनांचा दयाळ। तोडी मायाजाळ पांडुरंग।। 5।।
श्रीमान हा माझा सद्गुरू समर्थ। देई मोक्ष स्वार्थ पांडुरंग ।।6।।
डुरकणी देई मोह पंचानन। करी त्या हनन पांडुरंग।। 7।।
रंगे चित्त माझे तयाच्या स्वरुपीं ।असे आप आपी पांडुरंग ।।8।।
गर्व अभिमान झाडावा समूळ । भेटे तो दयाळ पांडुरंग।। 9।।
महा माया एके क्षणांत निरसी । सुखाची पैं राशी पांडुरंग।। 10।।
भूतळीं या नसे दुजा कोणी ऐसा ।भक्तांचा कोंवसा पांडुरंग ।।11।।
नेई भक्तांसी जो आपुल्या समीप ।तो हा मायबाप पांडुरंग ।।12।।
तीकडी सांखळी त्रिगुणाची तोडी । भवातूनि काढी पांडुरंग ।।13।।
उपमा तयासी काय देऊं आतां। सकळ अर्थदाता पांडुरंग।। 14।।
भक्तालागी अवतार केला। आनंदाचा झेला पांडुरंग।। 15।।
नाम हे जयाचे जन्ममरण वारी। मक्ता सहाकारी पांडुरंग ।।16।।
मन हें जडलें तयाचियां पदी ।उतरी भवनदी पांडुरंग ।।17।।
काया वाचा मनें स्वरुपी रहावें । नाम आठवावें पांडुरंग ।।18।।
यम नियम साधी साधन अष्टांग। होईल सर्वांग पांडुरंग।। 19।।
एका जनार्दनीं देह हारपला। होऊनि राहिला पांडुरंग ।।20।।

भावार्थ

ॐ कार स्वरुप असलेला पांडुरंग चिरंतन, इंद्रिय विषयांचा संग नसलेला (असंग) आणि अभंग आहे.तो साक्षात ब्रह्मरूप असून त्याच्या ठिकाणी द्वैत आणि अद्वैत असे दोन्ही भाव नाहीत.सर्व सजीव प्राणी व वनस्पती या मध्ये भरून राहिलेला पांडुरंग सद् आणि असद् या दोन्ही भावांपासून वेगळा आहे. दीनदयाळ पांडुरंग, भक्तांचा मायेची बंधन तात्काळ तोडून टाकतो.या तेजमूर्ति पांडुरंगाच्या तेजानेच सूर्य,चंद्र या ज्योती प्रकाशित होतात. ह्या वेदमूर्ति पांडुरंगाची वेद नित्य स्तुती करतात. हा पांडुरंग ज्ञानाची खाण असून पंचमहाभुतांवर याची अबाधित सत्ता चालते. मोहरूपी वनराजाचे हनन करून हा पांडुरंग जिवांचे रक्षण करतो.गर्व,अभिमान समूळ नाहिसा करून ज्याचे चित्त शुध्द झाले आहे अशा भाविकांना तो पांडुरंग भेटतो. त्याच्या स्वरूपी या भक्तांचे चित्त रंगून जाते.सुखाची राशी असलेला हा पांडुरंग महामायेचे एका क्षणांत निरसन करतो. सद्गुरू चरणांची साधकाची ईच्छा तो पूर्ण करतो. त्रैलोक्याचा गुरूराज स्वामी पांडुरंग प्रत्येकाच्या अंत:करणांत वास करून जाया, पुत्र,धन देऊन त्यांच्या कामना पूर्ण करतो,त्या भक्ताचे सर्वप्रकारे रक्षण करतो.पांडुरंग रूपी गुरूमुर्ति भेटतांच मृत्युचे भय नाहीसे होते. हा पाडुरंग चिद् रुपाची खाणी असून त्याच्याच रूपाने हे सर्व विश्व नटलें आहे. त्या विश्वेश्वरा सारखा या भुतलावर कोणिही नाही.हा पांडुरंग विश्वाचा मायबाप होऊन प्रतिपाळ करतो.त्या विश्वंभराची सेवा करणे हीच मानवी जीवनाची सार्थकता आहे.सत्व,रज,तम या त्रिगुणात्मक गुणांची सांखळी तोडून हा देवाधिदेव भवसागरातून सुटका करतो. हा सर्वदाता पांडुरंग अनुपमेय आहे साधकांवर उपकार करण्यासाठीं त्याने अवतार धारण केला असून तो सद्-चिद्-आनंद स्वरूप आहे.या पांडुरंगाचे नामस्मरण करून कायावाचामने त्याची भक्ती करावी.यम,नियम,आसन,प्राणायाम, प्रत्याहार ध्यान,धारणा,समाधी ही अष्टांग योगाची आठ अंगे आहेत.या आष्टांगयोगाची साधना केल्यास सर्वागानें पांडुरंग स्वरूप होता येईल असे एका जनार्दनीं म्हणतात.

श्रीविठ्ठलनाममहिमा

1

अविनाश नाम स्वयंभ संचलें । तें उभें चांगलें विटेवर।।1।।
वर्णितां वेदांसी न कळेचि पार । तें उभें साचार विटेवरी।। 2।।
मौन्यरुप श्रुती राहिल्या तटस्थ। तो आहे मूर्तिमंत विटेवरी।। 3।।
एका जनार्दनीं नाम अविनाश । गातां जातीं दोष जन्मांतरींचे।। 4।।

भावार्थ

अविनाशी परमात्मा साचार विटेवर उभा आहे,त्याचा अपार महिमा चारी वेदही यथार्थपणे वर्णन करु शकत नाहीत.स्वयंभू रुपाने विटेवर उभेअसलेले हे मुर्तिमंत रूप पाहून श्रुती तटस्थपणे मौन धारण करून राहिल्या आहेत.एका जनार्दनीं म्हणतात,अनेक जन्मांचे दोष हे अविनाशी नाम घेतल्याने निघून जातात.

2

जयालागीं करिती योगी सायास।तो हरी पंढरीस उभा असे ।।1।।
न लगे साधन मांडणे तत्वतां ।नाम गातीं गातां सोपा सर्वां।। 2।।
नर अथवा नारी न म्हणे दुराचारी। दर्शने उध्दरीं जडजीवा।। 3।।
पुंडलिका भाक देऊनि सावकाश । पुरवितो सौरस अद्यापवरी।। 4।।
एका जनार्दनीं चैतन्याचा गाभा। विटेवरी उभा भक्तांसाठीं ।।5।।

भावार्थ

ज्याच्यासाठी योगी खडतर तपश्चर्या करतात तो विश्व चैतन्याचा गाभा कोणत्याही साधनेशिवाय केवळ नामजपाच्या सोप्या मार्गाने सहजसाध्य होतो.नर,नारी,सदाचारी,दुराचारी असा भेदभाव न करता केवळ दर्शनाने तो विश्वात्मा जडजीवांचा उध्दार करतो.भक्त पुंडलिकाला दिलेले वचन पाळण्यासाठीं तो अजुनही भक्तांसाठी विटेवर उभा आहे असे एका जनार्दनीं सांगतात.

3

अंकितपणे राहिला उभा। विठ्ठल चैतन्याचा गाभा।
उजळली दिव्य प्रभा। अंगकांती साजिरी।। 1।।
पीतांबर माळ कंठी। केशर कस्तुरीची उटी।
मुगुटा तळवटीं। मयुरपिच्छें शोभत।। 2।।
सनकादिकांचे जे ध्यान। उभें विटे समचरण।
भक्तांचे ठेवणे।।3।।
वाचे वदतां न लगे मोल। एका जनार्दनीं बोल।
फुकाचें तें वेचितां ।।4।।

भावार्थ

भक्त पुंडलिकाच्या भक्तीचा अंकित होऊन विठ्ठल रूपाने चैतन्याचा गाभा विटेवरीं समचरणी उभा आहे.या विश्वात्मक विश्वेश्वराच्या अंगकांतीची दिव्य प्रभा विश्वांत प्रतिबिंबित झाली आहे.कटी पितांबर,कंठी वैजयंती माळ,कस्तुरी मिश्रीत केशराची उटी आणि मुगुटीं मोराची पिसे शोभून दिसत आहेत.सनकादिक मुनीं ज्या स्वरूपाचे निरंतर ध्यान करतात,तो भक्तांच्या हृदयीचा ठेवा असून केवळ वाचेने आळवितांच कृपेचा वर्षाव करतो.त्या साठी कांहीं मोल द्यावे लागत नाही असे एका जनार्दनीं या अभंगातून आश्वासन देतात.

4

श्रीविठ्ठलाचें नाम मंगल। अमंगल उध्दरिले।। 1।।
ऐसा याचा थोर महिमा। शिव उमा जाणती ।।2।।
एका जनार्दनीं नाम ब्रह्म । सोपे वर्म जपतां।।3।।

भावार्थ

श्रीविठ्ठलाचे मंगल नाम सर्व अमंगलाचा उध्दार करते असा या नामाचा महिमा आहे हें शिव पार्वती जाणतात. सरहे नादब्रह्म असून जप करण्यास अती सुलभ आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

5

नामामृत गोडी वैष्णव जाणती। येर चरफडती काग जैसें।। 1।
प्राकृत हे जन भुलले विषया। नामाविण वांया जाती देखा।। 2।।
नामें साधे मुक्ति नामे साधे मुक्ति। नामेंचि विरक्ति होत आहे।। 3।।
नाम तेंचि जालें वर्णरुपातीत। अनाम सतत उभें असें।। 4।।
एका जनार्दनीं पूर्ण नामबोध। विठ्ठलनामीं छंद सदा असो।। 5।।

भावार्थ

नामरुपी अमृताची गोडी वैष्णव जाणतात. बाकीचे कावळ्यासारखी व्यर्थ कावकाव करतात.ईंद्रिय विषयसुखाला भुलून सामान्य जन मानवी जन्म वाया घालवतात.विठ्ठल नामाच्या उच्चाराने भक्ती,मुक्ती आणि विरक्ती साध्य होते. ज्यांना नामबोध झाला तें वर्ण व रुप यांच्या अतित होतात.विठ्ठल नामाचा छंद सतत मनाला जडो अशी प्रार्थना एका जनार्दनीं या अभंगात करतात.

6

सर्वकाळ ज्यांचा नेम । वाचें श्रीविठ्ठलाचें नाम।
दुजा नाहीं कांहीं श्रम। विठ्ठल विठ्ठल वदती।।। 1।।
धन्य पुण्य तया साचें। नामस्मरण नित्य वाचे।
त्रीअक्षरीं नाम वाचें। धन्य त्यांचें पुण्य तें।। 2।।
ऐसा साधे जया नेम। तया सोय राखे आत्माराम।
एका जनार्दनीं परम। प्रिय तो देवाचा।। 3।।

भावार्थ

विठ्ठल ह्या तीन अक्षरी नामाचा सर्वकाळ वाचेने जप करणे हा ज्या साधकांचा नित्यनेम असतो ते धन्य होत, ते देवाला प्रिय असतात.या नामजपाच्या साधनेनें पुण्य संचय वाढतो.आत्माराम या साधकांवर प्रसन्न असतो असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.

7

दीनाचिया काजा। धांवे वैकुंठीचा राजा।। 1।।
तो हा हरी विटेवरी। समकर धरूनी कटीं ।।2।।
भक्त पुंडलिका पाहे। उभारूनी दृढ बाहे।। 3।।
एका जनार्दनीं शरण। विठ्ठलनाम पतीत पावन।। 4।।

भावार्थ

दीनदुबळ्या भक्तांसाठी धावत येणारा वैकुंठीचा राजा समचरण विटेवर ठेवून भक्त पुंडलिकासाठीं दृढपणे उभा आहे.विठ्ठल नामाने पतीत पावन होतात असे सांगून एका जनार्दनीं विठ्ठल चरणीं शरणागत होतात.

8

गोमटीं गोजिरीं पाऊलें साजिरीं। कटीं मिरविलीं करें दोन्हीं।। 1।।
वामभागीं शोभें भीमकतनया। राही सत्यभामा या जीवलगा।। 2।।
गरूड हनुमंत जोडलें तें करी। उभे महाद्वारीं भक्त जन ।।3।।
एका जनार्दनीं आनंद भक्तांचा। जयजयकार साचा विठ्ठलनामें।। 4।।

भावार्थ

दोन्ही हात कमरेवर, सुंदर गोजिरी पाऊले विटेवर ठेवून उभा असलेल्या विठ्ठलाच्या डाव्या बाजूला भीमक राजाची कन्या रुक्मिणी व सत्यभामा शोभून दिसत आहेत. समोर गरूड,हनुमंत हात जोडून उभे आहेत.महद्वारी भक्तजनांचा मेळावा विठ्ठल नामाच्या गजरांत आनंदाने नाचत आहेत.असे सुंदर शब्दचित्र या अभंगात एका जनार्दनीं रेखाटतात.

9

श्रीगुरुसारखा वंद्य नाहीं त्रिभुवनीं । तो कैवल्याचा धनी विटेवरी।। 1।।
विटेवरी उभा आनंदे राहिला। वैष्णवांचा मेळा शोभे तेथें।। 2।।
आनंद भीमातीरीं पुंडलिकापाशीं। नाम आनंदेसी गाऊं गीती।।3।।
एका जनार्दनीं कैवल्याचा धनी। तो नंदाच्या अंगणीं खेळे लीला।।4।।

भावार्थ

गोकुळांत नंदाच्या अंगणांत लीला करणारा श्रीहरी हाच परब्रह परमात्मा कैवल्याचा धनी भक्त पुंडलिका साठी भीमातीरी पांडुरंग रूपांत आनंदाने विटेवर उभा आहे.वैष्णवांचा मेळा आनंदानें क्विठ्ठल नामाचा जयघोष करीत आहेत असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात,हा कैवल्यमूर्ति पांडुरंग जगद्गुरू असून त्याच्या ईतका वंदनीय त्रीभुवनांत कोणी सापडणार नाही.

10

जन्मांतर सुखें घेऊं। श्रीविठ्ठलनाम आठवूं।। 1।।
नाहीं त्याचे आम्हा कोडें। विठ्ठल उभा मागें पुढें।।2।।
कळिकाळाचें भय तें किती। पाय यमधर्म वंदिती।।3।।
एका जनार्दनीं सिद्धी।नामें तुटती उपाधी।।4।।

भावार्थ

विठ्ठल नामाचा निजध्यास घेतलेल्या भक्तांना विठ्ठल त्यांचा सखा सांगाती वाटतो.सतत मागे पुढे राहून तो त्यांची सोबत करतो.अनेक जन्मांचे सोहळे विठ्ठल नाम गांत गांत साजरे करण्याची जिद्द हे भक्त बाळगतात.कळीकाळाचा नियंता विठ्ठल कृपेने या भक्तांच्या पायीं वंदन करतो.विठ्ठल नामानें सर्व सिध्दी प्राप्त होतात,सर्व उपाधी मिटतात असे एका जनार्दनीं सांगतात.

11

व्यापक विठ्ठल नाम तेव्हांचि होईल। जेव्हां तें जाईल मीतूंपण।।1।।
आपलें ते नाम जेव्हां वोळखील। व्यापक साधेल विठ्ठल तेणें।।2।।
आपले वोळखी आपणचि सांपडे। सर्वत्रासी जोडू विठ्ठलनाम।।3।।
नामिविण जन पशूच्या समान। एका जनार्दनीं जाण नाम जप।।4।।

भावार्थ

सर्व विश्वांत चैतन्यरुपाने व्यापून असलेल्या विठ्ठलाचे आपण एक अंश आहोत याची जाणीव होईल तेव्हांच आपल्याला आपली खरी ओळख पटेल.मनातला आपपर भाव संपून जीव त्या विश्वंभरासारखा विश्वव्यापी बनेल असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,नामजपाचा महिमा अपार असून नामाविण मानव हा पशुसमान आहे.

12

सर्वामाजीं सार नाम विठोबाचें। सर्व साधनांचें घर जे कां।।1।।
सहा चार अठरा वर्णितात कीर्ती । नामें मोक्षप्राप्ती अर्धक्षणीं।।2।।
शुकादिकीं नाम साधिलेसें दृढ। प्रपंच काबाड निरसिले।।3।।
एका जनार्दनीं जनीं ब्रह्मनाम । तेणें नेम धर्म सर्व होय।।4।।

भावार्थ

यज्ञ,याग,क्रिया,कर्म,तप ईश्वर प्राप्तीची ही सर्व साधनें शेवटी एका नामाशी येऊन थांबतात.नाम साधन सर्व साधनांचे सार आहे.साही शास्त्रे,चारी वेद,अठरा पुराणे ज्याच्या किर्तीचा महिमा गातात त्या विश्वात्मक पुराणपुरुषाचे केवळ नाम घेतल्यानें क्षणांत मोक्षप्राप्ती जयाचिया भेटी जातांहोते.संसारतापाचे निरसन होण्यासाठीं शुका सारख्या अनेक विरक्त मुनींनी दृढपणे नामसाधना केली असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,नामजप हे नादब्रह्म असून त्याने सर्व नेम,धर्म साकार होतात.

13

सदा सर्वकाळ मनीं वसे देव। तेथें नाहीं भेव कळीकाळाचा।।1।।
काळ तो पुढारी जोडितसे हात। मुखीं नाम गात तयापुढें।।2।।
म्हणोनि आदरें वाचे नाम घ्यावें। रात्रंदिवस ध्यावें विठ्ठलासी।।3।।
एकाजनार्दनीं जपतां नाम होटीं। पूर्वजा वैकुंठीं पायवाट ।।4।।

भावार्थ

सदा सर्वकाळ ज्या भक्ताच्या अंतरात देव वसत असतो त्या भक्तापुढे काळनियंता मुखाने नाम गात हात जोडुन उभा असतो.आदराने विठ्ठलाचे नाम घेऊन रात्रंदिवस त्याचे ध्यान करावे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, वाचेने निरंतर नामजप करण्याने पूर्वजांना वैकुंठ पदाची प्राप्ती होते.

14

जयाचिया भेटी जातां। मोक्ष सायुज्यता पाठीं लागे।।1।।
ऐसा उदार पंढरीराणा। पुरवी खुणा मनींच्या।।2।।
एक वेळ दरूशनें। तुटतीं बंधनें निश्चयें।।3।।
एका जनार्दनीं एक्याभावें।काया वाचा मनें गावें।। 4।।

भावार्थ

पंढरीचा राणा अत्यंत उदार असून भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करतो.या पंढरीनाथाचे एकवार दर्शन घेतांच भक्त सायुज्यता मुक्तीचा भागीदार होतो.जन्म मृत्युच्या बंधनातून मूक्त होतो. एका जनार्दनीं म्हणतात, काया, वाचा मनाने या पंढरीनाथाशी एकरूप व्हावे.

15

न धरी लौकिकाची लाज। तेणें सहज नाम गावें।।1।।
अनायासें देव हातां। साधन सर्वथा दुजें नाही।।2।।
साधन तें खटपट। नाम वरिष्ठ नित्य गावे।।3।।
एका जनार्दनीं सोपा। विठ्ठलनाम मंत्र जपा ।।4।।

भावार्थ

सदासर्वकाळीं वाचेने विठ्ठलनामाचा जप करणे हे परमेश्वर प्राप्तीचे सुलभ साधन आहे. घरदार, धनसंपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा या लौकिक गोष्टींचा हव्यास सोडून देवाचे नामसंकीर्तन करावे. ईतर खडतर साधनांपेक्षा नामसाधना वरिष्ठ आहे त्याने अनायासे देवाची कृपा होते असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलनाम हा सोपा मंत्र आहे तो आधी जपावा.

16

बोल बोलतां वाचें। नाम आठवी विठ्ठलाचें ।।1।।
व्यर्थ बोलणे चावटी। नामावाचुनी नको होटीं।।2।।
नाम हें परमामृत। नामें पावन तिन्ही लोक।।3।।
नाम सोपे भूमंडळीं। महापापा होय होळी ।।4।।
एका जनार्दनीं शरण । नाम पतितपावन।। 5।।

भावार्थ

व्यर्थ वायफळ गप्पा मारण्यापेक्षां सहज बोलतां विठ्ठल नाम आठवावें असा मोलाचा सल्ला देऊन एका जनार्दनीं सांगतात, तिन्ही लोक पावन करण्याचे सामर्थ्य विठ्ठलनामांत आहे.ते परम अमृत असून महापापांची होळी करुन पतितांना पावन करते.

17

विठ्ठलासी गाय विठ्ठलासी ध्येय। विठ्ठलासी पाहे वेळोंवेळां ।।1।।
विठ्ठल विसावा सोडवण जीवां। म्हणोनि त्याच्या गांवां जावें आधीं ।।2।।
विठ्ठलावाचुनि सोयरा जिवलग। विठ्ठलची मार्ग जपा आधीं।। 3।।
एका जनार्दनीं विठ्ठलावांचोनी। दुजा नेणे स्वप्नीं संग कांहीं।। 4।।

भावार्थ

विठ्ठल हा जीवाच्या मनाचे विश्रांतीस्थान असून त्याच्या दर्शनासाठी पंढरीस जावे.विठ्ठल हा सोय जाणणारा जिवलग सोयरा आहे.विठ्ठलाचे गुणकीर्तन करावे,विठ्ठलमूर्तीचे सतत ध्यान करावें, विठ्ठलनामाचा निरंतर जप करावा. एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलाशिवाय कशाचाही संग स्वप्नीं देखील नसावा.

18

करावे पूजन मुखीं नामस्मरण। अनुदिनीं ध्यान संतसेवा।। 1।।
आणिक न लगे यातायाती कांही ।वाचे विठाबाई वदे कां रे ।।2।।
एका जनार्दनीं संतांचे सांगात ।त्याचे वचनें मात कळों येत ।।3।।

भावार्थ

दोन्हीं करांनी विठ्ठलाचे पूजन, मुखाने नामस्मरण, चित्तांत विठ्ठलाचे ध्यान आणि संतसेवा ह्या शिवाय कोणत्याही खडतर साधनेची अपेक्षा विठाई करीत नाही असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,संत हे साधकांचे सांगाती असून त्यांच्या वचनातून विठ्ठलनामाचा महिमा समजतो.

19

बरें वा वाईट नाम कोणी घोका। तो हाय सखा विठोबाचा ।।1।।
कोणत्या सहवासें जाय पंढरीसी। मुक्ति दारापाशीं तिष्ठे सदा।।2।।
विनोदें सहज ऐके कीर्तन। तया नाहीं पतन जन्मोजन्मीं ।।3।।
एका जनार्दनीं ऐशीं माझी भाष। धरावा विश्वास विठ्ठलनामीं।। 4।। br>

भावार्थ

चांगल्या किंवा वाईट कोणत्याही पध्दतीने विठ्ठलनामाचा जप केल्यास भक्त विठोबाचा सखा बनतो.कोणाच्याही सोबतीने पंढरीची वारी केली तरी संसारापासून मुक्ती मिळते.विनासायास सहज विठ्ठलाचे गुणकीर्तन ऐकले तरी अनेक जन्म पतनाचे भय संपून जाते.एका जनार्दनीं म्हणतात,हे संतवचन असून या सत्य वचनावर विश्वास धरावा.

20

विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे। स्वरुप त्याचे ठसावें।।1।।
हा तो अनुभवा अनुभव। निरसे भेव काळाचें।।2।।
रूप देखतां आनंद । जन्म कंद तुटे तेणें।।3।।
एका जनार्दनीं मन। जडोन ठेलें चरणीं।। 4।।

भावार्थ

विठ्ठल नामाचा जप करतांना तो विश्वात्मा अंतरांत प्रकाशमान होतो याची प्रचिती घ्यावी.हे रुप पिहतांना मन आनंदाने भरून जाते.जीवाचे जन्म बंधन तुटून,काळाचे भय नाहीसे होते.एका जनार्दनीं म्हणतात,मन त्या ईश्वर चरणीं चिरंतन जोडले जाते.

21

ऐका ऐका वचन माझें। तुम्ही वदा विठ्ठल वाचे ।।1।।
नामापरतें साधन नाही । वेदशास्त्रे देती ग्वाही ।।2।।
चार वेद सहा शास्त्र।अवघा नामाचा पसर।। 3।।
अठरा पुराणांचे पोटीं। नामेंविण नाहीं गोष्टी।।4।।
नामें तारीले पातकी। मुक्त झाले इहलोकीं ।।5।।
अजमेळ तारिला। वाल्हा कोळी ऋषी केला।। 6।।
गणिका नेली निजपदा। रामनाम वदे एकदां।। 7।।
ऐसी नामाची ती थोरी। पुतना तारिली निर्धारित।। 8।।
आवडीने नाम गाय। एका जनार्दनीं वंदी पाय।। 9।।

भावार्थ

वाचेने विठ्ठलाला आळवणे या सारखे परमेश्वर प्राप्तीचे दुसरे साधन नाही असे चारी वेद एकमुखानें सांगतात.चारी वेद आणि सहा शास्त्रे हरीनामाचा महिमा विस्ताराने वर्णन करतात.अठरा पुराणे अनेक भक्तांच्या कथा सांगून नामाचा महिमा अखंडपणे सांगतात.पुत्रप्रेमाच्या मिषाने वारंवार देवाच्या नामाचा जप करणारा अजमेळ,वाटमारी करून कुटुंब निर्वाह करणारा वाल्याकोळी,पिंजर्यातल्या पोपटाला राम राम म्हणायल्या शिकवणारी गणिका नामजपाने मोक्षपदाला पोचले.श्रीहरीला दुधातून विषबाधा करण्यसाठी पाठवलेली पुतना सुध्दा उध्दरून नेली. अशी अनेक उदाहरणे देवून एका जनार्दनीं म्हणतात,आवडीने परमेश्वराचे नाम गायन करणारे सर्व भाविक वंदनीय आहेत.

22

आठवी गोविंद वेळोवेळां वाचे। तेणें या देहाचें सार्थक होय।। 1।।
विठ्ठल विठ्ठल मनीं निरंतर साचा।काया मनें वाचा छंद त्याचा।। 2।।
त्याविण आणिक दैवत पैं नाहीं। आणिके प्रवाहीं गुंतूं नको ।।3।।
सर्व सुखाचा विठ्ठल सांगाती। एका जनार्दनीं भ्रांती काढी काढी।। 4।।

भावार्थ

या मनुष्यदेहाचे सार्थक करायचे असेल तर हरघडीला गोविंदाचे स्मरण करावें.काया,वाचा,मनाला या गोविंदाचा छंद लागावा.गोविंदा खेरीज अन्य दैवत नाही असा ध्यास लागावा.सर्व सुख देणारा सखा आहे. गोविंदा शिवाय अन्य दैवत शोधण्याचा प्रयास करून चित्त विचलीत करू नका असे एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात.

23

काढी काढी भ्रांती देहाची सर्वथा । प्रपंचाची चिंता नको तुज।। 1।।
सर्वभावे शरण विठ्ठलासी जाई।ठायींचाचि ठायीं निवारील।। 2।।
देह गेह माझें म्हणणे हें दुजें ।सर्व विठ्ठलराजे समर्पी तूं ।।3।।
एका जनार्दनीं करी आठवण। चिंतीं तूं पावन परब्रह्म।। 4।।

भावार्थ

या नश्वर देहाचे ममत्व आणि प्रपंचाची चिंता सोडून एका विठ्ठलाला सर्वभावें शरण जावे.हा देह व गेह(घर) यांची अभिलाषा सोडून ते विठ्ठलचरणीं समर्पित करावे. हा विठ्ठल परब्रह्म स्वरूप असून त्याचे निरंतर पावन चिंतन करावे असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.

24

दृढभाव हृदयीं धरा। वाचे स्मरा विठ्ठल।। 1।।
मग तुम्हां काय उणें। होय पेणें वैकुंठ।। 2।।
धरा सत्यसमागम आवडीं। कीर्तनपरवडीं नाचावें।। 3।।
एका जनार्दनीं श्रोते। एकात्मते पावाल।। 4।।

भावार्थ

विठ्ठलचरणीं दृढ विश्वास धरुन वाचेने सदैव विठ्ठलाचे स्मरण केल्यास साधकाला कशाचिही उणीव भासणार नाही आणि वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल.आवडीने सत्यस्वरुप परमेशाचे कीर्तन करीत आनंदानें नाचावे भगवद् भक्तीचा हा सोपा मार्ग आहे.या मार्गाने परमात्म तत्वाशी एकरूप होता येईल असे एका जनार्दनीं या अभंगांत सुचवतात.

25

बहुतांची मतांतरे ती टाकुनी । विठ्ठलचरणीं बुडी दे कां।। 1।।
नव्हे तुज बाधा काळाची आपदा । ध्याई तूं गोविंदा प्रेमभरीत।। 2।।
जनार्दनाचा एका लागून चरणीं। बोलतसे वाणी करुणाभरीत।। 3।।

भावार्थ

अत्यंत नम्रपणे करुणामय वाणीने एका जनार्दनीं म्हणतात,अनेकांच्या परस्पर विरोधी मतांचा विचार न करता गोविंद चरणी शरणागत होऊन अनन्य भक्तीने त्याचे स्मरण केल्यास काळाची बाधा संपून जाईल.अनेक संकटे दूर होतील.असे एका जनार्दनीं श्रध्दापूर्वक विश्वासाने सांगतात.

26

जाणत्यां नेणत्यां हाचि उपदेश। विठ्ठल वाचे जप सुखें करा ।।1।।
न करा साधन वाउगाची शीण। विठ्ठलरूपी मन निमग्न राहो।। 2।।
भलतिया परी विठ्ठलासी गाये। सुखा उणें काय तुजला आहे ।।3।।
जन्ममरण तुटे आधिव्याधी । विठ्ठलनामें सिध्दि पायां लागे।। 4।।
एका जनार्दनीं जपतां विठ्ठल। न लगे तया मोल धन कांहीं ।।5।।

भावार्थ

विठ्ठलाची कृपा संपादन करण्यासाठी क्रिया,कर्म,नेम,धर्म,यज्ञयाग या साधनेची गरज नाही.ते व्यर्थ श्रम आहेत.विठ्ठल स्वरूपीं मन रममाण होण्यासाठी कोणत्याही प्रकारानें विठ्ठल नामाचे भजन करावें,यांतच सर्व सुख आहे.मनोदेहाच्या आधिव्याधी संपून सुखी जीवनाच्या सर्व सिध्दी प्राप्त होतील.जन्ममरणाची बंधने गळून पडतील.यासाठी नामसाधनेचा निरंतर जप करा असा उपदेश करून एका जनार्दनीं म्हणतात,या नामसाधनेसाठी कांहीं मोल द्यावे लागत नाही.

27

स्थिर करूनियां मन। वाचें गावा जनार्दन।। 1।।
तुटती बंधने । यमयातनेची।। 2।।
ऐशी विठ्ठल माऊली ।वाचे स्मरा वेळावेळीं कळिकाळाची चाली।
होऊं नेदी सर्वदा।। 3।।
कापलिया काळ । येथें न चले त्याचे बळ।
वाउगा पाल्हाळ। सांडा सांडा परता।। 4।।
धरा विश्वास दृढ मनीं । लक्ष लावावें चरणीं।
शरण एका जनार्दनीं । नुपेक्षी तो सर्वथा ।।5।।

भावार्थ

मन एकाग्र करून जगदीश्वराच्या भजनांत तल्लीन व्हावे त्यामुळे यमयातनेची बंधने तुटून पडतील.कळीकाळाची गती मंद होईल.विठ्ठलमाऊलीच्या सामर्थ्यापुढे काळाचे बळ कमी होईल.मनामध्ये दृढ निश्चय करून विठ्ठल चरणीं लीन व्हावे.एका जनार्दनीं म्हणतात, ही विठ्ठल माऊली भक्तांची उपेक्षा करणार नाही.

28

एकविध भावें हरी। वाचे उच्चारी सर्वदा।। 1।।
सर्व साधनांचे सार। विठ्ठलमंत्राचा उच्चार। 2।।
असो सदा हेंचि ध्यान। विठ्ठल नामाचें चिंतन।। 3।।
एका जनार्दनीं जपा। विठ्ठल मंत्र सोपा।। 4।।

भावार्थbr>

भक्तीभावाने विठ्ठल नामाचा सदासर्वदा उच्चार करावा.नामसाधना हे हे सर्व साधनेचे सार आहे.विठ्ठलमूर्तीचे ध्यान आणि चिंतन हा सर्वांत सोपा मंत्र असून त्याचा सदोदित जप करा असे एका जनार्दनीं परत परत सांगतात.

29

एक वेळ गाय विठ्ठलाचे नाम। मोक्ष मुक्ति सकाम पुढें उभे।। 1।।
आवडीनें घाली तया लोटांगण। संताचे चरण वंदी माथां।। 2।।
पंढरीची वारी संतांचा सांगात। पुरवी सर्व हेत निश्चयेसी।। 3।।
एका जनार्दनीं धरूनि विश्वास। संतांचा दास होय आधीं।। 4।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं संतपदाचा महिमा वर्णन करतात. पंढरीची वारी आणि संतांची संगती हे मनातील सर्व हेतू पूर्ण करतात.या वचनावर विश्वास ठेवून संत चरणांचे दास्यत्व करावे.

30

विठ्ठल म्हणतां विठ्ठचि होसी । संदेह येविशीं धरुं नको।।1।।
सागरीं उठती नाना पैं तरंग। सिंधु तो अभंग विठ्ठल एक ।।2।।
तैसें मन करीं द्वैत न धरी। सर्व चराचरीं विठ्ठल एक ।।3।।
एका जनार्दनीं विठ्ठलावांचुनी । दुजा नेणो कोणी स्वप्नीं आम्ही।। 4।।

भावार्थbr>

विठ्ठल नामांतच विठ्ठलाशी एकरुप होण्याचे सामर्थ्य आहे यांविषयीं संदेह धरुं नये.जसे सागरांत अनंत तरंग उमटतात तरी तो सागर अभंग असतो.विठ्ठल तत्व या सागरासारखे समजावें.सर्व चराचरांत व्यापलेले चैतन्यतत्व विठ्ठलाचेच रूप आहे हे अद्वैत भावाने जाणावे.स्वप्नांत देखील याविषयीं संदेह नसावा असे प्रतिपादन करून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलाचे नाम घेतांघेतांच विठ्ठ होशील.

31

उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे। अनंता जन्मांचे दोष जाती ।।1।।
न करी आळस आलिया संसारीं। वदा निरंतरी विठ्ठलनाम ।।2।।
साधेल साधन तुटतीं बंधने। विठ्ठलनाम जाण जप करीं।। 3।।
एका जनार्दनीं आसनीं शयनीं। विठ्ठल निशिदिनीं जप करीं।। 4।।

भावार्थ

अनंत जन्माचे दोष निवारण करण्यासाठी विठ्ठल नामाचा जप करावा.संसाराची सारी बंधने तोडून टाकण्याचे हे सोपे साधन आहे.जागेपणीं, स्वप्नांत किंवा गाढ झोपेतही विठ्ठलनामाचा रात्रंदिवस जप करावा त्यांत आळस करू नये असे आवाहन एका जनार्दनीं या अभंगांत करतात.

32

अखंडित वाचे। विठ्ठल वदा साचें ।।1।।
तेणें चुकतीं बंधन। कर्माकर्मी नाही पतन।। 2।।
सदा विठ्ठल ध्यानीं मनीं। तोचि पुण्यपावन जनीं ।।3।।
जननी पवित्र तयाची हाव। एका जनार्दनीं धन्य सुख।। 4।।

भावार्थ

अखंडपणे वाचेने विठ्ठलनाम घेतल्याने कर्म,अकर्म,विकर्म यांची बंधने चुकतात आणि कर्मभेदाने भोगाव्या लागणार्या पतनापासून मुक्ती मिळते.सदासर्वदा विठ्लनाम घेऊन भजन,चिंतन करणारा पुण्यपावन म्हणुन मान्यता पावतो.याची जन्मदात्री धन्य होय असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, ह्या पुण्यपुरुषाचे सुख अलौकिक आहे.

33

ज्ञान होय आधीं संतां शरण जातां। मग ओळखितां कळे रूप।। 1।।
नामांचें जें मुळ रूपाचें रूपस। पंढरीनिवास हृदयीं धरी।। 2।।
प्रपंची परमार्थी तारक हें नाम।ब्रह्मानंद प्रेम सर्व वसे।। 3।।
सच्चिदानंद खूण एका जनार्दनीं । स्वयं ब्रह्म जाण नाम असे ।।4।।

भावार्थ

संताना शरण गेल्यानंतर ज्ञान मार्ग सांपडतो.या मार्गाने प्रवास सुरू झाला की,परमेश्वरी रुपाचा साक्षात्कार घडतो.नामाचे जे मुळरुप तोच पंढरीनाथ असून त्याला अंत:करणांत सदैव धारण करावें.हे विठ्ठल नाम प्रपंचांत आणि परमार्थांत तारक आहे.हे नाम परब्रह्म असून सच्चिदानंद हे त्याचे स्वरूप आहे.त्यामुळे जीवनांत ब्रह्मानंद व भक्तिप्रेम निर्माण होते.परमेश्वराचे नाम हे स्वयं ब्रह्म आहे हे जाणून घ्यावे असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात.

16

शिव शिव अक्षरें दोन । जो जपे रात्रंदीन ।।1।।
धन्य तयाचा संसार । परमार्थाचें तेंच घर ।।2।।
सदोदित वाचे। जपे शिव शिव साचें ।।3।।
एका जनार्दनीं शिव। सोपा मंत्र तो राणीव।। 4।।

भावार्थ

शिव शिव ह्या दोन अक्षरी नामाचा जो रात्रंदिवस जप करतो तो संसारांत धन्यता पावतो.त्याचे घर परमार्थाचे निवासस्थान बनते.एका जनार्दनीं म्हणतात,शिवनामाचा मंत्र अत्यंत सोपा असून सर्व मंत्रांत श्रेष्ठ आहे.सदासर्वकाळ या मंत्राचा वाचेने जप करावा.

श्रीरामनाममहिमा

1

शिवाचे हृदयीं नांदसी श्रीरामा। काय वर्णू महिमा न कळे आगमानिगमा ।।1।। वेदशास्त्रे मौनावलीं पुराणें भांबावलीं। श्रुति म्हणती नेति नेति शब्दें खुंटली।। 2।। वाच्य वाचक जगन्नाथ स्वये शिवाचा आत्माराम । एका जनार्दनीं सुख तयांसी गातां निष्काम। ।3।।

भावार्थ

वाणीने ज्याचे सतत स्मरण करावे तो जगन्नाथ शिवशंकराचे ह्रदयांत नांदणारा श्रीराम असून तोच शिवाचा आत्माराम आहे.या आत्मारामाचा महिमा अगाध असून वेदशास्त्रे मौन होतात.पुराणे कोड्यांत पडतात.श्रुती या विश्वंभराचे वर्णन करतांना नि:शब्द होतात.एका जनार्दनीं म्हणतात,या जनार्दनाचे नाम गात असतांना अपार सुख मिळते आणि चित्त निष्काम होते.

2

मानवा रामनामीं भजें।
तेणें तुझें कार्य होतें सहजें।। 1।।
अनुभव घेई अनुभव घेई।
अनुभव घेई रामनामीं।। 2।।
शंकरादि तरले वाल्मिकादि उध्दरले।
तें तूं वहिलें घेई रामनाम ।।3।।
एका जनार्दनीं नामाचा परिपाठीं ।
दोष पातकें पळती कोटी।।4।।

भावार्थ

रामनामाच्या भजनाने वाल्याचा वाल्मिकी झाला ,त्याचा उध्दार झाला. शिवशंकर रामाचे सतत चिंतन केल्याने तरुन गेले. कोणतेही कार्य सहज सफल होण्यासाठी मानवाने रामनाम भजावे या वचनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, नामाचा परिपाठ ठेवल्याने माणसाचे अनेक दोष आणि कोटी पातकें पळून जातात.

3

कासयासी हटयोग धूम्रपान । घालुनी आसन चिंती वेगीं।। 1।।
सोपा रे मंत्र राम अक्षरे दोनीं। जपतां चुके आयणी चौर्यांशीची ।।2।।
मागें बहुतांचा उपदेश हाची। तरलें रामनामेंची पातकी जन।। 3।।
एका जनार्दनीं रामनाम ख्याती । जाहली पैं विश्रांति शंकरासी।। 4।।

भावार्थ

दोन अक्षरी रामनामाचा सोपा मंत्र असून त्याचा जप केल्याने चौर्यांशी लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकतात.रामनामाने पातकी जन तरून जातात असा उपदेश पूर्वी अनेक ब्रह्मज्ञानी ऋषी,मुनीनी केला आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, समुद्र मंथनातून निघालेल्या विषाचा दाह संपवण्यासाठी शिवशंकरांनी रामनामाची मात्रा घेतली आणि विश्रांति मिळाली.हटयोग, धूम्रपान या सारख्या खडतर तपश्चर्या करण्यापेक्षा आसनावर बसून रामनाम जपणे हा सहजसोपा मार्ग आहे.

4

सुख रामनामें अपार। शंकर जाणें तो विचार ।।1।।
गणिका जाणें रामनाम । गजेंद्र उध्दरिला राम ।।2।।
शिळा मुक्त केली। रामनामें पदा गेलीं।। 3।।
तारिले वानर। रामनामें ते साचार ।।4।।
रामनामे ऐसी ख्याती। एका जनार्दनीं प्रीती ।।5।।

भावार्थ

रामनामांत अपार सुख आहे हे शिवशंकर जाणतात. याच रामनामाने गणिका संसार सागर तरुन गेली आणि गजेंद्राची संकटातून सुटका झाली आणि उध्दार झाला.अहिल्या शापातून मुक्त होऊन रामनामाने रामपदां गेली.रामनामाने अनेक वानर तरून गेले.रामनामाचा महिमा सांगतांना एका जनार्दनीं अशी अनेक उदाहरणे देतात.

5

श्रीराम जयराम वदतां वाचे। पातकें जाती कोटी जन्माची।। 1।।
जयजय राम जयजय राम। तुमचे नाम गाये शंकर उमा ।।2।।
नाम थोर तिहीं लोकीं साजे। उफराटे वदतां पातक नासले वाल्हयाचे ।।3।।
एका जनार्दनीं नाम साराचें सार । नामस्मरणें तुटे भवबंध येरझार ।।4।।

भावार्थ

श्रीरामाच्या नामाचा जयजयकार करून शंकर पार्वती रामनाम गातात.रामनामाचा उफराटा (मरा) उच्चार करूनही वाल्याचे महापातक नाहीसे होऊन तो वाल्मिकी या महान पदाला पोचला.रामनामाची थोरवी तिन्ही लोकी गाजते.एका जनार्दनीं म्हणतात,रामनाम सर्व साधनेचे सार असून कोटी जन्मांचे पाप नाहिसे करण्याचे सामर्थ्य नामांत आहे.भवबंधन तोडून जन्म मरणाच्या फेरा नामस्मरणाने चुकवतां येतो.

6

आणिकांचे नामें कोण हो तरला। ऐसें सांगा मला निवडोनी।। 1।।
या रामनामें पातकी पतीत। जीव असंख्यात उध्दरिले।। 2।।
जुनाट हा पंथ शिवाचे हे ध्येय। रामनाम गाणे स्मशानीं तो।। 3।।
गिरजेसी आवडी रामनामें गोडी। एका जनार्दनीं जोडी हेंचि आम्हां।। 4।।

भावार्थ

रामनामाने असंख्य पतित पातकी जीवांचा उध्दार होतो. रामनामाची ही ख्याती पूर्वीपार चालत असून शिवशंकर स्मशानात रामनामाचा जप करीत असे. शिवशंकराप्रमाणे गिरजेला सुध्दां रामनामाची अवीट गोडी वाटे.याच रामनामाचा छंद आपल्यालाही जडावा अशी प्रार्थना एका जनार्दनीं करतात.

7

रामना उच्चार होटीं । संसाराची होय तुटी।। 1।।
संसार तो समूळ जाय। राम उच्चारूनी पाहे।। 2।।
मागें अनुभवा आलें। गजेंद्रादि ऊध्दरिले।। 3।।
शिव ध्यातो मानसी। रामनाम अहर्निशीं।।4।।
एका जनार्दनीं राम। पूर्ण परब्रह्म निष्काम।। 5।।

भावार्थ

मुखाने रामनामाचा जप म्हणजेच संसारसुखाविषयीं विन्मुखता. रामनामाच्या अखंडित जपाने गजेंद्राची प्राणसंकटातून सुटका झाली असा अनुभव आहे. राम हा परब्रह्म स्वरूप असून पूर्ण निष्काम आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

8

नाम उत्तम चांगले। त्रिभुवनीं तें मिरविलें।
जे शंभूने धरिलें। निजमानसीं आदरें।। 1।।
धन्य मंत्र रामनाम। उच्चारितां होय सकाम।
जन्म कर्म आणि धर्म। होय सुलभ प्राणिया।। 2।।
एका जनार्दनीं वाचे। ध्यान सदा श्रीरामाचे।
कोटी तें यज्ञांचे। फळ तात्काळ जिव्हेसी।। 3।।

भावार्थ

रामनाम त्रिभुवनांत सर्वोत्तम मंत्र असून शिवशंकरांनी आदराने या मंत्राचा स्विकार केला आहे. रामनाम उच्चारताच सर्व कामना पूर्ण होऊन जीवनाचे सार्थक होते कारण रामनामाने जन्म, कर्म आणि धर्म यांचे आचरण करणे सुलभ होते. एका जनार्दनीं म्हणतात, वाचेने रामनाम, श्रीराममूर्तीचे सर्वकाळ ध्यान केल्याने कोटी यज्ञाचे फळ साधकाला तात्काळ प्राप्त होते.

9

शिव सांगे गिरजेप्रती। रामनामें उत्तम गती।। 1।।
असो अधम चांडाळ। नामें पावन होय कुळ।। 2।।
नाम सारांचे पैं सार। भवसिंधू उतरीं पार।।3।।
नाम श्रेष्ठांचे पैं श्रेष्ठ। एका जनार्दनीं वरिष्ठ।। 4।।

भावार्थ

शिवशंकर गिरजेला सांगतात की रामनामानें जीवाला उत्तम गती मिळते.अत्यंत पापी चांडाळाचे कुळ पावन करण्याचे सामर्थ्य रामनामांत आहे. श्रेष्ठ साधकांचा हा अत्यंत श्रेष्ठ मंत्र असून भवसिंधू तरून नेणारी नौका आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

10

अहर्निशीं ध्यान शंकर धरीं ज्याचें। तो श्रीराम वाचें कां रे नाठविसी। ।1।।
रामनाम म्हणतां तुटेल बंधन।। होईल खंडन कर्माकर्मीं।। 2।।
रामनामें गणिका नेली मोक्षपदां। तुटली आपदा गर्भवास।। 3।।
रामनाम जप नित्य ती समाधीं। एका जनार्दनीं उपाधि तुटोनि गेली।। 4।।

भावार्थ

रात्रंदिवस शिवशंकर ज्याचे ध्यान करतात तो श्रीराम वाचेने निरंतर आठवावा. रामनामजपानें कर्म, अकर्माची बंधने तुटतिल. रामनामाने गणिका मोक्षपदाला पात्र झाली. अनेक भक्तांच्या संकटांचे निवारण झाले. एका जनार्दनीं म्हणतात, रामनामाचा जप म्हणजे नित्य समाधी अवस्था, ज्या अवस्थेत सर्व उपाधी संपून जातात.

शिवमाहात्म्य

1

आरोहण ज्याचे नंदीवरी। वामांकीं शोभे गिरिजा नारी ।।1।।
त्रिशुळ डमरू शंख कपाल। मस्तकीं गंगा चंद्रमाळ।। 2।।
अंकीं षडानन गजवदन। सदा प्रसन्न ज्याचे ध्यान ।।3।।
भूतें वेताळ शोभती। हर्षयुक्त उमापती।। 4।।
अंगीं विभूति लेपन। सदा समाधी तल्लीन।।5।।
मुखीं रामनाम छंद ।एका जनार्दनीं। परमानंद ।।6।।

भावार्थ

जो नंदीवर आरूढ झाला असून डाव्या मांडीवर हिमालय कन्या गिरिजा विराजमान आहे. मस्तकावर चंद्रकोर आणि गंगेचा प्रवाह शोभून दिसत आहे.मांडीवर कार्ति केय आणि गजानन असून या उमापती शिवशंकराचे ध्यान अत्यंत प्रसन्न दिसत आहे.सर्वांगावर चिताभस्माचा लेप लावला आहे.मुखी अखंड रामनामाचा जप चालू असून मन सतत समाधींत तल्लीन झालेले आहे.सभोवतालीं भूतें आणि वेताळांचा समूह असलेला गिरिजापती शंकराला पाहून परमानंद दाटून येतो असे एका जनार्दनीं म्हणतात.

2

पांच पांचाचा मिळोनि मेळु। सदाशिव म्हणती अमंगळु ।।1।।
कवणा न कळे याचा भावो। शिव साचार देवाधिदेवो ।।2।।
विरूपाक्ष म्हणती भेकणा। परी हा सर्वांग देखणा।। 3।।
एका जनार्दनीं प्रबोधु। शिव नित्य नवा आणि वृध्दी ।।4।।

भावार्थ

पृथ्वी,आकाश जल,वायू आणि अग्नीं ही पंचमहाभूते आणि प्रत्येकाचे पांच गुण असे पंचवीस तत्वें मिळून सदाशिव हा अमंगल आहे असे म्हणतात परंतू या देवाधिपती शिवशंकराचे महात्म्य कोणालाच कळत नाही. देवराज इंद्र या सर्वांगसुंदर महादेवाला भेकणा म्हणतात.असे कथन करून शिव हा नित्य नवा असून सतत नविन रचना करणारा आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

3

निर्गुण निराकार अवयवरहित। जो शब्दरुपातीत शिव जाण ।।1।।
चहूं वाचांवेगळा पांचांसी निराळा। तो असे व्यापला सर्वांघटीं ।।2।।
ध्यानीं मनीं नये समाधी साधनीं। तो भक्तांचे ध्यानीं तिष्ठतसे ।।3।।
एका जनार्दनीं नामरूपा वेगळा। परब्रह्म पुतळा शिव जाणा।। 4।।

भावार्थ

जो सत्व,रज,तम या गुणांविरहित,अवयवरहित,निराकार असून ज्याच्या रुपाचे वर्णन शब्दांनी करतां येत नाही.वैखरी,मध्यमा,परा,पश्यंती या चारही वाणीने ज्याचे यथार्थ वर्णन करणे अशक्य आहे.तो पंचमहाभुतांहुन वेगळा असून सर्व सृष्टीत व्यापून राहिला आहे.ध्यान,धारणा,समाधी या ध्यान मार्गाने त्याचे आकलन होत नाही.भक्तीमार्गाने मात्र तो सहजसुलभ आहे.असे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात,नामरुपावेगळा हा परब्रह्म परमेश्वर शिवशंकर आहे हे जाणून घ्यावे.

4

हृदयीं परमात्मा नांदे परिपूर्ण । तो शिव सनातन पूर्णब्रह्म ।।1।।
जीव तो गुंतला विषयाचे लक्षीं। शिव सर्वसाक्षीं परब्रह्म ।।2।।
भाव अभावना जया जैसी पाही। एका जनार्दनीं देहीं परब्रह्म ।।3।।

भावार्थ

प्रत्येक जीवाच्या हृदयांत परमात्मा नांदत असतो परंतू जीवात्मा ईंद्रिय विषयांचा आनंद घेण्यात गुंतलेला असतो. शिव हा सनातन,सर्वसाक्षी,परिपूर्ण परब्रह्म असून प्रत्येक जीवाच्या भावभावना जाणतो.एका जनार्दनीं म्हणतात,देहीं परब्रह्म आहे हे जाणून घ्यावे.

5

अकार उकार मकारां वेगळां। परब्रह्म पुतळा शिव एक ।।1।।
अंडज जारज,स्वेदज,उद्भीजा वेगळा। परब्रह्म पुतळा शिव एक।।2।।
प्राण अपान व्यान उदान समान। यांवेगळा जाण शिव एक ।।3।।
पृथ्वी आप तेज वायु आकाश। यांवेगळा भास शिव एक।।4।।
द्वैता अद्वैता वेगळाचि जाण । एका जनार्दनीं पूर्ण शिव एक ।।5।।

भावार्थ

ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतां पेक्षा वेगळा असा परब्रह्म परमेश हाच शिव होय.पक्षी,मनुष्यप्राणी,घामापासून जन्म घेणारे ढेकणा सारखे जीव किंवा पाण्यांत जन्मणारे यापेक्षा निराळा असलेला,देहांत असणार्‍या पंच प्राणापेक्षा तसेच पंच महाभूतांहून वेगळा भासणारा द्वैत आणि अद्वैत या दोन्ही तत्वांहून वेगळे परमात्म तत्व हाच शिवशंकर होय असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

6

वेदशास्त्री गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरी ।।1।।
तेणें माझ्या मना होय समाधान। आठवितां चरण वेळोवेळां ।।2।।
सकळ इंद्रिया झाली पैं विश्रांती ।पाहतां ती मूर्ति शंकराची।। 3।।
एका जनार्दनीं शिव हा भजावा। संसार करावा सुखरूप ।।4।।

भावार्थ

चारी वेद आणि साही शास्त्रें यांनी ज्याचा महिमा गाईला असून पुराणे ज्याच्या चरित्राचे वर्णन करतात तो शिवशंकर आपण डोळे भरून पाहिला असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,या शिवदर्शनाने मनाचे समाधान झाले.सर्व इंद्रियांना विश्रांती मिळाली.परत परत या शिवचरणांची आठवण येऊन मन शांत होते.एका जनार्दनीं म्हणतात, सुखरूप पणे संसार करतांना शिवाचे भजन नित्यनियमाने करावें.

7

शिव भोळा चक्रवर्ती । त्याचे पाय माझे चित्तीं ।।1।।
वाचे वदतां शिवनाम। तया न बाधी क्रोधकाम।। 2।।
धर्म अर्थ काम मोक्ष। शिवा देखतां प्रत्यक्ष ।।3।।
एका जनार्दनीं शिव। निवारी कळीकाळाचा भेव।। 4।।

भावार्थ

भोळ्या चक्रवर्ती शिवाचे चरणकमल आपण चित्तांत धारण केले असून वाचेनें शिवाच्या परमपवित्र नामाचा जप करणार्या साधकाला काम क्रोधाचा उपद्रव होत नाही.शिव-दर्शनानें धर्म, अर्थ, काम मोक्ष हे चारी पुरूषार्थ साधले जातात. एका जनार्दनीं म्हणतात, शिवशंकर मनातील कळीकाळाच्या भयाचे निवारण करतात.

8

स्वरुप सुंदर अति विशाल। नेत्रीं निघती अग्निज्वाळ।
हृदयावरी सर्पाची माळ। दुष्ट दुर्जना प्रत्यक्ष काळ।। 1।।
वाचे वदे हरहर शब्द। तेणें निरसे भवबंध।। धृ0।।
माथां जटा शोभे पिंगटवर्ण। मध्ये गंगा वाहे परिपूर्ण।
हृदयीं सदा समाधान। तयासी पाहतां निवे मन।। 2।।
शिव शिव नाम हें तारक। जया ध्याती ब्रह्मादिक ।
सिध्द साधक वानिती अनेक। तया ध्यांता सुख अलौकिक ।।3।।
वामांगी गौरी सुंदर। तेजे लोपतसे दिनकर।
हृदयीं ध्यातां परात्पर । एका जनार्दनीं तुटे येरझार।। 4।।

भावार्थ

अत्यंत सुंदर विशाल नयनांमधून अग्निच्या ज्वाळा निघत आहेत.वक्षस्थळीं सर्पाची माळ रूळत आहे.मुखानें हरिनामाचा जप सुरू आहे असा शिवशंकर दुष्ट आणि दुर्जनांचा नाश करणारा प्रत्यक्ष काळ असून तो साधकांची संसार बंधने तोडून टाकतो.मस्तकावर पिंगट रंगाच्या जटा शोभत असून त्या जटांमधून परमपवित्र गंगेचा प्रवाह वहात आहे. या देवाधिदेवाचे हृदय समाधानाने अखंडपणे भरलेलें आहे. या शिवदर्शनाने मनाच्या सर्व व्यथा नाहिशा होतात. या शिवशंकराचे ब्रह्मादिक देव ध्यान करतात.अनेक सिध्द साधक या देवाची स्तुतीसुमने गाऊन पूजा करतात.या शिवाचे ध्यान करण्यांत असामान्य आनंद आहे.या गौरीहराच्या डाव्या बाजूस गौरी आसनस्थ असून यां उभयतांच्या तेजापुढे सूर्यतेज फिके वाटत आहे.एका जनार्दनीं म्हणतात,भक्तीभावानें या परात्पर परब्रह्म स्वरूपाचे ध्यान केल्यास साधकांचे जन्म-मरणाचे फेरे चुकतात.

9

उत्तम अथवा चांडाळ। न पाहेचि खळाखळ ।।1।।
शरण आलिया तत्वतां। तया नुपेक्षी सर्वथा ।।2।।
न म्हणे शुचि अथवा चांडाळ। स्मरणेंचि मुक्तीफळ।। 3।।
ऐसा पतित पावन। शरण एका जनार्दन।। 4।।

भावार्थ

दुष्टबुध्दी चांडाळ असो किंवा शुध्दबुध्दी सज्जन असो शरण आलेल्या शरणागताची उपेक्षा शिवशंकर कधीहि करीत नाही.केवळ स्मरण करणार्या साधकाला मुक्तीफळाचे वरदान देतात.या पतितांना पावन करणार्या शिवशंकराला एका जनार्दनीं शरण जातात.

10

त्रिभुवनीं उदार। भोळा राजा श्रीशंकर।। 1।।
जे चित्तीं जया वासना। पुरवणें त्याचि क्षणा।। 2।।
याती कुळ न पाहे कांहीं । वास कैलासीं त्या देई।। 3।।
एका जनार्दनीं सोपें। शिवनाम पवित्र जपें।। 4।।

भावार्थ

स्वर्ग पृथ्वीं पाताळ या तिन्ही भुवनांत औदार्यासाठीं सर्वोत्तम असलेला भोळा शिवशंकर प्रत्येक भक्ताच्या मनातिल वासना त्याच क्षणीं पूर्ण करतो.जाती कुळाचा विचार न करतां भक्ताला कैलासांत निवास देतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, शिवनाम अत्यंत पवित्र असून वाचेला अतिशय सुलभ आहे.

11

नाम उत्तम पावन। शिव शिव वरिष्ठ जाण।। 1।।
ऐसा पुराणीं महिमा ।न कळे वेदशास्त्रा सीमा।। 2।।
जयासाठीं वेवादती । तो शिव स्वयंज्योती।। 3।।
रूपा अरूपावेगळा। एका जनार्दनीं पाहे डोळां।। 4।।

भावार्थ

शिव शिव हे नाम उत्तम पावन असून सर्वश्रेष्ठ आहे असा या नामाचा महिमा पुराणांत वर्णन केला आहे.वेदशात्रांना सुध्दां ज्याचे स्वरूप पूर्णपणे आकलन होत नाही.ज्या स्वरूपिविषयी सतत वादविवाद होतात तो शिव ज्योती स्वरूप आहे.या शिवाचे रूप आगळेवेगळे असून ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावे असे एका जनार्दनीं म्हणतात.

12

सोमवार व्रत एकादशी करी । त्याचें चरण शिरीं वंदीन मी ।।1।।
शिव विष्णु दोन्हीं एकचि प्रतिमा। ऐसा जया प्रेमा वंदीन त्यासी।। 2।।
सदा सर्वकाळ शिवाचें कीर्तन। आनंदे नर्तन भेदरहित।। 3।।
ऐसा जया भाव सदोदित मनीं । तयाचे चरणीं मिठी घाली।। 4।।
एका जनार्दनीं व्रताचा महिमा। नकळेचि ब्रह्मा उपरमला.

भावार्थ

सोमवार आणि एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांच्या चरणांना आदराने वंदन करावे.शिव व विष्णु या दोन्ही देवांची एकच प्रतिमा आहे असा ज्यांचा दृढ विश्वास आहे त्यांना प्रेमाने वंदावें. जो भक्त सदोदित शिवाचे कीर्तन करतो,ज्याचे चित्त भेदभावरहित आहे त्यांच्या चरणांना मिठी घालावी असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,एकादशी आणि सोमवार या व्रताचा महिमा न समजल्याने ब्रह्मदेव उपरमला.

13

देखोनियां हरलिंग। जो न करी तया साष्टांग।। 1।।
मुख्य तोचि वैरी । स्वमुखें म्हणतसे हरी।। 2।।
व्रत न करी शिवरात्र। कासयानें होती पवित्र ।।3।।
ऐशियासी यमपुरी। एका जनार्दनीं निर्धारीं ।।4।।

भावार्थ

शिवलिंग पाहूनही जो साष्टांग नमस्कार करीत नाही तो भक्त मुखाने हरीनामाचा जप करीत असला तरी तो वैरी समजावा.सर्वांना पापमुक्ती देणारे शिवरात्रीचे व्रत जो करीत नाही तो पावन होणार नाही, अशा पाखंडी लोकांना खात्रीने यमपुरींत पडावें लागते असे एका जनार्दनीं म्हणतात.

14

शिवरात्र व्रत करी यथाविधी । भावें पूजी आधीं शिवलिंग ।।1।।
चुकलें चुकलें जन्मांचें बंधन ।पुनरागमन नये तेणें ।।2।।
एक बिल्वदळ चंदन अक्षता । पूजन तत्वतां सोपें बहु।। 3।।
एका जनार्दनीं पूजितां साचार। इच्छिलें हरिहर पूर्ण करिती।। 4।।

भावार्थ

यथासांग शिवरात्रीचे व्रत जो करतो, भक्तिभावाने आधीं शिवलिंगाची पूजा करतो त्याच्या जन्माचे बंधन तुटते त्या शिवभक्ताला परत जन्माला यावे लागत नाही.एक बेलाचे पान,चंदन आणि अक्षता एव्हढीच सामुग्री लागणारे हे व्रत अतिशय सोपे आहे.एका जनार्दनीं सुचवतात शिवरात्रीचे दिवशी शिवलिंगाचे पूजन भक्तीभावाने केल्यास शिवशंकर आणि विष्णु मनोकामना पूर्ण करतात.

15

सकळ देवांचा जनिता। त्रिगुण सत्ता चाळवितां ।।1।।
शरण जाता त्याच्या पायां। सर्व हारपली माया।। 2।।
भेदाभेद निवारिले। सर्व स्वरूप कोंदलें ।।3।।
एका जनार्दनीं शिवें। जीवपणा मुकलों जीवे।। 4।।

भावार्थ

सत्व,रज,तम या तिन्ही गुणांवर सत्ता चालवणारा,सर्व देवांचा निर्माता अशा देवाधिदेव शिवशंकराला शरण गेल्यास मायारुप असलेला संसार विलयास जातो. सर्व भेदाभेद संपून जातात, मनातला द्वैतभाव विरून जातो. सर्व विश्वांत एकच शिवरूप कोंदून राहिले आहे याची जाणीव होते.जीवाची देहबुध्दी नाहिशी होते,म्हणजेच देह जीवपणाला मुकतो असे एका जनार्दनीं म्हणतात.


हरिहर ऐक्य

1

एका आरोहणा नंदी। एका गरूड बाहे स्कंधी ।।1।।
एका नित्य वास स्मशानीं। एका क्षीरनिधी शयनीं।। 2।।
एका भस्मलेपन सर्वांग। एका चंदन उटी अव्यंग ।।3।।
एका रूंडमाळा कंठीं शोभती । एका रूळे वैजयंती।। 4।।
एका जनार्दनीं सारखे। पाहतां आन न दिसे पारखे।। 5।।

भावार्थ

शिवशंकरांचे वाहन नंदी तर श्री विष्णु गरूडावर आरूढ होतात. शिव नित्य स्मशानांत वास करतात तर विष्णु क्षीरसागरांत शेष नागावर पहुडलेले असतात.शिव सर्व अंगाला भस्म लावतात तर विष्णु चंदनाच्या उटीचा सर्वांगाला लेप देतात.सर्पमाळा शिवाच्या गळ्यांत तर वैजयंती माळ श्रीहरीच्या गळ्यांत शोभून दिसते.एका जनार्दनीं म्हणतात,हरिहर वाहन,निवासस्थानें,वस्त्राभुषणे या बाबतीत भिन्न असले तरी स्वस्वरुपी दोघेही अभिन्न आहेत.


2

एकां जटा मस्तकीं शोभती। एका किरीट कुंडलें तळपती ।।1।।
एका अर्धांगी कमळा। एका विराजे हिमबाळा ।।2।।
एका गजचर्म आसन । एका हृदयीं श्रीवत्सलांछन।। 3।।
एका जटाजूट गंगा । एका शोभे लक्ष्मी पैं गा ।।4।।
एका जनार्दनीं दोघे। तयां पायीं नमन माझें।। 5।।

भावार्थ

शिवाने मस्तकावर जटा धारण केल्या आहेत तर विष्णुच्या मस्तकावर किरीट आणि कानांत कुंडले शोभून दिसत आहेत.कमळा ही विष्णुंची तर हिमालयाची कन्या पार्वती ही शिवाची अर्धांगिनी आहे. शिव गजचर्माचे (हत्तीच्या कातड्याचे)आसनावर विराजमान आहेत तर श्रीहरीनें वक्षावर भक्तवत्सलतेचे प्रतिक धारण केले आहे.सदाशिवाने मस्तकावरील जटांमध्ये गंगेचा प्रवाह बध्द केला आहे तर श्रीपतीने लक्ष्मीचा अंगिकार केला आहे.एका जनार्दनीं म्हणतात,या हरिहराच्या चरणांना ते वंदन करतात.

3

एका शोभे कौपीन। एका पीतांबर परिधान।।1।।
एका कंठीं वैजयंती। एका रूद्राक्ष शोभती ।।2।।
एकाउदास वृत्ति सदा। एक भक्तांपाशीं तिष्ठे सदा।।3।।
एक एका ध्यान करिती। एक एकातें चिंतित।।4।।
एका जनार्दनीं हरिहर। तया चरणी मज थार।। 5।।


भावार्थ

हरानें कौपीन (लंगोटी) तर हरीने कमरेला पीतांबर कसला आहे.श्रीहरीच्या गळ्यांत वैजयंती तर श्रीहराच्या गळ्यांत रुद्राक्षाच्या माळा रूळत आहेत.श्रीहरी सदा भक्तांच्या मेळाव्यांत रममाण असतात तर शिव सर्वदा उदासीन वृत्ती धारण करतात.असा विरोधाभास असुनही दोघे एकमेकांचे सदासर्वकाळ ध्यान करतात आणि परस्परांच्या चिंतनांत मग्न असतात.एका जनार्दनीं म्हणतात, या हरिहरांच्या चरणकमळांचा आश्रय आपणास मिळावा.

4

एक ध्याती एकमेकां । वेगळें अंतर नोहे देखा।। 1।।
ऐसी परस्परें आवडी। गूळ सांडुनी वेगळी नोहे गोडी ।।2।।
एकमेकांतें वर्णिती। एकएकांते वंदिती।। 3।।
एका जनार्दनीं साचार। सर्वभावें भजा हरिहर।। 4।।

भावार्थ

हरिहरांत वेगळा अंतराय नसून दोघेही एकमेकांचे ध्यान करतात.जशी गुळाचा गोडवा आणि गूळ परस्परांपासून वेगळे असू शकत नाहीत तसे हरिहर एकमेकांशी संलग्न आहेत.ते एकमेकांचे गुणवर्णन करून एक दुसर्याला वंदन करतात.एका जनार्दनीं सुचवतात, सर्वांनी हरिहराचे भजन करावे, या श्रेष्ठ धर्माचे आचरण करावे.

5

हरिहरांसी जे करिती भेद। ते मतवादी जाण निषिद्ध।। 1।।
हरिहर एक तेथें नाहीं भेद। कांसयिसि वाद मूढ जनीं ।।2।।
गोडीसी साखर साखरेस गोडी। निवडितां अर्ध घडी दुजी नोहे।। 3।।
एका जनार्दनीं हरिहर म्हणतात। मोक्ष सायुज्यता पायां पडे।। 4।।

भावार्थ

शैव आणि वैष्णव यांच्या मध्यें जे भेद करतात,असे मत असलेल्या लोकांना निशिध्द मानावे.श्रीहरी आणि श्रीहर एकच स्वरूपी असतांना मूढपणे वाद घालणे निरर्थक आहे.साखरेची माधुरी आणि साखर वेगळी करता येत नाही.एका जनार्दनीं म्हणतात, हरिहर या मंत्रजपाने सायुज्य मुक्ती (वैकुंठ,कैलास) लोक प्राप्त होतो.

6

होऊनी वैष्णव । जो कां निंदी सदाशिव ।।1।।
त्याचे न पहावें वदन। मुर्खाहुनी मूर्ख पूर्ण।। 2।।
भक्तीचा सोहळा । शिवें दाविला सकळां।। 3।।
एका जनार्दनीं वैष्णव। शिरोमणी महादेव ।।4।।

भावार्थ

शिवशंकर स्मशानात एकांती बसून रामरूपाचे सतत ध्यान करतात.भक्ती कशी असावी याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण शिवशंकर आहेत.असे असताना वैष्णवांनी सदाशिवाची निंदा करावी हे मूढपणाचे लक्षण मानले जाते. एका जनार्दनीं म्हणतात,भक्तीभावाचा सोहळा दाखवणारे महादेव वैष्णवांचे शिरोमणी आहेत.

7

शिव शिव नाम वदतां वाचे। नासे पातक बहूतां जन्मांचे ।।1।।
जो मुकुटमणी निका वैष्णव। तयाचें नाम घेतां हरे काळाचे भेव ।।2।।
तिहीं लोकीं श्रेष्ठ न कळे आगमां निगमां । तयाची गोडी ठाऊक श्रीरामा।। 3।।
एका जनार्दनीं नका दुजा भावो । विष्णु तोचि शिव ऐसा निर्वाहो ।।4।।

भावार्थ

शिव शिव हे नाम वाचेने जपले असतां अनेक जन्मांचे पाप नाहिसे होते.शिवशंकर वैष्णवांचा मुकुटमणी असून त्याचे नाम काळाचे भय दूर करते.तिन्हीं लोकीं श्रेष्ठ असलेल्या शिवशंकराचा महिमा वेदशास्त्रांना कळत नाही. श्रीराम शिवाचा महिमा यथार्थपणे जाणतात. एका जनार्दनीं म्हणतात, शिव आणि विष्णु असा दुजाभाव नसावा.शिव तोच विष्णु असा भक्तिभाव मनीं दृढ धरावा.

8

हरिहराच्या चिंतनीं। अखंड वदे ज्याची वाणी।। 1।।
नर नोहे नारायण । सदा वाचे हरिहर जाण ।।2।।
पळती यमदूतांचे थाट। पडती दूर जाऊनी कपाट।। 3।।
विनोदें हरिहर म्हणतां। मोक्षप्राप्ती तयां तत्वतां ।।4।।
एका जनार्दनीं हरिहर । भवसिंधु उतरी पार ।।5।।

भावार्थ
जो साधक हरिहराच्या चिंतनांत मग्न होऊन नामसाधना करतो तो सामान्य माणूस नसून प्रत्यक्ष नारायणाचे रूप आहे असे समजावे.हरिहराचा नामजप ऐकून यमदूत दूर पळून जाऊन गिरीकंदरी लपून बसतात.विनोदाने जरी नाम मुखीं आले तरी सहज मोक्षप्राप्ती होते.एका जनार्दनीं म्हणतात,हरिहर भक्तांना संसार सागरातून पार करतात.


9

अलंकार जाहलेपणें । जेवीं असे निखळ सोनें ।।1।।
नाम भिन्न रूप एक। देहीं देहात्मा तैसा देख ।।2।।
गोडी आणि गूळ। नोहे वेगळे सकळ।। 3।।
जीव शीव नामें भिन्न। एकपणें एकचि जाण ।।4।।
एका जनार्दनीं शरण । भेदरूपें दिसे भिन्न ।।5।।

भावार्थ

सोन्याचे अलंकार घडवले तरी त्यातिल मूलद्रव्य सोनेच असते.भिन्न भिन्न नामरूपाच्या या सृष्टींत देहात्मा परमात्म्याचे अंश असतात.गूळ आणि गोडवा यांत वेगळेपणा नसतो.जीव आणि शीव ही नामे भिन्न असली तरी जीवशीव एकरूपच आहेत हे जाणून घ्यावे.सद्गुरु जनार्दन स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं म्हणतात. नामरूपाचा भेद असल्याने जीवशिव भिन्न वाटतात.

10

जगाचा जनक बाप हा कृपाळु। दीनवत्सल प्रतिपाळू पांडुरंग ।।1।।
पहा डोळेभरी द्वैत तें टाकुनि। करील झाडणी महत्पापा ।। 2।।
ज्या कारणे योगी साधन साधिती। ती हे उभी मूर्ति भीमातटीं ।।3।।
एका जनार्दनीं भक्त करूणाकर । ठेवुनी कटी कर उभा विटे।। 4।।

भावार्थ

दीनदुबळ्यांचा सांभाळ करणारा पांडुरंग विश्वाचा कृपाळू जन्मदाता आहे.मनातिल द्वैतभावना दूर करून डोळ्यांत प्राण आणून त्याचे दर्शन घ्यावे.या भगवंतासाठी योगी कठोर तप करतात तो करूणाकर भीमातटी कटीवर कर ठेवून विटेवर उभा आहे.एका जनार्दनीं म्हणतात,भक्तीभावाने डोळे भरून दर्शन घेतल्यास तो महापापांची होळी करतो.

11

अभेदावांचून न कळे| भक्तीचे महिमान ।
साधितां दृढ साधन। विठ्ठलरूप न कळे।। 1।।
येथें पाहिजे विश्वास। दृढता आणि आस।
मोक्षाचा सायास। येथें कांहीं नकोची ।।2।।
वर्ण भेद नको याती। नाम स्मरतां अहोरात्रीं ।
उभी विठ्ठलमूर्ती । तयांपाशीं तिष्ठत।। 3।।
आशा मनिशा सांडा परतें। कामक्रोध मारा लातें।
तेणेंचि सरतें। तुम्ही व्हाल त्रिलोकीं।। 4।।
दृढ धरा एक भाव। तेणें चरणीं असे वाव।
एका जनार्दनीं भेव। नाहीं मग काळाचे।। 5।।

भावार्थ

साधकाच्या मनांत दृढ विश्वास आणि भक्ती नसेल तर विठ्ठलाचे खरे स्वरूप समजणार नाही. मनात शिव,विष्णु असा भेदभाव असेल तर भक्तीचा महिमा कळणार नाही. वर्णभेद,जातीभेद सर्व विसरून अहोरात्र नामस्मरण केल्यास विठ्ठलमूर्ती वाट पहात उभी राहते.भविष्यातील आशा, मनातिल ईच्छा,कामना,क्रोध यांना बाजुला सारून भक्तीमार्गाने वाटचाल सुरू केल्यास त्रैलोक्याचा धनी आपलासा होईल.त्याच्या चरणांशी आश्रय मिळेल. एका जनार्दनीं म्हणतात,अशा साधकाला कळीकाळाची भिती राहणार नाही.


श्रीदत्तनाममहिमा

1

धरीं अवतार विश्व तारावया। अंत्रीची अनुसूया गरोदर ।।1।।
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी। शुक्लपक्ष दिनीं पूर्णतिथी ।।2।।
तिथी पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरू तो वासर उत्सवात।। 3।।
एका जनार्दनीं पूर्ण अवतार। निर्गुण निराकार आकारले।। 4।।

भावार्थ

मार्गशीर्ष महिना,हेमंत ऋतू, शुक्लपक्षांतिल पौर्णिमेची शुभ तिथी,रोहिणी नक्षत्र आणि गुरुवार या शुभ दिनी निर्गुण,निराकार परमेश्वराने विश्वकल्याणासाठी अवतार धारण करण्याचे ठरवून अत्री ऋषींची भार्या अनुसूयेचे पोटीं जन्म घेतला.एका जनार्दनीं म्हणतात, हा दत्तात्रयाचा पूर्ण अवतार आहे.

2

अव्यक्त परब्रह्म न्हाणी पायांवरी। अभेद नरनारी मिळोनियां ।।1।।
पीतांबर पदरें पुशिला घननिळा । निजविला निर्मळ पालखांत ।।2।।
निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी। प्रेमाचे आवडी सेवा माय।। 3।।
एका जनार्दनीं दत्त पाळण्यांत घातिला। हालविती त्याला अनुसूया।। 4।।

भावार्थ

दत्तजन्माच्या उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी अनेक स्त्री-पुरूष एकत्र जमले.अव्यक्त परब्रह्म दत्तात्रय या नामरूपाने अवतरले असतां सती अनुसूया त्याला पायांवर घेऊन न्हाऊ घालते,पीतांबराच्या पदरानें त्याचे अंग पुसते.या घननिळाला निर्मळ करून पाळण्यांत निजविते.कडुलिंबाची पाने,कात आणि सुंठ ही त्रीगुणी भुकटी सर्वांना प्रेमाने प्रसाद वाटते. एका जनार्दनीं म्हणतात, अनुसूया दत्ताचा पाळणा हलक्या हाताने झुलवते.

3

दत्त वसे औदुंबरीं। त्रिशूळ डमरू जटाधारी।। 1।।
कामधेनु आणि श्वान। उभे शोभती समान ।।2।।
गोदातीरीं नित्य वस्ती। अंगीं चर्चिली विभुती ।।3।।
काखेमाजीं शोभे झोळी। अर्धचंद्र वसे भाळीं ।।4।।
एका जनार्दनीं दत्त। रात्रंदिनीं आठवित ।।5।।

भावार्थ

औदुंबर वृक्षाच्या छायेत दत्तगुरूंचा निवास असतो.या जटाधारी देवाने हतांत त्रिशूळ आणि डमरू धारण केले आहेत.अंगाला विभुतीचे लेपन केले असून कपाळावर अर्धचंद्राची कोर शोभून दिसत आहे.गाय आणि कुत्रा पायाशी उभे आहेत.खांद्यावर भिक्षेची झोळी आहे.गोदावरी नदीच्या तीरावर दत्तात्रयाची नित्य वस्ती असते.एका जनार्दनीं या दत्तगुरूंचे रात्रंदिवस स्मरण करतात.

4

दत्त माझा दीनानाथ। भक्तालागीं उभा सतत।। 1।।
त्रिशूळ घेऊनियां करीं। उभा असे भक्ताद्वारीं।। 2।।
भाळीं चर्चिली विभुती। रूद्राक्षाची माळ कंठीं ।।3।।
जवळी असे कामधेनु। तिचा महिमा काय वानुं।। 4।।
एका जनार्दनीं दत्त। रूप राहिलें हृदयांत।। 5।।

भावार्थ

दत्तगुरू हे दीनांचे नाथ असून भक्तांच्या रक्षणासाठी हातांत त्रिशूळ घेऊन भक्तांच्या दारांत उभे आहेत.त्यांच्या पायाशी कामधेनु उभी असून तिचा महिमा अवर्णनीय आहे. कंठांत रूद्राक्षाची माळ असून कपाळी विभुती लावली आहे.एका जनार्दनीं म्हणतात, हे रूप अंत:करणांत भरून राहिले आहे.

5

हातीं कमंडलु दंड। दत्तमूर्ति ती अखंड।। 1।।
ध्यान लागो माझे मना। विनवितो गुरुराणा ।।2।।
हृदयीं वसे क्षमा शांती ।।3।।
तोचि चित्तांत आठव। गुरूराज दत्त देव ।।4।।
एका जनार्दनीं दत्त। तद्रूप हें झालें चित्त।। 5।।

भावार्थ

हातांत कमंडलु आणि अखंड दंड घेतलेल्या गुरूमुर्तिचे मनाला अखंड ध्यान लागावे,हृदयांत सतत क्षमा शांती नांदावी, गुरूराज दत्त देवाचे सतत स्मरण राहावे अशी प्रार्थना एका जनार्दनीं या अभंगात करतात.

6

आयुष्य जाय माझें व्यर्थ। दत्त समर्थ महाराज।। 1।।
धांव धांव लवकरी । करूणा करी गुरूराया।। 2।।
मी तव अनाथ अपराधी। हीनबुध्दि स्वामीया ।।3।।
काळ घाला पडिलावरी। धांव श्रीहरी लवलाह्या ।।4।।
दत्ता पतित पावना। शरण एका जनार्दना ।।5।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं समर्थ दत्त महाराजाची विनवणी करीत आहेत.आपण अनाथ अपराधी असून गुरूकृपे शिवाय आयुष्य व्यर्थ जात आहे.काळाचा घाला पडल्यावर दत्तगुरूंनी त्वरित धावून यावे,करूणा करावी.पतिताला पावन करावे.

7

धांवे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ।।1।।
अनाथासी सांभाळावें। ब्रीद पावन आपुलें ।।2।।
तूजविण सोडवितां । नाहीं त्राता दुसरा।। 3।।
महादोषी पतितालागीं । करा वेगीं उध्दार ।।4।।
एका जनार्दनीं दत्ता। अवधूता माय बापा ।।5।।

भावार्थ

अनाथांचा नाथ हे दत्तराजाचे पावन ब्रीद असून भक्तजनांना तारणारा दुसरा त्राता नाही.महादोषी, पतित जनांचा उध्दार करण्यासाठी,अनाथांना सांभाळण्यास साठी दत्त महाराजांनी धांव घ्यावी अशी प्रार्थना एका जनार्दनीं या अभंगात करतात.

8

वेधोनि गलें माझें मन। हारपलें दुजेपण ।।1।।
ऐसी ब्रह्ममूर्ति दत्त। बोतलीसे आनंदभरित ।।2।।
तयाविण ठाव । रिता कोठें आहे वाव ।।3।।
एका जनार्दनीं भरला। सबाह्य अभ्यंतर व्यापिला ।।4।।

भावार्थ

दत्ताची ब्रह्ममूर्ति पाहून मन वेधले गेले. मनांतले सारे द्वैतभाव मावळलें. सर्व विश्वांत आतबाहेर हे ब्रह्मरूप व्यापून राहिलें आहे असा साक्षात्कार झाला. मन आनंदित झाले असा दत्तभेटीचा अनुभव एका जनार्दनीं वर्णन करतात.

9

ऐसी जगाची माऊली । दत्तनामे व्यापुनी ठेली ।।1।।
जावें जिकडे तिकडे दत्त। ऐशी जया मति होत ।।2।।
तया सांकडेंचि नाहीं । दत्त उभा सर्वां ठायीं ।।3।।
घात आघात निवारी। भक्तां बाहे धरी करीं ।।4।।
ऐशी कृपाळु माउली। एका जनार्दनीं देखिली ।।5।।

भावार्थ

जिकडे जावे तिकडे दत्त असा अस्तिक्य भाव ज्या साधकाच्या मनांत निर्माण होतो त्याला कोणतेही कोडे (संकट) पडत नाही. अंगावर पडणार्या घात आघातांचे निवारण करण्यासाठीं प्रत्यक्ष दत्त माऊली सर्व ठिकाणीं उभी असते. भक्तांना हात धरून सावरते.अशी जगन्माता दत्त या नामाने विश्वविख्यात आहे.असे सांगून एका जनार्दनीं आपण त्या माऊलीचे दर्शन घेतले आहे असे सांगतात.

10

लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा।
देखिलासे डोळां दत्तराव ।।1।।
चरणीं घातली मिठी। प्रेम दुणावे पोटीं।
पाहतां हारपली दृष्टि दुजेपणा ।।2।।
मन माझें वेधलें परिपूर्ण भरलें।
एका जनार्दनीं सांठविलें हृदयीं दत्त।। 3।।

भावार्थ

अत्यंत मनोहर लावण्यपूर्ण प्रेमाचा पुतळा डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितला असा अनुभव एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात. या दत्त दर्शनाने मनातील द्वैतभाव विलयास गेला. चरणांना मिठी घालतांच अंत:करणातिल प्रेमभावाला भरती आली.मन भक्तीप्रेमाने परिपूर्ण भरले.एका जनार्दनीं म्हणतात, हे सद्गुरू रूप हृदयांत पूर्णाशांने साठवले.

11

आमुचे कुळीचें दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ।।1।।
तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप।। 2।।
हेंचि आमुचे व्रत तप। मुखीं दत्तनाम जप।। 3।।
तयाविण हे सुटिका नाहीं नाहीं आम्हां देखा।। 4।।
एका शरण जनार्दनीं। दत्त वसे तनमनीं ।।5।।

भावार्थ

सद्गुरु जनार्दन स्वामींना शरणागत झालेले एका जनार्दनीं सांगतात, श्रीगुरुदत्त हे त्यांच्ये कुळदैवत आहे.सर्व प्रकारचे संसार ताप नाहिसे करणारे मायबाप आहेत.दत्तगुरुंची सेवा हे त्यांच्या घराण्याचे व्रत असून सर्व द्वंद्वात्मक दु:खे दूर करण्यासाठी दत्तनामाचा जप ही च साधना आहे.दत्त गुरु त्यांच्या तन मनीं ध्यानीं वास करतात.दत्तगुरुंशिवाय त्यांना दुसरा तरणोपाय नाही.

12

आत्मज्ञान बिंबलें हृदयीं । दत्त वोळखिला ठायीं।। 1।।
पारिखेपणा दूर केला । अवघा दत्तचि गमला ।।2।।
नामें पावन चराचरें । तें दत्तनाम दोन अक्षरें ।।3।।
एका जनार्दनीं छंद। दत्तनामें लागला वेधु ।।4।।

भावार्थ

सद्गुरू कृपेने चित्तांत आत्मज्ञानाचा उदय झाला. दत्तगुरुंची ओळख पटली.दुरावा नाहिसा झाला.सर्वाठायीं दत्तरूप भरून राहिले आहे याचा प्रत्यय आला.दत्तनामानें चराचर पावन झाले.दत्त या दोन अक्षरी नामाचा मनाला छंद जडला.मनाला दत्त दर्शनाचा वेध लागला असे एका जनार्दनीं म्हणतात.

13

श्रीगुरूकृपे दत्त वोळखिला । हृदय डोल्हार्यावरी बैसविला।
अभेद पूर्ण चांदवा तेथें दिला। शुध्द भक्तीनें दत्त पूजियेला ।।1।।
दत्त चरणीं मज लागलीसे गोडी । भवभयाची तुटोनी गेली बेडी।। ध्रृ0।।
सोहं गुढी तेथें उभारली। मंत्र उपदेशें देहबुध्दि गेली।
पूर्ण निवृत्ती प्रवृत्तीही धाली। सहज पूर्णानंद पूर्णता आली।। 2।।
जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी । बोलावयाची राहिली शिराणीं।
जनीं वनीं एकात्मता खाणीं। एका जनार्दनीं रंगलीसे वाणी।। 3।।

भावार्थ

सद्गुरु कृपेने दत्तस्वरुपाची ओळख पटली. हृदयाच्या हिंदोळ्यावर दत्तगुरुंची स्थापना करून अभेद भावभक्तीने दत्ताचे पूजन केले.दत्तचरणाची गोडी निर्माण होऊन संसार भयाची शृंखला गळून पडली.दत्त नाममंत्राने देहबुध्दी विलयास जाऊन स्वानंदाची गुढी उभारली.प्रवृतीची पूर्ण निवृत्ती झाल्याची अनुभूती आली.अंत:करणांत सहज पूर्णानंदाची भरती आली.जनीं वनीं सर्वत्र,जिकडे पहावे तिकडे चक्रपाणी एकात्मरूपाने व्यापून आहे याची जाणीव झाली. एका जनार्दनीं म्हणतात, या असामान्य अनुभूतीचे वर्णन करताना वाणी रंगून गेली.

14

स्वानंदे आवडी दत्त पाहूं गेलों डोळां। तंव चराचर अवघे श्रीदत्तची लीला।। 1।।
विस्मयो दाटला आतां पाहूं मी कैसें। देखता देखणें अवघें दत्तचि दिसे।। 2।।
असे आणि नसे हा तंव विकल्प जनांत। जनीं जनार्दन निजरूपें दत्त ।।3।।
एका जनार्दनीं तेथें अद्वय नित्य। सबाह्य अभ्यंतरी दत्त नांदत।। 4।।

भावार्थ

अत्यंत आनंदाने दत्त दर्शनाची आवड पूर्ण करण्यासाठी गेलो असतां सर्व चराचर सृष्टी ही दत्ताचिच लीला आहे असा अनुभव आला.दत्त,दर्शन आणि देखावा ही त्रिपुटी विलयास जावून सगळीकडे दत्तरूपच भरले आहे असा अनुभव येवून मनाला विस्मय वाटला.असणे,नसणे हा विकल्प जावून अद्वैताची नित्य भावना चित्तांत दाटून आली.विश्वांत आणि अंतरांत एकच दत्त नांदत आहे याची खात्री पटली.सद्गुरु जनार्दन हे निजरुपाने दत्तस्वरूप आहेत असे एका जनार्दनीं म्हणतात.

15

मनासी स्थिरता नामें दत्त वेध । दुजा नाहीं छंद आणीक कांहीं।। 1।।
म्हणोनि संकल्प दृढ झाला पायीं। दत्तावांचुनी ठायीं नोहे कांहीं ।।2।।
पाहतां पाहाणे परतलें मन। पाहण्याचें विंदान विसरले।। 3।।
एका जनार्दनीं परब्रह्म पुतळा। दत्त देखिला डोळां आत्मदृष्टी।। 4।।

भावार्थ

अत्यंत एकाग्रतेने दत्त नामाचा जप करण्याशिवाय वेगळा छंद नसल्याने मनाचा निश्चय दृढ झाला.दत्त भजनाशिवाय दुसरा विचार मनाला सुचेनासा झाला.दत्त दर्शनाची ओढ संपली.एका जनार्दनीं म्हणतात, दत्तगुरू हा परब्रह्म पुतळा आत्मदृष्टीने पाहिला.

16

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती वेगळा। पाहे तो सांवळा दत्तरावो।। 1।।
मन माझे वेधलें दत्ताचे चरणीं। नाहीं आन मनीं दुजा छंद ।।2।।
परात्पर पहावा हृदयी तैसा ध्यावा। एका जनार्दनीं सांठवावा दत्त मनीं।। 3।।

भावार्थ

ब्रह्मा रजोगुणी, विष्णु सत्वगुणी, महेश तमोगुणी असे मानतात परंतु सांवळा दत्तगुरू या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती पेक्षा वेगळा,गुणातित आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,मन दत्तचरणीं गुंतले,मनाला दुसरा छंद उरला नाही. दत्तराज नयनांनी पहावा,हृदयांत ध्यान करावे आणि मनांत सांठवावा.

17

दत्तात्रय नाम । नित्य जपे जो निष्काम।। 1।।
तया नाहीं द्वैतभाव। दृष्टि दिसे गुरूराव।। 2।।
दत्ताविण नसे स्थान। दत्तरूप जनवन।। 3।।
ध्यानीं मनीं दत्तराज। दत्ताविण नांही काज।। 4।।
एका जनार्दनीं जपा। दत्तनाम मंत्र सोपा।। 5।।

भावार्थ

दत्तनामाचा जप निष्कामपणे कोणतिही वासना मनांत न ठेवतां करतो त्याला दत्तगुरू स्वता: दर्शन देतात, त्या भक्ताचा द्वैतभाव नाहिसा होतो.जनीं,वनीं,स्वप्नीं दत्तरूप प्रत्ययास येते.ध्यानी मनीं दत्ताशिवाय अन्य कांहीं जाणवत नाही. एका जनार्दनीं म्हणतात, दत्तनामाचा सोपा मंत्र जपावा.

18

खुंटलासे शब्द बोलता आनंद। सर्व ब्रह्मानंद कोंदाटला ।।1।।
तें हें दत्तनाम आवडी आदरें। उच्चारी सोपारें सर्वकाळ ।।2।।
कलिमाजीं सोपें दत्तनाम घेतां। संसाराची वार्ता उरो नेदी ।। 3।।
एका जनार्दनीं लागलासे छंद। दत्तनामें आनंद सर्वकाळ।। 4।।

भावार्थ

दत्तनामाचा जप करतांना जो आनंद मिळतो त्याचे वर्णन करतांना शब्द सापडत नाही, तो आनंद शब्दातीत असतो.कलियुगांत सोपे दत्तनाम घेतांना संसाराचा विसर पडतो.ह्या दत्तनामाचा जप अत्यंत आदराने मनापासून करावा. एका जनार्दनीं म्हणतात.दत्तनामाचा छंद म्हणजे सर्वकाळ टिकणारा आनंद!

19

दत्त नामाचा उच्चार । मुखीं वसे निरंतर।। 1।।
तयापाशीं शांति क्षमा। प्राप्त होय निजधामा।। 2।।
सर्व सुखें तयापाशीं। ऋध्दिसिध्दि त्याच्या दासी।। 3।।
भुक्ति मुक्ति लोटांगणीं । लागताती त्या चरणीं।। 4।।
म्हणे एका जनार्दन मना लागलेंसे ध्यान।। 5।।

भावार्थ

मुखाने सदासर्वदा दत्तनामाचा उच्चार करणार्या साधकाच्या मनांत सतत क्षमा,शांती नांदत असते.ऋध्दि सिध्दि दासी बनून सेवा करतात.भुक्ति,मुक्ति आदराने चरणवंदन करतात. सर्व सुखे प्राप्त होतात.एका जनार्दनीं दत्तगुरूंचे निरंतर ध्यान लागावे अशी प्रार्थना करतात.

20

सर्व पर्वकाळ दत्त वदतां वाचे। आणिक सायासाचे मूळ खुंटे।। 1।।
म्हणा दत्त दत्त म्हणा दत्त दत्त । म्हणा दत्त दत्त वेळोवेळां।। 2।।
काळ वेळ कांही न लगे तत्वतां। नाम उच्चारितां दरुशन।। 3।।
भोळ्या भावीकांसी जप मंत्रावळी। दत्तनाम माउली सोपा जप।। 4।।
एका जनार्दनीं नामाचा प्रताप। निवारे भवताप दरूशनें।। 5।।

भावार्थ

दत्तनामाचा जप करण्यास काळ वेळाचा विचार करण्याचे कारण नाही. हा पवित्र मंत्र वाचेने वदतांना सदा पर्वकाळ असतो. भोळ्या भाविकांना ही मंत्रावळी सहज सोपी आहे. नाम उच्चारतांच दत्त माउलीचे दर्शन होते.असा विश्वास व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात,दत्त नामाचा महिमा असा आहे की,दत्तदर्शनाने सर्व भवतापांचे निवारण होते.

21

दत्त दत्त म्हणे वाचे। काळ पाय वंदी त्याचे ।।1।।
दत्तचरणीं ठेवीं वृत्ती। होय वृत्तीची निवृत्ती ।।2।।
दत्तरूप पाहे डोळा। वंद्य होय कळिकाळा।। 3।।
एका जनार्दनीं दत्त। हृदयीं वसे सदोदित।। 4।।

भावार्थ

वाचेने दत्तनामाचे स्मरण करणाऱ्या भाविकाचे चरणवंदन प्रत्यक्ष काळ करतो. मनाच्या सगळ्या वृत्ती दत्तचरणी समर्पित केल्याने वृत्तींची निवृत्ती होते.दत्तरूपाचे दर्शन लाभलेला भक्त कळिकाळास वंद्य होतो असे सांगून एका जनार्दनीं हृदयांत दत्तगुरूंनी निरंतर वास करावा अशी प्रार्थना करतात.

22

म्हणता दत्त दत्त। दत्त करी गुणातीत।। 1।।
दत्तनामाचा निजछंद। नामें प्रगटे परमानंद ।।2।।
निज भाव समर्थ। जेथें नाम तेथें दत्त।। 3।।
एका जनार्दनीं दत्त। दत्त करी देहातीत ।।4।।

भावार्थ

दत्तनामाचा जप साधकाला सत्व,रज,तम या गुणविकारां पासून मुक्त करतो.दत्तनामाचा छंद मनाला उच्च प्रतीचा आनंद देतो.जेथे नाम तेथे दत्त येऊन उभा राहतो.एका जनार्दनीं म्हणतात, दत्तनामाचे स्मरण भक्ताची देहबुध्दी नाहिसी करून आत्मबुध्दी प्रदान करते.


श्रीदत्तमानसपूजा

1

केलें आवाहन। जेथें नाहीं विसर्जन।। 1।।
भरला ओतप्रोत। स्वामी माझा देव दत्त।। 2।।
गातां येत नाहीं । पूर्ण सुलीनता पाही।। 3।।
एका जनार्दनीं खूण। विश्वीं भरला परिपूर्ण ।।4।।

भावार्थ

आपला स्वामी गुरू देव दत्त सर्व विश्वांत परिपूर्णपणे ओतप्रोत भरला आहे हीच मनाला पटलेली एकमेव खूण आहे असे अती विनम्रपणे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पूजेसाठी दत्तगुरुंना आवाहन करावे तेथें विसर्जन करावे लागत नाही.

2

अनन्य आवरी उदक निर्मळ । वासना सोज्वळ नम्रपणें ।।1।।
प्रक्षाळिले पाय वाही एक माथा। हृदयीं प्रीति धरितां प्रेमलाभ ।।2।।
घेऊनियां तीर्थ इंद्रियें तों धालीं। सकळ निवालीं जनार्दनीं ।।3।।

भावार्थ

सोज्वळ वासनेच्या निर्मळ पाण्यानें कमंडलू भरून नम्रपणे दत्तगुरूंचे चरण प्रक्षालन केले. मस्तकावर अभिषेक केला.हृदयातील भक्तीभावाने प्रेमलाभ झाला.चरणतीर्थ घेऊन सर्व इंद्रिये तृप्त झाली आणि जनार्दन स्वरूपी एकरूप झाली.

3

चोहों देहांची क्रिया । अर्घ्य दिले दत्तात्रया ।।1।।
जे जे कर्म धर्म । शुध्द सबळ अनुक्रम।। 2।।
इंद्रिय क्रियाजात । कांहीं उचित अनुचित ।।3।।
आत्मा माझा देवदत्त। एका जनार्दनीं स्वस्थ।। 4।।

भावार्थ

स्थूल सुक्ष्म कारण महाकारण या चारी देहांच्या कर्म, धर्म,शुध्द, सबळ या चारी क्रिया दत्तात्रयाला अर्पण केल्या. इंद्रियांच्या कडुन घडणाऱ्या उचित अथवा अनुचित क्रिया दत्तचरणी पदार्पण केल्या.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, आत्मतत्त्व देवदत्त असल्याने चित्त स्थिर झाले.


4

संचित क्रियमाण । केलें सर्वांचे आचमन ।।1।।
प्रारब्ध शेष उरलें यथा। तेथें ध्याऊं सद्गुरुदत्ता ।।2।।
झालें सकळ मंगळ। एका जनार्दनीं फळ ।।3।।

भावार्थ

चांगल्या, वाईट कर्मांचे जे साचलेले फळ होते ते आचमन करून गिळून टाकले.जे प्रारब्धाचे (पापपुण्याचे) फळ भोगायचे राहिले असेल त्या साठी सद्गुरूदत्ताचे ध्यान करावे असे सांगून एका जनार्दनीं समाधानाने म्हणतात, सर्व मंगलमय क्रियांचे फळ मिळालें.

5

वर्णावर्ण नाहीं । हेचि प्रावर्ण त्याचे ठायीं ।।1।।
पराभक्तीची पालवीं । जिवो अज्ञाना मालवी।। 2।।
करा करा जन्मोध्दार। हरिभक्तीचा बडिवार।।3।।
एका जनार्दनीं बोध । दत्तापायीं तो स्वानंद।। 4।।

भावार्थ

दत्तगुरू स्वरूपी वर्णावर्णांचा भेदाभेद नाही हेच त्या स्वरूपाचे वैशिष्ट्य आहे.पराभक्ती ही जिवाचे अज्ञान नाहिसे करते.जीवाचा जन्मोध्दार करते.एका जनार्दनीं म्हणतात दत्तगुरूंचा हा बोध मनाला स्वानंद देतो.

6

गंध ग्रहण घ्राणता। त्रिपुटीं मांडिली सर्वथा ।।1।।
सुबुध्दि सुगंध चंदन । केलें दत्तात्रया अर्पण।। 2।।
शांति क्षमा अक्षता। तिलक रेखिला तत्वतां ।।3।।
एका जनार्दन। करूनि साष्टांगें नमन।। 4।।

भावार्थ

सुबुध्दीरूपी सुगंधी चंदन दत्तात्रयाला अर्पण केले. सुगंध,सुगंध घेण्याची क्रिया सुबुध्दीरूपी चंदन ही त्रिपुटी लयास जाऊन दत्तगुरूंच्या ठायीं सुबुध्दी तद्रुप झाली.शांती,क्षमा रूपी तिलक रेखून त्यावर अक्षता लावल्या.एका जनार्दनीं म्हणतात,अशी मानसोपचाराने पूजा करून साष्टांग नमन केले.

7

आत्मज्ञान वैश्वानरीं । धूप जाळिला सरोभरी ।।1।।
तेणें मातला परिमळ। पिंडब्रह्मांडीं सकळ।। 2।।
वासाचा निजवास। एका जनार्दनीं सुवास।। 3।।

भावार्थ

आत्मज्ञान रूपी धूप अग्नींत (वैश्वानर) टाकला असतां विश्वातिल सर्व चराचर सृष्टींत या आत्मज्ञानाचा परिमळ(सुवास)दरवळला. एका जनार्दनीं या मानसपूजेचे असे वर्णन या अभंगात करतात.


8

ज्ञानदिपिका उजळी। नाहीं चिंतेची काजळी ।।1।।
ओवाळिला देवदत्त। प्रमें आनंद भरित।। 2।।
उष्ण चांदणें अतीत। तेज कोंदलें अद्भुत ।।3।।
भेदाभेद मावळले। सर्व विकार गळालें।। 4।।
एका मिळवी जनार्दन ।तेजीं मिळाला आपण ।।5।।

भावार्थ

ज्ञानरूपी दिपिका (निरांजन) पेटविले, चिंतेची काजळी नसलेला स्निग्ध,अपूर्व प्रकाश सभोवती कोंदून राहिला. मनातिल द्वैतभाव,भेदाभेद क्षणांत मावळले, सारे मनोविकार गळून पडले.एका जनार्दनीं म्हणतात, चित्त सद्गुरू जनार्दन स्वामींशी एकरूप झाले.तेजांत मिळून मिसळून गेले.

9

अहंममता घारीपुरी। समूळ साधली दुरी ।।1।।
चतुर्विध केलीं ताटें। मानीं शरण गोमटें।। 2।।
मन पवन समर्पिलें। भोग्य कृत्य हारपलें।। 3।।
एका जनार्दनीं भोजन। तृप्त झालें त्रिभुवन ।।4।।

भावार्थ

अहंकार आणि ममता यांना मुळांसह उपटून टाकून गुरूचरणी संपूर्ण शरणागती पत्करली.चंचल मन दत्तगुरूंना समर्पित केले.सर्व भोग भोगण्याच्या ईच्छेसह हरपून गेले. एका जनार्दनीं म्हणतात, हे चतुर्विध (चार प्रकारचे) भोजन करून स्वर्ग,पाताळासह पृथ्वी हे त्रिभुवन तृप्त झाले.

10

नाम मंगळा मंगळ। झालें जन्माचें सफळ।। 1।।
दत्त जीवींचे जीवन। दत्त कारणा कारण ।।2।।
अनुसुयात्मजा पाही। देहभाव उरला नाहीं ।।3।।
एका जनार्दनीं दर्शन। चित्त झाले समाधान।। 3 ।।

भावार्थ

दत्तगुरूंचे नाम सर्व मांगल्याचे मांगल्य आहेत.विश्वांत ज्या मंगल घटना घडतात त्या घडवण्याचे मूळ कारण म्हणजे दत्तगुरू होत.अनुसुया पुत्र दत्त गुरूंचे दर्शन झाले आणि देहभाव लयास गेला.चित्त समाधानरूप झाले.जन्म सफळ झाला.मनातिल कृतार्थ भावाचे वर्णन एका जनार्दनीं या अभंगात करतात.


श्रीहरिनाममहिमा

1

कलियुगामाजीं एक हरिनाम साचें। मुखें उच्चारितां पर्वत छेदी पापांचे ।।1।।
सर्वभावें भजा एक हरिचें नाम। मंगला मंगल करील निर्गुण निष्काम।। 2।।
दोषी अजामेळ तोहि नामें तरला। हरिनामें गणिकेचा उध्दार जाहला ।।3।।
एका जनार्दनीं नाम सारांचे सार। स्त्रियादी अंत्यजा एकदांचि उध्दार।। 4।।

भावार्थ

कलियुगांत हरिनामच केवळ सत्य असून अनंत पापांचे पर्वत छेदून टाकण्याचे सामर्थ्य हरिनामांत आहे.हरिनाम साधकाला निर्गुण,निष्काम करते.पातकी अजामेळ हरिनामाने तरला,गणिकेचा उध्दार झाला.स्त्रिया, अंत्यज यांचा उध्दार करणारे हरिनाम सर्व साधनांचे सार आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.


2

जगीं तो व्यापक भरूनी उरला। शरण तूं तयाला जाय वेगीं।। 1।।
उघडा मंत्र जाण वदे नारायण। नोहे तुज विघ्न यमदूत ।।2।।
अखंड वाचेसी उच्चार नामाचा ।तेणें कळिकाळाचा धाक नाहीं।। 3।।
एका जनार्दनीं संतसेवेविण । आणिक साधन नाहीं दुजें।। 4।।

भावार्थ

सर्व जगाला पूर्णत:जो व्यापून उरला आहे त्या नारायणाला सर्वभावे शरणागत होऊन नारायण नामाचा अखंड जप केल्याने कळिकाळाचे भय संपून यमदूताचे विघ्न टळेल.नारायण नामाचा महिमा संतसेवे शिवाय कळणार नाही.असे एका जनार्दनीं सुचवतात.br>

3

नाम ही नौका तारक भवडोहीं। म्हणोनि लवलाही वेग करा ।।1।।
बुडतां सागरीं तारूं श्रीहरी। म्हणोनि झडकरी लाहो करा।। 2।।
काळाचा तो फांसा पडला नाहीं देहीं । म्हणोनि लवलाही लाहो करा ।।3।।
एका जनार्दनीं लाहो करा बळें। सर्वदा सर्वकाळें लाहो करा।। 4।।

भावार्थ

संसार सागर तारून नेणारी नौका म्हणजे श्रीहरिचे नाम! या साठी त्वरा करून नामसाधनेला प्रारंभ करावा. काळाचा फांस देहाला पडण्यापूर्वी सदासर्वदा हरिनाम नौकेचा आसरा घ्यावा असे आवाहन एका जनार्दनीं या अभंगात करतात.

4

सर्वांवरी वरिष्ठ सत्ता । वाचे गातां हरिनाम।। 1।।
साधन सोपें पाहतां जगीं। साडांवी उगी तळमळ ।।2।।
रामनामें करा ध्यास। व्हा रे उदास प्रपंचीं ।।3।।
एका जनार्दनीं मन। करा वज्राहुनी कठीण ।।4।।

भावार्थ

हरिनामजप ही सर्वांत सोपी साधना असून नामजपाने सर्वांवर सत्तासामर्थ्य प्राप्त होते.प्रपंचांत उदासिन वृत्ती धारण करून ,मनाची तळमळ शांत करून रामनामाचा ध्यास घ्यावा.मन वज्रासारखे कठीण करून साधनेंत निमग्न व्हावे असे एका जनार्दनीं सांगतात.

5

नामें पाषाण तरले। महापापी उध्दरिले।
राक्षसादी आसुर तरले। एका नामे हरिच्या।। 1।।
घेईं नाम सदा। तेणें तुटेल आपदा।
निवारेल बाधा। पंचभूतांची निश्चयें ।।2।।
हो कां पंडित ब्रह्मज्ञानी। तरती तारिती मेदिनी।
शरण एका जनार्दनीं । नाम उच्चारणीं आनंद।। 3।।

भावार्थ

हरिनामाने महान पापी लोकांचा उद्धार झाला.राक्षसगण, आसूर तरले.हरिनामाने कष्ट, यातना दूर होतात.सर्व संकटे टळतात.पंचभूतांच्या बाधेपासून निवारण होते.महापंडित आणि ब्रह्मज्ञानी स्वता:उध्दरून जातात आणि पृथ्वीवरील अनेकांचा उद्धार करतात.जनार्दन स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं नामसाधनेंत आनंदाने रममाण होतात.

6

जों विनटला श्रीहरिचरणीं । त्यासी भवबंधनीं श्रम नाहीं।। 1।।
देव उभा मागें पुढें। वारी सांकडें भवाचें।। 2।।
नामस्मरणीं रत सदा। तो गोविंद आवडे।। 3।।
त्याचे तुळणें दुजा नाहीं। एका पाही जनार्दनीं ।।4।।

भावार्थ

जो साधक हरिचरणांना कायमचा जोडला गेला तो भवबंधनात असूनही विश्रांती पावला. देव अशा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्या भक्ताची संकटे दूर करतो.नामस्मरणांत रंगून गेलेला भक्त गोविंदाला आवडतो.तो भक्त अतुलनीय असतो असे एका जनार्दनीं म्हणतात.

7

हरिनामें तरले। पशुपक्षी उध्दरले ।।1।।
ऐशी व्याख्या वेदशास्त्रीं ।पुराणें सांगताती वक्त्रीं ।।2।।
नामें प्रल्हाद तरला। उपमन्यु अढळपदीं बैसला ।।3।।
नामें तरली ती शिळा । तारियेला वानरमेळा ।।4।।
हनुमंत ज्ञानी नामें । गणिका निजधामीं नामें ।।5।।
नामें पावन वाल्मिकी ।नामें अजामेळ शुध्द देख ।।6।।
नामें चोखामेळा केला पावन। नामे कमाल कबीर तरले जाण ।।7।।
नामें उंच नीच तारिलें। एका जनार्दनीं नाम बोले ।।8।।

भावार्थ

हरिनामाने प्रल्हाद सारखा निष्ठावंत भक्त हिरण्यकश्यपू सारख्या महापापी असुराने निर्माण केलेल्या जीवघेण्या संकटातून सुखरूप बाहेर पडून उध्दरून गेला.उपमन्युला अढळपद प्राप्त झाले.पोपटाला रामनाम शिकवतांना घडलेल्या पुण्याईने गणिका निजधामी पोचली.रामनामाच्या अखंड उपासनेनें भक्त हनुमान बुद्धिवंत आणि शक्तिमान हे बनून श्रीराम कार्यांत अग्रणी ठरला.वानरसेनेसह अमर झाला.उफराट्या नामाच्या जपाने वाल्याकोळी वाल्मिकी नामे ऋषीपदाला पोचला.तर अजामेळ शुध्द झाला.चोखामेळा,कमाल कबीर यांसारखे अनेक उंचनीच नामसाधनेने तरले.नामभक्तीने केवळ मानवच नव्हे तर पशुपक्षी आणि जड पाषाण सुध्दां तरले असा नाममहिमा पुराणांत वर्णिला आहे असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.

8

जेथें हरिनामाचा गजर । कर्म पळतसे दूर।। 1।।
नाम निर्दाळी पापातें । वदती शास्त्र ऐशी मतें।। 2।।
पापाचे पर्वत। नाम निर्दाळी सत्य ।।3।।
नामजप जनार्दन। एका जनार्दनीं पावन।। 4।।

भावार्थ

हरिनामाचा गजराने कर्माची बरीवाईट फळे दूर पळतात.पापांचे निर्दालन होते. पांपाचे पर्वत कोसळून पडतात.असे मत साही शास्त्रे मांडतात.हे सत्यवचन असून गुरुमुखातून प्रगट झाले आहे असे सांगून नामजपाने आपण पावन झालो असे एका जनार्दनीं म्हणतात.

हरिपाठ

1


हरीचिया दासा हरि दाही दिशा। भावें जैसा तैसा हरि एक ।।1।।
हरि मुखीं गातां हरपली चिंता। त्या नाहीं मागुता जन्म घेणें।। 2।।
जन्म घेणें लगे वासनेच्या संगे। तेचि झाली अंगे हरिरूप ।। 3।।
हरिरूप झाले जाणणें हरपलें। नेणणे तें गेलें हरीचे ठायीं ।।4।।
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं। एका जनार्दनीं हरी बोला।। 5।।

भावार्थ

हरीदासांना सारे विश्व हरीरूपाने ओतप्रोत व्यापले आहे असा अनुभव येतो.मुखानें हरीगुण गांत असताना मनाच्या सर्व चिंता हरपून जातात.जन्म-मरणाची येरझार चुकते.विषय वासनेमुळे परत परत जन्म घ्यावा लागतो.या वासनाच हरिरूप होतात.जाणणे,नेणणे यावृत्ती हरिरूपांत विलीन होतात.ध्यानी मनीं केवळ हरीरूप दिसते.असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

2

हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला। व्यर्थ गलबला करूं नका।। 1।।
नको नको मान नको अभिमान। सोडी मीतूंपण तोचि सुखी।। 2।।
सुखी जेणें व्हावें जग निववावें। अज्ञानी लावावें सन्मार्गासी ।।3।।
मार्ग जया कळे भाव भक्तिबळें। जगाचिये मळें न दिसती।। 4।।
दिसती जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं। एका जनार्दनीं ओळखिलें ।।5।।

भावार्थ

मुखाने हरीचे नाम घ्यावे किंवा मौन धारण करावे.मान आणि अभिमान यांचा विचार न करतां मीतूंपणाचा त्याग करणारा सुखी होतो.अजाण लोकांना सन्मार्गाला लावून जगांत शांतता निर्माण करावी.भावभक्तीने योग्य मार्ग सापडला आहे असे अनेक संत प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतात.असे एका जनार्दनीं म्हणतात.

3

जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप। पूजा ध्यान जप त्यासी नाहीं।। 1।।
वैकुंठ कैलासीं तीर्थक्षेत्रीं देव। तयाविण ठाव रिता कोठें।। 2।।
वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत। अनंताचा अंत पाहतां नाहीं।। 3।।
आदि मध्य अंतीं अवघा हरि एक। एकचि अनेक एक हरी।। 4।।
एकाग्र जीव तेचि दोन्ही। एका जनार्दनीं ऐसें केलें।। 5।।

भावार्थ

जे जे नजरेस पडते ते ते हरिचेच रूप आहे असा आस्तिक्य भाव ज्याच्या मनांत निर्माण झाला आहे त्याला ध्यान धारणा,जप,पूजाअर्चा या बाह्य उपचारांची गरज नाही.केवळ वैकुंठ,कैलास किंवा तीर्थक्षेत्रीच काय पण सर्व विश्वांत देव अंतर्बाह्य व्यापून राहिला आहे.वैष्णवांच्या हभक्तीचे रहस्य, मुक्तीची शांती आणि अनंत परमात्म्याचा अंत पाहतां येत नाही.विश्व रचनेच्या आदि मध्य व अंती केवळ एकच परमात्म तत्व अस्तित्वात होते.तोच परमात्मा अनंत नामरूपाने विश्वांत भरून राहिला आहे.सद्गुरू कृपेने या हरिरुपाशी एकाग्रचित्त होता आले असे एका जनार्दनीं म्हणतात.

4

नामाविण मुख सर्पाचें तें बीळ। जिव्हा नव्हे काळसर्प आहे ।।1।।
वाचा नव्हे लांव जळो त्यांचें जिणें । यातना भोगणें यमपुरी।। 2।।
हरीविण कोणी नाही सोडविता। पुत्र बंधु कांता संपत्तीचे।। 3।।
अंतकाळी कोणी नाहीं बा सांगाती। साधूचे संगती हरि जोडे।। 4।।
कोटिकुळें तारी हरि अक्षरें दोनी। एका जनार्दनीं पाठ केलीं ।।5।।

भावार्थ

हरिनाम ज्याच्या मुखाने गाईले जात नाही ते मुख नसून सापाचे बीळ आहे असे समजावे.या मुखाची वाचा नसून चेटकीण होय.अशा माणसाला यमपुरीच्या यातना भोगाव्या लागतात.पत्नी, पुत्र,भाऊ हे सारे सुखाचे सोबती असून अंतकाळी हरीशिवाय कोणी त्राता नाही.संतसंगतीने हरिभक्तीचे मर्म कळून येते.हरि या दोन अक्षरीं नामानें कोटी कुळांचा उध्दार होतो.या दोन अक्षरी नामाचे सतत स्मरण करावे असे एका जनार्दनीं सुचवतात.

5

धन्य माय व्याली सुकृताचें फळ। फळ तें निर्फळ हरिविण ।।1।।
वेदांचेहि बीज हरि हरि अक्षरे। पवित्र सोपारें हेचि एक ।।2।।
योगयाग व्रत नेम धर्म दान ।न लगें साधन जपतां हरि।। 3।।
साधनाचें सार नाम मुखीं गातां। हरि हरि म्हणतां कार्यसिध्दि।। 4।।
नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी। एका जनार्दनीं हरि बोला।। 5।।

भावार्थ

अनेक चांगल्या कामाचे फळ म्हणून पुत्रलाभ होतो परंतू हरिनाम स्मरणाविना हे पुण्यफल व्यर्थ होय.हरि ही दोन अक्षरे अत्यंत पवित्र आणि वाचेसी सहजसुलभ असून वेदांचे बीज आहेत.हरिनामाचा जप केल्यास योगयाग,व्रत,नेमधर्म किंवा दान यांपैकीं कोणतेही साधन करावे लागत नाही.हरिनाम हे सर्व साधनांचे सार असून सर्व कार्य सिध्दीस जातात.साधक नित्यमुक्त होतो.त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते असे एका जनार्दनीं म्हणतात.

6

बहुतां सुकृतीं नरदेह लाधला। भक्तीविण गेला अधोगती।।1।।
बाप भाग्य कैसें न सरेचि कर्म। न कळेचि वर्म अरे मूढा ।।2।।
अनेका जन्मांचें सुकृत पदरीं। त्याचे मुखा हरि पैठा होय।।3।।
राव रंक हो कां उंच नीच याती। भक्तीविण माती मुखीं त्याच्या ।।4।।
एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे।। 5।।

भावार्थ

अनेक जन्मींच्या पुण्यफलाने मानवीदेह मिळतो परंतू काहींवेळा भक्तिविणा तो अधोगतीला जातो.पूर्वजांच्या पुण्याईने नरदेह मिळत नसून ते कर्मफळ आहे हे मूर्खांना कळत नाही.अनेक जन्म हरिभक्ती केल्याने हरिकृपा होते.धनवान किंवा निर्धन,उच्च अथवा नीच हरिभक्ती विणा जन्म निरर्थक आहे.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,हरिनाम जपाने साधक सायुज्यता मुक्तिचा अधिकारी होऊन नित्य हरीच्या सहवासांत वैकुंठनगरीं वास करतो.

7

हरिनामामृत सेवी सावकाश। मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें।।1।।
नित्य नामघोष जयाचे मंदिरीं। तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र।।2।।
वाराणशी तीर्थ क्षेत्रा नाश आहे ।अविनाशासी पाहे नाश कैंचा।। 3।।
एका तासामाजी कोटि वेळां सृष्टी। होती जाती दृष्टी पाहे तोची।। 4।।
एका जनार्दनीं ऐसे किती झाले । हरिनाम सेविलें तोचि एक ।।5।।

भावार्थ

ज्या साधकाच्या गृहमंदिरांत नामाचा गजर नित्य सुरू असतो ते च तीर्थक्षेत्र काशी असे मानावे.वाराणसी हे तीर्थक्षेत्र असूनही ते अविनाशी नाही.दृष्टीला दिसणार्या या विनाशी सृष्टींत एका तासांत कोटी वेळा घडामोड होत असते. सृष्टीचे हे विनाशी चक्र स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात, हरिनाम हे अमृत असून त्याचे सावकाश सेवन करावे.या हरिनाम अमृतामुळे मिळणारा मोक्ष केवळ भुसा आहे.असे अनेक साधक जन्माला आले आणि गेले पण ज्यांनी हरिनामाचे अमृत सेवन केले ते चिरंजीव झाले.

8

सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया। आनंदपदीं जया म्हणती हरि।। 1।।
सत्पद निर्गुण चित्पद सगुण। सगुण निर्गुण हरिपायीं।। 2।।
तत्सदिती ऐसे पैल वस्तुवरी। गीतेमाजी हरि बोललेले।। 3।।
हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी। अभिमानियांसी गर्भवास।। 4।।
अस्ति भाति प्रिय ऐशीं पदें तिनी। एका जनार्दनीं तेंचि झालें।। 5।।

भावार्थ

परमेश्वर सत्चिदानंद आहे.त्यातील ब्रह्म हे सत्पद,चित्पद ही माया आणि हरि हा आनंदपदी आहे.ब्रह्म हे निर्गुण माया ही सगुण आणि हरी हा सगुण निर्गुण आहे. तत्सदिती हे परब्रह्म आहे असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. एका जनार्दनीं म्हणतात, भोळ्या भाविकांना हरिपदाची प्राप्ती होते तर ज्ञानाचा गर्व असणार्या अहंकारी जनांना परत परत जन्म मृत्युचे दु:ख भोगावे लागते.हीच तीन पदे अस्ति,भाति,प्रिय या नावाने ओळखले जातात.

9

ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटीं दु:ख कैचें।। 1।।
नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरि पवित्र तो।। 2।।
पवित्र तें कुळ धन्य त्याची माय। हरि मुखें गाय नित्य नेमें।। 3।।
काम क्रोध लाभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें।। 4।।
वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी। एका जनार्दनीं हरि बोला।। 5।।

भावार्थ

हरिचे सच्चिदानंद स्वरूप ओळखून त्याला आपलासा केला.हरिची भेट होतांच सर्व दु:खांचा निरास झाला.दुर्वतन करणारे स्त्री-पुरूष जर हरिनामाचा जप करतील तर ते पवित्र होतील.नित्यनेमाने हरिभजन करणार्या साधकाचे पवित्र कुळ व जन्मदात्री धन्य होय.ज्याचे अंत:करण वासना,क्रोध,मोह यांनी भरले आहे ते हरिकृपेचे अधिकारी होऊ शकत नाहीत.हरिनाम संकीर्तन हे वैष्णवांच्या हरिभक्तीचे रहस्य असून अखंड हरिनामाचा जप करावा असे एका जनार्दनीं सुचवतात.

10

कल्पनेपासुनी कल्पिला जो ठेवा। तेणें पडे गोंवा नेणे हरी ।।1।।
दिधल्यावांचूनि फळप्राप्ती कैची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा।। 2।।
इच्छावें तें जवळी हरिचे चरण। सर्व नारायण देतो तुज ।।3।।
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतीं जन्म कोटी हरि कैंचा।। 4।।
एका जनार्दनीं सांपडली खूण। कल्पना अभिमान हरि झाला ।।5।।

भावार्थ

आपण मुळातले आत्मतत्व नसून नश्वर देहतत्व आहोत.या विपरित कल्पनेने सारा घोटाळा झाला,त्यामुळे हरिचे सत्य स्वरूप समजले नाही.बीज पेरल्यावाचुन फळाची अपेक्षा ही व्यर्थ कल्पनेची बाधा आहे.हरिचरणांचे सान्निध्य ही एकच इच्छा धरल्यास नारायण सर्व काही देतो.अहंकाराच्या गाठी सुटत नाही तो पर्यंत हरिप्राप्ती न होता कोटी जन्म घ्यावे लागणार.अंतरीच्या साऱ्या कल्पना,अभिमान या हरिस्वरूपी लीन करणे, संपूर्ण शरणागती पत्करणे हीच हरिकृपेची खूण आहे असे एका जनार्दनीं सांगतात.

11

काय नपूंसका पद्मिणीचे सोहळे। वांझेसी डोहाळे कैचे होती।। 1।।
अंधापुढे दीप खरासी चंदन । सरकार दूधपान करूं नये।। 2।।
क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैंचा। व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये।। 3।।
खळाची संगती उपयोगासी नये। आपणा अपाय त्याचे संगें।। 4।।
वैष्णवीं कुपथ्य टाकिलें वाळुनी। एका जनार्दनीं तोचि भले।। 5।।

भावार्थ

नपूंसक व्यक्तीला बत्तीस लक्षणी सुंदर स्त्रीचा शृंगार ज्ञानी ज्ञनिरपयोगी ठरतो.वांझोटीचे डोहाळे ही केवळ कवीकल्पना असते.अंधाला दिवा दाखवणे, गाढवाला चंदन फासणे, सापाला दूध पाजणे या गोष्टी निरर्थक आहेत.ज्याचा आपल्या शब्दावर विश्वास नाही किंवा जो क्रोधाच्या आहारी गेला आहे त्याला हितोपदेश करून आपली वाणी शिणवूं नये. दुष्टांची संगत अपायकारी असल्याने तिचा त्याग करावा.विष्णुभक्त ही सर्व कुपथ्ये आहेत हे जाणून त्यांचा त्याग करतो तो च भला होय असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात./,br>

12

न जायेचि ताठा नित्य खटाटोप। मंडुकी वटवट तैसें ते गा।। 1।।
प्रेमाविण भजन नाकाविण मोती। अर्थाविण पोथी वाचुनी काय।। 2।।
कुंकुंवा नाहीं ठाव म्हणे मी आहेव। भावाविण देव कैसा पावे।। 3।।
अनुतापाविण भाव कैसा सहे। अनुभवें पाहे शोधुनियां।। 4।।
पाहतां पाहणें गेलें तें शोधुनी। एका जनार्दनीं अनुभविलें।। 5।।

भावार्थ

ज्ञानी भक्तांचा अहंकार नित्य खटाटोप करूनही जात नाही,डबक्यातील बेडकाची डराव डराव जशी थांबत नाही.भक्तीभावा शिवाय केलेले भजन, अर्थ न समजता केलेले पोथीवाचन व्यर्थ जाते.नकट्या नाकांत घातलेली नथ शोभा देत नाही. कपाळीं सौभाग्य तिलक नसतांना सौभाग्यवती म्हणवून घेणे हे भक्तीभावा शिवाय देव प्रसन्न व्हावा अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. संसारिक दु:खाचे चटके सोसल्या शिवाय अनुताप निर्माण होत नाही आणि अनुतापा शिवाय भक्तीभावाची ज्योत पेटणार नाही. या प्रत्यक्ष अनुभवाच्या गोष्टी आहेत असे एका जनार्दनीं स्वानुभवातून स्पष्ट करतात.

13

करा रे बापांनो साधन हरींचे। झणीं करणीचें करूं नका ।।1।।
जेणें नये जन्म यमाची यातना। ऐसिया साधना करा काही।। 2।।
साधनांचे सार मंत्रबीज हरी। आत्मतत्व धरी तोचि एक ।।3।।
कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम। एक हरिनाम जपतां घडे।। 4।।
एका जनार्दनीं न घ्यावा संशय। निश्चयेंसी होय हरिरूप ।।5।।

भावार्थ

जे साधन केल्याने जन्म आणि यम यातनांपासून सुटका होईल अशा हरिनाम जपाची साधना करावी.हरि हे परमात्म तत्व असून हरिनामाचा जप हे सर्व साधनांचे सार आहे व सर्व मंत्रांचा बीजमंत्र आहे.कोटी यज्ञाचे फळ केवळ हरिनामाचा जप केल्याने मिळते.या सत्य वचनाचा संशय घेऊ नये.हरिनाम घेऊन हरिरूप व्हावे असे एका जनार्दनीं ग्वाही देतात.

14

पिंडीं देहस्थिति ब्रह्मांडीं पसारा । हरिविण सारा व्यर्थ भ्रम।। 1।।
शुक याज्ञवलक्या दत्त कपिल मुनी। हरीसी जाणोनी हरिच झाले।। 2।।
या रे या धरूं हरिनाम तारूं। भवाचा सागरू भय नाहीं ।।3।।
साधुसंत गेले आनंदी राहिले। हरिनामें झाले कृतकृत्य ।।4।।
एका जनार्दनीं दुकान। देतो मोलविण सर्व वस्तु।। 5।।

भावार्थ

मी देह आहे ह्या देहबुध्दीने आत्मतत्वाचा विसर पडतो, हरिविण सारे व्यर्थ जाते.व्यासपुत्र शुकमुनी,याज्ञवल्क ,दत्तात्रय,कपिलमुनी यांनी हरिस्वरूप जाणले आणि ते हरीशी एकरूप झाले.भव सागराचे भय संपवण्यासाठीं हरिनामाच्या तारूचा आश्रय घ्यायला हवा.साधुसंतानी हरिनामाचा आनंदाने वसा घेतला आणि ते कृतकृत्य झाले.एका जनार्दनीं म्हणतात, हरिभक्तीच्या पेठेंत कोणतेही मोल न देतां सत्य वस्तू अनुभवास येते.


चिंतनमहिमा

1

चिंतनें नासतसे चिंता। चिंतनें सर्व कार्य ये हातां।
चिंतनें मोक्ष सायुज्यता। घर शोधितसे ।।1।।
ऐसे चिंतनाचे महिमान। तारिले अधम खळ जन।
चिंतनें समाधान। प्राणिमात्रा होतसे।। 2।।
चिंतनें तुटे आधिव्याधी। चिंतनें तुटतसे उपाधी।
चिंतनें होय सर्व सिध्दी। एका जनार्दनाचे चरणीं।। 3।।

भावार्थ

या अभंगात संत एकनाथ मानवी मनाच्या चिंतन शक्तीचा महिमा वर्णन करीत आहेत. चिंतनाने सायुज्यता नावाच्या मुक्तीचा लाभ होतो.समाजातले पापी,दुष्ट लोकांचा उध्दार सद्विचाराच्या चिंतनाने होतो.चिंतनाने मनाच्या व शरीराच्या आधिव्याधी,उपाधी तुटून जातात.चिंतनाने मनाच्या साऱ्या चिंता मिटतात.चित्ताचे समाधान होऊन हाती घेतलेली कार्ये पूर्ण होतात.मुनीजन आणि योगी केवळ परमेश्वर चिंतनाने अनेक सिध्दी प्राप्त करून घेतात.

2

चिंतनें कंसासुर तरला। चिंतनें पुतनेचा उध्दार केला ।
चिंतनें आनंद जाहला अर्जुनादिकांसी।। 1।।
म्हणोनी करावें चिंतन। काया वाचा मन।
संतांचे चरण नित्य चिंतावें।। 2।।
चिंतन आसनीं शयनीं। भोजनी आणि गमनागमनीं।
सर्वकाळ निजध्यानीं। चिंतन रामकृष्णाचें ।।3।।
चिंतन हेची तप थोर। चिंतनें साधे सर्व संसार।
एका जनार्दनीं निर्धार। नामस्मरण चिंतनीं।। 4।।

भावार्थ





3

हरे भवभय व्यथा चिंतनें। दूर पळती नाना विघ्नें ।
कली कल्मष बंधनें। न बाधती चिंतनें ।।1।।
करा करा म्हणोनि लाहो। चिंतनाचा निर्वाहो।
काळाचा तो भिहो। दूर पळे चिंतनें ।।3।।
हीच माझी विनवणी। चिंतन करा रात्रंदिनी।
शरण एका जनार्दनीं रामनाम चिंतावें ।।4।।

भावार्थ

चिंतनाने नाना प्रकारची संकटे दूर होतात,विघ्ने टळतात.कलियुगातील बंधने बाधक होत नाहीत.काळाचे भय नाहिसे होते,संसारातील अंतकरणाला जाळणार्या व्यथा चिंतनानें दूर होतात.परमेश्वराच्या गुणांचे आणि चरित्राचे सतत चिंतन करण्याचा नेम करावा.रात्रंदिवस रामनाम चिंतावे अशी एका जनार्दनीं विनंती करतात.


4

चिंतन तें सोपें जगीं । रामकृष्ण म्हणा सत्संगीं ।
उणे पडो नेदी व्यंगीं । देव धांवे चिंतनें।। 1।।
चिंतन करितां द्रौपदी। पावलासें भलते संधी ।
ऋषीश्वरांची मांदी।तृप्त चकेली क्षणमात्रें।।2।।
चिंतनें रक्षिलें अर्जुना। लागो नेदी शक्तिबाणा ।
होऊनीं अंकणा। रथारूढ बैसला।। 3।।
चिंतनाने प्रल्हाद तारिला। जळीं स्थळीं सांभाळिला ।
एका जनार्दनीं भला । चिंतनाचा अंकित।। 4।।

भावार्थ

पांडव वनवासांत असतांना दुर्वास ऋषी पांडवांकडे भोजनासाठी गेले. त्या अवेळी द्रौपदीची थाळी रिकामी होती.द्रौपदी ऋषी शापाच्या भयाने संकटांत सापडली. हरिचिंतनाने प्रसन्न झालेल्या श्रीहरीने विनाविलंब क्षणार्धांत ऋषींना तृप्त केले.अर्जुन श्रीकृष्णाचा सखा असून सतत त्याचे चिंतन करीत असे.कौरव पांडवांच्या महायुध्दांत सारथी बनून कर्णाच्या शक्तिबाणां पासून अर्जुनाचे रक्षण केलें. प्रल्हाद विष्णुचा एकनिष्ठ भक्त होता सतत विष्णुचिंतनांत मग्न असे.हरप्रकारे सागरात,अरण्यांत प्रल्हादाचे रक्षण केले.चिंतन ही सोपी साधना असून चिंतन भक्तीने देव धावत येऊन भक्तांचे रक्षण करतो.असे एका जनार्दनीं सुचवतात.

5

चिंतनें धांवे भक्तांपाठीं। धरीं कांबळी हातीं काठी।
चिंतनें उठाउठी। बांधवितो आपणिया ।।1।।
ऐसा भुकेला चिंतनाचा। न पाहे यातीहीन उंचाचा।
काय अधिकार शबरीचा। फळें काय प्रिय तीं।। 2।।
एका जनार्दनीं चिंतन। तेणें जोडे नारायण।
आणिक न लगे साधन। कलीमाजीं सर्वथा।। 3।।

भावार्थ

परमेश्वराचे सदोदित चिंतन करणाऱ्या भक्तांसाठी देव खांद्यावर कांबळे आणि हातांत काठी घेऊन लागोलाग धावत जातो.त्यां भक्ताचे बंधन आनंदाने स्विकारतो.जातीपातीचा,उच्चनीचतेचा विचार करीत नाही.शबरीचा अधिकार किंवा फळांची गोडी यापेक्षा शबरी रामाचे रात्रंदिन जे चिंतन करीत होती त्यामुळे शबरीचा उध्दार झाला.एका जनार्दनीं म्हणतात,केवळ चिंतनाने नारायण भक्तांसी जोडला जातो.आणिक कोणत्याही साधनेची कलियुगांत गरज नाही.

6

चिंतनासी न लगे वेळ। कांहीं न लगे तया मोल।
वाचे वदा सर्वकाळ। राम हरी गोविंद।। 1।।
हाचि पुरे मंत्र सोपा। तेणें चुके जन्मखेपा।
आणिक तें पापा। कधीं नुरें कल्पांतीं।। 2।।
चौर्यांशीची न ये फेरी। एवढी चिंतनाची ही थोरी।
सांडोनीं वेरझारी। का रे शिणतां बापुडी।। 3।।
एका जनार्दनीं चिंतन। वाचे सदा परिपूर्ण।
तेणें घडे कोटीयज्ञ। नाम चिंतन जपतां ।।4।।

भावार्थ

चिंतनाला वेळ-काळाचे बंधन नाही,त्यासाठी काही मोल द्यावे लागत नाही. राम हरी गोविंद हा सोपा जपावा.या मंत्राने चौर्यांशी लक्ष योनींमध्यें जन्मांच्या फेऱ्या चुकतात.एवढा चिंतनाचा महिमा आहे.साधक कल्पांता पर्यंत पापाचा भागीदार होत नाही.चिंतन साधना इतकी सहज सोपी आणि थोर असतांना तो मार्ग सोडणे योग्य नाही.एका जनार्दनीं म्हणतात, चिंतनाने कोटी यज्ञाचे पुण्य पदरीं पडते.

7

चिंतनें पर्वकाळ रासी। येती अपैशा घरासी।
चिंतन तें सार सर्वांसी। व्रतातपांसी चिंतन।। 1।।
चिंतनें यज्ञ दान धर्म। चिंतनें घडे नाना नेम।
आणिक तें वर्म। चिंतनें घडे सर्वथा ।।2।।
चिंतनें वेदशास्त्र पुराण । नाना मंत्र तंत्र पठण ।
नाना तीर्थांचे भ्रमण। चितनें होय ठायींच।। 3।।
ऐसा चिंतन महिमा। नाहीं आणिक उपमा।
एका जनार्दनीं प्रेमा। चिंतनें चिंतिता।। 4।।

भावार्थ

चिंतनाने यज्ञ,दानधर्म,नाना प्रकारचे व्रते,उद्यापने,नेम यांचे पुण्यफळ प्राप्त होते.वेदशास्त्र,पुराण श्रवणाचे तसेच नाना मंत्र-तंत्राचे पठण केल्याचे श्रेय चिंतनाने मिळते.नाना तीर्थयात्रा केल्याने जे साध्य होते ते सर्व कोणतिही यातायात न करतां एका ठिकाणी राहून चिंतन केल्याने साध्य होते.एका जनार्दनीं म्हणतात,चिंतन भक्तीचा महिमा अनुपमेय आहे.

8

चिंतनें उध्दरला पापी। महा दोषी केला नि:पापी ।
तया म्हणती ऋषि तपी । पुराणीं तें सर्व।। 1।।
नारदें सांडोनिया मंत्र। केला जगीं तो पवित्र।
चिंतना एवढें पात्र। आन नाहीं सर्वथा ।।2।।
चिंतने शुकादिक मुक्त। राजा जाहला परीक्षित।
ऐसें अपार आहेत। चिंतनें मुक्त जाहले ते।। 3।।
चिंतनाची येवढी थोरी। गणिका नारी परद्वारीं।
वाचे उच्चारितां हरी । मोक्षधामीं बैसविली ।।4।।
चिंतनें हनुमंता समाधी। तुटोनि गेली आधीव्याधीं।
एका जनार्दनीं बुध्दि । चिंतनीच जडलीसे ।।5।।

भावार्थ

नारदमुनींनी रामनामाचा मंत्र दिल्याने महापापी वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला.चिंतनाने तो पवित्र होऊन रामायण कर्ता म्हणून चिरंजीव झाला.शुक मुनींनी परिक्षित राजाला चिंतन मंत्र देऊन मृत्यु भयापासून सोडवले आणि मोक्षपदाला नेले.गणिका हरिचिंतनाने मोक्षधामी पोचली.रामनाम चिंतनाने हनुमंताच्या आधिव्याधी सरून चिरंजीव पद प्राप्त झाले.एका जनार्दनीं म्हणतात,चिंतनभक्तीच्या योग्यतेचे कोणतेही अन्य साधन नाही.

9

चिंतनें बिभीषण मुक्त। चिंतनें जाहला जनक जीवमुक्त।
चिंतनें कुळ सरित। सर्वभावें हरि होय।। 1।।
आवडी चिंतावें चरण। दुजे नको मानधन।
नाम स्मरणावांचून। चिंतनचि नसो।। 2।।
ऐसा एकविध भावें । चिंतन असो मनीं जीवें।
एका जनार्दनीं देव। तया पाठीं धांवतसे।। 3।।

भावार्थ

रावणबंधु बिभिषण विष्णू चिंतनाने मुक्त झाला.जनक राजा जीवनमुक्त झाला.अत्यंत भक्तिभावाने परमेश्वराच्या चरणांचे चिंतन,नामस्मरण करावे.कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता एकाग्र मनाने परमात्म्याचे चिंतन केल्यास देव भक्ताच्या पाठीमागे धांवत येतो असे एका जनार्दनीं सांगतात.

10

जाईन पंढरी। हेंचि चिंतन धरीं।
मग तो श्रीहरी। नुपेक्षी भक्तातें ।।1।।
धरुनी पहा विश्वास । नका आणिक सायास।
पहातसे वास। चिंतनाची सर्वथा ।।2।।
न धरीं माझें आणि तुझें। भार घाली पारे वोझें ।
एका जनार्दनीं दुजें । मग नाहीं तयातें ।।3।।

भावार्थ

पंढरीस जाईन असे मनाने योजिले आणि त्याचे सारखे चिंतन केले तर श्रीहरी भक्ताची ईच्छा पूर्ण करील यांत शंका नाही.देव कधीच भक्ताची उपेक्षा करीत नाही या वर विश्वास ठेवून आणखी काही सायास करण्याची गरज नाही.मी तू पणाचा भेदाभेद न करता श्रीहरी भक्ताचे ओझे पार करतो.असे एका जनार्दनीं सांगतात.

11

पंढरीस जावया। सदा हेत मानसीं जया।
कळिकाळ वंदी पाया। तया हरिभक्तातें ।।1।।
दृढ मनींच चिंतन। वाचे विठ्ठलचि जाण।
होतु कां कोटी विघ्न । परी नेम टळे सर्वथा।। 2।।
एका जनार्दनीं भाव। नुपेक्षी तया देव।
करूनि संसार वाव। निजपदीं ठाव देतुसे ।।3।।

भावार्थ

पंढरीस जाण्याची प्रबळ ईच्छा ज्या भक्ताच्या मनांत निर्माण होते तो कळीकाळाला वंदनीय वाटतो.मनांत हरीचे दृढ चिंतन आणि हरिनामाचा जप केल्यास कोटी विघ्ने टळतात परंतु नेम टळत नाही.एका जनार्दनीं म्हणतात, भावभक्तीने चिंतन करणार्या भक्तांची देव कधी उपेक्षा करीत नाही.संसार चक्रातून सुटका करून चरणपदीं आश्रय देतो.

12

चिंतन तें हरिचरण। हेंचि कलीमाजीं प्रमाण।
सर्व पुण्याचें फल जाण। नामस्मरण विठ्ठल।। 1।।
मागे तरलें पुढें तरती । याची पुराणीं प्रचिती।
वेद शास्त्र जया गाती। श्रुतीहि आनंदें।। 2।।
हेंचि सर्वांशी माहेर। भूवैकुंठ पंढरपूर।
एका जनार्दनीं नर। धन्य जाणा तेथींचे।। 3।।

भावार्थ

कलियुगांत हरिचरणांचे चिंतन आणि विठ्ठलाचे नामस्मरण हे पुण्यफल देणारे आहे. असे भाविक भूतकाळी तरले आणि भविष्यातही तरतील यांत संशय नाही.पुराणांत याचे अनेक पुरावे सांगितले आहेत.पंढरपूर पृथ्वीवरील वैकुंठ असून सर्वांचे माहेर आहे.वेद,शास्त्रे, श्रुती आनंदाने पंढरीचे गुणगान करतात.असे एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात.

नाममहिमा

1

ऐका नामाचे महिमान। नाम पावन तें जाण।। 1।।
हास्य विनोदें घेतां नाम। तरती जन ते अधम।। 2।।
एका जनार्दनीं धरीं विश्वास। नामे नासती दोष कळिकाळाचे ।।3।।

भावार्थ

हरिनाम अत्यंत पावन असून त्याचा महिमा श्रवण करावा.अतिशय पापी लोकांनी हास्य विनोद करतांना जरी हरिनामाचा उच्चार केला तरी ते पापमुक्त होऊन हरिपदाला पोचतात.एका जनार्दनीं म्हणतात,नामजपाने जन्म-मृत्युचे सारे दोष लयास जातात.

2

दोषी पापराशी नामाचे धारक। होतां तिन्ही लोक वंदिती माथां।। 1।।
नामाचें महिमान नामाचें महिमान। नामाचे महिमान शिव जाणे।। 2।।
जाणती ते ज्ञानी दत्त कपिल मुनी। शुकादिक जनीं धन्य जाहलें।। 3।।
एका जनार्दनीं नाम परिपूर्ण । सांपडली खूण गुरूकृपें ।।4।।

भावार्थ

अतिशय दुराचारी, पापी लोक जर नामसाधनेला लागले तर ते तिन्ही लोकांत वंदनीय होतात.नामाचा महिमा शिवशंकर चांगल्याप्रकारे जाणतात.दत्तगुरू,कपिल मुनी,शुकमुनी हे सर्व ज्ञानी नामाचा महिमा जाणून धन्य झाले.एका जनार्दनीं म्हणतात,जनार्दन स्वामींच्या कृपेने नामाचा परिपूर्ण महिमा जाणतां आला.ही गुरुकृपेची खूण आहे.

3

नाम तें उत्तम नाम तें सगुण। नाम तें निर्गुण सनातन।।1।।
नाम तें ध्यान नाम तें धारणा। नाम तें हें जना तारक नाम ।।2।।
नाम तें पावन नाम तें कारण। नामापरतें साधन आन नाहीं।। 3।।
नाम ध्यानीं मनीं गातसे वदनीं। एका जनार्दनीं श्रेष्ठ नाम।। 4।।

भावार्थ

नाम ही सगुण उपासना आहे कारण परमेश्वराची मूर्ती चित्तामध्यें धारण करून उपासक चिंतन करीत असतो. ही उपासना निर्गुण, सनातन आहे परमात्म तत्व हे परब्रह्म स्वरूप असल्याने ते प्रत्यक्ष दृष्टीपथांत येत नाही.ध्यानमार्गाने उपासना करणार्या साधकांना नाम हे ध्यान व धारणा असते याच मार्गाने ते समाधी अवस्था प्राप्त करू शकतात.नाम हे पावन असून साधकांना तारून नेणारे साधन आहे.नाम भक्तांच्या परमेश्वर प्राप्तीचे कारण आहे.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,नामासारखे श्रेष्ठ साधन नाही.ध्यानीं,मनीं,वदनी अखंड नामाचा जप करावा.

4

नामाचा धारक । हरिहरा त्याचा धाक।। 1।।
ऐसें नाम समर्थ। त्रिभुवनीं तें विख्यात।। 2।।
नामें यज्ञयाग घडती। नामें उत्तम लोकीं गती।। 3।।
नामें भुक्ति मुक्ति तिष्ठें। नामें वरिष्ठा वरिष्ठें ।।4।।
नामें सर्व सत्ता हातीं। नामें वैकुंठी वसती।। 5।।
नामें होती चतर्भुज। एका जनार्दनीं सतेज।। 6।।

भावार्थ

नामाचा महिमा अपार असून ते त्रिभुवनांत प्रसिध्द आहे.शिव आणि विष्णु नाम धारक भक्तांचा आदर करतात.नामाने यज्ञयाग संपन्न होतात आणि साधकांना उत्तम गती प्राप्त होवून वैकुंठलोकी वस्ती होऊ शकते. भक्ति,मुक्ति या नामसाधकाच्या दासी बनतात.नाम हे श्रेष्ठ साधनांपैकी सर्वश्रेष्ठ साधन आहे.नामाने साधकास सरूपता मुक्ती प्राप्त होऊन तो विष्णुस्वरूप सतेज होऊन सर्व सत्ताधारी होतो असे एका जनार्दनीं ग्वाही देतात.

5

सकळ साधनांचा सार। मुखीं नामाचा उच्चार।। 1।।
सकळ तपांचे जें सार । मुखीं नामाचा उच्चार ।।2।।
सकळ ज्ञानाचे जें सार। मुखीं नामाचा उच्चार।। 3।।
सकळ ब्रह्म विद्येचे जें सार। एका जनार्दनीचें माहेर ।।4।।

भावार्थ

परमेश्वर प्राप्तीसाठीं दान, धर्म, योग, याग, तप, अनुष्ठान करून जे फल साध्य होते ते सर्व नामजपाने मिळते.वेद,शास्त्रे, पुराणे वाचून परमेश्वरी तत्वाचे जे ज्ञान प्राप्त होते ते सर्व नामपठनाने ज्ञात होते.ब्रह्म विद्येचे रहस्य केवळ नामाच्या उच्चाराने उलगडते.असे मत स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात, नाम हे भक्तांच्या विसाव्याचे ठिकाण (माहेरघर) आहे.

6

साधन सोपें नाम वाचे । पर्वत भंगती पापांचें ।
विश्वासियातें साचें । नाम तारक कलियुगीं ।।1।।
अहोरात्र वदतां वाणी । ऐसा छंद ज्याचे मनीं ।
त्याचेनि धन्य ही मेदिनी। तारक तो सर्वांसी ।।2।।
एका जनार्दनीं नाम। भाविकांचे पुरे काम।
अभागियांतें वर्म। नव्हे नव्हे सोपारें ।।3।।

भावार्थ

नामजप हे सहजसोपी भक्तीसाधना असून पापांचे पर्वत भंग करण्याचे सामर्थ्य या साधनेंत आहे.या नामसाधनेवर विश्वास असणाऱ्या भक्तांसाठी कलियुगातील हे उत्तम साधन आहे.अहोरात्र नामस्मरण करण्याचा छंद जडलेला साधकामुळे ही पृथ्वी धन्य झाली आहे.असा साधक सर्वांचा तारणहार बनतो.

7

नाम पावन तिन्हीं लोकीं। मुक्त जालें महा पातकी ।।1।।
नाम श्रेष्ठाचें हें श्रेष्ठ। नाम जपे तो वरिष्ठ ।।2।।
नाम जपे नीलकंठ। वंदिताती श्रेष्ठ श्रेष्ठ ।।3।।
नाम जपे हनुमंत। तेणें अंगीं शक्तिवंत ।।4।।
नाम जपे पुंडलिक। उभा वैकुंठनायक।। 5।।
नाम ध्यानीं मनीं देखा। जपे जनार्दनीं एका।। 6।।

भावार्थ

स्वर्ग,पृथ्वी,पाताळ या तिन्हीं लोकांत नाम पावन समजले जाते.शिवशंकरा सारख्या वरिष्ठ देवाला नामस्मरण श्रेष्ठ आहे असे वाटते.भक्त शिरोमणी हनुमंत रामनामाचा जप केल्याने सर्व शक्तिमान बनला.भक्तराज पुंडलिकाच्या नामजपाने वैकुंठनायक विटेवर उभा राहिला. नामधारकांची अशी उदाहरणे देऊन एका जनार्दनीं नामभक्तीचा महिमा सांगतात.

8

पशु पक्षी वनचरें । श्वान श्वापदादि सूकरें ।।1।।
पडतां नाम घोष कानीं पावन होती इये जनीं ।।2।।
चतुष्पाद आणि तरूवर। नामें उध्दार सर्वांसी।। 3।।
उंच नीच नको याती। ब्रह्मणादि सर्व तरती।। 4।।
एका जनार्दनीं अभेद । नामीं नाहीं भेदाभेद।। 5।।

भावार्थ

पशु पक्षी,वानरे, हिंस्त्र जंगली प्राणी,कुत्रे आणि डुकरे यांच्या कानावर जर परमेश्वराचा नामघोष पडला तर ते याच लोकी पावन होतात.चार पायांचे प्राणीच नव्हे तर झाडेवेलींचा नाम श्रवणानें उध्दार होतो.उच्चनीचतेचा भेद संपून ब्राह्मण, क्षत्रिय,वैश्य,शुद्र सर्वांचा उध्दार नामसाधनेने होतो.एका जनार्दनींम्हणतात,नामधारकांमध्ये भेदाभेद नाही.नामसाधना अभेद आहे.नामजपाचा सर्वांना अधिकार आणि समान फलप्राप्ती आहे.

9

तारलें नामें अपार जन। ऐसे महिमान नामाचें।। 1 ।|
अधम तरले नवल काय। पाषाण ते पाहें तारियेले ।।2।।
दैत्यदानव ते राक्षस। नामें सर्वास मुक्तिपद ।।3।।
एका जनार्दनीं नाम सार। जपा निरंतर हृदयीं।। 4।।

भावार्थ

नामाचा महिमा असा आहे की, त्याने अगणित लोकांचा उध्दार झाला.नामसाधनेने पाषाण तरले तर महापापी जन तरले यांत नवल नाही.नामस्मरणाने दैत्य,दानव,राक्षस या सर्वांना मुक्तीपद प्राप्त झाले.एका जनार्दनीं म्हणतात,नामजप हे भक्तीचे सार आहे.परमेश्वराचे नाम निरंतर जपावे.

10

नाम तारक ये मेदिनी। नाम सर्वांचे मुगुटमणी।
नाम जपे शूळपाणी। अहोरात्र सर्वदा।। 1।।
तें हें सुलभ सोपारें। कामक्रोध येणें सरे।
मोह मद मत्सर। नुरे नाममात्रें त्रिजगतीं।। 2।।
घेउनी नामाचे अमृत। एका जनार्दनीं झाला तृप्त।
म्हणोनि सर्वांतें सांगत। नाम वाचे वदावें।। 3।।

भावार्थ

नाम सर्व साधनेचा मुगुटमणी असून पृथ्वीला तारणारे आहे.शिवशंकर अहोरात्र नाम जपतात.नामजप हे वाचेसी अतिशय सुलभ व आचरणास सोपे आहे.कामक्रोध,मद, मत्सर आणि मोह या मानसिक शत्रुंचा नाश करणारे आहे.एका जनार्दनीं सांगतात आपण नामामृत प्राशन करून तृप्त झालो आहे.स्वअनुभवाने सर्वांना नामस्मरण साधना करावी असे सुचवत आहे.

11

नाम षावन पावन ।नाम दोषासि दहन।
नाम पतितपावन। कलीमाजीं उध्दार।। 1।।
गातां नित्य हरिकथा। पावन होय वक्ता।
नाम गाऊनि टाळ वाजतां। नित्य मुक्त प्राणी तो ।।2।।
एका जनार्दनीं नाम। भवसिंधु तारक नाम।
सोपे सुगम वर्म। भाविकांसी निर्धारें ।।3।।

भावार्थ

सर्व दोषांचे दहन करणारे नाम अग्नीप्रमाणे पावन आहे.पतितांना पावन करण्याचे सामर्थ्य नामांत आहे.नेहमी हरिकथा गाणारा पावन होतो.टाळी वाजवून नाम गाणारा भवबंधनातून मुक्त होतो.एका जनार्दनीं म्हणतात,नाम भवसिंधु तारक असून भाविकांसाठी सोपे,सुगम साधन आहे हे निश्चित.

12

नामे पावन हीन याती। नाम जपतां अहोरात्रीं।
नामापरतीं विश्रांती। दुजी नाहीं प्राणियां ।।1।।
नका भ्रमू सैरावैरा। वाउगे साधन पसारा।
योग याग अवधारा। नामें एका साधतसे।। 2।।
व्रत तप हवन दान। नामें घडे तीर्थ स्नान।
एका जनार्दनीं मन। स्थिर करूनि नाम जपा।। 3।।

भावार्थ

रामनाम हा विश्वाचा विश्राम असून या नश्वर जीवनांत नामा सारखे दुसरे विश्रांतिचे स्थान नाही. व्रत,तप,हवन,दान, योग, याग, तीर्थ स्नान हे सर्व एका नामसाधनेनें प्राप्त होते.नामाने हीन याती सुध्दां पावन होतात.बाकी निरर्थक प्रयास न करतां मन परमात्म्याचे ठिकाणी स्थिर करून नामजप करावा.असा उपदेश एका जनार्दनीं या अभंगात करतात.

13

दोष दुरितांचें पाळें ।पळती बळें नाम घेतां।। 1।।
नाम प्रताप गहन। भवतारक हरिनाम।। 2।।
आणीक नको दुजी चाड। नाम गोड विठ्ठल।। 3।।
एका जनार्दनीं नाम। तरलें तरती निष्काम ।।4।।

भावार्थ

हरिनामाचे सतत गायन करणार्या दुरितांचे सारे दोष नामजपाने नाहिसे होतात.हरिनाम भवतारक असून मनाला निष्काम करते.नामाची माधुरी चाखल्यावर दुसरी कोणतिही कामना उरत नाही.एका जनार्दनीं म्हणतात,नामाचा महिमा चिरकाल टिकणारा असून नाम निष्काम साधकाचे तारणहार आहे.

14

नामे घडे निज शांति । तेथें वसे भुक्ति मुक्ति ।
नाम तारक त्रिजगतीं। दृढभावे आठवितां।। 1।।
म्हणोनि घेतलासे लाहो। रात्रंदिवस नाम गावो।
कळिकाळाचे भेवो। सहज तेथें पळतसे ।।2।।
मज मानला भरंवसा । नामीं आहे निजठसा।
एका जनार्दनीं सर्वेशा। नाम जपे अंतरीं ।।3।।

भावार्थ

एकाग्रतेने चित्तांत दृढभाव धरून नामस्मरण केल्यास मनाला नितांत शांतता लाभते.भुक्ति मुक्ति चित्तांत वास करतात. नामाचा ध्यास घेऊन रात्रंदिवस हरिनामांत राहिल्यास कळीकाळाचे भय संपून जाते.एका जनार्दनीं आत्मविश्वासाने सांगतात की,अखंड नामजपाने नामाचा उत्तम संस्कार अंतरंगात उमटला आहे.

15

नाम प्राप्त नित्यानंद। नामें होय परम पद।
नामें निरसे भवकंद। नाम तारक निर्धार।। 1 ।।
हेचि मना दृढ धरीं। वायां नको पडूं फेरी।
तेणे होसी हाव भरी। मग पतनीं पडशील।। 2।।
म्हणे एका जनार्दन । नामें तरती अधम जन।
नामें होय प्राप्त पेणें। वैकुंठचि निर्धारें।। 3।।

भावार्थ

परमेश्वराच्या नामसाधनेने नित्य आनंद मिळतो.श्रेष्ठ पद प्राप्ती होते.संसारतापा पासून मुक्ती मिळते.हा भक्तीभाव मनांत दृढ धरावा. व्यर्थ जन्म-मरणाच्या फेर्यांत गुंतून पतनीं पडूं नये असा उपदेश करून एका जनार्दनीं म्हणतात,पापी लोकांचा उद्धार करणारे हरिनाम जपल्याने वैकुंठपद प्राप्त होते.

16

नामें तारिलें पातकी। नाम थोर तिहीं लोकीं ।
नामें साधे भुक्ति मुक्ति । नाम कली तारक ।।1।।
नको जाऊं वनांतरीं। रानी वनीं आणि डोंगरीं।
बैसोनियां घरीं। स्थिर चित्त निमग्न।। 2।।
नामें साधलें साधन। तुटलें बहुतांचे बंधन।
एका जनार्दनीं शरण। नाम वाचे उच्चारी।। 3।।

भावार्थ

नामसाधनेने अनेक पातकी जनांचा उध्दार झाला असून नामाची थोरवी तिन्हीं लोकांत गायली जाते.रानात,वनांत, डोंगरी, कपारी कोठेही न जातां घरांतच बसून,शांतचित्ताने हरिनामांत मग्न व्हावे.नामसाधना साधून अनेक साधक भवबंधनातून मुक्त झाले आहेत.जनार्दन स्वामींचरणी शरणागत असलेले एका जनार्दनीं सदोदित वाचेने नामस्मरण करतात.


17

जितुका आकार दिसत। नाशिवंत जात लया।। 1।।
एक नाम सत्य सार। वाउगा संसार शीण तो।। 2।।
नामें प्राप्त ब्रह्मपद। नामें देह होय गोविंद।। 3।।
एका जनार्दनीं नाम। सर्व निरसें क्रोधकाम।। 4।।

भावार्थ

जे जे डोळ्यांना दिसते ते सर्व नाशवंत असल्याने लयास जाते.एक हरिनाम सत्य,अविनाशी असून बाकी सर्व संसार व्यर्थ शीण आहे.वदनीं नाम धारण करणारा देहधारी गोविंदस्वरूप होऊन ब्रह्मपद मिळवू शकतो.एका जनार्दनीं सुचवतात, नामसाधनाने कामक्रोधावर विजय मिळवतां येतो.

18

श्रुतीशास्त्रांचा आधार। पुराणांचा परिसर।
दरूशनें सांगती बडिवार। वाचे नाम उच्चार।। 1।।
तारक जगीं हें नाम। जपतां निष्काम सकाम।
पावे स्वर्ग मोक्ष धाम। कलिमाजीं प्रत्यक्ष।। 2।।
म्हणोनि धरिलें शिवें कंठीं। तेणें हळाहळ शमलें पोटीं।
एका जनार्दनीं गुह्य गोष्टी। गिरजेप्रति अनुवाद।। 3।।

भावार्थ

नामसाधनेला श्रुती आणि साही शास्त्रांचा आधार आहे.अठराहि पुराणे हरिनामाचे गुणगान करतात.दर्शने हरिनामाचा महिमा वर्णन करतात.जगाचा उध्दार करणारे हरिनाम वाचेने जपल्याने सकाम साधक निष्काम होवून मोक्षपद,स्वर्गसुख कलियुगात सुध्दां प्राप्त करू शकतात.रामनामाचा महिमा जाणून शिवशंकरानी समुद्रमंथनातून निघालेले हळाहळ (विषाचे) शमन करण्यासाठी रामनाम कंठीं धारण केले.हे रहस्य शिवशंकर स्वता:पार्वतिला सांगतात असे एका जनार्दनीं स्पष्ट करतात.

19

वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे।। 1।।
शास्त्रांचे मत नामांचा इतिहास। यापरती भाष नाहीं नाहीं।। 2।।
एका जनार्दनीं संतांचे हें मत। नामें तरतुद पतित असंख्यात।। 3।।

भावार्थ

चारी वेदातून मिळणारे परमात्म तत्वाचे ज्ञान, श्रुतींनी केलेला या तत्वांचा अनुवाद,अठरा पुराण कथांमधून वर्णिलेली हरिकथा रसाची माधुरी आणि साही शास्त्रांनी मान्य केलेला हरिचरित्राचा इतिहास या पेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही भाष(लिखित साधन) उपलब्ध नाही असे संतांचे मत आहे असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

20

कष्ट न करतां योग्य जरी साधी।
श्रम तें उपाधी वाउगी कां बा।। 1।।
नाम तें सोपें श्रम नाहीं कांहीं।
उच्चारितां पाही सर्व जोडे।। 2।।
एका जनार्दनीं नको योगयाग ।
म्हणावा श्रीरंग वाचे सदा।। 3।।

भावार्थ

कोणतेही विशेष सायास न करता एखादी गोष्ट साध्य झाली तरी ते श्रम वायां गेले असे म्हणणे योग्य नाही.नामजप हे सहज सोपे साधन असून नामजपाने सर्व काही साध्य होते.एका जनार्दनीं म्हणतात,योगयागाची अवघड साधना करण्यापेक्षा वाचेने सदासर्वदा श्रीरंगाला आठवावे.


21

योगयाग तप व्रतें आचरितां। नाम सोपें गातां सर्व जोडे ।।1।।
पाहोनियां प्रचित नाम घे अनंत। तुटे नाना घात जपे नाम।। 2।।
एका जनार्दनीं नामाचा महिमा। वर्णितां उपरमा शेष आला।। 3।

भावार्थ

योगयाग,अनेक प्रकारची खडतर तपे,कठिण व्रते करण्याने जे पुण्यफळ मिळते ते सर्व सहज सोपे नाम घेतल्याने साध्य होते.याची एकदा प्रचिति घ्यावी.नामजपाने नाना संकटांचे निवारण होते.एका जनार्दनीं म्हणतात,नामाचा महिमा वर्णन करतांना सहस्त्र मुखे असलेला शेष सुध्दां थकून स्तब्ध झाला.

22

करितां साधनांच्या कोटी। नामाहूनि त्या हिंपुटीं ।।1।।
नाम वाचे आठवितां। साधने सर्व येती हातां ।।2।।
नामापरता दुजा मंत्र ।नाहीं नाहीं धुंडिता शास्त्र ।।3।।
एका जनार्दनीं नाम । शुध्द चैतन्य निष्काम।। 4।।

भावार्थ

या अभंगात नाममहिमा सांगतांना एका जनार्दनीं म्हणतात, वाचेने परमात्म नामाचे पठण केल्याने सर्व साधना साधली जातात.नामा सारखा दुसरा मंत्र नाही हे शास्त्रांचा मागोवा घेतल्याने कळून येते.कोटी साधने केली तरी नामसाधनेच्या तुलनेने हिणकस ठरतात.परमेश्वराचे नाम हे शुध्द चैतन्य असून साधकाला ते निष्काम बनवते.

23

नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं। म्हणोनि शिव नित्य घोकी।। 1।।
सदा समाधी शयनीं। राम चिंती ध्यानीं मनीं।। 2।।
अखंड वैराग्य बाणलें अंगी म्हणोनि वंद्य सर्वा जगीं।। 3।।
एका जनार्दनीं वाचे । नाम वदे सर्वदा साचें।। 4।।

भावार्थ

नाम तिनही लोकी श्रेष्ठ आहे हे जाणून शिवशंकर सदा समाधिस्थ राहून,ध्यानस्थ किंवा निद्राधीन असतांना श्री रामाचे चिंतन करतात.या चिंतनाने त्यांना अखंड वैराग्याचा लाभ होऊन ते सर्व जगाला वंदनीय झाले.एका जनार्दनीं वाचने अखंड नाम वदावे असे सांगतात.

24

कळिकाळा नाहीं बळ। नाम जपे तो सबळ।। 1।।
ऐसें नाम सदा जपे। कळिकाळा घाली खेपे।। 2।।
हरीचिया दासा साचें। भय नाहीं कळिकाळाचें ।।3।।
एका जनार्दनीं। काळ होय कृपाळ।। 4।।

भावार्थ

हरिनाम धारकाला कळीकाळाचे भय नाहीं कारण नामधारक कळिकाळापेक्षा अधिक सामर्थशाली आहे.नामसाधकासाठी कळिकाळ कृपाळु बनतो. असे एका जनार्दनीं सुचवतात.


25

जेणें नाम धरिलें कंठीं ।धांवे त्याच्या पाठी पोटीं ।।1।।
नाम गातां जनीं वनीं। आपण उभा तेथें जाउनी।। 2।।
नामासाठीं मागें धांवें। इच्छिले तेणे पुरवावे।। 3।।
यातीकुळ तयाचें । न पाहे कांहीं साचे ।।4।।
वर्णाची तो चाड नाहीं। नाम गातां उभा पाहीं।। 5।।
एका जनार्दनीं भोळा। नामासाठीं अंकित जाला ।।6।।

भावार्थ

हरीनाम कंठांत धारण करणार्या साधकाचे जाती,कुळ,वर्ण यांचा विचार न करता देव त्याच्या मागे पुढे धावत जातो.नामसाधक जनांत अथवा वनांत कोठेही जात असला तरी देव त्याला इच्छित साधन पुरवण्यासाठी उभा राहतो.एका जनार्दनीं म्हणतात, भोळ्याभाबड्या भक्तांच्या भक्तीप्रेमाने देव भक्तांचा अंकित होतो.

26

एका नामासाठी। प्रगटतसे कोरडे काष्ठीं।
भक्त वचनाची आवडीं मोठीं। हाय जगजेठी अंकित।। 1।।
एका घरीं उच्छिष्ट काढणें । एका द्वारीं द्वारपाल करणें।
एका घरीं गुरें राखणें। लोणी खाणें चोरूनी।। 2।।
एकाची उगेचि धरूनी आस। उभा राहे युगें अठ्ठावीस।
एका जनार्दनीं त्याचा दास। नामें आपुल्या अंकित।। 3।।

भावार्थ

भक्त वचनाची अतिशय आवड असलेला विश्वंभर एका नामासाठी कोरड्या खांबातून नरसिंहाचे.रुपाने प्रगट होतो.पांडवांच्या राजसूय यज्ञाचे वेळी उच्छिष्ट काढतो.बळीच्या घरीं द्वारपाल होतो.नंदाघरीं गुरे राखतो आणि गवळणींच्या घरचे लोणी चोरून खातो. भक्त पुंडलिकाची वाट पहात अठ्ठाविस युगे विटेवर उभा राहतो. एका जनार्दनीं या हरीचा दास असून त्याच्या नामाचा अंकित आहे असे म्हणतात.

27

आपुल्या नामा आपण वाढवीं। भक्तपण स्वयें मिरवीं।
अवतार नाना दावीं। लाघव आपुलें।। 1।।
करीं भक्तांचे पाळण। वाढली त्यांचे महिमान।
तयासी नेदी उणीव जाण। वागवी ब्रीद नामाचें।। 2।।
करी नीच काम नाहीं थोरपण। खाय भाजीचें पान।
तृप्त होय एका जनार्दन। तेणें समाधान होतसे।। 3।।

भावार्थ

श्रीहरी आपल्या नामाचा महिमा आपणच वाढवतो.नाना अवतार धारण करून अनेक प्रकारच्या लीला करतो.भक्तांचे पालन, रक्षण करतो.भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करतो.कसलीच उणीव भासू देत नाही.थोरपणाचा बडिवार न करता हलकी कामे करुन श्रमाचा महिमा वाढवतो.द्रौपदीच्या थाळीतिल भाजीचे पान खाऊन तृप्त होतो आणि विश्वाला तृप्त करतो.एका जनार्दनीं म्हणतात, या साऱ्या चरित्रकथा ऐकून मनाला समाधान वाटते.

28

नाम घेतां ही वैखरीं। चित्त धांवें विषयांवरी।। 1।।
कैसे होता हे स्मरण। स्मरणामाजीं विस्मरण।। 2।।
नामरुपा नव्हता मेळ। नुसता वाचेचा गोंधळ।। 3।।
एका जनार्दनीं छंद। बोलामाजीं परमानंद।। 4।।

भावार्थ

कांहीवेळा साधक वाचेने नामजप करीत असतो परंतू त्याचे चित्त नामांत रममाण झालेले नसते.मन इंद्रिय विषयांकडे धावत असते.हरिस्मरणांत हे विषयांचे स्मरण होऊन हरिनामरुपाचा मेळ नाहिसा होतो .अशा वेळीं नामजप म्हणजे केवळ शब्दांचा गोंधळ ठरतो.एका जनार्दनीं म्हणतात, हरिनामाचा छंद लागला की हरिनाम जपांत परम आनंद मिळतो.

29

शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं ।नाम पवित्र जगीं जपा आधीं ।।1।।
साधनें साधितां कष्ट होती जीवा। नाम सोपे सर्वां गोड गातां ।।2।।
परंपरा नाम वाचे तें सुगम। सनकादिक श्रम न करिती।। 3।।
एका जनार्दनीं नाम तें पावन। वाचे उच्चारितां जाण श्रम हरे।। 4।।

भावार्थ

हरिनाम पवित्र असून वाचेने गाताना गोड वाटते.सर्वांसाठी नामजपाची साधना सोपी आहे.यज्ञयाग, तप, तीर्थयात्रा ही सर्व कष्टाची साधने आहेत.शुकमुनी सारखे योगी श्रीरंगाच्या रंगात रंगून जातात.सनकादिक ऋषी इतर सांधनांचे श्रम न करता केवळ नामसाधना करतात. एका जनार्दनीं म्हणतात,नाम उच्चारतांच सर्व श्रमांचा परिहार होतो.

30

वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन ।पुराणीं कथन हेचिं केलें ।।1।।
कलियुगामाजीं नाम एक सार। व्यासाची निर्धार वचनोक्ती ।।2।।
तरतील येणें विश्वासी जे नर। तत्संगे दुराचार उध्दरती।। 3।।
एका जनार्दनीं ऐसा हा अनुभव। प्रत्यक्ष सांगे देव उध्दवासी।। 4।।

भावार्थ

कलियुगात नामस्मरण ही साधना सर्व साधनेत श्रेष्ठ आहे हे व्यासांचे वचन आहे.वेदांतही हेच कथन केले असून शास्त्रांनी या वेद,व्यास वचनास अनुमोदन देऊन मान्यता दिली आहे.या वेदवचनावर जे जन विश्वास ठेवतील ते तर तरतीलच , आपल्या बरोबर ते अनेक दुराचारी जनांचा उध्दार करतील.एका जनार्दनीं म्हणतात,हे अनुभवाचे बोल असून प्रत्यक्ष श्रीहरीने उध्दवास उपदेश करतांना सांगितले आहेत.

31

नाम एक उच्चारितां। गणिका नेली वैकुंठपंथा।
नामें पशू तो तत्वता। उध्दरिला गजेंद्र।। 1।।
ऐसा नामाचा बडिवार। जगीं सर्वांसी माहेर।
नामापरतें थोर। योगयागादि न होती।। 2।।
नामें तरला कोळी वाल्हा। करा नामाचा गलबला।
नामें एका जनार्दनीं धाला। कृत्यकृत्य झाला संसार।। 3।।

भावार्थ

हरीनामाचा उच्चार करुन गणिका वैकुंठपदी पोचू शकते.गजेंद्र सारखा पशू हरिनाम स्मरणाने उध्दरून जातो.वाल्हा कोळी सारखा दुराचारी सुध्दां नामभक्तीने वाल्मिकी बनून रामायणासारखी महान ग्रंथ रचना करु शकतो.असे नामाचे महिमान आहे. नाम हे सर्वांसाठी विश्रांतीचे स्थान आहे. योगयागादि साधने नामस्मरणा इतके थोर नाहीत.असे सांगून एका जनार्दनीं नामाचा गजर करा असे आवाहन करतात.नामजपाने आपण कृतार्थ होऊन पूर्ण समाधान पावलो असे सांगतात.

32

अवघ्या लोकीं जाहलीं मात। नामें पतीत तरती।। 1।।
तोचि घेउनी अनुभव। गाती वैष्णव नाम तें।। 2।।
तेणें त्रिभुवनीं सत्ता। उध्दरती पतिता अनायासें।। 3।।
एका जनार्दनीं गाजली हांक। नाम दाहक पापांसी।। 4।।

भावार्थ

हरिनामाने पतितांचा उध्दार होतो अशी नामाची किर्ती सर्व लोकीं पसरली.हाच अनुभव घेउन वैष्णव जन सतत नामगायनीं दंग झाले. या वैष्णवांची त्रिभुवनीं सत्ता निर्माण झाली.पतितांचा विनासायास उध्दार होऊ लागला. हरिनाम पाप दाहक आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

33

भाग्याचें भाग्य धन्य ते संसारी। सांठविती हरी हृदयामाजीं।। 1।।
धन्य त्याचे कूळ धन्य त्याचे कर्म। धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा।। 2।।
संकटीं सुखांत नाम सदा गाय। न विसंबे देवराय क्षण एक ।।3।।
एका जनार्दनीं धन्य त्यांचें दैव। उभा स्वयमेव देव घरी।। 4।।

भावार्थ

जे भक्त संकटांत किंवा सुखांत असतांना सतत हरिनामाचे आनंदाने गायन करतात,अंत:करणांत हरिचे रूप सांठवतात,देवाला एक क्षणही विसंबत नाहीत ते भाग्यवान असून संसारी धन्य होतात.ते ज्या कुळांत जन्म घेतात ते कुळ धन्य होय कारण त्या भक्तांचे कर्म पावन आहे.एका जनार्दनीं म्हणतात, या भक्तांच्या घरीं देव येऊन उभा राहतो.

34

राजाला आळस संन्याशाला सायास। विधवेसी विलास विटंबना।। 1।।
व्याघ्रासी शांतता गाईसी उग्रता। वेश्येसी हरिकथा विटंबना ।।2।।
दानेंविण पाणी। घ्राणेविण घाणी। नामेविण वाणी विटंबना ।।3।।
एका जनार्दनीं भावभक्तीविना । पुण्य केलें नाना विटंबना ।।4।।

भावार्थ

राजाने प्रजेच्या कल्याणकारी कामांत किंवा न्यायदानांत आळस करणे,संन्याशाने नाना खटपटी करणे आणि विधवेने विलास करणे निंदनीय आहे.वाघासारख्या हिंस्त्र प्राण्याने शांत राहाणे,गाई सारख्या मवाळ प्राण्याने उग्र रूप धारण करणे, वेश्येने हरिकथा करणे विपरित आहे. दान न देता हातावर पाणी सोडणे,नाकाशिवाय दुर्गंधी,देवाचे नाम जप न करणारी वाणी असणे निरर्थक आहे असे दाखले देवून एका जनार्दनीं म्हणतात, भावभक्ती शिवाय पुण्य करणे ही विटंबना आहे.

35

आपुलें कल्याण इच्छिणें जयासी। तेणें या नामासी विसंबूं नये ।।1।।
करील परिपूर्ण मनींचे हेत । ठेवलियां चित्त नामापाशीं।। 2।।
भुक्ति आणि मुक्ति वोळंगती सिध्दी। होईल कीं वृध्दी आत्मनिष्ठे।। 3।।
एका जनार्दनीं जपतां हें नाम। पुरवील काम जो जो हेतु।। 4।।

भावार्थ

आपल्या कल्याणाची ईच्छा करणार्या साधकांनी हरिनामाचा आळस करू नये.ज्याचे चित्त हरिनामांत गुंतले आहे त्याच्या मनींचे सर्व हेतू पुर्ण होतात.भुक्ति आणि मुक्ति या सिध्दी नामधारकाच्या पायाशी लोळण घेतात.आत्मनिष्ठेची वृध्दी होते.एका जनार्दनीं म्हणतात.नामजप साधनेने मनातिल सर्व हेतू कामना पूर्ण होतात.

36

जयाचें देखतां चरण। तुटेल जन्म जरा मरण।। 1।।
तो हा चंद्रभागेच्या तीरी । कट धरुनियां करीं ।।2।।
नाम घेतां आवडीं। तुटेल संसाराची बेडी।। 3।।
भाविकांसी पावे। मागें मागे त्यांच्या धावे।। 4।।
म्हणे जनार्दनाचा एका। आवडीनें नाम घोका ।।5।।

भावार्थ

चंद्रभागेच्या तीरावर कटीवर कर ठेवून उभा असलेल्या श्रीहरीचे चरणांचे दर्शन होतांच जन्म, जरा, मरण ही साखळी तुटून जाईल.संसाराच्या सगळ्या बंधननातून मुक्त होण्यासाठी आवडीने नाम घ्यावे.नामाचे ब्रीद राखण्यासाठी श्रीहरी भाविकांच्या मागे धावतो.असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

37

मुखीं नाम हातें टाळी ।साधन कलीं उत्तम हें।। 1।।
न घडे योगयाग तप। नाहीं संकल्प दुसरा ।।2।।
संतांपायीं सदा मन। हृदयीं ध्यान मूर्तीचे।। 3।।
एका जनार्दनीं सेवा। हीचि देवा उत्तम।। 4।।

भावार्थ

हाताने टाळी वाजवत मुखाने हरिनामाचा गजर करणे ही नामसाधना उत्तम आहे कारण कलियुगांत योगयाग तप ही साधना घडत नाही. दुसरा कोणताही संकल्प पुरा होत नाही.संताच्या चरणांशी मन एकाग्र करून हृदयांत पांडुरंगाचे ध्यान करावे. एका जनार्दनीं सुचवतात, श्रीहरीची हीच सेवा सर्वश्रेष्ठ आहे.

38

काया वाचा आणि मन । जयाचे ध्यान संतचरणीं ।।1।।
तोचि पावन जाहला जगीं। दुजे अंगीं कांहीं नेणें।। 2।।
सदा वाचे गाय नाम। न करी काम आणीक तो।। 3।।
एका जनार्दनीं देव। नेदी तया दुजा ठाव।। 4।।

भावार्थ

देहाने वाणीने आणि मनाने जो साधक संतांचे ध्यान करतो,तो दुसरे कांही जाणत नाही.तो पावन होतो.सतत वाचेने हरिनामाचा जप एव्हढीच साधना तो नित्यनेमाने करतो.एका जनार्दनीं म्हणतात,अशा साधकाला देव सायुज्यमुक्ती देवून वैकुंठांत चिरंतन स्थान देतो.

39

निवांत बैसोनि सुखें गाय नाम। भेदाभेद परते सांडी।। 1।।
हेचि एक खूण परमार्थ पुरता। मोक्ष सायुज्यता हातां चढे।। 2।।
लौकिक व्वेहार आहे तैसा पाहे। जो जे होत जायें जो जे वेळे ।।3।।
कर्म धर्म तत्वतां बीज हे सर्वथा। एका जनार्दनीं पुरता योग साधे।। 4।।

भावार्थ

शांत चित्ताने निवांत ठिकाणी बसून जो हरिनामाचे गायन करतो त्या साधकाच्या मनातील सर्व द्वैत सारे संशय नाहिसे झालेले असतात.हीच परमार्थ साधण्याची खूण समजावी.सायुज्यता मुक्तीचा तो अधिकारी होतो. जे जे ज्या ज्या वेळेला होईल त्याप्रमाणे तो साधक व्यवहार संभाळतो.कर्म,धर्म या तत्वांची योग्य सांगड घालतो.हेच योगसाधनेचे बीज आहे असे एका जनार्दनीं स्पष्ट करतात.

40

नाहीं कधी वाचे नाम। तो अधम न पहावा।। 1।।
होतां त्याचें दरूशन । सचैल स्नान करावें।। 2।।
तयाची ते ऐकतां मात। होय घात शरिराचा ।।3।।
ऐसा अधम तो जनीं। नामहीन असतो प्राणी।। 4।।
म्हणोनि नाम आठवावें।एका जनार्दनीं जीवेंभावें।। 5।।


भावार्थ

जो मुखाने कधी परमेश्वराचे नामस्मरण करीत नाही त्या अधम माणसाचे दर्शन घेऊ नये.चुकून नजरेस पडला तर डोक्यावरून स्नान करावे.त्याची दर्पोक्ती ऐकून शरिराचा घात होतो.असा नामहीन प्राणी जगांत पापी समजला जातो.या साठी भावभक्तीने देवाला स्मरावे असा उपदेश एका जनार्दनीं करतात.

41

हेंचि साचें बा साधन। मुखीं नाम हृदयीं ध्यान ।।1।।
येणें तुटे नाना कंद। पीडा रोग भवछंद।। 2।।
नको रे वाउगी खटपट। मन करी एकनिष्ठ ।।3।।
घडे साधन समाधी। तेथें अवघी उपाधी।। 4।।
एका जनार्दनीं ध्यान। साधी परमार्थ साधन ।।5।।

भावार्थ

अंतरांत परमात्म रूपाचे ध्यान आणि मुखांत देवाचे नाम हीच खरी साधना आहे.या साधनेने मानसिक पीडा आणि शारिरीक रोग लयास जातात.वेगळी निरर्थक खटपट करावी लागत नाही.मन एकाग्र करून चिंतन केले तर समाधीसाधन घडते. सारे प्रयास संपून जातात.एका जनार्दनीं स्वानुभवातून स्पष्ट करतात ध्यान, धारणा समाधी या मार्गाने परमार्थ साधतो.

42

एक नाम गाये। तेथे सदा सुख आहे।। 1।।
नाम गातांची वदनीं। उभा असे चक्रपाणी।। 2।।
नामाचिये हाकें। उडी घाली कवतुकें।। 3।।
घात आघात निवारी। उभा राहे सदा दारीं ।।4।।
एका जनार्दनीं नामासाठीं। धांवे भक्तांचिये पाठी।। 5।।

भावार्थ

नामधारक जेव्हां नामजप करीत असतो तेव्हां श्रीहरी सुदर्शन चक्र हातात धरून उभा असतो.भक्ताची हाक ऐकताच तत्परतेने भक्ताच्या घात आघातांचे निवारण करतो.एका जनार्दनीं म्हणतात,भक्तीप्रेमाने वेडा होऊनि भक्तांच्या मागे धावत असतो.

43

पशु आणि पक्षी तरले स्मरणें। तो तुम्हा कारणें उपेक्षिना ।।1।।
धरूनि विश्वास आठवावें नाम। सद्गद् तें प्रेम असो द्यावें।। 2।।
सुखदु:ख कोटी येती आणि जाती। नामाविण विश्रांती नाहीं जगीं।। 3।।
एका जनार्दनीं नामाचा प्रताप। नुरेती तेथें पाप वोखदासी।। 4 ।।

भावार्थ

देवाच्या नामस्मरणाने पशु पक्षी तरून जातात ते नामस्मरण साधकाची उपेक्षा करणार नाही असा विश्वास धरून सतत नामजप करावा.सद्गतींत राहून अखंड साधना करावी.सुखदु:ख येतात आणि जातात,नामाशिवाय मनाला खरी विश्रांति मिळणार नाही.एका जनार्दनीं सांगतात, नामाचा महिमा असा आहे की,नाम जेथे आहे तेथे औषधाला सुध्दां पाप उरणार नाही.

44

नाहीं जया भाव पोटीं। तया चावटीं वाटे नाम।। 1।।
परी येतां अनुभव । चुकवी हाव संसार।। 2।।
वेरझारीं पडे चिरा। नाहीं थारा जन्माचा।। 3।।
एका जनार्दनीं खंडे कर्म। सोपे वर्म हातां लागे।। 4।।

भावार्थ

ज्या साधकाच्या मनांत भक्तिभाव नाही त्याला नामजप म्हणजे वाचाळता वाटते.परंतू अनुभवांती नामस्मरणाने संसार सुखाविषयी वैराग्य निर्माण होते हे नामधारकाला समजून येते.या वैराग्याने जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते.एका जनार्दनीं म्हणतात,भक्तियुक्त नामजपाने कर्मशृखंला खंडित होते हा सोपा उपाय लक्षांत येतो.

45

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळादि अधिकार।। 1।।
एका भावें गावें नाम। सोडोनिया क्रोधकाम।। 2।।
आशा ममता टाका दुरी। मग इच्छा कल्पना काय करी।। 3।।
एका जनार्दनीं मन। करा देवासी अर्पण।। 4।।

भावार्थ

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चारी वर्णांसह चांडाळांना सुध्दा नामजप साधनेचा अधिकार आहे असे सांगून एका जनार्दनीं सुचवतात, क्रोध,काम यांचा त्याग करून भक्तिभावाने हरीचे नाम गावे.सुखाची आशा आणि माझेपणाने येणारी ममता दूर सारल्यास मनाच्या इच्छा आणि पोकळ कल्पना यांना मनांत ठाव राहात नाही.असे शुध्द झालेले मन देवाला अर्पण करावें.

46

गुणदोष नायकावे कानीं । सदा वाचा नामस्मरणीं।। 1।।
हेंचि परमार्थाचे सार। मोक्ष मुक्तीचे भांडार।। 2।।
साधे सर्व योगस्थिती। द्वेष धरूं नये भूतीं।। 3।।
सर्वांठायीं जनार्दन। म्हणोनि वंदावें तें जन।।4।।
खूण सांगे जनार्दन ।एका जनार्दनीं पूर्ण।। 5।।

भावार्थ

कोणाच्याही गुणदोषांचे वर्णन कानाने ऐकू नये.वाचेनें सतत हरिनाम घ्यावे.हेच मोक्ष मुक्तीचे साधन असून परमार्थाचे सार आहे.नामस्मरणाने ध्यान,ज्ञान,कर्म,भक्ती या चारी योगस्थिती साध्य होतात.कोणाविषयी द्वेषभावना मनात असू नये. सर्वांच्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन वसत आहे असे समजून त्यांना वंदन करावे.हे गुरूवचन आहे असे एका जनार्दनीं सांगतात.

47

सदा वाचे नामावळी। नित्य जिव्हा ज्याची चाळी।
पातकांची होळी। होत तेणें कली ये।। 1।।
नको ध्यान धारणा आसन। वाचे सदा नारायण।
केलिया ऐसा नेम जाण। मेरूसमान सुकृत।। 2।।
उपमा नव्हे तया नरा। जनार्दन तो निर्धार।
एका जनार्दनीं बरा। त्याचा सांगात घडतां ।।3।।

भावार्थ

ज्या साधकाने नित्य नारायण नामाचा जप करण्याचा नेम केला आहे त्याचे सुकृत मेरूपर्वता प्रमाणे अढळ राहील यांत संदेह नाही.या साधकाच्या भाग्याला उपमा नाही.तो जनार्दन स्वामींप्रमाणे गुरूस्थानीं मानावा.त्या साधकाची संगती जोडावी,असे एका जनार्दनीं सुचवतात.

48

वेदाभ्यास नको सायास ज्योतिष। नामाचा तो लेश तेथें नाही ।।1।।
बहुत व्युत्पत्ती सांगती पुराण। व्यर्थ तेचि स्मरण नाम नाहीं।। 2।।
अनंत हे नाम जयापासुनी जालें। ते वर्म चुकले संतसेवा।। 3।।
संतांसी शरण गेलिया वांचुनि। एका जनार्दनीं न कळे नाम।। 4।।

भावार्थ

वेद मंत्रांच्या ऋच्या समजून घेण्याचा अभ्यास नको कारण वेदांत नाममाधुरी नाही.पुराणे परमेश्वराची अनंत नामे कशी रूढ झाली याच्या अनेक कथा सांगतात परंतू तेथे नामस्मरण नसल्याने ते व्यर्थ आहे.अनंत हे नाम संत या नामातून आले आहे हे जाणून न घेतल्याने संतसेवेचा मार्ग चुकला.संतांना शरण गेल्या शिवाय नामाचा महिमा कळणार नाही असे एका जनार्दनीं सुचवतात.

49

ज्या नामें पाषाण जळांत तरलें । नामे त्या रक्षिलें प्रल्हादासी।। 1।।
अग्नि विष बाधा नामेंचि निवारीं । गिरीं आणि कंदरीं रक्षी नाम ।।2।।
ब्रह्महत्यारी वाल्हा नामेंचि तरला। त्रैलोकीं मिरवला बडिवार।। 3।।
एका जनार्दनीं नामेंचि तरलें। जडजीव उध्दरले युगायुगीं।। 4।।

भावार्थ

ज्या रामनामाने सेतुबंधन प्रसंगी पाषाण पाण्यांत तरंगले त्याच नामाने प्रल्हादाचे अग्नी व विष बाधेपासून रक्षण केले.उत्तुंग पर्वत आणि खोल दरी यांतून रामनाम भक्तांचे रक्षण करते.ब्राह्मण हत्येचे पातक करणारा वाल्हा कोळ्याचा रामनामाने उध्दार होऊन रामायणकर्ता म्हणून त्रैलोक्यांत आदरणीय ठरला.रामनामाने अनेक युगांत जडजीवांचा उध्दार झाला आहे असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.

50

रंक बैसतां पालखीसी । उपेक्षी पहिल्या पदवीसी।। 1।।
तैसें नाम मुखीं गातां। कोण ब्रह्म ज्ञान वार्ता।। 2।।
मुळींच जाहलें नाहीं खंडन। वादविवाद अभेदी जाण।। 3।।
एका जनार्दनीं शरण। ब्रह्मज्ञानाची कोण आठवण।। 4।।

भावार्थ

एखादी निर्धन व्यक्ती सधन बनून पालखीचा मानकरी बनली तर त्याच्या आधीच्या परिस्थितिला विसरून जाते.तसेच मुखाने हरिनाम संकीर्तना छंद जडला आणि त्यातला आनंद कळला तर ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याने होणारा आनंद तुच्छ वाटतो. नामसाधनेंत मतांचे खंडन नाही,शूद्र भेदाभेद नाहीत आणि वादविवाद नाहीत.असे जनार्दन स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं म्हणतात.

51

आम्ही धारक नामाचे। आम्हां भय नाहीं काळाचें।। 1।।
ऐसी नामाची ती थोरी। कळिकाळ दास्य करी।। 2।।
येरां अवघियां उध्दार ।नाममंत्र परिकर।। 3।।
एका जनार्दनीं पोटी। नाम गावें सदा होटीं।। 4।।

भावार्थ

नामधारकांना काळाचे भय नसते.नामाचे श्रेष्ठत्व असे आहे कीं, कळीकाळ नामधारकांचे दास्यत्व करतो.नाममंत्र इतके समर्थ आहे की ते सर्वांचा उद्धार करते.मुखाने हरीचे नामस्मरण करावे असे एका जनार्दनीं सांगतात.

52

नामाचे धारक विष्णुरूप देख । त्रिभुवनींचे सुख तया ठायीं ।।1।।
ब्रह्मा विष्णु हर येतात सामोरे। नामधारक निर्धारिं तयां वंद्य ।।2।।
त्रिभुवनापरता नामाचा महिमा। जाणे शंकर उमा सत्य सत्य ।।3।।
एका जनार्दनीं पतित पावन नाम। गातां निजधाम जोडे मुक्ती।। 4।।

भावार्थ

नामधारक हे विष्णुरूप असून त्रिभुवनीचे सुख त्याच्या ठिकाणी एकवटलेलें असते.ब्रह्मा,विष्णु,महेश सामोरे जाऊन नामधारी भक्तांचे स्वागत करतात, वंदनीय मानतात. नामाचा महिमा त्रिभुवनाला पुरून उरणारा आहे हे शिवशंकर व पार्वती जाणतात.एका जनार्दनीं म्हणतात,हरिनाम पतितांना पावन करणारे असून वैकुंठपदाची प्राप्ती करून देणारे आहे.

53

मोक्ष मुक्तीचे लिगाड । वागवी अवघड कासया ।।1।।
एक नाम जया कंठीं। राखती मुक्ती देखा ।।2।।
मोक्ष तेथें जोडोनि हात। उभाचि तिष्ठत सर्वदा।। 3।।
एका जनार्दनीं देखा । मुक्ती फुका राबती ।।4।।

भावार्थ

मोक्ष मुक्ती या कल्पनांचे अवघड ओझे मनांत न आणता मुक्त कंठाने जो हरिनाम गातो त्या साधकाच्या पुढे मोक्ष हात जोडून सर्वदा तिष्ठत उभा राहतो.एका जनार्दनीं म्हणतात,मुक्ती तेथे फुकट दास्यत्व करतात.

54

धन्य धन्य श्रीहरीचे गुण । नाम पावन ऐकतां ।।1।।
जें जें अवतारचरित्र। वर्णितां पवित्र वाणी होय।। 2।।
कीर्ति वर्णिता उध्दार जीवां। कलीयुगीं सर्वा उपदेश।। 3।।
एका जनार्दनीं सोपे वर्म । गुण कर्म वर्णितां।। 4।।

भावार्थ

श्रीहरीचे गुण गाणारा आणि हरिचे पावन नाम ऐकणारा,धन्य होत.जे भक्त श्रीहरीचे अवतारचरित्र वर्णन करतात त्यांची वाणी पवित्र होते.हरीची किर्ति वर्णन करणार्या जीवांचा उध्दार होतो.कलियुगांत हाच सर्वांना उपदेश आहे की, हरीच्या गुण कर्मांचे वर्णन करावे असे एका जनार्दनीं सुचवतात.

55

जपतां नाम पडे धाक। पातकें पळती त्रिवाटे देख ।
कळिकाळाचें नासे दु:ख । ऐसे नामीं सामर्थ्य ।।1।।
जप तप नामावळी। आणिक नको मंत्रावळी।
ब्रह्मज्ञान बोली। वायां शीण आटाआटी।। 2।।
साधनें पुण्य असेल गांठीं। तरीच नाम येईल होटीं।
एका जनार्दनीं पोटीं। दया शांति आकळे।। 3।।

भावार्थ

हरीनामाचे सामर्थ्य असे की कळिकाळाचे दु:ख नाहिसे करते.नाम जपतांच पातके भयभीत होऊन तिन्हीं वाटांनी पळत सुटतात.परमेश्वर प्राप्तीसाठी जप,तप,मंत्र,तंत्र,ब्रह्मज्ञान ही साधने म्हणजे व्यर्थ शीण आहे .नामसाधनेचे पुण्य गांठी असेल तर वाचेने नामसाधना होऊ शकेल.चित्तांत दया,शांती नांदू लागेल असे एका जनार्दनीं सांगतात.

नामपाठ

1

नामपाठा गाये संताचे संगती ।नाहीं पुनरावृत्ती तया मग ।।1।।
नामपाठ गाय सर्व भावें मनीं । चुकेल आमची गर्भवास।। 2।।
जनार्दनाचा एका नामपाठ गाये। जनार्दन पाहे जनीं वनीं ।।3।।

भावार्थ

संतांच्या संगतीने जो साधक नामपाठ गातो त्याला परत जन्म-मरणाची फेरी नाही.भक्तीभावाने गायलेला हरिपाठ गर्भवास चुकवतो.एका जनार्दनीं नामपाठ गातो आणि जनीं वनीं सद्गुरू जनार्दनस्वामींचे दर्शनाचा लाभ घेतो असा स्वअनुभव कथन करतात.

2

नामपाठ सार सर्वांमाजीं श्रेष्ठ। जो गाये तो वरिष्ठ कलियुगीं ।।1।।
चुकेल यातना नाना गर्भवास। भय आणि त्रास नव्हे मनी।। 2।।
जनार्दनाचा एका नामपाठ भावें । आदरें गात आहे सदोदित ।।3।।

भावार्थ

नामपाठ सर्वश्रेष्ठ असून नामपाठ गाणारा साधक या कलियुगात वरिष्ठ समजला जातो.त्याच्या जन्म-मरणाच्या यातना संपून जातात.मन भय आणि त्रास यातून मुक्त होते.एका जनार्दनीं आदराने,भक्तीभावाने नामपाठ गायनाचा आनंद घेतात.

3

नामपाठ सार वेदाचे तें मूळ। शास्त्रांचे तें फळ नामपाठ ।।1।।
योगयाग विधी न लगे खटपट। नामपाठे स्पष्ट सर्व कार्य।। 2।।
जनार्दनाचा एका नामपाठ घोकी। गुढी तिहीं लोकी उभारिली ।।3।।

भावार्थ

नामपाठ वेदांचे मूळ असून शास्त्रांचे फळ आहे.योगयाग विधींची कोणतिही खटपट न करता नामपाठाने सर्व कार्य सिध्दीस जातात.जनार्दन स्वामींचा दास एका जनार्दनीं सदोदित नामपाठ गाऊन स्वर्ग,पृथ्वी,पाताळ तिन्हीं लोकी आनंदाची गुढी उभारतो.

4

नामपाठ किर्ति सर्वांत वरिष्ठ । नको साधन कष्ट आणिक कांहीं।। 1।।
नामपाठमाला हृदयीं ध्याईं भावें ।उगेचि जपावें मौन्यरूप ।।2।।
जनार्दनाचा एका नाम गाय फुका। साधन तिहीं लोकां वरिष्ठ।। 3।।

भावार्थ

नामपाठ किर्ति तिन्हीं लोकांत वरिष्ठ समजली जाते.नामपाठमाला भक्तिभावाने हृदयांत धारण करून मुकपणे जपावी.नामपाठ साधनेसाठी कोणतेही सायास करावे लागत नाही.असे एका जनार्दनीं सुचवतात.

5

नामपाठ ब्रह्म उघड बोले वाचा । वेदांती तो साचा |
निर्णय असे नामपाठ भावभक्ति तें कारण ।
आणिक साधन नाहीं दुजे ।।2।।
जनार्दनाचा एका गाये तो आवडी।
तोडियेली बेडी संसाराची ।।3।।

भावार्थ

नामपाठ हे वाचे द्वारे प्रगट होणारे साक्षात परब्रह्म आहे असा वेदांचा निर्णय आहे.नामपाठ हे भावभक्तीचे कारण असून त्यासारखे दुसरे साधन नाही.एका जनार्दनीं नामपाठ आ रेवडीने गातात आणि संसाराची बेडी तोडून मुक्त होतात.

6

नामपाठ अंडज जारज स्वेदज। उदभिज देख चार योनी ।।1।।
नामपाठ प्रेमें गाय तूं आवडीं। तुटेल सांकडीं कर्म धर्म।। 2।।
जनार्दनाचा एका नामपाठीं निका। तोडियेली शाखा द्वैताची तें।। 3।।

भावार्थ

अंड्यातून, वीर्यातून, घामातून आणि पाण्यातून या चारी योनीतून जन्मलेले सर्व प्राणी नामपाठाचे आधिकारी आहेत.प्रेमाने परमेश्वराचा नामपाठ गायल्यास कर्म धर्मातिल सर्व संकटे दूर होतात.एका जनार्दनीं नामपाठधारी असल्याने ते द्वैताची बंधने तोडून अद्वैत भावाने हरिरुपाशी एकरूप झाले आहेत असे मानतात.

7

नामपाठ वर्म सोपें आहे जाणा। चिंती नारायणा नामपाठें ।।1।।
अष्टांग योग साधनें वरिष्ट। नामपाठेविण कष्ट होती जनां ।।2।।
जनार्दनाचा एका करी विनवणी। नामपाठ निर्वाणीं शस्त्र आहे।। 3।।

भावार्थ

पतंजलींनी सांगितलेली अष्टांग योगाची साधना श्रेष्ठ आहे हे सर्वमान्य असुनही नामापाठा इतकी सोपी नसल्याने नामपाठा शिवाय भक्तजनांना कष्ट होतात.नामपाठ ही सहजसाध्य साधना असून नामपाठाने नारायणाचे चिंतन करावे.नामपाठ हे निर्वाण साधण्याचे साधन आहे असे एका जनार्दनीं विनवून सांगतात.

8

नामपाठ गाय सदा नामपाठ गाय। धन्य त्याची माय त्रिभुवनीं ।।1।।
ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती। नामपाठ कीर्ति मुखीं गातां।। 2।।
एका जनार्दनीं साराचे हें सार। नामपाठ निर्धार केला जगीं ।।3।।

भावार्थ

नामपाठ गाणार्या साधकाला ब्रह्मादी देव वंदन करतात आणि शिवशंकर त्या साधकाचे ध्यान लावतात.नामपाठ गायकाची माता त्रिभुवनीं धन्य होय.नामपाठ सर्व साधनांचे सार असून नामपाठ गायनाचा नित्य परिपाठ ठेवण्याचा निर्धार करावा असे एका जनार्दनीं सुचवतात.

9

नामपाठ जगीं सोपें तें साधन । म्हणोनि वर्णन वैष्णव करिती।। 1।।
आनंदे नाचती टाळी वाजविती। नामपाठ गाती सर्वभावें ।।2।।
जनार्दनाचा एका भुलला नामापाठीं। म्हणोनि वैकुंठीं घर केलें ।।3।।

भावार्थ

नामपाठ हे भक्तीचे सोपे साधन आहे असे वर्णन वैष्णव करतात.आनंदाने टाळी वाजवून नाचत नामपाठ गातात.एका जनार्दनीं नामपाठी तल्लीन होऊन वैकुंठपदीं विराजमान होतात.

10

नामपाठ करितां काळवेळ नाहीं । उच्चारूनी पाहीं सर्वकाळ ।।1।
सर्वभावें नामपाठ तूं गाये। आणिक न करी काय साधन तें।। 2।।
जनार्दनाचा एका भुलला नामपाठीं। आणिक नाहीं करी गोष्टी नामाविण ।।3।।

भावार्थ

नामपाठ साधनेला काळवेळाचे बंधन नाही.कोणत्याही वेळेला भक्तिभावाने नामपाठ गायन करावे.नामपाठाशिवाय कोणतिही साधना करण्याची गरज नाही.एका जनार्दनीं नामपाठ साधनेंत इतके रममाण होतात कीं,नामपाठा शिवाय कोणतिही गोष्ट करीत नाही.

11

नामपाठ सोपा भोळ्या भाविकांसी । मतवादीयांसी न रूचे नाम।। 1।।
नवज्वरिता दुग्ध प्राण जाय तत्वतां । अभाविकांसी सर्वथा गति तेचि ।।2।।
जनार्दनाचा एका सांगे प्रेमभावें । आदरे तें गावें नामपाठ ।।3।।

भावार्थ

वेगवेगळी मते मांडून वादविवाद आणि मतखंडन करण्याची आवड असणाऱ्यांसाठी नामपाठ नसून भोळ्या भाविकांसाठी नामपाठ साधना सहजसोपी आहे.न्ऊ दिवस मुदतीचा तापाचा विकार (न्युमोनिया )झालेल्या रोग्यास दूध अपथ्य कारक असते.त्याचप्रमाणे श्रध्दाहीन अभाविकास नामपाठ साधना अहितकारक आहे.यासाठी एका जनार्दनीं आदरयुक्त प्रेमाने साधकांना नामपाठ साधना करण्याचा उपदेश करतात.

12

नामपाठ करितां जाईल पैं चिंता। मोक्ष सायुज्यता हातां येई।। 1।।
म्हणोनि सोपें वर्म सांगते तुज । नामपाठ गुज जपें सदा ।।2।।
जनार्दनाचा एका कुर्वंडी करूनी। लोळत चरणी संताचिया।। 3।।

भावार्थ

नामपाठ साधनेने मनाच्या सगळ्या चिंता मिटून जातात.साधक सायुज्यता मुक्तीचा अधिकारी होतो.यासाठी नामपाठ करणे हे सोपे साधन आहे हे रहस्य एका जनार्दनीं साधकांना सांगतात.देहाची कुर्वंडी करून संताच्या चरणी लोळण घेतात.

13

नामपाठ जपे भोळा महादेव । देवाधि देव वंदी तया।।1।।
विष तें अमृत नामपाठें झालें । दैन्य दु:ख गेले नाम जपतां ।।2।।
जनार्दनाचा एका उभारूनी बाह्या । नामपाठ गाय सर्वकाळ ।।3।।

भावार्थ

देवाधिदेव ज्याला आदराने वंदन करतात ते शिवशंकर भोळ्याभाबड्या भक्तांप्रमाणे नामपाठ जप करतात.समुद्रमंथनातून निघालेले विष महादेवाने प्राशन केले रामनाम पाठाने त्या हलाहलाचे अमृत झाले.नामपाठ जपतांच साधकाचे सारे दैन्य, दु:ख लयास जाते असे एका जनार्दनीं दोन्ही हात उभारून भक्तांना सांगतात.

14

शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती। तेणें तयां विश्रांती सर्वकाळ।। 1।।
पुराणे वदतीं नाम पाठ कीर्ति । व्यासादिकीं निश्चितीं नेम केला।। 2।।
जनार्दनाचा एका सांगतसे गुज। नामपाठ निज जपे जना।। 3।।

भावार्थ

नामपाठाचा महिमा पुराणांत सांगितला आहे. भागवत पुराणाचे रचनाकार महर्षि व्यासमुनींनी नामपाठ गायनाचा नित्यनेम केला होता.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,शास्त्र जाणणारे ज्ञानीजन मनाच्या विश्रांती साठी सदोदित नामपाठ करतात.

नामपाठ प्राप्त झालेले भक्त

1

नामपाठें भक्ति हनुमंतें केली। सेवा रुजू झाली देवा तेणें ।।1।।
नामपाठें शक्ति अद्भुत ये अंगीं। धन्य झाला जगीं कपीनाथ।। 2।।
जनार्दनाचा एका सेवोनि आदरें । नामपाठ स्मरे सर्व काळ ।।3।।

भावार्थ

हनुमंताने नामपाठ भक्ति करून आपली सेवा श्रीराम चरणीं रुजू केली.या भक्तिने हनुमंताच्या देहीं अद्भुत शक्तिचा संचार झाला.वानरराज धन्य झाला.जनार्दन स्वामींचा शिष्य एका स्वानुभवे नामपाठ जपावे असे सांगतात.

2

नामपाठें तारिले पतित उध्दरिले। धांवणें तें केले पांडवांचे ।।1।।
पडतां संकटीं नामपाठ गाय। द्रौपदी ती माय तारियेली ।।2।।
जनार्दनाचा एका सांगतसे लोकां। नामपाठ फुका जपा आधीं।। 3।।

भावार्थ

संकटांत सापडलेल्या द्रौपदीसाठी श्रीहरी धावत पांडवांच्या घरीं गेले आणि संकटातून तारून नेले.नामपाठाने अनेक पतितांचा उध्दार होतो असे सांगून एका जनार्दनीं नामपाठ सदासर्वदा जपावा कारण हे साधन विनासायास घडते असे आवर्जून परत परत सांगतात.

3

नामपाठें सर्व मुक्तत्व साधिती। नामपाठे विरक्ती हातां येत ।।1।।
नामपाठें उध्दव तरला तरला। नामपाठें झाला शापमुक्त ।।2।।
जनार्दनाचा एका बोले लडिवाळ। नामपाठ काळ काळाचाही ।।3।।

भावार्थ

नामपाठ करणारे सर्व साधक मोक्षप्राप्ती करून घेतात.मुक्त होतात.नामपाठाने संसारातून विरक्त व्हावे अशी भावना मनांत निर्माण होते.नामपाठाने उध्दव शापमुक्त झाला.जनार्दन शिष्य एकनाथ साधकांशी सलगी करून लडिवाळपणे सांगतात, नामपाठाचे सामर्थ्य असे कीं, ते काळाला नामोहरण करू शकते.

4

नामपाठें अक्रूर सर्व ब्रह्मरूप । भेदाभेद संकल्प मावळले।।1।।
वंदी रजमाथां घाली लोटांगण। द्वैताचें बंधन तुटोनि गेलें।। 2।।
जनार्दनाचा एका नामपाठें मुक्त। जालासे सतत संतचरणीं।। 3।।

भावार्थ

नामपाठाच्या प्रभावानें अक्रूराचे सारे संशय,भेदाभेद,संकल्प मावळले.गोकुळातिल पावन माती त्याने कपाळी लावली,गोप गोपींची निष्काम,भोळी भाबडी भक्ती पाहून त्याने लोटांगण घातले.देव भक्तातिल द्वैत बंधन तुटून गेले.जनार्दनाचा एका नामपाठाने मुक्त होऊन संतचरणी शरणागत झाला.

5
2

नामपाठें बिभीषण सर्वास वरिष्ठ । वंश तो स्पष्ट देशोधडी ।।1।।
जाउनी शरण चिरंजीव झाला । नामपाठे धाला कल्पवरी ।।2।।
जनार्दनाचा एका मिरवी बडिवार। नामपाठ सार युगायुगीं।। 3।।

भावार्थ

नामपाठाने रावणबंधु बिभीषण राजपदाला पोचला,वरिष्ठ झाला. श्रीरामाला शरण जाऊन त्याने चिरंजीव पद प्राप्त करून घेतले.राक्षसवंश देशोधडीला मिळाला.एका जनार्दनीं नामपाठाचा महिमा वर्णन करताना सांगतात, नामपाठ अनेक युगापासून श्रेष्ठ साधन मानले जाते.

6

नामपाठें भीष्में कामातें जिंकिलें। सार्थक पैं केलें विहिताचे ।।1।।
आदरें आवडी नामपाठ गावें । सर्वांपरीं होय सत्ता त्याची ।।2।।
जनार्दनाचा एका होउनी शरण। घाली लोटांगण संतचरणीं।। 3।।

भावार्थ

नामपाठ साधनेने कौरवांचे पितामह भिष्माच्यार्यांनी आपल्या कामविकाराला जिंकून जीवनाचे सार्थक केले.भावपूर्ण भक्तीने नामपाठाचे गायन केल्याने सर्वश्रेष्ठ पद प्राप्त होते.असे मत व्यक्त करून जनार्दन शिष्य एका संतचरणीं लोटांगण घालतात.

7

नामपाठें तरला चोखा तो महार। भावें सर्वेश्वर स्थापी तया।। 1।।
नामपाठ करूनि कीर्ति केली जगीं। उपमा ते अंगी वाढविली ।।2।।
जनार्दनाचा एका वर्णितो संतांसी । नित्य नामपाठासी अनुसरला।। 3।।

भावार्थ

नामपाठ भक्तीने चोखा महार भक्तांमध्ये उच्च श्रेणीला पोचला.नामपाठ साधनेने जगांत सर्वत्र त्याची किर्ति पसरली.परमेश्वर कृपेने चोखा अद्वितीय बनला. एका जनार्दनीं नित्य नामपाठाचे अनुसरण करणार्या संतांचे वर्णन करतात.

8

नामपाठे गोरा कुंभार तरला। उध्दार तो झाला पूर्वजांचा ।।1।।
नामपाठ कीर्ति गाताती वैष्णव। धन्य तो अपूर्व नाममहिमा।। 2।।
जनार्दनाचा एका चरणरजरेण। नामपाठ संकीर्तन करा वेगीं।। 3।।

भावार्थ

नामपाठ साधनेने गोरा कुंभाराच्या पूर्वज्यांचा उध्दार झाला.गोरा कुंभार संसार बंधनातून मुक्त झाला.नाममहिमा अपूर्व असून वैष्णवजन सदैव नामपाठकिर्ति गातात.नामपाठ संकीर्तन अखंडपणे करावे असा संदेश जनार्दनाचा एका देतात.

9

नामपाठ प्रेमें सांवता तो गाये। हृदयकमळीं वाहे नारायण ।।1।।
नामपाठ निका नामपाठ निका। खुर्पू लागे देखा देव त्यासी ।।2।।
जनार्दनाचा एका ऐकोनियां बोल। सांगत नवल संतांपुढें ।।3।।

भावार्थ

प्रेमयुक्त भक्तीने सावता माळी नामपाठ गातो.नामपाठ साधना अत्यंत फलदायी असून देव भक्तासाठी शेतांत गवताची खुरपणी करतो.जनार्दनाचा एका संतांपुढे हे नवलाईचे बोल कथन करतात.

10

नामपाठें नामा शिंपी तो तरला। तयाची देवाला आवड मोठी ।।1।।
जाउनी जेवणें उच्छिष्ट भक्षणें । नामपाठें देणें इच्छिलें तें ।।2।।
जनार्दनाचा एका सद्गदित होय । नामपाठ गाय आवडीनें ।।3।।

भावार्थ

नामा शिंपी हा देवाचा आवडता भक्त होता. देव नामदेवा घरीं जाऊन जेवण घेत असे.नामाचा उच्छिष्ट आवडीने खात असे.नामदेवाला इच्छेनुसार फल पुरवित असे.जनार्दनाचा एका हे वर्णन करताना सद्गदित होतात आणि आवडीने नामपाठांत दंग होतात.

11

नामपाठें जनाबाई बरोबरी । दळी कांडी हरि शेणी वेंची।।1।।
भक्तांचे सकळ कार्य तें करणें । नये ऐसे उणें करी काम ।।2।।
जनार्दनाचा एका आवड पाहुनी। नाचतो कीर्तनीं नाम गाय ।।3।।

भावार्थ

जनाबाईच्या नामपाठाने प्रसन्न झालेला श्रीहरी तिच्या बरोबर धान्य दळतो,कांडण करतो.शेणी वेंचतो.भक्तांचे सर्व प्रकारची कामे करतांना आनमान करीत नाही.जनार्दनाचा एका देवाचे भक्तावरील हे प्रेम पाहून आनंदाने कीर्तनरंगी नाचतो.

12

नामपाठे ज्ञानियाची भिंत ओढी। भाविकां तांतडी देव धांवे ।।1।।
बोलविला रेडा केलेसें कवित्व। नामपाठें मुक्त केलें जन ।।2।।
जनार्दनाचा एका लागतो चरणीं। जावें ओवाळोनी जन्मोजन्मीं ।।3।।

भावार्थ

ज्ञानदेव चांगदेवांना भेटायला भिंतीवर बसून जाण्याचे ठरवतात तेव्हां नामपाठाच्या प्रभावाने देव जड भिंतीत चैतन्य निर्माण करतात.भक्ताचे सत्व राखण्यासाठी रेड्याच्या तोंडून वेद वदवितात ,नामपाठाचा महिमा वाढवतात.जनार्दनाचा एका संतचरणी नतमस्तक होऊन जन्मोजन्मीं जीव ओवाळून टाकण्याची ईच्छा व्यक्त करतात.

13

नामपाठें मुक्त मुक्ताई पैं झाली। हृदयीं आटली नामपाठें ।।1।।
देहादेह सर्व निरसिले चारही । नामपाठ वरी मुक्त झाले।। 2।।
जनार्दनाचा एका बोले करूणावचनीं। नामपाठ झणीं विसरूं नका ।।3।।

भावार्थ

स्थुल, सुक्ष्म,कारण,महाकारण हे चारी देह निरसून मुक्ताई मुक्तीपदास पोचली.नामपाठाने परमात्म तत्वाशी एकरूप झाली. करूणभावाने हे सांगून जनार्दनाचा एका नामपाठाचा महिमा विसरूं नका अशी विनंती साधकांना करतात.

14

नामपाठें निवृत्ती पावला विश्रांती। नामपाठें शांति कर्माकर्मी ।।1।।
म्हणोनि प्रेमभावें नामपाठ गावें। आलिंगन द्यावें संतचरण ।।2।।
जनार्दनाचा एका चिंता नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपी जगा ।।3।।

भावार्थ

नामपाठ साधनेंत विहित कर्मे करीत असताना निवृत्ती नाथांना अपूर्व शांतीचा लाभ होत असे.या नामपाठानेच निवृत्ती विश्रांती पावला असे सांगून एका जनार्दनीं प्रेमभावें नामपाठ गायन करावे,संतसंगत करावी,नामपाठाचे सतत चिंतन करावे,नामपाठ हा मोक्षप्राप्तीचा सोपा मार्ग आहे असे जनार्दनाचा एका सांगतात.

15

नामपाठ मच्छिंद्र गोरक्षातें बोधी। तोडिली उपाधी चौदेहांची ।।1।।
नामपाठ मोक्ष मार्ग तो सर्वदा। वाचे गातां बाधा नोहे कांहीं ।।2।।
जनार्दनाचा एका द्वैतविरहित । नामपाठ गात सर्वभावें ।।3।।

भावार्थ

मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना नामपाठाची दीक्षा दिली आणि चौदेहाच्या बंधनातून मुक्त केले.नामपाठ हा सोपा मोक्षमार्ग असून वाचेने नाम साधना करतांना कोणतिही बाधा येत नाही.जनार्दनाचा एका अद्वैत भावाने सदासर्वदा नामसाधनेंत दंग होतात.

16

नामपाठें गोरक्ष वोळगला गहिनी । दाविली उन्मनीं सर्वकाळ ।।1।।
समाधी आसन सैरा ते बोल । नामपाठ मोल अभ्यासिलें।। 2।।
जनार्दनाचा एका नेणें तो उन्मनीं । सदा संतचरणीं मिठी घाली।। 3।।

भावार्थ

गोरक्षनाथांनी नामपाठाचा उपदेश गहिनीनाथांना केला.ध्यान मार्गाने अखंड साधना करून गहिनीनाथ समाधी अवस्थेपर्यंत पोचले,उन्मनीं अवस्थेचा अभ्यास केला.एका जनार्दनींनी उन्मनी अवस्थेचा अनुभव कधी घेतला नाही.ते सदोदित संतसंगतीत रममाण होत असत.

17

नामपाठें गहिनि निवृत्ती वोळला । उघड तो केला परब्रह्म ।।1।।
नामपाठ ब्रह्म नामपाठ ब्रह्म । आणिक नेणें वर्म नामेविण ।।2।।
जनार्दनाचा एका सेवेसी नटला। नामपाठें केला जनार्दन।। 3।।

भावार्थ

गहिनीनाथांनी नामपाठाचा महिमा निवृत्तीनाथांना उपदेशिला,परब्रह्माचे स्वरूप समजावून सांगितले.नामपाठ हेच पूर्णब्रह्म असून ते नामसाधनेने जाणतां येते.हरिनामाशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही.असे स्पष्ट करून जनार्दनाचा एका सद्गुरु जनार्दन स्वामींच्या सेवेंत निमग्न राहून नामपाठ साधनेंत दंग होतो.


नामपाठमार्ग -गीताज्ञानेश्वरीपाठ

1

नामपाठें गीता ज्ञानेश्वरी होय । स्मरे तूं निर्भय ज्ञानदेवी ।।1।।
नामपाठें सोपी अक्षरें ती उच्चार। ज्ञानेश्वरी उच्चार करी वाचे।। 2।।
जनार्दनाचा एका ज्ञानेश्वरी ध्याय। तेणें मुक्त होय युगायुगीं।। 3।।

भावार्थ

भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे नामपाठाचे मार्ग आहेत.ज्ञानेश्वरी वाचायला आणि समजण्यास सोपी असून ती ज्ञानदेवी या नावाने ओळखली जाते.नि:शंक,निर्भय होऊन ज्ञानेश्वरीचे वाचन आणि स्मरण करावे.असे सांगून जनार्दनाचा एका म्हणतात,ज्ञानेश्वरीचे नित्य पठण करणारे साधक संसार बंधनातून कायमचे मुक्त होतात.

2

नामपाठे वर्म वेदांचे तें कळे। नामपाठबळे शास्त्रबोध ।।1।।
या दोहीचे वर्म ज्ञानदेवी जाणा। जपें कां रे जना हृदयी सदा ।।2।।
जनार्दनाचा एका विनीत होउनी । आठवितो मनीं ज्ञानदेवा ।।3।।

भावार्थ

नामपाठाने वेदांचे रहस्य उलगडते आणि शास्त्रांचा बोध समजतो.वेद आणि शास्त्रे यांचे समग्र ज्ञान ज्ञानदेवी पठनाने जाणता येते.एका जनार्दनीं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हृदयांत धारण करावा असे अत्यंत विनयाने सुचवतात.

3

नामपाठें संदेह सर्व हा जाईल। नामपाठ गाईल प्रेमभावें ।।1।।
नामपाठ सोपा नामपाठ सोपा । अहर्निशीं बापा जप करी।। 2।।
जनार्दनाचा एका ठेउनी विश्वास। नामपाठ निजध्यास करीं सदा ।।3।।

भावार्थ

जो भक्त प्रेम भावाने नामपाठ गाईल त्याच्या मनातील सर्व संशय निरसून जातील.नामपाठ साधना अतिशय सोपी असून रात्रंदिवस तिचा जप करावा. एका जनार्दनीं या साधनेवर विश्वास ठेवून नामपाठाचा अखंड ध्यास घेतात.

4

नामपाठ साधन याहुनी आहे कोण। कासयासी पेणें स्वर्गवास ।।1।।
जन्म देई देवा जन्म देई देवा । गाईन मी देवा नामपाठ ।।2।।
जनार्दनाचा एका बोलतसे वाणी। नामपाठें जनीं जनार्दन ।।3।।

भावार्थ

नामपाठा पेक्षां श्रेष्ठ असे काहिही नाही.स्वर्ग मिळावा अशी अपेक्षा करणे निरर्थक आहे.त्यापेक्षा परत परत जन्म घेऊन नामपाठ साधना करण्याचे भाग्य देवाने आपल्याला द्यावे असे जनार्दनाचा एका देवाला विनवतात.

5

नामपाठ युक्ति भाविकां प्रतिती । लोभिया विरक्ती नामपाठे ।।1।।
नामपाठे योग नामपाठे याग । नामपाठे भोग सरे आधी।। 2।।
जनार्दनाचा एका भोगातीत झाला । म्हणोनि वोळला जनार्दन ।।3।।

भावार्थ

नामपाठ साधना मोक्षमुक्ती मिळवण्याची सोपी युक्ति आहे अशी भाविकांना प्रचिती येते तर ऐहिक लाभासाठी नामपाठ साधना करणार्यांना विरक्ति येते.योगयागाचे सर्व फल नामपाठ साधनेने मिळतातच शिवाय नामपाठाने संसारिक भोग सरतात.असे मत व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात, नामपाठाने जनार्दनाचा एका भोगातीत झाले म्हणुनच सद्गुरु जनार्दनस्वामींच्या कृपेस पात्र ठरले.

6

नामपाठें मोक्ष पाविजे तत्वतां । आणिक तें आतां साधन नाहीं ।।1।।
नामपाठ सार नामपाठ सार । न करी विचार आणिक दुजा ।।2।।
जनार्दनाचा एका नामपाठ गाय । आदरें नाचताहे संतापुढें ।।3।।

भावार्थ

नामपाठाने मोक्ष प्राप्ती होते या शिवाय आणखी साधन नाही.नामपाठ हे सर्व साधनांचे सार आहे. यापेक्षा वेगळा विचार करू नये असे स्वानुभवातून जनार्दनाचा एका स्पष्ट करतात.

7

नामपाठे युक्ती साधन समाप्ती । नोहे दुजी प्रीती नामपाठें ।।1।।
आणिक खटपट कासया बोभाट । नामपाठ वाट वैकुंठाची ।।2।।
जनार्दनाचा एका,नामपाठें रंगला। आनंदे वहिला नाचतसे ।।3।।

भावार्थ

नामपाठाची युक्ती साध्य झाली कीं, सर्व साधनांची समाप्ती होते. दुसरे काही मिळवण्याचे बाकी राहतच नाही. नामपाठ हाच वैकुंठ पदाचा मार्ग आहे.एका जनार्दनीं नामपाठांत रंगून आनंदाने संताच्या मेळाव्यांत नाचतात.

8

नामपाठ करितां आनंद मानसीं । योगयाग राशीं पायां लागे ।।1।।
आनंदें आवडी नामपाठ गाय । उभा तारिता बाह्य जना।। 2।।
जनार्दनाचा एका सांगे जगाप्रती । नामपाठें विश्रांती होईल जना ।।3।।

भावार्थ

नामपाठ करतांना मनाला आनंद होतो.योगयागाचे पुण्य अनायासे प्राप्त होते.मनापासून आनंदाने नामपाठ गाणारा भक्त अनेकांना तारून नेतात.जनार्दनाचा एका सांगतात, नामपाठाने जगातिल सर्वांना विश्रांतीचा लाभ होईल.

9

नामपाठ पसारा घे रे मुखें सदा । कळिकाळाची बाधा तुज नोहे ।। 1।।
नाम तें सोपें नाम तें सोपें । नाम तें सोपें विठ्ठलाचें ।।2।।
जनार्दनाचा एका नामपाठ वाणी। कीर्ति त्रिभुवनीं नामपाठें ।।3।।

भावार्थ

कळिकाळाची बाधा टाळायची असेल तर मुखाने सदासर्वदा नामपाठ गावा.विठ्ठलाचे नाम वाचेसी अतिशय सोपे आहे. जनार्दनाचा एका नामपाठाचा महिमा सतत सांगतात,नामपाठाची किर्ति त्रिभुवनांत गाजत आहे.

10

नामपाठ कसवटी अखंड ज्याचे मुखीं । तो चि झाला सुखीं इहीं जनीं ।
नामपाठ धन्य नामपाठ धन्य । नामपाठ धन्य कलीमाजीं ।।2।।
जनार्दनाचा एका नामपाठें मिरविला । श्रीरंग वरला नामपाठें ।।3।।

भावार्थ

नामपाठ हे कलियुगातील सहजसोपे, साधन आहे.अखंड नामपाठ गाणारा भक्त सर्वदा सुखी होतो. कलीयुगांत धन्य होतो.नामपाठ साधना करून जनार्दनाचा एका लोकादरास पात्र झाले.श्रीरंगाची कृपा प्राप्त झाली.

11

नामपाठें ज्ञान नामपाठें ध्यान। नामपाठें मन स्थिर होय ।।1।।
जगांत हें सार नामपाठ भक्ती। आणिक विश्रांती नाहीं नाहीं ।।2।।
जनार्दनाचा एका अखंड नाम गाय। हर्षे नाचताहे प्रेमे रंगीं ।।3।।

भावार्थ

नामपाठ साधना ही ज्ञानमार्ग आणि ध्यानमार्ग यांचा संगम आहे.नामपाठ भक्ती हे साधकांचे विश्रांती स्थान आहे.जनार्दनाचा एका अखंड नाम गातात आणि भक्ति प्रेमांत आनंदाने नाचतात.

12

नामपाठ नित्य एक नेमें गायें। हरिकृपा होय तयावरी ।।1।।
अंतरीं बाहेरी रक्षी नारायण ।आलिया विघ्न निवारी साचे।। 2।।
जनार्दनाचा एका प्रचित घेउनी ।गात असे वाणी नामपाठ।। 3।।

भावार्थ

नित्यनेमाने हरिपाठ गायन करणारा भक्त हरिकृपा प्राप्त करतो. प्रत्यक्ष नारायण या भक्ताचे अंतर्बाह्य रक्षण करतो.विघ्नांचे निवारण करतो.या सत्य वचनाची प्रचिती आल्यानें जनार्दन शिष्य एका आवडीने नामपाठ गातात.

13

नामपाठ गंगा नामपाठ गंगा। दोष जाती भंगा नामपाठें ।।1।।
नामपाठ सरिता सागर संगम । देवभक्त नाम तिन्ही बोध।। 2।।
जनार्दनाचा एका करितो मार्जन। त्रिवेणीचे स्नान पुण्य जोडे।। 3।।

भावार्थ

देहमनाच्या सगळ्या दोषांचे भंजन करणारी नामपाठ साधना म्हणजे गंगेचा पवित्र प्रवाह आहे. नामपाठ सरिता आणि सागर यांचा संगम आहे.असे वर्णन करुन जनार्दनाचा एका म्हणतात,देव, भक्त आणि नाम यांचा बोध देणार्या त्रिवेणी संगमांत स्नान करून पुण्य फल प्राप्त होते.

14

नामपाठ श्रेष्ठ तीर्थाचे तें तीर्थ। वदे तूं चिंतारहित सर्वकाळ।। 1।।
काळाचे तें काळ नामपाठ गात। काळ हा तयास नमस्कारी ।।2।।
जनार्दनाचा एका काळा वंदीं चरणी। म्हणोनि जनार्दनी विनटला ।।3।।

भावार्थ

नामपाठ हे सर्वश्रेष्ठ तीर्थाचे तीर्थ असून नामपाठाचा पाठ नि:शंक मनाने सतत करावा.काळावर ज्यांची सत्ता चालते ते शिवशंकर सदासर्वदा नामपाठ गातात.काळ त्यांना नमस्कार करतात.जनार्दनाचा एका काळाचे चरण वंदन करून सद्गुरूची कृपा प्राप्त करतात.

संत महिमा

1

उद्धवा स्वमुखें सांगे श्रीकृष्ण। संतसेवा जाण सर्वश्रेष्ठ ॥१॥
हाची योग जाण उद्ववा स्वीकारी । आणिक न करी भरोवरीसाधन उद्धवा ॥ २ ॥
योगयाग तप व्रत कसवटी । न करी आन गोष्टीरे उद्धवा॥ 3 ॥
कीर्तन भजन सर्वभावें करी । जाई संतद्वारीं शरणागत रे उद्धवा ॥ ४ ॥
मनींचें सांगितले तुज ।एका जनार्दनीं निज साधे रे उद्धवा ॥ ५ ॥

भावार्थ

या अभंगात श्रीकृष्ण उद्धवाला संतसेवेचा महिमा सर्वश्रेष्ठ आहे असे स्वमुखाने सांगत आहे.हाच खरा योग असून योगचाग तप व्रत ही साधने सोडून संतसेवेचा मार्ग धरून सर्वभावे कीर्तन व भजन करावे संतांना शरण जावे.राका जनार्दनीं म्हणतात' आपल्या मनीचे हितगुज सांगून ते उद्धवाला स्वता:चे हीत साधायला सांगतात.

2

उद्धवा तूं धर संतसमागम । तेणें भवश्रम हरे उद्धवा ॥ १ ॥
सांगतसे गुज मना धरीं रे उद्धवा । आणिक श्रम वाया न करी रे तें ॥ २ ॥
तयाची संगती उद्धवा धरावी । सेवा ते करावी काया वाचा ॥ 3 ॥
मज तयाचा वेध उद्धवा प्रसिद्ध । तूं सर्वभावें सद्गद नाम घेई ॥ ४ ॥
ज्याची आवडी मजसी उद्धवा । जाई तया ठावां ॥ ५ ॥
उच्च नीच कांहीं न म्हणें उद्धवा । एका जनार्दनी तया शरण जावें ॥ ६ ॥

भावार्थ

संतसमागमाने संसारातील श्रम नाहीसे होतात हे मनाचे हितगुज उद्धवाला सांगून श्रीकृष्ण त्याला काया वाचा मनाने संतांची सेवा करायला सांगतात.आणखी कोणत्याही प्रकारची साधना न करता लहान थोर असा भेदाभेद न करता सतांना सर्वभावे शरण जावे असे एका जनार्दनीं सांगतात.

3

उद्धव बोले कृष्णाप्रती । एकोनि संताची कीर्ति ।
धन्य वैष्णव होती । कलीमाजी ॥ १ ॥
तुम्हां जयाचा निज छंद । मानीतसा परमानंद ।
अखंड तयाचा वेध । तुमचे मनीं ॥ २ ॥
ऐशी याची संगती । मज घडो अहोराती ।
नये पुनरावृत्ती । पुन: जन्मासी ॥ 3 ॥
हर्षे देव सांगे आपण । उद्धवा तयाचें मज ध्यान ।
एका जनार्दनीं शरण । ते मज आवडती ॥ ४ ॥

भावार्थ

या अभगांत एका जनार्दनीं श्रीकृष्ण आणि उद्धवाचा संवाद कथन करीत आहे.ज्या संतांची किर्ती ऐकून कलीयुगांत वैष्णव धन्य होतात त्यांचा श्रीकृष्णाला नित्य वेध लागतो त्यांच्या छंदात मनाला परमानंद मिळतो.अशा संतांची संगती अहोरात्र मिळावी व त्यामुळे जन्ममरणाची पुनरावृत्ती कायमची टळावी असे उद्धव श्रीकृष्णाला सांगतो.यावर श्रीकृष्णाला अतिशय आनंद होतो.तो 3ध्दवाला सांगतो की, संत त्याला अतिशय आवडतात आणि त्यांचे सतत ध्यान लागते.

4

मज तयांची आवड । पुरवणें लागे त्याचें कोड ।
गर्भवास सांकड । तयालागी उद्धवा ॥ १ ॥
घेऊनि अवतार । करी दुष्टांच संहार ।
माझा हा बडिवार । तयांचेनि उद्धवा ॥ २ ॥
माझे जप तप अनुष्ठान । देव पूजा मंत्र पठण ।
नाना नेमादि साधन । संत माझे उद्धवा ॥ 3 ॥
मज आणिलें नामरूपा । त्याची मजवर कृपा ।
दाविला हो सोपा।मार्ग मज उद्धवा॥ ४ ॥
माझा योगयाग सर्व । संत माझे वैभव ।
वैकुंठादि राणीव । तयाचेनि मज उद्धवा ॥ ५ ॥
ऐसें वरिष्ठ पावन । पुनीत केलें मजलागून।
एका जनार्दनीं शरण । तयांसीच उद्धवा ॥ ६ ॥

भावार्थ

श्रीकृष्ण उद्धवास सांगतात, संतांचे सर्व ईच्छा पूर्ण करण्यासाठी परत परत जन्म ( अवतार) घ्यावे लागतात.असे अवतार घेऊन दुष्टांचा संहार करण्याचे महान कार्य संता मुळेच घडून येते.सामान्य लोक जे जप,तप,अनुष्ठान देव पूजा,मंत्र पठण,अनेक व्रते,नेम ,साधना करतात ते सर्व संता मुळेच घडून येते.संतामुळेच देव नामरूपाला येतात. त्यांचे वैभव वाढते.वैकुंठाचे राजपद संतामुळेच उदयास आले.संत हे सर्वात वरिष्ठ असून त्यांच्या मुळेच देव पावन झाले.असे कथन करून एका जनार्दनी संताना शरण जातात.


ज्या सुखाकारणे देव वेडावला । वैकुंठ सांडुनी संतसदनीं राहिला ॥ १ ॥
धन्य धन्य संतांचे सदन । जेथें लक्ष्मीसाहित शोभे नारायण ॥ २ ॥
सर्व सुखाची सुखराशी । संतचरणीं भुक्ति मुक्ति दासी ॥ ३ ॥
एका जनार्दनीं पार नाही सुरवा म्हणोनि देव भुलले देखा ॥ ४ ॥

भावार्थ

ज्या संतसुखाने श्री हरी वेडावला आणि वैकुंठाचे वैभव सोडून संतांच्या घरीं येऊन राहिला.जेथे लक्ष्मीसहित नारायण येऊन राहतो ते संताचे सदन धन्य होय.संताच्या चरणांशी भक्ति आणि मुक्ति दासी बनून राहतात.येथे सर्व सुखांच्या राशी असून हे सुख अपार आहे.एका जनार्दनीं म्हणतात, या सुखाला देव भुलले.


संतापोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे ॥ १ ॥
ऐसा परस्परें मेळा । देव संतांचा अंकिला ॥ २ ॥
संताठायीं परंतू परं तदेव तिष्ठे । देव तेथें संत वसे ॥ २ ॥
एका जनार्दनीं संत । देव तयांचा अंकित ॥ ४ ॥

भावार्थ

संतांच्या अंतरांत देव आणि देवाच्या अंतरांत संत निवास करतात. संत जेथें असतील तेथे देव तिष्ठत उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात,देव संतांच्या अंकित आहे.


संत आधीं देव मग । हाचि उगम आणा मना ॥१॥
देव निर्गृण संत सगुण । म्हणोनि महिमान देवासी ॥ २ ॥
नाम रूप अचिंत्य जाण । संतीं सगुण वर्णिलें ॥3 ॥
मुळीं अलक्ष लक्षा नये । संतीं सोय दाविली ॥ ४ ॥
एका जनार्दनीं संत थोर । देव निर्धार धाकुला ॥ ५ ॥

भावार्थ

देव निर्गृण असून संत सगुण ( सत्व,रजो,तम ) या गुणांनी युक्त्त आहेत. तर देव या गुणांच्या अतित आहे.म्हणुन देवाचा महिमा श्रेष्ठ आहे. परंतु देवाच्या नामरूपाचे चिंतन करणे भक्तांना शक्य नव्हते .जो अव्यक्त आहे त्याला दृष्टीने बघणे अशक्य होते. संतांनी या निर्गुणाचे सगुण साकार रूपात वर्णन केले.एका जनार्दनी म्हणतात, संत देवापेक्षां थोर आहेत,कारण संतांनी देवाला देवपण दिले. यासाठी संत थोर आहेत हे जाणले पाहिजे.


संतांचा महिमा देवचि जाणें । देवाची गोडी संतांसी पुसणें ॥ १ ॥
ऐसी आवडी एकमेकां । परस्परें नोहे सुटिका ॥ २ ॥
बहुत रंग उदक एक । यापरी देव संत दोन्ही देख ॥ 3 ॥
संताविण देवा न कंठे घडी । उभयतां गोडी एक असे ॥ ४ ॥
मागें पुढें नसे कोणी । शरण एका जनार्दनीं ॥ ५ ॥

भावार्थ

संताचा महिमा देवच जाणतो, देवाच्या रूपाची सुंदरता आणि गुणांची मधुरता संतांनीच वर्णन करावी. ज्याप्रमाणे मातीच्या रंगाप्रमाणे पाण्याचे रंग वेगवेगळे दिसतात,त्यांप्रमाणे संत आणि देव भिन्न दिसत असले तरी ते एकरूपच असतात. संताशिवाय देवाला घटकाभर देखील चैन पडत नाही.देव आणि संत सदैव समीप असतात. उभयता एकात्म वृतीने वावरतात.असे सांगून एका जनार्दनीं देव आणि संताच्या चरणी शरणागत होतास.


देवाचे सोईरे संत जाणावें यापरतें जीवें नाठवी कोणा॥ १ ॥
पडतां संकट आठवितसे संत । त्याहुनी वारिता नाही दुजा ॥ २ ॥
म्हणोनि घरटी फिरे तया गांवीं । सुदर्शनादि मिरवी आयुधे हातीं ॥ 3॥
लाडिके डिंगर वैष्णव ते साचे । एका जनार्दनीं त्यांचे वंदी पाय ॥ ४ ॥

भावार्थ

संत हे देवाचे जीवाभावाचे सोईरे असून संताईनकी दुसऱ्या कुणाचिही आठवण देवाला येत नाही. संताच्या रक्षणासाठी देव सुदर्शन चक्रासारखी आयुधे हाती धरून त्यांच्या गावीं फिरतो.संत वैष्णवांप्रमाणेच देवाला अत्यंत प्रिय आहेत.एका जनार्दनीं संताच्या चरणांना वंदन करतात.

१०

पंढरीये देव आला । संतभारें तो वेष्टिला ॥ १ ॥
गुळासवें गोडी जैसी । देवासंगें दाटी तैसी ॥ २ ॥
झालें दोघां एकचित्त । म्हणोनि उभाचि तिष्ठत ॥ 3 ॥
एका जनार्दनीं भाव । संतापायी ठेविला जीव ॥ ४॥

भावार्थ

देव पंढरीला आला आणि गुळाला जसा गोडवा वेढून टाकतो तसा देवाला संतांनी वेढून टाकले.संत आणि देव दोघे मनाने एकरूप झाले. देव भक्तासाठी अठ्ठाविस युगे तिष्ठत उभा राहिला.अशा संत चरणांशी एका जनार्दनीं आपला जीवभाव अर्पण करतात.

११

पुंडलीक संत भला । तेणें उद्धार जगाचा केला ॥ १ ॥
तयाचे वंदावें चरण । कायावाचामने करून ॥ २ ॥
उपाधिसंग तुटती व्याधी । एका जनार्दनी समाधी ॥ 3 ॥

भावार्थ

भक्तश्रेष्ठ पुंडलिका मुळे श्रीहरी अठ्ठाविस युगे विटेवर उभा राहिला. त्याने जगाचा उद्वार केला.काया वाचा मनाने एकरूप होऊन संत पुंडलिकाच्या चरणांना वंदन करावे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या परमात्म परमेश्वराच्या दर्शनानें संसारातिल सर्व व्याधी निरसून जातात, मन शांत होऊन समाधी लाभते.

१२

उघड बोलती संत । जैसा हेत पुरविती ॥ १ ॥
मनीचें जाणती ते सदा । होऊं नेदी विषयबाधा ॥ २ ॥
अज्ञान सज्ञान । तारिती कृपें करून ॥ ३ ॥
संतांपायी ज्याचा भाव । तेथें प्रगटेचि देव ॥ ४ ॥
एका जनार्दनीं बरा । द्यावा मज तेथें थारा ॥ ५ ॥

भावार्थ

संत भाविकांच्या मनातिल सर्व भाव जाणून सर्व कामना पूर्ण करतात. भाविकांच्या मनाला इंद्रिय विषयांची बाधा होऊ देत नाहीत.अज्ञान व सज्ञान दोन्हीवर सारखीच कृपा करतात. संताच्या ठिकाणी ज्यांची श्रद्धा असते तेथें प्रत्यक्ष परमेश्वर प्रकट होतो.एका जनार्दनीं संतांनी त्यांच्या पायीं आसरा द्यावा अशी विनंती करतात.

१३

संत कृपाळु उदार । ब्रहमादिका न कळे पार ॥ १ ॥
काय वानूं मी पामर । थकले सहा अठरा चार ॥ २ ॥
नेति नेति शब्दें । श्रृती विरालिये आनंदे ॥ 3 ॥
एका जनार्दनीं शरण । धरा माझी आठवण ॥ ४ ॥

भावार्थ

संत अतिशय उदार व कृपाळु असतात. ब्रह्मा,विष्णु ,महेश या देवाधिदेवांना देखील संतांचा महिमा यथार्थपणे वर्णन करता येत नाही साही शास्त्रे,अठरा पुराणे आणि चारी वेद सुद्धां संतमहिमा गातांना थकून गेले.व्यतिरेकाने नेति नेति या शब्दांनी संताचे वर्णन करतांना श्रृती निःशब्द होऊन स्तब्ध झाल्या. एका जनार्दनीं संतांना शरण जावून त्यांनी आपली आठवण धरावी अशी विनंती करतात.

१४

संतचरणींचा महिमा। कांहीं न कळे आगमां निगमां ॥ १ ॥
ब्रह्मा घाली लोटांगण । विष्णु वंदितो आपण ॥ २ ॥
शिव ध्यातो पायवणी । धन्य धन्य संतजनीं ॥ 3 ॥
तया संतांचा सांगात । एका जनार्दनीं निवांत ॥ ४ ॥

भावार्थ

संतांच्या चरणांचा महिमा वेदशास्त्रांना पूर्णवणें आकलन होत नाही, ब्रह्मदेव संतपायी लोटांगण घालतात तर विष्णु त्यांना आदराने वंदन करतात. शिवशंकर संतचरणाचे सतत ध्यान करतात.या लोकांत संत धन्य असून त्यांच्या सहवासांत एका जनार्दनीं शांतपणे निवास करतात.

१५

पहातां संतसमुदाय । भुक्ति मुक्ति तेथें देव ॥ १ ॥
जातां लोटांगणीं भावें । ब्रह्मज्ञान अंगी पावें ॥ २ ॥
तयाचे उच्छिष्टाचा कण । शरण एका जनार्दन ॥ 3 ॥

भावार्थ

संत समुदायाचे दर्शन होतांच भक्ति आणि मुक्ति तेथें धाव घेतात. देव तेथे तात्काळ प्रगट होतात आणि भक्ति भावाने लोटांगण घालतात. त्यामुळे ब्रह्मज्ञान प्राप्त होते असे सांगून एका जनार्दनी संतांच्या उष्ट्या अन्नाच्या एका कणासाठी त्यांना शरण जातात.

१६

सुख अपार संतसंगी । दुजे अंगीं न दिसे कोठे ॥ १ ॥
बहु सुख बहुता परी । येथेंची सरी नसची ॥ २ ॥
स्त्रिया पुत्र धन सुख । नाशिवंत देख शेवटीं ॥ 3 ॥
एका जनार्दनीं संतसुखा । नोहे लेखा ब्रह्मांडीं ॥ ४ ॥

भावार्थ

संत संगतीत जे अपार सुख असते तसे सुख दुसरीकडे कोठेही दिसणार नाही.अनेक प्रकारचे भरपूर सुख संत सहवासांत मिळते त्याची सर ईतर कोणत्याही सुरवाला येत नाही.स्त्रिया,पुत्र तसेच धनसंपदे पासून मिळणारे सुख नाशवंत असते.एका जनार्दनीं म्हणतात,संतसुखाची तुलना ब्रह्मांडातील कोणत्याही सुरवाशी होऊं शकत नाही.

१७

अमृता उणें आणिता संतजन । नाम अमृत खूण पाजिताती ॥ १ ॥
नाशिवंत यासी अमृत उपकार । अनाशिवंता नामामृतसार ॥ २ ॥
नाशिवंत देह नाशिवंत जीव । नाशिवंत ठाव जगडंबर ॥ 3 ॥
एका जनार्दनीं संतांचिये दृष्टी । नाशिवंत सृष्टि सजीव होती ॥ ४ ॥

भावार्थ

संतकृपेने जे नामामृत प्राप्त होते त्या पुढे अमृताला देखील उणेपणा येतो. मानवी जीव आणि मानवी देह दोन्हीं नाशवंत आहेत.डोळ्यांना दिसणारा हा जगाचा पसारा सुद्धां नाशवंतच आहे. संतांनी दिलेले नामामृतसार मात्र अविनाशी आहे. संतमहिमा अशाप्रकारे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात,संतांच्या कृपा दृष्टीने सारी नाशवंत सृष्टी सजीव होते.

१८

संत ते सोयरे जिवलग सांगाती । भेटतां पुरती सर्व काम ॥ ४ ॥
कामधेनु कल्पतरू चिंतामणी । उदार चुडामणी याहुनी संत ॥ २ ॥
देऊ परिसाची यांसी उपमा । परी ते नये समा संताचिये ॥ 3 ॥
एका जनार्दनीं संतांचा सांगात । पुरती सर्व आर्त जीवीचे जें ॥ ४ ॥

भावार्थ

संत हे भाविकाचे प्रेमळ सोबती जिवलग सोयरे आहेत.ते सर्व कामना पूर्ण करणारे कलपतरू, चिंतामणी अथवा कामधेनु प्रमाणे उदार आहेत.संतांना परिसाची उपमा दिली तरी ती पूर्णपणे यथार्थ नाही. परीस केवळ लोखंडाचे सोने करतो पण संत कोणताही भेदभाव न करता सर्वांच्या मनीचे आर्त (अंतरीक ईच्छा )पूर्ण करतात.

१९

भाग्यवंत होती संत । दीन पतीत तारिती ॥१॥
उपदेश विठ्ठल मंत्र । देती सर्वत्र सारिखा ॥ २ ॥
स्त्रिया शुद्र अथवा बाळें । कृपाकल्लोळे एकची ॥ 3 ॥
एका जनार्दनीं शरण । पतितपावन संत होती ॥ ४ ॥

भावार्थ<brr>

दीन आणि पतितांना तारणारे संत भाग्यवंत असून ते पतीतपावन या नावाने ओळखले जातात.संत सर्वांना समभावाने मानून विठठल मंत्राचा उपदेश देतात. स्त्रिया शुद्र अथवा अज्ञानी बालके यांच्यावर सारखीच कृपा करतात.अशा कृपाळु, उदार, संतांना एका जनादनीं शरण जातात.

२०

संतांचे संगती । पाप नुरे तें कल्पांती ॥ १ ॥
ऐसा संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥ २ ॥
तीर्थ व्रत जप दान ।अवघें टाका वोवाळून ॥ 3 ॥
शरण एका जनार्दनीं । काया कुर्वंडी संतचरणी ॥ ४ ॥

भावार्थ

संतांच्या संगतीत पापाचा लवलेश राहात नाही. तीर्थ,व्रत,जप ,दान ही सारी पुण्यकर्मे संत सहवासाच्या तुलनेत नगण्य आहेत.संत कृपेला उपमा नाही.असे स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात, संतांना शरण जाऊन त्यांच्यावरून देह ओवाळून टाकावा.

२१

संतचरणीचे रज;कण । तेणें तिन्हीं देव पावन ॥ १ ॥
ऐसा महिमा ज्याची थोरी । वेद गर्जे परोपरी ॥ २ ॥
शास्त्रे पुराणें सांगत । दरुशनें प्राणी होती मुक्त ॥ 3 ॥
शरण एका जनार्दनीं । ठाव द्यावा संतचरणीं ॥ ४ ॥

भावार्थ

संतचरणांच्या धुळीकणाने सर्व देव पावन होतात अशी संताथी थोरवी आहे असे चारी वेद परतपरत गर्जून सांगतात. संताच्या दर्शनाने प्राणी मुक्त होतात असे शास्त्रे व पुराणे मुक्त कंठाने वर्णन करतात.अशा थोर संतांनी त्यांच्या चरणांशी आपल्याला स्थान द्यावे अशी एका जनार्दनीं विनवणी करतात.

२२

संतवरणी आलिंगन । ब्रहमज्ञानी होती पावन ॥ १ ॥
इतर सहज उद्धरती । वाचे गातां ज्याची कीर्ती ॥ २ ॥
लाभे लाभ संतचरणीं । मोक्षसुख वंदी पायवणी ॥ 3 ॥
शरण एका जनार्दनीं । संत पावन इये जनीं ॥ ४ ॥

भावार्थ

संतचरणांना आलिगन देतांच ब्रह्म जाणणारे पावन होतात.मुखाने संतांची कीर्ती गाणाऱ्या भक्तांना संत सहवासाचा लाभ होतो.असे भक्त मोक्षसुखाचे भागीदार होतात.अशा पावन संतांना एका जनार्दनीं शरण जातात.

२३

संतांचे चरण ध्यातां । हारपली जन्मव्यथा ॥ १ ॥
पुढती मरणांचे पेणें । चुकती जन्मजरा तेणें ॥ २॥
संतसमुदाय दृष्टी । पड़तां लाभ होय कोटी ॥ 3 ॥
शरण एका जनार्दनीं । काया कुर्वंडी संतचरणीं ॥ ४ ॥

भावार्थ

संतचरणांचे ध्यान केल्याने जन्म काळीच्या व्यथा हरपून जातात.जन्ममरणाचे फेरे चुकतात.वार्धक्यातिल कष्टांचे निवारण होते.संतसमुदायाचे दर्शन होतांच अनंत कोटी पुण्यफल प्राप्त होते. एका जनादेनी संतांना शरण जाऊन संतचरणी देह अर्पण करावा अशी इच्छा व्यक्त करतात.

२४

तुटर्ती बंधनें संतांच्या दरुशनें । केलें तें पावन जगीं बहु ॥ १ ॥
महा पापराशी तारिलें अपार । न कळें त्यांचा पार वेदशास्त्रां ॥ २॥
वाल्मिकादि दोषी तारिलें अनुग्रही ।पाप तेथें नाही संत जेथें ॥ 3 ॥
पापताप दैन्य गेलें देशांतरी । एका जनार्दनीं निर्धारी सत्य सत्य ॥ ४ ॥

भावार्थ

संतांच्या दर्शनाने महा पापांच्या राशी जळून जातात,संसाराची सारी बंधने तुटून पडतात.अनेकांचा उद्वार होतो.वेदशास्त्रांना सुद्धां त्याची गणना करता येत नाही. नारदमुनी सारख्या महान संतानी वाल्मिकींवर अनुग्रह करून त्यांचा उद्धार केला.एका जनार्दनीं निर्धाराने हे त्रिवार सत्य सांगतात कीं,जेथें संताची वस्ती असते तेथें पापताप,दैन्य,दुःख यांचा लवलेशही नसतो.

२५

पतितपावन केलें असें संती । पुराणी ती ख्याती वर्णियेली ॥ १ ॥
सदोषी अदोषी तारिलें अपार । हाचि बाडिवार धन्य जगीं ॥ २ ॥
नाना वर्ण याती उत्तम चांडाळ । उद्धरिले सकळ नाममात्रें ॥ 3 ॥
एका जनार्दनीं दयेचे सागर । संतकृपा धीर समुद्र ते ॥ ४ ॥

भावार्थ

सदोष आणि निर्दोष अशा उभय प्रकारच्या सामान्य जनांना सन्मार्गाला लावून परमेश्वर भक्ती करण्यास प्रवृत्त करणे हाच संतांचा महिमा आहे.देवाचा नाममंत्र देवून चारी वर्णाच्या तसेच उत्तम तसेच नीच जातीच्या लोकांचा उद्धार संतांनी केवळ नामभक्तीने केला.एका जनार्दनीं म्हणतात,संत धीरगंभीर समुद्राप्रमाणे दयेथे सागर आहेत.

२६

उदारपणे संत भले । पापी उध्दरिले तात्काळ ॥१॥
ऐसें भावें येतां शरण । देणे पेणें वैकुंठ ॥ २ ॥
ऐसें उदार त्रिभुवनीं । संतांवांचुनी कोण दुजें ॥ 3 ॥
एका जनार्दनीं शरण । संत पतीतपावन ॥ ४ ॥

भावार्थ

जे महापापी,दुष्ट प्रवृतीचे असुनही जीवेभावें संतांना शरण जातात त्यांचा संत उदारपणे तात्काळ उध्दार करतात.त्यांना वैकुंठ प्राप्तीचा भक्तीमार्ग दाखवतात. त्रिभुवनांत संतासारखे उदार दुसरे कोणिही नाही.या पतीत पावन संतांना एका जनार्दनीं शरण जातात.

२७

मेघापरीस उदार संत । मनोगत पुरविती ॥१॥
आलिया शरण मनें वाचा । चालविती त्याचा भार सर्व ॥ २ ॥
लिगाड उपाधी तोडिती । सरते करिती आपणामाजीं ॥ 3 ॥
काळाचा तो चुकवितो घाव। येउं न देती ठाव अंगासी ॥ ४ ॥
शरण एका जनार्दनीं । तारिले जनीं मूढ सर्व ॥ ५ ॥

भावार्थ

मनाने आणि वाचेने शरण आलेल्या भाविकाच्या सर्व मनोकामना मेघाप्रमाणे उदार असलेले संत पूर्ण करतात.त्याचा योगक्षेम संत स्वताः चालवतात.त्या भाविकाला सर्व उपाधी व संकटे यातून सोडवतात.त्याला अपलासा करून त्याच्या वरील काळाचे घाव चुकवितात.सर्व अज्ञानी जनांना सन्मार्गाला लावून त्यांचा उद्धार करतात.अशा कृपाळु संतांना एका जनादनीं शरण जातात.

२८

भाविक हे संत कृपेचे सागर । उतरती पार भवनदी ॥ १ ॥
तयांचियां नामें तरताती दोषी । नासती त्या राशी पातकांच्या ॥ २ ॥
दयेंचे भांडार शांतीचें घर । एका जनार्दनीं माहेर भाविकांचे ॥ 3 ॥

भावार्थ

भावाचे भुकेले संत कृपेचे सागर असून संसार सरीता तरून जाण्यास मदत करणारे नावाडी आहेत.त्यांनी दिलेल्या नामाने पातकांच्या राशी नाश पावतात. हे संतजन दयारूपी धनाचे भांडार असून शांतीचे निवासस्थान आहेत एका जनार्दनीं म्हणतात, असे प्रेमळ संत भाविकांसाठी माहेर घरच आहे.

२९

जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची ॥१॥
उपदेश धरिता पोटीं । दैन्यें दाही वाटी पळताती ॥ २ ॥
खंडे फेरा चोऱ्यांऐशी । धरितां जीवेंशी पाऊलें ॥ 3 ॥
शरण एका जनार्दनीं । ते दिनमणी प्रत्यक्ष ॥ ४ ॥

भावार्थ

संतसमागम घडताच जन्म,जरा ( वार्धक्य) आणि कर्माची बंधने तुटतात.संतांचा उपदेश ऐकून त्यांप्रमाणे आचरण केल्यास मनाची आणि धनाची दैन्यें दाही दिशांनी पळतात.चौऱ्यांशी लक्ष योनीतून फिरणारे जन्म मरणाचे फेरे चुकतात.संत हे जीवन प्रकाशित करणारे दिनमणीच आहेत,त्यांचे चरणांना जीवेभावे शरण जावे असे एका जनार्दनी या अभंगात सुचवतात.

३०

सुखदुःखांचिया कोडी । संतदरुशनें तोडी बेडी ॥ १ ॥
थोर मायेचा मायेचा खटाटोप । संसदरुशनें नुरें ताप ॥ २ ॥
चार देहांची पैं वार्ता । संतदरुशनें तुटे तत्वतां ॥ 3 ॥
एका जनार्दनों संत । सबाह्य अभ्यंतर देहातीत ॥ ४ ॥

भावार्थ

संत दर्शनाने सुखदुःखाची बेडी तुटून जाऊन भौतिक,आध्यात्मिक आधिभौतिक ताप विलयास जातात.स्थूल,सुक्ष्म,कारण,महाकारण या चारी देहापासून जिवात्म्याची सुटका होऊन तो देहातीत होतो.एका जनार्दनी म्हणतात,संत विश्वाला आंतून बाहेरून व्यापून असुनही देहातीत असतात.

३१

वैकुंठाचे वैभव । संतापायीं वसे सर्व ॥१॥
संत उदार उदार । देतो मोक्षाचे भांडार ॥२॥
अनन्य भावें धरा चाड । मग सुरवाड सुख पुढें॥ 3 ॥
एका जनार्दनीं ठाव । नोहे भाव पालट ॥ ४ ॥

भावार्थ

वैकुंठाचे सारे वैभव संतचरणांशी वसत असते.मोक्षाचे भांडार उघडून देणारे संत अत्यंत उदार मनाचे असून मनापासून संत संगतीची ईच्छा धरावी. त्यांमुळे सुखाच्या राशी पुढे उभ्या राहतील.एका जनार्दनीं म्हणतास,या वचनावर दृढ विश्वास ठेवावा.मनाचा भाव पालटू देऊं नये.

३२

मोक्ष मुक्तीचे ठेवणें । देती पेणें संत ते ॥ १॥
नाहीं सायासाचे कोड । न लगे अवघड साधन ॥ २ ॥
नको वनवनांतरी जाणें । संतदरुशनें लाभ होतां ॥ 3 ॥
एका जनार्दनी शरण । संतसमान देवाच्या ॥ ४ ॥

भावार्थ

संत मोक्ष मुक्तीचे वरदान देतात, त्यासाठी साधकाला कोणत्याही अवघड साधनेचे सायास करावें लागत नाही.संन्यास घेऊन अरण्यांत जाऊन तप करावे लागत नाही.संत हे देवांसमान असून त्यांच्या केवळ दर्शनाने साधकांना लाभ होतो.एका जनार्दनी यासाठीं संतांना शरण जावें असे सुचवतात.

३३

संतांचे चरणतीर्थ घेतां अनुदिनीं । पातकांची धुणी सहज होय ॥१ ॥
संतांचे उच्छिष्ट प्रसाद लाभतां । ब्रह्मज्ञान हातां सहज होय ॥ २ ॥
संतांच्या दरुशनें साधती साधने ।तुटती बंधनें सहज तेथें ॥ 3 ॥
एका जनार्दनीं संत कृपादृष्टी । पाहतां सुलभ दृष्टी सहज होय ॥ ४ ॥

भावार्थ

संतांच्या चरणांचे तीर्थ रोज घेतल्याने सर्व पापे सहज धुतली जातात.संतांनी उष्टावलेला प्रसाद मिळाल्यास ब्रह्म ज्ञानाची सहज प्राप्ती होते.संतांच्या दर्शनाने साधनेत सफलता मिळते.संसारातिल कामक्रोधाची बंधने सहज तुटून जातात.एका जनार्दनीं म्हणतात,संतांनी कृपा केल्यास समदृष्टी लाभणे सुलभ होते.

३४

देवतांचे अंगीं असतां विपरीत । परी संतकृपा त्वरित करिती जगीं ॥१ ॥
जैसी भक्ति देखती तैसे ते पावती ।परी संतांची गती विचित्रची ॥ २ ॥
वादक निंदक भेदक न पाहाती । एकरूप चिंती मन ज्याचें ॥ 3 ॥
भक्ति केल्या देव तुष्टे सर्वकाळ । न करितां खळ म्हणवी येर ॥ ४ ॥
संताचे तों ठायीं ही भावना नाहीं । एका जनार्दनीं पायीं विनटला ॥ ५ ॥

भावार्थ

जशी ज्याची भक्ति त्याप्रमाणे देव भक्तांवर कृपा करतात.देवतांची करणी कांहीं वेळा विपरीत वाटते.परंतू संत मात्र वादविवाद करणारे वादक,निंदा करणारे निंदक किंवा भेदाभेद करणारे भेदक अशी वर्गवारी न करता शरणागतावर तात्काळ कृपा करतात.सतत भक्ति करणाऱ्या भक्तांवर देव प्रसन्न असतात पण भक्ति न करणाऱ्याला दुष्ट ठरवतात.संतांच्या मनात असा दुजाभाव नाही.या कारणाने एका जनार्दनीं संतचरणीं सदैव नतमस्तक होतात.

३५

भवरोगियासी उपाय । धरावें तें संतपाय ॥ १ ॥
तेणें तुटे जन्मजराकंद । वायां छंद मना नये ॥ २ ॥
उपासना जे जे मार्ग । दाविती अव्यंग भाविकां ॥3 ॥
निवटोनी कामक्रोध । देती बोध नाममुद्रा ॥ ४ ॥
शरण एका जनार्दनीं धन्य धन्य संतजनीं ॥ ५ ॥

भावार्थ

संसार तापाने जे लोक ग्रासले आहेत त्यांनी संतांचे चरण धरावे. यापेक्षा वेगळ्या उपायांचा विचार करू नये. संत उपासनेचे जे जे मार्ग भाविकांना दाखवतात, त्यामुळे मनातिल कामक्रोधाचा निरास होतो.लोकांना उपदेश करून परमेश्वराच्या नामजपाचा सोपा मार्ग दाखवतात ते संत धन्य होत असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

३6

धन्य तेचि संत भक्त भागवत । हृदयीं अनंत नित्य ज्यांच्या ॥ १ ॥
धन्य त्यांची भक्ति धन्य त्यांचे ज्ञान ।चित्त समाधान सर्वकाळ॥ २ ॥
धन्य तें वैराग्य धन्य उपासना । जयाची वासना पांडुरंगीं ॥3॥
एका जनार्दनीं धन्य तेचि संत । नित्य ज्यांचे आर्त नारायणीं ॥ ४ ॥

भावार्थ

ज्यांच्या अंतरंगी नित्य अनादी अनंत परमात्मा वसत असतो ते संत धन्य होत.ते च भागवत धर्माचे भक्त समजावेत.या संतांची ज्ञान व भक्ति सर्वश्रेष्ठ असून त्यांचे मन सदैव समाधानी असते.त्यांची उपासना व वैराग्य असामान्य मानावें.त्यांची वासना पांडुरंगी रंगलेली असते.एका जनार्दनी म्हणतात,ज्याच्या मनोकामना सतत नारायण चरणाशी दृढ असतात ते संत धन्य होत.

३7

परलोकींचे सखे । संत जाणावे ते देखे ॥ १ ॥
तोडिती दरुशनें बंधन । करिती खंडन कर्माचें ॥ २ ॥
उत्तम जें नामामृत । पाजिती त्वरित मुखामाजी ॥ 3 ॥
एका जनार्दनीं संतपाय । निरंतर हृदयीं ध्याय ॥ ४ ॥

भावार्थ

संसाराची बंधने संतदर्शनाने तुटून जातात.कर्माचे खंडन होते.परमेश्वर नामाचे अमृत त्वरेने मुखीं घालून त्याची गोडी लावतात.असे कृपाळु संत परलोकींचे सखे आहेत असे भाविकांनी जाणावे.त्यांच्या चरणांचे हृदयांत ध्यान करावे असे एका जनार्दनीं या अभंगांत सुचवतात.

३८

आदि अंत नाहीं जयाचे रूपासी । तोचि संतांपाशी तिष्टतसे ॥ १ ॥
गातां गीतीं सावडें भावें तें कीर्तन । तेथें नारायण नाचतसे ॥ २ ॥
योगियांची ध्यानें कुर्ठित राहिलीं । संतनामामृतवल्ली गोड वाटे ॥ ३ ॥
एका जनार्दनीं संतसेवा जाण । घडती कोटी यज्ञ स्मरणमात्रे ॥ ४ ॥

भावार्थ

जो परमात्मा अनादी अनंत आहे तो संतासाठी तिष्टत उभा राहतो.संत जेथे आवडीने भक्तीगीते गातात त्या ठिकाणी नारायण आनंदाने नाचत असतो.संतांच्या मुखातून आलेले नामामृत देवाला गोड वाटते.राका जनादिनीं म्हणतात, संतसेवेने लाभणारे पुण्य कोटी यज्ञ केल्याने मिळणाऱ्या पुण्याच्या समान आहे.

३९

संता निंदीं जो पामर । तो दुराचार जन्मोजन्मीं ॥ १ ॥
त्यांसी करितां संभाषण । करावें सचैल तें स्नान ॥ २ ॥
तयांसी येऊं न द्यावें घरां । आपण जाऊं नये द्वारा ॥ 3 ॥
एका जनार्दनीं शरण । त्याचें न पहावें वदन ॥ ४ ॥

भावार्थ

जो संतांची निंदा करतो तो पापी मनुष्य दुराचारी समजावा.त्याच्या बरोबर संभाषण केल्याने जे पाप लागते त्याचे परिमार्जन करण्यासाठीं डोक्यावरून स्नान करावे.आपण अशा पापी माणसाच्या घरीं जाऊं नये आणि त्याला आपल्या घरीं बोलावू नये.त्याथी संगती टाळावी.असे एका जनार्दनीं या अभंगांत परखडपणे निवेदन करतात.

४०

जया संतचरणीं नाहीं विश्वास । धिक् त्यास वास यमपुरीं ॥ १ ॥
संतचरणीं मन ठेवा रे निश्चळ । करुणा उतावेळ भाका त्यासी ॥ २ ॥
घाला लोटांगण वंदू पांचरण । तेणें समाधान होईल मना ॥ 3 ॥
एका जनार्दनीं सत्संगावाचुनी । तरला तो कोण्ही मज सांगा ॥ ४ ॥

भावार्थ

संत वचनावर ज्याचा विश्वास नाही त्याचा धिक्कार असो संतचरणी अढळ विश्वास ठेवावा.संतांनी कृपा करावी यासाठी त्यांची आर्ततेने विनवणी करावी.संतांच्या चरणीं लोटांगण घालून त्यांच्या चरणांना वंदन करावे.त्यामुळे मनाला समाधान वाटेल.एका जनार्दनीं म्हणतात,संत संगतीशिवाय कोणीही हा संसार सागर तरून जाऊ शकत नाही.

४१

नांदतसें नाम आकाश पाताळीं । सर्व भूमंडळीं व्याप्त असे ॥ १ ॥
पाताळ भेदोनी व्याप्त ठेलें पुढें। नाहीं त्यासी आड कोठें कांहीं ॥ २ ॥
चोऱ्यांयशी भोगिती दुर्मती पामर । संतांसी साचार शरण न जाती ॥ 3 ॥
एका जनार्दनीं नाम अविनाश । संतसंगें दोष सर्व जाती ॥ ४ ॥

भावार्थ

या अभंगांत एका जनार्दनीं नाममहिमा वर्णन करीत आहेत.आकाश, पाताळ आणि सर्व पृथ्वीवर हरीनाम निनादत आहे.परमेश्वराच्या नामाला कोठेही आडकाठीं नाही.हे संतांचे वचन असून संतांना शरण न जाणारे अज्ञानी लोक जन्म मरणाचे फेरे चुकवू शकत नाही. परमेशाचे नाम अविनाशी आहे असे संत सतत सांगतात. या संत संगामुळे सर्व दोषांचे निर्मूलन होते.

४२

कर्म उपासना न कळे जयांसी । तेणें संतांसी शरण जावें ॥ १ ॥
सर्व कर्मभावें विठ्ठलनाम गावें । जाणिवे नेणिवेचे हांवे पडू नये ॥ २ ॥
अभिमान झटा वेदाचा पसारा । शास्त्रांचा तो भारा वहातां अंगीं ॥ 3 ॥
एका जनार्दनीं सर्व कर्म पाही । विठ्ठल म्हणतां देही घडतसे ॥ ४ ॥

भावार्थ

कर्म व उपासना यांचे वर्म ज्यांना कळत नाही त्यांनी संतांना शरण जावे.जाणिव ( बोध होणे)नेणिव ( बोध न होणे ) यांचा विचार करू नये.वेद शास्त्रांच्या अभ्यासाने अंगीं अहंकार वाढतो.भक्तीभावाने हरीनामाचा जप केल्याने देहाने सत्कर्मच घडत असते.एका जनार्दनीं निःसंशयपणे आपले मत स्पष्ट करतात.

४३

हरिप्रातीसी उपाय । धरावें संतांचें ते पाय ॥ १ ॥
तेणें साधती साधने । तुटतीं भवाची बंधने ॥ २ ॥
संतांविण प्राप्ति नाहीं । ऐशी वेद देत ग्वाही ॥ 3 ॥
एका जनार्दनीं संत । पूर्ण करिती मनोरथ ॥ ४ ॥

भावार्थ

संतांना शरण जाणे हाच हरिकृपेचा उत्तम मार्ग आहे.त्यामुळे साधना सफल होते.संसाराची सर्व बंधने तुटून जातात.संतसंगती शिवाय हरिपदाची प्राप्ती होत नाही ही वेदवाणी आहे.संत सर्व मनोरथ पूर्ण करतात असे एका जनार्दनीं या अभंगांत सांगतात.

४४

काम क्रोध लोभ नाहीं संतां अंगीं । वर्तताती जगीं जगरूप ॥ १ ॥
नातळोनी संसारा दाविती पसारा । भाव एक खरा विठ्ठलपायीं ॥ २ ॥
आणिकांची स्तुति नायकती कानीं । न बोलती वचनीं वायां बोला ॥ 3 ॥
एका जनार्दनीं तेचि संत तारू । भवाचा सागरू उतरिती ॥ ४ ॥

भावार्थ

संतांच्या ठिकाणीं काम,क्रोध,लोभ यांचा लवलेशही दिसत नाही.संसाराचे सत्य स्वरूप संत साधकांना समजावून सांगतात.ते सद्भावाने विठ्ठलाची भक्ती करतात.एका परमात्म्याशिवाय ते कोणचीही स्तुती करीत नाहीत,कानांनी ऐकत नाहीत. वाचेने निरर्थक भाषण करीत नाही.एका जनार्दनीं म्हणतात,संत हे भवसागर पार करून देणारी नौका आहे.

४५

संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची ॥ १ ॥
संतांचे देणें अरिमित्रां सम । कैवल्याचे धाम उघड तें ॥ २ ॥
संतांची थोरीव वैभव गौरव । न कळे अभिप्राय देवासी तो ॥ 3 ॥
एका जनार्दनीं करी संतसेवा । परब्रहमठेवा प्राप्त जाला ॥ ४ ॥

भावार्थ

संतांच्या मनांत श्रीमंत आणि दरिद्री असा दुजाभाव नसतो.संत शत्रु आणि मित्र असा भेदभाव न करता दोघांना समभावाने वागवतात.मोक्षाचे द्वार सर्वांना खुले करून देतात.संतांचे भक्तवत्सलेतेचे वैभव,मनाची थोरवी,साधकांकडून होणारा गौरव यांतिल रहस्य देवांना देखील कळत नाही.एका जनार्दनी संतसेवेत नित्य तत्पर असतात,म्हणून त्यांना परब्रह्म ठेवा लाभला.

४६

सम असे सुखदुःख । संत त्यासी म्हणती देख ॥ १ ॥
पापपुण्य मावळलें । द्वैत सर्व दुरावलें ॥ २ ॥
हर्ष शोक नाहीं देहीं । संत जाणावें विदेही ॥ 3 ॥
एका जनार्दनीं संत । जनालागीं कृपावंत ॥ ४ ॥

भावार्थ

जीवनातिल सुखदुःख जे समभावाने पाहतात त्यांना संत म्हणावें.पापपुण्य,शीत उष्ण,आपपर हे सारे द्वैतभाव मावळले असून आनंद आणि दुःख संतांच्या मनाला स्पर्श करू शकत नाहीत.असे संतजन संसारांत देहाने वावरत असले तरी ते सर्वार्थानी विदेहीच समजावे. सर्व सामान्य जनांसाठी जे कृपावंत ते संत अशी एका जनार्दनीं संतांची व्याख्या करतात.

४७

मुखीं नाही निंदा स्तुती । साधु वरीती आत्मस्थिती ॥ १ ॥
राग द्वेष समूळ गेले । द्वैताद्वैत हारपलें ॥ २ ॥
घेणें देणें हा पसारा । नाहीं जयासी दुसरा ॥ ३ ॥
एका जनार्दनीं संत । ज्याचे हृदयीं भगवंत ॥ ४ ॥

भावार्थ

साधु नेहमी आत्मस्थितींत असतात, ते कधीही कुणाची मुखाने निंदा किंवा स्तुती करीत नाहीत.देवघेवी चे व्यवहार करीत नाहीत.द्वैत आणि अद्वैत याविषयीचर्चा करीत नाहीत.एका जनार्दनीं म्हणतात,ज्याच्या हृदयात नेहमी भगवंत वसत असतो त्याला संत म्हणवे.

४८

मान देखोनि सहसा । संतां असंतोष होय जैसा ॥ १ ॥
नाम ऐकुनी बागुलातें । बाळ सांडू पाहें प्राणातें ॥ २ ॥
चंडवातें ते कर्दळी । समूळ कांपे चळचळीं ॥ 3 ॥
सन्माने नामरूप जाय । एका जनार्दनीं सत्य पाहे ॥ ४ ॥

भावार्थ

सामान्य लोक जेव्हां संतांना मान देतात,तेव्हां संतांना असंतोष वाटतो.जसा बागुलबुवा आला हे शब्द ऐकून बालक भितीने गर्भगळीत होतो.सोसाट्याचा वारा सुटाला म्हणजे कर्दळीचे झाड मुळापासून चळचळा कापते.त्याप्रमाणे संत सन्मालाला घाबरतात.असे एका जनार्दनीं संताविषयी सत्य वचन सांगतात.

४९

जागा परी निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे ॥ १ ॥
सकळ शरीराचा गोळा । होये आळसाचा मोदळा ॥ २ ॥
संकल्प विकल्पाची ख्याति । उपजेचिना सदा चित्तीं ॥ 3 ॥
यापरीं जनीं असोनि वेगळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥ ४ ॥

भावार्थ

जो परमात्म तत्वाविषयी सतत जागृत असूनही सगळ्या शरीराचा गोळा करून आळशासारखा पडलेला आहे असा दिसतो.त्याच्या चित्तांत संकल्प आणि विकल्प यांच्या लाटा उसळत नाहीत.जगामध्ये असूनही जो जनांपेक्षा वेगळा असतो असे एका जनार्दनीं संतांचे वर्णन करतात.

५०

आपुलीच दारा जरी टेके व्यभिचार । क्रोधाचा थारा अंतरीं नये ॥ १ ॥
आपुलेंच धन तस्करें नेतां जाण । जयाचें मन 3द्विग्न नव्हे ॥ २ ॥
आपुलाची पुत्र वधोनि जाय शत्रु । परी मोहाचा पाझरू नेत्रीं नये ॥ 3 ॥
आपुलें शरीर गांजितां परनरें । परी शांतीचें घर चळो नेदी ॥ ४ ॥
एका जनार्दनीं जया पूर्ण बोधू । तोचि एक साधु जगामाजीं ॥ ५ ॥

भावार्थ

आपली पत्नी व्यभिचार करीत आहे हे कळूनही जो मनांत राग धरीत नाही,चोराने आपले धन चोरून नेले तरी ज्याच्या मनाची शांती बिघडत नाही,शत्रुने स्वपुत्राचा वध केला तरी जो पुत्रमोहाने अश्रु गाळीत नाही किंवा त्याच्या देहाला कुणी पीडा दिली तरी चित्ताची शांती ढळत नाही असा ज्याला पूर्ण बोध झालेला साधु म्हणुन जगांत मान्यता पावतो असे एका जनार्दनीं या अभंगांत सांगतात.

५१

असोनि संसारीं आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा ॥ १ ॥
नाहीं मानसीं तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥ २ ॥
असोनियां अकिंचन । जयाची वृत्ति समाधान ॥ 3 ॥
एका जनार्दनीं ऐसे थोडे । लक्षामध्यें एक निवडे ॥ ४ ॥

भावार्थ

संसारांत पुरेशी संपदा (धन ) नसतांना जो सतत हरिनामाचा जप करतो,ज्याचे मन गंगाजळाप्रमाणे सदा शांत असते, दरिद्री असूनही जो समाधानी असतो असा भक्त लाखामध्ये एखादाच सापडतो.असे एका जनादनीं या अभंगांत म्हणतात.

52

इहलोकीं बरा तो परलोकीं वंद्य । त्यासी भेदत्व निंद्य उरलें नाहीं ॥ १ ॥
परस्त्री देखतां नपुसक वागे । परधन पाहतां अंधापरी निघे ॥ २ ॥
वाद वेवादा नोहे त्याची मती । हृदयीं भगवद्भक्ती सदा वाहे ॥ 3 ॥
एका जनार्दनीं ऐसे विरळे प्राणी । कोटीमाजीं जनीं एक देखी ॥ ४ ॥

भावार्थ

जो या लोकांत बरा असा मानला जातो तो परलोकांत वंदनीय ठरतो.त्याच्या मनातीले सारे भेदाभेद नाहिसे झालेले असतात.परस्त्री आणि परधन यांचा मोह त्याला पडत नाही.वादविवाद करण्यांत तो आपली बुद्धी खर्च करीत नाही तो सतत भगवंताची भक्ती मध्ये रममाण होतो.एका जनार्दनीं म्हणतात, असा साधक कोटी जनांमध्ये एखादाच सांपडतो.

५३

न मानी सन्मानाचें कोडें । नाहीं चाड विषयाची ॥ १ ॥
ऐसे मज शरण येती । तयांचें उणें न पडे कल्पांती ॥ २ ॥
नाहीं संसाराची चाड । नाही भीड कवणाची ॥ 3 ॥
एका त्याचा म्हणवी दास । धरूनि आस जनार्दनीं ॥ ४ ॥

भावार्थ

ज्या संतांना सन्मानाची आवड नसते, इंद्रिय विषयांची ईच्छा नाही ते श्रीहरीला अनन्य भावानें शरण जातात त्यांना चारी युगांच्या अंतापर्यंत ( कल्पांत ) कशाचीही उणीव वाटत नाही.एका जनार्दनीं म्हणतात,संसार सुखाची कामना नसलेल्या या निर्भिड संतांना सर्वभावें शरण जाऊन त्यांचा दास होऊन रहावे.

५४

संतांचा दास तो देवाथा थक्त । तरती पतीत दरुशनें त्याच्या ॥ १ ॥
त्याचिया योगे घडती सर्व तीर्थे । तीर्थ तें पवित्र होती तीर्थे ॥ २ ॥
तयाचियां पदें धरा धन्य म्हणे । ऐसे जे भेदरहित मनें तेचि संत ॥ 3 ॥
एका जनार्दनीं तयाच्या प्रसादे । कर्म अकर्मा दोंदे निघताती ॥ ४ ॥

भावार्थ

संतांचे दास्यत्व स्विकारणारा देवाचा आवडता भक्त असतो. त्याच्या दर्शनाने पतीतांचा उद्धार होतो आणि त्याच्या पदस्पर्शाने तीर्थे पावन होतात,पृथ्वी धन्य होते. असे समभावाने सर्वांवर कृपा करणाऱ्या संतामुळे सर्व कर्म आणि अकर्म यांचा विपाक होतो.असे एका जनार्दनीं या अभंगांत स्पष्ट करतात.

५५

धन जयासी मृत्तिका । जगीं तोचि साधु देखा ॥१॥
ज्यासी नाहीं लोभ आशा। तोचि प्रिय जगदीशा॥ २ ॥
निवारले क्रोधकाम । तोचि जाणा आत्माराम ॥ 3 ॥
एका जनार्दनीं पाय धरी । भुक्ती मुक्ति नांदे घरीं ॥ ४ ॥

भावार्थ

ज्या साधुला कशाचाही लोभ नाही,निरपेक्ष भावनेने जो धनसंपदेला मातीसमान मानतो तो परमेश्वराला प्रिय होतो.ज्याने क्रोध कामावर विजय मिळवलेला आहे तो आत्माराम आहे हे जाणून त्याला वंदन करावे कारण त्याच्या घरी भुक्ती मुक्ति एकत्र नांदत असतात असे एका जनार्दनी म्हणतात.

५६

साधु म्हणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी॥१ ॥
जयापाशीं नित्य शांती । संत जाणा आत्मस्थिती ॥ २ ॥
सिद्धी त्याच्या दासी । भुक्ति मुक्ति पायापाशी ॥ 3 ॥
एका जनार्दनीं साधु ।जयापाशी आत्मबोधु ॥ ४ ॥

भावार्थ

दया आणि क्षमा हे ज्याचे स्वाभाविक गुण आहेत त्यालाच साधु म्हणावे. जो सदैव आत्मस्थितींत असतो,मनाने शांत असतो अशा संताला सर्व सिद्धी प्राप्त होतात.भुक्ति आणि मुक्ति त्याच्या पायाशीं लोळण घेतात.एका जनार्दनीं म्हणतात, ज्याला आत्मबोध झाला आहे तोच साधु समजावा.

५७

वेधिलें ज्याचें मन सदा नामस्मरणीं । रामनाम ध्वनीं मुखीं सदा ॥ १ ॥
प्रपंच परमार्थ त्यासी पैंसारखा । अद्वैती तो देखा भेद नाहीं ॥ २ ॥
एका जनार्दनीं एकरूप भाव । नाहीं भेदा ठाव तये ठायीं ॥ 3 ॥

भावार्थ

ज्याचे मन सदासर्वदा नामस्मरणांत गुंतले आहे मुखांत रामनामाची धून गुंजत आहे,जो प्रपंचांत असूनही परमार्थ साधण्यासाठी तत्पर असून अद्वैत भक्त आहे.तो परमात्म तत्वाशी एकरूप झालेला परम भक्त आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,त्याच्या अंत:करणांत भेदाभेदाला स्थान नाही.


५८

काम क्रोध नाहीं अंगीं । तोचि नर जन्मला जगीं ॥ १ ॥
तयाचें होतां दरुशन । तुटे देहाचें बंधन ॥ २ ॥
अरुणोदयीं जाण । तम निरसे सहज आपण ॥ 3 ॥
एका जनार्दनीं शरण । नोहे एकपणावांचून ॥ ४ ॥

भावार्थ

काम क्रोध यांचा विकार नसलेला नरदेह पुण्यवान समजावा.ज्याप्रमाणे सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे त्याचे दर्शनाने देहाची बंधने तुटून जातात. एका जनार्दनीं म्हणतात,अशा पुण्यवंताला सर्वभावे शरण जावे.

५९

जें जें बोले तैसा चाले । तोचि वहिलें निवांत ॥ १ ॥
अंगी असोनी जाणपण। सदा सर्वदा जो लीन ॥ २ ॥
निंदा अथवा वंदा । नाही विषम ती बाधा ॥ 3 ॥
शांतीचा मांदुस । भरला असे सदोदित ॥ ४ ॥
एका जनार्दनीं धन्य। त्याचें दरुशन जगमान्य॥ ५ ॥

भावार्थ

जे संत नेहमी जसे बोलतात त्याचप्रमाणे वर्तन करतात,त्यांना अनेक विषयांचे ज्ञान असूनही ते अत्यंत विनयशील असतात.निंदा किंवा स्तुती यांनी त्यांच्या मनाची शांती ढळत नाही,या संतांचे मन शांतीरूप धनाने पूर्ण भरलेले असते.काम क्रोधाची बाधा त्यांना होत नाही.एका जनार्दनी म्हणतात,असे संत धन्य होत,ते सर्वांच्या आदराचे स्थान असतात.

६०

ऐशी शांती ज्यासी आहे । त्याचे घरी देव राहे॥१॥
हा अनुभव मनीं। पहा प्रत्यक्ष पुराणीं॥ २ ॥
धर्माघरीं वसे । अर्जुनाचे रथीं बैसे ॥ 3 ॥
अंकित दासाचा होय । एका जनार्दनीं देव ॥ ४ ॥

भावार्थ

ज्याच्या मनांत निरामय शांती वसत असते त्याच्या घरीं देव निवास करतो. हा अनुभवाचा विचार मनीं धरून त्याची प्रचिती पुराणात पहावी.श्रीकृष्ण भगवान धर्मराजाच्या घरीं निवास करीत आणि अर्जुनाच्या रथात बसून त्याचे सारथ्य करीत. एका जनार्दनीं ही उदाहरणे देवून सांगतात, की, देव भावाचा भुकेला आहे.

६१

हेचि एक खरें । सदा वाचे नाम स्मरे ॥ १ ॥
धन्य त्याची जननी । प्रसवली त्या लागोनी ॥ २ ॥
हरुषें नाचे कीर्तनांत । प्रेम न खंडे शुद्ध चित्त ॥ 3 ॥
एका जनार्दनीं शरण । वंदीन तयाचे चरण ॥ ४ ॥

भावार्थ

सदासर्वदा वाचेने हरीचे नामस्मरण करणारे,कीर्तनांत आनंदाने नाचणारे,ज्यांचे चित्त शुद्ध प्रेमाने भरलेले असते तेच खरे हरीचे दास असून त्यांना जन्म देणारी माता धन्य होय.एका जनार्दनीं म्हणतात,अशा हरीभक्तांना शरण जाऊन त्यांच्या चरणांना वंदन करावे.

६२

आले आले हरीचे दास । मुखीं रामनाम घोष ।
तोडोनियां भवपाश । जीवन्मुक्त ते ॥ १ ॥
वैराग्याचें कवच अंगीं । नाचताती प्रेमरंगीं ।
ज्ञान शस्त्र तें निसंगीं । छेदिती संग ॥ २ ॥
अनुभव तीक्ष्ण शर । सोडिताती निरंतर ।
वर्मी खोचले ते वीर । क्रोधादि असुर ॥ 3 ॥
सांडोनि देहाभिमान । तोचि जीवन्मुक्त जाण।
एका जनार्दना शरण । रामकृष्ण जपताती ॥ ४ ॥

भावार्थ

जे हरीचे खरे भक्त असतात ते संसाराचे सारे पाश तोडून, जीवनमुक्त होऊन,वैराग्य धारण करून वाचेने रामनामाचा घोष करीत प्रेमरंगी निःसंग होऊन नाचत असतात.अनुभवाचे धारदार बाण सोडून ते कामक्रोधादि असुरांच्या वर्मी घ्याव घालतात.एका जनार्दनीं म्हणतात, देहाचा अभिमान सोडून जे रामकृष्ण नामाचा सतत जप करतात तेच खरे जीवन्मुक्त झाले आहेत असे जाणून त्यांना शरण जावें.

६३

आसनीं भोजनीं शयनीं । जो चिंती रूप मनीं ॥ १ ॥
जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । सदा ध्यान रूप चित्ती ॥ २ ॥
नसे आणिके ठायीं मन । एका शरण जनार्दन ॥ 3 ॥

भावार्थ

जो साधक आसनावर बसला असतांना,भोजन (जेवण) घेत असतांना किंवा विश्रांती घेत असतांना सतत परमात्म रूपाचे मनांत चिंतन करीत असतो जागेपणीं,स्वप्नांत किंवा गाढ झोपेंत सुद्धां तो भक्त परमेश्वराच्या रुपाचे ध्यान करीत असतो, अन्यत्र जो कोठेही मनाने गुंतत नाही अशा अनन्य भक्तांना एका जनार्दनीं शरण जातात.

६४

न्याय मीमांसा सांख्य पांतजली । व्याकरण वेदांत बोली सर्व एक ॥ १ ॥
ते माझे सोई रे जिवलग जीवाचे । जे अधिकारी साचें संतजन ॥ २ ॥
एका जनार्दनीं मन तया ठायीं । होऊनिया पायीं उतराई ॥ 3 ॥

भावार्थ

संत हे आध्यात्मिक ज्ञानाचे अधिकारी असून जीवाचे जिवलग सोयरे आहेत.त्यांच्या ठिकाणी मन एकाग्र करून त्यांचे उतराई व्हावे असे सांगून एका जनादनीं म्हणतात,न्याय,मीमांसा ही शास्त्रे ज्ञान योग,पातंजलीचा अष्टांगयोग, व्याकरण आणि वेदांत हे सर्व संतमहिमा एक मुखाने मान्य करतात.

६५

भाग्य उजळलें आतां । संत सभाग्यता भेटले ॥ १ ॥
पाप ताप दैन्य गेलें । संत पाउले देखतां ॥ २ ॥
तुटलीं बंधनाची गांठी । पाय पोटीं आठवितां ॥ 3 ॥
एका जनार्दनीं शरण । संतचरण दुर्लभ ॥ ४ ॥

भावार्थ

साधकाचे भाग्य उदयाला आले की, संत भेटतात संतांच्या चरणांचे दर्शन होतांच कळत नकळत घडलेल पाप आध्यात्मिक,आधिभौतिक आधिदैविक हे सर्वताप आणि दैन्य नाहिसे होते.आत्मस्वरूपाला जे देहाचे बंधन पडते ते संतदर्शनाने तुटून पडते.असे सांगून एका जनार्दनीं संतांना शरण जातात.

६६

हृदयीं नांदे संदेह मूळ। तेथें फळ विरुढे केवी ॥१ ॥
जैसें बीज तैसा अंकुर । दिसे निर्धार जाणावा ॥ २ ॥
योगायोग शास्त्रपाठे । वाउगी खटपटें तर्काची ॥ 3 ॥
करितां कर्म धर्म नेहटी । नोहे भेटी संतांची ॥ ४ ॥
एका जनार्दनीं त्याचा दास।सहज आस पुरतसे ॥ ५ ॥

भावार्थ

अतरांत जर संदेह असेल तर भक्तीचे फळ वाढणार नाही.जसे बीज पेरावे तसे च फळ मिळणार हे जाणून घ्यावे.योग,याग,शास्त्रांचे अध्ययन हे सर्व तर्कशास्त्राची खटपट असून शास्त्रोक्त कर्माने संतांची भेट होणार नाही.खऱ्‍या भक्तीभावाने शरणागत झाल्याने जे संत मनोकामना पूर्ण करतात त्यांना शरण जावे असे एका जनार्दनीं या अभंगांत सोगतात.

६७

पूर्वपुण्य असतां गांठी । संतभेटी होय ॥ १ ॥
धन्य धन्य संतसंग । फिटे तम जन्माचा ॥ २ ॥
चार सहा वंदिती पाय । आणिकां ठाव कोठें नाही ॥ 3 ॥
एका जनार्दनीं संत । कृपावंत सुखसिंधु ॥ ४ ॥

भावार्थ

जन्मोजनीचा अज्ञान अंधकार नाहीशी करणारी संतसंगती पूर्वपुण्य गांठीशी असल्या शिवाय लाभत नाही असे मत व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात, संत हे कृपावंत असून सुखसागर आहेत. चारी वेद आणि साही शास्त्रे संतांच्या चरणांना वंदन करतात.

६८

बहुत जन्मांचें सुकृत | तयांसी घडत संतसंग ||१||
धन्य वैष्णव भूमंडळी | दरूशन मेळीं जीव तरतीं ||२||
एका जनार्दनीं विश्राम | निजदास संतांचा ||३||

भावार्थ

अनेक जन्मांच्या पुण्याईने संतांचा सहवास लाभतो.हे वैष्णव जन भुलोकांसाठी वरदान आहेत कारण त्यांच्या दर्शनाने सामान्य जन संसार सागर तरून जातात.एका जनार्दनी म्हणतात,संतांचे चरणांच्या दासांना खरी विश्रांती लाभते.

६९

बहु पुण्य होय गांठी | तरीच भेटी संतांची ||१||
पाप ताप दैन्य गेलें | संत पाऊलें देखतां ||२||
मोक्ष मुक्ति साधे फुका | ऐशी देखा संतकृपा ||३||
नाहीं आणिकांचें भेव | संत सदैव भेटता ||४||
एका जनार्दनीं संत | पुरविती हेत सर्वही ||५||

भावार्थ

पुष्कळ पुण्य गांठी असेल तरच संतांची भेट होऊन सारे पाप नाहीसे होऊन आध्यात्मिक,आधिभौतिक,आधिदैविक तापांपासून सुटका होते.सारे दैन्य लयास जाते.संतांच्या चरण दर्शनाने मोक्ष मुक्तीचा सहज लाभ होतो.संतकृपेने सर्व प्रकारच्या भयापासुन सुटका होते.एका जनार्दनीं म्हणतात, मनातिल सर्व हेतू संतकृपेने पूर्ण होतात.

७०

संतभेटीचा आनंदु | सुखसागर परमानंदु |
गातां नुरेची भेदु | नामस्मरणें ||१||
कैवल्याचे अधिकारी | मोक्ष राबे त्याचे घरीं |
ऋध्दी सिध्दि कामारी | कोण त्या पुसे ||२||
भुक्ति आणि मुक्ति | सदा तिष्ठे अहोरातीं |
कैवल्यपद येती | सामोरी तयांसी ||३||
नाम गाती जे आनंद | ह्रदयीं नाही दुजा भेद |
एका जनार्दनीं छंद | तयांचा मज ||४||

भावार्थ

संतभेटीचा आनंद परमसुखाचा सागर असून नामस्मरण आणि संतसंग यांत कोणताही भेद नाही.दोन्ही प्रकारचे भक्त कैवल्याचे अधिकारी असतात त्यांचे घरी मोक्ष, ऋध्दी सिध्दि हे सेवक म्हणून काम करतात.भुक्ति आणि मुक्ति रात्रंदिवस सतत कार्यरत असतात.एका जनार्दनीं म्हणतात, या अनन्य भक्तांचा मनाला छंद लागतो ,आनंदाचा,परमसुखाचा लाभ होतो.

७१

वाट पिकली संतांची | अवघें स्वरूप मुद्दलची ||१||
उकल करा लवडसवडीं | मुद्दल देव घडोघडीं ||२||
द्वैताची दाटणी सोडी | वासनेची वासना फेडी ||३||
आळ करितां सरळ सात | मन पडेल विचारांत ||४||
अखिल गुरू नामाचे | स्थापिले सुरंग भक्तीचे ||५||
अंगळु मंगळु नंद भाषा। द्वैत दळणीं वटील घसा ||६||
आंत बाहेर एकचि सूत | मुद्दल देतां सुखी होत ||७||
एका जनार्दनीं एकचि भेटी | सरिसीसाठी संसारा ||८||

भावार्थ

संतांना परमेश्वर रूपी मुद्दलच हाती आले.संतांचे सारे सायास सफल झाले.आपणच देव स्वरूप आहोत अशी ओळख पटल्याने द्वैत संपून गेले.सर्व वासनांचे निर्मुलन झाले.सदगुरुंच्या वचनाने नामजपाचा भक्तीरूप मार्ग सापडला.वस्त्र विणतांना जसे आंत बाहेर एकच सूत व्यापून असते तसा परमात्मा जीवाला आतून बाहेरून व्यापून आहे हे मर्म समजले.एका जनार्दनीं म्हणतात सद्गुरुंच्या भेटीने संसाराची यातायात संपली.

७२

आला आषाढी पर्वकाळ | भक्त मिळाले सकळ ||१||
निवृत्तिनाथ ज्ञानदेव | मुक्ताबाई सोपानदेव ||२||
चांगदेव विसोबा खेचर | सांवता माळी गोरा कुंभार||३||
रोहिदास कबीर सूरदास | नरहरी आणि भानुदास ||४||
नामदेव नाचे कीर्तनीं | एका शरण जनार्दनीं ||५||

भावार्थ

आषाढ महिन्याचा पुण्यकाळ सुरु झाला सारे भक्त विठोबाच्या पंढरींत जमा झाले.निवृति झानदेवा सह सोपानदेव आणि मुक्ताबाई तसेच चांगदेव,विसोबा खेचर, गोरा कुंभार,सावता माळी हे सर्व विविध व्यवसाय करणारे पण एकाच भागवत धर्माची उपासना करणारे भक्त पंढरीची वाट चालू लागले.रोहिदास,सूरदास,भानुदास,नरहरी सोनार आणि कबीर ही सर्व संतांची मांदियाळीं जमली. विठ्ठलाचा लाडका भक्त नामदेव कीर्तन रंगी तल्लीन होऊन नाचू लागला.पंढरीच्या सोहळ्याचे असे सुरेख वर्णन एका जनार्दनीं या अभंगांत करतात.

७३

वारंवार जन्म घेऊं | परी पाहूं पंढरपूर ||१||
दुजें मागणें नाहीं देवा | करूं सेवा वैष्णवांची ||२||
न मागों भुक्ति आणि मुक्ति| ती फजिती कोण सोसी ||३||
एका जनार्दनीं मागे | कीर्तनरंगीं रंगला वेगें ||४||

भावार्थ

परत परत जम्म घेऊन पंढरपूरची वारी करून वैष्णव जनांची सेवा करण्याची संधी मिळावी यापेक्षा वेगळे मागणे नाही अशी प्रार्थना करून एका जनार्दनीं म्हणतात, भुक्ति आणि मुक्ती ही केवळ फसव्या मृगजळाप्रमाणे आहेत असे समजून कीर्तन रंगी रंगून जावे.

७४

दास मी होईन कामारी दासीचा | परि छंद सायासाचा नाहीं मनीं ||१||
गाईन तुमचें नाम संताचा सांगात | यापरती मात दुजी नाहीं ||२||
निर्लज्ज कीर्तनीं नाचेन मी देवा | एका जनार्दनीं भावा पालट नको ||३||

भावार्थ

संसार बंधनांत बद्ध असलेल्या भक्ताचे मन या सायासांत गुंतून पडत नाही.तर संतांच्या संगतींत तो परमेश्वराचे नाम संकीर्तन करण्यांत दंग असतो.सारी लोकलज्जा सोडून तो भक्त कीर्तनांत नाचत असतो.एका जनार्दनीं देवाला विनंती करतात कीं, यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही.इश्वराविषयीचा हा भक्तिभाव सदैव मनांत जागतां राहावा.

७५

कोणता उपाय | जोडे जेणे संतपाय ||१||
हाचि आठव दिवस रात्रीं | घडो संतांची संगती ||२||
न करूं जप तप ध्यान | संतांपायी ठेवूं मन ||३||
न जाऊं तीर्थप्रदक्षिणा | आठवूं संतांचे चरणा ||४||
होता ऐसा निजध्यास | एका जनार्दनीं दास ||५||

भावार्थ

संतसहवास जडावा यासाठी कोणता उपाय करावा या विचारांत दिवस-रात्र मन व्यग्र असते,जप,तप,ध्यान यांपैकीं कोणतिही साधना न करता;तीर्थयात्रेचे सायास न करता संत चरणांशी मन एकाग्र करावे असा निजध्यास मनाला जडला आहे असे एका जनार्दनीं या अभंगांत सांगतात.

७६

आधीं घेई निरपेक्षता | त्याचे चरण वंदीन माथां ||१||
निरपेक्ष जेथें घडे | यमकाळ पायीं जोडे ||२||
निरपेक्षाची आवडी | ब्रह्मज्ञान घाली उडी ||३||
निरपेक्षावांचून | नाहीं नाहीं रे साधन ||४||
एका जनार्दनीं शरण | निरपेक्ष पाविजे ज्ञान ||५||

भावार्थ

या अभंगांत संत एकनाथ निरपेक्षता या सद्गुणा 'विषयी बोलत आहेत. निरपेक्ष भक्तांना प्रत्यक्ष काळाचा नियंता यमराज आदराने वंदन करतो.निरपेक्ष साधकासाठी ब्रह्मदेव तातडीने धावत येतो.निरपेक्षते वाचून कोणतिही साधना साध्य होत नाही असे सांगून एका जनार्दनी म्हणतात;अशा निरपेक्ष संतांना शरण जाऊन त्यांच्या चरणांना वंदन करावे कारण ते च खरे ज्ञानी असतात.

७७

न होता शुद्ध अंतःकरण |संतसेवा न घडे जाण| ||१||
शुद्ध संकल्पावांचून | संतसेवा न घडेचि जाण ||२||
कामक्रोध दुराचार | यांचा करूं नये अंगिकार ||३||
आशा मनीशांचें जाळें | छेदुनी टाकी विवेक बळें ||४||
एका जनार्दनीं ध्यान सहज तेणें संतपण ||५||

भावार्थ

निर्मल अंतःकरणातील शुद्ध संकलपाशिवाय संतसेवा घडत नाही.काम ( वासना)आणि क्रोध ( संताप) यामुळे दुराचार घडतो,यांचा कधीहि स्विकार करू नये तसेच विवेकाने मनातिल आशा-अपेक्षांचे जाळे छेदून टाकावे.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,संतसेवा घडण्यासाठी सदैव संतचरणांचे ध्यान करावे.

७८

जाणिव नेणिवांच्या वाटा |खटपटा पडूं नका ||१||
संतां शरण जा रे आधीं |तुटे उपाधी तत्काळ ||२||
तेणें तुटें भवबंधन | आत्मज्ञान प्रगटे ||३||
एका जनार्दनीं शरण | संत परिपूर्ण उदार ||४||

भावार्थ

जाणिव आणि नेणिव या निरर्थक द्वंव्दांत न पडतां आधी संतांना शरण जावे. त्यांमुळे संसार बंधन तुटून जाते आणि जीवाची देहबुद्धी नाहिशी होऊन त्याला आत्मबोध होतो.एका जनार्दनीं म्हणतात,संत ज्ञानाने परिपूर्ण असून उदार अंतःकरणाचे आहेत,त्यांना शरण गेल्याने सर्व उपाधींपासून सुटका होते.

७९

धर्म अर्थ काम मोक्ष | संतचरणीं ठेवी लक्ष ||१||
परा पश्यंती मध्यमा वैश्वरी | चरणीं निर्धारी संतांच्या ||२||
योगयागादि साधने | संतचरणीं असो ध्यानें ||३||
आणिक नको त्या उपाधी |तोडा देहीं आधिव्याधी ||४||
एका जनार्दनीं मन | एकपणे जनार्दन ||५||

भावार्थ

धर्म अर्थ काम मोक्ष हें चारी पुरषार्थ संतचरणीं मन गुंतवल्याने साध्य होतात.परा,पश्यंती,मध्यमा,वैरवरी या चारी वाणी संत चरणीं वास करतात.योगयागादी साधने संत कृपेने सफल होतात.देहाच्या व्याधी आणि मनाच्या चिंता संत सेवेने विलयास जातात.एका जनार्दनीं म्हणतात,मन एकाग्रपणे सद्गुरु जनार्दन स्वामींच्या मनाशी एकरूप झाले आहे.

८०

जयाचे चित्त संतांच्या चरणा | तेणें नारायणा जिंकियलें ||१||
भावें देव मिळे भावें देव मिळे |संतचरणीं लोळे सर्व काळ ॥ २ ॥
संतांची आवडी म्हणोनि अवतार धरी ।योगक्षेम भारी चालवी त्याचा ॥ 3 ॥
संतचरणीं देवा आदर उपचार । एका जनार्दनीं साचार करीतसे ॥ ४ ॥

भावार्थ

ज्याचे मन संतचरणांशी जडले आहे तोच नारायणाला आपलेसे करू शकतो.निरपेक्ष भक्ती भावानेच देव प्रसन्न होतो यासाठी सदा सर्वकाळ संतांची सेवा करावी असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,संतांच्या प्रेमासाठीच देव अनेक अवतार धारण करतो.स्वता: संताचा योगक्षेम चालवतो.संतच देवाचा महिमा वाढवतात.

81

संतासी आवडे तो देवाचाही देव कळिकाळाचें भेव पायातळीं।।1।।
आणिकाची चाड नसेची वासना। संतांचिया चरणा वाचूनियां।। 2।।
ऐसे ज्यांचे प्रेम ऐशी ज्यांची भक्ती। एका जनार्दनीं मुक्ति तेथें राबें ।।3।।

भावार्थ

जो साधक संतांना आवडतो त्याला कळीकाळाचे भय नसते.या साधकाला कोणत्याही प्रकारची वासना नसते.संत चरणांशिवाय कोणतिही अपेक्षा नसते.त्याचे संताविषयीचे प्रेम आणि भक्ती भाव यामुळे मुक्ती या भक्ताच्या पायी लोळण घेतात. असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

82

संतांचे सुख जिहीं अनुभवले । ते जीवमुक्त जाहलें जन्मोजन्मी ।।1।।
संतांचा संग जयासी हो जाहला। प्रत्यक्ष घडला सत्यलोक ।।2।।
एका जनार्दनीं संतांचा अनुभव । धाला माझा जीव परमानंदे ।।3।।

भावार्थ

संतसहवासाचे सुख ज्यांनी अनुभवले ते अनेक जन्मांतरी जीवमुक्त झाले.या भक्तांना सत्यलोकाची प्राप्ती होते असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,संतसेवेचा हा अनुभव आल्याने परमानंदाने मन भरून गेले.

83

संतचरणीं सावधान । ज्याचें जडलेसें मन।। 1।।
तया नाहीं जन्ममरण । मुक्ती उभ्या कर जोडोन ।।2।।
ब्रह्मज्ञान हात जोडी। संताघरी घाली उडी।। 3।।
शरण एका जनार्दनीं। वंदितसे अनुदिनी।। 4।।

भावार्थ

सावधान चित्ताने जो संतचरणी एकरूप झाला त्याचे जन्म-मरणाचे फेरे चुकतात.मुक्ती दासी बनून कर जोडून सेवेसाठी उभ्या राहतात.ब्रह्मज्ञान प्राप्त होते.जनार्दन स्वामींचा शरणागत एका जनार्दनीं अशा साधकांना सदैव वंदन करतात.

84

संतसेवा केल्यापाठीं । कैंची संसाराची गोष्टी ।।1।।
तेथें कैंचे कर्माकर्म । अवघा देव परब्रह्म ।।2।।
कैंचे ध्येय ध्याता ध्यान। एक संतचरणीं मन।। 3।।
कैंचा भेद कैंचें भान । एका जनार्दनीं ध्यान।। 4।।

भावार्थ

एकदा संतसेवची गोडी लागली कीं, तेथें संसारिक गोष्टींना महत्व राहात नाही.परब्रह्म आंत बाहेर व्यापून आहे याची प्रचिती येऊन कर्म आणि अकर्म यांची बंधने तुटून पडतात.संतचरणीं मन निमग्न झाले कीं,ध्येय,ध्याता (ध्यान करणारा) आणि ध्यानाची क्रिया ही त्रिपुटी लोप पावते.सारे भेदाभेद नाहिसे होतात.असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.

85

जयाचे चित्त संतांच्या चरणा । तेणें नारायणा जिंकियेलें।। 1।।
भावे देव मिळे भावें देव मिळे । संतचरणीं लोळे सर्व काळ ।।2।।
संतांची आवडी म्हणोनी अवतार धरी। योगक्षेम भारी चालवी त्याचा ।।3।।
वासंतचरणीं देवा आदर उपचार। एका जनार्दनीं साचार करीतसे।। 4।।

भावार्थ

संतांच्या चरणीं ज्या साधकांचे चित्त जडलेले असते त्यांच्यावर नारायण प्रसन्न होतो.निरपेक्ष भक्तीनेच देवाला आपलासा करता येतो.संतांच्या प्रेमामुळे देव विविध अवतार धारण करतो आणि संतांचा योगक्षेम स्वत: चालवतात.संत जगांत देवाविषयी आदरभाव वाढवून त्यांचा महिमा वाढवतात.असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

86

सुख अनुपम्य संतसमागमें । अखंड दुणावतें नामे।
दहन होती सकळ कर्मे। आणिक वर्म दुजे नाहीं।। 1।।
वाचे म्हणे कृष्णहरी । तेणें पापा होय बोहरी ।
संसारासी नुरे उरी । हा महिमा सत्संगाचा ।।2।।
काशी प्रयागादि तीर्थे बरी। बहुत असती महीवरी।
परी संतसमागमाची थोरी। तीर्थे न पावती सर्वदा।।3।।
असती दैवतें अनंत कोटी। परी संतसमागम भेटी।
दैवती सामर्थ्य हिंपुटी। हा महिमा संतांचा ।।4।।
एका जनार्दनीं मन। संतचरणीं दृढ ध्यान।
तेणें प्राप्त सच्चिदानंद । विठ्ठल देव विसंबे ।।5।।

भावार्थ

संतसहवासाच्या सुखाला कशाचिही उपमा देता येत नाही कारण नामाने ते सतत द्विगुणीत होत असते.सर्व कर्मफळांचे दहन करण्याचे सामर्थ्य संतसेवेंत सामावलेले आहे हेच यांतील मुख्य रहस्य आहे.वाणीने केवळ कृष्णहरी या नामाचा जप केल्याने सर्व पापांचे परिमार्जन होते.हा सत्संगाचा महिमा जाणावा.काशी,प्रयाग अशी अनेक तीर्थक्षेत्रे या भूतलावर आहेत पण संतसंगतीचे थोरवी या तीर्थक्षेत्रांना नाही.कारण तेथील दैवतांना संत समागमाचे सामर्थ्य नाही.एका जनार्दनीं या अभंगात सांगतात की,संतचरणांचे दृढ ध्यान केल्यास सत् चिद् आनंद असा विठ्ठल देव क्षणभरही भक्तांना विसंबणार नाही.

87

तीर्थाटन गुहावास । शरीरा नाश न करणे।। 1।।
समागम संतसेवा । हेंचि देवा आवडतें ।।2।।
करितां रामनाम लाहो। घडती पहाहो धर्म त्या।। 3।।
सकळ कर्मे जाती वायां । संतपाया देखतां ।।4।।
एका जनार्दनीं होतां दास। पुरे आस सर्वही ।।5।।

भावार्थ

तीर्थयात्रा करणे,पर्वतांच्या गुहेमध्ये निवास करणे, शरीराचा विनाश न करता संतांच्या सहवासांत राहून त्यांची सेवा करणे हेच देवाला विशेष प्रिय आहे.रामनाम जप केल्याने सर्व धर्म आपोआप साध्य होतात. संतचरणांच्या दर्शनाने सर्व कर्मफळांचा नाश होतो असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, सद्गुरू कृपेने मनातिल सर्व अपेक्षा सफल होतात.

88

सकळ तीर्थे । घडती करितां नामस्मरण।
देवाधि देव उत्तम। तोही धांवे सामोरा।। 1।।
पहाहो वैष्णवांचे घरीं । सकळ तीर्थे कामारी।
ऋध्दिसिध्दी मोक्ष चारी। दास्यत्व करिती सर्वदा।।2।।
शरण एका जनार्दनीं । तीर्थाचा तो अधिष्ठानी।
नामस्मरण अनुदिनी। तथा तीर्थे वंदिती।। 3।।

भावार्थ

सद्गुरू जनार्दन स्वामींना शरणागत असलेले संत एकनाथ म्हणतात,भक्तीभावानें सकळ तीर्थांचा अधिष्ठाता, देवांचा देव अशा विठ्ठलाचे सतत नामस्मरण केल्याने सर्व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य पदरी पडते.वैष्णवांचे घरीं सगळी तीर्थे,ऋध्दिसिध्दी आणि चारी मुक्ती सर्वदा दास्यत्व करतात.सारी तीर्थे या वैष्णवांना आदराने वंदन करतात.

89

भुक्तिमुक्तिचे सांकडें नाही विष्णुदासा ।
प्रपंचाची आशा मग तेथें कैंची।। 1।।
वैकुंठ कैलास अमरपदें तिन्हीं ।
तुच्छवत मनीं मानिताती ।।2।।
राज्य भोग संतती संपत्ति धन मान।
विष्ठे तें समान श्वान सुकर ।।3।।
मा ब्रह्मज्ञान तेथें कोण पुसे तत्वतां ।
घर रिघोनि सायुज्यता येत असे ।।4।।
एका जनार्दनीं नामाची प्रौढी।
ऋध्दिसिध्दि दडी घरी देती ।।5।।

भावार्थ

विष्णु दासांना मोक्षमुक्तीची अभिलाषा नाहीतर प्रपंचाची ओढ असूच शकत नाही.वैकुंठ(विष्णलोक)कैलास (शिवलोक)आणि अमरपदे हे तुच्छ मानतात.संतती(मुलेबाळे),संपत्ती ,धनामुळे मिळणारा सन्मान हे सर्व वैष्णवांना कुत्रा आणि डुक्कर यांच्या विष्ठेप्रमाणे टाकावू वाटतात.सायुज्यता मुक्तीचे भागिदार असलेले हे वैष्णव ब्रह्मज्ञान मिळवण्याचा अट्टाहास करीत नाहीत.एका जनार्दनीं म्हणतात, गुरूकडून लाभलेल्या नामाचा महिमा इतका अगाध आहे कीं,ऋध्दिसिध्दि आपण होऊन घरांत दासी होऊन राबतात.

90

कळिकाळाचें न चले बळ। ऐसे सबळ हरिदास ।।1।।
सेवेचें तो कवच अंगी। धीर प्रसंगी कामक्रोधा ।।2।।
रामनाम हाचि बाण। शस्त्र निर्वाण सांगाती ।।3।।
एका जनार्दनीं याचे भार । देखतां समोर पळती ते ।।4।।

भावार्थ

हरिदासांच्या अंगावर हरीसेवेचे संरक्षक कवच असल्याने त्यांना कळीकाळाचे भय नाहीं. त्यांच्या हातात वैराग्याचे शस्त्र असून रामनामाचा बाण जोडून ते धनुष्य सुसज्ज असते.अत्यंत धीरगंभीरपणे ते कामक्रोधाला जिंकतात.एका जनार्दनीं म्हणतात, या हरिदासांना समोर पाहून कळिकाळ वेगाने पलायन करतात.

91

जाईल तरी जावो प्राण ।परी न सोडा चरण संतांचे ।।1।।
होणार तें हो कां सुखे परी मुखें रामनाम न सोडा ।।2।।
कर्म धर्म होतु कां हानी। परी प्रेम कीर्तनीं न सोडा ।।3।।
एका जनार्दनीं वर्म । सोपा धर्म सर्वांसी ।।4।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं सहजसुलभ धर्म आचरणाचे सोपे नियम सांगत आहेत.प्राण गेला तरी संतांचे चरण सोडू नयेत.कर्म धर्म यथासांग होवोत अथवा न होवोत पण परमेश्वराच्या कीर्तनाचे प्रेम सोडू नये आगामी घटनांनी सुख लाभो अथवा न लाभो पण मुखाने रामनामाचा जप करण्याचे सोडू नये हेच धर्मशीलतेचे वर्म आहे.

92

गव्हांची राशी जोडल्या हातीं । सकळ पक्वान्नें ते होतीं ।।1।।
ऐसा नरदेह उत्तम जाण । वाचे वदे नारायण ।।2।।
द्रव्य जोडितां आपुले हाती । सकळ पदार्थ घरां येती ।।3।।
भावें करी संतसेवा । एका जनार्दनीं प्रिय देवा ।।4।।

भावार्थ

सर्व प्रकारची स्वादिष्ट पक्वाने तयार करण्यासाठी आरंभी गव्हाच्या राशी प्राप्त झाल्या पाहिजेत त्या साठी पुरेसे द्रव्य (पैसा)हाताशी असला पाहिजे म्हणजे सगळे पदार्थ घरी येतात.त्या प्रमाणेच उत्तम नरदेह प्राप्त झाला असतां मुखाने नारायणाच्या नामस्मरणाचे उत्तम धन जोडून संतसेवेने देव आपलासा करता येतो असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.


93

वेदोक्त पठण करितां चढे मान । तेणें होय पतन कर्मभूमी ।। 1।।
सोपें ते साधन संतांसी शरण । तेणें चुके बंधन जडजीवा ।।2।।
अभ्यासाचा सोस वाउगाची द्वेष ।न करी सायास नाम जपे ।।3।।
एका जनार्दनीं सायासाचे भरी । नको पडूं फेरी चौर्यांशीच्या ।।4।।

भावार्थ

वेदांचे शास्त्रोक्त पठण करून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा संतांना शरण जाणे हे सोपे साधन आहे.त्यामुळे जडजीवाचे बंधन तुटून जन्म मरणाच्या फेऱ्यातून सहज सुटका होते.हा अभ्यासाचा सोस सोडून संतांनी दिलेल्या नामाचा जप करावा असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.

९४

पालटे भावना संतांचे संगती । अभाविकांहि भक्ति प्रगटतसे ।।१।।
ऐसा ज्याचा उपकार । मानिती निर्धार वेदशास्त्रे ।।२।।
तारिती आणिका देऊनि विठ्ठलमंत्र । एका जनार्दनी पवित्र नाम गाती ।।३।।

भावार्थ

संतांच्या सहवासात सामान्य माणसाच्या भावनांमध्ये बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य असते. संतसंगतीने अभाविक माणसांत भक्ती प्रगट होते. संतांचे हे उपकार वेदशास्त्रेसुध्दा मान्य करतात असे प्रतिपादन करून एका जनार्दनी म्हणतात, अनेक साधकांना विठ्ठलनामाचा मंत्र देऊन संत त्यांची संसारचक्रातून सुटका करतात.

९५

नरदेहीचा हाचि मुख्य स्वार्थ । संतसंग करी परमार्थ ।।१।।
आणिक नाही पां साधन । मुखी हरि हरि स्मरण ।।२।।
सोडी द्रव्य दारा आशा । संतसंगे दशा पावावी ।।३।।
जरी पोखले शरीर । तरी ते केव्हाहि जाणार ।।४।।
जनार्दनाचा एका म्हणे । संतांपायी ठाव देणे ।।५।।

भावार्थ

संतसंगतीने परमार्थ साधणे हाच नरदेहाचा मुख्य स्वार्थ आहे.सदासर्वदा हरि नामाचे मुखाने स्मरण करणे याशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही.पत्नी आणि संपत्ती ही सुखाची साधने नसून त्यांची आशा सोडून द्यावी.शरिराचे कितिही पोषण केले तरी ते केव्हांतरी मृत्युमुखी पडणार हे अटळ आहे.एका जनार्दनीं म्हणतात,संतचरणीं संपूर्ण विश्रांति लाभेल.

96

नको दुजी रे वासना । मिठी घाली संतचरणा ।
पंढरीचा राणा । आपोआप हृदयीं ।।1।। हाचि धरी रे विश्वास ।सांडी वाउगा हव्यास।
नको आशा तृष्णा पाश । परतें टाकी सकळ।। 2।।
भगवद्भक्तींचे लक्षण। सर्वांभूतीं समाधान।
पाहतां दोष आणि गुण । वाउगा शीण मना होय ।।3।।
सर्वांभूती देव आहे । सर्व भरूनीं उरला पाहे ।
रिता नाहीं कोठे ठाव । देवाविण सर्वता ।।4।।
म्हणोनि नको भेदभाव । एक वचनीं एक ठाव ।
एका जनार्दनीं स्वयमेव । देव उभा पंढरी।। 5।।

भावार्थ

संतांना सर्वभावे शरण जाऊन त्यांच्या चरणांचा आश्रय घेतल्याने पंढरीचा राजा आपोआप हृदयी प्रगट होतो या सद्गुरू वचनावर विश्वास ठेवून आशा -तृष्णेचे पाश तोडून टाकणे हेच भगवंताच्या भक्तीचे मुख्य लक्षण आहे.कुणाचेही दोष-गुण न पाहतां सर्व प्राणिमात्रांशी सम भावाने वर्तन ठेवले असतां मनाला समाधान मिळते.सर्वत्र एकच परमात्म तत्वत भरून उरले असताना भेदभावाचे कारण नाही.या सत्य वचनावर पूर्ण विश्वास ठेवल्याने हेच परमात्म रूप पंढरींत स्वयमेव उभे ठाकले आहे अशी मनाची खात्री होते असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

97

सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्णावी । सज्जनवृंदें आधीं वंदावीं ।।1।।
संतसंगें अंतरंगें नाम बोलावें । कीर्तनरंगी देवासन्निध सुखें डोलावें ।।2।।
भक्तिज्ञानविरहित गोष्टी इतरां न कराव्या। प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ।।3।।
जेणें करूनी मूर्ति ठसावी अंतरी श्रीहरीची । ऐशी कीर्तनमर्यादा आहे संतांच्या घरची।। 4।।
अद्वय भजनें अखंड स्मरणें वाजवी करताळी । एका जनार्दनीं मुक्त होय तत्काळीं ।।5।।

भावार्थ

निर्गुण,निराकार परमात्मा संतरूपाने सगुण रूप धारण करतो तेव्हां या संतांच्या परम पवित्र अशा चरित्रांचे भक्तांनी अत्यंत आदराने वर्णन करावे.या संतजनांना आधी वंदन करावे.भक्ति आणि ज्ञान यांचे विवरण असलेल्या गोष्टी या संताकडून श्रवण कराव्यात,प्रेम आणि वैराग्याच्या युक्ति समजून घ्याव्या.त्यायोगे श्रीहरिची मूर्ती हृदयांत ठसेल.संतांच्या सहवासांत कीर्तनरंगीं रंगून जावे,अद्वितीय मधुर भजनांत हाताने टाळी वाजवत श्रीहरिचे अखंड स्मरण करावे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,या भक्तिमार्गाने साधक सर्व बंधनातून तात्काळ मुक्त होतो.

98

आली आषाढी जाये पंढरीसी । चित्त पायांपाशीं विठोबाच्या ।।1।।
वैष्णव गर्जत नामामृत सार । फुटतसे पाझर कामक्रोधा ।।2।।
एका जनार्दनीं धरूनी विश्वास ।जाये पंढरीस होय संतांचा दास।। 3।।

भावार्थ

आषाढी एकादशीच्या पर्वकाळी पंढरीस जाऊन मनाने विठ्ठल चरणांशी एकरूप व्हावे.तेथे विठोबाच्या नामाचा अखंड गजर वैष्णव करीत असतात.या नामामृताने अंतरीचे सारे कामक्रोध पाझरून जाऊन चित्त शुध्द होते.एका जनार्दनीं सांगतात,या वचनावर विश्वास ठेवून पंढरीस जाऊन संतचरणीं शरणागत व्हावे.

99

संतवचने साधे मुक्ती । संतवचनें ब्रह्मस्थितीं।
कर्माकर्मांची शांती। संतवचनें ।।1।।
संतवचनें याग । संतवचनें सांग योग।
संतवचनें अनुराग । घडतां संग संतांचा ।।2।।
संतवचनें ब्रह्मप्राप्ती। सायुज्य मुक्ती ।
ब्रह्मादि पदें येती। संतवचने समोर ।।3।।
संतवचनें सर्व सिध्दी। संतवचनें समाधी ।
संतवचनें उपाधी। एका जनार्दनीं तुटतसे।। 4।।

भावार्थ

या अभंगात संत एकनाथ संतवचनाचा महिमा वर्णन करतात.संतवचन श्रवण करून त्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर सर्व प्रकारचे योग याग केल्याचे पुण्य प्राप्त होते.संताच्या सहवासांत संतवचने ऐकून चित्तांत प्रेम भक्ती निर्माण होऊन ब्रह्मज्ञान होते.संतवचनाने सर्व सिध्दी प्राप्त होतात.सर्व संकटांचा परिहार होऊन मन शांत झाले कीं, समाधी पर्यंत प्रगती होते.संतवचनाने समीपता,सलोकता,सरुपता आणि सायुज्यता मुक्ती प्राप्त होतात.संत वचनाने सर्व उपाधी तुटतात.


100

धन्य हरिहर भवभयहर । आठव सत्वर करीं मन।। 1।।
तयांच्या चिंतनीं हरतील दोष । नित्य होय वास वैकुंठासी ।।2।।
नारदादि संतां करावें नमन ।धरावे चरण हृदयकमळीं ।।3।।
एका जनार्दनीं संतचरण ध्यातां । मुक्ति सायुज्यता हातां येते।। 4।।

भावार्थ

हरिहर (श्री विष्णु आणि श्रीशंकर )संसाराचे भय नाश करणारे असून त्यांचे मनाने चिंतन केल्यास देह,बुध्दी,मन यांचे सर्व दोष नाहीसे होतात.सलोकता मुक्ती प्राप्त होऊन वैकुंठांत नित्य निवास करता येतो.नारदां सारखे संत त्रिकालज्ञानी असून त्यांच्या चरणीं नतमस्तक व्हावे.एका जनार्दनीं म्हणतात,संतचरणांचे ध्यान केल्याने सायुज्यता मुक्ती मिळण्याचे भाग्य लाभते.

101

पायांवरीं ठेविती भाळ । तें प्रेमळ वारकरी ।।1।।
जन्मोजन्मीं त्यांचा संग । गा अभंग सर्वदा ।।2।।
सर्वकाळ वाचे। दुजें साचें नाठविती।। 3।।
एका जनार्दनीं त्यांचा संग। घडावा सर्वांगें मजसी ।।4।।

भावार्थ

सर्वदा भक्तिपूर्ण अभंग गाणारे भोळेभाबडे प्रेमळ वारकरी संतचरणीं मस्तक ठेवून आदराने वंदन करतात.जन्मोजन्मी त्यांच्या सहवासांत राहून वाचेने हरिचे अभंग गावेत.अन्य कशाचिही अपेक्षा करू नये अशी ईच्छा एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.

102

धर्म अर्थ काम । जिहीं अर्पिला संपूर्ण ।।1।।
तेचि जाती या वाटा। पंढरी चोहटा नाचती ।।2।।
आणिकांसी नोहे प्राप्ती। संत गाती तो स्वादु ।।3।।
शीण आदि अवसानीं। पंढरपूर न देखतां नयनीं ।।4।।
उभा विटे समचरणीं ।एका शरण जनार्दनीं ।।5।।

भावार्थ

धर्म, अर्थ,काम हे पुरुषार्थ ज्यांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणीं अर्पण केले आहेत असे वारकरी पंढरीला जाऊन किर्तनरंगीं नाचतात.त्यांना संतसंगतीचा जो आनंद मिळतो त्याची इतरांना प्राप्ती होत नाही.पंढरीला जाऊन ज्यांनी समचरणीं विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही त्यांनी जन्माचा व्यर्थ शीण घेतला असे जनार्दन स्वामींना शरणागत झालेले एका जनार्दनीं म्हणतात.

103

नको तुझें आम्हां कांही । वास पंढरीला देई ।।1।।
दुजे कांहीं नको आम्हां । द्यावा चरणाचा महिमा ।।2।।
संतांची संगत । दुजा नाही कांहीं हेत ।।3।।
काकुलती येतो हरी। एका जनार्दनीं निर्धारीं ।।4।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं अत्यंत व्याकुळ अंत:करणाने श्रीहरीची विनवणी करीत आहेत.विठ्ठल चरणी संपूर्ण शरणागती आणि संतसंगत या दोन गोष्टींचे दान द्यावे,अन्य कोणतिही अपेक्षा नाही.

104

देहाचिया आशा पुत्रादिक धन । कासया बंधन घडे मग ।।1।।
सांडोनि उपाधी करावें भजन। तेणें जनार्दन कृपा करी ।।2।।
एका जनार्दनीं निराशीं तो धन्य। तयाचें चरण वंदूं आम्ही ।।3।।

भावार्थ

पुत्रलाभ व्हावा, धनलाभाचा योग यावा या देहाच्या अपेक्षा आहेत.त्यामुळे संसाराचे बंधन पडते.या उपाधी सोडून देऊन परमेश्वराच्या भजनाचा आनंद घेतल्याने जनार्दन कृपा करतो.एका जनार्दनीं म्हणतात,निरपेक्ष साधक धन्य होय.त्यांचे चरण वंदनीय असतात.

105

संत जाती हरिकीर्तना । त्यांच्या वाहीन मोचे वहाणा।। 1।।
हेंचि भवसिंधुचे तारूं । तेणें उतरूं पैलपारू।। 2।।
जन्मोजन्मीचें भेषज। ते हें संतचरणरज।। 3।।
संतचरणींच्या पादुका। जाहला जनार्दन एका ।।4 ।।

भावार्थ

संत हे भवसिंधू पार जाण्यासाठी तारू (छोटे जहाज)असून त्याद्वारे हा संसार सागर सहज तरून जाणे शक्य होते.संताच्या चरणांची धूळ हे जन्मांतरीच्या भवरोगा पासून मुक्ती देणारे औषध आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,संत जेव्हां हरिकीर्तनाला जातात तेव्हां तेव्हां त्यांच्या पायीच्या वहाणा वाहून नेण्याचे सद्भाग्य प्राप्त व्हावे.किंबहुना संताच्या पायींच्या वहाणाच आपण व्हावे अशी कामना करतात.

106

संत भलते याती असो। परीं विठ्ठल मनीं वसो ।।1।।
घेईन मी पाठवणी।। 2।।
ज्ञाती कुळासी संबंध । मज नाही भेदाभेद।। 3।।
भलते ज्ञातीचा। विठ्ठल उच्चारी वाचा ।।4।।
तेथें पावन देह चारी। एका जनार्दनीं निर्धारी।। 5।।

भावार्थ

परमेश्वराची निष्काम भक्ती मनाचा सारा संकुचितपणा घालवून देऊन भेदाभेद नाहिसे करते हा नवविचार या अभंगात एका जनार्दनीं प्रगट करतात. ज्या संताच्या मनांत अखंडपणे विठ्ठल नांदत असतो तो कोणत्याही जातीकुळाचा असला तरी तो वंदनीय मानावा.विठ्ठल नामाचा सदैव जप करणाय्रा भक्ताचे चारी देह ( स्थूल,सूक्ष़मकारण व महाकारण) पावन असतात.

107

सोनियाचा दिवस आजी झाला। संतसमागम पावला।। 1।।
तणें फिटलें अवघे कोडे। झालें परब्रह्म उघडें।। 2।।
एका जनार्दनीं सेवा। करीन मी त्यांची भावा ।।3।।

भावार्थ

संतांच्या संगतीचा लाभ जेव्हां होतो तो दिवस सोनियाचा दिन म्हणून साजरा करावा.साधकाच्या मनातील को हम? (मी कोण?) या कोड्याचे उत्तर मिळून अद्वैत तत्वाचा बोध होतो.देव भक्तातिल द्वैत संपून आपण परब्रह्म परमेशाचा अंश आहोत याची खात्री पटते.सर्वत्र दृष्टीपुढे परब्रह्म दिसू लागते.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,या संत कृपेने जिवाभावाने संतसेवेच्या व्रताचा अंगिकार करावा.

108

जगीं जनार्दन मुख्य हाचि भाव। संत तेचि देववृत्ती ऐसी ।।1।।
समाधी साधन माझें संतजन। विश्रांतीचें स्थान संतापायीं ।।2।।
योगयाग धारणा पंचाग्नि साधन। तें हें माझें ध्यान संतांपायीं ।।3।।
एका जनार्दनीं तयांचा सांगात घडो मज निश्चित सर्वकाळ ।।4।।

भावार्थ

परमात्म तत्व आत्मरूपाने सर्व जगांत नांदत आहे.जगाच्या कल्याणासाठी देव संतरूपाने सगुण रूपांत साकार होतो.हे संतजन मनाच्या विश्रांतीचे स्थान आहेत.संतकृपेनेच समाधी अवस्थे पर्यंत साधकाची प्रगती होते.योगयाग,धारणा,पंचाग्नि साधन हे सर्व भक्तीमार्ग केवळ संतचरणांचे ध्यान केल्याने साध्य होतात असे स्पष्ट करून एका जनार्दनीं संतांचा सहवास सदासर्वदा घडावा अशी मनापासून प्रार्थना करतात.

109

धन्य आज दिन संतदर्शनाचा । अनंत जन्माचा शीण गेला।। 1।।
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे। कदा न सोडावे चरण त्यांचे ।।2।।
विविध तापांची जाहली बोळवण। देखिल्या चरण वैष्णवांचे।। 3।।
एका जनार्दनीं घडो त्यांचा संग। न व्हावा वियोग माझ्या चित्ता।। 4।।

भावार्थ

ज्या वैष्णवांच्या दर्शनाने,आध्यात्मिक,आधिदैविक आणि आधिभौतिक अशा तिन्ही तापांपासून भक्तांची सुटका होते त्या संतचरणांचे दर्शन झाले.अनेक जन्माचा शीण गेला.या संतांना आलिंगन देऊन त्यांचे चरण कधीच सोडू नये अशी कामना व्यक्त करून या संतदर्शनाचा आनंद या अभंगात एका जनार्दनीं व्यक्त करतात.

110

संतसुखसागरीं । बुडी दिधली निर्धारी।
भव दु:ख हरी।संतनामें।।।1।।
ऐसा संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा।
ब्रह्मसुखधामा।पुढें नाचे।। 2।।
बोलती तें वचन साचें। नाहीं बोलणें असत्याचें।
नामी प्रेम जयाचें । जडोनी ठेले।। 3।।
कृपावंत संत। दीन तारिले त्वरित।
एका जनार्दनीं मात। श्रवण मज झाली।। 4।।

भावार्थ

संतांनी दिलेल्या नामाच्या आधाराने संतरूपी सुखसागरांत बुडी मारली आणि भवदु:खाचा निरास झाला.संतकृपेचा महिमा अनुपमेय असून त्याचे वर्णन करता येत नाही.या नामाची अवीट गोडी लागली आणि ब्रह्मसुखाची प्राप्ती झाली.संत वचन सत्यवचन आहे याची प्रचिती आली.कृपावंत संत दीन भक्तांना त्वरित तारून नेतात याची खात्री पटली असा अढळ विश्वास या अभंगात एका जनार्दनीं व्यक्त करतात.

111

तुम्ही संतजन। माझें ऐका हो वचन।। 1।।
करा कृपा मजवरी। एकदां दाखवा तो हरी।। 2।।
आहे तुमचे हातीं। म्हणोनि येतो काकुळती।। 3।।
एका जनार्दनीं म्हणे थारा। संती द्यावि मज पामरा ।।4।।

भावार्थ

संतजनांनी आपली विनंती ऐकून आपल्यावर कृपा करावी आणि एकदांतरी हरिदर्शनाची आस पुरवावी अशी कळकळीची विनंती करून एका जनार्दनीं म्हणतात,हरिदर्शनाची भक्तांची आस केवळ संतच पूर्ण करु शकतात असा विश्वास असल्याने आपणास चरणाशी थारा द्यावा.

112

जाहली भाग्याची उजरी। संतसेवा निरंतर ।।1।।
हेंचि मज वाटे गोमटें। येणें भवभ्रम फिटे ।।2।।
करिता सावकाश ध्यान। होय मनाचें उन्मनी ।।3।।
एका जनार्दनीं संत। सदा शांत अंतरीं ।।4।।

भावार्थ

संतांची निरंतर(अखंड) सेवा करावी हे मनाचे सर्वसुंदर सुख आहे हा विचार भाग्य उजळवून टाकणारा आहे.संतसेवेने चित्ताचे सारे भ्रम नाहिसे होऊन शांतपणे हरिचरणांचे ध्यान करणे शक्य होईल त्या ध्यान योगाने मनाचे उन्मन होऊन ते उच्च पातळीवर स्थिर होईल.संत मनाने सदा शांत असतात असे एका जनार्दनीं म्हणतात.

113

कृपाळ उदार तुम्हीं संत। दीन अनाथ तारिले।। 1।।
हाचि महिमा ऐकिला। जीव गुंतला चरणीं ।।2।।
करा माझें समाधान। देउनी वचन अभयाचें ।।3।।
यावरी फार् बोलूं नेणें । उचित करणें तुम्हासी ।।4।।
एका जनार्दनीं शरण। आहे मी दीन पामर।। 5।।

भावार्थ

दीन अनाथांना तारून नेणारे संत अत्यंत कृपाळू आणि उदार मनाचे असतात.हा संतांचा महिमा ऐकून त्यांच्या चरणांशी जीव गुंतला.या थोर संतांनी अभयदान देऊन मनाचे समाधान करावे.या शिवाय संतांना शरणागत असलेल्या दीन पामराचे अधिक कांही मागणे नाही.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात.संत सर्व उचित गोष्टी जाणतात.

114

संतांचिये पायीं मज पैं विश्रांती । नाही माया भ्रांति तये ठायीं ।।1।।
सांगतो तें मनी धरावें वचन। संतांसी शरण जावें सुखें।। 2।।
संत तुष्टलिया देवा आनंद होय। मागें मागें धांवे तया पाठी।3।।
एका जनार्दनीं माहेर सुखाचे । घेतल्या वाचे संतनाम ।।4।।

भावार्थ

संताच्या जीवनांत माया आणि भ्रांती (भ्रामक कल्पना) यांना थारा नाही.संतचरणीं साधक देह मनाने पूर्ण विश्रांत होतो.या वचनावर विश्वास ठेवून संतांना सर्वभावें शरण जावे.समाधानी संत पाहून देवही प्रसन्न होतात,एका जनार्दनीं म्हणतात, संतचरण हे सर्व सुख देणारे माहेर आहे.संतानी दिलेल्या नाममंत्राचा अखंड जप करावा.

115

ब्रह्मांडभरी कीर्ति संतांचा महिमा । वर्णावया आम्हां मती थोडी ।।1।।
एक मुखें वानूं चतुरानन शीणू । सहस्त्र मुखें गुणु वानितां नयें ।।2।।
एका जनार्दनीं वर्णीन पवाडे । उभा वाडेकोडे पंढरीये ।।3।।

भावार्थ

संतांची कीर्ति अवघ्या ब्रह्मांडांत दुमदुमत आहे.संताचा महिमा वर्णन करणे चार मुखे धारण करणार्या ब्रह्मदेवालासुध्दां शक्य झाले नाही.सहस्त्र मुखे धारण करूनही संतांच्या गुणांचे यथार्थ वर्णन करता येणार नाही.संतांचे गुणवर्णन अल्पबुध्दी, एक मुखी भक्त करू शकत नाही.असे स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात,पंढरीच्या पुण्यक्षेत्रांत उभे राहून संतमहिमा वर्णन करून त्यांचे पोवाडे गाईन.

116

गर्भवासा भीती ते आंधळे जन । मुक्तीसी कारण नाहीं आम्हां ।।1।।
गर्भवास झालिया संतसेवा घडती। मुक्त जालिया न कळे भगवद्भक्ती ।।2।।
आम्हीं सुखे गर्भवास घेऊं देखा। मुक्तीचिया मस्तकां पाय देऊं ।।3।।
एका जनार्दनीं गर्भवास सोसूं । संताचा सौरस हातीं लागे।। 4।।

भावार्थ

परत परत जन्म घेऊन गर्भवासाचे दु:ख भोगण्यास जे लोक घाबरतात त्यांना अज्ञानी समजावे.जन्माला येऊन संतसेवेची संधी मिळून भगवंताची भक्ती प्राप्त होते.मुक्ती मिळाल्यास साधक भक्तिला मुकतो असे सांगून एका जनार्दनीं या अभंगात सांगतात,मुक्तिचा हव्यास सोडून सुखाने गर्भवास सोसल्यास संतकृपेचे अमृत हाताला लागेल.

117

तुमचे कृपेचें पोसणें । त्याचे धांवणें करा तुम्ही ।।1।।
गुंतलोंसें मायाजळीं । बुडतो जळीं भवाच्या।। 2।।
कामक्रोध हे मगर। वेढिताती निरंतर ।।3।।
आशातृष्णा या सुसरी। वेढिताती या संसारीं ।।4।।
म्हणोनी येतों काकुळती। एका जनार्दनीं विनंती।। 5।।

भावार्थ

संतांच्या कृपेवर पोषण झालेल्या या जीवास संतानीच धावण्याचे बळ द्यावे.संसारमायेच्या जाळ्यांत गुंतून पडलेल्या साधकाची सुटका करावी.भवसागराच्या अथांग जळांत बुडणिर्या साधकास कामक्रोध रुपी मगर वेढून टाकतात,आशातृष्णा या सुसरींचे रूप घेऊन संसारमायेंत ओढीत नेतात.या दु:खाने व्याकुळ झालेले एका जनार्दनीं संतांना विनंती करतात.

118

संत ते सोईरे सांगातीं आमुचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ।।1।।
जयाची आवडी धरी नारायण । म्हणोनि चरण धरूं त्यांचे ।।2।।
परलोकीचे सखे सोईरे सांगाती। मज ते आदी अंती सांभाळिती ।।3।।
एका जनार्दनीं धरुनि विश्वास। होईन त्यांचा दास जन्मोजन्मी।। 4।।

भावार्थ

संत हे साधकाचे परलोकी सांभाळ करणारे सोईरे असून निरंतर सोबत करतात.साधकाचे कळिकाळापासून रक्षण करतात,निर्भय बनवतात.संत साधकाचे जन्मा पासून अंतापर्यंत सांभाळ करतात.प्रत्यक्ष नारायणाला या संताची आवड असते. अशा दयाळू संतांच्या चरणीं पूर्ण शरणागत असलेले एका जनार्दनीं संताचा जन्मोजन्मी दास होऊन राहण्याचा निश्चय करतात.

119

बहुतांच्या मता । आम्हीं न लागूं सर्वथां ।।1।।
धरूं संतांचा सांगात। तेणें होय आमुचें हित।। 2।।
जाऊं पंढरीसी । नाम गाऊं अहर्निशीं ।।3।।
करूं हाच नित्य नेम। आणिक नको निजधाम।। 4।।
एका जनार्दनीं नाम। गाऊं आवडीनें राम ।।5।।

भावार्थ

संतांची संगती जोडून पंढरीस जावे,तेथे वैष्णवांच्या मेळाव्यांत रात्रंदिवस पांडुरंगाचे नाम घ्यावे हाच नेम सदैव आचरणांत आणावा.निजधामाचा मोह सोडून देऊन मनापासून रामनामाचा जप करावा असे मनोगत व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात,बहुतेक लोकांचे मत याविरूध्द असले तरी ते सर्वथा स्विकारणे योग्य नव्हे.

120

अर्ध क्षण घडता संतांची संगती। तेणें होय शांती महत्पापा।। 1।।
संतसंग देई संतसंग देई। आणिक प्रवाही घालूं नको ।।2।।
संसार मज न करणें सर्वथा। परमार्थ पुरतां हातीं देई ।।3।।
जनार्दनाचा एका करूणावचनीं ।करी विनवणी पायांपाशीं ।।4।।

भावार्थ

अत्यंत अल्प अशा संतसंगतीने सुध्दां महान पापांचे परिमार्जन होते.दुस्तर संसार प्रवाह टाळून परमार्थाच्या मार्गाने जाण्याचा निश्चय करून जनार्दन स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं परमेश्वर चरणी विनंती करतात कीं,या परमार्थ तत्वाचे संपूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त व्हावे यासाठी संतसंगतीचा लाभ व्हावा.

130

सोईरे धाईरे आम्हां संतजन। तयाविण चिंतन आन नाही ।।1।।
हाचि माझा भाव हीच माझी भक्ति । आणिक विश्रांति दुजी नाहीं ।।2।।
हेंचि माझें कर्म हाचि माझा धर्म। वाउगाचि श्रम न करी दुजा ।।3।।
हेंचि माझे ज्ञान हेचि माझे विज्ञान। संतांविण शरण न जाय कोणा।। 4।।
एका जनार्दनीं हा माझा निश्चय। वंदीन मी पाय सर्वभावें ।।5।।

भावार्थ

संतचरणांचे अखंड चिंतन ही च खरी भावभक्ती असून संतचरण हे च विश्रांतीचे एकमेव स्थान आहे.संतसेवा हा च धर्म असून इतर कांही कर्म करण्याचे श्रम निरूपयोगी आहेत.संतचरणीं संपूर्ण शरणागत होणे हें च सर्वोत्तम ज्ञान असून हे स्वानुभातून प्राप्त झालेले विज्ञान आहे अशी खात्री पटली आहे.संताशिवाय कुणालाही शरण जाणार नाही हा निश्चय करून एका जनार्दनीं संतांना सर्वभावें वंदन करतात.

131

अंगीं जया पूर्ण शांती। वाचा रामनाम वदती ।
अनुसरले चित्तवृत्ती । संतचरणीं सर्वदा ।।1।।
घडो तयांचा मज संग। जन्ममरणाचा फिटतसे पांग।
आधिव्याधि निरसोनि सांग। घडतां संग वैष्णवांचां।। 2।।
जें दुर्लभ तिहीं लोकां। आम्हां सांपडलें फुका।
एका जनार्दनीं घोका। नाम त्यांचे आवडीं ।।3।।

भावार्थ

ज्यांचे अंत:करणांत पूर्ण शांती नांदत असून वाचेने सतत रामनामाचा जप करीत असतात, त्यांच्या चित्तवृत्ती संतचरणी सदैव लीन असतात त्या साधकांची संगती आपणास घडावी अशी अपेक्षा या अभंगात एका जनार्दनीं व्यक्त करतात.या संतसंगाने देह-मनाच्या सर्व आधिव्याधि निरसून जातील आणि जन्ममरणाची सारी बंधने तुटून जातील असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,तिन्ही लोकांत दुर्लभ असे ज्ञान सहज प्राप्त झाले आहे.मनापासून आवडीने या भक्तांचे नामस्मरण करावें.

132

देऊनियां अभयदान। संतीं केलें मज पावन ।
निरसोनी भवबंधन । तारिलें मज ।।1।।
ऐसा संतसमागम। नाहीं आणीक विश्राम ।
योगियांचें धाम। कुंठीत पैं झाले।। 2।।
आणीक एक वर्म। मुख्य इंद्रियांचा धर्म।
मन ठेवुनी विश्राम। नामचिंतन करावें ।।3।।
एका जनार्दनीं जाण ।संत आमुचें निजस्थान।
काया वाचा मन। दृढ पायीं ।।4।।

भावार्थ

जन्ममरणाचे भवबंधन निरसून संत अभयदान देतात आणि भक्तांना पावन करतात.या संतसंगंती शिवाय मनाला दुसरा विश्राम नाही.शांत चित्ताने परमेश्वराच्या नामाचे चिंतन करावे हे आणखी एक रहस्य सांगून एका जनार्दनीं म्हणतात,संत हे आपले सर्वसुखाचे स्थान आहे हे जाणून काया वाचा मनाने संतचरणीं दृढ व्हावे.

133

जाणते संत जाणते संत । जाणते संत अंतरीचें ।।1।।
जे जे इच्छा देती फळ । काळ वेळ चुकवोनी ।।2।।
मनोरथ पुरले वो माझे। एका जनार्दनीं वोझें ।।3।।

भावार्थ

संत हे अत्यंत जाणते असून अंतर मनाच्या इच्छा जाणून ते साधकांना त्याप्रमाणे फळ देतात.काळ आणि वेळ यांचा विचार न करता ते शरणागताचे मनोरथ पूर्ण करतात.असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

134

जाणती ते हातवटी। संत पोटी दयाळु ।।1।।
न म्हणती अधम जन । करीती कृपेचे पोषण ।।2।।
शुचि अशुचि न म्हणे कांहीं । एकरूप वर्ते देहीं ।।3।।
एका जनार्दनीं मज। तारियेलें तेणें सहज ।।4।।

भावार्थ

संतांचा स्वभाव दयाळु असल्याने ते सहजपणे अंतरीचे भाव जाणतात.अधम जनांवर सुध्दां पूर्ण कृपा करतात.शुध्द अशुध्द (सोवळे ओवळे ) याचा विचार न करता सर्वांवर सारखी कृपा करतात.असे सांगून एका जनार्दनीं आपल्यावर संतांनी सहज कृपा केली असा स्वानुभव कथन करतात.

135

जयाच्या चरणां मिठी घाली भावें । धन्य ते जाणावे सदैव संत ।।1।।
प्रेमाचे सागर भक्तीचे उदधी। तोडिला उपाधी नाममात्रें ।।2।।
जडजिवां तारक सत्य सत्य वाचें । आणीक तें न वचे उपमे त्याच्या ।।3।।
एका जनार्दनीं कृपाळु संतजन । तेणें मज पावन कलें जगीं ।।4।।

भावार्थ

ज्यांच्या चरणांना भावभक्तीने मिठी घालाविशी वाटते ते संत धन्य होत.ते संत प्रेमाचे सागर असून भक्तीचे महासागर आहेत हे जाणावे.त्यांना दुसरी कोणतिही उपमा नाही.असे संत जड जीवांचा उद्धार करणारे असतात हे सत्य वचन आहे. हे संत केवळ नाममंत्र देवून भक्तांची उपाधी दूर करतात.एका जनार्दनीं म्हणतात,हे संत अत्यंत कृपाळु असून जगांत अनेकांना पावन करतात.

137

ऐकोनी संतकीर्ति।मना आलीसे विश्रांती।
नाहीं पुनरावृत्ती। जन्माची तया।।1।।
धन्य धन्य संतजन। मज केलें वो पावन ।
विश्रांतीचें स्थान। हृदयीं माझ्या ठसविलें।। 2।।
बहु जाचलों संसारे । बहु जन्म केले फेरे।
ते चुकविले सारे। आजी कृपा करूनी।। 3।।
शरण एका जनार्दनीं। माझें हरिलें मीपण ।
तुम्ही कृपा करून। अभय वर दिधला।। 4।।

भावार्थ

संतांची कीर्ति ऐकून मनाला पूर्ण विश्रांती मिळाली.हे संतजन धन्य होत जे साधकांना पावन करून हृदयांत विश्रांतीचे स्थान निर्माण करतात.जन्म-मरणाचे अनेक फेरे करून अनंत यातना सहन सहन कराव्या लागतात.संतकृपा होतांच या सर्व जाचांतून सुटका होते.साधकाचे मीपण (अहंकार) लयास जाते.एका जनार्दनीं म्हणतात,संतांनी अभय वर दिल्याने जन्म-मरणाचे फेर्यातून कायमची सुटका झाली.

138

जयाचिये द्वारीं तुळशीवृंदावन । धन्य ते सदन वैष्णवांचे।।1।।
उत्तम चांडाळ अथवा सुशील। पावन सकळ वैकुंठी होती ।।2।।
जयांचिया गळां तुळशीमाळा। यम पदकमळा वंदी त्याच्या।। 3।।
गोपीचंदन उटी जयाचियां अंगीं। प्रत्यक्ष देव जगीं तोचि धन्य।। 4।।
एका जनार्दनीं तयाचा सांगात । जन्मोजन्मीं प्राप्त हो कां मज ।।5।।

भावार्थ

भक्त उत्तम कुळातिल असो,सुशील असो अथवा चांडाळ असो वैकुंठ लोकांत जाऊन सर्व पावन होतात.असा विश्वास व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात,ज्याच्या गळ्यांत तुळशीची माळ असते त्यांच्या चरणांना यम (मृत्युदेव) वंदन करतात. ज्याच्या दारांत तुळशी वृंदावन असते ते वैष्णवांचे घर धन्य होय.गोपीचंदनाची उटी जो भक्त आवडीने अंगाला लावतो तो या जगीचा देव च समजावा.या पुण्यशील संतांचा सहवास आपणास प्रत्येक जन्मीं प्राप्त व्हावा अशी एका जनार्दनीं परमेश्वर चरणीं प्रार्थना करतात.

139

जडजीवांसी उध्दार । करावयासी निर्धार ।।1।।
पापी दोषी जैसे तैसे । लाविलें कांसें आपुल्या ।।2।।
जया जें जें गोड लागें । तें तें अंगें देताती ।।3।।
एका जनार्दनीं शरण । शरणागत नाहीं न्युन ।।4।।
भावार्थ
जडजीवांचा उद्धार करण्यासाठी परमात्मा संतरूपाने सगुण साकार अवतार धारण करतो.अनेक दोष असलेल्या पापी लोकांना नाममंत्र देवून संत सन्मार्गाला लावतात.ज्याला जे आवडते ते प्रदान करतात.एका जनार्दनीं म्हणतात,शरणागताची कोणतिही उणीव ध्यानीं न धरतां संत सर्वांना समानतेने कृपादान देतात.

140

धर्माची वाट मोडे। अधर्माची शीग चढे ।
तें आम्हां येणें घडे। संसारस्थिती ।।1।।
आम्हां कां संसारा येणें हरिभक्ति नामस्मरणें।
जडजीव उध्दरणें। नामस्मरणें करुनी।। 2।।
सर्व कर्म ब्रह्मस्थिती। प्रतिपादाव्या वेदोक्ती।
हेंचि एक निश्चिती। कारण आम्हां।। 3।।
नाना मतें पाषांड । कर्मठता अति बंड।
तयाचें ठेंगणें तोंड। हरिभजनें ।।4।।
विश्वरूप सृष्टी। अर्जुना दाविली दृष्टी।
भिन्नं भेदाची गोष्टी। बोलूं नये।। 5।।
एका जनार्दनीं । धरिती भेद मनीं ।
दुह्रावले येथुनी । निंदक जाण ।।6।।

भावार्थ

जेव्हां जगांत अधर्माची वाढ होऊन धर्माचे प्राबल्य कमी होते तेव्हा परमेश्वराला संत रुपाने अवतार घ्यावा लागतो. हरिभक्ती आणि नामस्मरण यांचा महिमा वर्णन करून जडजीवांचा उद्धार करण्यासाठी, वेदांच्या मतांचे प्रतिपादन करण्यासाठी संतांचे आगमन होते. नाना प्रकारची नास्तिक मतांतरे, कर्मठता यांचे अवडंबर कमी करुन सामान्य लोकांना भक्तिमार्ग दाखवून हरिभजनाचा महिमा वाढीस लागतो. कुरूक्षेत्रावर अर्जुनाला विश्वरूप दर्शन देवून श्रीहरिने त्याच्या मोहाचे बंधन नाहिसे केले.एका जनार्दनीं म्हणतात, मनातिल भेद भाविकाला भावपूर्ण भक्तिपासून दूर नेतात.


श्रीसद्गुरुमहिमा

141

धन्य धन्य श्रीसद्गरूभक्त । गरूचे जाणती मनोगत ।।1।।
गुरूचरणीं श्रध्दा गाढी। गुरूभजनाची आवडी ।।2।।
गुरूचें नाम घेतां वाचें । कैवल्य मुक्ति तेथें नाचे।। 3।।
गुरूचे घेतां चरणतीर्थ। भक्ति मुक्ति पवित्र होत ।।4।।
गुरूकृपेचे महिमान। शरण एका जनार्दन।। 5।।

भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं सद्गुरुंच्या भक्तांचा महिमा वर्णन करतात.या भक्तांची गुरूचरणांवर अतूट श्रध्दा असते. गुरूभजनाची त्यांना विलक्षण आवड असते.सद्गुरूंच्या नामस्मरणाने कैवल्यमुक्तीची द्वारे उघडतात.सद्गुरूंच्या चरणांचे तीर्थ मनांत पवित्र भक्तिभाव निर्माण करतात.हे सद्गुरूभक्त धन्य असून ते सद्गुरूंच्या मनातिल भाव जाणतात.

142

धन्य धन्य सद्गुरुराणा । दाखविलें ब्रह्म भुवना।। 1।।
उपकार केला जगीं। पावन जालों आम्हीं वेगीं ।।2।।
पंढरी पाहतां। समाधान जालें चित्ता ।।3।।
विटेवरी समचरण । एका जनार्दनीं निजखूण।। 4।।

भावार्थ

सद्गुरु कृपेने प्रत्यक्ष ब्रह्मभुवनाचे दर्शन पंढरींत घडले.विटेवर समचरण ठेवून उभा ठाकलेला पांडुरंग पाहून भाविक जन पावन झाले.चित्त समाधानाने परिपूर्ण भरले.जगावर उपकार करणारे हे सद्गुरू धन्य होत.असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.




श्रीविठ्ठलभावभक्तिफल

1

भावाचेनि भक्ती थोर । भावें तुटे येरझार ।।1।।
भावें अंकित देव भक्ताचा । वेदशास्त्र बोले वाचा ।।2।।
भावें गुरूशिष्य दोन्ही । भावयुक्त सर्व गुणीं ।।3।।
भावें जालें भक्तिपंथ । भावें पुरे मनोरथ ।।4।।
एका जनार्दनीं भाव । भावें दिसे देहीं देव ।।5।।


भावार्थ

भक्ताच्या अंतरातिल परमेश्वरा विषयी असलेल्या पुज्यभावाने निर्माण झालेली भक्ती थोर असते.या भावभक्तीने देव भक्ताचा अंकित होतो. वेदशास्त्रातिल ज्ञान भक्ताला अवगत होते.गुरूशिष्य दोघेही एकाच भक्तिभावाने समरस होतात.भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण होतात.भक्तिपंथाचा उत्कर्ष वाढीस लागतो.भक्ताच्या अंतरात देव प्रकट होतो.जन्म-मरणाच्या येरझारा थांबतात.असा पारमार्थिक अनुभव या अभंगात एका जनार्दनीं वर्णन करतात.


2

देव भुलला भावासी । सांडोनिया वैकुंठासी ।।1।।
उघडा आला पंढरपुरा । तो परात्पर सोइरा ।।2।।
पाहुनियां पुंडलीका । भुलला तयाच्या कौतुका ।।3।।
उभा राहिला विटेवरी । एका जनार्दनीं हरी ।।4।।


भावार्थ

परात्पर परमेश्वर भक्तांचा जिवाभावाचा सोइरा असून भक्तांसाठी वैकुंठ सोडून पंढरीला आला.भक्तराज पुंडलिकाच्या प्रेमळ भक्तिभावाला भुलून विटेवर समचरणीं उभा आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.


3

प्रमें भक्तांची आवडी । म्हणोनियां धुतो घोडी ।।1।।
ऐसा प्रेमाचा भुकेला । सेवक जाहला बळीद्वारीं ।।2।।
उच्छिष्ट फळें भाल्लणीची । खाये साची आवडीनें।। 3।।
एका जनार्दनीं उदार । तो हा सर्वेश्वर विटेवरीं ।।4।।


भावार्थ

विटेवर उभा असलेला सर्वेश्वर भावभक्तिचा भुकेला आहे या प्रेमापोटी तो अर्जुनाचा सारथी होऊन त्याच्या रथाची घोडी धुतो. दैत्यराजा बळी याचा द्वारपाल होतो.शबरीची उष्टी बोरे आवडीनें चाखतो.भक्तिप्रेमाची ही उदाहरणे देऊन एका जनार्दनीं म्हणतात, हा विश्वेश्वर उदार हृदयीं आहे.


4

एका भावें कार्यसिद्धी । एका भावें तुटे उपाधी ।
एका भावें आधिव्याधी । जन्मजरा पाश तुटे ।।1।।
एका भावें करी भजन । एका भावें संतसेवन ।
एका भावें वेदवचन। पाळितां तुटे भवपीडा ।।2।।
एका भावें योगयाग । एका भावें तप अष्टांग ।
एका भावें द्वैत तें सांग । तेथें द्वैत नको बापा ।।3।।
एका भावें रिघे शरण । एका भावें एका जनार्दन ।
एका भावें धरीं चरण । कायावाचामनेंशीं ।। 4।।

भावार्थ

भावभक्तिने संसारातिल सर्व संकटांचे निवारण होऊन कार्यसिद्धी होते.नामजपानें मन आणि देहाच्या आधिव्याधि, लयास जातात.जन्म आणि वार्धक्य ही बंधने तुटून पडतात. भावभक्तिने भजन केल्यास, संतांची सेवा केल्यास, वेदवचनांचे पालन केल्यास संसारातिल सर्व दु:खांचा निरास होतो.अष्टांग योग, याग, तप यामुळे चित्तातिल द्वैत भावना विलयास जाते. काया वाचा मनाने सद्गुरु चरणीं संपूर्ण शरणागत व्हावे असे एका जनार्दनीं अभंगाच्या अंतिम चरणांत सुचवतात.

5

योगी रिगाले कपाटीं । हटयोग साधिती आटी ।।1।।
परी तयांसी दुर्लभ । तो गोकुळीं जाहला सुलभ ।।2।।
यज्ञादिकीं अवदाना नये । तो गोपाळांचे उच्छिष्ट खाये ।।3।।
सदा ध्याती जपी तपी ज्यासी । तो नाचे कीर्तनीं उल्हासी ।।4।।
एका जनार्दनीं प्रेमळ । भोळ्या भाविकां निर्मळ ।।5।।

भावार्थ

अनेक हटयोगी गिरीकंदरी वास करून अटीतटीनें ध्यान साधनेने ज्याचे दर्शन घेण्याचा अट्टाहास करताना त्यांना हा श्रीहरी दुर्लभ असतो.तोच श्रीहरी गोकुळातिल निरागस गोपाळांना मात्र अत्यंत सुलभ होतो.यज्ञातिल अविर्भाग स्विकारण्यास जो नकार देतो तो गोपाळांचे उष्टे घास आननंदाने स्विकारतो.भक्तांच्या ध्यान साधनेचा, जपतप साधनेचा विषय असलेला भगवान कीर्तनांत आनंदाने नाचतो.एका जनार्दनीं म्हणतात,प्रेमळ,निर्मळ, भोळ्या भाविकांसाठी हा जगजेठी सदैव तत्पर असतो.

6

समसाम्य सर्वाभूतीं । ज्यांसी घडे भगवद्भक्ति ।।1।।
जालिया सद्गुरु कृपा । सर्व मार्ग होय सोपा ।।2।।
हृदयीं ठसतांचि भावो । प्रगटे देवाधिदेवो ।।3।।
भक्ता भावार्थ विकला । एका जनार्दनीं देखिला ।।4।।

भावार्थ

जो साधक सर्व व्यापक सृष्टींत एकच आत्मतत्त्व पहातो त्यालाच भगवंताची भक्ति घडते.सद्गुरुंची कृपा होतांच हा भक्तिमार्ग सोपा होतो.हृदयांत हा भक्तिभाव ठसला कीं,तेथें देवाधिदेव श्रीहरी प्रगट होतो. भक्त या भक्तिभावाने देवाला आपलासा करतो.असे या अभंगात एका जनार्दनीं सुचवतात.

7

झालिया गुरूकृपा सुगम । सर्वत्र ठावें परब्रह्म ।।1।।
तेथें नाहीं जन्ममरण । भवबंधन असेना ।।2।।
ऐसा धरितां विश्वास । काय उणें मग तयास ।।3।।
एका जनार्दनीं भाव । स्वये आपणचि होय देव ।।4।।

भावार्थ


जेव्हां साधकाला गुरूकृपेचा लाभ होतो तेव्हां त्याला सर्वत्र परब्रह्ममाचे अस्तित्व प्रत्ययास येऊ लागते.जेथे भवबंधन तुटून पडतात.जन्म -मरणाचे भय संपून जाते.साधक पूर्ण समाधानी,नि:शंक होतो.तो देवरूप होतो.असा विश्वास एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.

8

भावेविण देव नयेचि पैं हातां। वाऊगें फिरता रानोरान।।1।।
मुख्य तें स्वरूप पाहिजे तो भाव। तेणें आकळे देह निसंदेह।। 2।।
संत समागम नाम तें पावन। वाचे नारायण हाचि भाव।। 3।।
एका जनार्दनीं सोपा मंत्र राम। गातां जोडे धाम वैकुंठाचे।। 4।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं म्हणतात,उत्कट भावभक्ती शिवाय देव प्रसन्न होत नाही. त्यामुळे देह नि:संदेह होतो.संतांच्या सहवासांत मन पावन होते.वाचेने अखंड हरी नारायणाचा ध्यास लागतो.भाव हेंच भक्तिचे मुख्य स्वरूप आहे.राम हा दोन अक्षरांचा सोपा मंत्र असून या मंत्राच्या जपाने सायुज्यता मुक्तिचा लाभ होतो.


9

देवासी तों पुरे। एक तुळसीपान बरें ।।1।।
नाहीं आणिक आवडी । भावासाठीं घाली उडी ।।2।।
कण्या भाजी पान फळें खाय । न पाहे यातिकुळ स्वयें ।।3।।
प्रितीने दहीभात। उच्छिष्ट गोवळ्यांचे खात ।।4।।
भक्तिसुखे भुलला हरी । एकाजनार्दनीं निर्धारीं ।5।।


भावार्थ

देव भावाचा भुकेला असून भावभक्तिने दिलेल्या एका तुळशी पत्राने सुध्दां तो प्रसन्न होतो.विदुरा घरच्या कण्या,द्रौपदीच्या थाळीतिल भाजीचे एक पान,गोपाळांच्या ताटातिल उष्टा दहीभात, शबरीची उष्टी बोरे,तो श्रीहरी जातीकुळाचा विचार न करता प्रेमाने खातो. एका जनार्दनीं सांगतात,भक्तिसुखाने भुलून हरी भक्तांचा अंकित होऊन राहतो.

10

भावे करा रे भजन । भावें करा नामस्मरण ।।1।।
भावें जावें पंढरीसी । भावें नाहावें भीमरथीसी ।। 2।।
भावें करा प्रदक्षिणा । भावे करा जागरणा ।।3।।
भावें व्रत एकादशी । एका शरण जनार्दनासी ।।4।।

भावार्थ

भावभक्तीने पंढरपूरला जावे, भीमेच्या पात्रांत स्नान करावे, विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालावी.विठ्ठलाच्या भजनांत रंगून जावे.श्री हरीच्या नामस्मरणांत जागरण करून एकादशीचे व्रत करावे.असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

11

पाउला पाउली चिंतावी माऊली । विठाई साऊली आदि अंतीं ।।1।।
नोहे परता भाव । नोहे परता भाव । आतुडेचि देव। हातीं मग ।। 2।।
बैसलासे दृढ ह्रदयमंदिरीं । सबाह्याभ्यंतरीं कोंडोनिया ।।3।।
एका जनार्दनीं जडला विठ्ठल । नोहे तो निर्बळ आतां कधीं ।।4।।

भावार्थ

जीवनांत प्रत्येक पाऊल टाकतांना (कोणताही छोटा भोठा निर्णय घेताना) विठुमाऊलीचे चिंतन करावे.या शिवाय अन्य मार्ग नाही. या भावभक्तिने विठुमाऊली हृदयमंदिरांत स्थिर झाली कीं,अंतरांत आणि बाह्य सृष्टींत सर्वत्र हे आत्मतत्त्व भरून राहिले आहे याचा प्रत्यय येऊं लागतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,विठ्ठल असा जिवाभावाशी जडला कीं, भक्त कधी हताश, निराधार होत नाही.

12

भक्त देवातें भजती । देवे भक्ती धरी प्रीती ।।1।।
ऐसा एकमेकांचा ठावो । भक्ता अंगी देव पहा हो ।।2।।
अलंकार एक सुवर्ण । तैंसे नाही दुजेपण ।।3।।
एक आधीं एक पाठीं । एका जनार्दनीं राहाटी ।।4।।

भावार्थ

भक्त देवाचे भजन करतात, देव भक्तावर प्रेम करतो. देव आणि भक्त यात आपुलकीचे नाते निर्माण होते. देव आणि भक्त एकरूप होतात. जसे अलंकारातून सोने वेगळे करता येत नाही.एक आधी आणि एक पाठी, नाण्याच्या दोन बाजू! हीच जग रहाटी आहे असे एका जनार्दनीं सुचवतात.

13

एक एकाच्या भावा । गुंतुनी ठेले अनुभवा ।।1।।
प्रेम न समाये गगनीं । धन्य धन्य चक्रपाणी ।।2।।
उध्दरी पतिता । मोक्ष देतो सायुज्यता ।।3।।
एका शरण जनार्दनीं । उदार हा जगदानी ।।4।।

भावार्थ

देव आणि भक्त एकमेकांच्या भावबंधनात गुंतून पडतात.देव भक्तामधील प्रेमभाव गगनांत मावेनासा होतो.पतितांचा उध्दार करणारा चक्रपाणी धन्य होय.तो पतितांना सायुज्यता मोक्ष देतो.सर्व जगाचा स्वामी असलेला हा चक्रपाणी अतिशय उदार आहे.असे जनार्दन स्वामींना शरणागत झालेले एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.

14

आधीं देव पाठीं भक्त। ऐसें मागें आले चालत।। 1।।
हेहि बोलणेंचि वाव । मक्ता आधीं कैचा देव ।।2।।
भक्त शिरोमणी भावाचा देव लंपट झाला साचा।। 3।।
भक्तांसाठी अवतार। ऐसा आहे निर्धार।। 4।।
वडील भक्त धाकुला देव। एकाजनार्दनीं नाहीं संदेह ।।5 ।।





2187


जो जो कोणी भजनी बैसे। तेथे मी दिसे तैसाची ॥१॥
उपासनेचा निर्वाहो। सर्वांभूर्ती देवाधिदेवो ॥२॥
हो कां माझी प्रतिमा मूर्ति । अंतर्ज्योति मी वसे ।।३।।
तेथें करितां भावे भक्ति । एका जनार्दनीं मुक्ति तयासी ॥४॥


भावार्थ


जो साधक परमेश्वराच्या भजन साधनेंत रममाण होतो तेथे देव स्वता: प्रकट होतो.असा एकाग्र साधक सर्व भूतमात्रांत देवाचे अस्तित्व आहे हे जाणून घेण्याची कला आत्मसात करू शकतो.देवाच्या प्रतिमेंत त्या साधकाला अंतरंगातिल प्रकाशज्योतीचे दर्शन होते.एका जनार्दनीं म्हणतात, या उत्कट भावभक्तीने हा भक्त मोक्षपदाचा अधिकारी बनतो.


2188

जे भजती मज जैसे । मीही तया तैसा असे ।।१।।
जयां जैशी पैं वासना । मीहि तैसा होय जाणा ॥२॥
हो कां माझी प्रतिमा मूर्ति । आदरें करितां माझी भक्ति ॥३॥
शा मी जनीं असोनी निराळा । एकाजनार्दनीं अवलीला ॥४॥


भावार्थ


एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात कीं, भक्त देवाचे जे स्वरूप मनांत धरून भजन साधना करतात,त्याच्या अंत:करणांत तो परमात्मा त्याच स्वरूपांत प्रथकट होतो व त्या साधकाला त्याच्या मनातील वासनेप्रमाणे फल प्राप्त होते.देवाच्या प्रतिमेची आदराने भक्ती करणार्या साधकास देवाच्या अवतार लीला अनुभवता येतात.


2189

मज जे अनुसरले काया वाचा मर्ने। त्यांचे चालवणे सर्व मज ॥१॥
ऋणवई त्यांचा अनंत जन्माचा। जे गाती वाचा कीर्ति माझी।।२।।
तयांचियां द्वारी लक्ष्मीसहित। उभा मी तिष्ठत याचकपणे ॥३॥
सर्व जडभारी जाणे योगक्षेम। एकाजनार्दनी नेम जाणा माझा ।।४।।

भावार्थ

जे भक्त काया वाचा मनाने परमेश्वराची अखंडित भक्ती करतात त्यांचा चरितार्थ चालवण्याची काळजी प्रत्यक्ष परमेश्वर करतो.असे भक्त वाचेने सतत परमेश्वराची कीर्ति गात असतात त्यांचे ऋण हा परमात्मा कधीच विसरत नाही.याचक होऊन लक्ष्मी सह तो या भक्तांच्या दारांत तिष्ठत उभा राहतो. या भक्तांचा योगक्षेम चालवणे हा परमात्मा परमेश्वराचा नेम आहे असे एका जनार्दनीं सांगतात.

2190

मजसि जेणें विकिलें शरीर । जाणे मी निरंतर अंकित त्याचा ॥१॥
त्याचे सर्व काम करीन मी अंगें। पड़ों नेदी व्यंगें सहसा कोठे ।।२।।
एका जनार्दनीं त्याचा मी अंकित । राहे पैं तिष्ठत त्याचे द्वारी ।।3।।

भावार्थ

जे भक्त आपला देह झिजवून परमात्म परमेश्वराची अखंड सेवा करतात, त्यांची सर्व कामे परमेश्वर या भक्तांचा अंकित होऊन स्वता: पूर्ण करतो.या कार्यात देव कोणत्याही प्रकारची उणीव राहू देत नाही.एका जनार्दनीं नि:शंकपणे सुचवतात कीं, देव या भक्तांचा अंकित होऊन त्यांच्या दारी तिष्ठत उभा राहतो.

2191

सर्व कर्म मदर्पण। करितां मन शुद्ध होय ।।१।।
न्यून ते चढते जाण । करी संपूर्ण मी एक ॥२॥
माझ्या ठायी ठेवुनी मन। करी कीर्तन आवडी ।।३।।
मन ठेवुनी माझ्या ठायीं । बसो कोठे भलते ठायीं ॥४॥
एका जनार्दनीं मन । करा मजसि अर्पण ।।५।।

भावार्थ

कोणतेहि कर्म करून ते जर परमेश्वराला सद्भावनेने अर्पण केले तरी त्या साधकाचे मन शुद्ध होते.या कामांत जर कांही कमतरता राहिली तरी परमेश्वरी कृपेने ती दूर होऊन कार्यसिद्धी होते.देवाच्या चरणीं चित्त एकाग्र करून मन परमात्म चरणीं अर्पण करावे असे आवाहन एका जनार्दनीं या अभंगात भक्तांना करतात.

2192

साक्षात्कार होतां । साच बद्धता नुरे तत्वतां ।। १।।
माझा होतां अनुभवा कल्पनेसी नुरेठाव ॥२॥
माझे देखतां चरण। संसारचि नुरे जाण ॥३॥
माझी भक्ति करितां। दोष नुरेचि सर्वथा ॥४॥
सर्वाठार्थी मी वसे । एकाजनार्दनीं भेद नासे ॥५॥

भावार्थ

भक्ताला भगवंताचा साक्षात्कार झाला असतां त्याची संसारविषयीची सारी बंधने तुटून पडतात.परमेश्वर स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर भ्रामक कल्पनांना मनांत जागा उरत नाही.किंबहुना देवाच्या चरणीं लीन झाल्यावर क्षणभंगूर संसाराचा निरास होतो.भक्तीमार्गाची वाटचाल करतांना मनोदेहाचे सारे दोष लयास जातात.सर्व चराचर सृष्टींत केवळ आत्मतत्त्व भरून राहिले आहे याची प्रचिती येऊन सारे भेदाभेद संपून जातात असे एका जनार्दनीं अभंगाच्या शेवटीं सांगतात.

2193

भाविकांच्या उदकासाठीं। रमा नावडे गोमटी ॥1।।
भाविकांचे उदक घेतां। मज समाधान चित्ता ॥२॥
भाविकांचे उदकापुढें। मज वैकुंठही नावडे ॥३।।
ऐशी भाविकांची गोडी। एकाजनार्दनीं घाली उडी ।।४।।

भावार्थ

भाविकांनी अर्पण केलेल्या उदकाची माधुरी इतकीं अवीट असते कीं,देवाधिदेव श्री विष्णुंना सौंदर्यशालिनी रमा सुध्दां आवडेनासी होते.वैकुंठाची अपूर्वाई वाटत नाही.भक्तांचे प्रेम मनाला समाधान देते.भाविकांच्या या भक्तिभावासाठीं देव वैकुंठ सोडून पंढरीला येतो असे एका जनार्दनीं सांगतात.


2194

स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीति सांडोनी देख ॥१॥
भावें करितां माझी भक्ति। भाविक आपोआप उद्धरती ॥२॥
गव्हांची राशी जोडिल्या हाती । सकळ पक्वान येती त्याच्या होती ॥३।।
द्रव्य जाहले आपुले हाती। सकळ पदार्थ घरां येती ॥४॥
एका जनार्दनीं बोध । सहज घड़े एकविध ॥५॥

भावार्थ


स्वर्गसुखाची प्राप्ती,नरकवासाची भिती,आणि इहलोकाची आसक्ती सोडून जे साधक केवळ देवाची अनन्यभावे भक्ति करतात ते आपोआप उध्दरून जातात. उदाहरणार्थ एका जनार्दनीं सुचवतात, ज्या पदार्थापासून सर्व पक्वाने बनवता येतात येतात त्या गव्हाच्या राशी घरी आणल्यावर कार्यभाग साधण्याचा वेगळा खटाटोप करावा लागत नाही. उत्कट भक्तिभाव हा परमात्मा प्राप्तीचा एकमेव सहजसुलभ पर्याय आहे.


2195

माझा शरणागत न दिसे केविलवाणा। ही तो लाज जाणा माझी मज ॥१।।
एकविधभावें आलिया शरण। कर्म धर्म जाण पूर्ण त्याचे ॥२॥
समर्थाचे मुला काय खावयाची चिंता।तैसे मी त्या तत्त्वतां न विसंवें ॥३॥
एकाजनार्दनी हा माझा नेम। आणीक नाहीं वर्म भावेंविण ।।४।।


भावार्थ


संपूर्ण शरणागत झालेला साधक परमेश्वर कृपेपासून वंचित होऊन केविलवाणा दिसत असेल तर ही गोष्ट परमेश्वरी शक्तिला बाधा आणणारी आहे.उत्कट भक्तीभावाने शरणागत झालेल्या अनन्य भक्ताचे कर्म, धर्म आणि चरितार्थ यांची जबाबदारी प्रत्यक्ष परमेश्वर स्विकारतो.समर्थ पित्याच्या मुलाला उदरनिर्वाहाची चिंता नसते.एका जनार्दनीं म्हणतात, परमेश्वरी कृपा संपादनाचे भावपूर्ण भक्तिशिवाय अन्य कोणतेही रहस्य नाही.


2196


माझा भक्त मज भीतरी। मी स्वयें असे तया माझारी ॥१॥
बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह तो आत्मा जाण ॥२॥
माझिया भक्तीसी जे लागले। ते मीच होउनी ठेले ॥३॥
एका जनार्दनी अभेद । तया हदयी मी गोविंद ।।४।।


भावार्थ


अनन्य भक्तिभावाने भक्त देवाच्या अंत:करणांत स्थान मिळवतो आणि देव प्रेमळ भक्ताच्या अंतकरणासी एकरूप होतो. भक्त देवाच्या देहातिल आत्मतत्व बनतो.भक्तिमार्ग अनुसरणारे साधक समाजाकडून देवरूप मानले जातात.सद्गुरु जनार्दन स्वामी आणि एका जनार्दनीं हे भेदातित गुरू शिष्याचे नाते आहे. त्यांच्या अंत:करणांत गोविंद (ईंद्रियांना आनंद देणारा ) नांदतो. देव-भक्तातिल हा अभेद एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.


2197


देवपूजी माझिया भक्तांते। तेणें संतोष होत मातें ॥१॥
भक्त माझा मी भक्ताचा। ऐसी परंपरा साचा ॥२॥
देवभक्तपण। वेगळीक नाही जाण ॥३॥
भक्त जेवितांची धालो। एका जनार्दनीं लाधलों ॥४॥


भावार्थ


देव भक्तांचे रक्षण करतो आणि भक्त अनन्यभावे भगवंताचे सतत चिंतन करतो. या भक्तिभावाने देव भक्ताशी आणि भक्त देवाशी एकरूप होतो ही परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे.भक्ताचे भोजन होतांच देव समाधानाचा ढेकर देतो.सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने आपणास हे सर्व ज्ञान प्राप्त झाले असे एका जनार्दनीं कृतज्ञतेने स्पष्ट करतात.


2198

वभिल्या मिष्टान्ना। परतोनी श्रद्धा न धरी रसना ।।१।।
ऐसे आठविता माझे गुण।मिथ्या ठायीं नसे ज्ञान ।।२।।
जेथें कर्माचे परिपाठीं। हैं तो पुन्हां नये गोष्टी ॥३॥
येव्हढे कथेचे महिमान । एका जनार्दनी शरण ।।४।।


भावार्थ


कथा किर्तनांतून परमेश्वराच्या गुणांचे श्रवण करून नित्य त्या गुणांचे स्मरण केले असतां जे ज्ञान आत्मसात केले जाते ते कधिही विफल होत नाही.कथेचा महिमा असा आहे कीं, त्यानंतर कोणत्याही कर्मकांडांची गरज राहत नाही.ज्याप्रमाणे एकदां प्राशन केलेल्या गोड अन्नाचा त्याग (ओकारी) केल्यानंतर परत रसना त्याचा स्वीकार करीत नाही. हे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.


2199


भावें करितां माझी भक्ति । विषय वासना जळोनि जाती ।।१।।
चालतां माझेभक्तिपंथी। सकळ साधनें जळोनि जाती ।।२।।
माझिया निजभक्ता। बाधेची संसारव्यथा ।।३ ।।
प्रल्हादा गांजिता जगजेठी। मी प्रगटलों कोरडे काष्टीं ।।४।।
द्रौपदी गाजितां तात्काळीं । कौरवांची तोंडे केली काळी ॥५॥
गोकुळी गांजितां सुरपती। गोर्वधन धरिला हाती ।।६।।
अर्जुन प्रतिज्ञेचेवेळी । म्या लपविला हेळी ।।७।।
अंबऋषीचे गर्भवास । म्या सोशिले सावकाश ।।८।।
भक्तचरणींची माती । एकाजनार्दनीं वंदिती ।।९।।


भावार्थ


भावपूर्ण भक्तीने भक्तांच्या मनांतिल सर्व विषयवासना जळून जातात.भक्तीपंथाचे अनुसरण केल्यास बाकी सर्व साधने यज्ञयाग, कर्मकांडे निरुपयोगी ठरतात.भक्तांच्या सर्व संसारिक दु:खांचे निवारण होते.भक्त प्रल्हादाचे दु:ख निवारण करण्यासाठी श्रीहरी नरसिंहरूपाने खांबातून प्रगट झाले.द्रौपदीचे सत्व राखण्यासाठी कौरवांचा विनाश श्रीकृष्णाने घडवून आणला.अर्जुनाची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी सुदर्शन चक्राने सूर्याला लपविले आणि जयद्रथाचा वध घडवून आणला.अंब ऋषींना शापाने मिळालेले गर्भवास परमेश्वराने सोसून त्यांची मुक्तता केली.असे कथन करून एका जनार्दनीं म्हणतात,अशा थोर भक्तांच्या पायधूळ मस्तकीं धारण करावी.

भक्तवत्सलता

2200


जी जी भक्त बोलती वचनें। ती ती प्रमाण करणे देवा ।।१।।
याजसाठी अवतार।धरी मत्स्य कांसव सुकर ।।२।।
भक्तवचना उणेपण। येऊ नेदी जाण निधरिं ।।३।।
स्वयें गर्भवास सोशी। अंबऋषीकारणे ।।४।।
एका जनार्दनीं ब्रीद साचा । वागवी भक्ताचा अभिमान ।।५।।


भावार्थ


भक्तांना दिलेल्या वचनांची पूर्तता करणे हे भगवंताचे ब्रीद असून ते सार्थ करण्यासाठी परमेश्वर मासा, कासव ,सुकर असे दशावतार धारण करतो.अंबऋषींची शापातून मुक्तता करण्यासाठी परमात्म परमेश्वर स्वता: गर्भवास सोसतो.एका जनार्दनीं सांगतात, भक्तांचा अभिमान जपण्यांत भगवंत कधीच उणीव भासू देत नाही.


2201


अंबत्राषिराया पडिले सायास। सोसी गर्भवास स्वयें देव ।।१।।
उच्छिष्टही खाता प्रायश्चित्त असे। गोपाळांचें ग्रास खाय हरी ।।२।।
शा एका जनार्दनीं भक्ताचा अंकित । म्हणोनी तिष्ठत विटेवरी ॥३॥


भावार्थ


कोणाचेही उच्छिष्ट सेवन करणे हे परमार्थांत पाप समजले जाते.असे असूनही श्रीहरी गोपाळांनी भरवलेले उष्टे घास आवडीने स्वीकारतो.अंब ऋषीचे गर्भवास सोसतो.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात. देव हा भक्ताचा अंकित असून भक्त पुंडलिकासारख्या प्रेमळ भक्तांसाठी अठ्ठावीस युगे विटेवर उभा तिष्ठत उभा राहतो.


2202


भक्तालार्गी अणुमात्र व्यथा। ते न साहवे भगवंता ॥१॥
करूनी सर्वांगाचा वोदा।निवारीतसे भक्तपीडा ।।२।।
होउनी भक्ताचा अंकितु। सारथीपण तो करीतु ॥३॥
प्रल्हादासी दुःख मोठे। होतांची काष्ठी प्रगटे॥४॥
ऐसा अंकित चक्रपाणी। एका शरण जनार्दनीं ॥५॥


भावार्थ


करुणामय भगवंताला भक्तांचे अगदी क्षुल्लक दु:ख सुध्दां सहन होत नाही.आपल्या सर्व शक्ति एकवटून तो भक्तांचे रक्षण करतो.भक्तांचा जिवाभावाचा सखा होऊन तो अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतो. नरसिंह रुपाने भक्त प्रल्हादाचे रक्षण करतो.जगन्नाथ स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं म्हणतात, भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत हातांत चक्र घेऊन सदैव तत्पर असतो.


2203


भक्तपणा सान नव्हे रे भाई। भक्तीचे पाय देवाचे हृदयीं ॥१॥
भक्त तोचि देव भक्त तोचि देव। जाणती हा भाव अनुभवी ।।२।।
दान सर्वस्वं उदार बळी। त्याचे द्वार राखे सदा वनमाळी॥३॥
एका जनार्दनी मिती नाही भावा । देवचि करितो भक्ताची सेवा ॥४॥


भावार्थ


भक्तांची थोरवी एव्हढी महान आहे की, भक्ताचे पाय भगवंत आपल्या हृदयात धारण करतो.अनुभवी भक्तभाविक हे जाणतात कीं, देव आणि भक्त एकरूप आहेत.दानधर्म हे सर्वस्व मानणार्या उदार दैत्यराजा बळी याचा श्रीहरी द्वारपाल होऊन सेवा करतो.एका जनार्दनीं म्हणतात, देव-भक्तांतिल प्रेमळ भावाला मर्यादा नाही.


2204


वाहे भक्तांचे उपकार । न संडी भार त्यांचा तो ॥१॥
म्हणे इही थोरपण आम्हां।ऐसा वाढवी महिमा भक्तांचा ॥२॥
एका जनार्दनी कृपाळु । दीनाचा दयाळू विठ्ठलु ॥३॥



भावार्थ


एका जनार्दनीं या अभंगातून सुचवतात कीं पंढरीचा पांडुरंग भक्तांवर कृपा करणारा असून दिनांवर दया करणारा आहे. भक्तांमुळेच देवाला थोरपण प्राप्त होते असे मानून देव भक्तांचा महिमा वाढवतात.भक्तांचे उपकार देव कधीच विसरत नाही.


2205


मिठी धालूनिया भक्तां। म्हणे सिणलेती आतां ॥१॥
धांवे चुरावया चरण। ऐसा लाघवी आपण ।।२॥
योगियासी भेटी घाली तो आवडीनें कवळी बाहीं ॥३॥
एका जनार्दनीं भोळा। भक्तां आलिंगी सांवळा ॥४॥


भावार्थ

भक्ताची भेट होतांच देव त्याला प्रेमाने आलिंगन देतो. श्रम परिहार करण्यासाठी भक्ताचे पाय चेपण्यासाठी धावतो. योगी जनांना आपुलकीने जवळ घेतो. एका जनार्दनीं म्हणतात,सांवळा श्रीहरी भोळ्या भाविकांना आपलासा करतो.


2206


आपणा आपण पाहे विचारूनी। विचारतां मनी देव तूंर्ची ॥१॥
तूंचि देव असतां फिरशी वनोवनीं। प्रगटती काहाणी बोलायासी ॥२॥
देहींच देवळी आत्माराम नांदे। भांबावला भक्त हिंडे सदा रानें ॥३॥
एका जनार्दनीं भ्रमाची गोष्टी । वायांचि शिणती होती कष्टी ॥४॥


भावार्थ


मानवी देह देवाचे मंदिर असून परमात्मा परमेश्वर या देहांत आत्मरुपाने वास करतो.भक्त भाविकांना या गोष्टीची प्रत्यक्ष प्रचिती येत नसल्याने भक्त देवाचा शोध घेत रानींवनीं गिरीकंदरी भटकत फिरतो.एका जनार्दनीं सुचवतात, भक्ताची ही भावना केवळ भ्रम असून या भ्रामक कल्पनेने तो भ्रमंती करून कष्टी होतो. भक्ताने भगवंताशी एकचित्त होऊन विचार केला तर त्याला आपणच देव आहोत ह्या सत्याची जाणीव होईल.


2207


श्रमोनी वाउग्या बोलती चावटी। परी हातवटी नये कोणा ॥१॥
ब्रह्मज्ञानी ऐसे मिरविती वरी। क्रोध तो अंतरीं वसतसे ॥२॥
सर्वरूप देखे समचि सारिखें । द्वैत अद्वैत पारखें टाकूनियां ॥३॥
एका जनार्दनीं ब्रह्मज्ञान बोली। सहजचि आली मज अंगी ।।४।।


भावार्थ


परमेश्वर प्राप्तीसाठी कित्येक साधक संसाराचा त्याग करून निर्जन ठिकाणी भ्रमंती करतात.परंतू त्यातून स्वार्थ अथवा परमार्थ साधला जात नाही.अंतरंगातील काम, क्रोध या वरही विजय मिळविला जात नाही.ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असे सांगून स्वता:ची व इतरांची फसवणूक करतात.द्वैत व अद्वैत या पैकी कोणत्याही मार्गाने साधना घडत नाही.असे सांगून एका जनार्दनीं विनयाने म्हणतात,केवळ गुरुप्रसादाने त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले.


2208


सूर्य अंधारातें नासी। परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥
माझें जिणे देखणेपण। तेंचि मायेचें लक्षण ।।२।।
देहीं देहअभिमान। जीवी मायेचे ते ध्यान ॥३॥
एका जनार्दनीं माया । देहाधीन देवराया ॥४॥


भावार्थ


आपणास जे विश्वदर्शन होते तो मायेचाच परिणाम आहे. नश्वर देहाचा अभिमान बाळगणे हे सुध्दा मायाजालच आहे. सूर्याचा उदय होताच अंधाराचे जाळे नाहिसे होते.सूर्य आणि अंधार कधीच समोरासमोर दिसत नाही. ज्ञान आणि विपरित ज्ञान (माया) कधीहि एकत्र दिसत नाही असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, माया देहाधीन असून ब्रह्मज्ञानाला परमेश्वराचे अधिष्ठान आहे.


2209


नित्य नूतन दीपज्वाळा। हाती जाती देखती डोळा ॥१॥
जागृती आणि देखती स्वप्न । दोहींसी देखतां भिन्न भिन्न ।।२।।
भिन्नपणे नका पाहूं। एका जनार्दनीं पाहूं ।।3।।


भावार्थ


निरांजनांत प्रकाशणारी ज्योत नित्य नविन भासते. एकाच्या हातातून दुसरीकडे गेली तरी ती डोळ्यांना समानच दिसते. जागृत असताना मनाने पाहिलेले देखावे आणि स्वप्नतिल देखावे मात्र भिन्न दिसतात.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, सद्गुरु जनार्दन स्वामी आणि एका जनार्दनीं यांना भिन्नत्वाने पाहू नका.गुरु शिष्य एकरूपच असतात.


2210


जानर्दनें मज केला उपकार। पाडिला विसर प्रपंचाचा ॥१॥
प्रपंच पारखा जाहला दुराचारी। केलीसे बोहरी कामक्रोधा ॥
आशा तृष्णा यांचे तोडियेलें जाळं। कामनेंचे काळें केलें तोंड ॥३॥
एका जनार्दनीं तोडियले लिगाड। परमार्थ गोड दाखविला ॥४॥


भावार्थ


या अभंगात एका जनार्दनीं म्हणतात, सद्गुरु जनार्दन स्वामींनी मोठे उपकार केले. ज्या प्रपंचामुळे अनेक दुराचार (अयोग्य कृत्ये) करावी त्या प्रपंचाची आसक्ती कमी झाल्याने मन प्रपंचाला पारखे झाले.काम क्रोधाने घर रिकामे केले. आशा आणि अभिलाषा यांचे जाळे तुटून मन कामना रहित झाले.सद्गुरू कृपेने संसाराचे लचांड तुटून पडले आणि परमारार्थाचा आनंदमय मार्ग दाखवला.


2211


जनार्दनें केलें अभिनव देवा। तोडियेले शाखा अद्वैताची ॥१॥
केला उपकार केला उपकार मोडियेलें घर प्रपंचाचें ॥२॥
एका जनार्दनीं एकपणे देव । दाविला नवलाव अभेदाचा ॥३॥


भावार्थ


सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा झाली आणि चित्ताला पडलेले अद्वैताचे बंधन तुटून पडले.परमात्म परमेश्वराचे दर्शन घडवले.मनातिल सारे भेदाभेद लयास गेले.प्रपंचाचे सारे कष्ट निमाले.असे सांगून एका जनार्दनीं सद्गुरूंचा महिमा वर्णन करतात.


2212


कामक्रोध वैरीयांचे तोडियेले पांसे। जनार्दने सरसें केलें मज ।।१।।
देहाची वासना खंडून टाकिली। भ्रांतीची उडाली मूळ दोरी ॥२॥
कल्पनेचा कंद समूळ उपडिला। हृदयीं दाविला आरसा मज ।।३।।
एका जनार्दनीं सहज आटले । स्वदेहीं भेटले गुरूकृपें ।।४।।


भावार्थ


सद्गुरू जनार्दन स्वमींच्या कृपेने मी देह आहे ही भावना समूळ नाहिशी झाली.मनाचे जे वैरी काम क्रोध यांचे फासे तुटून पडले.देहाचे ममत्व संपून गेले.आपण देह नसून परमात्म तत्वाचा अंश आहोत अशी खात्री पटली.ह़दयातिल परमेश्वराचे प्रतिबिंब दाखवून भ्रामक कल्पनेचा चित्तातिल कंद समूळ उपटून काढला.असे एका जनार्दनीं या अभंगात गुरुकृपेचे यथार्थ वर्णन करतात.


2215

खुर्पू लागे सावत्यासी । न पाहे यातीसी कारण ।।1।।
घडी मडकें कुंभाराचे । चोख्यामेळ्याचीं ढ़ोरें वोढी।। 2।।
सजन कसयाचें विकी मांस । दामाजीचा दास स्वयें होय ।।3।।
एका जनार्दनीं जनीसंगे । दळूं कांडू लागे आपण ।।4।।


भावार्थ


जातीपातीचा कोणताही विधीनिषेध न मानता परब्रह्म परमात्मा सावत्या माळ्याबरोबर शेतातील गवत खुरपण्याचे काम करतो.गोरा कुंभाराची मडकी घडवतो.चोखा मेळ्याला ढोरे ( मृत जनावरे) ओढून र्नेण्याच्या कामांत मदत करतो.सजन कसया बरोबर मांस विकतो.दामाजीचा दास बनतो.एका जनार्दनीं सांगतात,जनाबाईस धान्याचे दळण कांडण करण्यांत हातभार लावतो.



2216


देखावया भक्तगण। रूप धरिलें सगुण ।।1।।
तो हां पंढरीचा राणा । वेदा अनुमाना नये तो ।।2।।
भाविकांचे पाठीमागें । धांवें लागे लावलाही।। 3।।
खायें तुळशीपत्र पान । न म्हणे सान थोडे ते।। 4।।
एका जनार्दनीं हरी । आपुली थोरी विसरे ।।5।।


भावार्थ

भक्तांच्या प्रेमळ भक्तीभावाचा आनंद घेण्यासाठी देवाने सगुण रूप धारण केले.वेदांना ज्याच्या स्वरुपाचे वर्णन करता येत नाही तो हा पंढरीचा राणा भाविकांच्या पाठीमागे धावतो.त्या साधकांनी अर्पण केलेले तुळशीचे पान लाखमोलाचे मानून त्याचा आवडीने अस्वाद घेतो.एका जनार्दनीं म्हणतात,श्री हरी आपला थोरपणा विसरून भक्तांशी समरस होतो.


2220

एका घरी द्वारपाल। एका घरीं होय बाळ।। 1।।
एका घरी करी चोरी। एका घरी होय भिकारी ।।2।।
एका घरी युध्द करी । एका घरी पूजा बरी।। 3।।
एका घरी खाय फळें । एका घरी लोणी बरें ।।4।।
एका एकपणे एकला । एका जनार्दनीं प्रकाशला ।।5।।


भावार्थ

सद्गुरु जनार्दन स्वामींकडून लाभलेल्या ज्ञान प्रकाशाने पावन झालेले एका जनार्दनीं या अभंगात श्री हरीच्या लिलांचे वर्णन करतात.गोकुळांत नंदाच्या घरी बालक्रीडा करतो तर गोपींच्या घरांतिल शिंक्यावरचे लोणी चोरून खातो.शबरीच्या घरीच्या उष्टावलेल्या बोरांचा आस्वाद घेतो.दुर्योधनाच्या राजवाड्यांत जाऊन युध्द करतो.भिकारी बनून द्रौपदीच्या घरी जाऊन चिंधी मागतो.बळीराज्याच्या घरी जाऊन त्याचा द्वारपाल बनतो.


2227

भक्ताच्या उपकारासाठीं । नोहे पालट उतराई ।।1।।
ज्ञानोबांची भिंत वोढी । उच्छिष्ट पात्रे काढी धर्माघरीं।। 2।
जेवी नामदेवासंगे साचें। सुदाम्याचे पोहे भक्षी ।।3।।
विष पितो मीराबाईसाठी । विदुराच्या हाटी कण्याविकी स्वयें ।।4।।
एका जनार्दनीं अंकितपणें । द्वार राखणे बळीचें ।।5।।

भावार्थ


भक्तांच्या उपकाराची फेड करण्यासाठी, त्यांचे उतराई होण्यासाठी परब्रह्म परमात्मा ज्ञानेश्वरासाठी भिंत चालवतो.जेष्ठ पांडव धर्मराजाच्या राजसूय यज्ञांत उष्टी पात्रे काढतो.नामदेवाच्या हट्टासाठीं जेवण करतो. सुदाम्याचे पोहे खाऊन तृप्तीचा ढेकर देतो.मीराबाईचे सत्व राखण्यासाठी विषाचा पेला प्राशन करतो.विदुराच्या कण्या बाजारांत नेऊन विकतो.बळीराजाचा द्वारपाल होतो.एका जनार्दनीं म्हणतात,देव एकनिष्ठ भक्तांचा अंकित होऊन त्यांच्यासाठी कष्टाची कामे करतो.


2228

दासासी संकट पडतां जडभारी । धांवे नानापरी रक्षणार्थ ।।1।।
पडतां संकटीं द्रौपदी बहीण। धांवे नारायण लवलाहें।। 2।।
सुदामियाचें दरिद्र निवटिले ।द्वारकेतुल्य दिलें ग्राम त्यासी।। 3।।
अंबरूषीसाठी गर्भवास सोसी। परीक्षितीसी रक्षी गर्भामाजीं ।।4।।
अर्जुनाचे रक्षी होउनी सारथी। उच्छिष्ट भक्षिती गोवळ्याचें ।।5।।
राखितां गोधनें मेघ वरूषला । गोवर्धन उचलिला निजबळें ।।6।।
मारूनी कंसासुर सोडिले पितर । रक्षिले निर्धारें भक्तजन ।।7।।
एकाजनार्दनीं आपुलें म्हणवितां। धांव हरी सर्वथा तयालागीं ।।8।।


भावार्थ

कौरवांच्या सभेंत द्रौपदी पणाला लावली गेली,तिच्यावर दारूण संकट कोसळले तेव्हां नारायणाने त्वरेने धावून त्या संकटाचे निवारण केले.द्वारके सारखी सुंदर सुदाम नगरी वसवून सुदाम्याचे दरिद्र कायमचे नष्ट केले.अंबरूषी साठी गर्भवास सोसला.सारथी बनून अर्जुनाचे घोडे राखले.गर्भातिल परिक्षिताचे रक्षण केले.गोपांळांसाठी गोवर्धन पर्वत उचलला.कंसासुराचा वध करून पितरांचे रक्षण केलें.एका जनार्दनीं म्हणतात, आपल्या भक्तांसाठी भगवंत क्षणाचाही विलंब न करता धांव घेतो.

2233

उत्तम अन्न देखतां दिठी। ठेवी पोटीं जतन तें ।।1।।
तान्हुल्याची वाहे चिंता । जेवीं माता बाळातें।। 2।।
न कळे तया उत्तम कडु। परी परवडू माता दावी ।।3।।
एका जनार्दनीं तैसा देव । घेत धांव भक्ताघरीं ।।4।।


भावार्थ

उत्तम पक्वान नजरेला पडतांच आई ते बाळासाठीं सांभाळून ठेवते.आपल्या तान्हुल्याची ती सतत चिंता वाहते.बाळाला गोड कडु समजत नाही.माता जशी बाळाची काळजी घेते तसा देव भक्ताची काळजी घेऊन त्याच्या घरीं धांव घेतो.देव-भक्तामधील जिव्हाळा एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.

2234

वत्साचिये लळे जैसी । धेनु अपेशी येत घरां ।।1।।
तैसा भक्तांघरीं नारायण । धांवे आपण वोढीनें ।।2।।
मुंगियांच्या घरां मूळ । धाडी समूळ कोण तो ।।3।।
एका जनार्दनीं देव। घेत धांव आपणचि ।।4।।


भावार्थ

रानांत चरावयास गेलेली गाय जशी वासराच्या ओढीने आपोआप घराकडे धांव घेते तसा नारायण भक्ताघरी धांव घेतो.हाच कृपाळू भगवान मुंग्यांना साखरेसाठी मूळ धाडतो.या चराचर सृष्टीची भगवंत प्रेमाने काळजी घेतात असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.


2238

भक्तिभावार्थ अर्पिला देव सर्वांगीं धरिला ।।1।।
रानींच रानट वनमाला । भक्ति आणुनी घातली गळां ।।2।।
भक्त अर्पितां आवडी । देव जाणे त्याची गोडी ।।3।।
भक्तभाव जाणोनि पाही । एका जनार्दनीं राहे देही ।। 4।।


भावार्थ

भक्तिभावाने भक्त आपला देह देवाला अर्पण करतो.रानांतिल रानटी वनमाला आणून भक्त देवाच्या गळ्यांत घालतो.भक्ताच्या या प्रेमळ भक्तिभावाची गोडी भगवंत पूर्णपणे जाणतो.या च भक्तिभावाने वेडा होऊन देव भक्ताच्या अंतरांत वास करतो असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.


2242

भक्ता जैसा मनोरथ । पुरवी समर्थ गुरूराव ।।1।।
नित्य ध्यातां तयाचे चरण। करी संसारा खंडन ।।2।।
वानूं चरणांची पवित्रता। उध्दार जडजीवां तत्वतां ।।3।।
अवचट लागतांचि कर । एका जनार्दनीं उद्धार ।।4।।


भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं समर्थ गुरूंचे महात्म्य सांगत आहेत.नित्य निरंतर गुरुचरणांची सेवा केल्यास संसारातिल विविध तापांचे खंडन होते.गुरूचरणांची पवित्रता जडजीवांचा उध्दार करते.नकळत गुरूचरणांना हस्तस्पर्श झाला तरी सामान्य जनांचे त्रिविध ताप दूर होतात.



2248

भक्त अर्पितां सुमनमाळा । घाली आवडीने गळा।। 1।।
ऐसा आवडीचा भूकाळु । श्रीविठ्ठल दीनदयाळु ।।2।।
भक्तेभावार्थें अर्पितां । तें आवडे पंढरीनाथा।।3।।
भक्तासाठीं विटेवर । समपद कटीं कर ।।4।।
ऐशी कृपेची कोंवळी । एका जनार्दनीं माउली ।।5।।


भावार्थ

पंढरीनाथ भक्तांच्या प्रेमासाठी आसुसलेला असून दीनदयाळु आहे.भक्तांनी अर्पण केलेली वनमाला सुध्दां तो अत्यंत आवडीने स्विकारतो.एकनिष्ठ भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रीविठ्ठल विटेवर समपद आणि कटीवर कर ठेवून अठ्ठावीस युगे उभा राहतो.एका जनार्दनीं म्हणतात,पंढरीनाथ भक्तांची माउली असून कृपेची कोवळी साउली आहे.


2252

भक्तदरूशनें देव ते तोषती । तेणें आनंद चित्तीं देवाचिये ।।1।।
भक्ताची स्तुति देवासी आनंद । भक्तनिंदा होतां देवा येतसे क्रोध ।।2।।
भक्त संतोषतां देवासी सुख। एका जनार्दनीं देवा भक्तांचा संतोष ।।3।।


भावार्थ

भक्तांच्या दर्शनाने देवाला मनापासून आनंद होतो.भक्ताची स्तुती ऐकून देवाला संतोष वाटतो.भगवंताच्या एकनिष्ठ भक्तांची कोणी निंदा केल्यास भगवंताला क्रोध येतो.भक्तांचा संतोष हेच देवाचे सुख असे सांगून एका जनार्दनीं देव भक्तांचा जिवाभावाच्या संबंधाचे वर्णन या अभंगात कथन करतात.


2253

देव पूजिती आपुले भक्ता। मज वाढविलें म्हणे उचिता ।।1।।
ऐसा मानी उपकार । देव भक्तीं केला थोर ।।2।।
देवाअंगीं नाही बळ। भक्त भक्तीनें सबळ ।।3।।
देव एक देशीं वसे । भक्त नांदती समरसे ।।4 ।।
भक्ताची देवा आवडी । उणें पडों नेदी अर्ध घडी ।।5।।
नाहीं लाज अभिमान देवा । एका जनार्दनीं करी सेवा ।।6।।


भावार्थ

भक्त आपल्या एकनिष्ठ भक्तिभावाने देवाचा महिमा वाढवतात.भक्त आपल्या भक्तीबळाने समर्थ आहेत,देवाच्या अंगी हे सामर्थ्य नाही.देव एकदेशी असून भक्त परस्परांशी समरस होऊन एकत्र नांदतात.अशा प्रकारे देव भक्तांचे उपकार मानतात.भक्तांना काही कमी पडू नये याची काळजी भगवंत घेतो.एका जनार्दनीं म्हणतात,भक्तांची सेवा करण्यात देवाला लाज वाटत नाही.


2254

भक्त नीच म्हणोनि उपहासिती । त्यांचे पुर्वज नरका जाती ।।1।।
भक्त समर्थ समर्थ । स्वयें बोले वैकुंठनाथ ।।2।।
भक्तासाठीं अवतार । मत्स्य कूर्मादि सुकर ।।3।।
यातिकुळ न पाहे मनीं । एका शरण जनार्दनीं ।।4।।


भावार्थ

भक्तांचा नीच म्हणून जे उपहास करतात त्यांचे पूर्वजांना नरकयातना भोगाव्या लागतिल असे वैकुंठनाथ स्वता: सांगतात.भक्त अतिशय समर्थ असून त्यांच्यासाठी भगवंत मासा,कासव,सुकर यांचे अवतार धारण करतो.जनार्दन स्वामींना शरणागत असलेले संत एकनाथ म्हणतात,भक्तांची जात कुळ यांचा विचार न करता भगवंत भक्तांचे रक्षण करतो.


2261

भक्ताची अणुमात्र व्यथा न सहावे भगवंता ।।1।।
अंबर्षिसाठी गर्भवास येत पोटीं ।।2।।
प्रल्हादाकारणें सहस्त्र स्तंभीं गुरगुरणें ।।3।।
गोपळ राहिले वनांतरीं। तेथें उचलिला गिरी ।।4।।
राखिले पांडव जोहरीं । काढिलें बाहेरी विवरद्वारें ।।5।।
ऐसा भक्तांचा अंकित। एका जनार्दनीं तया ध्यात ।।6।।


भावार्थ

भक्तांचे कणभरही दु:ख भगवंताला सहन होत नाही.परमेश्वर अंबर्षिसाठी गर्भवास सोसतो.प्रल्हादासाठी खांबातून नरसिंह रूपाने प्रगट होऊन हिरण्यकश्यपूचा वध करतो.गोपाळांसाठी बोटाच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरतो.वनवासांत पांडवांचे रक्षण करण्यासाठी त्यांना भुयारीमार्गाने सुखरूप बाहेर काढतो.अशा प्रकारे भक्तांचा अंकित होऊन त्यांचे रक्षण करणाऱ्या भगवंताचे एका जनार्दनीं ध्यान करतात.


2263

शरणांगता नुपेक्षी हरी । ऐसी चराचरीं कीर्ति ज्याची ।।1।।
बिभीषणें नमस्कार केला । राज्यधर केला श्रीरामें ।।2।।
उपमन्या दुधाचा पैं छंद । क्षीरसागर गोविंद त्या देतु ।।3।।
ध्रुव बैसविला अढळपदीं । गणिका बैसली मोक्षपदीं ।।4।।
ऐसी कृपेची साउली । एका जनार्दनीं माउली ।।5।।


भावार्थ

जे अनन्य भक्त श्री हरीला शरणागत होतात त्यांची उपेक्षा भगवंत करीत नाही अशी त्यांची कीर्ती चराचरात दुमदुमत आहे.राक्षसराज रावणाचा पक्ष सोडून रावणबंधू बिभिषण रामाकडे येऊन त्यांना नमस्कार करतो तेव्हां श्रीराम बिभिषणाला लंकेचे राज्य देवून सन्मानित करतात.द्रोणाचार्यांचा पुत्र उपमन्यु दुधासाठी हट्ट करतो तेव्हां त्याला क्षीरसागर देवून बालहट्ट पुरवतात.कठोर तप करणार्या ध्रुव बाळाला अढळपद देवून अजरामर करतात.नामजप करणार्या गणिकेला मोक्षपद देऊन कृतार्थ करतात.पुराणातील उदाहरणे देऊन एका जनार्दनीं म्हणतात,भक्तीभावानें शरणागत झालेल्या भक्तांवर श्रीहरी कृपेची सावली प्रदान करतात.




















2468


देहाचे देऊल देवळींच देव । जनार्दन स्वयमेव उभा असे ।।१।।
पूजन तें पुज्य पूजकु आपण। स्वयें जनार्दन मागेपुढे ॥२॥
ध्यान तें ध्येय धारणा स्वयमेव । जनार्दनीं ठाव रेखियेला ॥३॥
एका जनार्दनीं समाधी समाधान । पडिलें मौन देही देहा ॥४॥


भावार्थ


भक्ताचा देह हेच देवाचे मंदिर असून या मंदिराच्या द्वारी सद्गुरु जनार्दन स्वामी स्वता:उभे आहेत.देवाचे पूजन ज्याची पूजा करायची तो परमात्मा आणि पूजा करणारा ही त्रिपुटी संपून केवळ परमात्म्याचे अस्तित्वच कायम राहते. ध्यान धारणा आणि ध्याता एकरूप होतो.देहाचे भान विसरून ध्यात्याची समाधी लागते.वाचेचे मौन पडते आणि भक्ताला अपूर्व समाधानाची प्राप्ती होते. हा पारमार्थिक अनुभव एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.


2469


आतां यजन कैशापरी। संसारा नोहे उरी ॥१॥
सद्गुरूवचन मंत्र अरणी। तेथोनि प्रगटला निर्धूम अग्नी ॥२॥
सकळी सकळांच्या मुखें। अर्पितसे यज्ञ पुरूषे ।।३।।
एका जनार्दनीं यज्ञे अपी । अपी त्यामाजीं समपी ॥४॥


भावार्थ


सद्गुरू वचन रूपी अरणीने मंथन करताना अंतकरणरूपी यज्ञकुंडातून धूरविरहित अग्नी प्रगट झाला.तो साधकांच्या सकळ मुखांनी यज्ञ पुरूषाला अर्पण केला.वरून तुपाचे यजन केले.संसाराची वार्ता उरली नाही असे एका जनार्दनीं या अभंगाच्या शेवटच्या चरणांत स्षष्ट करतात.


2470


शांतीचेनि मंत्र मंत्रुनी विभूती लाविली देहाप्रती सर्व अंगा ।।१।।
तेणें तळमळ हारपली व्यथा। गेली सर्व चिंता पुडिलाची ॥२॥
लिगाडाची मोट बांधोनि टाकिली। वासना भाजली क्रोध अमी ॥३॥
एका जनार्दनीं शांत जाहला देह। कामना देव प्रगटला ॥४।।


भावार्थ


शांती मंत्राने मंत्रुन विभूती देहाच्या सर्व अवयवांना लावली. या विभुतीमुळे मनाची तळमळ आणि देहाच्या सर्व व्यथा चिंता हारपून गेल्या. संसारेचे जे लचांड मागे लागले होते त्याची मोट बांधून टाकली.क्रोधरूपी वासना भाजून टाकली. एका जनार्दनीं म्हणतात,कामना रूपी देव प्रगट झाला आणि देह शांत झाला.


2471


अहं सोहं कोहं सर्व आटलें। दृश्य द्रष्टत्व सर्व फिटलें ।।१।।
ऐसी कृपेची साउली। माझी जनार्दन माउली ।।२।।
द्वैत अद्वैताचे जाळें। उगविलें कृपाबळे ॥३॥
अवघे एकरूप जाहलें।दुजेपणाचे ठाव पुसिले ॥४॥
शरण एका जनार्दनीं । एकपणे भरला अवनीं ।।५।।


भावार्थ


जनार्दन स्वामींच्या कृपेने दृष्य विश्वाचा पसारा, तो पाहणारा आणि पाहण्याची क्रिया सर्व एकरूप झाले. द्वैत आणि अद्वैत यांचा मनांत निर्माण झालेला गुंता सुटला. भेदाभेद संपून आपपर भाव नाहिसा झाला.सद्गुरू जनार्दन स्वामी कृपेची साउली धरणारी माउली असून एका जनार्दनीं स्वामींना सर्वभावे शरण जातात.


2472


पहा कैसी नवलाची ठेव । स्वयमेव देहीं देखिला देव ।।१।।
नाहीं जप तप अनुष्ठान । नाही केले इंद्रियाचे दमन ।।२।।
नाहीं दान धर्म व्रत तप। अवघा देहीं जालों निष्पाप ॥३॥
पापपुण्याची नाहीं आटणी। चौदेहासहित शरण एका जनार्दनीं ॥४॥


भावार्थ


कोणत्याही प्रकारे इंद्रियांचे दमन न करतां,कोणताही जप,तप,अनुष्ठान किंवा दानधर्म,कठिण व्रत किंवा खडतर तप यांचा अंगिकार न करतां स्वता:च्या अंतकरणांत परमेश्वराचे दर्शन सद्गुरू जनार्दन स्वामींनी घडवले ही अतिशय नवलाची गोष्ट आहे.त्यामुळे सर्व पापांचे परिमार्जन होऊन देह निष्पाप झाला.पापपुण्यापासून मन मुक्त झाले.असे सांगून एका जनार्दनीं विनयाने म्हणतात, सूक्ष्म, स्थूल,कारण आणि महाकारण या चारी देहापासून आपण जनार्दन स्वामींच्या चरणीं शरणागत आहोत.


2473


त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला। हृदयस्थ पाहिला जनार्दन ।।१।।
दीपाची ती वाती वातीचा प्रकाश। कळिकामय दीप देहीं दिसे ॥२॥
चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योती। एका जनार्दनीं भ्रांति निरसली ॥३॥


भावार्थ


त्रिभुवनाला प्रकाशित करणारा जनार्दन रूपी दीप हृदयांत तेवत असलेला दिसला.दीपाची ती तेजस्वी ज्योत,या दीपकळिकेचा चैतन्यमय प्रकाश स्वता:च्या आत्मज्योतीसारखा भासला आणि मनातिल सर्व भ्रामक कल्पनांचा निरास झाला.असा पारमार्थिक स्वानुभव एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात.


2474


उदारपणे उदार सर्वज्ञ । श्रीजनार्दन उभा असे ।।१।।
तयाचे चरणी घातली मिठी।जाहली उठाउठी भेटी मज ।।२।।
अज्ञान हारविलें ज्ञान प्रगटलें। हृदयी बिंबलें पूर्ण ब्रह्म ॥३।।
एका जनार्दनीं नित्यता समाधी । वाउग्या उपाधी तोडियेल्या ॥4।।


भावार्थ


उदार मनाचे सर्वज्ञ श्री जनार्दन स्वामी सामोरे दिसतांच त्यांच्या चरणांना मिठी घातली. स्वामींनी उठवून प्रेमभराने आलिंगन देतांच अज्ञानाचा लोप होऊन चित्ताच्या गाभार्यात ज्ञान प्रगट झाले. ह़दयांत पूर्ण ब्रह्म एकवटून आले. निरर्थक उपाधींची बंधने तुटून पडली.नित्य समाधीची अवस्था प्राप्त झाली. हा उच्च प्रतीचा पारमार्थिक अनुभव या अभंगात एका जनार्दनीं वर्णन करतात.


2476


माजें मीपण देहीच मुरालें। प्रत्यक्ष देखिलें परब्रह्म ॥१॥
परब्रह्म सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरूनियां ।।२।।
ब्रह्मज्ञानाची ते उघडली पेटी। जाहलों असे पोटी शीतल जाणा ||३||
एका जनार्दनीं ज्ञानाचें तें ज्ञान । उघड समाधान जाहलें जीवा ॥४॥


भावार्थ


परब्रह्म सुखाचा सोहळा जेव्हां प्रत्यक्ष डोळे भरून पाहिला तेव्हां मनातील अहंकार ठायींच विरून गेला. मन शांत सुखाने भरून आले. एका जनार्दनीं सांगतात, ज्ञानाचे ज्ञान अशा ब्रह्मज्ञानाचे भांडार खुले झाले.चित्ताला निखळ समाधानाचा लाभ झाला.


2477


दीपाचें तें तेज कळिकें ग्रासिले। उदय अस्त ठेले प्रभेविण ॥
लोपलीसे प्रभा तेजाचे तेजस । जाहली समरस दीपज्योती ।।२।।
फुकल्यावाचुनी तेज ते निघालें। त्रिभुवनी प्रकाशिले नवल देख ।।३।।
एका जनार्दनीं ज्योतीचा प्रकाश। जाहला समरस देहीं देव ॥४॥


भावार्थ


दीपाचे तेज दीपज्योतीने गिळून टाकले. प्रकाशाच्या अभावाने विश्वाच्या उदय अस्ताची जाणिव लोपून गेली. दीपज्योती दीपाच्या स्वरूपाशी एकरूप झाली.वायुने फुंकर घालण्या आधीच दीपाचे तेज त्रिभुवनीं पसरून सारे त्रिभुवन प्रकाशित झाले.एका जनार्दनीं सांगतात, देहांत देव समरस व्हावा तसा ब्रह्मज्ञानाचा प्रकाश अंतरंग व्यापून राहिला.


2478


जेथें परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरू ॥१॥
तेणें माझें मना जाहलें समाधान । निरसला शीण जन्मोजन्मीं ।।२।।
उपाधी तुटली शांति हे भेटली। सर्व तेथे आटली तळमळ ॥३॥
एका जनार्दनीं प्रेमाचे ते प्रेम । दाविले सप्रेम हृदयांत ।।४।।


भावार्थ


जेथे परा आणि पश्यंती वाणीची भाषा मावळते (कुंठित होते ) तेथे सद्गुरू स्वज्ञानाचा प्रकाशदीप प्रकाशित करतात. या गुरूकृपेने जन्मोजन्मीचा अज्ञान अंधकार नाहीसा होऊन मनाला अतीव समाधानाचा लाभ झाला.सर्व उपाधींचे निरसन होऊन चित्त शांत-निवांत झाले.अंतकरणांतिल तळमळ समूळ नाहिसी झाली.एका जनार्दनीं म्हणतात,सद्गुरूंच्या अपार प्रेमाचा साक्षात्कार ह़दयांत झाला.


2479


उदार विश्वाचा दीपकु तेजाचा। प्रकाशु कृपेचा दावियेला ।।१।।
हारपले विश्व विश्वंभरपणे । दाविले जनार्दर्ने स्वयमेव ।।२।।
अकार उकार मकार शषबट। घेतिलासे पोट परब्रह्मीं ॥३॥
एका जनार्दनीं विदेह दाविला । सभराभरी दाटला हदयामाजीं ॥४।।


भावार्थ


एका जनार्दनीं या अभंगात सांगतात, जनार्दन स्वामींच्या कृपेने देहबुध्दी लयास जाऊन आत्मबुध्दी उदयास आली. विश्वंभर परब्रह्म स्वरूपाने विश्व व्यापले आहे याची प्रचिती आली.अकार (ब्रह्मा) उकार ( विष्णू) मकार (महेश) ही सर्व एका परब्रह्माची रूपे आहेत याची खात्री पटली. जनार्दन स्वामी उदार अंत:करणाचे असून ज्ञानदीप आहेत. या पारमार्थिक सत्याच्या दर्शनाने विदेहीपणाची भावना ह़दयांत दाटून आली.


2480


देहाची आशा टाकिली परती । केलीसे आरती प्रपंचाची ।।१।।
स्थूल सूक्ष्म यांची रचूनियां होळी। दावामि पाजळी भक्तिमंत्रे ।।२।।
एका जनार्दनीं देहासी परण। विदेही तो जाण जनार्दन ॥३॥


भावार्थ


देहाची आसक्ती सोडून स्थूल, सूक्ष्म ,कारण, महाकारण या चारी देहाची होळी ( देहबुध्दीचा त्याग केला ) केली. प्रपंचाची सांगता केली.मनाने प्रपंचाचा त्याग केला. एका जनार्दनीं अभंगाच्या शेवटच्या कडव्यांत देहबुध्दीचा त्याग करून विदेही बनल्याची ग्वाही देतात.


2481


फिरलों मी दशदिशा। वायां सोसा हाव भरी ।।१।।
नाहीं जाहले समाधान । वाउगा शीण जाहला पोटीं॥२॥
उरला हेत पंढरीसी। सुखरासी लाधली ।।३।।
एका जनार्दनी सुखाचे भांडार । जोडिले निर्धार न सरेची ॥४॥


भावार्थ


परमेश्वर दर्शनाची अभिलाषा धरून दाही दिशा फिरूनही मनाचे समाधान झाले नाही. निरर्थक शीण झाला या भावनेने निराश झालो.पंढरीस जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा हेतू मनांत धरून पंढरीस आलो आणि सुखाचे भांडार लाभल्याचा परमानंद मिळाला. असा स्वानुभव एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.


2482


आणिकांची धरितां आस। होतो नाश जीवित्वा ।।१।।
म्हणोनि निर्धारिलें मन । धरिलें ठाणे रामकृष्ण ॥२॥
न धांवें आतां कोठे मन । हृदयीं ध्यान धरिलें तें ।।३।।
एका जनार्दनी प्राण । ठेविला जाण समूळ चरणीं ।।४।।


भावार्थ


कोणत्याही एका गोष्टीवर मन स्थिर न करता अनेक गोष्टींची अभिलाषा धरल्याने जीवनांत कोणतेही यश मिळत नाही.असा विश्वास धरून मनाचा निश्चय केला.ह़दयांत रामकृष्ण या देवतांची स्थापना करून त्यांचे ध्यान धरण्याची मनाला आज्ञा दिली. आतां चंचल मनाची धाव संपली.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, रामकृष्ण चरणीं काया वाचा मनाने प्राण अर्पण केला.


2483


मागें बहुतांसी सांभाळिलें। ऐसें वरदान ऐकिलें ॥१।।
म्हणवोनी धरिला लाहो।मनींचा संदेहो टाकुनी ।।२।।
अजामेळ पापराशी। नेला निज नित्य वैकुंठासी ।।३।।
तारिले उदकी पाषाण । ऐसें महिमान नामाचें ।।४।।
एका जनार्दनीं जाहलों दास । नाहीं आस दुसऱ्याची ||५||


भावार्थ

नामाचा अगाध महिमा असा आहे कीं, सेतू बंधनाचे वेळी केवळ रामनामाने पाषाण पाण्यावर तरंगले.पापराशी असा अजामेळ सुध्दां रामनामाने उध्दरला.त्याला वैकुंठ पदाची प्राप्ती झाली.अशा प्रकारे अनेकांना वरदान देवून त्यांचा सांभाळ केला.अशा अनेक कथा ऐकून मनातिल संदेह दूर झाला.ईतर कुणाचिही आशा न धरतां केवळ जनार्दन स्वामींच्या चरणीं शरणागत झालो असे एका जनार्दनीं म्हणतात.


2484


उपाधीच्या नांवें घातियेलें शून्य । आणिका दैन्यवाणे काय बोलूं ।।१।।
टाकूनियां संग धरियेला देव । आतां तो उपाय दुजा नाहीं ।।२।।
सर्व वैभव सत्ता जयाचे पदरीं । जालों अधिकारी आम्ही बळें ॥३॥
एका जनार्दनीं तोडियेला संग। जालो आम्ही नि:संग हरिभजनीं ॥४||


भावार्थ


अनेक उपाधींचा त्याग केला. संसाराचा संग सोडून देवाची संगती जोडली. दुसरा कोणताही उपाय न करता सर्व प्रकारच्या वैभवाचा जो अधिपती आहे त्या परमेश चरणी लीन झालो.एका जनार्दनीं सांगतात,सर्वांचा संग सोडून नि:संग होऊन हरिभजनीं मग्न झालो.


2485


सकळ प्रपंचाचे भान । ते तंव मृगजळासमान ।।१।।
जन्ममरणापरता। त्रिगुणातें नातळता ।।२।।
प्रपंचाची अलिप्त युक्ति। ऐसी आहे देहस्थिती ।।३॥
प्रपंर्ची न दिसे भान । एका शरण जनार्दन ||४||


भावार्थ


प्रपंचातिल सुखदुःखाचे भान मृगजळ सारखे फसवे आहे.कौटुबिक नातीगोती, सगेसोयरे कांही दिवसांचे सोबती असून त्यांच्या पासून अलिप्त वृत्ती ठेवल्यास प्रपंचाचे भान नाहिसे होते.अन्यथा सत्व,रज,तमो गुणांसह जन्म मरणाचे चक्र चालू राहते.असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.


2486


उघड दाखविलें देवा । नाहीं सेवा घेतली ॥१॥
ऐसी प्रेमाची माउली। जगी व्यापक व्यापलीं ।।२।।
नाहीं घालीत भार कांहीं। आठव देही रामकृष्ण ।।३।।
एका जनार्दनी शरण । माझे नेलें चोरून मन ॥४।।


भावार्थ


सद्गुरू जनार्दन स्वामी हे नि:स्वार्थ प्रेम करणाऱ्या माऊली समान असून कोणत्याही प्रकारची सेवा न घेता स्वामींच्या कृपेने परमात्म्याचे प्रत्यक्ष साक्षात्कार झाला.रामकृष्णांचे सतत स्मरण करावे हा उपदेश दिला. एका जनार्दनीं म्हणतात, स्वामींनी मनाची चोरी केली आहे.


2487


मनाचे माथां घातिला धोंडा। वासना कापुनी केला लांडा ॥१॥
जनी लांडा वनी लांडा। वासना रांडा सांडियलें ॥2।।
वासना सांडोनी जालों सांड्या। कामना कामिक म्हणतो गांड्या ।।३।।
कामना सांडे विषयीं लाताडे । एका जनार्दनीं तयाची चाड ।।४।।


भावार्थ

सद्गुरु जनार्दन स्वामींनी मनाच्या सर्व वासनांवर धोंडा घालून त्या समूळ नाहिशा केल्या. जनीं, वनीं सर्वत्र परब्रह्म परमेशाचे रूप दाखवले. संसाराला पारखा झालो.इंद्रिय सुखाच्या कामने पासून मुक्त झालो. एका जनार्दनीं सुचवतात, स्वमींनी ईच्छे प्रमाणे सगळे घडवून आणले.


2488


मनाचें तें मन ठेविलें चरणीं। कुर्वडी करूनी जनार्दनीं ॥१॥
ध्यानाचें तें ध्यान ठेविलें चरणीं । कुर्वडी करूनी जनार्दनीं ॥२।।
ज्ञानाचे ते ज्ञान ठेविले चरणी। कुर्वडी करून जनार्दनीं ॥३||
शांतीची शांती ठेविले चरणीं। कुर्वडी करूनी जनार्दनीं ॥४॥
दयेची ती दया ठेविली चरणीं। कुर्वंडी करूनी जनार्दनीं ॥५||
उन्मनी समाधी ठेविली चरणीं । कुर्वंडी करूनी जनार्दनीं ॥६॥
एका जनार्दनीं देहाची कुर्वंडी। वोवाळोनि सांडी जनार्दनीं ॥७॥


भावार्थ


मन,ध्यान,ज्ञान,शांती,दया,उन्मनी,समाधी ही सर्व भाववाचक नामे असून ती आपल्या कृतीतून,बोलण्यातून,वर्तनातून जगापुढे येतात.या भावनांच्या निर्मितीमागे आंतरिक प्रेरणा असते.या सर्व एका जनार्दनीं गुरूचरणीं अर्पण करतात.मनांत भावना,विचार निर्माण करणारे अंत:करण,देवाच्या मूर्तीसमोर ध्यानमग्न असलेल्या भक्ताच्या अंतरातिल देवदर्शनाचा ध्यास, ज्ञान संपादन करण्यामागची जी प्रेरणा किंवा जिज्ञासू वृत्ती,चंचल मनावर ताब्यांत ठेवणारी अंतरिक शांतता.प्राणिमात्रांवर,दीन दुबळ्यावर दया करणारी अंतरिक सहानुभूती,व्यवहारिक पातळीवरून मनाचे उन्नयन करणारी सद्भावना,सद् विचारास प्रवृत्त करणारी अंतरिक प्रेरणा गुरूचरणांना अर्पून एका जनार्दनीं कृतकृत्य होतात.


2489


एक भाव दुजा न राहो मनीं। श्रीरंगावांचुनी दुजें नाही ॥१॥
मनासी ते छंद आदर आवड। नामामृत चाड़ गोविंदाची ॥२॥
एका जनार्दनीं नाम वाचे गाऊं। आणीक न ध्याऊं दुर्जे काही ॥3।।


भावार्थ


या अभंगात एका जनार्दनीं सद्गुरु जनार्दन स्वामींना विनंती करतात कीं,गोविंदाच्या अमृतसमान नामाची मनाला अशी गोडी लागावी कीं, त्याशिवाय दुसरी कोणतीही भावना मनांत येऊ नये.इतर कशाविषयीची आवड निर्माण होऊ नये.वाचेने श्रीरंगाचे अखंड नाम घेत नाचावे असा छंद जडावा.नामस्मरण शिवाय आणखी कशाचाही ध्यास चित्ताला नसावा.


2490


अवघे देवा तुजसमान । मज नाहीं भिन्न भिन्न ।।१।।
नाम वाचे सदा गाऊं। आवडी ध्याऊं विठ्ठल ॥२॥
वारंवार संतसंग। कीर्तनरंग उल्हास ।।३।।
एका जनार्दनीं सार । विठ्ठल उच्चार करूं आम्ही ॥४॥


भावार्थ

संतांच्या संगतीने वाचेने सदैव विठ्ठलाचे नाम घ्यावे.आवडीने विठ्ठलाचे ध्यान करावे.विठ्ठलाच्या कीर्तनांत संताबरोबर रममाण होऊन उल्हासाने नाचावे.अवघ्या भूतमात्रांत केवळ देवाचे रूप पहावे.सारे भेदाभेद नाहिसे व्हावेत.विठठल हेच जीवनाचे अंतिम सार असावे अशी प्रार्थना एका जनार्दनीं सद्गुरू जनार्दन स्वामींचे चरणी शरणागत होऊन करतात.


2491


भुक्ति मुक्तिचे कारण। नाहीं नाहीं आम्हां जाण ।।१।।
एक गाऊं तुमचें नाम। तेणें होय सर्व काम ||२||
धरलिया मूळ। सहज हाती लागे फळ ॥३॥
बीजाची आवडी। एका जनार्दनीं गोडी ॥४॥


भावार्थ

भगवंताच्या नामाचे सतत गायन करण्यात जो आनंद मिळतो त्यामुळे मानवी जीवनाचे सार्थक होते.सर्व कामना पूर्ण होतात.भुक्ती मुक्तिची लालसा उरत नाही.वृक्षाचे मूळास पाणी घातल्यास आपोआपच फळ हातीं लागते.परमेश्वराचे नाम हे बीज असून त्याची गोडी अवीट आहे असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.


2492

लौकिकापुरता नोहे हा विभाग । साधलें अव्यंग सुखसार ।।१।।
अविट विटेना बैसले वदनीं नाम ।संजीवनी ध्यानीं मनीं ॥२॥
बहुता काळांचें ठेवणे शिवाचें। सनकसनंदाचे कुळदैवत ।।३।।
एका जनार्दनीं भाग्य ते चांगले। म्हणोनि मुखा आले रामनाम ॥४|।


भावार्थ


वाचेला परमेश्वराच्या नामाची अविट गोडी निर्माण झाली. सुखाचे भांडार उघडले.ध्यानी मनीं एकच छंद लागला.जीवनाला नविन संजीवनी लाभली.नामसाधना हा केवळ लौकिकाचा भाग उरला नाही.रामनाम हे सनकनंदांचे कुळदैवत असून पुरातन काळापासून शिवशंकराचा जपमंत्र आहे.रामनामाची अशी थोरवी वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात,केवळ भाग्य फळाला आले म्हणून रामनामाचा छंद मनाला लागला.


2493


वेदाचा वेदार्थ शास्त्राचा शास्त्रार्थ । आमुचा परमार्थ वेगळाची ।।१।।
श्रुतीचें निज-वाक्य पुराणींचे गुज । आमुचें आहे निज वेगळेंची ।।२।।
तत्त्वांचे परमतत्त्व महत्त्वासी आलें। आमुचे सोनुले नंदाघरीं ।।३।।
एका जनार्दनीं ब्रह्मांडाचा जीव । आमुचा वासुदेव विटेवरी ॥४॥

भावार्थ

वेदांचा शब्दश: अर्थ काढून वादविवाद करणे किंवा शास्त्रार्थ जाणून घेण्याची नस्ती उठाठेव करण्यापेक्षा परमार्थ साधणे सोपे आहे. श्रुतींचे रहस्य किंवा पौराणिक कथांचे सत्य उलगडून दाखवणे या ज्ञानमार्गा पेक्षा भक्तिमार्ग अधिक सोपा आणि आनंद देणारा आहे. नंदाघरी लिला करणारा गोपाळकृष्ण हा सर्व तत्वांचे परम तत्व असून (सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी असलेले आत्मतत्व ) असून तोच भीमेच्या तीरावर भक्तांसाठी विटेवर समचरणीं उभा आहे.असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.

2494

गाढवा सांगाती सुकाळ लाथांचा। श्रम जाणिवेचा वायां जाय ॥१||
आम्हांसी तों एक प्रेमांचे कारण । नामाचे चिंतन विठोबाच्या ॥२॥
एका जनार्दनीं आवडी हे माझी। संतचरण पूर्जी सर्वकाळ ॥३॥

भावार्थ

गाढवाची संगत धरल्यास केवळ लाथा खाव्या लागतात. तसेच मूर्खांशी वादविवाद केल्याने जाणत्या माणसाचे ज्ञान वाया जाते.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,विठोबाचे नामस्मरण हेच प्रेमाचे मुख्य कारण आहे. सदासर्वकाळ संत चरणांचे पूजन आणि विठोबाच्या नामाचे चिंतन ही मनाची अवीट गोडी आहे.

2495

दास्यत्वें चोखट । रामनामें सोपी वाट ॥१॥
करितां लाधले चरण । मना जाहलें समाधान ||२||
होतों जन्मोजन्मी तापलों। तुमचे दरूशनें निवांत ठेलों।|३।।
शरण एका जनार्दनीं। जनार्दन एकपर्णी ||४||

भावार्थ

श्री रामाचे दास्यत्व स्विकारून रामनामाची सोपी वाट अंगिकारली आणि श्रीरामाचा चरणस्पर्श होऊन मनाचे समाधान झाले.जन्म मृत्युच्या फेर्यात अडकून मन अशांत झाले असताना श्री राम दर्शनाने मनाला विश्रांती लाभली. असे सांगून एका जनार्दनीं सद्गुरू जनार्दन स्वामींना भक्तीभावाने शरण जातात.


2496

रामकृष्णनाम । कथा करूं कीर्तन ॥१॥
हाचि आम्हां मंत्र। सोपा दिसे सर्वत्र ॥२॥
संतांचे संगी। मुखीं नामामृत तृप्ती ॥३॥
बसो कीर्तनी सदा। माझी मति गोविंदा ॥४॥
जनार्दनाचा एका म्हणे माझी कीव भाका ।।5।।

भावार्थ

रामकृष्णांच्या गुणांचे कथा कीर्तन करावे हा सर्वांत सोपा मंत्र वाटतो.संतांच्या संगतीने नामसंकिर्तन केल्याने नामरूपी अमृताने वाणी तृप्त होते.असे सांगून एका जनार्दनीं विनयाने म्हणतात, सतत नामसंकीर्तन करण्याची मती सद्गुरु जनार्दन स्वामींनी कृपा करून प्रदान करावी. अशी विनवणी गुरूचरणी करतात.


2497

चरणाची सेवा आवडी करीन । कायावाचामन धरूनी जीवीं ॥१॥
यापरतें साधन न करी तुझी आण। हाचि परिपूर्ण नेम माझा ।।२।।
एका जनार्दनीं एकत्वे पाहीन । हृदयीं ध्याईन जनार्दन ।।३।।

भावार्थ

काया,वाचा मन एकाग्र करून सद्गुरू चरणाची सेवा आवडीने करीन,यापेक्षा वेगळी साधना करणार नाही.हाच नेम परिपूर्णतेने तडीस नेईन असा निर्धार करून एका जनार्दनीं म्हणतात, केवळ सद्गुरू जनार्दन स्वामींना ह़दयांत धारण करून त्यांचे ध्यान करीन असे एका जनार्दनीं अभंगाच्या शेवटीं म्हणतात.


2498


मागें बहतजनांनी मानिला विश्वास । म्हणोनि मी दास सत्य जाहलों॥१॥
कायावाचामन विकिलें चरणीं। राहिलो धरूनी कंठी नाम ।।२।।
एका जनार्दनीं नामाचा प्रताप। भक्त आपोआप तरताती ॥३॥


भावार्थ


सद्गुरु जनार्दन स्वामींनी नामाचा असा प्रताप सांगितला आहे कीं, नामसाधना करणारे साधक संसार सागर सहज पार करून जातात.या वचनावर अनेकांचा विश्वास असल्याने जनार्दन स्वामींचे दास्यत्व स्विकारले.काया वाचा मनाने स्वामींना शरणागत झालो आणि रामकृष्ण नाम कंठी धारण केले.असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.


2499

वायांविण करूं नये बोभाट । सांपडली वाट सरळ आम्हां ।।१।।
आतां नाहीं भय तत्त्वतां । ठेविला माथा चरणावरी ॥२॥
धरिल्या जन्माचे सार्थक । निवारला थोर धाक ॥३॥
गेला मागील तो शीण। तुमचे दरूशन होतांची ।।४।।
पूर्णपणे पूर्ण जाहलों । एका जनार्दनीं धालो ।।५।।


भावार्थ

कोणत्याही गोष्टीची प्रचिती आल्याशिवाय तिचा लोकांमध्ये उच्चार (बोभाट) करू नये हा विचार केला आणि भक्ति मार्गाची सरळ वाट सापडली तेव्हां सद्गुरू चरणावर माथा टेकवून शरणागत झालो.जन्माला आल्याचे सार्थक झाले. मनातील सारे भय संपून गेले.सगळा शीण नाहिसा झाला.सद्गुरू जनार्दनस्वामींचे दर्शन होतांच जीवनाला परिपूर्णता लाभली.मनाचे पूर्ण समाधान झाले.हा स्वानुभव एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.

2500

अवघा व्यापक दाविला । माझा संदेह फिटला ||१||
मन होतें गुंडाळलें। आपुले चरणी पैं ठेविलें ॥२॥
केलें देहाचे सार्थक । तुटला जन्ममरण धाक ॥३।।
नाहीं पहावया दृष्टी। अवघा जनार्दन सृष्टी ॥४॥
कार्यकारण हारपले द्वैत अवघे निरसलें ।।५।।
उडालें वैरियाचे ठाणे। आतां एकचि जहाले एकपणे ॥६।।
दुजा हेत हारपला । एका जनार्दनीं एकला ||७||


भावार्थ

सर्व चराचर सृष्टींत व्यापून राहिलेल्या परब्रह्म परमात्म्याचे दर्शन झाले आणि मनातिल संदेह संपून सारे भेदाभेद नाहिसे झाले. जन्ममरणाचे भय संपून गेले.मनुष्य देह धारण केल्याचे सार्थक झाले.कार्य आणि कारण यातिल द्वैत संपून गेले. वैरभावनेचा संपूर्ण निरास झाला.आपपर भाव लयास गेला. सारी सृष्टी सद्गुरू कृपेने भरून गेली.जीवनाचा दुसरा कोणताही हेतू शिल्लक राहिला नाही.मनाने एका जनार्दनीं सद्गुरु चरणांसी एकरूप झाले.


2501

सखीये अनुतापें वैराग्यता अति संतप्त नयनीं।
अश्रु अंगी स्वेद रोमांच जीवीं जीव मूर्छित वो ॥१॥
माझें मजमाजी गुरूकृपा मन तें जालें उन्मन वो।
देहीं देह कैसा विदेह जाते क्रिया चैतन्यघन वो॥२॥
माझें मीपण पहातां चित्तीं चित्त अचिंत वो।
वृत्तिनिवृत्ति तेथें चिद्रूप जाली परमानंदें तृप्त वो॥३॥
एका जनार्दनीं एकत्वें जन वन समसमान एक ।
एकपणे परिपूर्ण जाला त्रैलोक्य आनंदघन वो॥४॥


भावार्थ

गुरूकृपेने मनाचे उन्मन झाले,मन व्यवहारिक पातळीवरून उच्चतम पातळीवर पोचले.चित्ताची देहबुध्दी नाहिसी होऊन देह विदेही झाला.मनाचे मीपण (अहंकार )लयास गेला.वृत्तीची निवृत्ती झाली.मन चैतन्यघन होऊन परम आनंदाने तृप्त झाले.सर्वत्र चैतन्यमय परमेश्वराची अनुभूती येऊन जन आणि वन समान भासू लागले.अनुतापाने संसाराविषयी वैराग्य निर्माण झाले.डोळ्यांत अश्रु दाटून आले.अंगावर रोमांच उभे राहिले.सर्वांगाला घाम सुटला.सारे त्रैलोक्य आनंदाने भरून गेले. एका जनार्दनीं म्हणतात, गुरूकृपेने जीवन परिपूर्ण झाल्याची अनुभूती देणारा हा विस्मयकारक अनुभव होता.


2502

असोनी देही आम्ही विदेही भाई। नातळों कर्म अकर्माचे ठायी ॥१॥
माझें नवल म्यांच पाहिले डोळां । शब्द निःशब्द राहिलों वेगळा ॥२॥
काय सांगू नवलाची कहाणी। पाहते पाहणे बुडाले दोन्ही ॥३॥
न पहावें न देखवें नायकावें कानीं। कायावाचामनें शरण एका जनार्दनीं ॥४॥


भावार्थ

देहाने जगांत वावरत असूनही देहभावना नष्ट झाल्याने मन विदेही झाले.कर्म करीत असूनही मी करतो हा कर्तेपणाचा अहंकार गेल्याने ते अकर्म झाले.शब्दांचे प्रयोजन संपल्याने वाचा कुंठीत झाली.पाहणारा, पाहण्याची क्रिया आणि देखावा एकरूप झाला.पहाणे,ऐकणे,बोलणे या क्रिया शुन्यवत झाल्या.गुरूकृपेने हे नवल घडून आले.हे पाहून काया,वाचा,मनाने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी शरणागत झालो.


2503

जाहली गेली तुटली खुंटली हाव । पहातां पाहणे एकचि जाहला देव ॥१॥
जंगम स्थावर अचळ चळाचळ। अवघा व्यापुनी राहिला अकळ ।।२।।
न कळे लाघव खेळ खेळे करूणादानी। कायावाचामने शरण एका जनार्दनीं ॥३॥


भावार्थ

देव भक्त आणि दर्शन या क्रिया एकरूप होऊन सगळ्या चराचर सृष्टींत केवळ परमात्म तत्व व्यापून राहिले आहे असा अनुभव आल्याने मनाचा हव्यास लयास गेला. करूणामय परमेश्वराचे हे लाघव कळेनासे झाले.असा अनुभव सांगून एका जनार्दनीं काया वाचा मनाने सद्गुरु जनार्दन स्वामींना शरण जातात.


2504

देव पाहतां मजमाजीं भेटला। संदेह फिटला सर्व माझा ॥१||
माझा मीच देव माझा मीच देव । सांगितला भाव श्रीगुरूनें ॥२।।
एका जनार्दनी पाहिलासे देव। फिटला संदेह आता माझा ॥३॥


भावार्थ

सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी परमेश्वराचे आत्मरूपाने अस्तित्व आहे हे ज्ञान जनार्दन स्वामींच्या कृपेने प्राप्त झाले असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,आपल्याच अंत:करणांत परमात्म्याचा साक्षात्कार झाला. मनाचा संदेह फिटला.


2505

पहावया गेलों देव। तो मीची स्वयमेव ।।१।।
आतां पाहणेंचि नाहीं। देव भरला हृदयीं ॥२॥
पाहता पाहतां खुंटलें। देवपण मजमाजी आटलें ॥३॥
परतले दृष्टीचे देखणें। अवघा देव ध्यानेमनें ॥४॥
एका जनार्दनीं देव। नुरे रिता कोठे ठाव ॥५।।


भावार्थ

देवाचे दर्शन घेण्यासाठी देवालयांत गेलो असता आपण स्वता:च देव आहोत या सद्गुरू वचनाची प्रचिती आली आणि अंत:करण परमात्म स्वरूपाने भरून गेले.पाहाण्याची क्रियाच खुंटून गेली.मी पण परमेश्वर स्वरूपांत विरून गेले.एकाच परमात्म स्वरूपाने मन व्यापून टाकले.परमात्मा तत्वाने सारे विश्व भरून टाकल्याची जाणीव झाली.मन परमेश्वराच्या ध्यांनांत मग्न झाले.हा अलौकिक अनुभव एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.


2506

कायावाचामनें। कृपाळू दीनाकारणें ॥१॥
ऐसा समर्थ तो कोण। माझ्या जनार्दना-वाचून ॥२।।
माझें मज दाखविलें। उघड वाचे बोलविलें ॥३॥
जनी जनार्दन । एका तयासी शरण ॥४॥


भावार्थ

या अभंगात सद्गुरू जनार्दन स्वामींची थोरवी गातांना एका जनार्दनीं म्हणतात, काया वाचा मनाने दीनांवर कृपा करणाऱ्या जनार्दन स्वामींसारखे समर्थ या जगांत दुसरे कोणी नाही.सद्गुरू कृपेने आराध्य दैवताचे दर्शन झाले.यासाठी जन्मभर त्यांचा शरणागत होऊन ऋणी राहीन.

2507

सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी ॥१॥
त्याचे ठायीं भाव माझा। न दिसे दुजा पालटू ॥२॥
वारंवार ठेवीन डोई। उगेच पायीं सर्वदा ॥३॥
न मागें भुक्ति आणि मुक्ति। संतसंगति मज गोड ॥४॥
त्याचे वेड माझे मनीं। शरण एका जनार्दनीं ॥५।।


भावार्थ

जनार्दन स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं म्हणतात,सर्व देवांचा देवाधिदेव भक्तराज पुंडलिकासाठी पंढरीला विटेवर उभा आहे त्याच्या ठिकाणी भक्तीभाव अर्पण करून चरणांवर वारंवार नतमस्तक व्हावे.भक्ती आणि मुक्तिची लालसा न धरता केवळ संतांच्या संगतीचा लाभ व्हावा,एव्हढा एकच हेतू ह़दयीं बाळगून एका जनार्दनीं सद्गुरूंना शरण जातात.


2508

आजी देखिली पाउलें। तेणें डोळे धन्य जाहले ॥१।।
मागील शीणभारू। पाहतां न दिसे निर्धारू ॥२॥
जन्माचें तें फळ ।आजी जाहले सुफळ ॥३॥
एका जनार्दनी डोळा। विठ्ठल देखिला सांवळा ॥४॥


भावार्थ

विटेवर उभ्या असलेल्या विठोबाच्या पाउलांचे दर्शन झाले आणि डोळ्यांचे पारणे फिटले.जन्मोजन्मीचा शीणभार उतरला.जन्माला येऊन केलेल्या अनन्य भावभक्तीचे फळ पदरीं पडले.एका जनार्दनीं म्हणतात, सावळ्या विठ्ठलाच्या चरणांचे दर्शन हा अलभ्य लाभ झाला.

2509

सायासाचे बळ। ते आजी जाहलें अनुकूळ ॥१॥
धन्य जाहलें धन्य जाहलें। देवा देखिले हदयीं ॥२॥
एका जनार्दनीं संशय फिटला । देव तो देखिला चतुर्भुज ।।३।।

भावार्थ

चार भुजा असलेल्या देवाचे मनोहारी रूप डोळ्यांना दिसले आणि जीवन धन्य झाले.अनेक जन्मींचे भाग्य उदयास आले.परब्रम्ह परमात्मा ह़दयांत साठवला.मनांतले सारे संशय लयास गेले.ही कृतार्थतेची भावना एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.


2510

मज करू दिली नाही सेवा। दाविलें देवा देहींच ॥१॥
जग व्यापक जनार्दन । सदा वसे परिपूर्ण ॥२॥
भिन्न भिन्न नाहीं मनीं । भरलासे जनीं बनीं ॥३॥
एका जनार्दनीं शरण । सर्वाठायीं व्यापक जाण ॥४॥

भावार्थ

विश्वाच्या जनांत आणि वनांत अभिन्नपणे सर्वत्र व्यापक भरून राहिलेल्या परब्रह्म परमात्म्याचे देही दर्शन घडवून आणण्याची किमया जनार्दन स्वामींचा कृपेने घडून आली कोणतिही सेवा न घेता त्यांनी हे उपकार केले अशी कृतज्ञतेची भावना या अभंगात एका जनार्दनीं व्यक्त करतात.


2511

मानसींच ध्यान मानसींच मान । मानसींच अर्चन करूं आम्ही ॥१॥
न करूं साधन लौकिकापुरते। न पुजू दैवत आन वायां ॥२॥
मानसींच तप मानसींच जप । मानसीं पुण्यपाप नाही आम्हां ॥३॥
मानसीं तीर्थयात्रा मानसीं अनुष्ठान । मानसीं धरूं ध्यान जनार्दन ॥४||
एका जनार्दनीं मानसीं समाधी। सहज तेणें उपाधी निरसली ॥५॥


भावार्थ


मनानेच परमात्म्याचे मानस पूजन करणे,मनातच ध्यान मग्न होऊन मूर्तीचे अवलोकन करणे,मनानेच तप,आणि वाणीने जप करणे या मानसिक क्रियांयोगे पापपुण्याच्या भ्रामक कल्पना आणि लौकिकाची अभिलाषा मनांत येत नाही.एका जनार्दनीं सुचवतात,मनाने केलेले अनुष्ठान,तीर्थयात्रा,ध्यान,धारणा आणि समाधी यामुळे जीवनातिल सर्व उपाधी निरसून मनास अपूर्व शांतता लाभेल.


2512


मानसींच अर्थ मानसींच स्वार्थ । मानसीं परमार्थ दृढ असे ।।१।
मानसींच देव मानसींच भक्त। मानसींच अव्यक्त दिसतसे ।।२।।
मानसींच संध्या मानसीं मार्जन। मानसी ब्रहायज्ञ केला आम्हीं ॥३॥
मानसीं आसन मानसी जनार्दन । एका जनार्दनीं शरण मानसींच ॥४॥


भावार्थ

मनातच देवाच्या अव्यक्त मूर्तीची स्थापना करून तिची यथासांग स्नान,संध्या आणि पूजा केल्याने मनांत द्रुढ भक्तिभाव निर्माण होतो.हाच मानसिक ब्रह्मयज्ञ साकार होतो.मनातच सद्गुरुंसाठी आसन तयार करून त्या वर मनानेच जनार्दन स्वामींची स्थापना करून मनानेच त्यांना पूर्ण शरणागत व्हावे असे आवाहन एका जनार्दनीं या अभंगात करतात.


2513


बहुत पुराणें बहुत मतांतरें । तयांच्या आदरें बोल नोहे ॥१॥
शाब्दिक संवाद नोहे हा विवाद । सबाह्य परमानंद हृदयामार्जी ।।२।।
नोहे हैं कवित्व प्रेमरस काढा । भवरोग पीडा दुरी होय ॥३॥
नोहे हे कामनिक आहे निष्कामनिक। स्मरतां नासे दुःख जन्मांतरीचें ॥४॥
एका जनार्दनी माझा तो निर्धार । आणिक विचार दुजा नाहीं ॥५।।


भावार्थ

चारी वेद,साही शास्त्रे,अठरा पुराणे याविषयीं कितीही मतभेद निर्माण झाले असले तरी हे वादविवाद नसून शाब्दिक संवाद आहे.त्यामुळे हृदयात अंतरबाह्य परमानंद दाटून येतो.हे केवळ कवित्व नसून संसार दु:खाची पीडा दूर करणारा प्रेमरसाचा काढा (रसायन) आहे.हे वासना निर्माण करणारे नसून मनाला निष्काम करणारे रसायन आहे.याचे स्मरण होतांच जन्मोजन्मीचे दु:ख निवारण होते.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,हे केवळ मत नसून मनाचा निर्धार आहे यापेक्षा वेगळा विचार नाही.


2514


जो काळासी शासनकर्ता । तोचि आमुचा मातापिता ॥१॥
ऐसा उदार जगदानी । जनार्दन त्रिभुवनीं ॥२॥
आघात घात निवारी । कृपादृष्टी छाया करी ॥३।।
जन तोचि जनार्दन एका जनार्दनी भजन ।।४।।


भावार्थ


प्रत्यक्ष काळाचा जो शासनकर्ता तोच सर्व प्राणिमात्रांचे पालनपोषण करणारा मातापिता असून हा जनार्दन अतिशय उदार आहे.तो सर्वांची संकटे दूर करून आपल्या कृपादृष्टीने सर्वांवर प्रेमाची पाखर घालतो.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,जन हे जनार्दनाचे रूप असून जनसेवा हेच जनार्दनाचे भजन आहे.


2515


आम्हां काळाचे भय ते काय । जनार्दन बापमाय ॥१॥
पाजी प्रेमाचा तो पान्हा । नये मना आन दुजें ॥२॥
दिशाद्रुम भरला पाहीं। जनार्दन सर्वाठायीं ॥३॥
एका जनार्दनीं ध्यात । जनार्दन तो ध्यानाआतं ॥४||


भावार्थ


जनार्दन विश्वांत दाही दिशांमध्ये भरला आहे.सर्वच प्राणिमात्रांत तो आत्मरूपाने वसत आहे.मायबापा होऊन प्रेमाने संगोपन करणारा जनार्दन असतांना काळाचे भय वाटण्याचे कारण नाही.एका जनार्दनीं सांगतात,या परमात्म्याचे निरंतर ध्यान करावे.


2516


स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वावरी सत्ता। नाहीं पराधिनता जिणे आमुचें ॥१॥
नाही त्या यमाचे यातनेचे भय। पाणी सदा वाहे आमुचे घरीं ।।२।।
नाहीं जरामरण व्याधीचा तो धाक। सुखरूप देख सदा असों ॥३॥
एका जनार्दनीं नामाच्या परिपाठीं। सुखदुःख गोष्टी स्वप्नी नाहीं ||४||


भावार्थ

स्वर्ग,मृत्यु,पाताळ या त्रिभुवनांवर ज्याची सत्ता चालते तो पाठिराखा असतांना यम यातनेचे भय बाळगण्याचे कारण नाही.वार्धक्य,मृत्यु,शारिरीक आणि मानसिक व्याधी यांना घाबरण्याची गरज नाही.सदैव सुखासमाधांत,जनार्दनाच्या नामसंकिर्तनांत काल व्यतित करावा.सुखदु:खाच्या गोष्टींचा स्वप्नांत देखिल विचार करू नये असा उपदेश एका जनार्दनीं या अभंगात करतात.


2517


जन्मोजन्मीं आम्ही बहु पुण्य केलें। मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारी झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ।।२।।
भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसे या देवासी मन माझें ।।३।।
आणिका देवासी नेघे माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥४॥
एका जनार्दनीं मज तेथें न्यावें। हाडसोनी द्यावें संतांपार्शी ॥५।।


भावार्थ


या संसारांत जन्माला येऊन विठ्ठलाचे दास्यत्व स्विकारले.पूर्व जन्मांत केलेल्या पुण्याने हा योग जुळून आला.पांडुरंगावर अनन्य विश्वास निर्माण झाला.सुगंधी फुलावर जसा भ्रमर किंवा मधाच्या पोळ्यावर जशी मधमाशी आसक्त होते तसे मन विठ्ठल चरणीं गुंतून पडले.विठोबाच्या गुणांचे गोड गीत गातांना इतके सुख होते कीं,इतर देव देवतांकडे चित्त वळतच नाही.एका जनार्दनीं सद्गुरू जनार्दन स्वामींनी कृपा करावी आणि अखंड संत-संगतिचा लाभ घडावा.अशी मनोकामना अभंगाच्या शेवटी व्यक्त करतात.


2518


अगाध तुझी लीला आकळ कैसेनी कळे। ब्रह्मा मुंगी धरूनी तुझें स्वरूप सांवळे ॥१॥
तुज कैसें भजावें आपणां काय देखावें । तुजपाशीं राहुनी तुजला कैसे सेवार्वे ॥२॥
अगा देव तूं आम्हां म्हणसी मानवी। हेम अलंकार वेगळे निवडावे केवी ।।३।।
एका जनार्दनी सबाह्यभ्यंतरी नांदे। मिथ्या स्वप्नजात जेवीं जाय ते बोधे ।।४।।


भावार्थ


परमेश्वराची अगाध लीला कशी समजून घ्यावी,परमेश्वराची भक्ती,भजन कसे करावे,परमेश्वर चरणीं लीन होऊन त्याची सेवा कशी करावी हे कळत असूनही त्याचे आकलन होत नाही.परमात्म्याचे दृष्टीने मानव रूप असलो तरी त्यापासून वेगळे नाही,सोने आणि सोन्याचा अलंकार वेगळे करता येत नाही.एका जनार्दनीं म्हणतात हे आत्मतत्त्व विश्वाला आंतून बाहेरून व्यापून राहिले आहे.हा बोध झाला कीं,द्वैताचे हे बंधन स्वप्नासारखे विरून जाईल.







२५२३


विटाळेंविण पोटा आला। अवघा संसार मिधा केला ॥
शा लग्न लागतां आला पोटा। मग सोडिले अंतरपाटा ॥२।।
ॐकारेसी बुडाली घडी। लग्न लाविलें औटावे घडीं॥३॥
एका जनार्दनीं लग्न समरसें। पाहों गेलिया त्या लाविलें पिसें ॥४॥




२५२४

बोलू नये तें आलें बोला। आमुचा बाप गरवार जाला ॥१॥
नवलही ऐकिलें ऐका जो तुम्ही चोज। ऐकू जातां तोचि नाचे भोजें ॥२॥
प्रौढ जाली आमुची आई। बापासी नावे त्या टेविली पाही ।।३।।
लेकीने बापासी केले सावेव । एका जनार्दनीं पहा नवलाव ।।४।।



२५२५

अवघ्या संसाराचा कळस जाला। आमुलाची कैसा पोटा आला ॥१॥
पाठी बैसला तोचि पोटीं। उघड्या दिठी देखतसे ।।२।।
अमोल्याचे कुळ न सांगवे तोंडें। सोय धरी तरी सखी भावंडे ।।३।।
पाठी पोर्टी बैसला पाठीं। सोयरीक गोष्टी एका जनार्दनीं ॥४॥



२५२६

बोलणे बोलतां हेंचि दुर्घट । नुपजत लेकासी लाविला पाट ॥१॥
बोलू नये याचे सत्त भण। मौनची राहणे हेचि शहाणपण ।।२।।
तेथील संतति म्हणाल पवित्र । न म्हणतां तरी घात कुळगोत्र ॥३॥
काही एक वेद वॉलं गेला वोली। चवंढाई चिरूनी तीन कांडे गेली ॥४॥
श्वापोनी भक्ती बोलू गेली तोडें। बोल बोले तंव नवखंडें ।।५।।
लडिवाड भक्त बोलोनी हांसे । बोल बोलें तंव लावियेलें पिसें ।।६।।
बोलावला येतो चढला अभिमाना । बोल बोलें तंव दवडिलें राना ||७||
एका जनार्दनीं मौनची घोटी। एकपणे तेंही घातले पोर्टी ॥८॥





२५२७

बाप तोचि पाय होउनी आला पोर्टी। जातक वर्णितां गुंती पडली भेटी॥१॥
बाप की माय म्हणावा पुत्र । भुललीया श्रुति करितां वृत्तान्त ।।२।।
मी बापापोर्टी की बापु माझ्या पोटी। वर्णितां ज्योतिषी विसरले त्रिपुटी ।।३।।
एका जनार्दनीं जातक मौनी। जन्मनाम ठेविलें नि:शब्द देउनी ॥४॥



२५२८

एकाची दिठी एकाचे डोळे। एक चाले कैसें एकाचिये खोळे ॥१।।
सबाह्य अभ्यंतरी सारिखा चांग। दोघे मिळोनियां एकचि अंग ॥२॥
यापरि रिगाली अभिन्न अंगी। दोघे सामावले अंगीच्या अंगी ॥३॥
ऐसें लेकीने बापासी बांधिले कांकण । एका जनार्दनीं केलें पाणिग्रहण ||४||




२५२९


माये आधी लेक जन्मली। दोघींच्या लग्राची आयती केली ॥
शा कोण नोवरा कोण नोवरी। अर्थ पाहतां न कळे निर्धारीं ॥२॥
बापा आधी लेक जन्मला। लग्नाचा सोहळा बापाचा केला ॥३॥
वरात निघाली नोवरा नोवरी । एका जनार्दनी जाहली नवलपरी ।।४।।



२५३०


स्वामीसेवका अबोला। ऐसा जन्मचि अवघा गेला ॥१॥
जन्मवरी जुनें भातें। साधन शिऊं नेदी हातें ॥२॥
काम करूं नेदी हातीं। उसंत नाही अहोराती ॥३॥
श्रद्धेविण अचाट सांगें। ढळो नेदी पुढे मागें ॥४॥
न गणी दिवस मास वरुषी। भागों जातां वहीच पुसी ॥५||
चावा चावीं करूं नेदी। सगळे गिळवी त्रिशुद्धी ॥६॥
जो कां ग्लानी साधन मागें। तेंचि बंधन त्यासी लागे ॥७॥
जो सेवा करी नेटका। त्यासी करूनी सांडी सुडका ।।८।।
झोप लागों नेदी काहीं। निजे निज निजवी पाही ॥१॥
एका जनार्दनीं निज सेवा। जीवें ऊरूं नेदी जीवा ॥१०॥



२५३१


गो गोरसातीत स्वानंद माखरेसी। प्रेमें पेहें पाजीन सख्या सोयऱ्यासी ॥१॥
घेई घेई बाळा घोट एक। झणी पायरव होईल कुशली पडे तर्क ॥२॥
दृश्य न दिसे तें काळी अवघे लावी होटी। सद्युक्तीचे शिंपीवरी गिळी तैसें पोटीं ॥३॥
अंतर तृप्त जालें सबाह्य कोंदलें। निज गोडिये गोडपणे तन्मय जालें ॥४॥
सद्गुरू माउली पेहे पाजी अंगी भरला योग । तेणें देह बुद्धी समूळ केला त्याग |५||
पंचभूतांचें अंगुले सुवर्ण हारपलें। माझें माझें म्हणत होते त्या गुणा विसरलें ॥६।।
आतीची हारली भूक जालें सुख। निजानंदी पालीं पहुडले स्वात्मसुख ॥७॥
पेहे पाजायाचें मिसें देतसे पुष्टी तुष्टी। एका सामावला जनार्दना पोटी ॥८॥




२५३२


नयन तान्हेलें पाजावें काई। मना खत झाले फाडू कवण ठायीं ॥
शा ऐसा कोणीहि वैद्य मिळता का परता। सुखरूप काढी मनाची का व्यथा ।।२।।
डोळ्याची बाहुली पाहता झडपली। तिसी रक्षा भली केवि करूं ॥३॥
निढळींची अक्षरे चुकी कानामात्रे । शुद्ध त्याहावें कैसे लिहिणारें ||४||
जीवाचीया डोळा पडळ आलें। अंजन सुदले केविं जाय ॥५॥
एका जनार्दनीं जाणे हातवटी। पुण्य घेऊनी कोणी करा भेटी ।।६।।




२५३३


धरा अधर जाली वोटंगणे काई। जळे मळे तें ध्यायें कवणे ठायी ॥१॥
ऐसा कोण्हीही गुणीया मिळों का निरूता। भूतें धरे धरी आपुलिया सत्ता ।।२।।
अनि हिवेला तापात्र कोठे। पवना प्राणु नाही कवण लावी वाटे ॥३।।
गगन हारपले पाहावें कवणे ठायी। मन मुखर्जी लागलें शांतीक ते पाही॥४॥
स्वादें जेवणार गिळिला 4 जाणा। चयी सांगावया सांगते कवणा ॥५॥
एका जनार्दनीं जाणे एक खुणे। त्यासी भेटी कोणी घ्या एकपणें ॥६||




२५३४


हे सहजचि थोरावले। पृथ्वी आप तेज झालें।
वायु आकाश संचलें । आनंदले सकलही ॥१॥
तें मोहरी येव चक्र । गगनी हा निर्धार ।
याचा पाहे पां विचार। चैतन्यामाजी ॥
श तेथें वेदासी बोबडी। अनुभवी पैलथडी।
एका जनार्दनीं गोडी। नित्य घेतसे ॥३॥



२५३५


आता आम्ही सहजचि थोर। ब्रह्मा विष्णु महेश्वर ।
परब्रह्म स्वयें ॐकार । परात्मा जगदात्मा ॥१॥
आम्ही सहजचि स्वत:सिद्ध । जागृति सुषुप्ति साध्य ।
तूर्या त्रिसाक्षीणी बोध । अपि अगाध उन्मनीं ।।२।।
ते उन्मनी परात्पर । निर्गुण हो निराकार ।
तूर्या तिचा आकार । एका जनार्द सगुणाकार देह झाला ॥३॥




२५३६


उन्मनीचा हेलावा। तूर्या त्रिनयनीं दावावा।
त्रिगुण तूर्या साठवावा। तें कारण उन्मनीं ।।१।।
हार्ती देऊनि बावन कस। भूमंडळी फिरवा भलत्यास।
नाहीं लांछन हीनकसास। बाळकांत तेवीं तें ॥२॥
एका जनार्दनीं हा बोध । उघड बोलिलों सुबोध ।
अनुभवोनि हा बोध संतचरण धरावे ॥३॥




२५३७


नाभिस्थानी ठेवा हृदयकमळी पहावा। द्विदळी अनुभवा एकभाव ।।१।।
अर्थमा बिंदु पाहतां प्रकार। होउनी साचार सुखी राहे ॥२॥
प्रणव ओंकारू विचार करितां। बिंदूप तत्त्वतां सर्वगत ॥३।।
कुंडलिनी गति सहजचि राहे। सहस्त्रदळी पाहे आत्मरूप ।।४।।
भिन्नभिन्न नाई अवचि स्वरूप। पाहतां निजरूप रूप होय ।।५।।
तेथें कैंचा विचारू कैंचा पां अनाचारू। एक जनार्दनीं साचारू सवा घर्टी ॥६॥




२५३८


रात्रंदिवस जप होती साठ घटिका। संख्या त्याची ऐका निरनिराळी ॥१॥
दो घटिका पळे दहा निमिष दोन। प्रथम तें स्थान आधारचक्र ॥२॥
साडेसोळा घटिका दहा पर्ने लेखा। निमिर्षे तीन देखा स्वाधिष्ठानी ॥३॥
दहा पळें देखा घटिका सोडेसोळा असती। मणिन गणती निमिष चार ।।४।।
आणिक घटि पळे तितुकींची पाही। अनुहत ठायीं निमिष पांच ॥५
पावणेतीन घटिका दहा पळे जाणा। विशुद्धींची गणना निमिष एक ॥६॥
अग्निचक्रावरी पावणे तीन घटिका। दीड पळ देखा निमिष एक ॥७॥
पळ आठ घटिका अडिचाची गणती। निमि चवदा असती सहस्त्रदळीं ॥८॥
सहाशे ते सहस्त्र एकवीस होती। जनार्दनप्राप्ति एका उपायें ॥५॥





२५३९


आंगुलीवरी आंगुली खेळतसे तान्हुली।
पडली तिची साउली। भिन्न माध्यान्ही ॥१॥
दिवसांचे पाहणे । पाहतां दिसे लाजिरवाणे ।
खेळ मांडिला विंदानें । नवल ऐका ॥२॥
बारा सोड घागरी । पाणी नाही थेंबवरी।
नाहायासी बैसली नारी। मुक्त केशें ॥३॥
घरधनी उभा ठेला। ते रांजण उचलिला।
जाउनी समुद्री बुडाला नवल ऐका ॥४॥
नाहतां नारी उठली। परपरुष भेटली
आनंदाने बैसली। निजस्थानी ।।५।।
काळे निळे नेसली। जाउनी दारवंटा बैसली
एका जनार्दनी देखिला। नवल ऐका ।।६।।





२५४०


जगामध्ये काय हालत । ते दृष्टीसी नाहीं भरत ।
अचळ असोनि चळस । चंचळ म्हणत आहे मुठीत ॥१॥
कैसे बोटाने दाखवू तुला। सावध होई गुरुच्या मुला।
हा शब्द अयोज वेगळा अर्थ जाणे सहस्त्रांत विरळा ॥
शा काही नसोनि ते दिसत । नाही म्हणतां सत्य भासत।
आकारी आकार लपत । वाउगे जाणत्यासी भासत ।।३।।
अहं सोहं कोहं लपाला। उघड दृष्टीरूपा आला ।
जगी व्यापक नसोनि व्यापला । एका जनार्दनीं गुरूपुत्र भला ||४|





२५४१


चक्षुदर्पणी जग हे पहा । जगजीवनी मुरूनी रहा।
तूर्या कालिंदि तीथी नाहा। पापपुण्यासी तिळांजुळी वहा ।।१।।
डोळ्यांनो सत्य ही गुरूची खूण। आपुलें स्वरूप घ्या ओळखून ॥धृ०॥
तिन्ही अवस्था सांडुनी मागें। अर्ध चंद्राच्या चांदण्यांत वागे।
चांदणे ग्रासूनि त्या ठायी जागे। गड उन्मनी झडकरी वेगें।।२।।
एवढे ब्रह्मांडफळ ज्या देठी। ते आटले देखण्यांचे पोर्टी।
त्यासी पहातां पाठी ना पोर्टी। मीतूंपणाची पडली तुटी ||३||
चहूं शून्याचा निरसी जेणें। शून्य नाहीं तें शून्यपणे।
शून्यातीतचि स्वयंभ होणें । शून्य गाळूनि निःशून्यपणे ।।४।।
चार सहा दहा बारा सोळा। हा तो आटल्या देखण्याच्या कळा।
कळातीत स्वयंभ निराळा। एका जनार्दनी सर्वाग डोळा ॥५॥



२५४२

एक पंच तीन नवांचे शेवटीं। अठरा हिंपुर्टी जयासाठीं ॥१॥
सात तेरा चौदा घोकितां श्रमले। पंचवीस शिणले परोपरी ।।२।।
तेहतिसां आटणी चाळिसां दाटणी। एकुणपन्नासांची कहाणी काय तेथें ॥३।।
एका जनार्दनीं एकपणे एक। बावन्नाचा तर्क न चालेचि ॥४॥



२५४३


कान्होबा नवल सांगतों गोष्टी। एक वृक्ष दृष्टी देखिला तयावरी सृष्टी ॥१||
कोडें रे कोडे कान्होबा तुझे कोडें। जाणती जाणती अर्थ पाहतां उघडे ॥धृ०॥
वृक्षारी नाही मूळ वर शेंडा नाही सरळ। बावन शाखा पल्लव पन्न पुष्प भरलें सकळ ॥२॥
एका जनार्दनीं वृक्ष सुढाळ। तयांवरी खेळे एक एकुलते बाळ ||३||




२५४४


पंचभूते नव्हती जई । तै वृक्ष देखिला भाई।
अधोभार्गी शेंडा मूळ पाहो । बरी वेंधली तिसी पाय नाहीं ॥१॥
सांगें तूं आमुचे कोडें कान्होबा सांग तूं आमुचे कोडे।
नाहीं तरी जाऊं नको पुढे ॥धृ०।।
नवलक्ष जया शाखा। पत्रपुष्पें तेचि रेखा।
पंचभूते कोण लेखा। ऐसा वृक्ष देखिला देखा ॥२।।
तयावरी एक सीण। तिने खादले त्रिभुवन।
शरण एका जनार्दन। हें योगियांचे लक्षण रे ।।३।।




२५४५


सगुण निर्गुण नोहे वृक्ष। पाहतां नेत्रीं न भासे सादृश्य।
देखतां देखत होतो अदृश्य ।।१।।
सांग रे कान्होबा हे कोडें। तुझे तुजपाशी केले उघडे ।
आम्हां न कळे वाडेंकोडें ॥२॥
एक मुळी वृक्ष देखिला। द्विशाखां तो शोभला।
पाहतां पेंत्र पुष्पें न देखिला ॥३॥
ऐसे वृक्ष अपरंपार । एकाजनार्दनीं करा विचार ।
मग चुकेल वेरझार ।।४।।




२५४६


अलक्ष अगोचर म्हणती वृक्ष । तो दृष्टी न दिसे साक्ष।
योगी म्हणती पाहिलालक्ष ॥१॥
कान्होबा तुझें कोडें। तुजपुढे केलें उपर्डे ।
सांगता वेद जाहले वेडे रे ||२||
सहा असा मिळणी। छत्तिसांचे घातले पाणी।
तो वृक्ष देखिला नयनी रे ॥३॥
पंचाण्णवाची एक शाख। एका जनार्दनीं वृक्ष देखा।
अर्थ पाहतां मोक्ष रेखा रे ॥४॥





२५४७


अहं सोहं वृक्षा तो निघाला वोहं ।
याचा शेंडा नाहीं पा कोठे कोहं ॥१॥
कानोग उघड माझें कोडे
बोल बोलतो साबडे । अर्थ करी कां रे निवाडे ॥२
शा वृक्ष जाहला मन पवन । तो सहजचि हवन ।
वृधे वेधलें चराचर गहन रे ।।३।।
वृधे भेदिले आकाश। एका जनार्दय निरवकाश ।
वृक्षचि जाहला अलक्ष रे ।।४।।



२५४८


नीळवर्ण वृक्ष तो अति दृश्य । पाहतां सावकाश दृष्टी न पडे||१||
मलें में कान्होबा हैं तुझे। लय लक्षा न कळे म्हणती माड़ों आणि तुझें ।।२।।
हो वृक्षाची योळख धरा वरी निवृत्ति ज्ञानदेव सोपान अधिकारी ॥३।।
एका जनार्दनीं वृक्ष सगुण निर्गुण। जाहला पुंडलिक कारणें ब्रह्म सनातन ॥४॥



२५४९


वृक्ष व्याला आकाश पाताळ। वृक्षी प्रसवले लोकपाळ।
अठ्यांशी सा ऋषिमंडळें ॥१॥
कान्होबा बोलों तुझें कोडें। अर्थ ऐकतां ब्रह्म जोडे।
अभक्त होती केवळ रे॥२॥
वृक्षाअंगी पंचभूतें। प्रसवला तत्त्वे निरूतें ।
अहं सोहं पाहतां तें होतें ।।३।।
एका जना पाहिला वृक्ष । गुरूकृपें वोळखिला साक्ष।
भेदभाव गेला प्रत्यक्ष रे ।।४।।



२५५०


निर्गुण निराकार वृक्ष आकारला । पंचतत्वें व्यापक जाहला ॥१||
कान्होबा हे बोल माझें कोडें । पंचविसांचे ध्यानीं नातुडे रे ॥२॥
साठ ऐशी शोभती शाखा । नवलक्ष पल्लव भाग रे ॥३।।
चौऱ्यांयशी लक्षांची मिळणी । वृक्षरूपी एका जनार्दनीं देखा रे ।।४।।



2551


ॐकार हा वृक्ष विस्तारिला। चतुःशाखें थोर जाहला ।
पुढें षडंतर शाखें विस्तारअठरांचा तया मोहोर आला ॥१॥
उघडे माझें कोडें । जाणती न जाणती ते वेडे।
पडलें विषया सांकडें । तया न कळे हे कोडे रे ।।२।।
चौांयशी लक्ष पत्रे असती। सहस्त्र अठ्यायशी पुष्पे शोभती।
तेहतीस कोटी फळे लोंबती। ऐशी वृक्षाची अनुपम्य स्थिती रे ॥३॥
आदि मध्य पाहतां न लगे मूळ । एकवीस स्वर्ग सप्त पाताळ ।
एका जनार्दनीं वृक्ष तो सबळ। उभा विटे समूळ वो ॥४॥


भावार्थ

ॐकार वृक्ष बहरला तो चार शाखांमध्ये विस्तार पावला.नंतर सहा शास्त्रे निर्माण झाली.अठरा पुराणांचा मोहर फुटला.चौर्यांशी लक्ष प्राण्यांच्या योनींची पालवी फुटली.एक हजार अठ्यांशी पुष्पांचा बहर येऊन वृक्ष शोभायमान झाला.कालांतराने तेहतीस कोटी फळे लोंबू लागली.या अश्वस्थ वृक्षाचे अनुपम स्वरूप नजरेंत भरत होते पण त्याचे मूळ मात्र अगम्य वाटत होते.एकवीस स्वर्ग आणि सात पाताळ यांना व्यापून राहिलेला हा वृक्ष अतिशय सबळ असून पंढरीला विटेवर समचरणीं उभा आहे असे एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.


2552


वृक्ष पहातां परतला आगम। निगमा न कळे दुर्गम ।
वेदशास्त्रांसी निरूते वर्म।'वृक्ष देखिला विट्ठलनाम॥१॥
माझे सोपें कोडें। कान्होबा करी तूं निवाडे।
अर्थ सखोल ब्रह्मा भक्तिभाव तयासि उघडे रे ।।२।।
साहांची येथे न चाले मती। चार गुंतले न कळे गती।
अभाटीव वर्णिती। ऐशियासी न कळे स्थिती रे ।।३।।
चौऱ्यांशी लक्ष भुलले वायां । अयांशी सा भोगिती छाया ।
तेहतीस कोटी न कळे आयतया। एका जनार्दनीं लागे पायां रे ॥४


भावार्थ


या वृक्षाचे स्वरुप जाणून घेणे आगमा-निगमास दुर्गम (कठिण) वाटले.वेदशास्त्रांना त्याचे रहस्य उलगडून दाखवता येईना.चारी वेद आणि साही शास्त्रे यांची मती कुंठित झाली.चौर्यांशी लक्ष योनितून फिरणारे तेहतीस कोटी मानव या विठ्ठलनाम वृक्षाला पाहून स्तंभित झाले असे वर्णन करुन एका जनार्दनीं या वृक्षाला आदराने वंदन करतात.


2553


सोपा वृक्ष फळासी आला। विठ्ठलनामें विस्तारला ॥१॥
वेदां न कळे मूळ शास्त्रे भांडती पैं तोंडा ।।२।।
पुराणें स्तवितां व्याकुळ जाहलीं। निवांत होऊनियां ठेली ॥३॥
वृक्ष जनार्दन । एका जनार्दनीं विस्तार पूर्ण ।।४।।


भावार्थ


सहज सोपा भक्तीभावाचा हा वृक्ष फळाफुलांनी बहरून आला.विठ्ठलनामाने त्याचा विस्तार झाला.चारी वेदांना या वृक्षाचे मूळ हाती लागेना.साही शास्त्रे वादविवाद करून थकली.याच्या स्वरूपाचे वर्णन करताना अठरा पुराणे नि:शब्द झाली.असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात,जनार्दन नावाचा हा वृक्ष जनमानसांत पूर्ण विस्तार पावला.


2554


एक दोन तीन विचार करती। परि न कळे गति त्रिवति ॥1।।
त्रिरूप सर्व हा मायेचा पसार। त्रिवर्ग साचार भरले जग ।।२।।
त्रिगुणात्मक देह त्रिगुण भार आहे । त्रिमूर्ती सर्व होय कार्यकर्ता ॥३॥
एका जनार्दनीं त्रिगुणांवेगळा। आहे तो निराळा विटेवरी ॥४॥


भावार्थ


ब्रह्मा,विष्णू,महेश या त्रिमूर्ती या जगाचे निर्माते असून ते प्रमुख कार्यकर्ते आहेत.मानवी देह सत्व,रज,तम असा त्रिगुणात्मक आहे.सात्विक,राजस,तामस या तीन प्रकारच्या व्यक्तींनी जग व्यपलेले आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,या त्रिगुणात्मक सृष्टीच्या पलिकडे त्रिगुणांपासून अलग असलेला परब्रह्म परमात्मा पंढरीत विटेवर समचरणी उभा आहे.


2555

चार देह चार अवस्था समाधी। कासया उपाधि करिसी बापा ||१||
चार बेद जाण चार युगें प्रमाण । पाचवे विवरण न करी बापा ।।२।।
जनार्दनाचा एका चतुर्थ शोधोनी। पांचवे ते स्थानी लीन झाला ॥३॥


भावार्थ


सुक्ष्म, स्थूल,कारण आणि महाकारण हे चार देह,ध्यान,धारणा,समाधी,या अवस्था,सामवेद,ऋग्वेद,यजुर्वेद,अथर्ववेद हे चार वेद या शिवाय ईतर गोष्टींचा विचार करण्याचे कारण नाही. सत्ययुग,त्रेतायुग,द्वापारयुग, कलियुग या चार युगांशिवाय पाचव्या युगाचे स्पष्टीकरण करणे अवघड आहे.जनार्दन स्वामींचा शरणागत एका जनार्दनीं ही चारी युगे शोडून पांचवे स्थानी (विठ्ठलपायीं) लीन झाला.


2556


पंचक पंचकाचा पसारा पांचांचा। खेळ बहुरूपियां पांचापासोनी ॥१||
पृथ्वी आप तेज वायु आकाश जाण। पंचकप्राण मन पांचांमार्जी ।
इंद्रियपंचक जाण ते पंचक। कर्म ते पंचक जाणे बापा ||३||
धर्म तो पंचक सान ते पंचक। ध्यान ते पंचक जाणे बापा ॥४||
एका एकार्दनीं पंचका वेगळा । पाहे उघडा डोळा विटेवरी ॥५||


भावार्थ


पृथ्वी,जल,अग्नी,वायु,ही पंचमहाभूते एकवटून या सृष्टीची निर्मिती झाली असे आपले धर्मग्रंथ वर्णन करतात.मानवी देहातिल पंच प्राण,अपान,व्यान, उदान,समान हे मनाने व्यापले आहे.पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिये असून धर्म,सान,ध्यान ही पंचके मानली जातात.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या पंचका पासून वेगळा असा पंढरीचा विठोबा भक्तांसाठी अठ्ठावीस युगे विटेवर समचरण ठेवून उभा आहे.


2557

सहा ते भागले वेवादती सदा। सहांची आपदा होती जगीं ।।१।।
सहांचे संगती घडतसे कर्म। सहा तो अधर्म करिताती ॥२॥
सहांचे संगती नोहे योगप्राप्ती। होतसे फजिती सहायोगें ।।३।।
एका जनार्दनीं सहांच्या वेगळा । सातवा तो आठवो मज वेळोवेळां ॥४||


भावार्थ


सहा शास्त्रांत मतमतांतरे आहेत,हरविशेष हरी गौण (शिवशंकर आणि विष्णु यामध्ये श्रेष्ठ कोण) यासारखे वादविवाद होतात आणि ते थकून जातात.काम,क्रोध,मद,मत्सर,दंभ आणि अहंकार हे सहा सड् रिपू असून त्यांच्या संगतीने अनुचित कर्मे केली जातात.अधर्म घडून येतो.योगप्राप्तीची संधी मिळत नाही.समाजात अपकिर्ती होते.एका जनार्दनीं सांगतात,या सहा शत्रुंपासून वेगळा असा सातवा जो आहे त्याचे सदैव स्मरण करावे.


2558


सातवा तो सर्वांठायीं वसे। शंकरादिक ध्याती तया ।।१।।
तो सातवा हृदयींआठवा । आठवितां तुटे जन्ममरण ठेवा ॥२॥
सातवा हृदयीं घ्यावा जनीं वनीं पहावा । पाहूनियां ध्यावा भनामाजीं ।।३।।
एका जनार्दनीं सातवा वसे मनौं। धन्य तो जनीं पुरूष जाणा ।।४।।


भावार्थ


शिवशंकर सदोदित ध्यानमग्न होऊन ज्याचे नामस्मरण करतात तो सातवा पुरुषोत्तम ह़दयांत धारण करून त्याचे नित्य स्मरण करावे.त्याच्या पुण्यस्मरणाने जन्ममरणाचे बंधन तुटून पडते.जनीवनी सर्वत्र व्यापून राहिलेल्या या परमेश्वराचे सतत ध्यान करावे.एका जनार्दनीं सांगतात,या सातव्या पुरुषोत्तमाचा ज्याला ध्यास लागतो तो पुरूष धन्य होय.


2559


आठवा आठवा वेळोवेळ आठवा । श्रीकृष्ण आठवा वेळोवेळां ॥१॥
कलीमार्जी सोपें आठवा आठवण। पावन तो जन्म आठव्याने ॥२॥
आठवा नामें तरी पांडवा सहाकारी । दुराचारियां मारी आठवा तो॥३॥
एका जनार्दनी आठव्याची आठवण। हृदयी सांठवण करा वेगीं ॥४॥

भावार्थ


श्रीकृष्ण हा परमात्म्याचा आठवा अवतार असून त्याचे सदोदित स्मरण करावे.कलियुगात जन्म सार्थक करण्याचे सहज सोपे साधन आहे.सदाचारी पांडवांचा सहाय्यक होऊन दुराचारी कौरवांचा विनाश करणार्या या श्रीहरीची ह़दयांत साठवण करावी.त्यामुळे हा मानवी जन्म पावन होतो.असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.


2560


नववा वसे स्थिररूप । तया नाम बौद्धरूप ॥१॥
संत तया दारी। तिष्ठताती निरंतरीं ॥२॥
पुंडलिकासाठी उभा। धन्य धन्य विठ्ठल शोभा ।।३॥
शोभे चंद्रभागा तीर। गरूड हनुमंत समोर ॥४॥
ऐसा विठ्ठल मनी ध्याऊं। एका जनार्दनीं त्याला पाहूं ।।५।।


भावार्थ


बोधी वृक्षाखाली स्थिर आसन घालून ज्याने मानवी जीवनातील दु:खाचा परिहार करणारे ज्ञान संपादन करून बौध्द धर्माची स्थापना केली तो परमात्म्याचा नववा अवतार मानला जातो.भक्तराज पुंडलिकासाठी समचरण विटेवर ठेवून उभा असलेल्या विठ्ठलाची शोभा अवर्णनीय आहे.चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठलासमोर गरूड हनुमंत उभे ठाकले आहेत.अशी मनमोहक विठ्ठल मूर्ती मनामध्ये धारण करून त्याचे दर्शन घेण्यासाठी सारे संत तेथे तिष्ठत उभे राहतात असे एका जनार्दनी म्हणतात.


2561

मूळची एक सांगतों खूण। एक आधी मग दोन।
तयापासब चार तीन । व्यापिलें पांचे परिपूर्ण ॥१॥
तें भरूनी असे उरलें। सर्वां ठायीं व्यापियेलें।
जी स्थळी सर्व भरलें। शेखीं पाहवां नाहीं उरलें ॥२।।
निवृत्ति ज्ञानदेव सोपान। हेचि जाणती प्रेमखूण।
समाधी पावले समाधान । नाहीं उरले भिन्नाभिन्न ।।३।।
शरण एका जनार्दनीं । खूण बाणली निजमनीं।
व्यापक दिसे तिहीं निभुवनीं । गेला देहभाव विसरूनी ॥४।।


भावार्थ


सर्वांआधी आत्मतत्त्व निर्माण झाले,त्यानंतर परमात्म शक्ती माया रूपाने उदयास आली.पृथ्वी,आकाश, वायू,आप,अग्नी ह्या पंचमहाभूतांनी सर्व व्यापून टाकले. ही पंचभूतात्मक सृष्टी निर्माण झाली.निवृत्ती,ज्ञानेश्वर, सोपानदेव यांना बोध झाला.ज्ञानेश्वरी सारखा काव्यत्मक ग्रंथ निर्माण झाला.आणि ते कृतकृत्य होऊन समाधींत लीन झाले.एका जनार्दनीं म्हणतात,जनार्दन स्वामींच्या कृपेने हे व्यापक तत्व मनांत ठसले आणि सारा देहभाव नाहीसा झाला.


2562


एक एक म्हणती सकळ लोक। पाहतां एका एक हरपलें ॥१॥
एकाविण एक गणीत नाहीं देख। ते नित्य वोळख निजी आत्मीया रे ।।२।।
त्वंपद असिपद नाहीं। ठायींच्या ठायीं निवोनि पाही ॥३।।
सच्चिदानंद तिन्ही नाम माया। सूक्ष्म कारण तेथें भुलू नको वायां ॥४॥
अहं तें मी पण सोहं तें तूंपण । अहं सोहं सांडोनि पाहें निजकानन ॥५॥
एका जनार्दनीं सांडी एकपण। सहज चैतन्य तेथे नाही जन्ममरण ||६||


भावार्थ


एकच आत्मतत्त्व सर्व विश्व व्यापून उरले आहे हे सर्व लोक जाणतात.या आत्मतत्त्वा शिवाय बाकी सर्व केवळ शून्य भासते हे ओळखून या नित्य निज आत्म स्वरूपाची ओळख करून घ्यावी.या आत्मतत्वांत मी तू पणाचा भाव नाही.सत्,चित्,आनंद ही तिन्ही नामे आत्मतत्वा शिवाय केवळ माया समजावी.अहं ही केवळ मीपणाची जाणिव असून सोहं हे तूं पण सुचवते.या मी तू पणाचा त्याग करून परमात्म स्वरुप जाणून घेण्यासाठी अरण्यवास स्विकारावा असे सांगून एका जनार्दनीं सांगतात,चैतन्यमय आत्मतत्वांत जन्ममरणाची वार्ता नसते.


2563

लक्ष गांवे तरणी। पृथ्वी व्यापी निज किरणी।
तो साक्षी अलिमपणीं। मेबांच्या तेथें ॥१॥
तैसा आत्मा देहीं। म्हणती त्यासी ज्ञान नाहीं।
तो व्यापूनी सर्वा ठायीं राहिला असे ॥२॥
सदगुरूमुखींचा विचार। जयासी माला साक्षात्कार ।
उदेला ज्ञानभास्कर। अहार-तिमिरौं ॥३॥
हिरवा पिवळा । संगे रंग जाला निळा स्फटिक या वेगळा।
आत्मा तैसा । तैसी ज्ञानकिल्ली।
जयाचे हातां आली । तयाने उगविली अज्ञान कुलुपें ।।५।।
एका जनार्दनाचा रंका त्याचे बोधे कळला विवेक।
पूर्ण बोधाचा अर्क उदया आला ||६||


भावार्थ


पृथ्वीवरील असंख्य गांवे आपल्या प्रकाश किरणांनी व्यापून टाकणारा सूर्य जसा सर्वसाक्षी आहे तसा आत्मा सर्व सृष्टी व्यापून राहिला आहे.सद्गुरू कृपेने या ज्ञानाचा साक्षात्कार होऊन अज्ञानाचा अंध:कार लयास जातो.हिरवा आणि पिवळा रंग एकत्र मिसळून निळा रंग दिसतो.स्फटिक मात्र दोन रंगाचे मिश्रण नसून तो स्वयंभू आहे तसा आत्मा.अज्ञानाची कुलपें उघडण्यासाठी सद्गुरु कृपा रुपी ज्ञानकिल्ली हाती लागावी लागते असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या ज्ञान बोधाने विवेकरूपी पूर्ण बोधाचा सूर्य उदयास आला.


2564

परेहूनी कैसें पश्यंती वोळलें। मध्यमी पणावले सोहंबीज ||१||
वैखरियेसी कैसे प्रगट पैं जालें। न वचे ते बोल एकविध ||
साक्षात्कारें कैसे निजध्यासा आलें। मननासी फावलें श्रवणद्वारें ॥३॥
सुखासुख तेथें जालीसे आटणी। एका जनार्दनी निजमुद्रा ||४||


भावार्थ


मानवी देहातील आत्मतत्व परमात्म्याचे अंशरूप आहे हे सोहंबीज ( मी परमात्म्याचे अंशरूप आहे हे ज्ञान ) परावाणीतून पश्यंती वाणीत स्फुरले,तेथून मध्यमेत (कंठात) उतरले ) आणि सद्गुरू मुखातून वैखरीवाटे प्रगट झाले.श्रवणाने या गुरुबोधाचा निजध्यास लागला.मननाची अवीट गोडी लागली,सुख दुःखाचा विसर पडला.परमार्थाचे हे रहस्य एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.


2565

स्वयंप्रकाशामार्जी केले असें स्नान । द्वैतार्थ त्यागून निर्मळ जाहलों ॥१।।
सुविरोई वस्त्र गुंडोनि बैसलों । भूतदया ल्यालो विभूती अंगीं ।।२।।
चोविसापरतें एक वोळखिले। तेवि उच्चारिलें मूळारंभी ।।३।।
आकार हारपला उकार विसरला । मकरातीत केला प्रणव तो ||
अकर्म सर्व सांडियेल्या चेष्टा । तोचि अपोहिष्ठा केलें कर्म ।।५।।
संसारासी तीन ओंजळी घातले पाणी। आत्मत्वालागुनी अर्घ्य दिलें ।।६।।
सोहं तो गायत्री जप तो अखंड। बुद्धिज्ञान प्राप्त सर्वकाळ ॥७॥
एका भावें नमन भूतां एकपणीं । एका जनार्दनीं संध्या जाहली ।।8।


भावार्थ


स्वयंप्रज्ञेच्या प्रकांशात शुचिर्भूत होऊन द्वैताचा त्याग केला आणि मनाची मलीनता धुवून टाकली.भूतदयेची विभूती अंगाला लावून वैराग्याचे वस्त्र परिधान केले.चोविस तत्वा- पलिकडील पंचविसावे तत्व ओळखून प्रारंभीच त्या नामाचा उच्चार केला.अकार तो ब्रह्मा,उकार तो विष्णू,मकार तो महेश्वर हे द्वैत हरपले.कर्म आणि अकर्म यांचे सायास सोडून संसाराला तिलांजली दिली.आत्मतत्वाला अर्घ्य देवून सोहंम् या गायत्री मंत्राचा अखंड जप सुरू केल्याने बुध्दीज्ञान प्राप्त झाले.विश्वातील सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी एक आत्मभाव निर्माण झाला.असा पारमार्थिक अनुभव एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.


2566


झाली संध्या संदेह माझा गेला। आत्माराम हृदयीं शेजें आला ॥धृ०॥
गुरूकृपा निर्मळ भागीरथी। शांति क्षमा यमुना सरस्वती।
असीपदें एकत्र जेथें होती। स्वानुभव स्नान मुक्तस्थिती ॥१॥
सद्बुद्धीचे घालूनि शुद्धासन । बरी सद्गुरूची दया परिपूर्ण ।
शमदम विभूती चर्चुनी जाण । वाचे उच्चारी केशव नारायण ॥२।।
बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां ।
भक्ति बहीण धाऊनि आली गांवा। आतां संध्या कैशी मी करूं केव्हां ॥३॥
सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण। जन नोहे अवघा हा जनार्दन ।
ऐसें ऐकतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणिली निज खूण ।।४।।


भावार्थ


सद्गुरुंची कृपा देह-मनाची मलीनता धुवून टाकणारी निर्मळ भागीरथी आहे.शांति ही मनाला गोपाल कृष्णाच्या रासक्रीडेचा आनंद देणारी यमुना असून क्षमा ही अंतरांत गुप्तपणे वास करणारी सरस्वती आहे.गंगा, यमुना,सरस्वती यांच्या संगमात मनाचा आप-पर भाव विरून जातो.सारे भेदाभेद संपून जातात आणि मन मुक्त झाल्याचा अनुभव येतो.सद्गुरू कृपेने प्राप्त झालेल्या सद्बुद्धीचे आसन घालून,शम-दमाची विभूती (राख) फासून वाचेने केशव नारायणाचा नामजप सुरू केला.त्यायोगे ज्ञानबोध पुत्ररूपाने उदयास आला.ममतेची बंधने तुटून पडली.प्रेमळ भक्तीभाव भगिनी रुपाने भेटीस आला.या भक्तिभावाने मन ईतके आनंदून गेले कीं,नित्यकर्म सहजपणे विरून गेली.जन हाच जनार्दन या सत्याची प्रचिती आली.मनाचा संदेह नाहीसा झाला आणि हृदयांत आत्माराम प्रगटला.हा पारमार्थिक अनुभव या अभंगात एका जनार्दनीं वर्णन करतात.


2567


स्थूल देहाचा विचार । हातां आलिया साचार ।
तेथें देहें अहंकार। विरोनी जाये ||१||
स्थूल ब्रह्मज्ञान नेत्रीं। स्थूलभोग जागृति वैखरी।
हे नव्हे मी ऐसा अंतरीं । बोध झाला ।।२।।
मग देहें मारितां तोडितां । पूजितां कां गांजितां ।
नसे हर्षे खेदवार्ता । तया पुरूषा ॥३॥
एका जनार्दनीं । लीन झाला संतचरणीं।
दर्पणामाजी बिंबोनि । दर्पणातीत ॥४॥


भावार्थ

स्थळ,काळाने मर्यादित असलेल्या,डोळ्यांना दिसणार्या या स्थूल देहाचा आणि त्यामुळे लाभणार्या नश्वर भोगांचा विचार केला तर या क्षणभंगूर देहाविषयीं वाटणारा अहंकार गळून पडतो. हा स्थूल देह म्हणजे मी नव्हे याचा बोध अंत:करणाला होतो.असा बोध झाला कीं,या देहाची पूजा केली काय किंवा मारले किंवा तोडले काय त्याचा आनंद किंवा खेद करण्याचे कारण नाही.या संत-वचनाचा बोध झाल्याने एका जनार्दनीं संतचरणीं शरणागत होतात.आत्मस्वरूपाचे ज्ञान होऊन देहातीत होतात.


2568


ऐसी बाढलिया सद्वासना। तेथें जिराली मनाची कल्पना।
इंद्रिये विषय प्राणा। बोध जाला ||१||
लिंग विष्णु स्वप्न कंठस्नान । काल्पनिक भोग जाण।
वाचा मध्यमा ऐसी खूण। मिळोनी ठेली त्या पदा ।।२।।
तेथें इंद्रिया ऊर्वसी। आलीया सेजेसी।
जयाचिया मानसीं। काम नुठी ॥३॥
एका जनार्दनीं बोध ।अवघा झाला ब्रह्मानंद ।
लिंग देहाचा खेद । वस्तु जाला ॥४॥


भावार्थ

जेव्हां साधकाला आत्मबोध होतो तेव्हां सद्वासना वाढतात आणि मनातील तर्क-वितर्क,कल्पना लयास जाऊन इंद्रिये,त्यांचे विषय,यांचा बोध होतो.देहाचे सारे भोग काल्पनिक वाटू लागतात.सद्गुरू वचनाची खूण मनाला पटते.ऊर्वशी सारख्या अप्सरेच्या कामविलासाने सुध्दां मनांत कामवासनेचा उद्भव होत नाही.एका जनार्दनीं म्हणतात,सद्गुरू वचनाचा असा बोध झाला कीं,लिंग देहाचा खेद होत नाही आणि ब्रह्मानंदाचा अनुभव येतो.


2569

आतां कारण जें अज्ञान । तेंही गेलें घोसरोन ।
बोधाचे आसन। बैसलें तेथें ।।१।।
कारण रूप सुषुप्ति। आनंद भास हृदयीं प्राप्ती ।
या समस्ताची वस्ती। वस्तु झाली ।।२।।
ऐसा असोन वोहोट झाला । ज्ञानरसे भरला ।
मग सर्वाठायी देखिला । आत्मबोध ।।३।।
एका जनार्दनीं आत्म्याची भेटी । तेथें उडाली त्रिगुण त्रिपुटी ।
मग बोधासी राहटी। जेथें तेथें ।।४।।


भावार्थ


साधकाला आत्मबोध होऊन त्याची देहबुध्दी (अज्ञान) नाहिसे होते.बोधाचे आसनावर सुषुप्तिची प्राप्ती होवून अंतरांत ज्ञानरसाचा आनंद दाटून येतो.सर्व चराचरांत हेच आत्मतत्व व्यापून राहिले आहे याची खात्री पटते.एका जनार्दनीं म्हणतात,या आत्मबोधाची सत्यता प्रत्ययास आली कीं,सत्व,रज,तमोगुणाची त्रिपुटी लोप पावते आणि एकच परमात्मा सगुण आणि निर्गुण स्वरुपांत प्रगट होतो.

महाकारण देह

2570

महाकारण जे देहज्ञान । त्याचाही साक्षी आत्मा आपण।
जैसा सेजे ये आंबा मुरोन । तैसा तो जाण ॥१॥
ऐशी मुराली तुर्या अवस्था। मग साक्षी जाला परीता।
तो मुरोनि वस्तुता। वस्तु जाला ॥२॥
ऐशी विवेकाची राबणूक । विवेक आत्मा वोळख।
एका जनार्दनीं परम सुख । प्राप्त जालें ॥३॥


भावार्थ


महाकारण देहज्ञान साधकाला तुर्या अवस्थेत प्राप्त होते.पाडाला आलेला अंबा अढींत घालून मुरवला कीं,जसा रसरशीत मधूर होतो तसा साधक तुर्या अवस्थेत आत्मरुपाने सर्वसाक्षी होतो.एका जनार्दनीं सुचवतात, ही विवेकाची जाण आली कीं,परमोच्च आत्मसुख अनुभवास येते.

नवविधा भक्ति

2571

नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगू आतां ॥१||
एक एक नाम पठता प्रात:काळी। पापा होय होळी क्षणमात्रे ।। २।।
श्रवणें परीक्षिती तरला भूपती। सात दिवसां मुक्ति जाली तया ।।३।।
महाभागवत श्रवण करूनी। सर्वांगाचे कान केले तेणे ॥४॥
श्री शुक आपण करूनी कीर्तन । उद्धरिला जाण परीक्षिती ।।५।।
हरिनाम घोषे गर्जे तो प्रल्हाद स्वानंदे प्रबोध जाला त्यासी ॥६॥
स्तंभी अवतार हरि प्रगटला। दैत्य विदारिला तयालागीं ।।७।।
पादसेवनाचा महिमा स्वयें जाणे रमा। प्रिय पुरूषोत्तमा जाली तेणें ॥८॥
हरी पदांबुज सुकुमार कोवळे । तेथें करकमळे अखंडित ।।९।।
गाईचिया मागे श्रीकृष्ण पाउलें। उध्दवे घातले दंडवत ॥१०॥
करूनी वंदन घाली लोटांगण। स्वानंदें निमग्न जाला तेणें ।।११।।
दास्यत्वे मारूती अर्चे देहस्थिती।सीताशुद्धी कीर्ति केली तेणें ।।१२।।
सेव्य सेवक भाव जाणे तो मारूती। स्वामी सीतापती संतोषला ॥१३।।
सख्यत्व स्वजाति सोयरा श्रीपति। सर्वभावें प्रीति अर्जुनासी ।।१४।।
उपदेशिली गीता सुखी केलें पार्था । जन्ममरण वार्ता खुंटविली ॥१५।।
आत्मनिवेदन करूनियां बळी । जाला वनमाळी द्वारपाळ ।।१६॥
विट पाऊल भूमी घेऊनी दान । याचक आपण स्वयें जाला ||१७||
नवविधाभक्ति नवजणे केली । पूर्ण प्राप्ती जाली तयालार्गी ॥१८॥
एका जनार्दनीं आत्मनिवेदन। भक्ति दुजेंपण उरलें नाहीं ।।१९।।


भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं नवविधा भक्तिचे श्रद्धेने आचरण करून अविनाशी पद प्राप्त करून घेणाऱ्या नऊ भक्तांची नामकिर्ति वर्णन करून सांगत आहेत.प्रभातकाळी या भक्तांचे पुण्यस्मरण केल्याने महापातकांची होळी होते.



२५७२

हरिकथा श्रवण परीक्षिती सुजाण ऐकतां आपण अंगें होये।
होय न होय ऐसा संशय नाही पूर्णत्व राहे।
राहिले गेले देह ज्याचा तो नेणें देहींच विदेहीं होये।
श्रवण समाधी नीच नवा आनंद ब्रह्माहस्मि न साहे राया ।।१।।
नवविधा भक्ति नवविधा व्यक्ति अवघिया एकची प्राप्ती।
एका जनार्दनीं अखंडता मुक्तीची फिटे भ्रांति राया ।।धृ०।।
हरीच्या कीर्तनें शुक आणि नारद छेदिती ।
अभिमानाचा कंदु । गातां पैं नाचतां अखंड पैं उल्हास कीर्तनीं प्रेमाल्हादू ।
हरिनाम गजर स्वानंदे हंबरे जितिला पायेचा बाधू।
श्रोता वक्ता स्वयें सुखरूप जाला वोसंडला ब्रह्मानंदु राया ॥२॥
हरीचेनि स्मरणे इंद्व दुःख नाही हे भक्ति प्रल्हादा ठायीं।
कृतांत कोपलिया रोमही वक्र नोहे मनी निर्भयता निज देहीं।
अग्नि विष आप नेदी त्या संताप न तुटे शखाच घाई ।
परिपूर्ण जाला देह विदेह दोन्ही नाहीं रया।।३।।
हरिचरणामृत गोड मायेसी उटी चाड लाहे जाली रमा।
चरणद्वय भजतां मुकली द्वंद्वभावा म्हणोनि पढिये पुरुषोत्तमा।
हरिपदा लागली शिळा उद्धरली अगाध चरणमहिमा।
चरणीं विनटोनी हरिपदा पावली परि चरण न सोडी रया ॥४॥
शिव शिव यजिजे हे वेदांचे वचन पृथुराया बाणले पूर्ण ।
पूज्यपूजक भाव सांडोनी सद्भावे करी पूजन।
देवी देव दाटला भक्त प्रेमें आटला मुख्य हे पूजेंचे विधान ।
त्रिगुण निपुटीं छेदुनियां पूजेमाजी समाधान रया ॥५॥
हरिचरण रज रेणू बंदूनिया पावन जाला अक्रूर ।
पावनपणे प्रेमें वोसंडे तेणे वंदी श्वानसुकर ।
वृक्ष वल्ली तृणा घाली लोटांगण घाली हरिस्वरूप चराचर रया ।।६।।
जीव जायो जिणें परि वचन नुलंघणे सेवेचा मुख्य हा हेतु ।
या सेवा विनटोनि सर्वस्वं भजोनि दास्य उदय हनुमंतु ।
शस्त्राचेनि बळे न तुटे न बुडे न जळे देहीं असोनि देहातीतु ।
जन्ममरण होळी कासे भाले बळी भजनें मुक्त कपिनाथु रया।।७।।
सख्यत्वे परपार पावला अर्जुन त्यासी न पुसत दे ब्रह्मज्ञान।
स्वर्गाची खणखण बाणाची सणसण उपदेशा तेंचि स्थान ।
युद्धाचिये संधी लाविली समा कल्पांती न मोडे जाण।
निज सख्य दोघां आलिंगन पडिलें भिन्नपणे अभिन्न रया ||८|
बळी दानदीक्षा कैसी जीवें देउनी सर्वस्वेंसी निजबळे बांधी देवासी।
अनंत अपरंपार त्रिविक्रम सभा आकळिला हषीकेशी।
हृदयींचा हृदयस्थ आकळितां तंव देवची होय सर्वस्वेंसी।
यापरि सर्व देवासी अर्पनी घरीदारी नांदें देवेशी रया ॥९॥
भक्ति हैं अखंड अधिकाराचे तोंड खंडोनि के नवखंड।
एकएका खंडें एक एक तरला बोलणें हें वितंड।
अखंडता जंव साधिली नाही तंव मुर म्हणणे हे पाषांड ।
बद्धता मुक्तता दोन्ही नाही ब्रह्मत्व नुरे ब्रह्मांड रया ।।१०।।
सहज स्वरूपस्थित तया नांव भक्ति नवविधा भक्ति भासती।
ऐसी भक्तिप्रति अंगें रावे मुक्ति दास्य करी अहोराती।
दासीसी अनुसरणे हे तंव लाजिरवाणे मूर्ख ते मुक्ति मागती।
एकाजनार्दनीं एकविधा भक्ति।
चारी मुक्ति मुक्ति होती रया ॥११||



सार

२५७३


वेदामाजी ओंकार सार ।
शाकासार वेदान्त ।।॥
शास्त्र मंत्रामाजी गायत्री सार।
तीर्थ सारामाजी सार गुरूचरणी ।।२।।
ज्ञान सार ध्यान सार।
नाम सार सारामाजी ।।३।।
व्रतामाजी एकादशी सार ।
द्वादशी सार साधनीं ॥४॥
पूजेमार्जी ब्राह्मण सार।
सत्य सार तपामाजीं ।।५।।
दानामाजी अन्नदान सार।
कीर्तन सार कलियुगी ॥६॥
जनामाजी संत भजन सार।
विद्या सार विनीतता ॥७॥
जिल उपस्थ जय सार।
भोग सार शांतिसुख ।।८।।
सुखामा| ब्रह्मसुखसार ।
दुःख सार देहबुद्धी ॥
एका जनार्दनी एका सार ।
सर्व सार आत्मज्ञान ॥१०॥


उपदेश कलिप्रभाव

2574

येऊनि नरदेही वायां जाय। नेणें संतसंग कांही उपाय ॥१।।
कली वाढलासे अधमब्राह्मण सांडिती आपुलें कर्म ॥२॥
शुद्ध याति असोनि चित्त। सदा नीचाश्रय करीत ।।३।।
देवपूजा नेणे कर्म। न घडे मानसंध्या धर्म ॥४॥
ऐसा कलीचा महिमा। कोणी न करी कर्माकर्म ।।५।।
एका जनार्दनी शरण। घडो संतसेवा जाण ॥६॥


भावार्थ




2575


मंत्रतंत्रांची कथा कोण। गाइत्री मंत्र विकिती ब्राह्मण ।।१।।
ऐसा कलीमाजी अधर्म ।करिताती नानाकर्मे ॥२॥
वेदशास्त्री नाहीं चाड। वायां करिती बडबड ।।३।।
एका जनार्दनीं धर्म । अवघा कलीमाजी अधर्म ॥४॥


2576

कलीमाजी नोहे अनुष्ठान । कलीमाजी नोहे हवन ।
कलीमाजी नोहे पठण । नोहे साधन मंत्राचे ।।१।।
नोहे योगयागविधी। नसती अंगी ये उपाधी।
वाढतसे भेदबुद्धी। नोहे सिद्धी कोणती ॥२॥
न चले कर्माचे आचरण । विधिनिषेदाचें महिमान ।
लोपली तीथे जाण। देवप्रतिमा पाषाण ||३||
नठाके कोणाचा कोठे भाव अवघा लटिका वेवसाव।
एका जनार्दनीं भेव । जेथें तेथें वसतसे ॥४॥


२५७७

कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हे गूढ वायां शास्त्र ।।१।।
आपुलाला धर्म नाचरती जनीं। अपीक धरणी पीक न होय ॥२॥
अनावृष्टि मेघ न पडे निर्धार । ऐसा अनाचार कलीमाजी ॥३।।
एका जनार्दनीं नीचाचा स्वभाव । न कळे तया भाव कोण कैसा ||४||


२५७८

पंडित शास्त्री होती नीच याती। त्यांचे ऐकताती नीति ते धर्म ॥१||
शा स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन। होती भ्रष्ट जाण मद्यपी ते ॥२॥
नीचाचे सेवक करती घरोघरीं। श्वानाचिये परी पोट भरती ।।३।।
एका जनार्दनीं आपुला स्वधर्म । सानियां वर्म होती मूढ ।।४।।


२५७९

या पोटाकारणें न करावें तें करिती।
वेद ते विकिती थोर याती ।।१।।
नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण।
ऐकती ब्रह्मज्ञान त्यांचे मखें ।।२।।
श्रेष्ठवर्ण होउनी नीचकर्म करिती।
कांहीं न ते भीती पुण्यपापा ।।३।।
एका जनार्दनी सांडोनि आचार ।
करिती पामर नानामतें ॥४॥


२५८०

कलियुगामाजी थोर जाले पाषांड ।
पोटासाठी संत जाले उदंड ॥१।।
नाहीं विश्वास संतदया मानसीं।
बोलती वायांविण सौरस अवघा उपहासी ।।२।।
वेद पठण शास्त्रे संभाषे पुराणमत ।
अवघे बोधोनि ठेविती बोलती वाचाळ मत्त ।।३।।
देव भजन संतपूजन तीर्थ महिमान न कळे मूढा।
ऐसें कलियुगी जाले जाणत जाणत दगडा ।।४।।
एका जनार्दनीं काया वाचा राम जपा।
सो हे साधन तेणे नाहे पुण्यपापा ।।५।


२५८१

अल्प ते आयुष्य धन कलीं।
मर्यादा हे केली संतजनीं ॥१॥
जनमय प्राण न घडे साधन ।
नोहे तीर्थाटन व्रत तप ।।२।।
असत्याचे गृह भरले भांडार।
अवघा अनाचार शुद्धबद्ध ॥३॥
एका जनार्दनी म्हणोनि येते कींव।
बुडताती सर्व महाडोहीं ॥४॥


२५८२

कोण मानील हा नामाचा विश्वास ।
कोण होईल उदास सर्वभावें ॥१॥
कलियुगा- माजी अभाविक जन ।
करती उच्छेदन भक्तिपंथा ।।
शा नानापरीची मते नसती दाविती।
नानामंत्र जपती अविधीनें ।।३।।
एका जनार्दनीं पातकाची राशी ।
नाम अहर्निशीं न जपती ॥४॥


२५८३

वंदूं अभाविक जन। ऐकावें साधन पावन ।
कलियुगीं अज्ञान । अभाविक पैंहोती ॥१॥
न कळे श्रुती वेदशास्त्र । पुराण न कळे पवित्र ।
जान ध्यान गायत्री मंत्र। जप तप राहिलें ॥
शा यज्ञ यागादिक दान। कोणां न कळे महिमान।
अवघे जाहल अज्ञान । न कळे कांहीं ॥३॥
लोपले मंत्र औषध । गाईस न निघे दुग्ध।
पतिव्रता ज्या शुद्ध । व्यभिचार करिती ॥धा
ऐसियाने करावें काय। तिहीं ध्यावें विट्ठल पाय।
एका जनार्दनीं ध्याय। विठ्ठल नाम आवडी ॥५॥


वेषधाऱ्याच्या भावना

२५८४

कलिमार्जी दैवतें उघड दिसती फार। नारळ आणि शेंदूर यांचा भडिमार ॥१॥
लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचे धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ।।२।।
तेल रांधा मागती मलीदा वरती काजळ कुंकू। फजीतखार एम देव तयाचे तोडावर धुंकू ॥३॥
एका जनार्दनीं सर्वभावे सोपा पंढरीराव। तया सांडोनि कोण पुसे या देवांची कासया माव॥४॥


२५८५

भक्त रागेला तवकें। देव फोडोनि केले कुटकें ।।१।।
कटकट मूर्ति मागुती करा। मेण लावुनी मूर्ति जडा॥२।।
न तुटे न जळे काही न मोडे। त्या देवाचे केले तुकडे ।।३।।
रांडवा म्हणती आगे आई। कैसा देव फोडिला बाई॥४।।
जवळींच शुद्ध असतां देवा। भक्तांसी पडिला सदेवो ॥५॥
शाळीग्राम शुद्ध शिळा हारपलीया उपवास सोळा ।।६।।
चवदा गांींचा बांधिला दोरा। तोहि अनंत नेला चोरा ॥७॥
अनंतासी अंतु आला। भक्ता तेथे खेदु जाहला ।।८।।
एका जनार्दनी भावो। नाहीं तंव कैंचा देवो ।।९।।


२५८६

देव म्हणती मेसाबाई। पूजा अर्चा करिती पाही ।।१।।
नैवेद्य वहाती नारळ। अवधा करिती गोंधळ ॥२॥
बळेंचि मेंढरे बोकड मारिती। सुकी रोटी तया म्हणती ।।३।।
बळेंचि आणिताती अंगा। नाचताती शिमगी सोंगा ॥४॥
सकळ देवांचा देव। विसरती तया अहंभाव ॥५।।
एका जनार्दनीं ऐसा देव । येथं कैसा आमुचा भाव ।।६।।


२५८७

प्रेमें पूजी मेसाबाई। सांडोनियां विठाबाई ।।१।।
काय देईल ती वोंगळा । सदा खाय अमंगळा ।।२॥
आपुलीये इच्छेसाठीं। मारी जीव लक्ष कोटी ।।३॥
तैसी नोहे विठाबाई। सर्व दीनाची ती आई॥४॥
न सांडीची विठाबाई। एका जनार्दना पाहीं ।।५।।

२५८८

सांडोनिया विठाबाई। कां रे पूजितां मेसाई॥१॥
विठाबाई माझी माता। चरणों लागो इचे आतां ॥२॥
अरे जोगाई तुकाई। इजपुढे बापुड्या काई॥३॥
एका जनार्दनी माइश आई। तिहीं लोकीं तिची साई॥४॥


२५८९

आलों ऐकोनी खंडोबाची थोरी। वाधा होऊनि मज मागा म्हणती वारी ।।१।।
ठकलों ठकलों वाउगा सीण। थारी मागतां पोट न भरे जाण ॥२॥
सदा वागवी कोटंबा आणि झेंडा। भेटवा मज पंढरीरावो॥४॥
रांडापर्पोरें त्यजिली जालों काळतोंडा॥३॥
गेले दोनी ठाव आतां कोर्ट उरला वाव । एका जनार्दनों

२५९०


पूजिती खंडेराव पतर भरिती। विठ्ठल विठ्ठल न म्हणती अभागी ते ॥१।।
लावूनिभंडार दिवटा घेती हाती। विठ्ठल म्हणतां लाजती पापमती ।।२।।
ऐसियासी भाव सांगावा तो कवण। एका जनार्दनी काया वाचा शरण ॥३॥


२५९१

फजितीचे देव मागती पुटीरोटी। आपणासाठी जगा पीडिती काळतोंडे मोठी ॥१॥
नको तया देवा आठव मजसी । विठ्ठल मानसीं आम्ही ध्याऊं ॥२॥
अविचारी देव अविचारी भक्त । देवाकारणे मारिती पशुधात ॥३॥
एका जनार्दनीं जळो जळो ऐसा देव तो भांड। विठ्ठल विठ्ठल न म्हणे त्याचे काळे तोंड ।।४।।


२५९२

म्हणती देव मोठे मोठे। पूजिताती दगडगोटे ।।१।।
कष्ट नेणती भोगिती। वहा दगडातें म्हणती ।।२।।
जीत जीवा करूनि वध। दगडा दाविती नैवेद्य ।।३।।
रांडापोरें मेळ जाला। एक म्हणती देव आला ||४||
नाक घासूनी गव्हार । देवा म्हणती गुन्हेगार ।।५।।
एका जनार्दनीं म्हणे। जन भुलले मूर्खपणें ॥६।।


२५९३

पाषाणाची करूनि मूर्ति। स्थापना करिती द्विजमुखें ।।१।।
शा तयां म्हणताती देव । विसरूनी देवाधिदेव ।।२।।
मारिती पशूच्या दावणी। सुरापाणी आल्हाद जयां ।।३।।
आमुचा देव म्हणती भोळा। पहा सकळां पावतसे ॥४॥
ऐशा देवा देव न म्हणे कोणीही। एका विनवी जनार्दनीं ॥५॥


२५९४

प्रतिमेचा देव केला। काय जाणे ती अबला ।।१।।
शा नवस करिती देवासी। म्हणती पुत्र देई वो मजसी ॥२।।
न कळेचि मूढा वर्म। कैसे जाहालेंसें कर्म ।।३॥
प्रतिमा केलीसे आपण । तेथें कैंचें देवपण ।।४।।
देव खोटा नवस खोटा। एका जनार्दनीं रडती पोटा ।।५।।


२५९५

देव दगडाचा भक्त तो मेणाचा। ऐका दोहींचा विचार कैसा॥१॥
खरेपणा नाहीं देवाचे ते ठायी। भक्त अभाविक पाहीं दोन्ही एक ।।२।।
एका जनार्दनीं ऐसें देवभक्तपण। निलाजरे जाण उभयतां ।।३।।


२५९६

करूनि नवस मागती ते पुन । परी तो अपवित्र होय पुढे ।।१।।
नासोनियां धर्म करी वेडेचार । भोगिती अघोर पापमती ।।२।।
शा सदा सर्वकाळ निंदावे सज्जन। काया परद्रव्या ।।३।।
परनारी देखतां सुख वाटे मनीं । भोगी वित्त हानी पाप जोडे ।।४।।
ऐसिया पामरा दंड तो कोण । तयाचे वदन कृष्णवर्ण ।।५।।
एका जनार्दनीं नवसाचे फळ। कुळी झाला बाळ बुडवणा ||६||


२५९७


जयाचेनि तुटे भवबंधन । तयासी जाण विसरती ।।१।।
करिती आणिकांची सेवा। ऐसे ते अभागी निर्देवा ।।२।।
मुळीच नाहीं देवपण । तेथें करिती जप ध्यान ||३||
विसरूनी खन्या देवासी। भुलले आपुल्या मानसी ।।४।।
सत्य सत्य बुडती जनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥


२५९८


वोस घर वस्तीस काहा। तैसें देवा कोण पुसे ||१||
सांडोनियां पंढरीराणा। वोस राना कोण धांवे ॥२।।
घेती मांसाचे अवदान । देवपण कैंचें तेथें ।।३॥
ऐसिया देवासी पूजणें। एका जनार्दनी खोटें जिणें ।।४।।

२५९९

येउनी नरदेहा भूतातें पूजिती। परमात्मा नेणती महामूर्ख ||१||
दगडाच्या देवासेंदुराचा भार । दाविती वडिवार पूजनाचा ।।२।।
रांडापोरे घेती नवसाची यगाड़। नुगये लिगाड तयाचेनि ।।३॥
आपण बुडती देवा बुडविती। अंतकाळी होती दैन्यवाणं ।।४।।
एका जनार्दनी ऐसिया देवा । जो पूजी गाढवासम होय ||५||


२६००


भजन चालिले उफराटें। कवण जाणे खरे खोटें ||१||
जवळी अमतां देव । भक्तां उपजला संदेह ।।२।।
सचेतन तुळशी तोडा। वाहाती अचेतन दगडा ।।३।।
बेला केली ताडातोडी। लिंगा लाखोली रोकडी ।।४।।
अग्निहोत्रीचा सुकाळ । शमी पिंपळासी काळ ।।५।।
तिन्ही देव पिंपळांत । अमिहोत्री केला घात ।।६।।
मुख बांधोनी बोकड मारा। म्हणती सोमयाग करा ॥७॥
चवदा गांठींचा अनंत दोरी। तो प्रत्यक्ष नेला चोरी ।।८।।
' शालिग्राम शुद्ध शिळा। हारपलीया उपवास सोळा ।।९।।
एका जनार्दनीं एक भाव । कुभाषिका कैंचा देव ।।१०।।


२६०१

प्रतिमा देव ऐसा ज्याचा भाव । न करी निर्वाहो अंगों अंगी ||१||
असतां सर्वत्र बाहेरी अंतरीं। संतुष्टा भीतरी म्हणे देव ।।२।।
तेचि ते द्वारका तेचि हे पंढरी। सर्वत्र न धरी तोचि भाव ॥३॥
तीर्थयात्रा करी देव असे क्षेत्रीं। येर काय सर्वत्री बोस पडलें ।।४।।
पुण्य क्षेत्रीं पुण्य अन्य क्षेत्रीं पाप। नवल संताप कल्पनेचा ॥५।।
एका जनार्दनी स्वत:सिद्ध अस । नाथिलेची पिसे मत वाद ।।६।।


२६०२

देव देही आहे सर्व ते म्हणती। जाणतिया न कळे गती देव नेणे ।।१।।
ऐसे ते भुलले देवा विसरले। तपताती वहिले करूनी कष्ट ।।२।।
देवाची ती भेटी नाहीं जाहली तया। शिणताती वायां कर्महीन ॥३॥
एका जनार्दनीं जवळी असानी देव । कल्पनेनें वाव केला मनें ॥४॥


२६०३


सर्वात्मक भरला देवो । तेथें न ठेविती भावो ।।१।।
ऐशी भुलली कर्मासी। आचरती ती दोषासी ।।२।।
शा सर्व ठायी व्यापक हरी। कोण द्वेषी कोण वैरी ॥३॥
ऐसे अभागी ते हीन । भोगिताती जन्मपतन ॥४॥
नको ऐसें ब्रह्मज्ञान । एका जनार्दनीं शरण ||५||


२६०४


देव सर्वाठायीं वसे। परि न दिसे अभाविकां ।।१।।
शा जळी स्थळी पाषाणी भरला । रिता ठाव कोठे उरला ॥२॥
जिकडे पाहे तिकडे देव । अभाविकां दिसे वाव ।।३।।
एका जनार्दनी नाहीं भाव । तंव तया न दिसे देव ॥४॥


२६०५


लटिक्या भावाचें। देवपण नाहीं साचें ।।१।।
भाव नाहीं जेथें अंर्गी। देव पाहतां न दिसे जगीं ॥२॥
सर्व काळ मनीं कुभाव। जैसा पाहे तैसा देव ।।३।
लटिकी भंड फजिती । एका जनार्दनी निशिती ॥४॥


२६०६

देही असोनियां देव । वाउगा करिती संदेहो ॥१॥
जाय देवळासी स्वयें। मी आशा दुसरी वाहे ।।२।।
बैसोनी कीर्तनी। लक्ष लावी सदां धनीं ॥३॥
करूं जाय तीर्थयात्रा। गोविले मन विचारा ॥४ा
ऐशियासी न भेटे देव । एका जनार्दनीं नाहीं भाव ।।५।।


२६०७

ब्रह्म एक परिपूर्ण । तेथें नाहीं दोष गुण ॥१॥
पराचा देखती जे दोष । तेचि दोषी महादोषी ।।२।
ब्रह्मीं नाहीं दोष गुण। पाहती ते मूर्ख जाण ॥३॥
जे गुणदोषी देखती । एका जनार्दनीं नाडती।।४।।


२६०८

मी तेचि माझी प्रतिमा । तेथें नाहीं आन धर्मा ॥१॥
तेथे असे माझा वास । नको भेद आणि सायास ।।२।।
कलियुगी प्रतिमेपरतें। आसना साधन नाहीं निरूतें ॥३॥
एका जनार्दनीं शरण। दोन्ही रूपं देव आपण ॥४॥



ब्राह्मण

२६०९


स्नानसंध्या शौचाचार । स्वधर्म नावडे साचार ।।१।।
कनकफळ नाम गोमटें। बाहेर आंत दिसे कांटे ।।२।।
शरीर श्वेत निर्नासिक । तोंडाळ ओढाळ पतिनिंदक ॥३॥
ऐशी आचारहीन बापुडीं। एका जनार्दनी न धरी जोडी ॥४॥


२६१०


सुंदर विभूती लावी अंगी। मिरवी जगीं भूषण ।।१।।
घालूनियां गळां माळा । वागवी गवाळा वोंगळ ।।२।।
नेणे कधी योगयाग । दावी सोंग भाविकां ।।३।।
एका जनार्दनीं भाव । नाहीं तेथें कदा देव ॥४॥


२६११


द्रव्याचिया लोभे। तीर्थामध्ये राहती उभे ।।१।।
सांगती संकल्प ब्राह्मण। तेणें निर्फल तीर्थ जाण ॥२॥
संकल्पाने नाड। उभयतां ते द्वाड।।३।।
संकल्पाविरहित धन। एका जनार्दनीं पावन ।।४।।
नवल दंभाचे कौतुक। अग्नहोत्री म्हणती याज्ञिक ||5।।
मंत्रतंत्राची कथा कोण । मुख्य गायत्री विकिती ब्राह्मण ।।6।।
आम्ही स्वधर्मनिष्ठ पावन । दंभे म्हणती आपणा जाण ।।7।।
दांभिकांची भक्ति वाव । एका जनार्दनीं नाहीं ठाव ।।8।।






२६१३

वेदाचिया बोला कर्मातें गोविला । परी नाहीं भजला संतालार्गी ।।१।।
शा घोकूनियां वेद द्वैत नवजाय। वाउगाची श्रम तया ॥२॥
तया अद्वैताच्या वाटां जाय तो करंटा। शीण तो अव्हाटा आदिअंत ।।३।।
एका जनार्दनीं संतांसी शरण। गेलीयां पठण सर्वजोडे ||४||


विद्यावंत

२६१४

विद्या जालिया संपूर्ण। पंडित पंडिता हेळसण ।।१।।
धन जालिया परिपूर्ण। धनाढ्यासी हेळसण ॥२॥
कळतां आत्मज्ञान स्थिति । भलत्या सर्वे वाद घेती ॥३।।
वृशिका अंगी विष थोडें । तैसा वादालार्गी चढे ॥४॥
भुलोनि पामर । एका जनार्दनीं बुडवी घर ।।५।।


बेदपाठ

२६१५

वेदविधि कांहीं न कळे पाठका । गुणदोष देखा मलीन सदा ॥१॥
दशग्रंर्थी ज्ञान होतांचि जाण । निंदितो देखोन भलत्यासी ।।२।।
सर्व ब्रह्मरूप ऐसे बोले वेद । तेथें वादावाद उरला नाहीं ॥३॥
ओऽहं सोऽहं कोऽहं नाही ठाव। उगेचि गौरव मिरवी ज्ञान ॥४॥
एका जनार्दनीं ब्रह्मज्ञानासाठी। हिंडताती कोटि जन्म घेत ।।५।।


२६१६

वेद वोलिला जो जो गुण । तो तो नव्हेचि पठण ॥१॥
वेदें सांगितले न करी। ब्रह्मद्वेषो दुराचारी ॥२॥
न करा सुरापान । कन्या-गो-विक्रय जाण ।।३।।
ऐसी वेदाची मर्यादा। न कळेचि मतिमंदा ॥४।।
निजमुखें स्वयें बोले वेदु । न करावा परापवादु ।।५।।
एका जनार्दनीं शरण ।वेदाचें नोहे आचरण ।।६।।